Now Reading
बेपत्ता

बेपत्ता

Menaka Prakashan

प्रिय मानस,
वाड्यातल्या ओसरीवरचा हा शिसवी बाक आठवतोय? तुला आणि तुझ्या आईला-अलकाला- तो कधीही आवडला नाही, पण त्याच बाकावर चिंतन करत, आज घरी येणार्‍या पाहुण्यांची वाट बघत बसलोय. तू नाहीस आणि अलका नाही, पण मी आणि तो बाक अजूनही ओसरीवर वाट बघतोय. गेल्या आठ वर्षांत तुझ्यासंदर्भात मी खूप पत्रं लिहिली, तुझ्याबद्दल इतरांनी लिहिलेली पत्रं वाचली, पण मी तुला असं पत्र लिहिलंच नाही. खरं सांगू, माझ्या डोक्यातही हा विचार आला नाही. पण आज, तुझ्या माझ्या आयुष्यातलं एक खूप महत्त्वाचं पान उलटलं जाणार आहे, का वेगळ्याच पुस्तकातलं काढून ठिगळ जोडतात तसं जोडलं जाणार आहे, माहीत नाही… तुला लिहिलेलं हे पत्र कुठल्या पत्त्यावर पाठवायचं, हे माहीत नसलं, ते माझ्याच उशाखाली राहणार असलं, तरी आज लिहितो आहे.

पिनाकी आयुषला घेऊन भारतात आली, तेव्हा तो फक्त सहा महिन्यांचा होता. तेव्हापासून मी त्याचा आजा न राहता त्याचा बाप बनून त्याला वाढवलं आहे. तो तुझा मुलगा असला, तरी तो तू नाहीस.
तुझ्या माणिकआजीच्या आणि तिच्या सुमात्राहून आणलेल्या माणकाच्या कथा तुला आठवतात का रे? लहान होतास तू खूप, तिचा आरडाओरडा-रडणं सुरू झालं, की खूप कावराबावरा व्हायचास. त्या वेळेला याच बाकावर येऊन बसायचो आपण, रस्त्यावरच्या सायकली आणि दुचाकी मोजत. बिचारी अलका, आईचं विव्हळणं ऐकत, तिचं सांत्वन करायचा प्रयत्न करत राही. आईला विस्मरण झाल्यावरही, त्या अंगठीच्या अलंकारिक नक्षीचा ती वारंवार उल्लेख करत, अलकावर तिच्या त्या अंगठीतला माणीक चोरल्याचा ती दिवसरात्र आरोप करे. पण आईच्या अंगावर तुळशीच्या मण्यांची माळ आणि मोत्याच्या कुड्या सोडल्यास मी कधीच काहीही पाहिलं नव्हतं. आई त्या माणकाच्या पोटी तळमळते आहे म्हणून अलकानं सोनाराला आपल्या घरी आणून, आपल्याला परवडेल तेवढ्या रकमेचं माणीक आईपुढे ठेवलं होतं… पण ‘हा माझा सुमात्रेचा माणीक नाही, माझ्या अण्णांनी आणलेला माणीक डाळिंबाच्या दाण्यासारखा रसरशीत होता. हा अण्णांचा माणीक नाही!’ म्हणून आई टाहो फोडून रडली. त्यानंतर तिचे डोळे सततच पाणावलेले असत. ‘अण्णा! अण्णा!’ म्हणत आणखीन व्याकूळ होत, कुठल्या तरी अनामिक तृष्णेची ओढ तिला शोषून घेत पैलतीरी घेऊन गेली. सुमात्राला जाणारे तिचे वडील आणि डाळिंबी रंगाचा तिचा माणीक, सगळंच निव्वळ बुद्धिभ्रमातून उमगलेलं कथारंजन वाटायचं मला. पण ते कथारंजन नव्हतंच! माझी आई ‘माणीक माणीक’ म्हणत गेली आणि त्याच सागवानी पलंगावर ‘मानस मानस’ म्हणत तुझी आई! आपली आई आणि आपली बायको मनात अशी धगधगणारी आस घेऊन शेवटचा श्वास घेतात, तेव्हा त्यांच्या अतृप्त आत्म्यांपेक्षा आपली जिवंतपणे होणारी तळमळ कुणाच्याही वाट्याला येऊ नये. कुठे आणि कशी व्यक्त करायची ती? वाटलं, दोन शोकांतिका घडलेल्या त्या पलंगाचा एकन् एक पूर्जा वेगळा करून त्यालाही अग्नी देऊन टाकावा. पण पिनाकी म्हणाली, ‘बाबा, अँटिक आहे तो आता, तुम्हाला घरात नको असला, तरी सुतार बोलावून जरा दुरुस्त करूया आणि मग विकूया.’ आणि सुताराला सापडली की रे आईची अंगठी! काळवंडलेली, वेलीच्या पानांमध्ये दोन अस्फुट कमळं आणि डाळिंबी रंगाचा मळकट माणीक. ती अंगठी पाहून इतकं अपराधी वाटलं मला मानस! तिच्या बोलण्यात तथ्य नाही, असं समजून मी कधी ती अंगठी, किंवा माणीक शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. ती बोलते आहे ते खरंय, तिच्यासाठी कधी कुणीतरी माणीक आणला असेल, यावर विश्वासच ठेवला नाही…

आणि तुझ्या आईला वाटत होतं, तू बेपत्ता असलास तरी तू आहेस, तू संपर्क केला नसलास, तरी तू सुखरूप आहेस, तू परत येशील. निदान तिचा विश्वास अतूट राहावा म्हणून मी प्रयत्न करत राहिलो.
एअरपोर्टपोर्टवरून गायब झाल्यामुळे, तुझ्या वैद्यकीय संशोधनाच्या स्वरूपामुळे जवळ जवळ एक वर्ष तुझ्या शोधात अनेक देशांचे पोलिस कार्यरत होते. त्यामुळेच तुझ्या तल्लख बुद्धीची वाहवा, तुझं संशोधन, तुझ्या विक्षिप्तपणाचे किस्से, पिनाकीवर तुझं ओरडणं, धमकावणं, तुमच्या काऊन्सेलर्सचं तुम्ही वेगळं व्हावंत हे निदान, सगळं मलाच नाही, जगातल्या अनेक लोकांना कळलं. पिनाकीवर तुला बेपत्ता करण्याचे संशय, अतिशय चारित्र्यहीन आरोपसुद्धा झाले. मी शरमलो, दहा वर्षांचं जगण्याचं ओझं दोन वर्षांतच माझ्या चेहर्‍यावर दिसायला लागलं, पण पिनाकी खंबीरपणे उभी राहिली. तिनं आयुषलाच नाही, मलाही नवीन उमेद दिली.

तुला माहिती आहे मानस, मी कधीच माझ्या आईच्या आई-वडलांना पाहिलं नव्हतं. ते म्हणे आईच्या लहानपणीच वारले होते. त्यामुळे आईला तिच्या मामा-मामीनं वाढवलं होतं. खूप आपुलकीनं, प्रेमानं वाढवलं असावं, असं वाटत नाही, कारण आईमध्ये कधी मला ते सापडलं नाही… आणि माझे वडील! देवाच्या कृपेनं तू वाचलास, त्यांची सावली तुझ्यावर कधी पडली नाही. पण माझ्या वडलांचा बहुधा प्रेम या शब्दाशी छत्तीसचा आकडा होता! आईशी तिनं त्यांना न विचारता दुधावर खर्च केलेल्या दहा पैशांवरून सुद्धा ते भांडत, कधी तिच्यावर हात उगारत…

पण या पत्राचा उद्देश माझ्या भूतकाळातल्या कौटुंबिक हिंसेच्या वर्तुळाशी तुझी ओळख करून देण्याचा नाही. माझं बालपण कसं होतं, त्यावरून मी तुझं बालपण कसं असायला हवं, हे तू प्रत्यक्षात यायच्या आधीच ठरवून ठेवलं होतं. तुला माहिती आहे, तू लहानपणी मी ऑफिसहून यायची वाट बघत या बाकावर बसायचास ना, तेव्हा माझ्या लहानपणीच्या अनेक तीव्र वेदनांवर तू फुंकर घालायचास. मी खेळून यायला दोन मिनिटं उशीर झाला, तरी माझे वडील पट्टी घेऊन बसलेले असायचे… पण त्याच बाकावर तू नाकपुड्या फुगवून रुसलेला का होईना, माझी वाट बघत असायचास ना, तेव्हा शंभर गालगुच्चे घ्यावेसे वाटायचे… माझ्याभोवती रचलेली एक अनामिक, अमंगल वेसण झिडकारून मी स्वतःला मुक्त केलंय, असा आपल्या नात्यामुळे माझा विश्वास दृढ होत गेला. पण जे प्रेम मी मनोसक्त तुझ्यावर, अलकावर उधळलं, ते थोडंसं तरी माझ्या आईवर शिंपडायला हवं होतं… सरतेशेवटी तरी कुणीतरी माणिकला माणीकसारखं जपायला हवं होतं.

तू बेपत्ता झलास, का स्वच्छेनं आमचा त्याग केलास माहीत नाही. पण गेल्या आठ वर्षांत तुझी वेगवेगळी रूपं समोर येत गेली आणि त्याअनुषंगानं माझ्या स्वभावाचे कंगोरे. पहिल्यांदाच प्रश्न पडला… तू प्रेमापोटी वाट बघत असायचास, माझी ओढ म्हणून, का मी घेऊन येणार्‍या खाऊचं आमिष होतं म्हणून? आणि मग कित्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात, जेव्हा तुला मी तुझा मित्र न होता तुला जाब विचारायला हवा होता, तुला सरळ तुझे कान पकडून माझा धाक वाटला तरी चालेल, पण तुला तुझी चूक कबूल करायला लावायला हवी होती. नुसतं ‘आय अ‍ॅम सॉरी’ म्हणून सगळं सुरळीत होत नाही, याची जाणीव तुला बाहेरच्या जगात पाठवायच्या आधी मी तुला करून द्यायला हवी होती. पण इथे त्याची यादी मांडून काय उपयोग? गेल्या आठ वर्षांत मला पहिल्यांदाच समजलंय मानस, पूर काय, किंवा दुष्काळ काय, दोन्ही वाईटच. मग तो प्रेमाचा पूर, किंवा दुष्काळ का असेना! पण ही समज तू गेल्यावर आलेली. आयुषचा आजा, तुझ्या बापापेक्षा जास्त सतर्क आहे. तू कधी आयुषचा विचार करतच असशील, तर निश्चिंत राहा.

थोडं आडवळणावळणाचं हे पत्र लिहिण्याचा खरा उद्देश असा, की आज पिनाकीच्या लग्नाची बोलणी करायला तिचा नवा मित्र आणि आई वडील येतायत. कायद्यानं तुला मृत करार देऊन सहा महिने झाले आहेत. एकदा पिनाकीचं लग्न झालं, की आयुष फक्त आपला राहणार नाही. एक वेगळं कुटुंब, एक वेगळा वडीलमाणूस त्याच्या डोक्यावर हात ठेवेल. आपल्या घराणातल्या दुष्काळ-पुराच्या चक्रात न अडकता त्याला संपूर्ण प्रेम मिळू देत.
कायद्याच्या लेखी तू जिवंत नसलास, तरी हा बाक, हे पत्र, या अवकाशात तरळणारे तुझे-माझे अनेक प्रसंग नि प्रश्न आणि जिवंत आहे तोपर्यंत मी, आम्ही तुझी वाट पाहतोय!

– अमृता हर्डीकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.