Now Reading
मुसलमान

मुसलमान

Menaka Prakashan

शाळेत डेव्हिड हा नव्यानं रुजू झालेला अमेरिकन शिक्षक होता. असाच ३१ डिसेंबर आला आणि त्यानं सहज नववीच्या मुलांना ‘माझे नव्या वर्षातले संकल्प’ असा निबंधाचा विषय लिहायला दिला. वह्या तपासायला म्हणून दुसऱ्या दिवशी गठ्ठा ओढला, तर त्याला एकदम धक्का बसला. वीसपैकी एकाही वहीत कुणीही निबंध लिहिलेला नव्हता. उलट प्रत्येक विद्यार्थ्यानं, ‘हे ‘तुमचं’ नवीन वर्ष आहे, ‘आमचं’ नाही. आम्ही आमचा इस्लाम नववर्ष इस्लामी तवारीखप्रमाणे पाळतो. जे आमचं नाही, त्या विषयी आम्ही लिहिणार नाही,’ हा ‘मेसेज’ त्याला लिहून पाठवला होता.

सगळ्या वीस वह्या पानं वासून टेबलावर पडल्या होत्या. विभागप्रमुख म्हणून प्रकरण माझ्याकडे आलं. डेव्हिडची नाराजी त्यानं बोलून दाखवली. त्याचं म्हणणं, ‘सगळं जग ही कालगणना वापरतं. हे लोकही हीच तारीख व्यवहारात पाळतात. मग यात न लिहिण्यासारखं काय? पण मी अमेरिकन आहे, ख्रिश्चन आहे हा यांचा प्रॉब्लेम… आमचं इंग्लिश, आमच्याशी व्यापार, डॉलर हे तेवढं यांना हवं असतं, आणि असे विषय आले, की यांना इस्लाम सुचतो!’ त्याची गाडी आता जागतिक विषयांकडे चालली होती. कुणी राष्ट्र, धर्म इत्यादी संवेदनशील विषयांमध्ये, अभ्यास न करण्याची कारणं शोधू लागला, की मी स्वत: लगेच सावध होते. इथे डेव्हिडचं म्हणणं अगदीच अनाठायी नव्हतं, परंतु शाळा ही आदर्श संस्था मानली असल्यानं त्यात अशा ‘वेगळ्या’ विचारांचा उद्वेग शक्यतो होऊ नये, यासाठी सगळेच काळजी घेतात. त्याचं सगळं ऐकून घेतल्यावर त्याला विचारलं, ‘‘एवढं सगळं कळल्यावर मुलांनी याच विषयावर लिहावं, असं तू कम्पल्शन करणारेस का?’’

मूळ व्यक्तिस्वातंत्र्यवादी संस्कृतीतून आलेला डेव्हिड चटकन उठला नि म्हणाला, ‘‘छे, छे! शिक्षक म्हणून विषय देण्याचं काम माझं, लिहायचं न लिहायचं त्यांचं स्वातंत्र्य मी कशाला नाकारू? फक्त कारणाचा जरा त्रास झाला म्हणून तुझ्यापर्यंत आलो.’’ वह्या गोळा करून तो निघून गेला.

विषय संपला, पण विचार संपला नाही. मला माझे सुरुवातीचे दिवस आठवले. थायलंडबद्दल माहिती देणारा एक उतारा होता. वाचताना ‘अवघड शब्दांखाली रेषा मारा, नंतर अर्थ पाहू,’ हे नेहमीप्रमाणे चाललं होतं. आठवीच्या वर्गातल्या सगळ्या बावीस मुला-मुलींनी Buddha या शब्दाला अधोरेखित केलं होतं. ते पाहून मलाही असाच धक्का बसला होता. या मुलांना साधा बुद्ध कसा माहीत नाही! (भारतीय हिंदू) सुपरवायझरीण बाईंना ही गोष्ट सांगितली, त्यांनी ठोकळेबाजपणे सांगून टाकलं, ‘‘इतर धर्माशी संबंधित काही असेल, तर सरळ तो पाठ वगळा आणि पुढे चालू लागा. सिल्याबस कम्प्लीट करणं महत्त्वाचं.’’

रामकृष्ण, बुद्ध, महावीर, येशू, पैगंबर, त्यांची प्रार्थनास्थळं, सर्वधर्मसमभावाच्या प्रार्थना अशा संपन्न ‘भारतीय’ वातावरणात माझं स्वत:चं शिक्षण, नोकरी आणि लोकांत वावरणं झालेलं असल्यामुळे बाईंचं म्हणणं माझ्या मनाला आलं नाही. तसंच पाठ निम्मा शिकवून झाल्यानं, तो वगळता येणार नव्हता. मग मी आपली बुद्धाबद्धल सगळी बेसिक माहिती सांगणारं एक प्रेझेंटेशन तयार केलं आणि त्यांना समजेल असं सांगितलं. त्यावर त्यांनी इतर चार शब्दांचे अर्थ जसे समजून घ्यायचे, तसा नि तेवढाच ‘बुद्धा’चा अर्थ समजून घेतला. मलाही ते त्या परिस्थितीत पुरेसं होतं. पण इतर धर्माचं असेल तर टाळून पुढे चला, असे सरसकट निर्णय घेऊ नयेत, एवढं मला त्या छोट्या प्रसंगातून कळलं. अशा चिकित्सक गोष्टी टाळायच्या असतील, तर मग लिबरल शिक्षणपद्धतीचा उपयोग काय? आपण कोणत्याही धर्माला का घाबरतो? धर्म दूर का ठेवतो? मुस्लिमांना इतर धर्माबद्धल माहिती देणं म्हणजे आपण त्यांच्या धर्मात हस्तक्षेप करतोय, हे आपणच ठरवून घ्यायचं, या भारतीय मानसिकतेची उत्तरं मला अजूनही कळत नाहीत. जिथे जिथे आवश्यक आहे, तिथे तिथे इतर धर्माबद्धल शिक्षक म्हणून माहिती दिली, तर त्यानं मुलांची समज वाढते. त्यांना त्यांच्याच कोषात तसंच ठेवणं हे कुणाच्याच हिताचं नाही, ही गोष्ट राजकारणात धर्माचं कार्ड जगभरात प्रबळ होत असताना जास्त महत्त्वाची होते आहे.

आज शिकत असलेला मुलगा-मुलगी पुढच्या पाच ते आठ वर्षांत जगाच्या कुठल्या देशात असेल, कुठल्या समूहात वावरत असेल, याची काहीच शाश्वती राहिलेली नाही. जर आपण नोकरी, धंदा, शिक्षण, तंत्रज्ञान, खानपान, करमणूक, जगभरातल्या समस्यांवर मतं नोंदवण्यापुरते का होईना, पण गतिशील झालो आहोत, तर आपल्या व्यक्तित्वाला व्यापून उरलेल्या धर्मविषयक समजुतींना कसं स्थितिशील ठेवू शकतो?
इतकी वर्षं ओमानी मुस्लिम समाजात घालवल्यानंतर एक गोष्ट मला आता प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे भारतीय आणि अरबी मुसलमान यांच्यातल्या फरकाची! धर्म एकच असला, तरी त्यांची होणारी जडणघडण वेगवेगळी आहे. भारतीय मुसलमान हा त्याच्या भोवती असलेल्या बाकीच्या धर्म, संस्कृतीच्या संपर्कात राहून स्वत:चं वेगळेपण सिद्ध करत राहतो. धर्माचा झेंडा कधी उंच करावा आणि देशाचा कधी हाती घ्यावा, या दोलायमान स्थितीत तो असतो.

एका अर्थानं, त्याचे एकूण व्यवहार हे प्रतिक्रियात्मक जास्त आणि नैसर्गिक कमी आहेत. त्यामुळे आपल्याकडचे मुसलमान बचावात्मक, नाहीतर आक्रमक पवित्रा घेताना आढळतात. त्यांच्या या चलनवलनात माणूस म्हणून जे एक जगणं असतं, ते हरवत चाललं आहे. याउलट बहुतांश अरबी मुसलमानांमध्ये हा स्वत:ला सिद्ध करण्याचा खटाटोप नाही. कारण त्यांचा एक धर्म (यातले पंथभेद तूर्तास बाजूला ठेवते), एकजिनसी समाज, धर्मनियमांचं यमनियमांसारखं पालन करण्याची कठोर वाटावी इतकी व्यवस्था! त्यांचा बहुतांश संघर्ष ख्रिस्ती आणि अमरिका, युरोप या मुक्त संस्कृतीशी आहे. त्यामुळे भारतातल्या मुस्लिमांच्या वागणुकीवरून अरबी मुस्लिमांच्या वागण्याची कारणमीमांसा करणं धाडसाचं ठरेल.

एक साधं उदाहरण. आम्ही इथे घरातल्या घरात गणपती बसवतो. पूजेला येतात ते अर्थात मुसलमानच. यात भारतीय आणि अरबी दोन्हीही असतात. गणपतीची आरती सुरू असताना सगळेच भारतीय मुसलमान टाळ्या वाजवतीलच असं नाही, पण बाकीचं सगळं मस्त ठेका धरून सुरू असतं. भारतीय मुसलमानांतले दोन-चार तरी असे ‘कट्टर’ निघतात, की जे प्रसादाला हसून नकार देतात, किंवा ‘नंतर घेतो’ म्हणतात. पण बाकीचे मुसलमान ‘मुमताज’ म्हणत तो मोदक चाटूनपुसून खातात, ‘आणखी केल्यावर आम्हाला पण द्या’ असं आवर्जून सांगतात. यात चांगलं-वाईट, हा असा तो तसा, असं लेबलिंग न करता पाहिलं, तर एकच धर्म पाळणाऱ्या परंतु वेगवेगळ्या समाजातून, संस्कृतीतून आलेल्या मुस्लिम मानसाचा विचार, प्रतिक्रिया किती भिन्न आहेत, हे लक्षात येतं. ‘भारतातल्या मुस्लिमांची स्थिती’ यापेक्षा ‘युरोप-अमेरिकेतल्या मुस्लिमांची स्थिती’ यावर या समाजाच्या धर्मविषयक प्रतिक्रिया अवलंबून असतात. भारत, हिंदू हे अजूनही त्यांच्या कुतूहलाचे, अनेक गोष्टी नीट समजल्या नाहीत, या सदरातले असतात.

यापाठीमागे कारणं आहेत. आपल्या भारतीय उपखंडातून (भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश) लोक वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं इथे येतात. इथल्या समाजाचे, उद्योगधंद्याचे, सेवाक्षेत्रांचे भाग होऊन राहतात. यापैकी कोणत्याही देशानं यांना कुठल्याही अर्थानं वरचष्मा दाखवलेला नाही. त्यांच्या अंतर्गत, लष्करी, धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ केलेली नाही. इथे यावं, शांतपणे आपलं काम करावं; रियाल, दिनार, दिरहम कमवावेत आणि उतारवयात मायदेशी परतून उरलेली वर्षं सुखात काढावीत, अशी पेट्रोडॉलर-सोनेरी स्वप्नं बहुतेकांची असतात.

त्यामुळे इथल्या मुस्लिम समाजानं बहुतांश भारतीयांना हिंदू-मुस्लिम असे न पाहता, ‘हिंदी’ (भाषा, किंवा धर्म नव्हे, तर भौगोलिक प्रमाण म्हणून अल्‌ हिंद असा उल्लेख) म्हणून पाहिलं आहे. पण अमेरिकेची एकूण अरब जगतातली ढवळाढवळ पाहता, त्यांच्याविषयी फार उदारता दिसत नाही. तीच गोष्ट युरोपियनांच्या बाबतीत. त्यात जर इस्राईल-पलेस्तीन विषय निघालाच, तर मग अरबांचं खवळणं, राग जाणवण्याइतपत दिसून येतो.

शाळेत येणारी मुलं अशा सगळ्या पार्श्वभूमीच्या घरांतून, शिकवणुकीतून, माध्यमांतलं चित्रण बघत बघत शाळेत आलेली असतात. तेव्हा, शिक्षक म्हणून आपली समज, विचार आणि भोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास यांवर आपण तरून जाऊ शकतो. नाहीतर आपल्या समजुती, आपल्या देशातलं राजकारण, आपलं धर्मकारण, भारतातले मुस्लिम व्यवहार इतक्या झापडबंद माहितीवर तुम्ही एखादी ‘नोकरी’ इथे नक्कीच आरामसे करू शकता, पण जेव्हा वयात येणारी मुलं हाताळायची वेळ येते, तेव्हा स्वत:सहित पलीकडे पाहण्याचा कठोर प्रामाणिकपणा लागतो. तरच मुलांमध्ये मिसळून त्यांच्या कलानं काही शिकण्या-शिकवण्याच्या गोष्टी घडू शकतात. नाहीतर हज्जारो रियाल कमावून अनुभवशून्य मनानं घरी परतण्यात काय हशील?

जसा सगळीकडचा ‘हिंदू’ अनेक बाबतींत भिन्न आहे, तसा जगभरात पसरलेला ‘मुसलमान’ही ‘एक’ नाही, आणि त्याला कारण त्याचा भवताल आणि त्या भवतालाला तो देत असेलेली प्रतिक्रिया यातून ही ‘भिन्नता’ येत गेली आहे.

शिवकन्या शशी
shivkanyashashi@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.