Now Reading
‘पुष्पा संभाजी दळवी’

‘पुष्पा संभाजी दळवी’

Menaka Prakashan

बाराव्या वर्षात आलेली, उंच, लुकडी, पोपटी रंगावर डाळिंबी रंगाची बटबटीत फुलं असलेला घोळदार परकर, त्याला लाल रंगाची मोठ्ठी लेस आणि वर त्याच कापडाचा झंपर घालून, पुष्पा नट्टापट्टा करत छोट्या आरशात बघण्यात मग्न झाली होती. डोळाभरून काजळ, म्हणजे तव्यामागची काजळी लावून, पाण्यात गंध कालवून त्याचा बारीकसा थर ओठांवर लावून, खिळा गरम करून कपाळावरच्या केसांच्या बटेला त्याभोवती गुंडाळत, बटेला कुरळी करत बसली होती. तेवढ्यात, तिकडून संभानं- तिच्या काटकुळ्या, पण पुरुषी ताकदीच्या बापानं- तिला जोरात झापड मारली. तिच्या परकराच्या ओटीत वर्तमानपत्राच्या पुडीतली तिची पावडर शेणानं सारवलेल्या तिच्या घरातल्या जमिनीवर सांडली आणि मारण्यापेक्षा पावडर सांडल्यामुळे ती जास्तच व्यथित झाली. गरम खिळा गालावर घासून लांब उडाला, तिच्या गालावर रक्ताची रेघ मारून…

‘‘अवदसे, मुके, कसली बाजारबसवी थेरं चालालीयात गं टवळे…!’’
असं म्हणून शेजारच्या चुलीतल धगधगतं लाकूड आणायला बाप वळला आणि धामणीच्या वेगानं पुष्पा तिथून सटकून बाहेच्या पिंपळाच्या झाडाच्या शेजारी असलेल्या मावशींच्या घरात घुसली. तिला माहीत होतं, या घरात बापाची डाळ शिजत नाही.
गावातल्या प्रतिष्ठित वकिलांच्या पत्नी म्हणजे या मावशी. आजूबाजूचे, वाड्यातले लोक त्यांना ‘मावशी’ म्हणत आणि मग त्या गावच्याच मावशी झाल्या. वकिलांइतकाच, नव्हे कदाचित त्याहून थोडा अधिकच मावशींचा शब्द हा तिथल्या वाड्यात नव्हे, गावातच अधिकारवाणीचा शब्द असे. त्यांचा प्रेमाचा सल्ला हा कोणत्याही दटावणीपेक्षा, किंवा दहशती हुकमापेक्षा ताकदवान होता. मावशींनी पुष्पाकडे पाहिलं. तिचा नट्टापट्टा केलेल्या चेहर्‍यावरचा लालभडक रक्ताचा ओहोळ त्यांनी पहिला आणि कसं काय विचारायच्या आधी त्यावर हळदीची चिमूट भरली.
संभा दातओठ खात, काही न बोलता, लाकडं फोडायला निघून गेला.
‘आन्नाच त येयय…पुयच पुये…’ (आत्ताचं तर टळलंय, पुढचं पुढे!) गेंगाणी पुष्पा सुटकेचा श्वास घेऊन स्वतःशी म्हणाली आणि खाल मानेनं मावशींनी निवडायला घेतलेल्या गवारीच्या शेंगा मोडत बसली.

पुष्पा देखणी, चुणचुणीत मुलगी होती. मात्र तिच्या टाळूला चिमणीच्या अंड्याच्या आकाराचं भोक होतं, म्हणून तिचं बोलणं नाकात येई. तिला सर्रास सगळे ‘ए गेंगाणे, ए मुके’ म्हणत. तिला सवय झाली होती त्याची, पण तिला ते कधी तिचं व्यंग आहे, असं वाटलंच नाही. खरंतर तिच्यात असं काही कमी आहे, असं कुणालाच वाटायचं नाही. तिचं बोलणं, उत्साहानं, समरसून त्यामुळे पुष्पा एक आवडणारी मुलगी होती परिसरातली.
तिला नटायला आवडू लागलंय, याची जाणीव मावशींना झाली होती. ‘झाली की ती आता बरा-तेरा वर्षाची!’ त्यांना तिचं रंगवलेलं तोंड बघून हसू येत होतं खरं, पण झाल्या प्रकाराबद्दल त्यांनीसुद्धा आत्ता तिला काही विचारलं नाही. खरंतर तिच्या नटवेपणापायी बोलणी खाणं, मार खाणं हे हल्ली जास्तच वेळा घडायला लागलं होतं.

पुष्पाला कल्पनेत रमायला आवडे. सिनेमा हा तिच्या सार्‍या ज्ञानाचा कोश होता. त्यात घडतं ते आपल्या आयुष्यात घडणार, याची तिला खात्री असे.
तिच्या मोठ्या बहिणीचं- सुमनीचं- लग्न होतं. तिच्यापेक्षा पुष्पाचीच गडबड सुरू होती. तिला बाजारात मिळणारं प्लॅस्टिकच्या मोठ्या गुलाबाच्या फुलांचं ‘दो बदन’ केसांना लावायला आणायचं होतं. खाली चकचकीत मण्यांनी आणि धाग्यांनी केलेल्या गोंड्याचं गंगावन आणून लांब वेणी घालायची होती. जत्रेत आठ आण्याचे चमचम करणारे झुमके तिनं घेतले होते, ते कुणालाच दाखवले नव्हते. लग्नात ती ते घालणार होती. मावशींच्या मुलीनं तिला गुलाबी पावडरचा डब्बा दिला होता. त्यात एका बाजूनं झिजलेला पावडरचा पफ पण होता. अशी ती तिच्या तयारीत व्यग्र होती. मधेच जाऊन कुणाच्या शेतात कांदे लाव, कुणाची भांडी घासून दे, असं सुरूच होतं. ‘शाळा फुकट असून, तिच्या टाळूवरच्या भोकामुळे तिचं बोलणं कुणाला समजायचं नाही, आणि शिकून तरी काय करणार ही?’ असं वाटून तिच्या आई-वडलांनी तिला शाळेत पाठवलं नव्हतं. मावशींनी ‘तिला शाळेत पाठवा’ सांगितल्यावर ती गेली पण… पण तिला काही शाळा प्रकार आवडायचा नाही. त्यापेक्षा एकटीच्या राज्यात रमायला तिला आवडे. नट्टापट्टा करायला आवडे. तो पण स्वतःसाठीच. तिच्या कल्पनेच्या राज्यातल्या भरार्‍या ऐकायला तिच्या मैत्रिणींना आवडे. तिला स्वर्ग, स्वर्गात मिळणारं अमृत, तिथल्या अप्सरा, रंभा यांचं आकर्षण वाटे. ती कधीतरी मावशींबरोबर आयुष्यावर गप्पा मारे.
सुमनी शेजारच्या मळ्यात नांदायला निघाली, तेव्हा पुष्पा हमसून हमसून रडली. नंतर आरशात पाहिलं, तर डोळ्यांतलं काजळ सगळ्या चेहर्‍यावर माखलं होतं.

हातांवरची गोळ्यागोळ्यांची मेंदी अजून तश्शीच लालकाळी असेपर्यंत महिनाभरात सुमनीला नांदवणार नाहीत, असा निरोप घेऊन आणि निरोपाबरोबर सुमनीला घेऊन शेजारच्या मळ्यातले तात्या घरी आले. तिचे नव्याकोर्‍या साडीत गुंडाळलेले चारदोन कपडे घेऊन. सुमनी आक्रसलेल्या चेहर्‍यानं कोपर्‍यात जाऊन बसली. एक मोठ्ठं काम केल्याच्या आविर्भावात, तात्यांनी चहा करायला सांगितला. पुष्पानं गूळ-चहापत्ती टाकून चहा केला आणि पितळीत ओतून त्यांच्यासमोर ठेवला. सुमनीला एका पेल्यात दिला. एक क्षणासाठी दोघींची नजरानजर झाली आणि पुष्पानं तिच्या डोक्यावरून ओझरता हात फिरवला. सुमनीला त्या स्पर्शानं आणखीनच कालवल्यासारखं झालं आणि डोळ्यांतलं खारं पाणी चहात मिसळलं, तरी ते पुसण्याची तोशीस तिनं घेतली नाही.
पुढच्या पंधरा दिवसांत सुमनीला वांत्या सुरू झाल्या आणि सुमनी पोटुशी असल्याची वार्ता वाडाभर पोचली. मावशींनी तिला आलेपाक, मधात बुडवलेल्या लवंगा दिल्या आणि त्यांच्या या मदतीमुळे, सुमनीकडे बघायच्या सगळ्यांच्या नजराच बदलल्या. पुष्पा कुतूहलानं हे सगळं पाहत होती. सुमनीच्या अंगावर, चेहर्‍यावर येणारं तेज बघून, पुष्पा भाजी खुडता खुडता, स्वतःच्या लग्नाची, सुहाग रातीची, नवर्‍याची, मुलाबाळांची, संसाराची, नव्या घरी नांदायला जायची स्वप्नं बघण्यात रममाण होई. आपल्या टाळूवरच्या भोकाचा या सार्‍याशी काही संबंध असेल, असं तिला कधी दुरान्वयानंही जाणवायचं नाही.

सुमनीला पोर झालं, बारसं झालं, पहिला वाढदिवस झाला, बालवाडीत नाव घातलं, शाळा सुरू झाली. वर्षं सरकत होती… पुष्पा साड्या नेसू लागली होती. पुष्पाचं लग्न काही ठरेना. तिला पाहिल्यावर लगेच होकार येई, पण तिला बोलताना ऐकलं, की लगेच नकार. सुरुवाती सुरुवातीला कोमेजून जाणारी पुष्पा नकार घेऊन निर्ढावली होती. एकटी असताना मावशींच्या जवळ मोकळेपणानं बोलताना आपल्या गेंगाण्या आवाजात म्हणे, ‘‘टाळूला भोक आहे, याचं येव्हडं काय हो? त्यानं काय नडणार आहे संसार कारायला? कसला बाऊ वाटतो त्यांना हो मावशी? माझा स्वयंपाक बघा, माझं काम बघा. माझे फोटो कित्ती झ्याक येतात. कित्ती छान संसार करीन मी मावशी…!’’ ती गेंगाण्या आवाजात तन्मयतेनं सांगे.

मावशी म्हणायच्या, ‘‘हो गं पोरी.’’
तिच्यातला कल्पनेत समरसून जाण्याचा स्वभाव मात्र होता तसाच होता. परिस्थिती सगळी तिच्याविरुद्ध असली, तरी ती स्वतः मजेत असे. तिनं शिवणकामाचा क्लास लावला होता. वेगवेगळ्या गळ्यांची, पाठीमागच्या बटनांची पोलकी ती इतकी सुंदर शिवून देई, की तालुक्यात ती माहीत झाली. आताशा ती शेतावर जात नसे. भांडी घासत नसे. स्वतः पैसे मिळवणारी झाल्यानं तिला घरात मान मिळू लागला. तिच्या पैशांनी तिनं फुलाफुलांच्या कपबश्या आणल्या. इष्टीलची भांडी, फुल्पात्री घेतली. घरासमोर कोबा करून घेतला. छपरावरचं गवत काढून दोन लोखंडी पत्रे टाकले. तिचा शिवणक्लास सुरू झाला. दहा-पंधरा मुलीबाळी येऊ लागल्या. तिच्याशी मोकळ्याढाकळ्या गप्पा होत. आपली वाटायची सगळ्यांना. मात्र लग्नाच्या बाजारात ती सपशेल नापास होत होती. तिची संसाराची स्वप्नं पाहण्याचं वय सरत चाललं असलं, तरी मनात तिनं अशा सोडली नव्हती. आपल्या टाळूला भोक आहे, तर स्वाभाविकपणे नकार येणारच की, अशा समजुतीच्या भावानं तिचं सामाजिक व्यंग तिनं आपलंसं केलं.

आणि एके दिवशी ठरलं की पुष्पाचं लग्न! न शिकलेली पुष्पा, तिला सातवी झालेला नवरा मिळणार होता. रामदास हिरवे नावाचा मुलगा… मुलगा कसला, पुष्पापेक्षा बारा वर्षांनी मोठा बाप्याच. मध्यस्थानं सांगितलं, की घरात मोप शेतीवाडी, गुरं, कोंबड्या… मोठं खटलं होतं. शिक्षणाची आवड म्हणून राम फावल्या वेळात तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोष्टात लोकांची पत्रं लिहून दे, मनीऑर्डरी कर अशी पण कामं करायचा. असा शिकलासवरलेला नवरा म्हटल्यावर पुष्पा आणि घरदार आनंदून गेलं. मावशींना दाखवायला आणला. त्याच्या पांढर्‍याशुभ्र कवडीसारख्या डोळ्यांकडे मावशींचं लक्ष जाताच, पुष्पा तिच्या गेंगाण्या आवाजात म्हणाली, ‘‘हाय वयानं मोठ्ठा, आणि डोळा असा हाय, पण आपल्यात पण खोट हायना वं मावशी? कशाला न्हाई म्हणायचं?’’
मावशी म्हणाल्या, ‘‘नीट चौकशी केलीयस ना रे संभा?’’ संभानं जोरात मान डोलवली, होकारार्थी.

दोन दिवसांत हळदी-बांगड्यांचा कार्यक्रम झाला. आता पुष्पाकडे खरं काजळ होतं, खरी लिपस्टिक होती. लग्न ठरल्याच्या आनंदात तिनं वाडातल्या सगळ्यांना कपडे केले. आपल्या आईला चकचकीत गुलाबी मद्रासी कुंकवाच्या रंगाचं लुगडं घेतलं. बापाला पांढरा पायजमा, पांढरा सदरा आणि कोल्हापुरी चपला घेतल्या. सुमनीला वायलची फुलाफुलांची साडी, मावशींना हकोबाचा ब्लाऊज पीस… अगदी प्रत्येकाला काही ना काही. साठवलेले सगळे पैसे संपवले. नव्या घरासाठी लोखंडी कॉट, लोखंडी कपाट, रुखवत, त्यासाठी लागणारी भांडीकुंडी. चार-आठ दिवसांत लग्न झालं. निळ्या चिंतामणी रंगाची शालूसारखी दिसणारी साडी नेसून, खरे-खोटे दागिने घालून, नटूनथटून पुष्पा लग्न होऊन सासरी निघाली. निरोप घेताना, सिनेमातल्यासारखी रडली. मावशींना नमस्कार करताना मात्र घुसमटल्यासारखी झाली. काय चाललं होतं तिच्या मनात कुणास ठाऊक? भविष्याची चिंता आणि संसाराची स्वप्नं, वास्तव आणि स्वप्न… तिचा तिला अंदाज येत नव्हता. मावशींनी तिची साडी-चोळी देऊन ओटी भरली, दोनशे पन्नास रुपयांचं पाकीट तिच्या नवर्‍याच्या हातात दिलं.

‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव,’ असा आशीर्वाद दिला. तर पुष्पा लाजेनं चूर झाली. ‘‘नीट संसार करा.’’ मावशी म्हणाल्या. पुष्पाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि दोघांनी जोडीनं त्यांना नमस्कार केला. पुष्पा दारात गेलेली परत आली. आपल्या गेंगाण्या आर्जवी आवाजात मावशींना म्हणाली, ‘‘मावशी, लग्नानंतर नाव बदलतात ना! तुम्ही सांगा ना यांना, मला ‘शकुंतला’ म्हणायला.’’ सगळे कौतुकानं हसले आणि ‘पुष्पा संभाजी दळवी’ची ‘शकुंतला रामदास हिरवे’ होऊन शेजारच्या खेड्यात पुष्पा नांदायला गेली.
सुहाग रात, नवर्‍याला चांगलंचुंगलं खायला करून देणं, सासरच्या लोकांच मन जिकायचं, घर सजवायचं, सासूला, नणदेला मागच्या बटनांचं पोलकं शिवून द्यायचं, होणारी मुलं… अधीरतेनं तिच्या मनात स्वप्नं उसळ्या मारत होती.
बाहेर सजवलेल्या बैलगाडीतून पुष्पा सासरी निघाली. बैलांच्या शिंगांना गुलाबी रिबिनीची फुलं बांधलेली होती. त्यांच्या अंगावर हिरवे, गुलाबी हाताच्या पंजाचे ठसे उमटवले होते. वेशीपर्यंत मिरवणूक गेली त्यांना निरोप द्यायला. पुढे टिमकी वाजत होती, त्याच्या बरोबर बेसूरपणे ‘जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ची धून सनईवाला वाजवत होता.

अधूनमधून मावशी विचारायच्या पुष्पाबद्दल. ‘चांगलं चाललंय’ असं उत्तर मिळायचं. दीड-दोन महिन्यांत दिवाळी आली. पुष्पा येणार म्हणून घरात दोन गोडाचे पदार्थ केले, मावशींच्या सल्ल्यानं. साडी आणून ठेवली. पण निरोप आला, शेतातल्या कामामुळे त्यांना आत्ता यायला जमणार नव्हतं. पण ‘गडबड संपली की येऊ’ अशा दिलाशानं सगळे निवांत राहिले. सगळेच आपापल्या कामात व्यग्र. पुष्पाच्या लग्नाच्या नवेपणाचा करकरीतपणा आता संपला होता. पुष्पाकडची शेती, गुरांची कामं सुरूच होती. तिला सवड म्हणून मिळत नव्हती माहेरी यायची. एके दिवशी मावशी पुष्पाच्या भावाला बोलावून म्हणाल्या, ‘‘अरे बाळू, तिला जमत नाहीये यायला. तू जाऊन घेऊन ये ना तिला दोन दिवस.’’

दुसर्‍या दिवशी बाळू तयार होऊन गेला. पाहुण्यांकडे जायचं म्हणून इस्त्री केलेला सदरा आणि जुनीच विजार घालून, बरोबर पापड, कुरडया, सांडगे, थोडे शेव-फुटाणे असा खाऊ घेऊन गेला. सक्काळी निघाला. दोन दिवसांत परत येणार म्हणून, पण त्याच दिवशी आला, दिवे लागणीच्या वेळी. आला तो तडक मावशींच्याच घरी. संध्याकाळचा देवापुढे दिवा लावून मावशी कसलीशी पोथी वाचत होत्या. वकीलसाहेब वृत्तपत्र चाळत होते. बाहेरचं फाटक अशा तिन्ही सांजेला वाजलं म्हणून त्या बाहेर आल्या आणि जागीच थिजून उभ्या राहिल्या.

बाळू रया गेलेल्या तोंडानं, भेदरून उभा होता. संभा बावचळून काही सुधरत नसल्यागत इकडे तिकडे बघत होता. पुष्पाची आई बधिरपणे बसकण मारून बसलेली. आणि पुष्पा… पुष्पा नव्हतीच ती. पुष्पाचा सांगाडा. काजळविरहित उजाड डोळ्यांची, खरेखोटे दागिने सासरच्यांनी लुबाडलेली, गळ्यात मण्यांची पोत पण नाही… लग्नातला शिवलेला ब्लाऊज पण पोत्यासारखा सगळीकडून तरंगणारा, विटलेली साडी पांघरलेला एक देह.
मावशींनी तिला आत बसवलं. पुष्पाला रडताही येत नव्हतं. ओठांना चिरा पडण्याइतके कोरडे ओठ. ‘‘काही खाल्लंयस का?’’ मावशींनी विचारलं.
त्यावर तिनं क्षीणपणे नकारार्थी मान हलवली. तीसुद्धा थोडीशीच.
‘‘किती दिवस उपाशी आहेस?’’
तिनं बोटांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित वीस बोटं दाखवत होती.
दोन महिने पण पूर्ण झाले नाहीत लग्नाला… आणि… मावशींनी हिशोब केला. ‘‘अरे, त्यांनी हिला उपाशी मारायचं ठरवलं होतं की काय?’’ त्या म्हणाल्या आणि एकीकडे छोट्या ताटलीत मऊमऊ गुरगुट्या भातावर थोडं मेतकूट टाकून तूप टाकून स्वतःच्या हातानं पुष्पाला भरवला. आतली सगळी त्वचा इतकी सुकून गेली होती, की तिला तो भात गिळता पण येईना. मावशी म्हणाल्या, ‘‘होईल बरी. अजून सगळं आयुष्य छान घालवायचं ना आपल्याला?’’
पुष्पा शांत नजरेनं फक्त पाहत होती. मावशींनी पुष्पाला आपल्या घरात एक अंथरूण टाकून दिलं. सतत काहीतरी प्यायला दे, खायला दे, असं करून झाल्यावर तीन-चार दिवसांनी ती पहिल्यांदा बोलली. ‘‘मी गेल्यावर त्यांनी आधी माझे सगळे पैसे, दागिने काढून घेतले. ज्या दिवशी गेले, त्याच दिवशी…’’ तिला दम लागला होता. ‘‘मला बोलता येत नाही म्हणून मला कोंडून ठेवलं. बाहेर सोडायचे ते शेतातलं काम करायला. पुन्हा कोंडून. गायीला दावणीला बांधून ठेवतात तसं. आणि जेवायलाच द्यायचे नाहीत. मी म्हणायचे, ‘तुम्हाला मी नकोय, तर मला घरी सोडा.’ पण ऐकायचेच नाहीत माझं.’’
बाळूकडून समजलं, की रामदासचं आधी एक लग्न झालं होतं. दोन मुलं होती. पण मध्यस्थांनी पुष्पाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन, ‘घरात हक्काची कामकरीण मिळेल’ असा मोह दाखवून या लग्नाचा प्रस्ताव मांडला.

दिवसभरात जे ती थोडं थोडं सांगत होती, त्यातून साधारण कल्पना सगळ्यांना आली. घरगुती उपायांनी बरं वाटेना म्हणून तालुक्याच्या ठिकाणी नेलं. पैसे संपले, औषधांचा खर्च परवडेना. परत आणली. घरातलीच औषधं करायची, असं ठरलं. ‘मावशींच्या औषधांनी मला बरं वाटतं.’ पुष्पा खुणेनं सांगे. तिच्या आतड्यांना सुकून सुकून व्रण झाले होते. शेवटचा प्रयत्न म्हणून पैसे जमवून, मावशींच्या मदतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी नेलं. तिथे तिची जास्तीच हेळसांड झाली.
आणि पुष्पा गेलीच..
पुष्पाला घरी आणलं. शेवटच्या यात्रेसाठी नवीन साडी नेसवायला म्हणून पिशवी उपडी केली आणि तिनं घेतलेल्या साड्यांच्या घड्याखाली असलेलं एक छोटं दागिन्यांबरोबर मिळतं, तसलं वेल्वेट सारखं, जांभळ्या रंगाचं पाकीट खाली पडलं. ते उघडून पाहिलं, तर एक वर्तमानपत्राची पुडी पडली. यात काय म्हणून उघडली, तर आतली गुलाबी पावडर सगळीकडे पसरली…
त्या सुन्न भयाण, मृत वासाच्या खोलीत त्या पावडरचा वास दरवळला.
पुष्पा गेली… बघितलेली स्वप्नं मागे ठेवून. जमवलेलं नट्टापट्ट्याचं सामान पिशवीच्या तळाशी ठेवून. तिनं कल्पिलेल्या स्वर्गात कदाचित…!

– अपर्णा महाजन

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.