Now Reading
मोकळा श्वास

मोकळा श्वास

Menaka Prakashan

SEGAM INFOTEC चं ऑफिस. रात्रीचे आठ वाजले होते. चारुल, नेहा, रूपेश, सगळे आपापली टर्मिनल्स शट डाऊन करून केव्हाच गेले होते. पण हातातलं काम उरकल्याशिवाय राही निघणार नव्हती. खरंतर तिच्याशिवाय दुसरी कुणीही स्त्री संध्याकाळी सातनंतर थांबत नसे, पण राहीला कशाचंच काही वाटेनासं झालं होतं. आई म्हणते तशी ती आता दगड झाली होती.

तिला वाटायचं, बरोबरच आहे आईचं. दगडावर पाय पडला, तरी जखम आणि दगड फेकून मारला, तरी जखमच! दोन्ही वेळेला नुकसान दुसर्‍याचंच. दगडाला काहीच होत नाही.
राहीनं आजचं टाईम शीट पूर्ण केलं अन् बर्‍याच वेळानं मान वर करून बघितलं. कोपर्‍यात शेवटच्या क्युबिकलमध्ये संदीप अजूनही काम करत होता. राहीला आश्चर्य वाटलं. बहुतेक आठ-नऊ महिन्यांपूर्वीच आपण याच्या लग्नाला गेलो होतो… आणि याला फारसा कामाचा लोड पण नाहीये, असं चारुल म्हणत होती. मग हा अजून गेला का नाही?
‘…’
तिनं ऑफिस बॉयसाठी बेल वाजवली. त्यानं एक-एक दिवा घालवायला सुरुवात केली. राही बॅग उचलून निघाली. पाठोपाठ संदीप पण आला. दोघंही लिफ्टपाशी थांबले.
‘‘आजकाल फार लोड आहे का कामाचा?’’ ती.
‘‘नाही, नेहमीचंच. मी थांबलो म्हणून का?’’
लिफ्टमध्ये जाता जाता ती म्हणाली, ‘‘तसं नाही, अगदी थांबणाराच काम करतो आणि बाकीचे काम उडवून लावतात वगैरे आशा मेंटॅलिटीची नाहीये मी. सहज विचारलं.’’
त्यानं बराच पॉझ घेतला.
‘‘खाली थोडा वेळ बसूया? कॉफी घेऊया? उद्या सुट्टीच आहे.’’ त्यानं विचारलं.
पुन्हा तिला आश्चर्य वाटलं.
‘याला घरी जायची घाई नाहीये का?’
‘‘हो, चालेल.’’ ती म्हणाली.

दोघं एक टेबल पकडून बसले. ते एक महागडं कॉफी शॉप होतं.
‘‘मी कॉफीला लगेच ‘हो’ म्हणाले, तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं?’’
‘‘ ‘हो’ म्हणालात म्हणजे वेळ आहे, बस. आश्चर्य काय त्याच्यात.’’
‘…हा खरंच इतका सरळ आहे, की नाटक करतोय.’ ती आठवू लागली. ‘काय नाव याच्या बायकोचं… हां.. सीमा…’
‘‘सीमा काय म्हणते?’’
‘‘अतिशय मजेत.’’
‘‘ती पण जॉब करते का?’’
‘‘नाही, घरीच असते’’
‘…याच्याशी संवाद कसा वाढवायचा. दोन शब्दांत उत्तर देतो हा.’
‘‘घरी अजून कुणी असतं का? म्हणजे तुमची आई, किंवा…’’ मधेच तो बोलला.
‘‘आईसोबत राहायला ती तयार नव्हती. मग आईच म्हणाली, ‘मी गावी जाते.’ आता ती तिथे एकटीच असते.’’
‘‘आई खूपच समजूतदार दिसते तुमची.’’
‘‘…घ्या कॉफी.’’
तिनं कॉफी स्वतःच्या पुढ्यात घेतली.
संदीपनं मोसंबी ज्यूस मागवला होता.
‘‘कॉफी आवडत नाही का?’’ ती.
‘‘असं काही नाही.’’
तिला वाटलं, हा माणूस एक गूढच दिसतोय.
‘‘मला घरी जाऊन लेख पूर्ण करायचाय. या शनिवारच्या पुरवणीसाठी. तुम्ही वाचता?’’
‘‘तुमचं सगळं लिखाण वाचतो मी. खूप छान लिहिता तुम्ही.’’
‘‘थँक्स! तुम्ही पण लिहिता ना कविता वगैरे? मी वाचल्यात तुमच्या कविता.’’

त्याचे डोळे चमकले. ‘‘हो, मी देईन माझ्या कविता तुम्हाला वाचायला. केव्हापासून खूप तीव्र इच्छा आहे, काव्यसंग्रह प्रकाशित करायचाय. फार कोंडमारा होतो हो माझा…’’ त्यानं जसे पुढचे शब्दच गिळले. तो एकदम सीरिअस झाला. परिस्थितीनं माणूस एकदम अंतर्मुख व्हावा तसा…
साडेतीनशे रुपयांचं बिल आलं. ते अगदी सहज देऊन तो म्हणाला, ‘‘थँक्स! मला कंपनी दिल्याबद्दल. निघूया?’’
हे एकच वाक्य त्यानं स्वतःहून बोललेलं होतं. बाकी सगळी फक्त उत्तरं होती…
काही पावलं पायी चालल्यावर तो म्हणाला, ‘‘आज आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला.’’
‘‘हो, म्हणजे आज अचानक असं…’’
‘‘तुमचा सल्ला हवाय.’’
तिनं प्रश्नार्थक बघितलं.
‘‘मला आज घरी जायचं नाहीये.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे घरची ओढ नाहीये.’’
‘‘बायको घरी नाहीये ना, ींहशप ळीीं ेर्लींर्ळेीी.’’
‘‘नाही. बायको घरी आहे, म्हणून जायचं नाहीये.’’
‘‘गंमत करताय का माझी? काही महिनेच झालेत लग्नाला. तरीही…’’
‘‘…’’
‘‘संदीप, आपण हे ‘अहो-जाहो’चं भूत काढून टाकू.’’
‘‘ओके, चालेल… तर आठ-नऊ महिनेच झालेत, पण भयानक आहे सगळं.’’
‘हम्मम्म… म्हणजे… याला हे बोलायचंय तर…’ तिला वाटलं.
‘‘हं, बोल संदीप.’’
‘‘तुम्हाला… घरी जायला… नाही… म्हणजे… उशीर…’’ तो चाचरत म्हणाला.
‘‘मी एकटी राहते. म्हणूनच रोज जास्त वेळ काम करू शकते.’’ तिनं प्रसन्न स्मित केलं. ‘‘तू बोल.’’
पुन्हा दोघं जुहू बीचच्या काठानं बाकावर बसले.
‘‘माझं ना…’’ संदीपला बोलवेना.
ती हसली. ‘‘बोल ना पुढे.’’
‘‘सीमाला माझ्याशी संसार करायचा नाहीये.’’
‘‘काही खास कारण?’’
‘‘मी आवडत नाही तिला.’’
‘‘हे तिला लग्नानंतर वाटायला लागलं, की आधीपासूनच?’’
‘‘आधी ओळख नव्हती.’’
‘‘ओऽऽह! आय अ‍ॅम सॉरी.’’
‘‘छे… No… Don’t be… तिचा दोष नाही. तिनं मला लग्नाच्या आठ दिवस आधीच सांगितलं होतं.’’
‘‘तरीही तुम्ही लग्न केलंत?’’
‘‘हो, तिचं दुसर्‍या कुणावर प्रेम आहे. मी नुसता तिचा केअर टेकर आहे.’’
‘‘This is unbelievable! संदीप, तू माणूस आहेस की कोण? यातून कुणीच सुखी होणार नाही, हे माहीत असतानासुद्ध का…’’
‘‘गम की आहटों से डरके
दरवाजा बंद ना करो,
पिछेसे खुशी
दौडती हुई आती होगी।’’ त्यानं ऐकवलं.
‘‘वाह! क्या बात! कुणी लिहिलंय?’’ तिनं दाद दिली.
इतक्यात त्याला फोन आला.
‘‘हो, येतो’’ म्हणून घाईघाईत त्यानं फोन बंद केला.
त्यानं तिच्यासाठी टॅक्सी मागवली. स्वतः मात्र उलट दिशेनं चालत बस स्टॉपवर गेला.

कुलूप उघडून राही यंत्रवत आत आली. तिची रूमपार्टनर पूजा एक महिन्यासाठी चेन्नईला गेली होती. ती काही दिवस तरी एकटीच होती…

‘आज जवळपास वर्ष झालं, आपण सोबत काम करतोय. बर्‍याचदा कामानिमित्त बोलणं होतं, तितकंच. ऑफिसच्या स्नेहसंमेलनात त्यानं कविता ऐकवल्या होत्या. मग आजच यानं कॉफीचं विचारलं… फारशी जवळीक नसताना…
गंमत म्हणजे माझ्याबद्दल फारसं काही विचारलं नाही… अजब आहे…’
‘फक्त कॉफी आणि ज्युसचे साडेतीनशे रुपये ही रक्कम काही फार नाही, पण… राहुलला कापरं भरलं असतं, ही किंमत वाचून… नाही, तो गेलाच नसता अशा शॉपमध्ये…’ ती मागचं सगळं आठवू लागली.

खूप थाटात राही आणि राहुलचं लग्न झालं होतं. राहुलसारखा इंजिनीअर मुलगा मिळाला, तेही अगदी निर्व्यसनी म्हणून खूष होती राही. आई पण एकदम उत्साहात सगळं करत होती. तिचे वडील दोन वर्षांपूर्वी वारले होते… हार्ट अ‍ॅटॅकनं. त्यामुळे राहीला काही कमी पडू नये, म्हणून आईनं कोण आटापिटा केला होता.

लग्नाच्या दिवशी तिच्या मैत्रिणीनं दोन कोल्डड्रिंक्स आणली दोघांसाठी, तर राहुल पटकन म्हणाला होता, ‘‘दोनाचे पैसे का घालवलेत? हिलाच द्या, मला नकोय.’’
तिनंही भारी शालू घेऊ नये, साध्याच साड्या घ्याव्यात, असं वारंवार सांगितलं होतं त्यानं.
तेवढ्या लग्नविधीच्या घाईतही तिला मागचा प्रसंग आठवला होता. ती आणि राहुल लग्नाची अंगठी घ्यायला गेले होते. मिळून बाहेर जाण्याची त्यांची ती पहिलीच वेळ होती.
तेव्हा तिला खूप भूक लागली होती.
राहुलनं अर्धा किलोमीटर चालवत नेऊन तिला एक वडापाव खाऊ घातला होता. तिला अतिशय मनाला लागलं होतं… आपलं पाहिलं आऊटिंग, अंगठी घेतलीये, आणि हे असं विचित्र वागणं? पण तिनं दुर्लक्ष केलं होतं… वाटलं, नाही कळत काही मुलांना लग्नाआधी आपण कसं वागावं ते… जाऊदे… लग्नात इतक्या धामधुमीतही हे आठवलं होतं तिला.
सगळे विधी पार पडले, विहिणीची पंगत सुरू झाली… संध्यानं आणि बाकी करवल्यांनी त्याचे बूट लपवून ठेवले होते. गंमत चालली होती. ‘‘पाचशे रुपये द्या, मगच परत देऊ.’’ म्हणाल्या. राहुलनं अतिशय प्रेमानं सांगितलं, की ‘एक रुपयाही मिळणार नाही, तुम्हाला काय कारायचं ते करा.’ शेवटी निमाताईंच्या मिस्टरांनी म्हणजे विकासभाऊजींनी पैसे दिले आणि प्रसंग निभावला होता.
लग्नानंतर ते कुठेही फिरायला गेले नव्हते. एवढंच काय, साधं सिनेमा, हॉटेलिंग, खरेदी… काही काही नाही.
भाज्यादेखील शंभर ग्रॅम, पन्नास ग्रॅम अशा आणे तो. पैसे नुसते जमा करायची विकृती. मनमुराद जगणं तर दूर, शरीर जगवण्यासाठी आवश्यक अन्नसुद्धा त्याला फालतू खर्च वाटे…

खरंतर हे सगळं अजिबात आठवायचं नाही, तिनं ठरवलं होतं मनाशी, पण आज संदीपनं सहज पैसे खर्च केले अन् हे डोक्यात आलं.
राहीला वाटलं, आयुष्य किती गमतीशीर असतं नाही, शहाण्या समजूतदार माणसाची प्रखर परीक्षा घेतं आणि लबाड माणसाचं कायमच फावतं.

दुसर्‍या दिवशी रविवार होता. निवांत झोप काढायची ठरवून ती झोपायला गेली.
आईचा फोन आला होता.
‘‘हॅलो राही, तुला गरज वाटत नसेल, पण आम्हाला भेटायचंय तुला. येतेस का उद्या? संध्याही घरीच आहे.’’
आईला राहीची इतकी काळजी वाटायची, पण प्रत्यक्षात बोलायची वेळ आली, की टोमणेच जास्त असायचे. तिच्या राहीकडून अपेक्षा होत्या. जरा जास्तच.
राहीला पण ओढ असायची घराची. आईला, संध्याला भेटायची, पण प्रत्येक सुटीत ठाणे गाठायला नको वाटायचं.
आईचं कसंबसं समाधान करून ती झोपी गेली.

‘फुले सभागृहा’त आज गुलजार यांच्या कवितेचा कार्यक्रम होता. सोबतीला जावेद अख्तरही. राही कितीतरी दिवसांपासून अशा कार्यक्रमाची वाट बघत होती.
तिला स्वतःला कला, साहित्य, नृत्य, चित्रकारिता अशा कलेच्या सगळ्या रूपांचं वेड होतं. कुठेही न जाता तासन्तास पुस्तकं वाचायला आवडायचं तिला आणि भटकंती करायची म्हटलं, की त्या भागातली लोककला, तिथली हस्तकला, वास्तू यांचा डोळस अभ्यास असायचा.
शायरी हा वीकपॉईंट असलेली राही ‘गुलजार’ कसं मिस करणार…
तिनं चारुलला विचारलं, ‘‘सोबत येणार का?’’ पण तिला बॉयफ्रेंडबरोबर जायचं होतं.
‘कलेचं वेड माणसाला पैसे विसरायला लावतं, आणि पैसा असल्याशिवाय कलेची कदरही करता येत नाही…’ राही या उपहासानं हसली.
नाट्यगृहाबाहेर बरेच रसिक जमले होते. गुलजार आणि जावेद अख्तर यांचे काव्यसंग्रह विकत घेण्यासाठी गर्दी झाली होती. त्या गर्दीपासून एकटा असा संदीप तिला दिसला. तिला कंपनी मिळाल्याचा आनंद झाला.
‘‘हेऽऽ, यु ऑल्सो!!’’ राही म्हणाली, ‘‘मला खात्री होती, की तू असणार.’’
‘‘कशावरून?’’ संदीपलाही आनंद झाला तिला पाहून.
‘‘आपल्यासारख्यांना लोक गॉन केस म्हणतात.’’ राही हसून म्हणाली.
‘‘असं नाही. इथे आलेले लोक काय सगळेच ‘गॉन’ थोडेच आहेत.’’
‘‘चल, वेळ झाली.’’
संदीपची सीट थोडी पुढे होती. राही तीन-चार रांगा मागे होती.
कार्यक्रम मस्त रंगला होता. गुलजारजींचा भरलेला भारून टाकणारा आवाज, कविता सादर करण्याची जादूमय ढब, सगळंच कसं जीव मोहरून, गुंतून टाकणारं…
ते बोलत होते आणि श्रोते कान देऊन ऐकत होते.

‘मिलता तो बहोत है
जिंदगी में
बस हम गिनती
उसी की करते है
जो
हासील ना हो सका…’ गुलजारजींनी ऐकवलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
अचानक तिचं लक्ष गेलं, संदीपला फोन आला होता आणि तो उठून चालला होता. तिनं खुणेनं विचारलं, त्यानं म्हटलं, ‘‘सीमा…’’
तिला भयानक चीड आली. काय बाई आहे! भरल्या ताटावरून उठवते माणसाला.
तिनं मात्र पूर्ण कार्यक्रम खूप आनंदानं ऐकला.
पुढचे दोन दिवस संदीप ऑफिसला आलाच नाही. तिला कार्यक्रमाबद्दल भरभरून बोलायचं होतं. ‘इतकी अभिजात, दर्जेदार अभिव्यक्ती, जी मनात खोल रुतून बसली होती, ती समजायला माणूसही त्याच ताकदीचा हवा. नाहीतर त्या निर्मितीची फक्त हेळसांडच होते.’
तिनं संदीपला फोन लावला. बर्‍याच वेळा प्रयत्न केला, रिंगही झाली, पण तिकडून रिस्पॉन्सच आला नाही.
तिनं टाईम ऑफिसमध्ये विचारल्यावर कळलं, की त्यानं पाच दिवसांची सुट्टी घेतलीये.
रविवारी ती ठाण्याला आईकडे गेली. जाताना आईसाठी इलेक्ट्रिक हीटिंग पॅड घेतलं. आईची कंबर आजकाल खूप दुखत असे. संध्यासाठी एक छानसा पार्टी गाऊन घेतला.
‘…’
आई खूष होती तिला भेटून.
‘‘आई, हे पंचवीस हजार. खरंतर बँकेतच ट्रान्सफर करणार होते. पण मग विचार केला, नाही हातातच देऊया.’’
‘‘तुला ठेवत जा गं काही, सगळं आम्हालाच देणार का?’’
‘‘आपली कुणाला गरज आहे, आपण कुणासाठी महत्त्वाचे आहोत, ही भावना खूप ताकद देते आई .’’
‘‘अशात काय लिहिलंस? मागच्या दिवाळी अंकाच्या तुझ्या सगळ्या कथा अप्रतिम होत्या राही. आता कथासंग्रह छापू तुझा. लिहिणं बंद नको करू. लिखाण हे विरजणासारखं असतं.’’
‘‘अगं, विरजण काय?’’
‘‘विरजण ना, सर्जनशील असतं बघ. कसं, दोन थेंब असले, तरी भांडभर दुधाचं दही बनवतं… तसं.’’
‘‘आई, किती छान बोललीस तू! वा!! …विरजण!!!’’
‘‘संध्या आली, की जेवायला बसू . मी कुकर लावते.’’
राही विचार करत होती, ‘खरंच आपल्यातलं हे ‘विरजण’ जिवंत असेपर्यंतच आपण काही दर्जेदार साहित्यिक निर्मिती देऊ शकतो.’
कागदावर तिनं एक कविता लिहिली. सुंदर भावपूर्ण कविता.
‘तुझी साधना जगवी श्वास
मनी अश्वासक जागवी आस
नियतीशी मी तुझ्या सोबती
झुंझायाला आले आई …
दाटलेल्या भावना सार्‍या
सांगायाला आले आई…’

हे नकळत तिनं आपल्या आईबद्दल लिहिलं होतं. आता तर वडील नाहीत, पण तसंही त्यांच्या जिवंतपणी त्यांनी कधीच तिची कदर केली नाही. तिला लिखाणाची आवड होती, आवाजही खूपच छान होता, पण तिचं मन त्यांनी कधी जाणलंच नाही.
एकत्र कुटुंब, जबाबदार्‍या… पार दबून गेली होती ती.

‘‘हेऽऽ दीदी! दीड महिन्यानं आलीस!’’ संध्यानं येऊन मिठी मारली.
‘‘हे बघ, तुला काय आणलंय.’’
‘‘वॉव! खूप खूप छान आहे.’’ संध्या खूष होती.
‘‘राही, तू स्वतःबद्दल काही निर्णय घे आता.’’ आई म्हणाली.
‘‘अगं, इथे आम्ही काय बोलतोय आणि तू मधेच… काय… आई!’’
‘‘पुन्हा तू जायची घाई करशील आणि मुख्य विषय तसाच राहील.’’ आई ठाम आवाजात म्हणाली.
‘‘मी आत जाऊ, की इथे थांबू?’’ संध्या दबकत बोलली.
‘‘तू पण एक जबाबदार सदस्य आहेस घराची. थांब इथेच! …अन् आई, मी पुन्हा लग्न करणारच नाही, असं नाहीये. पण विनाकारण आपल्या आयुष्याची दोरी कुणा अनोळखी माणसाच्या हातात मला अजिबात द्यायची नाहीये.’’
‘‘तूच बघ ना कुणी. पण एकट्यानं आयुष्य काढणं हा शापच आहे बाई.’’
‘‘आणि बाबांसारख्या माणसाबरोबर? तो शाप नव्हता?’’
‘‘झालं, ते पर्व संपलंय आता. माझ्याबद्दल कशाला बोलायचं.’’ आईनं तोडत म्हटलं, ‘‘तुझा विषय सुरू आहे इथे.’’
‘‘आई, मागचं बोलायच नाही ठरलंय ना आपलं. मला भेटलाच कुणी, तर मी स्वतःहून सांगेन तुला. बस? आणि तू दगड म्हणतेस ना मला, मग या दगडाला प्रेमाचा पाझर फुटण्याची शक्यता कमीच आहे.’’ ती एकटीच हसली.
तिच्या ठाण्याच्या प्रत्येक भेटीत आई लग्नाचा विषय काढत असे. तिचंही तर बरोबरच होतं. पण राहुलची तिला आता आठवण पण नको असायची.
आठवणी काय मनाच्या दारावर परवानगी काढून येत नाहीत. नको असताना पुन्हा आठवण आलीच…
लग्नानंतर सुट्टी संपवून पुन्हा जॉईन करताना ती ऑफिसला निघाली होती.
‘‘कधी निघणार तू राही?’’
‘‘साडेनऊला निघेन. मला सरळ ऑफिसपर्यंतची बस मिळेल.’’
‘‘तू बसनं नको जाऊस. बसचं तिकीट आहे सव्वीस रुपये आणि लोकल ट्रेनचं फक्त सोळा रुपये. मग जाऊन-येऊन लोकलच परवडते ना.’’
‘‘पण इथून स्टेशन आणि तिथून ऑफिस मला बरंच अंतर आहे.’’
‘‘मग जायचं ना पायी. रिक्षाचे पैसे वाचतील.’’
पहिल्याच दिवशी तिच्या लक्षात आलं, की हे प्रकरण आपल्या डोक्यात जाणार. एक दिवस ती ट्रेननं गेली. जाऊन-येऊन खूप वेळ पण गेला.
तिनं राहुलजवळ हे सांगितलं, तर तो म्हणाला, ‘‘हे बघ, मी जर पेट्रोल वाचवायचं म्हणून स्कूटर न चालवता पायी फिरू शकतो, तर तुला इतकं तरी जमलंच पाहिजे.’’
अवघड होतं त्याच्यासोबत आयुष्य काढणं. अशा कितीतरी आठवणी काढून तिला हसायला यायचं आता.

सोमवारी सकाळी ती वेळेत ऑफिसला गेली.
संदीप आधीच येऊन कामाला लागला होता.
‘‘हाय! त्या दिवशी तू कार्यक्रम सोडून मधेच निघून गेलास… everything ok?’’
‘‘सॉरी, तुझा फोन उचलायला वेळच नव्हता. नुसता पळत होतो आठ दिवस.’’
‘‘…???’’
‘‘सीमाच्या आईला अचानक अ‍ॅडमिट करावं लागलं . मग काय, ईसीजी, अँजिओास्टी…’’
‘‘‘I cant believe this!!! मला एक नाही कळत संदीप, तुझी अशी कोणती असाहाय्य परिस्थिती होती, की तिनं एवढं स्पष्ट सांगूनही तू लग्न केलंस.’’
‘‘आमच्याकडून पसंती गेल्यावर मग तिनं हे सांगितलं. तिनं मला तशी विनंती केली होती.’’
‘‘संदीऽऽप! जाऊदे . माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे हे सगळं. मला भरपूर काम आहे, मी जाते.’’
काम संपवून जाण्याआधी ऑफिस बॉयनं एक फाईल दिली… आत कागद होता… लिहिलं होतं,
‘उघड्या डोळ्यांनी स्वीकारलेल्या नात्यांबद्दल आता तक्रार कशाला?’ आणखी काहीबाही लिहिलं होतं आणि खाली हसरे चेहरे काढले होते.
तिनं शांतपणे आपलं काम पूर्ण केलं.
उठली तेव्हा संदीप बाहेर उभा राहून तिची वाट बघत होता.
‘‘मिस्टर संदीप, तुम्हाला घरी जायला हवं. सीमा वाट बघत असेल.’’
‘‘नाही, ती आज तिच्या बॉयफ्रेंडबरोबर मूव्हीला गेली आहे.’’
ती उसळून म्हणाली, ‘‘तुला काही पाठीचा कणा नाहीये का? तुझ्याकडे आत्मसन्मान, स्वाभिमान नावाची चीजच नाहीये का?’’
‘‘सगळं आधी ठरलं होतं ना? मग राग कशाचा? …बरं, त्या माझ्या ओळी कशा वाटल्या?’’
‘‘बुळबुळीत, बोथट!’’ ती ताडकन बोलली आणि लिफ्ट सोडून पायर्‍या उतरायला लागली.
संदीप पण तिच्या मागे मागे उतरत बोलला, ‘‘राही, तिच्या मनाप्रमाणे होऊदेत ना सगळं. काही दिवस जातील, पण माझ्याशी कायदेशीर फारकत घेताना तिच्या नजरेत माझं स्थान वेगळं असेल नाही? …तुझ्या भावना समजू शकतो मी.’’
तिनं उत्तरादाखल फक्त मान हलवली.
ती घरी पोचली. पूजा वाटच बघत होती. तिनं राहीचा चेहरा वाचला.
‘‘काय झालं? कुणाशी भांडून आलीस का?’’ पूजा.
‘‘अगं, भांडायला दोन व्यक्ती लागतात!’’
‘‘ओके ओके. शांत व्हा देवीजी!’’
‘‘एका अतिसज्जन माणसाचं हे असं वागणं डोक्यात जातंय माझ्या. एक व्यक्ती म्हणून त्रास होतोय या सगळ्याचा.’’
ती फ्रेश झाली, पूजानं बनवलेली कॉफी हातात घेऊन बसली. संदीपचा काहीतरी मेसेज आला होता.
लिहिलं होतं…
‘जिंदगी ने पूछा,
हमेशा खुष
कैसे रहते हो?
मैने कहा
गम का पाठ पढना
भूल ही गया… (संदीप)’

राहीनं पण उत्तर पाठवलं…
‘दर्द की भी
अपनी एक अदा है
वो भी सहने वालो पे
फिदा है… (गुलजार)’
‘जेवढं सहन करशील, तेवढे अडचणींचे डोंगर वाढतच जातील… राही’ आणि तिनं वैतागून फोन स्विच्ड ऑफ केला.
‘‘का गं कुणाचा मेसेज?’’
‘‘संदीपचा गं…’’
‘‘चांगला वाटतो गं तो मला.’’
‘‘काय कामाचा गं असला चांगुलपणा? त्या सीमाला याच्या पैशावर मज्जा करायचीये. ती सांगतेय स्पष्ट, की तो तिला आवडत नाही, तर मग तिला मोकळं नको करायला?’’
‘‘तुला आवडायला लागला का तो?’’
‘‘आधी मला आपुलकी वाटली, नंतर खूप आश्चर्य वाटलं गं त्याचं. अशीही माणसं आहेत जगात असं… पण आता मला आवडेनासा झालाय त्याचा हा बुळेपणा. चांगुलपणा आणि बुळेपणा यातली रेषा कळावी माणसाला.’’
‘‘मग बोल ना तू . रोज भेटतो ना? बोल घडा घडा. तुझा साथीदार म्हणून विचार…’’
‘‘मला आत्ता तरी कुठलाच निर्णय घ्यायचा नाहीये.’’

लंच अवरमध्ये ती मुद्दाम त्याच्यासोबत बसली.
‘‘मी काही कविता पाठवल्या होत्या, वाचल्या?’’ त्यानं अधीरपणे विचारलं. कवितांचा विषय निघाला, की त्याचा चेहरा काहीसा दारुण, काहीसा विचित्र होतो का?… अशी शंका आली तिला. पण म्हणाली, ‘‘हो रे, मी अभिप्राय पण दिला की. एक विचारू?’’
‘‘गो अहेड.’’
‘‘तू सीमाचा केअर टेकर म्हणून किती काळ राहणार आहेस?’’
‘‘दीपक- तिचा बॉयफ्रेंड- बरा होईपर्यंत.’’
‘‘म्हणजे? त्याला काय झालं?’’
‘‘आठ दिवसांपूर्वी अ‍ॅक्सिडेंट झाला त्याचा… मग अ‍ॅडमिट करणं… हॉस्पिटलमध्ये चकरा…’’
ती एकदम उभी राहिली.
‘‘बस! बस संदीप!! तुला काय चांगुलपणाची नशा चढते का? की महान बनण्याची झिंग चढते?… त्या बाईसाठी आपल्या आईला गावी एकटं ठेवलंस तू? स्टॉप ऑल धिस मॅन!’’
ती तरातरा तिथून निघून गेली.
प्रत्येक वेळी संवादाचा शेवट तिच्या निघून जाण्यात होऊ लागला.

घरी पोचते, तर अत्यानंद झाला तिला, कारण संध्या आली होती. ‘‘हाय दीदी! सरप्राईज!!’’
‘‘किती छान झालं तू आलीस! मी मस्त कॉफी करते, आपण गॅलरीत बसून घेऊया.’’
‘‘दीदी, राहुलभाऊजी आले होते. आईशी बोलून गेले.’’
‘‘आता काय होणारेय येऊन? तुम्ही का त्याला घेतलं घरात?’’
‘‘दीदी, आईला वाटतं…’’
‘‘सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत संध्या! माहितीये का, खर्च जास्त येतो, मूल नको म्हणून मला न सांगता फॅमिली ॅनिंगचं ऑपरेशन करून घेतलं होतं त्यानं. आणखी कितीतरी असह्य गोष्टी आहेत, ज्यामुळे मी पुन्हा त्याच्यासोबत राहण्याचा विचारही करू शकत नाही. आता एक कवयित्री, लेखिका म्हणून स्वतःला घडवायचंय. मागे वळून पाहायचं नाहीये.’’
‘‘अगं हो, तुझा ‘दैनिक पहाट’मधला स्तंभ मस्तय हां दीदी, खूप गाजतोय तो. We are so proud of you didi !! आता आम्हाला ‘द राही’ची आई, बहीण म्हणून ओळखतात. असं मस्त वाटतं ना!… पण दीदी मग त्या संदीपबद्दल काय वाटतं तुला?’’
‘‘चांगलाच आहे गं तो, पण अशा माणसांबरोबर राहणं सुद्धा सोपं नसतं बरं! अति चांगुलपणा फार ओझं देऊन जातो बाबा! श्वास गुदमरतो… पण …बघू!’’

आज कुठेतरी बाहेर जाण्याचा मूड होता. पूजा म्हणाली, ‘‘नॅशनल आर्ट गॅलरीमध्ये खास पेंटिंग प्रदर्शन आहे, माझ्या फेवरेट आर्टिस्टचं. जाऊया?’’
दोघी गेल्या तिथे.
प्रवेशद्वारावरच अत्यंत सुरेख निसर्गचित्र होतं आणि नाव होतं…
‘सीमा हळदकर.’
राही बघतच राहिली. काय एकेक विषय, काय अफलातून रंगसंगती.
तैलचित्रं, वॉटर कलर, पेस्टल, सगळ्या माध्यमांत तितकाच मोकळा वावर.
‘‘खरंच गं पूजा, काय आर्टिस्ट आहे ही!’’
‘‘अगं, सारखी परदेशात असते ही, कुठे कुठे बोलावतात हिला, काय डिमांड आहे हिच्या पेंटिंग्जना! चल, भेटू आपण.’’
‘‘हॅलो सीमा!’’
ती वळली… राही बघतच राहिली.
ही… ही तर…
‘‘हाय! कसं वाटलं माझं काम?’’
‘‘काय प्रतिभा आहे तुमची… प्रत्येक चित्र बघतच राहावं वाटतं इतकं जिवंत!’’ पूजा म्हणाली.
राहीला प्रचंड धक्का होता हा.
‘ही…?? संदीपची बायको? एक जागतिक दर्जाची चित्रकार? मग… तो तर कधीच बोलला नाही.’
नुसता गुंता!

ती हिंमत करून सीमाजवळ गेली.
‘‘सीमा, हाय! मी राही. संदीपच्या ऑफिस…’’
सीमा लगेच म्हणाली, ‘‘ओह! खूप ऐकलंय तुमच्याबद्दल! छान जमेल तुमची जोडी. God bless you both.’’ इतक्यात काही व्हिजिटर्स आले आणि ‘Excuse me’ म्हणून ती गेली…
राहीला गरगरायला लागलं.
तिनं एका खुर्चीचा आधार घेतला… आता हे काय भलतंच!

दुसर्‍या दिवशी ती पूजानं दिलेल्या पत्त्यावर गेली.
छोटंसं पण अतिशय अभरुचिपूर्ण घर होतं ते. आटोपशीर पण अप्रतिम बाग, देखणी मांडणी आणि भिंतीवर सुरेख पेंटिंग्ज… एका कलाकाराचं घर!
‘‘या या!’’ तिनं हसतमुखानं स्वागत केलं.
‘‘मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण काल तुमचा गैरसमज झालेला दिसला, म्हणून आले.’’
‘‘तुम्ही संदीपच्याच ऑफिसमध्ये ना?’’
‘‘हो, त्यानं काय काय सांगितलंय तुम्हाला?’’ राहीनं विचारलं.
‘‘तुमचे पती अनेक वर्षांच्या आजारानं वारले आणि तुम्हाला आधार म्हणून…’’
‘‘तो माझ्याशी लग्न करणार असं?’’
‘‘हो, असंच काहीसं…’’
‘‘मग तुमची स्टोरी ऐका… संदीपच्या नजरेतून बरं का! तुमचं दीपक नावाच्या एका व्यक्तीशी अफेअर आहे. संदीपशी नाईलाजानं दबावाखाली लग्न झालंय…’’
तिनं सगळं सांगितलं.
‘‘…’’
सीमा फक्त कडवट हसली. म्हणाली, ‘‘संदीप एक विकृत माणूस आहे. माझं चित्रकार असणं त्याला लग्नाच्या वेळी भूषण वाटलं, पण लग्नानंतर मात्र त्याला ते सहनच व्हायचं नाही. मी नावलौकिकाला येतेय आणि त्याची अपेक्षित प्रगती नाही, हे त्याच्या डोक्यात राख घालत होतं. संदीपला कवितांचा फार नाद. आपण एक जागतिक दर्जाचे कवी आहोत, असा प्रचंड गैरसमज. मग माझ्याशी लग्न करून किती मोठा त्याग केलाय… असं इतरांना दाखवणं सुरू झालं. आणि कवितेत जीव ओतायचा तर आतून उन्मळून यायला हवं, मन असं पिळवटून जायला हवं, असं काहीसं त्याला वाटायचं. मग स्वतःचं एक-एक आभासी दुःखी जग तो निर्माण करू लागला. लोकांना रंगवून आपलं दुःख, केविलवाणी अवस्था, हे सांगून जबरदस्तीनं काव्यनिर्मिती करू लागला. पण मुळात प्रतिभा असायला हवी, मग काव्यही साथ देतं, बरोबर? नंतर नंतर तर ही विकृती वाढतच गेली. त्या रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’मध्ये कसं त्याला आतून संगीत उन्मळून येण्यासाठी दुःखाची साथ हवी असते, तसं. मग तो खोटं ‘व्हर्चुअल’ दुःखी जग निर्माण करू लागला. कुणीही नवीन व्यक्ती भेटली, की नवीन कथा. आणि मग त्याचा हा नादच बनला. तुम्हाला आणखी काय काय सांगितलंय काय माहीत.
मी पहिल्या पाच-सहा महिन्यांतच इतकी वैतागले… माझ्याशी, स्वतःच्या पत्नीशीच स्पर्धा? माझं खूप नाव आहे, तारीफ होतेय म्हटल्यावर माझी पेंटिंग्ज खराब करणं, त्यावर रंग फासणं, आर्ट गॅलरीचं बुकिंग परस्पर कॅन्सल करणं… सतत काहीतरी निरर्थक खरडून मला ऐकवणं आणि जरा म्हणून दुरुस्ती सांगितली, की आदळआपट करणं. कितीतरी त्रासदायक गोष्टी… शक्य नाही अशा माणसाबरोबर संसार करणं. मी गेल्या चार महिन्यांपासून इथेच राहतेय, निवांत!’’ सीमा खूपच समजूतदार आणि संयमित स्त्री असणार, हे राहीला जाणवलं.

‘‘तुम्ही त्याला कधी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न…’’
‘‘कितीदा! कितीदा तरी केला. ‘संदीप, तू पण छान लिहितोस, थोडं वाचन वाढव, शब्दांना वजन येईल. माझं पेंटिंग, त्याखाली तुझी कविता, असं प्रदर्शन भरवत जाऊ आपण… किती छान वाटेल तरल काव्य आणि तितकंच तरल चित्र… का त्रागा करतोयस?… खूप समजावलं हो. हा त्यापलीकडचा निघाला.’’
सीमानं फारच वेगळं वास्तव पुढ्यात उकलून ठेवलं होतं. राही शहारली होती ते ऐकून. ती म्हणाली, ‘‘बरं झालं तुमच्याशी बोलणं झालं. त्याच्या माणुसकीच्या, म्हणजे खोट्या माणुसकीच्या ओझ्याखाली दबले होते मी. माझा जीव गुदमरायचा आताशा. आता मात्र सुटका झाल्यासारखं मोकळं मोकळं वाटतंय.’’

दुसर्‍या दिवशी मान मोडून काम केल्यावर निघताना ती संदीपच्या टेबलाजवळ गेली.
‘‘कॉफी?’’ तिनं विचारलं.
‘‘पण माझ्याकडून!’’ तो.
‘‘शुअर!’’
दोघं कॉफी शॉपमध्ये बसले.
‘‘मग काय ठरवलंस सीमाबद्दल?’’
‘‘काय, दीपक बरा झाला, की ती जाईल त्याच्याबरोबर.’’ त्याचा दांभिकपणा.
राही नुसतीच एकटक रोखून बघत होती.
‘‘काय झालं? अशी का बघतेस?’’
‘‘का संदीप? का हे सगळं? इतकं खोटं? कुणाच्या नजरेत महान बनायचं होतं? फार बरं झालं, मी सीमाला भेटले. तुझ्या महानपणाचं ओझं गुदमरवत होतं मला. दम कोंडायचा माझा. कवी म्हणवतोस स्वतःला! जो कलाकार दुसर्‍याच्या कलेची कदर करू शकत नाही, तो कसली कलाकृती देणार? स्वच्छ नजरेनं जगाकडे बघ संदीप! दु:ख उगाळून नाही, तर आयुष्याला पॉझिटिव्हली सामोरं जाऊन, आहे तसं स्वीकारून जगलं, तरच कविता उत्स्फूर्तपणे उमलू शकते. ओढूनताणून, कण्हत कुथत नाही. जी स्वप्नं तू बघितलीस, ती पूर्णत्वाला नेण्यासाठी धडपड, किंवा स्वतःला आणखी पैलू पाडण्याचा प्रयत्न न करताच तू सीमावर शिंतोडे उडवतोयस? दुसर्‍या कलाकाराला कमी लेखून त्याचं नुकसान करणारा स्वतः कलाकार असूच शकत नाही!’’
इतकं सगळं पोटतिडकीनं बोलून तिला दम लागला होता.
तिनं संदीपचा निरोप घेतला आणि वरिष्ठांकडे ब्रँच बदलून देण्याचा अर्ज केला. काही दिवसांतच तिला ठाण्याला घराजवळची ब्रँच मिळाली.
आई आणि संध्या अतिशय खूष झाल्या. संध्याच्या लग्नाचं पण बघायचं होतं.

राही न थांबता पुढे जात राहिली. तिचं एक नाही, दोन पुस्तकं प्रकाशित झाली. तिच्या कथासंग्रहाला वाचकांनी डोक्यावर घेतलं होतं. साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संग्रहांचा तिला पुरस्कारही मिळाला होता. तिचे लेख वर्तमानपत्र गाजवत होते. लवकरच एक काव्यसंग्रह पण प्रसिद्ध होणार होता. त्यानंतर अनेक ठिकाणी तिच्या मुलाखती, कार्यक्रम झाले. काही ठिकाणी सीमाबरोबर प्रदर्शनंही भरवली. सीमाचं पेंटिंग, खाली राहीची अप्रतिम कविता. बघणार्‍याला दुहेरी मेजवानी.
मुळातच प्रगल्भ असलेली तिची लेखणी आता आणखीनच धारदार झाली होती. आईदेखील बर्‍याच सुधारणा सांगायची. आईची अर्धवट लेखणी राहीच्या रूपानं पूर्ण होत होती.
आता तिला कोणत्याही राहुल अथवा संदीपची गरजच नव्हती. आता ती खर्‍या अर्थानं जगत होती, भरभरून मोकळा श्वास घेऊन!

– अपर्णा देशपांडे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.