Now Reading
बीज

बीज

Menaka Prakashan
View Gallery

खाली आल्यावर काहीतरी आठवलं, तशीच आशू परत फिरली. आता लिफ्टसाठी थांबावं लागणार, असं दिसत होतं. जवळच्या इन्डिकेटरवर पाचचा आकडा दिसत होता. वर जाणारा बाणही खुणावत होता. किती वेळ असंच… चुळबुळत ती उभी राहिली.
घड्याळाकडे परत परत नजर जात होती. निघून जाण्याच्या विचारानं पाऊल उचललेलं, पण काहीच पर्याय नव्हता. जागेवरच खिळून… स्वतःलाच दोष देत… चरफडत…
हल्ली तर हे फारच वाढत होतं. पर्स उचलताना बाजूलाच अडकवलेल्या गाडीच्या किल्ल्या घेण्याचं भानच राहिलं नव्हतं.
लिफ्टचं दार उघडं ठेवूनच वरती बोलण्याचा अन् काही सरकावण्याचा आवाज येत होता. तिचा ताण मात्र वाढत होता, पण… हतबलतेनं वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.
लिफ्टचं दार सरकावल्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. कुजबुजही थांबली होती. तिला एकदम सुटल्यासारखं वाटलं.
लिफ्टमध्ये खुर्चीवर बसलेले दामलेकाका, बाजूला फायलींची पिशवी घेतलेला अजय आणि बावरलेली वीणा बघताच ती चमकली.
‘‘सॉरी हं आसावरी, बाबांना अचानक…’’ काळजीनं भरलेल्या स्वरात सूक्ष्म अपराधी भाव डोकावत होते. त्याचा केविलवाणा चेहरा, त्यावरचे लीनदीन भाव… ती आतून हलली.
‘‘अरे, काहीही काय? मी… थांब जरा. फोन करून सांगते हॉस्पिटलमध्ये तसं…’’
‘‘मी कळवलं आहे. अ‍ॅडमिट करावं लागेल. अस्वस्थ वाटू लागलं, चक्कर आली… अजून आम्ही घरीच होतो म्हणून बरं झालं.’’ बाबांच्या खांद्यावर थोपटत अजय म्हणाला. वीणानं त्यांची घसरलेली शाल सारखी केली. ‘‘त्यात नेमकी कालच आमची गाडी गॅरेजमध्ये… आता टॅक्सी केव्हा मिळणार… अ‍ॅम्ब्युलन्स पण नाहीत…’’
‘‘वीणा, मी सोडू शकते तुम्हाला. वॉचमनच्या मदतीनं काकांना उचलून ठेवता येईल. माझ्या गाडीच्या सीट्स अ‍ॅडजेस्टेबल आहेत. हवं तर खुर्चीसकट अलगद ठेवू. मी आलेच आत्ता किल्ल्या घेऊन.’’
धाडधाड निर्णय घेऊन आठव्या मिनिटाला गाडी हॉस्पिटलच्या आवारात आणून उभी केली गेली. पुढचे सगळे सोपस्कार पार पाडल्यानंतरच ती निघाली.
नव्वदीतल्या आजोबांना धरून नर्स त्यांना चालण्याचा आग्रह करत होती. त्यांना मात्र चक्करल्यासारखं होत होतं. तिला वाटलं, क्षणभर नर्सला थांबवावं अन् सांगावं, ‘बाई गं, हे आता पडतील. पाय लटपटतायत ते बघ. पाय घसरला तर…’
एका बेडवरच्या, नाका-तोंडात नळ्या घातलेल्या आजी काहीतरी सांगू बघत होत्या.
त्यांच्या नजरेतलं कारुण्य, हतबल अवस्था यांच्याशी काहीही देणं-घेणं नसल्यागत बाजूच्या स्टुलावर बसलेला बहुधा त्यांचा नातू असावा.
हेडफोनवर गाणी ऐकत तो आपल्याच तंद्रीत डोलत होता. त्याच्या कानफटात एक सणसणीत ठेवून द्यावी, असा तीव्र विचार त्या क्षणी आशूच्या मनात आला.
प्रत्यक्षात त्याला हलवून सावध करून ती बाहेर पडली.
तिच्या गाडीच्या मागे-पुढे वाटेल तशा गाड्या पार्क केलेल्या होत्या.
‘‘लोकांना साधी शिस्त पाळता येत नाही.’’ मनातला उद्वेग बाहेर पडला.
आत्ता जिजी असत्या, तर त्यांचा परवलीचा मंत्र ऐकावा लागला असता.
‘अगं, डोकं शांत ठेव. आपोआप मार्ग निघेल.’
‘पण… प्रत्येक वेळेस हा प्रयोग यशस्वी होईलच असं नाही, हे त्यांना कोण सांगणार? कोण म्हणजे?… आपणच. दुसरं कोण?’
स्वतःच्याच विचाराचं तिला हसू आलं.
‘‘सॉरी बरं का मॅडम… काय झालं ना, पेशन्टला तातडीनं आत नेण्याच्या घाईत…’’ बोलता बोलता त्या गृहस्थानं आपली गाडी काढून तिचा रस्ता मोकळा करून दिला.
‘‘इट्स ओके!’’
वाहत्या पाण्याप्रमाणे वळण घेण्याची वृत्ती हल्ली अंगीकारावी लागली होती. नेहमीच तत्त्वनिष्ठा, सडेतोड वृत्ती बाळगून चालणार नसतं, हे आता अंगवळणी पडू लागलं होतं. पण जी मुळं खोलवर रुजली होती, त्यांचं काय?
ती इतकी सहजासहजी कशी हलणार?
‘‘स्वतःचीच मतं मिरवत राहण्याचा रोग जडलाय तुला. दुसरं काही नाही. सारखं आपलं माझं यंव अन् माझं त्यंव…’’
जयच्या शब्दांच्या फटकार्‍यानं जीव हुळहुळला होता. हॉर्नच्या आवाजानं ती भानावर आली.
संध्याकाळी परतायला अपेक्षेपेक्षा उशीरच झाला. अम्माकडची फेरी काही चुकवता येणार नव्हती. तयार होऊन पिनू दारात ताटकळत उभी असेल. अम्माच्या हातात पुस्तक असलं, तरीही तिचं लक्ष मात्र दाराकडे आणि घड्याळाकडेच असणार. सेकंदकाट्याच्या दुप्पट गतीनं तिचं टेन्शन वाढत असणार…
घरात शिरल्यावर काय होईल, याचा विचार करत एक सफाईदार वळण घेऊन तिनं गाडी सोसायटीच्या आत घेतली.
आत मायक्रोवेव्हच्या ‘बीप बीप’ आवाजाबरोबरच ताटं मांडल्याचा आवाजही येत होता. जेवण करून जाण्याची ती अप्रत्यक्ष सूचना होती.
अम्मा ताड ताड बोलून, रागावून मोकळी होणार नाही, उशिरा आल्याचा खुलासाही विचारणार नाही, हे तर जवळपास ठरूनच गेलं होतं. संयमित आणि शांतपणानं ताणलेल्या चेहर्‍यावरचे अदृश्य सपकारेच समोरच्याला गुदमरून टाकत.
कानकोंडं करण्याची जबरदस्त ताकद त्या धगीत असायची.
‘‘आज ऑफिसला पोचायला उशीर झाला…’’ पोळीचा तुकडा मोडत आशूनंच कोंडी फोडली.
अम्मानं भुवया उंचावून प्रश्‍नार्थक नजरेनं तिच्याकडे फक्त बघितलं.
‘‘काय झालंऽऽ… दामलेकाकांना अचानक हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावं लागलं. अजयची गाडी गॅरेजमध्ये दिलेली. धावपळ करायला कुणी नाही… मग मी पोचवलं. बरं झालं, पण वेळेवर… ऑफिसमध्ये गेल्यावर कळलं, नेमकं आजच माझं प्रेझेन्टेशन ठरवलंय. आधी न सांगता… तयारी करायला पण वेळ नाही मिळाला..’’
‘‘हंऽऽऽऽ’’
अम्माच्या तोंडून फक्त एक दीर्घ हुंकार तेवढा बाहेर पडला.
दरीमधून येणारा ध्वनी दीर्घकाळ निनादत राहावा, तसा तो हुंकार घुमत राहिला.
रात्री उशिरापर्यंत पिनूची चिवचिव सुरू होती. डोळ्यांत झोप मावत नव्हती, तरीही आठवडाभरच्या घटनांचा आढावा… तो कोटा संपत नव्हता. बोलता बोलता झावळ्यासारख्या लांबसडक पापण्या विसावल्या.
‘‘काय कमालीचे डोळे आहेत गं तुझे…’’ जयचे शब्द कानांत घुमू लागले. त्याच्या मदभर्‍या शब्दांची धुंदी लग्नानंतर खाडकन् उतरली होती. तिला सावध करण्याचा अम्मा आणि जिजींचाही प्रयत्न असफल ठरला होता. त्याची कोती आणि खुजी मनोवृत्ती दिसू लागल्यावर तिला भान आलं होतं. नकळत एक दीर्घ सुस्कारा बाहेर पडला.
सकाळी अल्लद पावलानं पिनूनं खोलीत प्रवेश केला. आळसावलेल्या नजरेनं आशू तिच्याकडे बघत होती. ‘सकाळी लवकर उठून आवरायची सवय अम्मानं तिला लावली होती. मारून मुटकन आपल्यालाही अनेक गोष्टी तिनं करायला लावल्या, पण आपल्याला घडवताना ती जास्तच कठोर होत गेली होती का… तिच्यापुढे हूं का चूं करायची प्राज्ञा नसायची. कडकपणा तर तिच्यात ठासून भरला होताच, सोबतीला तळपणारा स्वाभिमानही…’
एकीकडे आवरत असतानाच पिनूच्या बोलण्यानं तिचं लक्ष वेधून घेतलं. संकोचलेल्या, वेदनामय चेहर्‍यानं ती सांगत होती.
‘‘… काल तिचा काहीतरी कार्यक्रम होता. पण तुला यायला तर खूपच उशीर झाला. मग काय… ती तर…’’
‘‘कुणाचा कार्यक्रम…? अन् कसला?’’
‘‘अगं, अम्माआजीचाच ना! तेच सांगतेय. आणखीन दोघी-तिघी आजी तिला बोलवायला आल्या होत्या, पण मी…? माझं काय? मला एकटीला कशी सोडणार? नाही जाता आलं तिला.’’
आशूच्या डोळ्यांपुढचा धुक्याचा पडदा झर्रकन दूर झाला. ‘काल १५ तारीख… अम्माचा कथाकथनाचा कार्यक्रम होता. बापरे! दहा-बारा दिवसांपासून दोन-चार वेळा तरी तिनं आठवण करून दिली होती. त्या दिवशी रजा घेण्याचंही सुचवलं होतं.’
कुणीतरी जादूची कांडी फिरवून विस्मृतीच्या पडद्याआड ढकलून दिल्यागत तिची अवस्था झाली होती.
‘‘जयच्या बाबतीत तू कुणाचंच ऐकलं नाहीस. अगदी जयच्या आईचंही. त्यांनी पण परावृत्त करण्याचा कमी प्रयत्न केला का? खड्ड्यात उडी तू मारली आहेस. आता जिजी काय, किंवा मी काय… आमची मदत असेलच. पण… कोणतंही नातं तू आता गृहीत धरू नकोस. माझं स्वातंत्र्य जपतच मी पिनूला सांभाळेन, हे मात्र नक्की… लक्षात ठेव! मदतीचा हात पुढे केलाय याचा अर्थ…’’
रोखठोक शब्दांत सडेतोडपणानं सुनावणारी अम्माची मूर्ती जशीच्या तशी आत्ताही आशूला समोर दिसत होती.
असं कसं आपण विसरलो…?
तगमग वाढतच गेली.
‘‘मदर्स प्रॉमिस…’’
दोन बोटांच्या चिमटीत गळ्याची कातडी पकडत पिनू म्हणत होती,
‘‘एऽऽ, सारखं सारखं काय गं असं मदर्स प्रॉमिस… मदर्स प्रॉमिस… काल तुला यायला उशीर झाला, हे कळलं ना? पुढच्या फ्रायडेचं लक्षात ठेव. विकीचा बर्थ डे… मस्त धमाल करू. गेम्स, अंताक्षरी, डान्स, हंऽऽऽ?’’
परत परत बजावून पिनूची दोस्त मंडळी निघून गेली.
‘‘मम्माऽऽ’’
‘‘होय, आता मोबाईलमध्ये रिमाईन्डरच लावते. परत कालच्यासारखं नको.’’
गोठलेले शब्द बाहेर पडले.
भोवतालच्या परिघावर उभं राहून वाभाडे काढणार्‍या माणसांच्या बोलण्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम करून घ्यायचं तिनं कधीचंच सोडलं होतं. पण अम्मा आणि जिजी?
‘‘स्वतःची त्रिज्या त्यानं आखून घेतली आहे, ते तुला दिसत नाही.’’
आकाशवाणी झाल्यासारखे अम्माचे शब्द कानांवर आदळत राहिले.
त्रिज्या काय, परीघ काय… आयुष्याचंच गणित चुकत गेलं.
‘‘एव्हरी मॅन हॅज अ‍ॅन ओपिनियन इन धिस हाऊस.’’
शब्दांवर जोर देत तो तिला ठासून सांगत होता.
‘‘म्हणजे…?’’
‘‘म्हणजे, या घरात…’’
‘‘अर्थ नको सांगूस… तो कळतो मला. स्पष्टीकरण दे.’’
‘‘देतो. तुला जसं तुझं मत मांडण्याचा अधिकार आहे, तसंच मला पण ते पटलं नाही, तर धुडकावण्याचा अधिकार आहे.’’
डाव्या तळहातावर उजव्या हाताची मूठ आपटत तो म्हणाला होता.
‘‘इथे मत मांडण्याचा, किंवा धुडकावण्याचा प्रश्‍न नाहीच. पिनू तुझी पण मुलगी आहे. तिच्या संगोपनाची जबाबदारी तुझ्यावर पण आहे… हे लक्षात ठेव.’’
‘‘पार पाडेन, पण… ती माझ्या पद्धतीनं.’’
‘‘म्हणजे कशी?’’
‘‘ते तू विचारायचं नाहीस. रादर, कुणीच विचारायचं नाही. मी कधी विचारतो तुला? मग तू पण… आय अ‍ॅम नॉट अ‍ॅन्सरेबल टू एनीबडी.’’
मग्रुर, ताठ चेहर्‍यावरून आढ्यतेखोरपणा ओसंडत होता. हिटलरशाही वृत्ती उफाळून येत होती. अंगात कली शिरल्यागत त्याचं वागणं होतं.
‘‘अगदी, तू काहीही केलंस, तरीही?’’
‘‘ते तर मी तुलाही म्हणू शकतोच ना…’’
शेंडा, बुडखा नसलेल्या वादाला ना काही अर्थ होता, ना अंत. नातं जपण्याचा आटोकाट प्रयत्न तिनं केला. पिनूसाठी, निष्कपट बालपणासाठी.
अम्मामधला मानसशास्त्रज्ञ टक्क जागा होता. त्यातला तिचा अभ्यास, माणसाच्या मनाची वृत्ती, लहान मुलांची मानसिकता… सगळं जाणून निरीक्षणं समोर दाखवून देण्याची तिची हातोटी विलक्षणच होती.
‘‘तू एकदा शांतपणे पिनूला सगळं काही स्पष्टपणे सांग. वास्तव काय आहे, हे तिला कळायलाच हवं. आजूबाजूची परिस्थिती, भोवतालची आपलीच म्हणवणारी माणसं… आपल्या परीनं इमानेइतबारे खतपाणी घालतात. ते तरी थांबेल. तिची मतं तिलाच ठरवू दे. तिचा अनुभव कदाचित वेगळाही असू शकेल. काय असेल तो घेऊ दे.’’
अम्माचा अंदाज खरा ठरला होता. लहान वयातच घटनेकडे त्रयस्थपणे पाहण्याची सवय पिनूला लागली होती. आशूच्या मनातले काळे, धूसर ढग विरळ झाले होते.
वार्‍याच्या झुळकीनं खिडकीचे पडदे हलत होते. त्याला लावलेल्या छोट्या घुंगरांचा मंजूळ किणकिणाट वातावरणात भरला होता. ही जयची खास आवड होती.
एखाद्या गोष्टीसाठी झपाटलेपण पराकोटीचं असायचं. आवड असो वा नावड, एकदम टोक गाठणारंच असायचं. त्यात बदल करण्याची, किंवा जुळवून घेण्याची वृत्ती नव्हतीच. विरुद्ध गुणांच्या मिश्रणानं त्याचं व्यक्तिमत्त्व बनलंं होतं.
क्षणात त्याचं अनपेक्षित रूप अचानक समोर आलेलं बघून थक्क होण्याचे अनेक प्रसंग आत्ताही तिच्या डोळ्यांपुढे आले. नात्याची वीण उसवतच गेली. जुळवून घेण्याचे तिचे प्रयत्न… पण ते हाणून पाडण्याचाच जणू त्याचा डाव होता.
डंख करण्याचा असुरी आनंद तो मिळवत राहिला.
पिनूला तयार करताना त्याचा आवाज चढाच असायचा. तिला बूट घालताना तर रणधुमाळी कधी चुकली नव्हती. त्याचा टिपेला पोचलेला आवाज, पिनूचं घाबरून भोकाड पसरणं, न राहवून आशूची मध्यस्थी… जयचं डाफरणं आणि दिलेली ताकीद..
‘‘तू मधे पडायचं नाहीस. मी बरोबर हॅन्डल करतो तिला. आय अ‍ॅम अ परफेक्ट पर्सन. माझ्याजवळ तडजोड चालणारच नाही.’’
‘‘तडजोडीचं सोड… सगळी मोडतोडच करतो आहेस. ती एवढीशी लहान मुलगी… काय रे तिच्याशी वागणं तुझं? कुणाशीच कसं जमवून घेत नाहीस? अगदी तुझी जिजी अन् अम्माशीसुद्धा…?’’
‘‘हू द हेल इज धिस अम्मा अ‍ॅन्ड टम्मा?’’
ताणलेलं रबर अखेर फाडकन तुटलं होतं.
त्या झटक्यानं मन अजूनही हुळहुळत होतं. ती तर पूर्ण कोलमडून गेली होती. अम्मांना अपेक्षित असलं, तरी त्या पण हादरल्या होत्या. फक्त जिजी मात्र भानावर होत्या.
त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण आशू त्यापलीकडे गेली होती. सगळं अनपेक्षित नसलं, तरी अपेक्षांच्या आशा होत्याच. पचवणं इतकं सोपं नव्हतं.
जिजींची वाक्यं कानांवर पडत होती.
‘‘आसावरी, तुला एक सत्य हकीकत सांगते. पूर्वी आमच्या बागेत काकडीची वेल होती. हिरव्यागार, कोवळ्या, लुसलुशीत काकड्यांनी वेल डंवरून जायची. मन अगदी लोभावून जायचं! पण… त्या सगळ्या काकड्या कडू असायच्या. खतं घातली, औषधं, माती बदलून बघितली. काहीही उपयोग झाला नाही. शेवटी नाईलाजानं वेलच मुळासकट उपटून काढली. सुधारणा अशक्य होती. कारण ते बीज तसंच होतं. तुझ्यासारखीच माझी पण होरपळ झाली. मी निमूटपणे सोसत राहिले… तू मात्र वेळेवर उपटूनच टाकलंस… बीजच तसं…!

वर्षा परांडेकर, पुणे
varshaa76p@gmail.com
मोबाईल : ७२७६३ ८६३२८

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.