Now Reading
माहीत नसलेला प्रवास…

माहीत नसलेला प्रवास…

Menaka Prakashan

खूप दिवसांनी आलात ताईसाहेब. शहरात राहून राहून गावाला विसरलात वाटतं.’’ घरात स्वयंपाक करायला येणार्‍या रमाताईनं, उशिरा आवरून न्हाणीघरातून बाहेर येणार्‍या मधुराला विचारलं.
‘‘गावाला विसरलीये का माहीत नाही, पण बाबांना तर विसरलीसच वाटतंय. रमा, चार महिन्यांनी येतेयस या वेळी मला भेटायला.’’ वडलांनी दिवाणखान्यातूनच आवाज दिला.

‘‘हो, माझ्या बाबांना माझ्या प्रकृतीपेक्षा माझं लग्न कधी होणार, याची चिंता असते, म्हणून मी त्यांना विसरले.’’ मधुरा गमतीत म्हणाली. रमाही मोकळेपणानं हसली.
‘‘विसर मला. पण आता आलीच आहेस, तर दोन स्थळं बघूनच जा.’’ वडील हे गमतीत म्हणतायेत का खरंच, या विचारानं मधुराच्या चेहर्‍यावरचं हास्य गायब झालं.
थोड्या वेळात वडलांना तिनं फोनवर बोलताना ऐकलं. ‘‘आली आहे मधुरा काल संध्याकाळी. तू आणि दाजी दुपारपर्यंत याल ना?’’
‘‘बाबा, कुणाला यायला सांगताय?’’ तिनं विचारलं.
‘‘अगं, तुझी आत्या आणि मामा येणार आहेत तुला भेटायला.’’ वडलांनी तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं.
‘‘दोघंही? काय विशेष काम?’’
‘‘अगं… येत नाहीत का इकडे ते अधूनमधून? आता योगायोगानं तू आलीच आहेस म्हणून आजच बोलावलं.’’ वडलांचं हे स्पष्टीकरण ऐकताना त्यांच्या अडखळलेपणानं आणि चेहर्‍यावरच्या भावानं मधुराच्या मनात शंका निर्माण केली. ‘मी येणार आहे, हे बाबांना कळलं आणि आधीच त्याबद्दल त्यांनी आत्याला सांगून ठेवलंय. आता तर तिच्यासोबत मामाही येताहेत. नक्कीच यांचं मला लग्न करण्यासाठी उपदेश देण्याबद्दल ठरलं असणार.’ विचारानं मधुरा जराशी अस्वस्थ झाली.

आत्या आणि त्यांचे यजमान आल्यावर मधुरा आणि तिच्या वडलांनी त्यांचं स्वागत केलं. चहापाणी घेताना इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
‘‘मग, किती दिवस आहेस अजून?’’ मधुराला तिच्या मामांनी- आत्याच्या यजमानांनी विचारलं.
‘‘अजून आहे तीन-चार दिवस. नंतर जाईन. आता पुढच्या महिन्यात परीक्षा आहेत ना…’’
‘‘अजून आहेतच का परीक्षा! बास झालं की आता. म्हातारी होईपर्यंत शिकतच राहणार का? तीस वय झालं ना आता! तुझ्याबरोबरच्या मुलींना दोन पोरं झाली.’’ मामांच्या अशा पद्धतीच्या मस्करीत बोलण्याची सवय मधुराला होती. त्यामुळे या बोलण्यानं तिला काहीच वाटलं नाही.
‘‘तिला ‘सोशल स्टडी’ शिकण्याची आवड आहे, शिकू दे.’’ आत्यानं आपल्या यजमानांचं म्हणणं सावरलं, तरी थेट विषयाला हात घालत पुढे म्हणाली, ‘‘पण या गोष्टी लगीन झाल्यावरही सुरूच राहू शकतील. यांच्या माहितीतली दोन स्थळं आहेत. तुझ्या बाबांना यांनी फोटो पाठवले होते, पण तुझीच तयारी नाही म्हणून थांबलोय. आता स्थळं बघून घेतेस आलीच आहेस तर?’’
आत्याच्या या बोलण्यानं मधुराला आपल्या पोटातून भीतीची कळ आल्यासारखं झालं. ‘वडलांना आपण ओझरतं सांगितलंय, आपण लग्नासाठी का थांबलोय ते, तरीही त्यांना समजून घ्यायचं नाहीये. नातेवाइकांकरवी आपल्याला ते तयार करण्याचा प्रयत्न करताहेत.’ विचार करून मधुराला वाईट वाटलं.
‘‘नाही… कसं आहे, या परीक्षेच्या मधे मला व्यत्यय नको आहे. शिवाय सोशल स्टडीचा भाग म्हणून मला पुढे तीन महिने भारताबाहेर जायचंय. त्यामुळे तिकडून आल्यावर बघू.’’ मधुरानं अडखळत उत्तर दिलं.

‘‘तिकडे जायला अजून वेळ आहे. आता फक्त स्थळं बघायची आहेत. लग्नाची तारीख तुझ्या परीक्षा आणि परदेशाहून येण्याच्या तारखेनंतरची एकमतानं ठरवू ना आपण…’’ वडलांनी पर्याय सुचवला.
कितीही कारणं दिली, तरी आता कुणी ऐकत नाही म्हणून मधुरा आवेशात आली आणि म्हणाली,
‘‘नाही मला अजून सहा महिने लग्नाचा विचार करायचा नाहीये.’’
‘‘का करायचा नाही?’’ आत्यानं विचारलं.
‘‘माझी तयारी नाही.’’
‘‘हे बघ, आम्ही एवढ्या लांबून हे ऐकण्यासाठी आलोय? तू एकतर तयार हो, नाहीतर तयार न होण्याचं पटण्यासारखं कारण सांग. तोपर्यंत आम्ही इथेच राहणार.’’ तिचे मामा पुन्हा विनोदी शैलीत म्हणाले. तिचे ओठ मात्र अजूनच कोरडे झाले. खूप क्षणांनंतर प्रयत्न करून ती म्हणाली, ‘‘मी सांगितलं आहे बाबांना.’’
‘‘निवृत्ती, काय सांगितलंय तिनं तुला?’’ आत्यानं तिच्या बाबांना विचारलं.
‘‘हं, ती म्हणाली, की तिला मुलं आवडत नाहीत. समलिंगी आवड आहे तिची. असं आहे का कुठे आपल्याकडे?’’ जरासं कचरत, अस्पष्टपणे वडील म्हणाले आणि थरथरणार्‍या मधुरानं आत्या आणि मामांच्या चेहर्‍यावरचा गोंधळ टिपला. आपली शारीरिक, मानसिक स्थिती नीटशी त्यांना कळाली नव्हती, हे त्यांच्या चेहर्‍यावरून तिला समजलं.
‘‘म्हणजे… नेमकं काय? काय मेडिकल प्रॉब्लेम हाय का?’’ तिच्या मामांनी विचारलं.
‘‘मेडिकली ती पूर्ण फिट आहे. मला तर वाटतंय, फक्त तिच्या मनाचा गोंधळ आहे हा सगळा.’’ वडील म्हणाले.
‘‘मी काय मुद्दाम बनवलाय का हा गोंधळ?’’ शक्य तितक्या संथपणे मधुरा म्हणाली.
‘‘एकदा लग्न झालं ना, की सगळी आवड निर्माण होते.’’ आत्यानं समजावलं.
‘‘हे असं चालतं का? आपल्या पैपाहुण्यांपैकी कुणी आहे का असं?’’ वडील म्हणाले.
‘‘पैपाहुण्यांपैकी काय? पूर्ण समाजातच काही चालतं का असं? लग्न तर करावंच लागतं.’’ आत्यानं आपलं मत मांडलं.
‘‘पण जे आहे ते मी सांगितलं, माझी नाही तयारी…’’ मधुरा परत धीरानं म्हणाली. आत्या आणि वडलांना आता मधुराला कसं समजवावं कळेना.
‘‘बरं, जाऊदे. आपले तालुक्यातले देसाई डॉक्टर आहेत, त्यांना दाखवू आपण.’’ विचार करून आत्याचे यजमान मधुराला असं म्हणून पुढे म्हणाले, ‘‘बरं का निवृत्तीनाना, देसाई डॉक्टरांनी अनेकांच्या लैंगिक समस्या सोडवल्या आहेत. शंभर टक्के यावर ते औषध देतीलच. तिकडून जाऊन या. मग तिच्या सहमतीनंच बघायला सुरू करू.’’

‘‘हे एकदमच पटलं. तसं करू आपण. चालेल ना मधुरा?’’ वडील पूर्ण आशावादीपणानं म्हणाले.
‘माझ्याबद्दल आत्या आणि मामांना नीटसं कळलेलं नाही. शहरातलेही काही डॉक्टर याला समजू शकत नाहीत. तालुक्यातल्या डॉक्टरांना याबद्दल काय माहिती असेल?’ मधुराच्या मनात विचार आला, पण तिलाही आता सगळं मनात ठेवायचं, अनेक गोष्टींची काल्पनिक भीती बाळगायची आणि एकटीनंच सगळं सहन करायचं यातून बाहेर पडायचं होतं, म्हणून तिनं हा प्रवास करून बघू, असा विचार केला.
‘‘हां, ठीक आहे.’’ ती म्हणाली.
‘‘बरं झालं सांगितलंस आम्हाला. बघ, यातून मार्ग निघेल. निवृत्ती, आजच फोन कर डॉक्टरांना आणि उद्याची, नाहीतर परवाची अपाईंटमेंट घे. तुम्ही दोघंजण जाऊन या. आम्हाला कळवा नंतर काय होईल ते.’’ आत्या तिच्या वडलांना म्हणाली.

ती आणि तिचे वडील बाहेर बसले. मधुराला अचानक आपल्या आईची आठवण आली. काही वर्षांपूर्वी आई गेल्यानंतर तिची आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदार्‍या तिचे वडील निभावत होते. आता दोघंही मूक बसले होते. त्यांच्यात संवाद घडत नव्हता, परंतु तरीही एकमेकांमधला तणाव दोघांनाही स्पष्ट जाणवत होता.
‘‘तुझी आत्याही येईलच थोड्या वेळात. तीही येते म्हणालीये आज.’’ वडील म्हणाले, तशी मधुरा पुन्हा थोडीशी अस्वस्थ झाली.
‘‘आत्या येतायत… आणि तुम्ही मला हे आत्ता सांगताय. पण ती येणार नव्हती ना?’’ ती पटकन बोलून गेली.
‘‘अगं, तिला मी काल परत रात्री फोनवर विचारलं, तेव्हा ती तयार झाली.’’
‘आपला आत्यासोबत इतका मोकळेपणा नाही, परंतु काही गोष्टी आपण मुलगी म्हणून आत्याशीच बोलू शकू, असं बाबांना वाटलं असेल. आणि त्यांनाही आत्ता कुणाच्या तरी असण्याची गरज वाटतच असेल. मग ते आपल्याला काल सांगण्याऐवजी आत्ता याबद्दल सांगताहेत म्हणून त्यांच्यावर राग धरण्यात काय अर्थ आहे?’ मधुरानं समंजसपणे विचार करून पुढे वडलांना काहीही विचारलं नाही.
मधुरा दवाखान्यात प्रतीक्षा खोलीत बसल्यावर स्वतःच्या आत डोकावत होती. तिला जाणवत होतं, आपल्याला नको असूनही आपल्या आत खिन्नता दाटली आहे. तिनं एक दीर्घ श्वास घेतला आणि ती डोळसपणे खोलीत इतरांना बघू लागली. एक आई जेमतेम मधुराच्याच वयाच्या आपल्या मुलाला जेवण भरवत होती. त्यांच्याकडे काहीजण अप्रूपपणे, सहानुभूतीनं बघत होते. ‘आपलं सगळं धडधाकट असताना आपले वडील आपली एवढी चिंता करतात. व्यंग असलेल्या या मुलाचं काय भविष्य आहे? त्याच्याबद्दल त्याच्या या आईला काय वाटत असेल? याच्यापुढे आपली समस्या छोटीच नाही का?’ मधुराला थोडंसं हलकं वाटू लागलं.
‘‘किती वेळ लागंल आजून नंबर यायला?’’ विचारांच्या तंद्रीत असलेल्या मधुराला आत्यानं तिच्याजवळ येऊन प्रश्न विचारल्यावर ती भानावर आली.
‘‘आत्या, आलात तुम्ही?’’ तिनं विचारलं.
‘‘अजून तासभर लागेल. बस.’’ तिचे वडील म्हणाले.

आधीची व्यक्ती बाहेर आल्यावर मधुरा, वडील आणि आत्या डॉक्टरांच्या खोलीत गेले.
‘‘मधुरा तूच ना? हं, बोल.’’ तिघंही आरामशीर बसल्यानंतर तिची फाईल उघडून डॉक्टर देसाईंनी तिला हसर्‍या चेहर्‍यानं विचारलं.
‘‘सर, माझं आकर्षण मुलांकडे नाही, मला मुली आवडतात.’’ इतर वेळी हे कुणालाही सांगताना शब्द ओठांपर्यंत थबकणार्‍या मधुरानं अगदी सहजपणे आत्या आणि वडलांसमोर डॉक्टरांना सांगितलं. काल एकदम मधुराबद्दल स्पष्ट न कळलेल्या आत्यालाही आता जरा उमजू लागलं होतं.
‘‘एक मिनिट… तुम्ही दोघं जरा बाहेर थांबता का? तिच्याशी एकटीशी मला बोलायचं आहे जरा.’’ डॉक्टरांनी वडील आणि आत्याला सांगितल्यावर दोघंही बाहेर गेले.
‘‘कदाचित त्यांच्यासमोर तू नीट बोलू शकली नसतीस. मी जे विचारेन ते नीट आणि व्यवस्थित सांग. काही लपवू नकोस. हे असं कधीपासून वाटतंय?’’ डॉक्टर तिच्या फाईलमध्ये काहीतरी नोंद करत म्हणाले.
‘‘मला जेव्हापासून आठवतंय, तेव्हापासून मला मुलीच आवडतात. मुलं आवडलेली आठवत नाहीत. वयात आल्यानंतर तर ही ओढ जास्त कळून आली.’’ मधुरानं स्पष्ट केलं.
‘‘बरं. मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होतीस कधी?’’
‘‘हो, पहिल्यांदा अकरावीला असताना…’’
‘‘त्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये सांगशील?’’ या प्रश्नासरशी ती सांगू लागली.
तिचं पहिलं प्रेम. अल्लड प्रेम. ज्या प्रेमात भविष्याची शाश्वती नव्हती, तशीच उद्याची चिंताही नव्हती. फक्त एकमेकींची ओढ होती… वयात आल्यावर आपल्या प्रेमाला जगात काय नाव आहे, जगाच्या दृष्टीनं त्याला काय अर्थ आहे, असे प्रश्न मधुराला सतावतच होते. कॉलेजमध्ये होस्टेलवर मात्र तिला रेवती भेटली. दोघीही मैत्रिणी झाल्या. त्याहीपुढे दोघींनाही एकमेकींबद्दल अजून काहीतरी वाटू लागलं, पण ते व्यक्त करण्याचं धाडस कित्येक दिवस दोघींकडेही नव्हतं. आपली वेगळी जाणीव, वेगळ्या भावना फक्त आपल्याच आहेत, असं दोघींनाही वाटत होतं. कालांतरानं दोघींमध्ये स्पर्शानं वेगळी भाषा दर्शवली, ती भाषा दोघींनाही जाणवली. मधुराला त्या दिवशी जग जिंकल्याचा आनंद मिळाला.
पुढे दोघींनी वेगळ्या वाटा पकडल्या. काही काळ संपर्क राहिला, पण वाढला नाही. ओढही कमी होत गेली. ‘अशा प्रेमाला काही भवितव्य आहे?’ मधुरा या प्रश्नानं थिजायची.
‘‘म्हणजे प्रेम गमावल्याचा त्रास झाला नंतर..?’’ डॉक्टरांच्या या उद्गारांनी सर्व सांगताना आठवणीत हरवलेल्या मधुराची तंद्री भंगली.
‘‘काही दिवस… हो.’’
‘‘त्यानंतर कधी कुणासोबत रिलेशनशिप किंवा प्रेम?’’ मधुरानं आधी जे सांगितलं त्याची फाईलमध्ये नोंद करून डॉक्टरांनी प्रश्न विचारला.
‘‘हो, काही वर्षांपूर्वीच…’’ मधुरा सांगू लागली.

तिचं दुसरं प्रेम… ती जिथे नोकरी करत होती तिथली सहकारी मुग्धा. ‘जिच्यावर आपण प्रेम करतो, तिच्यासमोर व्यक्त करावं का? पण ती आपल्यासारखी नसेल तर? आपल्या जाणिवा, आपल्या भावना या फक्त आपल्यापुरत्याच का? जगाच्या दृष्टीनं ती एक विकृती? का आहोत आपण असे? आपल्या शरीर-मनाची ओळख आहे आपल्याला. मुग्धाला समोर पाहिलं, की हृदय धडधडू लागतं. जगाचा विसर पडतो. तिच्यासोबतच्या एकत्र राहण्याच्या कल्पनेनंच रात्री डोळ्यांवाटून अर्थपूर्ण अश्रूही बोलू लागतात. आपण सांगायचं धाडस करून.’
वेगवेगळ्या मार्गांनी तिनं मुग्धाशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. मैत्री झाली. मधुराला वाटलं, आता वेळ आलीये आपलं मन तिच्यासमोर उघड करण्याची. आत्तापर्यंत मात्र ती आपल्यासारखीच असेल का, याबद्दल कुठलीच खूण तिच्याकडून मिळाली नाही. मधुरानं ठरवूनही मुग्धाला समोर बोलायचं धाडस होईना. तिनं मोबाईलच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे तिच्याशी संपर्क साधण्याचा मार्ग निवडला.
तिनं संदेश करताना मुग्धाची आधी औपचारिक विचारणा केली. मग म्हणाली, ‘आता वेळ आहे का? मला काहीतरी सांगायचंय.’
मुग्धा म्हणाली, ‘सांग जे सांगायचंय ते. मैत्रीत परवानगी कधीपासून लागायला लागली.’
यावर मधुरा म्हणाली, ‘मला वेगळं काहीतरी सांगायचंय. तू कुठलाही निष्कर्ष न काढता फक्त ऐकून घेशील?’
मुग्धाच्या लक्षात आलं, हिला काहीतरी खासगी बोलायचं आहे.
‘तू जे सांगशील ते फक्त तुझ्या-माझ्यात राहील.’ मुग्धानं विश्वास दिला.
खूप वेळ मधुरा लिहीत राहिली, जे लिहितोय ते तिला पाठवू नक्की, असा विचार ती करत राहिली. लिहून झालं, पण पाठवायचं धाडस होईना. शेवटी थरथरत्या बोटानं तिनं ‘सेन्ड’चं बटण दाबलं.
‘मी हे सांगितल्यावर तू मला स्वीकारशील का नाही माहीत नाही. तुला याबद्दल काही माहिती आहे का नाही तेही नाही माहीत. पण मला तुला हे सांगावंसं वाटतंय. मला आतापर्यंत मुली आवडल्या, मुलं आवडली नाहीत. त्याअर्थानं मला मुलींबद्दल जितकं आकर्षण वाटलं, तसं मुलांबद्दल नाही वाटलं. असं असण्याबद्दल खूप गैरसमज आहेत आपल्याकडे. पण हे सगळं तसं नाहीये.’

काही क्षण मुग्धाचं यावर काहीच उत्तर आलं नाही. यादरम्यान मधुराला वाटलं, आपले ओठच कोरडे पडले आहेत. काय विचार करतेय मुग्धा हे वाचून? हे सांगून तिला मनाचा बोजा हलका झाल्यासारखाही वाटत होता, पण आता मुग्धा काय म्हणतेय म्हणून तिच्या हृदयाचे ठोके वाढले.
‘चिल आऊट! मी समजू शकते. हे नैसर्गिक आहे. खूपजण आहेत असे. तू नको टेन्शन घेऊस. हे जे सांगितलंस ते फक्त तुझ्या-माझ्यात राहील.’ काही वेळानं मुग्धाचं उत्तर आलं. वाचून मधुराच्यात संथपणा आला. तिच्यात चैतन्य आलं. हरखून तिनं उत्तर दोन-तीन वेळा वाचलं. खूपजण आहेत असं, असं मुग्धा म्हणतेय. म्हणजे तीही? आपण आता आपलं मन पूर्ण मोकळं करायची वेळ आलीये. मधुरानं लगेच पुढे लिहिलं,
‘अजून एक सांगायचंय मला महत्त्वाचं.’
‘सांग ना…’
‘मला तू आवडतेस. कधीपासून आवडायला लागलीस हे माहीत नाही…’ मधुरानं हे लिहिलं आणि आता पुन्हा तिची धडधड वाढली. मुग्धाच्या उत्तरावर आता सगळं ठरणार होतं. तीही आपल्यासारखी असू शकते. सामाजिक भीतीमुळे, अस्वीकारामुळे कुणी मन मोकळं करत नाही. त्यामुळे दोन व्यक्ती एकमेकांना आवडत असल्या, तरी त्यांचं प्रेम बहरत नाही. एकमेकांना सांगायचंही धाडस होत नाही.
‘तुला असं कधी वाटलं, की मी तुझ्यासारखी आहे…?’ मुग्धाचं उत्तर आलं. या उत्तरानं मधुराची सगळी धडधड शांत झाली.
‘…’
‘बोल ना? तू माझ्यावर?…‘ मुग्धा मधुराचं असणं समजून घेऊ शकत होती. पण तिनं आपल्यावरच प्रेम करावं, या कल्पनेनं तिला वेगळंच वाटलं. आपल्याच हालचालीत, वागण्यात काही वेगळं दिसलं म्हणून मधुरा आपल्याला पण तिच्यासारखी समजली? या विचारानं तिला स्वशंका निर्माण झाली आणि यावरून क्षणात मधुराची चीड आली.
‘थांब मुग्धा. गैरसमज करून घेऊ नकोस. यात तुझी काहीच चूक नाही. पण तूच सांग प्रेम काही ठरवून होतं का?’ मधुरानं समजावलं.
‘ीज, बोलणं थांबव.’ लाजिरवाणं वाटून मुग्धा म्हणाली.
‘मला तू माझं संपूर्ण विश्व वाटत होतीस. मला किमान हे व्यक्त करण्याचाही हक्क नव्हता का? माझ्या भावना फक्त समजून घे.’
‘स्टॉप इट मधुरा! स्टॉप! आता काहीही टाईप करणं थांबव.’
‘बरं, ऐक. आता मला कळलं, की तू माझ्यासारखी नाहीस. आपण फक्त मैत्रिणी असू यापुढे…’ मधुराचा हा संदेश मुग्धापर्यंत पोचलाच नाही. ती लिहीत असतानाच मुग्धानं रागानं तिला ब्लॉक केलं.

मधुरा हादरून गेली. काय करावं तिला कळेना. ‘मुग्धाला फोन केला तर? या वेळेला नको. ती अजूनच चिडायची.’
‘तू जशी आहेस त्याबद्दल मला काही हरकत नाहीये. मी हे कुणाला सांगणारही नाही. पण आता आपल्यात कुठलंच नातं ठेवायला नको. आपला संवाद फक्त कामापुरता. तू वेगळं काही करण्याचा प्रयत्न केलास, तर मात्र मला तुझी तक्रार करावी लागेल ऑफिसमध्ये.’ मुग्धाचा काही वेळानं टेक्स्टवर मेसेज आला.
वाचून मधुराला जास्तच धक्का बसला. ‘परमेश्वरानं आपल्याला असं का बनवलं, की आपल्या भावनाही इतरांना समजू नयेत? मुग्धाला आता मैत्रीचं नातंही मान्य नाही. घरी तरी कुणाला सांगायचं धाडस नाही, किमान मैत्रीण म्हणून तू तरी धीर द्यायचास मुग्धा? इतकी घाबरलीस मला, की तक्रार करण्यापर्यंत विचार करतेयस?’ तिच्या मनात अनेक विचार आले. अंधार्‍या खोलीत तिचे अश्रू थांबेनात.

दुसर्‍या दिवशी तिला कामावर जायची इच्छा नव्हती, त्याहीपेक्षा तिला कामावर मुग्धासमोर जाण्याची भीती वाटत होती. स्वतःला समजावत, मन घट्ट करत ती कामावर गेली. ती बसत असणार्‍या जागेपासून मुग्धा जवळच बसत होती. अद्याप ती आली नव्हती. मधुरा आपल्या कामाला लागली, थोड्याच वेळात तिला मुग्धा येताना दिसली. मधुराच्या हाताला अचानक कंप सुटला. तिनं आपली मान खाली घातली. मुग्धानं जागेवर बसण्याआधी चोरटा कटाक्ष मधुराकडे टाकला आणि ती आपल्या कामाला लागली. जेवणाच्या वेळी दोघी एकत्र कँटीनमध्ये जायच्या, आज एकत्र गेल्या नाहीत.
मधुराला आज कोंडून ठेवल्यासारखं वाटत होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर येऊ पाहत होते, परंतु भर कामाच्या ठिकाणी तिला अश्रू डोळ्यांच्या आतच रोखून ठेवणं भाग होतं. तिला दिवस खूप मोठा वाटला, निघताना ती पिंजर्‍यातून बाहेर पडत असल्यासारखी कार्यालयातून बाहेर पडली.
डॉक्टरांना या प्रेमाबद्दल सांगताना मधुराला पुन्हा सर्व डोळ्यांसमोर येऊन गेलं.

‘‘जितकी तू यामुळे अस्वस्थ झालीस, ढासळलीस, तितकीच तू यातून खर्‍या अर्थानं घडत गेलीस.’’ डॉक्टर म्हणाले.
‘‘तसंच म्हणता येईल. या दुःखानंच अंतःकरण शुद्ध होत गेलं. त्यानंतर माझी आई गेली आणि मग आयुष्याचा मी अजूनच खोलवर विचार करू लागले. बाबांना हे सांगितलं… पण त्यांनी आता ‘हे बदलता येतं’ असा वेगळाच आशावाद मनात बाळगला आहे.’’ ती शांतपणे म्हणाली. डॉक्टरांनी फाईलमध्ये नोंद करून घेतली.
‘‘कधी तुला मित्र-मैत्रिणींकडून चिडवणं किंवा त्रास झाला?’’
‘‘फारसा नाही, पण कॉलेजमध्ये असताना एकदा होस्टेलवर मैत्रिणींच्या प्रेम, मुलं यावर गप्पा सुरू होत्या. सहसा अशा गप्पा सुरू असताना कुणाला कोणता मुलगा आवडतो, असं विचारून एकमेकींची गंमत केली जायची. मी नेहमीप्रमाणे त्या दिवशीही म्हणाले, ‘मला कुणी आवडत नाही.’ तर माझी एक मैत्रीण लगेच म्हणाली, ‘काय गं, तुला मुलांबद्दल आकर्षण आहे का नाही?’ सगळ्याजणी हसू लागल्या. ती गमतीतच म्हणाली होती, पण माझ्या अजाण मनावर तेव्हा आघात झाला. त्या रात्री मला नीट जेवण गेलं नाही, की झोप आली नाही.’’
‘‘तू बरीच मॅच्युअर होत गेलीस, पण तरीही मला सांग, अशी आहेस म्हणून आत्ताच्या घडीलाही कधी डिप्रेशन, किंवा आत्महत्येचे विचार मनात येतात?’’
‘‘डॉक्टर, मी म्हणाले तसं आता मी पूर्ण वेगळेपणानं बघते याकडे. त्रास, किंवा दुःख वेगळ्या पद्धतीचं होतं, पण ते मी हँडलही करू शकते.’’ मधुरा मोकळेपणानं म्हणाली.
‘‘ठीक आहे. मी दोघांनाही आत बोलावतो. काही गोष्टी एकत्रच सांगतो.’’ डॉक्टर स्मितहास्य करत मधुराला म्हणाले.

डॉक्टरांनी वडील आणि आत्यालाही आत यायला सांगितलं, तेव्हा डॉक्टर आता काय सांगणार म्हणून तिचा श्वास रोखला गेला.
‘‘मी पूर्णपणे ऐकून घेतलं आहे. मी काही सांगणार याआधी मला तुम्हाला विचारायचे आहे. हे जे आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे?’’ डॉक्टरांनी विचारले.
‘‘हो, जे आहे ते बदलायचं आहे.’’ वडलांनी काळजीनं लगेच आपलं मत मांडलं.
‘‘शिवाय तिचं जे काही आहे, ते आपल्या समाजात, आपल्या वातावरणात शक्य नाही.’’ आत्या म्हणाली.
‘‘मी मधुराचं पूर्ण ऐकून घेतलं आहे. हे बघा, समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. हा त्यातलाच एक वेगळा प्रकार आहे. सगळ्यात पहिलं तुम्ही हे समजून घ्या, की ही विकृती नाही, हा निसर्गाचाच एक भाग आहे. त्यामुळे यात बदल होणार नाही. असे लोक समाजात असतात, ते उच्चशिक्षित होतात, सगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात. आई-वडलांची काळजी घेतात. सगळ्या जबाबदार्‍या घेतात. मग फक्त त्यांची ही गोष्ट वेगळी आहे म्हणून त्यांना वेगळं म्हणायचं का?’’ शांतपणे डॉक्टरांनी अगदी मनापासून आपलं मत व्यक्त केलंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं. डॉक्टरांच्या वाक्यावाक्यानं मधुरा खुलत गेली. आज पुन्हा कुणीतरी तिच्या असण्याबद्दल इतक्या सकारात्मकपणे सांगत होतं. तिच्या मनात हर्ष दाटला.
‘‘काहीतरी उपाय असेल ना पण? जी काही गोळ्या-औषधं असतील ती आम्ही घेऊ.’’ वडलांनी शंका व्यक्त केली.

‘‘अहो, माणूस म्हणजे रोबोट नाही. इथे फक्त शरीराचा प्रश्न नाही, मन गुंतलेलं असतं. विचार करा, एखाद्या माणसाचं ज्या व्यक्तीवर प्रेम जडतं, त्या लिंगाच्या व्यक्तीवर प्रेम जडू नये म्हणून त्यानं गोळ्या-औषधं खायची? काय अवस्था होईल त्याच्या मनाची?’’ डॉक्टर जणू आपल्या मनातलंच बोलले म्हणून मधुरा स्थिर आणि शांत होऊन त्यांच्याकडे बघू लागली.

‘‘नीट समजून घ्या. औषधं आजाराला असतात. मुळात हा आजारच नाही, तर याला कुठली औषधं असतील? उद्याही कुणी औषधं आहेत, असा दावा केला आणि तुम्ही त्या डॉक्टरचं ऐकलं, तर तुम्ही तिच्या शरीर-मनाचं नुकसान कराल, एवढं नक्की. निसर्गातलं एखादं झाड सरळ रेषेत येतं, एखादं झाड वेगळ्या पद्धतीनं उंच जातं, तशीच ही गोष्ट आहे. यात अनैसर्गिक असं काहीच नाही.’’ डॉक्टरांनी पुन्हा समजावून सांगितलं. काही क्षण कुणीच काही बोललं नाही.
‘‘हिचं वय आता तीस आहे. ही शहरात असते. समाजात हिच्या वडलांना सारखं लग्नाबद्दल विचारताहोत. त्याला कसं सामोरं जायचं?’’ आत्यानं विचारलं.
‘‘माझ्याकडे येणार्‍या अनेक पेशंट्सचा हा प्रश्न असतोच.’’ किंचित हसत डॉक्टर पुढे म्हणाले,‘‘लोक काय म्हणतायेत, याचं ओझं घ्यायचं नाही. ते आज विचारतील आणि नंतर विचारायचं थांबतील. ही गोष्ट आता कायद्यानंही मान्य केली आहे. त्यामुळे त्याचंही दडपण घेऊ नका. तुम्ही तिच्यावर दडपण आणू नका. तिच्या शरीर-मनानुसार तिच्यात काय भावना निर्माण होतील, किंवा काय बदलतील, याची खरी साक्षीदार फक्त ती असेल. त्यानुसार पुढे मुलाशी लग्न करायचं का नाही, हे तिला ठरवू दे.’’
‘‘पण समजा, हिची तयारीच नाही झाली… तर अशा जगण्याला काय अर्थ?’’ आत्यानं गोंधळून विचारलं.
‘‘असा कसा अर्थ नाही. लग्नाशिवाय जीवन नसतं? जगण्याला अर्थ आपण शोधत असतो, ती शोधेल अर्थ. काय माहीत उद्या कायद्यानं अशा लग्नाला संमती मिळाली, तर तुम्हीच त्याला तयार व्हाल.’’ डॉक्टरांनी थोडं वातावरण हलकं केलं. वडील आणि आत्याचं मधुराबाबतच्या अनेक प्रश्नांचं निरसन झालं.
परत डॉक्टरांनी दोघांना बाहेर बसायला सांगून मधुराशी अत्यंत मोकळेपणानं संवाद साधला. ‘‘पुढे कधीही गरज वाटली तर अपॉईंटमेंट घे. तू जे आहेस ते स्वीकारलं आहेस. सत्याच्या मार्गावर तुला जायचं आहे, इथेच तू अर्धी लढाई जिंकली आहेस. बाकी तू स्वतःच समंजस आहेस.’’ डॉक्टर मधुराला म्हणाले.

दवाखान्याच्या बाहेर आल्यावर तिघंही कुणी नाही अशा ठिकाणी बाजूला जाऊन थांबले. डॉक्टरांच्या सांगण्यानंतर मधुराला वडलांचं आणि आत्याचं म्हणणं ऐकण्यासाठी धडधड आणि उत्सुकता निर्माण झाली होती.
‘‘सध्या तरी थांबू आपण स्थळं बघायचं. पुढे बघू काही मार्ग निघतोय का. पण काही काळजी करू नकोस मधुरा.’’ अगदी उघडपणे वडील डॉक्टरांच्या म्हणण्याशी सहमत असल्याचं सांगत नसले, तरी त्यांच्या या उद्गारानं मधुरा सुखावून त्यांच्याकडे बघू लागली.
‘‘देवानं काय तर ठेवलं असलंच की मधुरासाठी. सगळंच कसं रितंपण देईल तो एकालाच. जो माणूस या जगात आला, त्याला कधी ना कधी जायचंच आहे. कशाला उगाच काळजी करत बसून चार दिवसांचं मरण दोन दिवसांवर आणायचं. निवृत्ती, तिला जसं जगायचंय तसं जगू दे. तिच्या पाठीशी राहू आपण. नको ते बळजबरी करायला सांगून तिला माणशीक त्रास नको.’’ आत्याच्या या बोलण्यानं मधुरा स्तब्धच झाली. फार न शिकलेली, पण अनुभवानं असे विचार मांडणारी आत्या तिला एकदम वेगळीच भासली.

‘किती दिवस आपण सगळं दडपण मनातच ठेवलं होतं. प्रत्येक टप्यावर एकटीनं डिप्रेशन भोगलं. नको नको ते विचार करून आपण संवाद टाळत होतो. आधीच का नाही आपण डॉक्टरांचा मार्ग निवडला. पण कदाचित हीच वेळ होती. तोपर्यंत हा प्रवास करायचा होता, म्हणून आज हे घडलं.’ मधुराला मनातून वाटलं.
मधुरा शहराकडे परतीच्या प्रवासाला निघताना बसची वाट बघत थांबली होती. तिला सोडायला वडील आले होते.
‘‘मधुरा, जे आहे ते सगळं असेल बरोबर, पण तू एकटी राहणार, ही कल्पना अजूनही पचनी पडत नाही.’’ वडलांनी आपलं अंतर्मन खोललं. मधुरानं वडलांच्या हातावर हात ठेवला.
‘‘बाबा, आई गेली तेव्हाची गोष्ट आठवतेय? आईच्या जाण्याच्या कल्पनेनंच तुम्ही घाबरला होता. तेव्हा आपण अनुभवलं, मरण दिसू लागलं, की त्या वेळी आपल्याला फक्त जगणं हवं असतं. अशा वेळी आपण जगण्याला नियम आणि अटी लागू करत नाही. नाहीतर इतर वेळी कित्येकदा आपण जगणंच सोडून देतो आणि कधी आयुष्य संपतं तेच कळत नाही. बाबा, आता मात्र जगणं बाकी आहे. त्याला आपण का संघर्षमयी करून मरणासारखंच जगायचं? का या क्षणाला ज्याच्यात आनंद मिळतो, त्याप्रमाणे नाही वागायचं? खरा जो मृत्यू आहे, त्याला घाबरायचं काहीच काम नाही. तो जीवनाचाच एक भाग आहे. मला कळतंय, तुम्हाला माझं आयुष्य मार्गी लावायचं आहे, म्हणून तुमची ही धडपड आहे. पण त्या मोजक्या काही दिवसांसाठी, जे दिवस येतील का नाही याबद्दलही काही शाश्वती नाही, त्यासाठी वर्तमान सोडून का जगायचं?’’
वडील ऐकत होते. त्यांना पटलं होतं, पण ते त्याबद्दल काहीच बोलले नाहीत.
गाडी आली. वडलांचा निरोप घेऊन मधुरा गाडीत बसली. तिला कित्येक वर्षांनी आज शरीर आणि मनानं खूप हलकं वाटत होतं.

– राहुल शिंदे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.