Now Reading
मुंजाबा

मुंजाबा

Menaka Prakashan

म्हातार्‍या माणसांनी कसं काठी टेकत सावकाश चालत जाऊन गावाच्या चावडीवर अलगद बूड टेकवावं अन् तिथे बसलेल्या आपल्या इतर वृद्ध सोबत्यांसोबत मनमुराद गप्पा ठोकाव्या. आत्तापर्यंत जगत आलेलं आयुष्य सार्थकी लागल्याबद्दल प्रसन्नतेनं होत जोडावे आणि मिळालेल्या या मनुष्यजन्माबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, टाळ-मृदंग- पखवाजाच्या साक्षीनं विठ्ठलाचा जयघोष करावा. लहान मुलाप्रमाणे मुला-सुनेकडे अन् नातवंडांकडे हट्ट करावेत आणि त्यांनी ते क्षणातच पूर्ण करावेत.

भोरवाडी गावातले सगळेच वृद्ध कमीअधिक प्रमाणात या सर्व गोष्टींचा उपभोग घेत होते. अपवाद होता तो फक्त आणि फक्त मुंजाबा शिंदेचा. मुंजाबा पंचाहत्तरीचा तरी असावा. हां, तसं आता तिरडीवर जायला त्याला अजून पाच-सात वर्षं बाकी असली, तरी आत्तापासूनच त्याला आणखी आयुष्य जगण्यात काहीच राम वाटत नव्हता. ‘हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन क्षणात मरून जावं, नाहीतर अंगावर वीज कोसळावी, विजेचा धक्का लागावा, साप चावावा, चालता चालता विहिरीत पडून बुडावं, या ना त्या प्रकारे कसातरी परंतु एका झटक्यात आपला प्राण जावा,’ असं त्याला सारखं वाटू लागलं होतं.
मुंजाबा कुणाच्याही जवळ जाताच त्याच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळांना अंघोळ करतेवेळी चिकटलेल्या साबणाचा घमघमाट येत असे. कपाळाला शेंदूर लावत असल्यामुळे त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीच्या नखात कायम शेंदूर दिसे. भेदरलेल्या डोळ्यांनी तो आजूबाजूची सृष्टी न्याहाळे आणि क्षणोक्षणी कपाळाला येणारा घाम डोक्यावरच्या भगवान टोपीनं पुसे.

ब्रह्मसकाळी अंघोळ करावी. कपाळी दंडगोलाकार केशरी गंध लावून त्याच्या मधोमध काळा बुक्का लावावा आणि काठी टेकत ‘हारी इठ्ठल… इठ्ठल’ तोंडाशी पुटपुटत सावकाश चालत चालत मंदिराजवळ जावं. तिथे चावडीवर बसलेल्या दोस्तांची आपुलकीनं अन् मनापासून विचारपूस करावी.
‘‘आरं काय शिरप्या, आहेस तरी कुठे इतक्या दिस भ्याटला न्हाईस?’’
आणि शिरप्यानं तिरसटपणे त्याला उत्तर द्यावं,
‘‘आरं, ह्या काय तुह्यासमोरच बसलेलो हाय… दिसत न्हाय व्हय तुला? डोळं फुटलं की काय तुव्ह?’’
असं घडताच मुंजाबा कावराबावरा होऊन उगीच इकडे तिकडे बघे आणि हसून डोळे मिचमिचे करून अपमान रिचवे.
एकेकाळी मुंबईला कापड गिरणीत कामाला असलेला मुंजाबा. दिवस कशा पद्धतीनं फिरतील याचा काही नेम नाही! गिरणीत संप झाला म्हणून काम सोडून वयाच्या चाळिसाव्या वर्षी पुन्हा गावी येऊन त्यानं बस्तान बसवलं. गिरणीतून कमावलेली सगळी मिळकत जमिनी सुधरवण्यात घातली. काही गुंठे जमीन खरेदी करून नदीवरून पाईपलाईन करून वावरात पाणी आणलं. शेणामातीचं का होईना, छोटंसं घर बांधलं. दोन्ही मुलांची थाटामाटात लग्नं लावली. अख्ख्या कुटुंबाचा गाडा एकहाती सांभाळून मुलांची आयुष्यं स्थिरस्थावर केली. एवढं करूनसुद्धा त्याची मुलं त्याला नीट सांभाळत नव्हती. मुलं आज या वृद्ध बापाला कस्पटासमान वागवताहेत, यापेक्षा वाईट आणखी कोणतं असू शकतं?
‘‘झक मारली आणि पोरांना वाटप करून धिली. च्यायला! सहनही होईना आणि सांगताही येईना. गेल्या वर्षी मंगला वारली आणि त्यानंतर भांडाण नको म्हणून दोन्ही मुलांची वाटणी करून धिली… आन इथंच आयुष्य गंडलं पगा…’’ मुंजाबा सगळीकडे सांगायचा.
‘‘च्यायला! म्हातार्‍याचं लयच आवघड हाये… म्हातारं कदीबी कण्हत बसतंय.’’ समोरचाही मन हेलावून बोलायचा.

उत्तम आणि दत्तू या दोन्ही मुलांनी घरादाराची वाटणी झाल्या झाल्या मुंजाबाला गचपणात टाकलं होतं. त्यांच्यासोबत दोन सुना आणि सहा नातवंडं एवढ्या मोठ्या गलक्यात राहणारा मुंजाबा वाटप झाल्यापासून एकदम एकटा पडला होता. जमीन आणि घराचं वाटप होईपर्यंत मुलांनी आणि सुनांनी त्याला देवाप्रमाणे पुजलं होतं, पण आता आडवाटंला शेंदूर फासलेल्या दगगडावाणी त्याची अवस्था झाली होती.
सहा महिने थोरला लेक उत्तमकडे, तर पुढचे थंडी-पावसाचे सहा महिने धाकटा लेक दत्तूकडे राहायचं, असं ठरल्याप्रमाणे तो राहत होता.
‘माह्या आधी देवानं मंगलाला नेलं, हे एक बरं झालं. नाह्यतर लेकांचे हे हाल तिला तर अजाबातच सोसावले नसते.’
सहा फुटी उंचीचा, शिडशिडीत बांध्याचा, टोकदार नाकाचा, एकेकाळी रंगीत फेट्यालाही इस्त्री करून झोकात मिरवणारा हा बागायतदार आज पार युद्ध हरलेल्या राजासारखा भकास झाला होता. हात पाठीमागे बांधून जमीन धुंडाळत चालताना कुणी अचानक आवाज देताच मुंजाबा धांदलीनं मान फिरवून बघे आणि गडबडीत उगीचच बोले, ‘‘हां, बरं चाललंय समदं.’’ समोरचा हसून पुढे निघून जायचा. त्याला नेहमी वाटायचं, हा आपल्या परिस्थितीवरच हसतोय की काय?
त्याच्या नेमकी उलट परिस्थिती मुंजाबाचा सख्खा धाकटा भाऊ विष्णूतात्या शिंदे याची होती. विष्णूचं घर मुंजाबाच्या बाजूलाच होतं. त्याचा मोठा बंगला होता. त्यालाही दोनच मुलं होती, पण ते सगळे गुण्यागोविंदानं राहत होते. नातवंडं मुंबई-पुण्याला जाऊन गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर होते. त्याहीपेक्षा सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विष्णूची मुलं आणि इतर गावकरी विष्णूला आदरानं वागवत होते. त्याची ऊठबस करत होते.
गावकरी बोलायचे, ‘‘तो तसा आणि हा असा!’’

जास्त फरक नव्हता. मुंजाबा पंचाहत्तर, तर विष्णूतात्या बाहत्तर-त्र्याहत्तर वयाचा असेल. भावाला इतकं सुखी बघून मुंजाबाची चिरफाड होत असायची. अपमानानं अन् उपेक्षेनं गांजलेला, रापलेला मुंजाबा भावाला सदान्कदा आनंदानं उसळताना, हसताना खिदळताना बघायचा आणि त्याच्या हृदयात कालवाकालव व्हायची. हे सुख आपल्या नशिबी का नाही? कुठे चुकलं आपलं? काय कमी केलं आपण पोरांना? विष्णूनं जे संस्कार केले तेच आपणसुद्धा तर केले…
एक दिवस काढून मुंजाबा घरातून पिशवी घेऊन बाहेर पडला. निघताना तो फक्त एवढंच बोलला, ‘‘रामभाऊकडं चाललोय… येरवाळ होईल यायला.’’ त्याला कुणी काही विचारलंही नाही. रामभाऊ हा मुंजाबाचा मुंबईत गिरणीमध्ये काम करतानापासूनचा जिवाभावाचा सखा होता, हे घरच्यांना माहिती होतं. पाच-सहा महिन्यांतून हा तिकडे जात असतो, नाहीतर तो इकडे येत असतो, हे त्यांना माहिती होतं.
वसंत ऋतू असल्यानं सूर्य डोक्यावर यायच्या आधी रामभाऊच्या गावी म्हणजे निरगुडसरला पोचायचंच, या इराद्यानं तो निघाला होता.
रामभाऊच्या बंगल्यात पाऊल ठेवताच मुंजाबाचा सगळा शीण निघून गेला. इतका प्रवास करून इथे येताच मात्र त्याच्या अंगात उत्साह संचारला.
ही अशी एकच वास्तू त्याच्या आयुष्यात होती, जिथे त्याला समाधान मिळत होतं. रामभाऊ मुंजाबाच्याच वयाचा. रामभाऊ आणि त्याचा संपूर्ण परिवार कायमच त्याची खातिरदारी करत असे.

रामभाऊची वडलोपार्जित जमीन तब्बल वीस एकर होती. तीसुद्धा भीमाशंकर साखर कारखाना टच. रामभाऊनं शेतीत चांगलाच जम बसवला होता. प्रचंड बोलबच्चन, शिवाय छक्केपंजे करणारा हा मोठा शातीर गडी! खर्‍याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यात वस्ताद. रामभाऊला गावात प्रचंड आदर होता. गावातली वाटप करायची असो, वा छोटेमोठे तंटे असो, जे पोलिसदरबारी सुटायचे नाहीत, ते रामभाऊच्या बंगल्यात सटासट सुटत असत.
मुंजाबाला अचानक आलेलं बघताच रामभाऊ गडबडला. ‘आत्ता अचानकच गडी?’ त्याला एकटा आलेला बघून रामभाऊला आश्चर्य वाटलं. कायतरी गडबड झाली असावी, हे त्याला उमजलं. दुपारी दोघांची जेवणं झाली. आज मात्र मुंजाबा नेहमीसारखा बोलत, हसत नसल्याचं रामभाऊच्या नजरेत आलं, पण त्यानं मुंजाबाची अडचण स्वतःहून विचारली नाही. तो स्वतःहून कधी सांगतोय हे तो बघत राहिला.
‘‘बरं रामभाऊ, निघू का?’’ मुंजाबा चुळबूळ करत म्हणाला.
‘‘आत्ता इतक्या लवकर?’’ नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर निघत असल्यानं रामभाऊनं कपाळाला आठ्या पडत विचारलं.
‘‘बरं… बाकी निवांत ना मुंज्या… काय गडबड नाय ना? पोरं-सुना नीट बगतात ना? तरास तर नाय ना कसला?’’
‘च्याक…च्याक’ आवाज करून उगीच गडबडीत तोंडावर हसू आणत मुंजाबा बोलला,
‘‘नाय नाय, तसलं काय नाय बा… एकदम निवांत.’’

मुंजाबा घुटमळला. पुढे काय बोलावं आणि काय नाही हेच त्याला सुचेना…
‘‘किती वर्सं झाली आपल्या दोस्तीला… तुला काय आजला नाय ओळखीत मी. इकडं पग… माह्या डोळ्यांत पगून बोल मुंज्या… सगळं ठीकाय करून.’’
रामभाऊ कणखर आवाजात बोलला तसा मुंजाबा गंभीर झाला… थोडा घुटमळला अन् खूप प्रयत्न करून ‘‘समदं चांगलं हाय,’’ असं मोडक्यातोडक्या आवाजात बोलला ना बोलला तोच रामभाऊला घट्ट मिठी मारून बिलगला आणि हंबरडा फोडून ओक्साबोक्शी रडू लागला.
‘‘मोकळा हो… रडून घे… आन काय झालंय ते सपष्ट सांग पगू…’’
खरं म्हणजे रामभाऊला हे काही नवीन नव्हतं. खटल्यातली डोकं फोडेपर्यंतची भांडणं, ही अशी रडारडी हेच तो आयुष्यभर बघत आला होता. पण या वेळेस माणूस काळजाच्या पार जवळचा होता. दोघंही एका कोपर्‍यात बसले. हायवेवरून वाहनांची ये-जा सुरू होती, पण बस थांब्यावर चिटपाखरूही नसल्यानं सगळं सामसूम होतं.
मुंजाबाला आपण इतके ढसाढसा कधी रडलो होतो ते आठवेना… आई गेली तेव्हा? गेल्या वर्षी बायको मंगला वारली तेव्हा? की कापड गिरणी सोडत होतो तेव्हा? डोक्यावरच्या चुरगाळलेल्या फेट्यानं मुंजाबानं चेहरा पुसला आणि काकुळतीला येऊन बोलला,
‘‘रामा… मंगीची लय आठवण येतेय रं… ती गेल्यावं पोरांना वाटप करून धिली… आन आता पार गबाळगत झालंय आविष्य… लेक-सुना नीट सांभाळत नाय पग. थोडं जरी कुठं चुकलो, तर घरचे असे काय अंगावर धावून येतात का जनमभराचा दोष केलाय. दिस दिसभर उपाशी ठेवतात. कुठं जायाचं झालं, तर माही चालायची काठी लपवून ठेवतात. लय वंगाळ आविष्य होऊन गेलंय. जमीन आणि घर मिळालं आन पोरं जित्याजागत्या बापाला इसरून गेली… जुलूम होतोय माह्यावर. जग लयच रगील झालंय पग… कोण कोन्हाला सुदरना…’’
‘‘आलं समदं माह्या धान्यात… काय गडबड झालीये ते. आता शांत बस पगू… करतो म्या बराबर सगळं.’’ पाच-सात मिनिटं कोण कुणासोबत बोललं नाही आणि मग अचानक काहीतरी ध्यानात येऊन रामभाऊ अचानक हसू लागला. मुंजाबाला समजेचना हा का हसायला लागलाय.
‘‘हे लय बेस मार्ग हाय पग… तू एक काम कर… आता हिथून फुडं मी सांगतो त्ये नेमानं कर… जमत आसंल तर पुढं चालू… जमतंय का?’’
‘‘न जमून जातोय कुठं मी? तू बोलतील ती पुरव दिशा.’’ मुंजाबा बोलला.
‘‘आपण कापड गिरणीतून गावी आलो, तवा दोगांनी मिळून दोन एकर जमीन हिकडं निरगुडसरमध्ये घेतली हुती… त्येची आज ऐंशी लाख रुपये किंमत झालीये.’’

मुंजाबाचे डोळे पांढरे झाले. ‘दोन एकर जमीन? माही आन रामभाऊची? इतकी मौल्यवान आपली जमीन होती आणि आपल्या आठवणीतही नाही? वृद्धापकाळामुळं आपल्याला स्मृतिभ्रंश झाला की काय?’ त्याला आतून गुदगुल्या झाल्या आणि दिवसा चांदण्या दिसू लागल्या.
‘‘आरं, पर कदी घेतली हुती?’’ खूष होऊन मुंजाबानं विचारलं.
‘‘आरं, घेतलेली नवती बाबा… हे तुला ठावं हाय… मला ठावं हाय… पण तुह्या मुलांना असं दाखवायचं, की तुही जमीन आजून हाय… त्या जमिनीपायी प्वारं लालची हुतील आन मंक पग कशी चाकरी करतील तुही.’’
मुंजाबानं डोक्याला हात लावला अन् सातमजली हसत म्हणाला,
‘‘आरं तिहायला… रामा, लेका मानलं बुवा तुला… पण खरंच हे आसं होईल का?’’
रामभाऊ छद्मी हसत बोलला,
‘‘आविष्य म्हणजे ना सापा-मुंगसाचा ख्योळ हाय. कदी आपण साप आसतो आन नशीब मुंगूस आसतं, तर कदी आपण मुंगूस आन नशीब साप आसतो… ह्यो खेळ खेळण्यातच मजा हाय पग.’’
मुंजाबाला रामभाऊचं बोलणं पटलं. मान वाकडी करून एक डोळा बारीक करून कपटीपणानं रामभाऊनं मुंजाबाला विचारलं,
‘‘जमतंय का?’’
मुंजाबासुद्धा कपटीपणानं बोलला, ‘‘जमतंय…’’
तसं दोघेही छद्मी हसले.

दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी कोवळी उन्हं ढगांमधून सुट्टी होण्याच्या पहिल्या प्रहरातच रामभाऊ त्याच्या तरण्या नातवासोबत चार चाकीनं मुंजाबाच्या घरी आला आणि त्यानं एकट्यानंच मुंजाबासोबत पडवीमध्ये तास-अर्धा तास खलबतं केली आणि आला तसा वार्‍यासारखा निघून गेला. फक्त जाताना चौकात बसलेल्या माणसांसोबत काहीतरी बोलला तेवढंच! रामभाऊनं येताना हातात लाल रंगाच्या कापडामध्ये गुंडाळलेली काही कागदपत्रं आणलेली मुंजाबाच्या लेका-सुनांनी, नातवंडांनी, भावांनी, भावांच्या पोरांनी, त्यांच्याही पोराबाळांनी सगळ्यांनी बघितली आणि शिंदेंच्या घरात एकच गलका उडाला. या कानाची खबर त्या कानाला, त्या कानाची खबर आणखी तिसर्‍या कानाला, असं होत होत अख्ख्या भोरवाडीत एकच खबर पसरली.
‘मुंजाबाची रामभाऊच्या गावात स्वतःच्या नावावर एक एकर जमीन अजून शिल्लक हाय. तीस-चाळीस वर्षांपूर्वी त्या दोगांनी मुंबईहून आल्यानंतर गिरणीतल्या मिळालेल्या पैशांतून ती जमीन घेतली हुती आणि त्येचा सौदा आता सुरू हाय. नाय म्हटलं, तरी गुंठा दोन लाख परमानं एक एकराला ऐंशी-नव्वद लाख कुठंच जात न्हायत.’

झालं… बोंब उठली. अन् मुंजाबाच्या अख्ख्या घरात त्रेधातिरपीट उडाली. आता बापाची जमीन म्हंजे ती आपलीच जमीन झाली की! या उक्तीप्रमाणे दोन्ही मुलांनी मुंजाबाला देवास्थानी नेऊन ठेवलं. आत्तापर्यंत घरातली कटकट असलेला म्हातारा मुंजाबा अचानक घरातलं आदरणीय, सन्माननीय आणि सर्वांत महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व बनला. मुलं-सुना, नातवंडं आदरणीय मुंजाबाच्या सगळ्या हौसामौजा पूर्ण करू लागली. त्याला आपल्याकडे ओढायला सगळेजणच झटू लागले. जणू त्यांच्या घरात देवच अवतरला होता. फक्त त्याचे पाय धुऊन पाणी प्यायचंच बाकी राहिलं होतं.
मुलं तर चार लोकांत बोलू लागली,
‘‘आमच्या बापानं कुटुंबासाठी लय खस्ता खाल्ल्या. आमचे आबा नसते, तर आम्ही आज झीरो असतो.’’
आता मुंजाबाला ‘म्हातार्‍या’ हा शब्दच जाऊन त्याच्या ‘आबा’ या मूळ टोपणनावानं घरातली सगळीच मंडळी हाक मारू लागली. सुनांनी नवर्‍याचे कान भरले, ‘‘आवो, आबांना काय कमी पडून देऊ नका… नाह्यतर म्हातारा परस्परच टाकायचा इकुन ती जमीन आणि पैसं देईन यखाद्या देवळाला उधळून.’’
आता घरामध्ये मुंजाबाचे सगळे आदर करू लागले. दोन्ही लेकरांच्या मनात एकच होतं, की बापाकडून ती एक एकर स्वतःच्या नावावर करून घ्यायची. मुंजाबाची मर्जी ते सांभाळू लागले.

हे सर्व बघून मुंजाबा तृप्त होऊ लागला खरा, ‘पण हे असं कधीपर्यंत चालणार? एक ना एक दिवस घरच्यांना आणि सगळ्या भोरवाडीला हे कळणार आहे, की माझ्याकडं जमीन वगैरे काहीही नाहीये. रामभाऊनं आणि मी हा सगळा बनाव बनवलेला आहे. त्यानंतर हे सगळं पुन्हा बदलणार. पुन्हा मुलं आपल्यासोबत निर्दयी वागणार. पुन्हा सुना-नातवंडं अन् गावकरी क्षणोक्षणी आपला पाणउतारा करणार. आपल्याशी निष्ठुर वागणार.’ त्याला वाटू लागलं, हा आपला बनाव सगळ्यांना कळायच्या आधीच जर आपल्याला मरण आलं, तर किती बरं होईल. या सार्‍या विचारांनी मुंजाबा आता रात्र रात्र जागत होता. त्याला चमचमीत पदार्थ आता नकोसे झाले होते. त्याचं मन ना कशात रमत होतं, ना त्याला घरात थांबवत होतं.

सुरुवातीचे काही दिवस निवांत गेले. पण काही दिवसांतच त्याच्या दोन्ही मुलांनी त्याला निरगुडसरच्या त्या एक एकराबद्दल विचारण्यास सुरुवात केली. मुंजाबानं त्यांना ‘आज बघू… उद्या बघू…’ म्हणत थोपवून ठेवलं. पण त्याच्या मुलांनी त्या जमिनीचा तगादाच लावला. तसं मुंजाबाची भंबेरी उडाली.
पण एवढं मोठं धादांत खोटं बोलण्याची वेळ आपल्यावर आलीच कशी? मुंजाबा दिवसरात्र या विचारानं ग्रासला गेला. त्याला अन्न गोड लागेना. तो दिवस दिवसभर अबोल बसू लागला. त्याच्यासोबतीच्या म्हातार्‍या माणसांमध्ये गप्पा मारत बसणंही त्यानं बंद करून टाकलं. मंदिरात जाणं बंद केलं. तो उगीच दिवस दिवसभर वावरात जाऊन बसू लागला. दुपारच्या प्रहरी लिंबाच्या झाडाखाली झोपून दिवस ढकलू लागला.

काही दिवस निघून गेले. फाल्गुन महिना सुरू झाला. होळी पेटली, गावात धुळवड मोठ्या उत्साहानं साजरी झाली. घराघरांतून पुरणपोळ्या, श्रीखंड-पुरी असले गोडधोड पदार्थ केले गेले. उन्हाचा ज्वर आता उत्कट होऊ लागला होता. शेतात लावलेली कांचनी रंगाच्या मक्याची कणसं, उसाच्या शेंड्याला फुललेले तुरे, गव्हाच्या ओंब्या, पाटातलं पाणी या तीव्र उन्हानं लख्खपणानं उजळून चकाकत होतं. यात्रेचे आणि लग्नकार्याचे दिवस जवळ येऊ लागले, तसं मुंबई- पुण्याच्या लोकांची गावाला येण्याची लगबग वाढली. लग्नाचं वर्‍हाड-बैलगाडे-तमाशे यांनी भरलेल्या लोकांनी ट्रकच्या ट्रक रस्त्यारस्त्यानं दिसू लागले. अख्ख्या भोरवाडी गावालाच जणू जत्रेचं स्वरूप आलं होतं.

अशा या भोरवाडीतल्या एका सकाळी शिंदेंच्या घराण्यातल्या एका विहिरीत मुंजाबाचं प्रेत पाण्यावर तरंगताना दिसलं. खोल विहिरीच्या त्या पाण्यावर त्यानं नेसलेलं पांढरं धोतर, पांढरी बंडी आणि गुलाबी रंगाचा फेटा पाण्यानं भिजून तरंगत होता. मुंजाबानं आत्महत्या केली होती. त्याचं जमिनीचं घेतलेलं सोंग नातेवाइकांना आणि संपूर्ण गावाला कळण्याआधीच!

– अक्षय टेमकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.