Now Reading
पेठा

पेठा

Menaka Prakashan

रियाला रात्री तीन वाजताच जाग आली. आदल्या दिवशी दिवसभर जागं राहून काहीच उपयोग झाला नव्हता. जेटलॅग होता, का मनात सुरू असलेल्या विचारांचा परिणाम, हे कळणं तसं अवघडच होतं. ती उठून बसली. भिंतीवर लावलेल्या घड्याळाचा काटा टक टक आवाज करत फिरत होता. त्या घड्याळातलं रेडियम सोडलं, तर खोलीत मिट्ट काळोख होता. थोडा वेळ झोपायचा प्रयत्न करावा, असं ठरवून ती परत आडवी झाली, पण झोप लागेना. मग ती उठली आणि चार्जिंगला लावलेला फोन काढला. अपेक्षेप्रमाणे सॅमचे बरेच मेसेजेस आलेले होते. ते मेसेज वाचत असतानाच त्याचा परत मेसेज आला, ‘किती वाजले आहेत? तू जागी कशी अजून?’ ती उत्तर लिहिणार तितक्यात फोनच केला त्यानं. रिया सॅमशी अगदी हळू आवाजात बोलत होती. आजी-आजोबा शेजारच्या खोलीत झोपले होते. तिच्या आवाजानं त्यांची झोपमोड होऊ द्यायची नव्हती तिला. सॅमकडे तिला सांगायला दोन मोठ्या बातम्या होत्या. तो इलॉन मस्कला भेटला होता आणि त्याचं प्रमोशनही होणार होतं. त्याच्या प्रमोशनबद्दल ऐकून रियाला विशेष आनंद झाला. ती स्वतः सॅमइतकीच याची वाट बघत होती. सॅमशी गप्पा मारण्यात वेळ कसा जायचा, हे कधीच कळायचं नाही तिला. तीनचे साडेपाच वाजले, तरी त्यांच्या गप्पा सुरूच राहिल्या.
‘‘सॅम, गॉट टू गो!’’ खोलीबाहेर चाहूल लागली म्हणून तिनं अचानक फोन ठेवला.
‘माझ्यासाठी गणपतीची मूर्ती आणायला विसरू नकोस.’ फोन ठेवल्या ठेवल्या त्याचा लगेच मेसेज आला.

रिया खोलीच्या बाहेर येईपर्यंत आजीनं चहा ठेवला होता. उठल्यावर अंघोळ करून स्तोत्र म्हणत आजीचं चहा करणं बघण्यासारखं असायचं. सकाळचा पहिला चहा आजी इतकी तन्मयतेनं करायची, की चहाचं भांडं हवनकुंड आहे आणि त्यात ती साखर, आलं आणि चहाची आहुती देतेय, असं वाटावं. आजोबा कोणतं तरी गाणं गुणगुणत ओट्यावरची भांडी पुसून ट्रॉलीत लावत होते. रियानं आजोबांच्या हातातला नॅपकिन काढून घेतला आणि त्यांना टेबलाशी जाऊन बसायची खूण केली. भांडी लावून झाल्यावर रियानं कपबश्या आणि बिस्किटांचा डबा टेबलावर मांडला आणि ओट्यावर किटली ठेवली. आजीनं त्या किटलीत चहा गाळला आणि तिघंही टेबलाशी जाऊन बसले.
‘‘लागली का गं छकुले, तुला झोप?’’ आजोबांनी विचारलं.
‘‘हो हो. छान लागली अगदी!’’ रियानं सांगितलं.
‘‘मी दूध आणि पेपर आणायला गेलो, तेव्हा तुझा बोलल्याचा आवाज आला.’’ आजोबा म्हणाले.
‘‘अहो, हो. तो… जरा कॉल सुरू होता ऑफिसचा.’’ रियाला पटकन कारण सुचलं आणि तिनं निःश्वास सोडला.

इतक्या सकाळी सॅमशी बोलत होते असं सांगितलं, तर त्यांना उगीच नको त्या शंका येतील, असं वाटलं तिला. तसंही सॅम फक्त तिचा एक चांगला मित्र होता, किंवा ती निदान स्वतःला सतत तसं बजावून सांगायची तरी. त्यापलीकडे त्यांच्यात काही झालेलं आजी-आजोबांना आवडलंही नसतं, याची कल्पना होती रियाला. तिचे आई-बाबा एका अपघातात गेल्यापासून आजीच तिची आई झाली होती. स्वतःची प्रॅक्टिस, दवाखान्यातली वर्दळ, येणारे-जाणारे, आजोबांनी जमा केलेला गोतावळा, या सगळ्याबरोबर रियाला बारा वर्षांची असल्यापासून सांभाळणं सोपं नक्कीच नव्हतं तिच्यासाठी. पण तिनं रियाला आई-वडलांची उणीव कधी भासू दिलीच नाही. आजोबा त्यांच्या फॅक्टरीच्या वेळांच्या इतकेच काटेकोरपणे रियाच्या सर्व वेळा सांभाळायचे. शाळा, टेनिस, बॅलेचा क्लास, मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस, कॅम्प्स, कुठेही जायला रियाला कधीच उशीर झाला नाही. बारावीनंतर तिला खरगपूरला अ‍ॅडमिशन मिळाली, तेव्हा दोघं तिला पोचवायला गेले होते. तिथल्या आणि दोन वर्षांनंतर स्टॅनफर्डच्या ग्रॅज्युएशनलाही दोघं अभिमानानं हजर होते.
‘‘दोन दिवस स्ट्रिक्टली सुट्टी, असं सांगितलं नाहीस ऑफिसमध्ये? उद्या बेंगळुरूला गेलीस, की आहेतच की कॉल्स आणि कामं. फार राबवून घेतात कंपन्या हल्लीच्या.’’ आजी रिकाम्या झालेल्या कपात चहा ओतत म्हणाली.
‘‘तुझीच सावली पडली आहे तिच्यावर सुले, तू केलास का कधी रात्र आणि दिवसात फरक? तिकडे पेशंटला कळा सुरू होतात न होतात, की लगेच निघायचीस तातडीनं!’’ आजोबांनी लगेच चान्स घेतलाच.
‘‘आपण लेबरर लोक हो! माझं दवाखान्यात आणि तुमचं फॅक्टरीतलं लेबर सोडवण्यातच आयुष्य गेलं की.’’ आजीनं तिचा फेव्हरेट डायलॉग मारला.
आधी चहा आणि मग रियाच्या आवडीच्या उकडीचा ब्रेकफास्ट झाला. मग तिघंही बाल्कनीत जाऊन बसले.

‘‘आता काय ठरवलं आहेस तू रिया? पीएचडी करणार आहेस का नोकरीच आवडतीये?’’ आजोबांनी विषय काढला.
‘‘सध्यातरी नोकरी आवडतीये. मला हवं तसं वातावरण आहे. मला करायचं होतं, तेच कामही मला करायला मिळतंय. कलीग्ज पण चांगले आहेत सगळे.’’
‘‘एखादा जास्तच चांगला नाही का?’’ आजोबांनी मिश्किल आवाजात विचारलं.
‘‘तुझ्या बाबांचा मित्र अभय, त्याचा मुलगा मिहीरही कॅलिफोर्नियात आहे. अभयचा फोन आला होता परवा. तुझी बरीच चौकशी करत होता.’’ आजी म्हणाली.
‘‘आजी, अगं इतक्यात कुठे…’’
‘‘इतक्यात? झालीस की सव्वीस वर्षांची आता. शिकणार असशील तर घाई करणार नाहीच आम्ही, पण नाहीतर हरकत काय आहे पुढचा विचार करायला?’’
‘‘छकुले, तुला कुणी आवडत असेल तर तसं सांग. तो कॉलेजमधला निखिल, तो काय करतोय हल्ली?’’
‘‘त्यानं स्टार्टअप काढलीये स्वतःची चेन्नईला. परवाच आला होता त्याचा मेसेज, मस्त चाललंय त्याचं.’’ रिया उत्साहानं सांगायला लागली.
‘‘म्हणजे मग तो अमेरिकेत येणार नाहीच…’’ आजोबा म्हणाले.
‘‘तो येणार नाहीच म्हणजे… आजोबा काहीतरीच काय? मित्र आहे तो माझा फक्त!’’
‘‘मैत्रीच्या पलीकडे गेलंय का मग कुणाशी प्रकरण?’’ आजोबा हा विषय सोडणार नव्हते, हे स्पष्ट दिसत होतं.
‘‘प्रकरण? आजोबाऽऽऽ!’’ रिया ओरडलीच.
‘‘आपण नंतर बोलूया या विषयावर. जा, जाऊन थोडा वेळ विश्रांती घे.’’ आजी कपबश्या उचलत म्हणाली.
‘‘छेः गं, विश्रांतीबिश्रांती नाही. मला भरपूर गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी!’’
‘‘रात्रभर जागीच होतीस, दिवसा थोडा आराम कर.’’ सॅमचा तेवढ्यात मेसेज आला.

सॅम तिला दोन वर्षं सीनिअर होता ‘स्टॅनफर्ड’मध्ये. त्याच्या पीएचडीचा आणि हिच्या मास्टर्सच्या थीसिसचा गाईड एकच असल्यानं त्यांची ओळख झाली होती. त्यांची घरंही जवळ होती, त्यामुळे बर्‍याच वेळा येता-जाताही त्यांची भेट व्हायची. थोड्याच दिवसांत त्यांची छान मैत्री झाली. तिचा आणि त्याचा ग्रुप मिळून वीकएंडला भेटायचे आणि एकत्र फिरायचेसुद्धा. तिच्या मनात असलेली टिपिकल अमेरिकन मुलांची प्रतिमा त्यानं संपूर्णपणे बदलून टाकली होती. आई-वडील आणि धाकटा भाऊ, असं त्याचं छोटंसं कुटुंब होतं. तो प्रत्येक वीकएंडला आई-वडलांशी बोलायचा, भावाला त्याच्या असाईनमेंट्समध्ये काही अडलं, तर मदत करायचा. दोन्ही बाजूंच्या आजी-आजोबांचीसुद्धा आवर्जून चौकशी करायला त्यांना फोन करायचा.
‘‘माझ्याबरोबर मिशिगनला येतेस या थँक्स गिव्हिंगला?’’ त्यानं रियाला त्याच्याबरोबर जायला आमंत्रित केलं. रियाला हे अनपेक्षित होतं. या आमंत्रणानं तो मैत्रीच्या पुढची काही स्वप्नं बघतोय, असं तिच्या लक्षात आलं. सॅम एक मित्र म्हणून खूप जवळचा होता तिच्यासाठी, पण त्यापुढे…

‘‘आईच्या मैत्रिणीकडे जायचं माझं आधीच ठरलं आहे.’’ तसं ठरलेलं नसूनही ती त्याला म्हणाली. ती उगाच सबब सांगतेय, हे बहुतेक कळलं त्याला. सॅमच्या चेहर्‍यावरची निराशा लपू शकली नव्हती. मनातून रियालाही वाईट वाटलं होतं. सॅमचं तिच्या मनातलं स्थान किती महत्त्वाचं आहे, हे तिला यापूर्वी कधी जाणवलंच नव्हतं. तिला आवडलं असतं त्याच्याबरोबर जायला. ‘नाही’ म्हटल्यावर त्याचा चेहरा बघवला नव्हता तिला. पण तिला एक अमेरिकन मुलगा आवडतो, हे जर आजी-आजोबांना कळलं तर त्यांना काय वाटेल, याची कल्पना रियाला करवत नव्हती. त्यामुळे तिचं त्याच्यावर प्रेम नाहीये, असं तिनं पक्कं ठरवून टाकलं आणि स्वतःला तसं पटवूनही दिलं होतं. शिक्षण संपल्यावर योगायोगानं दोघांना एकाच शहरात नोकरी मिळाली, त्यामुळे ते दोघं युनिव्हर्सिटीनंतरही एकमेकांच्या संपर्कात राहिले. काहीही मदत लागली, तर तो मध्यरात्रीही येईल, याची खात्री वाटायची तिला त्याच्याबद्दल. ते भेटायचे बर्‍याच वेळा, त्यांची कामं डिस्कस करायचे, घरच्यांबद्दल बोलायचे, पण ती जाणूनबुजून त्याच्यापासून कायम एक अंतर राखून असायची. तो ते अंतर मिटवायचा सतत प्रयत्न करत राहायचा. ती ऑफिसच्या कामानं आठवडाभर भारतात जाणार आहे, हे त्याला कळल्यावर त्यानं तिला फोन केला.
‘‘मी येतो तुला एअरपोर्टवर ड्रॉप करायला.’’ तो म्हणाला.
‘‘थँक्स सॅम, पण माझी रूममेट येते म्हणाली आहे.’’ रियानं त्याला सांगून टाकलं.
‘‘आजी-आजोबांबरोबर दोन दिवस राहणार आहेस, तेव्हा मज्जा कर. आणि हो, इंडियातून माझ्यासाठी गणपतीची एक मूर्ती घेऊन ये.’’ त्यानं सांगितलं.

‘‘गप्पा मारायच्या आहेत म्हणालीस आणि कुठे तंद्री लागली तुझी?’’ आजोबांनी रियाला टपली मारली.
‘‘तुला काही खरेदी करायची आहे का? तर जाऊन येऊ आपण संध्याकाळी.’’ आजी म्हणाली.
‘‘नाही गं बाई, तू आणून ठेवलेलं सामानच बॅगेत कसं माववायचं, हे बघावं लागणार आहे मला.’’

दुपारी आजीच्या हाताखाली मिसळ करायला शिकण्याचा कार्यक्रम ठरला. मिसळ तयार झाली आणि आजीनं रियाला फरसाणचं पॅकेट उघडायला सांगितलं.
‘‘तो सॅम कुठे नोकरी करतो गं आता?’’ आजीनं ेटमध्ये पाव काढता काढता विचारलं.
‘‘स… स… सॅम? तो टेस्लात आहे.’’
‘‘म्हणजे तुझ्याच गावात का?’’
‘‘हो, जवळच.’’
‘‘मग भेटता का तुम्ही?’’
‘‘भेटतो का आम्ही? नाही. म्हणजे हो. म्हणजे विशेष नाही…’’
‘‘अगं अगं अगं! ते फरसाण डब्यात काढायला सांगितलं मी तुला. तू ते कढईत…’’
आजीनं अचानक सॅमबद्दल विचारल्यामुळे रिया गोंधळून गेली होती आणि तिनं अर्धंअधिक फरसाण चुकून मिसळीच्या कढईत घातलं होतं!
‘‘तुला सॅम लक्षात आहे?’’ चमच्यानं वरवरचं फरसाण एका छोट्या बोलमध्ये काढत रियानं विचारलं.
‘‘लक्षात का नसेल? भेटला होता की तुझ्या ग्रॅज्युएशनच्या वेळेला. आमच्या बरोबरच बसला होता पूर्ण वेळ. किती आनंद झाला होता त्यालाही तुला डीननं स्पेशल मेडल दिलं तेव्हा. फार गुणी मुलगा आहे.’’
‘‘बोलावू आजोबांना मिसळ खायला?’’ आजी आणखी काही विचारायच्या आत रियानं विषय तिथेच थांबवला.

आजीचं ट्रेनिंग परफेक्ट होतं, त्यामुळे मिसळ मस्तच झाली होती, पण रियानं अगदी थोडीशीच खाल्ली. आजीनं अचानक सॅमचा विषय का काढला असेल, या विचारातच होती ती. आजोबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी विचारलंही तिला, पण तिनं नुसतंच ब्रेकफास्ट जास्त झाल्याचं कारण पुढे केलं. मग तिनं आजी-आजोबांना बाहेर जाऊन बसायला सांगितलं आणि मागचं सर्व आवरून टाकलं.

संध्याकाळी रिया सामान आणि बॅग आवरायला बसली. आजीनं डबल पॅकिंग करून कितीतरी पिशव्या भरून ठेवल्या होत्या. त्या पिशव्या बॅगेत व्यवस्थित मावतील अशा ठेवणं म्हणजे एक मोठं कामच होतं. आजोबा फिरून आले आणि त्यांनी तिच्या हातात आणखी दोन बॉक्स दिले.
‘‘अहो आजोबा, अशक्य आहे आता हे मावणं!’’
‘‘आण इकडे, मी टाकते.’’ म्हणत आजीनं तिच्या हातातून ते घेतले आणि ते तिच्या बॅगेत अदृश्य झाले.
‘‘आजी, तू प्रो आहेस हं अगदी!’’ रियाला आजीचं फारच कौतुक वाटलं.
आजोबांनी तिसरा बॉक्स उघडला आणि रियाच्या समोर धरला.
‘‘पेठा? कित्ती दिवस झाले मला पेठा खाऊन!’’ म्हणत रियानं एक मोठा तुकडा तोंडात कोंबला.
‘‘आज अ‍ॅनिव्हर्सरी आहे आमची, म्हणून आणला आहे.’’ आजी म्हणाली.
‘‘कसली? तुमच्या लग्नाचा वाढदिवस तर २९ जानेवारीला असतो!’’
‘‘आज इज़हार झाला होता!’’ आजोबा आजीकडे बघत म्हणाले आणि आजी चक्क थोडीशी लाजली.
‘‘आजी, तू लाजतेयस? अगं, काय आहे काय नक्की या पेठ्यामागची कहाणी?’’ रियानं आजीच्या गळ्यात पडत विचारलं.

‘‘थर्ड इयरच्या सुट्टीत मी एका मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाला पुण्याला आले होते आणि मावशीकडे उतरले होते. नवरी मुलगी नलूचीही मैत्रीण होती.’’ आजी सांगायला लागली.
‘‘म्हणजे नलूआत्याआजीची?’’
‘‘हो, एका कॉलेजमध्ये होत्या त्या दोघी. लग्नात खूप धमाल केली आम्ही. मैत्रिणीच्या वाड्यात राहणारे सगळे लोक ओळखीचे झाले होते. तिच्या घरचे असल्यासारखेच होते ते सगळे. त्या मंडळींमध्ये एक आगाऊ मुलगा होता. मला कळायचं माझ्या मागे मागे करतो तो. इंजिनीअरिंगला होता तेव्हा. होता बावळट, पण स्वतःला देव आनंद समजायचा!’’
‘‘बावळट? पटवर्धनांच्या घरात बावळट लोक जन्माला आलेच नाहीत आजपर्यंत!’’ आजोबा आणखी एक पेठा तोंडात टाकत म्हणाले.
‘‘मला उगीच विषय काढून काहीतरी प्रश्न विचारायचा तो. मी मेडिकल कॉलेजला आहे, याचं कौतुक वाटायचं त्याला, पण तसं दाखवायचा मात्र नाही. स्वतःच्या इंजिनीअरिंगच्या फुशारक्या मारायचा उगाचंच! मावशीच्या वाड्यात राहणार्‍या रानड्यांच्या मुलाचा मित्र होता तो. त्या मुलाला भेटायला यायचं कारण पुरायचं त्याला लग्न आटोपल्यावर.’’ आजी अगदी काल-परवा घडल्यासारखं सांगत होती.
‘‘तो त्यालाच भेटायला यायचा! नागपूरच्या मुलींचे उगाच नसते गैरसमज.’’ आजोबा मधेच म्हणाले.
रियाला हे सगळं ऐकून फारच मजा वाटत होती.

‘‘पुढच्या सुट्टीत मी परत पुण्याला आले होते. आम्ही मैत्रिणी दिल्ली आणि आग्र्‍याला ट्रिपला जाणार होतो इथून.’’ आजीनं गोष्ट पुढे नेत रियाची बॅग बंद केली.
‘‘इथून जायची आवश्यकता नव्हती खरंतर, पण कारणं कोण शोधेल…’’ आजोबांचं अधूनमधून फिरक्या घेणं सुरूच होतं.
‘‘अजिबात नव्हतं गं असं. इथून होती ट्रेन. आम्ही स्टेशनवर गेलो, तर जाणार्‍यांपेक्षा पोचवायला आलेली मंडळीच जास्त! तो मुलगाही आला काहीतरी कारण शोधून. मी गाडीत चढायला लागले, तर माझी बॅग घेऊन माझ्या मागे चढला.’’
‘‘काय सांगतेस काय आजी! सॉलिड आहे हे. आजोबा तुम्ही…’’
‘‘मी सांगितलं तिला, की येताना माझ्यासाठी पेठा घेऊन ये.’’ आजोबा डोळा मारत म्हणाले.
‘‘मला इतका राग आला होता तेव्हा. ‘पेठा घेऊन ये’ म्हणजे काय? मी म्हणाले सुद्धा नलूला, की कसला आगाऊ मुलगा आहे मेला!’’
‘‘पण मुख्य सांग की तिला. तुझी आजी घेऊन आली अर्धा किलो पेठा माझ्यासाठी.’’
‘‘क्क्काय? आजी, सीरिअसली?’’
‘‘मी त्यांच्यासाठी नव्हता आणला, पण दिसला पेठा आणि झाली खरी इच्छा घ्यायची.’’ आजी परत एकदा लाजली.
‘‘आज त्या दिवसाला साठ वर्षं झाली!’’ आजोबा आजीला पेठा भरवत म्हणाले.
‘‘इतकं सोपं होतं? तुमच्या घरचे काही म्हणाले…’’
‘‘सोपं?’’ आजी हसली. ‘‘मी एमबीबीएस करून जेव्हा पुण्याला आले, तेव्हा यशवंत पटवर्धन मला न्यायला स्टेशनवर हजर होता. मला टांग्यानं सोडायला आला मावशीच्या घरी. टांग्यातून उतरताना हात दिला त्यानं मला. मी उतरून आत जायच्या आत वाड्यातल्या बच्चे कंपनीनं बातमी पोचवली होती, की माझ्याबरोबर कुणी मुलगा होता टांग्यात!’’
‘‘बापरे! मग?’’
‘‘मग काय, पटवर्धनांच्या स्थळात नाही म्हणण्यासारखं होतंच काय? सुलूच्या मावशीनं देवासमोर साखर ठेवली!’’ आजोबा म्हणाले.
‘‘हो हो! साखर ठेवली म्हणे! पटवर्धनांच्या मुलाला मिळणार होती ना डॉक्टर बायको. रांगच लागली होती दाराबाहेर.’’ आजी खोटं खोटं रागवत म्हणाली.
‘‘नागपूरची सावळी मुलगी, त्यात देशस्थ. किती कष्टानं पटवावं लागलं होतं माझ्या आईला.’’
‘‘आमच्या घरीही असा घारा गोरा पुणेरी बोका नव्हताच पसंत.’’
‘‘बोका? काय गं आजी!’’ आता मात्र रियाची फारच करमणूक होत होती.
‘‘अगं रिया, त्या काळी मी असं ह्यांच्या प्रेमात पडणं म्हणजे तू सॅमच्या प्रेमात पडण्यासारखं होतं.’’ आजी रियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
‘‘छकुले, स्वतःचा जोडीदार स्वतः पारखून निवडावा. घरच्यांना मुलांचं सुखच तर हवं असतं.’’ आजोबांनी रियाला जवळ घेतलं.
‘‘तुला कळतंय ना, आम्हाला काय म्हणायचंय?’’

‘‘किती वाजलेत गं आजी? दुकानं उघडी असतील ना अजून?’’ रिया एकदम उठून उभी राहिली.
‘‘दुपारी तर म्हणालीस, काही घ्यायचं नाही तुला. आता काय आठवलं बॅग बंद केल्यावर?’’
‘‘सॅमनं गणपती आणायला सांगितला आहे मला. मिळाला तर घेते छोटासा.’’
‘‘सुले, जाऊन या तुम्ही. मी देवासमोर साखर ठेवतो.’’ आजोबा म्हणाले आणि त्यांनी त्यांच्या छकुलीला मिठी मारली.

– प्रिया साठे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.