Now Reading
प्रपोजल

प्रपोजल

Menaka Prakashan

स्टेशनवरच्या घड्याळाचा काटा वेगानं पुढे सरकत होता आणि प्रत्येक मिनिटागणिक त्या जागेचं रूप पालटून जात होतं. गाड्या ठरावीक वेळेला आपल्या आपल्या फलाटावर पाहुण्यासारख्या येऊन थांबायच्या आणि वेळ झाली, की निघूनही जायच्या. लगोलग त्या गाडीच्या चहूबाजूंनी माणसांची झुंबड उडत होती. फेरीवाले, हमाल, विक्रेते इकडे तिकडे धावाधाव करत होते.
नीरजला त्या जागेची फार गंमत वाटली.
प्रत्येक रेल्वे ही एखाद्या निर्णयासारखी असते. त्यात चढणं, किंवा न चढणं, हे ठरवणं म्हणजे समोर फुटलेल्या दोन वाटांपैकी कोणती निवडायची, हे ठरवण्यासारखं होतं.
त्याच्या बाबतीत तर ही गोष्ट अगदी तंतोतंत खरी होती.
रेल्वेत चढायचं की नाही?
त्यानं मनगटावरच्या घड्याळाकडे बघितलं. अजून रेल्वे यायला एक तास होता. त्यानं बाकावर शेजारी ठेवलेल्या आपल्या बॅगकडे बघितलं.
मुंबईला जाण्याची सगळी तयारी आता झाली होती. सामान भरलेलं होतं, तिकीट हातात होतं, तो स्वत: गेली पंधरा मिनिटं स्टेशनवर वाट बघत बसला होता. कोण म्हणेल की त्याचा निर्णय झाला नव्हता? त्यानं ठरवलं होतं, की हे लग्न करायचं, पण का कोण जाणे, एक कुठला तरी अनोळखी आवाज त्याच्या कानांत घुमत होता.

एकदा मागे वळून बघायला काय हरकत आहे?
त्यानं उसासा टाकला. आता गोष्टी खूप पुढे गेल्या होत्या. त्याच्या घरच्यांनी त्यांच्याकडून होकार कळवला होता, तोही नीरजच्या संमतीनं. सलोनीच्या घरच्यांनी तर आपली पसंती अगदी पहिल्या भेटीनंतरच दिलखुलासपणे सांगितली होती. घरच्यांच्या भेटीगाठी होऊन रविवारी सलोनीच्या आजी-आजोबांचा आशीर्वाद घ्यायला नीरजनं तिच्या घरच्यांसोबत मुंबईला जायचंही नक्की झालं होतं.
मग ही अस्वस्थता कसली?
नीरजची स्वत:शीच ओळख पटत नव्हती. त्याला स्वत:लाच ओरडून विचारायचं होतं, की ज्या सलोनीसाठी कित्येक रात्री तू तळमळत घालवल्या आहेस, ती आज तुझ्याशी लग्न करायला तयार झालीये, तर तू का पळ काढतोयस? शेवटच्या क्षणापर्यंत इतका विचार का करतो आहेस? तुला भीती नक्की वाटतीय तरी कसली?
‘‘…’’
‘‘आपण सगळं विसरून एक नवीन सुरुवात करू शकतो?’’ सलोनीनं त्याला विचारलं होतं.
त्याला उत्तरही माहीत होतं.
माणसाला वाटतं, की आपण आपला भूतकाळ मागे टाकून फार पुढे निघून आलो आहोत. पण अनुभव त्याच्या मनावरती एखाद्या दगडावर अक्षरं कोरावीत, तसे कोरले गेलेले असतात. त्यांना विसरणं तर अशक्यच! आणि जे घडून गेलं त्याचा परिणाम आपल्या वर्तमानावर होणार नाही, अशी अपेक्षा करणं हा चक्क मूर्खपणा.
तो कसा विसरणार होता अभ्यासिकेतले सलोनीसोबत घालवलेले ते दिवस? ते दीड वर्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. प्रत्येक दिवस त्याच्या आठवणीत साठवलेला होता.
ते सगळं विसरून जायचं?

प्रभात रोडवरचं ते तीन मजली दिमाखदार ग्रंथालय जसंच्या तसं त्याच्या डोळ्यांपुढे उभं राहिलं. त्याच्यासाठी जगातली सर्वात सुंदर जागा होती ती. दहावीच्या अभ्यासासाठी म्हणून लावलेली ती अभ्यासिका त्यानं नंतर पार इंजिनीअर होईपर्यंत सोडली नव्हती. अभ्यास करायचा आणि लगेचच तिथे ठेवलेल्या पुस्तकांपैकी एखादं छानसं पुस्तक घेऊन मनसोक्त वाचत बसायचं, हा त्याचा अगदी दिनक्रम ठरून गेला होता.
निदान सलोनी भेटेपर्यंत तरी.
सलोनी तिची पिवळी व्हेस्पा चालवत तिथे पहिल्यांदा आली, तो दिवस त्याला आठवला. अर्थात, तिला बघताक्षणीच तो प्रेमात वगैरे मुळीच पडला नव्हता. पण तिनं पहिल्याच दिवशी गाडी चुकीची पार्क करून तिथल्या वॉचमनशी भांडण केल्याचं त्याला चांगलंच आठवत होतं.
त्यानं त्या भांडकुदळ मुलीशी बोलायचा प्रयत्न वगैरेही केला नव्हता. तीच एकदा अनाहूतपणे आपला अभ्यास बाजूला ठेवून त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली.
‘‘यातलं एखादं चांगलं पुस्तक सांगू शकाल?’’ तिनं विचारलं होतं.
तो प्रसंग आठवून त्याच्या चेहर्‍यावर आजही एक स्मित झळकलं. पु. ल., व. पु. काळे, कुलकर्णी, खांडेकर अशा अनेक दिग्गजांच्या पुस्तकांनी भरलेल्या पुस्तकांच्या विभागात ती दोघं उभी होती. त्यातून चांगलं पुस्तक सांगायचं तरी कसं?
केवळ प्रसंगावधान म्हणून पु.लं.चं ‘व्यक्ती आणि वल्ली’ त्यानं तिच्या हातात ठेवलं होतं.
‘‘तुमचं नाव?’’ त्यानं हळूच विचारलं होतं.
‘‘सलोनी. सलोनी जोशी.’’

त्याच दिवशी त्यानं ते नाव सर्व सोशल मीडिया साईट्सवरती शोधलंही होतं. अगदी आजही ती फेसबुकवर त्याची फ्रेंड होती. आणि तेच नाव त्या भेटीनंतर तब्बल पाच वर्षांनी एखाद्या वादळासारखं त्याच्या आयुष्यात परतलं होतं.
त्यानं कित्येकदा मनात विचार केला होता, की ती त्याला परत कुठे भेटेल का? पण तिचं नाव त्याला वधू-वर सूचक मंडळाच्या वेबसाईटवर दिसेल, असं मात्र त्याला कधीही वाटलं नव्हतं.
आणि आज तर तो चक्क एक ‘बघण्याचा कार्यक्रम’ करायला निघाला होता.
त्याला एकदम हसायलाच आलं.
सलोनीला बघण्याचा कार्यक्रम कशाला करायला हवा?
सलोनीशी ओळख झाल्यानंतर त्याला ती कधी आवडू लागली, हे त्यालाच कळलं नाही. त्याला हळूहळू तिच्याकडे बघणं मात्र आवडू लागलं. तिचा दिनक्रमही त्याला पाठ झाला होता.
सकाळी बरोबर दहा वाजता व्हेस्पा बाहेर पार्क करून आत यायचं. केस वर बांधून टाकायचे आणि अभ्यासाला सुरुवात करायची. दुपारी ठीक दोन वाजता एखादी कादंबरी घ्यायची आणि तिथून बाहेर पडायचं. अभ्यास करता करता त्याचे डोळे कधी तिच्याकडे वळायचे त्याला कळायचंच नाही. ती मुळात दिसायला चांगली होतीच. त्यापेक्षाही जास्त तिच्या वागण्यातली सहजता, तिच्या हालचालीतला आत्मविश्‍वास आणि ती बेधडक वृत्ती त्याला जास्त आवडली होती.

तिच्या त्या आत्मविश्‍वासाला तडा गेलेला त्यानं बघितला तो एकदाच.
ज्या दिवशी तिचे वडील अचानक तिथे येऊन उभे राहिले, त्या दिवशी.
सलोनीनं त्या दिवशी मान वर करून बघितलंही नाही. ती फक्त अभ्यास करत राहिली. दुपारचे दोन वाजून गेले तरीही! ठीक साडेपाच वाजता ती तिच्या बाबांसोबत निघून गेली.
ही आपल्या वडलांना घाबरते, हे त्यानं तेव्हाच ओळखलं होतं.
दुसर्‍या दिवशी ते सलोनीच्या आधी आले आणि वरच्या मजल्यावर जाऊन बसले. सलोनीवर खिडकीतून लक्ष ठेवण्याचा त्यांचा इरादा असणार, हे त्याच्या अगदी सहज लक्षात आलं होतं. म्हणूनच जेव्हा सलोनी नेहमीप्रमाणे पुस्तक परत करायला काऊंटरपाशी आली, तेव्हा नीरज तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला.
‘‘तुझे वडील सकाळीच वर येऊन बसले आहेत.’’ त्यानं तिला सांगितलं.
आणि त्या दिवसापासून सलोनी त्याची मैत्रीण झाली.
मैत्रीण! फक्त मैत्रीण! अजून काहीही नाही.
गेली पाच वर्षं नीरज स्वत:च्या मनाला पुन्हा पुन्हा हेच समजावून सांगत होता.
त्यानं जेव्हा लग्न करण्यासाठी होकार दिला, तेव्हा त्यानं ठरवलं होतं. एका नवीन, अनोळखी माणसासोबत आयुष्याचा प्रवास करायला सुरुवात करायची. एक नवीन सुरुवात करायची. वधू-वर सूचक मंडळाच्या साईटवर तिचं नाव दिसूनही त्यानं कधीही सलोनीचं प्रोफाईल ना उघडलं, ना तिला फोन करायचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा या दोन्ही गोष्टी तिनंच केल्या, तेव्हा त्याच्या सावरलेल्या जगात पुन्हा एकदा उलथापालथ झाली.

तिनं इंटरेस्ट का दाखवला?
आता का दाखवला?
त्याच्या घरच्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. गोरी, देखणी, एमबीए झालेली मुलगी. सर्व दृष्टीनं नीरजला शोभणारी. त्यातून ते दोघं पूर्वी मित्र होते, हे ऐकून तर त्यांना अजूनच आनंद झाला.
मात्र नीरजला जे वाटत होतं, तो आनंद नक्कीच नव्हता.
का? कुणास ठाऊक!
त्याला बाईकवर तिची वाट बघत रोज ठीक दोन वाजता ग्रंथालयाच्या बाहेर उभा राहणारा विशाल आठवला.
सलोनी अर्धा दिवस अभ्यास करून उरलेला वेळ त्याच्यासोबत घालवायची, हे त्याला लवकरच कळून चुकलं. त्यांची मैत्री झाल्यानंतर काही दिवसांनी तिनं नीरजची विशालशी ओळखही करून दिली होती.
सहा फूट उंच, भेदक घारे डोळे, अस्ताव्यस्त कुरळे केस असा तो विशाल पाहून त्याच्या मनात विलक्षण असूया निर्माण व्हायची.
दुपारी जेवण होईपर्यंत नीरजचा दिवस अगदी उत्तम पार पडायचा. सलोनी आल्या आल्या त्याच्याकडे बघून मनापासून हसायची, रोज त्याच्या शेजारी अभ्यासाला बसायची आणि ते डबाही एकत्रच खायचे.
तसं बघायला गेलं, तर त्या दोघांचं जग एकमेकांपेक्षा फार वेगळं होतं.
नीरजचं आयुष्य तसं साधं-सरळ होतं. आई-वडील, काका-काकू, भाऊ असं त्यांचं एकत्र कुटुंब, थोडेफार मित्र, इंजिनीअरिंग आणि वाचन सोडून त्याच्या विश्‍वात दुसरं काहीही नव्हतं. आणि त्यात तो फार समाधानीही होता. त्यानं आयुष्याकडून कधी जास्त काही मागितलंच नव्हतं.
सलोनीनं ते मऊ मुलायम चित्र जणू फाडूनच टाकलं.

तिच्या आयुष्यात विशालसारखा बॉयफ्रेंड होता. अनेक ग्रुप्स होते, मित्रमैत्रिणी होत्या. सर्व क्षेत्रांतले सर्व प्रकारचे लोक तिच्या ओळखीचे होते. तिला जगाचा अनुभव होता. त्यांचे काही कॉमन मित्रही निघाले. त्यामुळे त्यांच्या गप्पा रोज अगदी रंगलेल्या असायच्या.
मात्र घड्याळाचा काटा जसा जसा दोनकडे सरकायचा, तशी तशी नीरजच्या मनातली अस्वस्थता वाढू लागायची. कारण काहीही झालं, तरी दोन वाजता तो विशाल त्याची बुलेट घेऊन तिथे कडमडायचाच!
एकमेकांना भेटायची त्यांची आतुरता पाहून तो कासावीस व्हायचा.
बाहेर बाईकचा आवाज कधी येतोय तिकडे तिचे कान असायचे आणि डोळे मात्र पु. ल. देशपांडे यांच्या सुंदर शब्दांवर! नीरज अभ्यास करता करता हळूच तिच्याकडे बघत राहायचा. अर्ध्या-पाऊण तासात त्या पुस्तकाचं एकही पान उलटलं जायचं नाही. तिचे नाटकी डोळे पुन्हा पुन्हा त्याच ओळींवरून फिरत राहायचे. विशालच्या बाईकचा आवाज आला, की जे पुस्तक हातात असेल ते उचलून ती घाईघाईनं बाहेर जायची. ते पुस्तक असायचं ते फक्त बाबांना दाखवण्यासाठी.

दीड वर्ष ती दर पंधरा दिवसांनी पु.लं.चं एक पुस्तक न चुकता घरी नेत राहिली. पण तिनं त्यातली एक ओळही कधी वाचली नाही.
‘‘मला वाचनाची खूप आवड आहे.’’ आपली ओळख करून देताना तिनं त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं.
‘खोटं, साफ खोटं!’ त्याला ओरडून सांगावंसं वाटलं होतं. पण त्यानं कसंबसं स्वत:ला आवरलं. तिथे तिचे बाबा बसले होते, म्हणून केवळ ती असं बोलली होती, असं त्याला वाटलं होतं. पण जेव्हा फक्त तो आणि सलोनी गच्चीवर एकांतात बोलायला गेले, तेव्हाही ती तशीच वागत होती.
तिची ट्रेकिंगची आवड, नाटकात काम करायची आवड, तिचं सोशल लाईफ हे जणू अस्तित्वातच नाहीये, अशीच वागत होती ती. हे पाहून नीरजला धक्काच बसला.
‘‘अजूनही काका तुझ्यावर लक्ष ठेवून असतात वाटतं.’’ तो म्हणाला होता. सलोनी यावर फक्त मंद हसली.
‘‘मी ते सगळं केव्हाच सोडून दिलंय!’’
तिला नक्की काय सोडून दिलंय म्हणायचं होतं, त्याला कळलंच नाही.
त्याचा प्रश्‍नार्थक चेहरा बघून ती फक्त एवढंच म्हणाली होती.
‘‘मला एवढंच म्हणायचंय, की पाच वर्षांपूर्वी मी जी चूक केली, ती आता मला सुधारायची आहे. आंब्याच्या झाडाखालचं तुझं ते प्रपोजल मला आता मान्य आहे, असं समज.’’
पाच वर्षांपूर्वी चूक नक्की कुणी केली होती? सलोनीनं की त्यानं?
त्याला कळून चुकलं होतं. सलोनीला प्रपोज करायची ती वेळ योग्य नव्हती. तिच्या डोळ्यांत त्याला रोज विशालबद्दलचं प्रेम साफ दिसत होतं.
आणि तिला विशाल का आवडू नये?
तो सलोनीच्या आयुष्यात अगदी सहज, पाण्यात साखर विरघळावी, तसा सामावून गेला होता. तो कविता करायचा, सलोनी त्या रात्री पांघरुणाच्या आत मोबाईल ठेवून वाचत राहायची. तो नाटक लिहायचा आणि ते नीट पार पडावं म्हणून सलोनी जिवाचं रान करायची. त्यांना एकाच ट्रेकला जाण्याची इच्छा असायची. हायवेवरून गाडी भरधाव पळवण्याची शर्यत लावायची, असं ते ठरवायचे. घरची बंधनं तोडून कुठेतरी दूरदेशी पळून जावं आणि हवं तसं जगावं, हे दोघांचंही स्वप्न होतं.

केवळ विशालला भेटता यावं, म्हणून बाबांशी खोटं बोलून, रोज खूप मोठा धोका पत्करून ती त्या ग्रंथालयात यायची. तिच्या वडलांना तिचा संशय आलेला होता आणि ते कधीही तिच्यावर लक्ष ठेवायला तिथे येऊन उभे राहायचे. आणि त्या दिवशी ती विशाल तर जाऊचदे, पण नीरजशीही बोलायची नाही.
‘‘माझे बाबा तसे खूप चांगले आहेत,’’ ती एकदा म्हणाली होती, ‘‘मी एखाद्या मुलाच्या नादी लागेन की काय, एवढीच भीती त्यांना वाटते.’’
सलोनीच्या मोठ्या बहिणीनं पळून जाऊन जातीबाहेर लग्न केलं होतं आणि वर्षभरातच ती परतही आली होती. म्हणून सलोनीचे बाबा आपल्या धाकट्या मुलीवर हे असं लक्ष ठेवू लागले होते. त्यांची अगदी चूक नाही, हेही सलोनीला कळत होतं. पण विशालला भेटल्याशिवाय तिला चैन पडायचं नाही. खूप मोठा धोका पत्करून ती त्याला भेटत राहिली.
नीरज तिच्यासाठी कोण होता?
चुकून भेटलेला, चुकून मित्र झालेला, चुकून आयुष्यात आलेला एक मुलगा! तिनं त्याला मनातलं कितीही सांगितलं, किंवा त्याला कितीही जवळचा मित्र मानलं, तरी विशालला भेटण्यासाठीची तिची आस, तिची तळमळ त्या नात्यात कुठेच नव्हती. आणि कदाचित त्याला विशालची असूया वाटायची ती त्यामुळेच.
काही दिवसांनी तर नीरज स्वत:च एक चांगलं पुस्तक बाजूला काढून ठेवू लागला होता. सलोनीनं अभ्यासाला येणंच बंद करून टाकलं होतं. दर पंधरा दिवसांनी ग्रंथालय बंद होण्याच्या वेळी ती भरधाव आपली व्हेस्पा चालवत तिथे यायची आणि ते पुस्तक घेऊन घरी परतायची. बाबांनी विचारलं, तर ती सांगायला मोकळी ‘अभ्यास करायला गेले होते’ म्हणून! आणि अगदीच गरज पडली, तर नीरज होताच, खोटी साक्ष द्यायला!
तेव्हा त्यांच्या भेटीही अशाच हळूहळू कमी होत गेल्या. कधीतरी कोपर्‍यावर चहा प्यायला जाणं, एवढीच काय ती त्यांची भेट! त्यातही सलोनीच्याच आयुष्यातले वेगवेगळे किस्से ती सांगत राहायची आणि तो ऐकत राहायचा.

बिअरचा पहिला घोट, रायगडच्या ट्रेकला शेकोटीवर भाजून खाल्लेलं चिकन, पहिली सिगारेट इतकंच नाही, तर विशालला केलेलं पहिलं किस हे सगळं त्याला माहिती होतं. घरच्यांना ‘क्लासला जाते’ असं सांगून तिनं नाटकाच्या स्पर्धांमधे कसा भाग घेतला आणि विशालनं लिहिलेल्या नाटकाला कसं पहिलं बक्षीस मिळालं, हेही अभिमानानं सांगताना त्यानं तिला पाहिलं होतं.
तिच्या या जगात नीरज कुठेच बसत नव्हता. तेव्हाही नाही आणि आजही नाही. मग तिनं अचानक हे लग्नाचं प्रपोजल त्याच्या पुढ्यात का आणून ठेवलं होतं?
ती म्हणाली होती, की तिला चूक सुधारायची होती. पण ती खरं बोलत होती का? आणि जरी बोलत असली, तरी आता का?
चूक सुधारायचीही एक योग्य वेळ असते.
नकळत पाच वर्षांत ती संधी निसटून गेली असेल, असा विचार तिच्या मनात का आला नाही?
तिनं त्याला एक फोन केला असता, एकदा भेटायला बोलावलं असतं आणि माफी मागितली असती, मनातल्या भावना व्यक्त केल्या असत्या, तर तो धावत तिच्याकडे गेला असता.
पण तिनं थेट लग्नाची मागणी का घालावी?
वरवर पाहता सलोनीमध्ये नावं ठेवण्यासारखं, नकार देण्यासारखं असं काहीच नव्हतं. पण त्याला ती सलोनी कुठेच सापडत नव्हती, जिच्या तो प्रेमात पडला होता.
त्याला खात्री होती, की सलोनी काही फसवणारी मुलगी नाही. तिला फक्त एक मनमोकळं आयुष्य जगायची इच्छा होती, जे तिच्या बाबांनी नेहमीच तिला नाकारलं होतं. त्यांनी एक अनामिक बंधन घातलं होतं, त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचं, जे ती नकळत पाळतही होती. जणू काही तिची दोन ररूपंच होती ती.
नीरजचं स्वप्न होतं, की तिला एक आयुष्य मिळावं जिथे तिला कुठलीही गोष्ट करण्यापासून अडवलं जाणार नाही. नीरज तिला ते आनंदानं द्यायला तयार होता. पण तिला ते हवं होतं का? का तिलाही नकळत त्या बंधनांची सुरक्षितता आवडली होती.
म्हणूनच तिनं कदाचित विशालला सोडलं असेल.
तिनं विशालशी ब्रेकअप करावं, या गोष्टीचा त्याला विलक्षण धक्का बसला होता. त्याच्या मते विशाल सर्व दृष्टीनं तिच्यासाठी योग्य होता.
त्या दिवशी त्यानं पहिल्यांदा सलोनीला रडताना बघितलं.

तिच्या बाबांच्या पोटात ट्युमर होता आणि त्यांना अ‍ॅडमिट केलेलं होतं. तेव्हा तिच्या लक्षात आलं, की तिची आई गेल्यापासून तिच्या बाबांनीच तिला वाढवलंय, सांभाळलंय, लहानाचं मोठं केलंय. त्यांच्याशिवाय तिला कुणाचाच आधार नाही. त्यांना असं फसवणं तिला योग्य वाटत नव्हतं. तिला उत्तम मार्कांनी एमबीए व्हायचं होतं, अभ्यास करायचा होता.
काही लोक सगळी बंधनं तोडून टाकून मोकळेपणाने जगतात, तर काही लोक पिंजर्‍यात राहूनच आयुष्य काढतात. सलोनी मात्र वेगळीच होती. काहीशी अडकल्यासारखी. मोकळं होण्याची हिंमत नाही आणि बंदिस्त राहण्याचा स्वभाव नाही! गळ्यातली साखळी न तोडता जिथपर्यंत जाता येइल तिथपर्यंत ती जायची.
त्या दिवशी त्यानं फार वेगळी सलोनी बघितली आणि तो तिच्या अजूनच प्रेमात पडला.
आज त्याच्या घरचे सलोनीवर फार खूष होते. गोरी, देखणी, एमबीए झालेली मुलगी. नीरजला सर्व दृष्टीनं योग्य अशी! त्यांनी का खूष नसावं?
पण नीरजच्या मनात मात्र विलक्षण उलथापालथ सुरू होती.
माणसाचं मन किती विचित्र असतं!
विशालला सोडल्यानंतर सलोनीनं जीव तोडून अभ्यास केला आणि तिची परीक्षाही उत्तम झाली. ती पहिली आली म्हणून ती आणि नीरज संध्याकाळी ‘वैशाली’ला गेले होते. सलोनीचा तो अभ्यासिकेतला शेवटचा दिवस होता. त्याला आता सलोनी पूर्वीसारखी रोज भेटणार नव्हती.
त्याच भावनेच्या भरात त्यानं अभ्यासिकेच्या बाहेर आंब्याच्या झाडाखाली सलोनीला सांगितलं होतं, की तो नकळत तिच्या प्रेमात पडलाय.
तेव्हा सलोनीला धक्का बसल्यासारखा काही वाटला नाही. तिला कदाचित हा अंदाज असावा. पण ती खूप गोंधळून गेली होती. ती त्याला एवढंच म्हणाली होती,
‘‘तू माझा मित्र आहेस.’’

त्या दिवसानंतर ते भेटले नव्हते. कारण नीरजच्या लक्षात आलं होतं, की त्यानं आता आपल्या आयुष्यावर लक्ष द्यायची गरज होती. मनावर अक्षरश: दगड ठेवून त्यानं हा निर्णय घेतला होता.
आता तो तिच्यासाठी कोण होता?
त्याची नजर पुन्हा स्टेशनवर गेली. दहा मिनिटांत ट्रेन येणार होती. मुंबईला जाऊन, सलोनीला भेटून आणि तिची बाजू ऐकून नंतर निर्णय घेणंही शक्य होतं.
पण त्याला तिचं म्हणणं ऐकून घ्यायचं होतं का?
त्याचं सलोनीवर प्रेम होतं, पण विश्‍वास नव्हता. मुंबईला त्याला भेटून, ती आपलं म्हणणं पारदर्शकपणे मांडेल, याबद्दल त्याच्या मनात शंकाच होती.
लग्न म्हणजे शेवटी एक बंधनच. सोन्याची असली तरी साखळीचा अर्थ तोच आणि कामही तेच.
त्याला चार वर्षांपूर्वीची सलोनी आठवली, जिच्या तो प्रेमात पडला होता. ती दोघं एकत्र असताना त्यांच्यात कसलंच बंधन असायचं नाही. तेव्हा त्यानं खर्‍या सलोनीला बघितलं होतं.
नखरे करणारी, चमकदार डोळ्यांनी हसणारी, स्कार्फ न बांधता सुसाट गाडी चालवणारी, वादविवाद करण्यात मुद्दे नसतानाही सरसरून भाग घेणारी आणि सतत काहीतरी नवीन, चांगलं शोधणारी सलोनी! पण ते तिचं एक रूप होतं. नाण्याची ती एकच बाजू होती. तिची दुसरी बाजू म्हणजे तिचं ‘अनुरूप’वरचं प्रोफाईल होतं. गोरी, हुशार, संस्कारी, एमबीए झालेली मुलगी.
हे प्रपोजल त्या सलोनीशी लग्न करण्याचं होतं, जी त्याला कधी आवडलीच नाही. कारण ती खोटी होती.
बाकावरचं सामान उचलून तो उठला. मस्त वारा सुटला होता, त्याचे वाढलेले केस त्यावर भुरभुरत होते. दूर कुठूनतरी रेल्वेचा अस्पष्टसा आवाज येत होता, पण तो त्या रेल्वेसाठी थांबला नाही.
‘याला म्हणतात नवी सुरुवात!’ तो मनात म्हणाला आणि तिथून बाहेर पडला.
त्यानं ठरवून टाकलं होतं. आता त्याला बाईकवर वाट पाहणारा विशाल व्हायचं होतं. तिच्या हातातलं पु. लं. देशपांडे यांचं पुस्तक नाही.

– अश्विनी जोगळेकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.