Now Reading
भूमिका

भूमिका

Menaka Prakashan

दहाची दूरचित्रवाणी मालिका संपली, तशी सुजाता झोपायला जायला उठली. जाता जाता ती आईच्या खोलीत डोकावली. प्रतिभाताई फोनवर बोलत होत्या, म्हणून ती खुर्चीवर टेकली.
”सावकाशीनं करीन फोन,’’ असं म्हणून त्यांनी फोन बंद केला. सुजाताकडे वळून त्या म्हणाल्या, “परवा घरी जाईन म्हणते.”
“का गं? आल्यासरशी आठ दिवस तरी राहा की.”
“आल्यासरशी काय? दुसऱ्या गावात असते, तर वेगळी गोष्ट होती. निषाद आला, की चांगली दहा दिवस राहायला येणार आहे. पोराला किती वर्षांत पाहिलं नाही.”
सुजाताला छातीत झालेली बारीकशी धडधड जाणवली. “आज टीव्ही इतक्या लवकर कसा काय बंद केलास?” विषय बदलत ती म्हणाली.
“शीलाचा फोन आला, म्हणून बंद केला.”

“शीला कोण गं?”

“असं काय करतेस, मी बोलले होते तुला. गेल्या वर्षीपासून आमच्या भजनी मंडळात यायला लागली आहे म्हणून. आवाज काही खास नाही, पण अगदी नियमित येते. आमच्या दोघींची ओळख त्या आधीची. कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो.”
“हो का?”

“तुला म्हणून सांगते सुजाता, शीला आता वन बेडरूमचा फ्लॅट भाड्यानं घेऊन राहतीये, ‘अथश्री’मध्ये.”
“अरे वा!”

“अरे वा काय? कितीही पॉश असला, तरी ‘अथश्री’ म्हणजे वृद्धाश्रमच. त्याला घराची सर कशी येणार? खरंतर शीलाचा दोन खोल्यांचा का होईना, स्वत:चा फ्लॅट होता. पण तो मेंटेन होईना म्हणून प्रकाशनं तिला विकायला लावला. आता हातात असता फ्लॅट, तर तिथे नसतं का राहता आलं. आलेले पैसेही सगळे प्रकाशच्या नावानं करून मोकळी झाली. आता तो म्हणतो तसं वागायला लागतं. तो देईल तेवढे पैसे खर्च करायची मुभा. अर्थात, प्रकाशलाही तिच्यासाठी बराच खर्च करायला लागला. दोनदा अँजिओप्लास्टी करायला लागली. किती खर्च येत असेल त्याला?”
“एक, दीड लाख असेल.” जांभई आवरत सुजाता म्हणाली.

“हो का! अर्थात त्याला काही कमी नाही. महिना पाच/सहा लाख तरी तो मिळवत असणार.”
“महिना? स्वत:चा बिझनेस आहे वाटतं त्याचा? आणि असला तरी तुला बरं माहिती त्यांचं मंथली इन्कम?”
“माझा आपला अंदाज. प्रकाश बोटीवर असतो… म्हणजे नेव्हीत आहे. साध्या नेव्हीत नाही, तर मर्चंट नेव्हीत आहे. सहा/सहा महिने समुद्रावर असतो. तो बाहेर असला, की मैथिलीचा पाय घरात ठरत नाही आणि तो घरी आला, की त्याच्या बरोबर हिंडायला-फिरायला हवं म्हणून ही सदा बाहेरच. सगळं एकट्या शीलावर पडतं.”

“मग बरं की आता ‘अथश्री’मध्ये राहायला गेल्या आहेत ते.”
“…पण तिथे गेल्यावर फार एकटं वाटत असेल नाही तिला? इथे निदान नातवंडं तरी दृष्टीस पडायची.”
“त्याला आता कोण काय करणार? नातवंडं हवी, तर सुनेशी जुळवून घ्यायला हवं. नसेल जमत तर एकटं राहता यायला हवं. झोप आता. तुला तर कुणी घरातून जा म्हटलेलं नाही ना!”

“मला कशाला कोण जा म्हणेल? अनुजाचं वागणं तर मी कायम सोडून देत आले आहे. कधी सासूगिरी केली आहे तिच्यावर? बोल ना?”
सुजातानं नकारार्थी मान हलवली आणि ती जायला उठली.
“बैस गं जरा.”

सुजाता नाईलाज असल्यासारखी बसली. जरा वेळ प्रतिभाताई इकडचं तिकडचं बोलत राहिल्या. मग शब्दांची जुळवाजुळव करत त्या म्हणाल्या, “मी म्हणते सुजाता, अनुजानं हे मधेच काय काढलं आहे गं, अमेरिकेला जायचं?” तुला काही बोलली का ती?”
“परवा फोनवर बोलली तसं. पण मुलाला आणि सुनेला भेटावसं वाटलं, तर मधेच काय काढलंय, असं का म्हणतेस तू?”
“पण सहा महिन्यांपूर्वी तर जाऊन आली दोघं. मानस आणि श्रेयाचं बरं चाललं आहे ना? नवानवा संसार त्यांचा… अनुया तर रोज तास-तास मानसशी बोलत असते.”

“कमाल करतेस आई तू! अगं, मुलाशीच तर बोलत असते ना ती.”
“तेच म्हणतीये मी. एवढं बोलणं होतं फोनवर तर उठून जायला कशाला हवं? अमेरिकेला जायचं म्हणजे कमी का खर्च आहे?”

“अगं, पैसे आहेत म्हणून जाताहेत.”
“तेही खरंच म्हणा. अनुजाची एक तऱ्हा, तर तुझ्या भावाची तिसरीच. आई घरात असूनसुद्धा दिवसच्या दिवस ‘कसं काय’ एवढंसुद्धा विचारत नाही संकेत.”

सुजाता गप्प बसलेली पाहून त्या म्हणाल्या, “आता तू म्हणशील, आई इतकी धडधाकट दिसतीये, तर रोज रोज काय विचारायचं म्हणून.”
“मी काहीच म्हणत नाहीयेय. सगळं तूच तर बोलती आहेस.”

“तेच तर. आत्ता ही महिन्याभरासाठी म्हणून जातीये, उद्या सुनेचं बाळंतपण आलं, की मग सहा/सहा महिने जाऊन राहील.”
“कधीकधी ना, तू काय बोलतीयेस हेच कळेनासं होतं. पाच मिनिटांपूर्वी शंका बोलून दाखवलीस, की मानस आणि श्रेयाचं पटतंय का नाही म्हणून? …आणि आता तिच्या बाळंतपणाच्या गोष्टी करायला लागलीस. काय झालंय काय तुला?”

“वय झालं. दुसरं काय? आता एकटं राहायची कल्पना, तीही सहा महिने… नाही सहन होत.”
“मग ये माझ्याकडे राहायला.”

“जावयाकडे इतके दिवस राहायला बरं नाही वाटत.”
“मग शीलामावाशी सोबत ‘अथश्री’मध्ये राहा. तुझी इच्छा असेल, तर संकेत तुला फ्लॅट घेऊन देईल; आणि त्यानं कशाला घेऊन द्यायला हवा, तुझ्या जवळसुद्धा तेवढे पैसे आहेत की.”

“प्रश्न पैशांचा नाही गं, पण ‘अथश्री’ म्हणजे… म्हणजे शेवटी वृद्धाश्रमच. आजूबाजूला सगळे आजी-आजोबा. कुणी व्हीलचेअरवरून हिंडतंय, तर कुणी वॉकर घेऊन. परवा शीलाकडे गेले होते. तर म्हणाली, ‘आत्ताच एका कार्यक्रमाला जाऊन आले.’ कोणत्या, तर म्हणे शेजारच्या ब्लॉकमधल्या आजी गेल्या, त्यांची श्रद्धांजली सभा होती. म्हणजे, तिथे दुसरेही कार्यक्रम असतात, पण हे जास्त असतात. असणारच म्हणा.” आईनं बोलता बोलता पलंगावरची उशी मांडीवर घेऊन दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवली. तिच्या डोळ्यांतून डोकावणारं मृत्यूचं भय सुजाताला जाणवलं. …पण भय फक्त मृत्यूचं असतं का? या वयात जाणवणारा एकाकीपणा, तुटलेपण, असुरक्षितपणाची भावना. या सगळ्याचा संबंध फक्त वयाशी असतो, असं थोडंच आहे? सुजातानं खिडकी बाहेर पाहिलं. बाहेरचं पानं झडून गेलेलं बदामाचं झाड नजरेत भरलं. नाही म्हणायला डोक्यावर चार-दोन पानं शिल्लक होती. रस्त्यावरच्या ट्युबलाईटच्या प्रकाशात ते झाड अजूनच भकास दिसत होतं. तिला फार वेळ त्याच्याकडे बघवेना.

“झोप तू. माझी टकळी संपणार नाही.” सुजाता गप्प बसलेली पाहून आई म्हणाली. आईला हवा तसा प्रतिसाद आपण देऊ शकत नाही, या भावनेचं ओझं घेऊन सुजाता उठली. दारापाशी क्षणभर थांबून ती म्हणाली, “उद्या मी आणि वैजू कॅनॉल रोडवर फिरायला जाणार आहोत. सव्वासहाला तिथे पोचायचं, म्हणजे साडेपाचला तरी उठायला हवं.” जणू आपल्या उठण्याचं ती समर्थन करत होती.

“वैजू आहे तुझ्याबरोबर. मग तिला घेऊन घरी ये ना. किती दिवसांत भेटली नाही. तुम्ही कॉलेजमध्ये असताना रोज चक्कर असायची. का गं बोलत नाहीस? तुमचं परस्पर ‘वैशाली’त जायचं ठरलंय का? तसं असेल तर तिथे जाऊन फक्त कॉफी घ्या. मी घरी पोहे करून ठेवते. तिला माझ्या हातचे पोहे किती आवडायचे ना! खरंतर पोहे करण्यात कसलं आलंय कौशल्य. पण होस्टेलमध्ये राहिलं, की घरच्या खाण्याची किंमत कळते. फक्त खाण्याची नाही, तर घराची किंमत कळते; जी संकेतला कधी कळली नाही. त्यामुळे आईचीही किंमत नाही.”

‘आईची किंमत काय, खायला छान छान पदार्थ खायला घातल्यानं कळते का?’ हा ओठाशी आलेला प्रश्न सुजातानं विचारला नाही. “झोपते आता,” असं म्हणून ती तिच्या खोलीकडे वळली. पलंगाजवळचा दिवा लावून प्रदीप काहीतरी वाचत होता. ती पलंगावर पडली. प्रतिभाताईंनी आता टीव्ही सुरू केला. त्याचा आवाज त्यांच्या खोलीपर्यंत येऊ लागला, तशी प्रदीपच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या. त्यातून उमटणारे ‘काय हे’ शब्द तिला वाचता आले. मुकाट्यानं उठून ती आईच्या खोलीत गेली. तिनं टीव्हीचा आवाज थोडा लहान करत आईच्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. खोलीत येऊन तिनं पाठ टेकली, तरी आईचे शब्द पाठ सोडत नव्हते. ‘होस्टेलवर राहिलं, की घराची किंमत कळते.’ ‘आईचं तर्कशास्त्र एकदम सुटसुटीत होतं. तसं घडतं तर आयुष्य किती सोपं होऊन गेलं असतं. आपला निषाद कमी का वर्षं राहिला होस्टेलवर? त्याला कुठे कळली घराची किंमत? निषादचं वागणं आईला कळेल, तेव्हा तिचे ठोकताळे किती चुकीचे आहेत, हे समजेल तिला. बारावीनंतर त्यानं घर सोडलं. सोडलं का आपण सोडायला लावलं? दुसरा पर्याय तरी काय होता आपल्यापुढे. दहावीत जेमतेम सत्तर टक्के मार्क्स मिळवलेल्या आपल्या मुलाला आपल्यासारखा डॉक्टर करण्याचं स्वप्न प्रदीप पाहत राहिला. पैशांच्या जोरावर तो निषादला डॉक्टर करूही शकला असता, पण निषादच्या इच्छेचं काय, हे त्यानं कधी समजून घेतलं नाही. अकरावीत तर मार्कांच्या घसरणीबरोबर निषादची बेफिकिरी वाढायला लागली. शेवटी त्याला शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आपण. परदेशी जायचं या कल्पनेनंच निषाद हुरळून गेला. नाना खटपटीलटपटी करून त्याला तिकडे पाठवलं. युनिव्हर्सिटी कशी आहे, यापेक्षा ती परदेशातली आहे म्हणून आपल्या प्रतिष्ठेत भर घालणारी आहे, यावर प्रदीपनं समाधान मानलं. तिकडे जाऊनही तो डॉक्टर नाही होऊ शकला. कशीबशी पदवी मिळवली. आता नोकरी करतोय. नोकरीतही धरसोड सुरू आहे. पुढच्या महिन्यात भारतात येणार आहे. तो येणार म्हटल्यावर कितीतरी बेत आईनं आणि आपण केले. परंतु चार दिवसांपूर्वी त्याचा फोन आला, तेव्हा म्हणाला, ‘मी पुण्यात आलो, की आपल्या बाणेरच्या फ्लॅटवर राहीन, नाहीतरी तो वापरात नसतोच.’ ऐकलं आणि झोप उडाली. त्याच्याशी काय बोलावं आणि कसं बोलावं, या विचारानं डोकं पिंजून काढलं. प्रदीपशी तर काही बोलायची सोय नाही. उच्चार जरी केला, तरी तो डोक्यात राख घालून घेणार.’ तिनं प्रदीपकडे पाहिलं. त्याचा डोळा लागलेला दिसत होता. मोबाईल घेऊन ती दिवाणखान्यात आली. तिनं निषादला फोन लावला.

“बोल काय काम आहे?” त्यानं विचारलं.
“काय करतो आहेस?”
“मॅच बघतोय. लवली शॉट!”
“आज जेवायला काय केलं होतंस?”
“कालचं सब वेचं टू गो केलं होतं. काही काम?”
“काम काही नाही. सहजच.”
“मग ठेवतो फोन.”

कुणीतरी तोंडावर दार बंद केल्यासारखं तिला वाटलं. ती उठली. आईच्या खोलीचं दार उघडं होतं. आत दिवा सुरू होता, पण टीव्ही बंद होता. ती खिडकीशी पाठमोरी उभी होती. नजर अंधारात रुतलेली. तिला आत जावंसं वाटेना. ती खोलीत आली. “काय फोन लावला होता वाटतं पेशव्यांना? त्यांना बोलायला वेळ होता का?” प्रदीपनं विचारलं. तिनं काहीच उत्तर दिलं नाही. कूस बदलून त्यानं पांघरूण ओढून घेतलं. ‘त्याला उत्तर अपेक्षित नसावं. आपण मात्र प्रत्येक वेळी बाप-मुलाच्या प्रश्नांमध्ये पडत रहिलो. त्यांचे प्रश्न समजून घेत उत्तर शोधत राहिलो. पण त्यातून काय साधलं? ना स्वत:ची फरफट थांबवू शकलो, ना त्यांच्यात संवाद निर्माण करू शकलो.’

रात्री उशिरानं तिचा डोळा लागला. सकाळी गजरानं जाग आली, तेव्हा डोळ्यांवर झापड होती. तरीही ती उठली. भराभर आवरून ती तयार झाली. गाडी काढताना तिचं लक्ष समोरच्या झाडाकडे गेलं. झाडामागून पोर्णिमेचा चंद्र डोकावत होता. एकदा तिनं आईला विचारलं होतं, की तू मला कोजागिरीला कधीच का ओवाळत नाहीस? यावर ती काही बोलली नव्हती. परंतु सुजातानं पुन्हा एकदा तिला विचारल्यावर तिनं सांगितलं होतं, की तिला सुजाताच्या आधी एक मुलगी झाली होती, पण पहिल्या दहा दिवसांतच ती गेली. हे सांगताना आईच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं होतं. तेव्हाच नाही, तर प्रत्येक कोजागिरीला आईच्या डोळ्यांत तिला एक वेदना जाणवायची. एरवी तडकफडक वागणाऱ्या आईच्या डोळ्यांतली वेदना ती समजू शकली नव्हती; तीही केवळ दहा दिवसांचा सहवास लाभलेल्या बाळाच्या आठवणीनं उमटणारी. निषादचा आणि आपला सहवास तर त्याहून जास्त. याचा अर्थ सहवास जेवढा जास्त, तेवढी कासाविशी जास्त, असं म्हणायचं आहे का आपल्याला? सहवासानं निर्माण होणारी कासाविशी फक्त आईच्या बाजूनं असते का? या प्रश्नाला एकच एक उत्तर कसं देता येईल?’ आपल्या विचारातला फिजुलपणा तिचा तिलाच जाणवला. ‘कुठेतरी भरकटत चाललो आहोत आपण,’ असं म्हणत तिनं समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं. रस्त्यावर प्राजक्ताचा सडा पडला होता. त्यावरून गाडी घालताना तिला कसंसंच वाटलं.

बरोबर सव्वासहा वाजता ती कॅनॉल रोडवर पोचली, पण वैजूचा पत्ता नव्हता. तिला फोन करण्यासाठी सुजातानं मोबाईल काढला. त्यावर वैजूचा मेसेज दिसला. ‘सॉरी नॉट कमिंग.’ घरी आई पोहे करून ठेवणार. हे आता तिला कळवायला हवं, किंवा ‘करू नकोस’ हे आईला तरी. तिनं वैजूला तसा मेसेज टाकला आणि चालायला सुरुवात केली. समोरून दाजीकाकांना येताना पाहून तिनं पटकन रस्ता बदलला. निषाद अकरावीत असताना ते त्याला गणित शिकवायला घरी यायचे. तिच्या वडलांचे मित्र. ‘ते भेटले म्हणजे निषादच्या हजार चौकश्या करणार. तो येणार हे कळल्यावर ‘भेटायला नक्की येणार’ असं म्हणणार. काय सांगायचं त्यांना, की त्याला भेटायचं असेल, तर आमच्या घरी नाही, आमच्या बाणेरच्या फ्लॅटवर जा म्हणून. खरंच का वाटत असेल त्याला तिकडे जाऊन राहावंस? का वाटत असेल? येताना तो त्याची कुणी मैत्रीण घेऊन येणार असेल म्हणून, का इथे त्याची कुणी मैत्रीण असेल? इथे कुणी असण्याची शक्यता कमीच. गेली दहा वर्षं तो तिकडे आहे. म्हणजे मैत्रीण असली, तर तिकडचीच असणार. गोरी असेल का काळी? कुणी का असेना, आपण तिला स्वीकारणार नाही, असं वाटतंय का त्याला? पण मग तो बोलत का नाही? कदाचित कुणी मैत्रीण नसण्याचीच शक्यता अधिक.’ काल रात्री त्याच्याशी झालेलं बोलणं तिला आठवलं. हा मुलगा घडघडून काही बोलेल तर शपथ. अर्थात, यात नवीन असं काय आहे? आपण मात्र… तिला एकदम खलिल जिब्रानची ‘तुमची मुलं’ ही कविता आठवली. त्यानं म्हटलंय ‘तुमची मुलं तुमची नसतात, ती असतात आयुष्य जगण्याच्या अनिवार इच्छेची अपत्यं. तुम्ही असता केवळ त्यांचं माध्यम. तुम्ही त्यांना प्रेम देऊ शकता, पण विचार देणं अशक्य.’ खलील जिब्राननं मुलांविषयी अजून बरंच काही लिहून ठेवलं आहे, ते सगळं सुजाताला आठवत नव्हतं. घरी गेल्या गेल्या त्याचं ‘द प्रोफेट’ पुन्हा वाचायचं तिनं ठरवलं. तिला खूप हलकं वाटायला लागलं. तिचा चालण्याचा वेग वाढला. तेवढ्यात फोन वाजला. आईचा होता. ”वैजू येतीय ना, तुझ्याबरोबर.’’

”अं, हो.’’ सुजातानं ठोकून दिलं. वैजू आलीच नाही हे आईला कळतं, तर तिच्या सतराशेसाठ चौकश्या आणि सूचना सुरू झाल्या असत्या. त्यात हा हलकासा मूड निसटून गेला असता. पोहे काय, आपण आणि प्रदीप खाऊ शकतो.

”बरं झालं, वैजू येतीये.’’ आई म्हणाली. आईनं अजून काही विचारण्यापूर्वी तिनं फोन बंद केला. आईच्या बोलण्याला आपण कंटाळतो, या जाणिवेनं तिला कसं तरीच वाटलं. ‘तिच्यापर्यंत पोचत असेल का आपलं असं वागणं? काल आपण किती सहजपणे तिला सुचवलं, की घरी कंटाळा येत असेल, तर ‘अथश्री’वर राहायला जा म्हणून. तसा काही निर्णय ती घेऊ शकेल? तिचं काही सांगता येत नाही. पण तिच्या घरात दिवसेंदिवस ती किती एकटी पडत चाललीये, हे आपण पाहतोय. पण म्हणून वयाची ऐंशी वर्षं उलटल्यावर असं काही करणं कितपत योग्य ठरेल? थोड्या वेळा पूर्वी जिब्रानला आठवून ‘आपली मुलं आपली नसतात.’ हे त्याचे विचार आपल्याच गळी उतरविण्याचा प्रयत्न केला आपण, पण आपल्या आई-वडलांचं काय? तेही आपले नसतात, असं म्हणायचं का? त्यांच्या विषयीचं आपलं कर्तव्य काय असतं? काय ठरतं? हे ठरवायचं कुणी? आई-वडलांनी, का त्यांच्या मुलांनी?’ परत फोन वाजला. वैजूचा फोन होता.

”सुजाता, सॉरी! उठायला उशीर झाला, म्हणून फिरायला यायचा कंटाळा केला. पण मावशी आल्या असतील, तर मी परस्पर तुझ्या घरी येते. किती दिवसांत भेटल्या नाहीत.’’

सुजाताचा चालायचा उत्साह एव्हाना संपला होता. तिनं घराचा रस्ता धरला. ती घरी पोचली. तिच्या पाठोपाठ वैजू आली. कांदेपोहे तयार होते. पोह्यांबरोबर कॉलेजमधल्या दिवसांच्या आठवणी निघाल्या. वैजूच्या विसरभोळेपणाच्या कितीतरी गोष्टी आईच्या लक्षात आहेत, हे पाहून सुजाताला आश्चर्य वाटलं.

”संकेत आणि अनुजा काय म्हणताहेत मावशी? आम्ही त्यांच्यावर कसे पाळत ठेवून असायचो, हे आठवलं की गंमत वाटते. तेही किती दिवसांत भेटले नाहीत.’’

”ती चालली आहे अमेरिकेला, मानसकडे. सहजच. मीच म्हटलं तिला, चांगलं महिना-दोन महिने जाऊन ये. मुलाचा-सुनेचा नवा नवा संसार पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारच की. पुढे थंडी सुरू झाली, की जाणं मुश्कील होणार.”

सुजातानं आईकडे रोखून बघितलं, पण तिचं लक्ष नव्हतं. ती आपल्याच नादात बोलत होती. ”मी म्हटलं, माझी काही काळजी करू नकोस. सुजाता आहे. मुख्य म्हणजे प्रदीपरावही काही हवं-नको बघतात.” सुजाताला आईची कमाल वाटली. ‘काल रात्री अनुजा अमेरिकेला जायला निघाली म्हणून आई अस्वस्थ झाली होती आणि तीच आता म्हणतीये, की ‘मीच अनुजाला सुचवलं म्हणून.’ हा समजूतदारपणा म्हणायचा की मानभावीपणा? आपल्या माणसांना सांभाळून घ्यायचं शहाणपण बाईच्या अंगी उपजत असतं, की परिस्थितीनं येतं?’

“सगळेजण तुमची काळजी घेणारच की.” वैजूच्या शब्दांनी सुजाता भानावर आली. “तुम्ही सगळ्यांच्या आवडीनिवडी इतक्या निगुतीनं जपता ना. आज मी येणार म्हटल्यावर लगेच माझ्या आवडीचे कांदेपोहे केलेत. कमाल आहे तुमची!”

“मी कॉफी करून आणते.” सुजाता म्हणाली.
सुजाता आत गेल्याची खात्री पटल्यावर प्रतिभाताई उठून वैजूजवळ जाऊन बसल्या आणि म्हणाल्या, “वैजू, तुला एक काम सांगू का?”
“सांगा ना, त्यात विचारायचं काय?”
“मला जाता-जाता घरी सोडशील?”
“एवढंच ना!”
“तुला थोडं उलटं पडेल.”
“त्याची नका तुम्ही काळजी करू.”
“काल रात्रीच कपडे जुळवून ठेवले आहेत. येते घेऊन.”
पाच मिनिटांत साडी बदलून त्या बाहेर आल्या.
“हे काय आई! तू कुठे निघालीस?” सुजातानं विचारलं.
“घरी. वैजू सोडतीये मला.”
“अगं, पण परवापर्यंत राहणार होतीस ना?”
“आत्ता जाते. निषाद आला, की चांगली पंधरा दिवस येणार आहे मुक्कामाला. त्याला माझ्या हातच्या साटोऱ्यांपासून पिठल्यापर्यंत सर्व पदार्थ आवडतात.”
“ते सगळं निषाद आल्यावर बघू.” निषादचा उल्लेख करताना सुजाताच्या छातीत बारीकशी कळ उठली, पण त्याची तीव्रता कालच्याइतकी नसल्याचं तिला जाणवलं. “आत्ता इतक्या घाईनं का निघालीस?” तिनं परत एकदा विचारलं.

“मला आज शीलाकडे जायचं आहे.” दुसऱ्या कुणी आपल्याबाबत काही निर्णय घेण्यापूर्वी तो आपला आपण घ्यायला हवा, या निष्कर्षाप्रत त्या काल रात्री आल्या होत्या. त्याबद्दल सुजाताशी बोलायची त्यांची इच्छा नव्हती. “कॉफी झाली की निघतो आम्ही. वैजूलाही उशीर नको व्हायला.”
सुजातानं मान हलवली. त्या गेल्यावर खोलीत जाऊन तिनं खलिल जिब्रानचं पुस्तक कपाटातून काढलं. ‘युवर चिल्ड्रेन’ ही कविता वाचायला सुरुवात केली. त्यानं लिहिलं होतं. ‘तुम्ही त्यांच्या शरीरांना तुमच्या घरात आश्रय देऊ शकाल, पण त्यांच्या आत्म्यांना कोंडून ठेवू शकणार नाही. कारण त्यांचे आत्मे भविष्याच्या घरात वावरत असतात. त्यांचं ते घर पाहणं स्वप्नातही शक्य नसतं तुम्हाला.’ वाचता वाचता ती क्षणभर थबकली. ‘जिब्रान म्हणतो त्याप्रमाणे मुलांची स्वप्नं आपण पाहू शकणार नाही. याचा अर्थ असा नाही, की मूलपण संपलं, की स्वप्नं पाहायची ताकद कुणामध्येच उरत नाही. भले ताकद आणि इच्छा कमी होत असेल, पण ती नसेल, असं तरी का समजायचं आपण?’ जिब्रानच्या ओळी वाचताना तिच्या डोळ्यांसमोर निषादऐवजी आईची मूर्ती आली. तिनं पुढे वाचायला सुरुवात केली. ‘तुम्ही एक धनुष्य आहात. तुमच्या मुलांना बाणाप्रमाणे पुढे सोडलं आहे. त्या धनुर्धारी माणसाचं प्रेम, जो बाण सुटला त्यावर असतं आणि जे धनुष्य त्याच्या हातात असतं, त्यावरही असतं.’

तिला वाटलं, किती खरं लिहिलं आहे त्यानं. प्रत्यक्ष जगताना धनुर्धारी माणूस, धनुष्य, बाण सगळ्या भूमिका अनेकदा एकात एक मिसळलेल्या असतात. तिनं पुस्तकातली नजर उचलून खिडकीबाहेर दिसणाऱ्या बदामाच्या झाडाकडे पाहिलं. शेंड्याला लाल जर्द रंगाची चार-सहा पानं अजून शिल्लक होती आणि रूक्ष वाटणाऱ्या फांद्यांमधून पोपटी पानं डोकावत होती. तिनं त्या झाडाकडे मायेनं पाहिलं. वाऱ्याच्या झुळकीसरशी सगळी पानं आपल्याच नादात डोलत होती.

मृणालिनी चितळे, पुणे.
chitale.mrinalini@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.