Now Reading
माझा नॅशनल डे

माझा नॅशनल डे

Menaka Prakashan

मस्कतच्या शाळेत रुजू होऊन महिनाच झाला होता. संपूर्ण निराळा देश, धर्म, संस्कृती, हवापाणी या सगळ्यांशी ओळख करून घेणं जुळवून घेणं सुरू होतं. नव्या देशात आलो, की तिथे फिरायची हौस दांडगी. म्हटलं, आधी मस्कत तरी पूर्ण बघून घ्यावा. एके संध्याकाळी फिरता फिरता ‘18 November Street’ अशी पाटी लावलेला एक प्रशस्त रस्ता दिसला. पलीकडून अरबी समुद्राची गाज ऐकू येत होती आणि अलीकडे तो स्वच्छ, सुंदर रस्ता! पण रस्त्याला तारखेचं नाव का दिलं असावं, ते काही कळत नव्हतं. रस्त्यावर लगेच कुणाला तरी ते विचारायचा टिपिकल भारतीय मोह होत होता, पण एकतर इथे रस्त्यावर आपल्या कडच्यासारखी चालतीबोलती माहिती केंद्रं नाहीत. दुसरं, आपल्याला काय अरबी येत नाही, की अगदी गेला बाजार मल्याळम ही भारतीय भाषाही येत नाही. इंग्लिशमध्ये विचारायची तयारी होतीच, पण रस्त्यावर कुणी चालताना दिसायला तरी पाहिजे! सगळे कारमधून जाणारे, नाहीतर रस्त्यालगतच्या मोठ्या दुकानांत काचेआड एसीत बसलेले. आम्हीच काय ते ‘दो दिवाने शहर में’ असे पायी भटकत होतो. तर, कुणाला विचारावं असं कोण नव्हतं. बरं, पडला प्रश्न की टाक गुगलला, इतकी चलाख नेटकरीण मी अजून झाले नव्हते तेव्हा! रस्त्याच्या नावाचा प्रश्न तसाच डोक्यात ठेवून मी दुसऱ्या दिवशी शाळेत हजर झाले आणि आमच्या सुपरवायझरीनबाईनी गोड हसत एक मोठा कागद हातात दिला आणि म्हणाल्या, ‘‘You can start preparing children for the National Day.’’

अजून शाळेत मी हातपायच मारत होते, तर ही इतक्या मोठ्या कार्यक्रमाची यादी गळ्यात पडली. भाषेची शिक्षिका म्हणून संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लिहिणं आणि ते मुलांकडून करवून घेणं, असं ते जिकिरीचं काम होतं. कार्यक्रमपत्रिकेवर परत सहज नजर फिरवली, तर लिहिलं होतं. ‘18 November – National Day Celebration’. १८ नोव्हेंबर हा ओमानचा राष्ट्रीय दिवस! मग मला त्या रस्त्याच्या नावाचा उलगडा झाला, पण या दिवशी यांच्या देशात काय झालं, ते माहीत नव्हतं.

भारतात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी अंगवळणी पडले होते. म्हणजे, प्रमुख पाहुण्यांचं स्वागत, झेंडावंदन, राष्ट्रगीत, भाषण, थोडे सांस्कृतिक कार्यक्रम, खाऊ, मग हुर्योऽऽऽऽ शाळेला सुट्टी! बरं, कार्यक्रमात तरी काय, तर आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य कसं मिळालं आणि आपण ते कसं टिकवलं पाहिजे, विविधतेत एकता, जवानांची आठवण असा एक सरधोपट आराखडा झाला, की झालं. इतिहास तोंडपाठ. वर्षानुवर्षं हे सगळं माझ्यातल्या साने गुरुजींमध्ये भिनलं होतं. पण इथे त्याचं काय? यांच्या राजाचा फोटो भारतीय वकिलातीत पाहिला होता, पण नाव विसरले होते. राजाच्या नावापासून सुरुवात होती. या देशाचा इतिहास काय, हा देश कुणाच्या अमलाखाली होता का, होता तर तो स्वतंत्र व्हावा म्हणून कुणी कुणी लढे दिले, यांच्यातले नेहरू-गांधी-सावरकर-बोस कोण, यांच्या झेंड्यातले रंग कोणते, त्यांचा अर्थ काय, महत्त्व काय, राष्ट्रीय चिन्हं कोणती, प्रतीकं कोणती, कशाविषयी बोलायचं, कशाविषयी नाही बोलायचं, काऽऽऽऽही माहीत नव्हतं. आणि आता प्रसंग असा होता, की जे माहीत करून घ्यायचं ते टू द पॉइंट हवं होतं. लिहून इथल्याच लोकांसमोर सादर करायचं म्हणजे त्यातला एकही तपशील चुकणार नाहीच, अशी काळजी. बरं, हे सगळं इंग्रजीत लिहून ते अरबी शिक्षकांना अरेबिकमध्ये भाषांतरासाठी द्यायचं. वेळ कमी होता आणि कार्यक्रमाची जंत्री तर अडीच-तीन तासांची होती. त्यात किमान अर्ध्या तासाचं सूत्रसंचालन! तीस मिनिटं बोलण्यासाठी किमान पंधरा ते अठरा पानं टाईप केलेला मजकूर मला तयार करावाच लागणार होता. त्यातून नो सुटका!

मी पटकन अरेबिक डिपार्टमेंटमध्ये डोकावलं. तर त्यात दोन जॉर्डनचे, एक ट्युनिशियाची आणि दोन इजिप्तचे असे एकूण अरब ब्रदरहूड कॉफी घेत बसले होते. ओमानी कुणीच नव्हतं. त्यांना असली तरी, उडत उडत सांगोवांगीची माहिती असणार, जी मला नको होती. राहता राहिले आमचे इभूना शिकवणारे, उस्ताद महम्मद सालेम! त्यांना पटकन इंग्रजीत विचारलं, तर दगडानं दगडाकडे पाहावं, तसं त्यांनी माझ्याकडे पाहिलं. तोंड कडवट करून म्हणाले, ‘‘अॅना मिसरी. मा आरफ इंग्लीजी.’’ (मी इजिप्शियन आहे. मला इंग्लिश येत नाही.) तेवढं बरीक मलाही चटकन कळलं! म्हणजे एकूण अरब स्टाफचा मला तसा काही उपयोग होणार नव्हता. मग मी परत सुपरवायझरीण बाईंकडे गेले. मागच्या वर्षीचा असा काही नमुना असेल, तर दाखवा म्हणाले. त्यावर त्या त्यांच्या खड्लखट्ट इंग्लिशमध्ये सुरू झाल्या, ‘‘You see, we do something different every year! This year you too try something different!’’ एवढं बोलून त्या टिकटॉक टिकटॉक करत निघून गेल्या. माझा मुद्दाच त्यांच्या लक्षात आला नव्हता. आता या देशाच्या इतिहासात ‘every year something different’ कसं काय करायचं, ते माझ्या बुद्धीपलीकडचं होतं.

गुगलवर एकाच सेकंदात भरमसाट माहिती समोर आदळत होती. ते नुसतं स्क्रोल करणंही फार वेळखाऊ होतं. मी पीसी बंद केला. काय करावं कळत नव्हतं. शाळा सुटून गेली. बाहेर अरबस्तानातलं ऊन मी म्हणत होतं. जेवून उष्ट्या पडलेल्या ताटासारखी स्टाफरूम रिकामी पडली होती. मी फुल्ल टेन्शनमध्ये फायली आवरत होते. तेवढ्यात फोनवर बोलत खालिद आला. मी लक्ष दिलं नाही. जराशानं त्याचं बोलणं संपलं. जवळ येऊन म्हणाला, ‘‘What’s the matter?’’ मी matter सांगितला. हा खालिद लेबनॉनचा. अरेबिक साहित्याची उत्तम जाण आणि अरेबिक-इंग्लिश-अरेबिक अनुवादावर जबरदस्त पकड. शाळेतल्या कोणत्याही मीटिंगा त्याच्या दुभाषणाविना होत नसत. पण त्यालाही ओमानच्या समग्र इतिहास, संस्कृतीची फारशी माहिती नव्हती. मला हसत म्हणाला, ‘‘Oman is a very small country, not as big as India. You can write anything good. Your good words will make their National Day! Khalaas!!’’ हा त्याचा स्वभाव होता. पण असं चालणार नाही, हे मला माहीत होतं.

शेवटी शांत डोक्यानं गुगलशरणागती! ते प्रचंड माहितीचे तुकडे वाचत राहणं, यांची क्लिष्ट वाटणारी नावं, त्यांचा इतिहास, यांच्या भूभागाचे बारकावे, इथल्या संस्कृतीबद्दलची निरनिराळी मिळत जाणारी माहिती, हे सगळं आधी समजून घेणं, मग लिहिणं, सूत्रसंचालनात फिट बसेल अशी परत त्याची मांडणी करत राहणं… हे काम मला सलग तीन दिवस पुरलं. कार्यक्रम चांगला झाला वगैरे.

पण हे सगळं करताना एका बाजूला ताण होता, मात्र दुसऱ्या बाजूला मी अचंबित होत होते. कारण आत्तापर्यंतच्या आयुष्यात माझे सगळे स्वातंत्र्यदिन माझ्या माझ्या देशाचे होते. दुसऱ्या देशाचा ‘राष्ट्रीय दिवस’ साजरा करण्याची आणि त्यासाठी सगळं नव्यानं माहीत करून घेण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. माझ्या पिढीनं जन्मापासून स्वदेशात लोकशाहीच पाहिल्यानं राजेशाहीविषयी वाचताना, गंमत वाटत होती. पण इथल्या सुलतानाबद्दल इतके चांगले, कौतुक करणारे मोठमोठाले कंटेंट नेटवर वाचून मला छान वाटत होतं… आणि त्याच वेळी त्याच्याशी ऋणानुबंधही निर्माण होत आहेत, हे जाणवत होतं. नाहीतर, हजारो मैल इतक्या दूर येऊन, आजपर्यंत कधीही माहीत नसलेल्या राजाविषयी इतकी पानंच्या पानं लिहिण्याचं आणि ते शेकडो लोकांसमोर वाचून दाखवायचं, तसं कारण काय?

तुलना नाही, परंतु भाषेचा शिक्षक म्हणून संपूर्ण निराळ्या देशसंस्कृतीत जाऊन काम करणं अनेक अर्थानं आव्हानात्मक आहे. अगदी इंग्रजी जरी शिकवायची म्हटली, तरी नव्या देशातला इतिहास, भूगोल, संस्कृती, धर्म (यावर इथे मी जास्त जोर देते, कारण या देशांत इस्लाम हा राष्ट्रीय धर्म आहे आणि त्यांच्या जगण्यावर-वागण्यावर त्याचा अनेक अर्थांनी पगडा आहे) यांची माहिती असणं फार फार गरजेचं आहे. त्यांच्या भाषेतलं बेसिक तरी कळणं गरजेचं वाटतं. याची काहीही माहिती करून न घेता, आपण आंधळेपणानं वर्गात जाऊन शिकवू लागलो, तर ते शिकवलेलं मुलांपर्यंत पोचेलच, याची खात्री नसते. अगदी पहिल्या महिन्यात मी या फेजमधूनही गेले. पण त्यांचा ‘नॅशनल डे’ साजरा करायच्या निमित्तानं माझा केवढा तरी अभ्यास झाला आणि इथे रुळायला मोठी मदत झाली.

शिवकन्या शशी, ओमान.
shivkanyashashi@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.