Now Reading
पाहण्यात नसलेल्या नायिका

पाहण्यात नसलेल्या नायिका

Menaka Prakashan

कथेतलं मुख्य पात्र जेव्हा एखाद्या तणावाच्या परिस्थितीतून जात असतं, तेव्हा तो तणाव त्या पात्राच्या वागण्या-बोलण्यात आलेला असतोच, शिवाय लेखकाच्या मनावरसुद्धा नकळत जमा झालेला असतो. अशा तणावाची वीण कथेला एक प्रकारची मजबुती आणत असते. कथेतलं हे तणावाचं पात्र जर स्त्री असेल, तर मग त्या कथनाला आपोआप एक गहराई येते.

‘भरपाई’ कथेनं हा अनुभव दिला. या कथेतलं मुख्य पात्र खरं म्हणजे, संग्राम. तालुका नगरपालिकेत पंप ऑपरेटर म्हणून नोकरीला असलेला हा चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी. गावाच्या बाहेर गावाला पाणी पुरवणार्‍या नळाच्या भल्यामोठ्या टाकीचा हा पंप ऑपरेटर. त्याची ड्युटी म्हणजे, नदीवरून धावत आलेलं, लांबलचक- दोन्ही हातांच्या व्यासाच्या पाईपमधून येऊन इथे तितक्याच प्रशस्त टाक्यांत जमा होणारं पाणी; त्या टाकीचं नियंत्रण. मग या टाकीतलं पाणी गावासाठी सोडण्याचं-थांबवण्याचं काम. जबाबदारीची आणि तणावाची त्याची नोकरी.

ही एक मोठी कथा आहे. पैशांच्या विचारानं आणि तणावामुळे सतत झपाटलेला असा हा संग्राम, दोन समस्येमध्ये गुंतून गेलेला. त्यापैकी एक म्हणजे, आईच्या अपघातामुळे त्यानं दाखल केलेला नुकसानभरपाईचा चाळीस हजार रुपयांचा दावा. ट्रकच्या मागच्या चाकाखाली आलेली संग्रामची आई थोडक्यात बचावते आणि तिचा पाय गुडघ्यापासून कापावा लागतो. तिच्या या अपघाताची नुकसानभरपाई म्हणून त्यानं चाळीस हजारांचा दावा ठोकलेला आणि या चाळीस हजारांच्या प्राप्तीच्या कल्पनेत रंगून गेलेला चतुर्थ श्रेणीचा संग्राम. संग्रामची दुसरी समस्या म्हणजे, नोकरीसाठी उमेदवारांकडून पैसे गोळा करून परस्पर पोचवणं, त्यातून चार पैसे मिळवणं अशा एक प्रकारच्या दलालीत अडकलेला हा संग्राम. …पंप ऑपरेटरची नोकरी करताना पैसे मिळवण्याची धून लागलेला असा माणूस.

कथेत या घटनांच्या समांतर घटना घडत असतात, त्या त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या आईच्या, म्हणजेच सासू-सुनेतल्या संबंधातल्या. त्यांच्या नात्यातल्या चढउताराच्या. अपघाताच्या आधी, सुनेच्या कजाग वागण्या-बोलण्याच्या छायेखाली दडपणानं वागणारी म्हातारी सासू, आता अपघातानं अपंग झालेली. अंगणात पडून असणारी, मात्र आपल्यामुळे आता पोराला चाळीस हजार मिळणार असल्यानं आता तिच्यात अन् सुनेत झालेला बदल हा कथेचा समांतर भाग. सासूची सेवा करता करता गडबडून जाणारी तरुण सून आणि बाजेवर दिवसभर रेडिओ घेऊन स्टेशनं फिरवत बसणारी, सुनेवर आवाज चढवणारी, सगळी सेवा करून घेणारी तिची सासू.
खेड्यातलं, तालुक्यातलं अशा तर्‍हेचं सासू-सुनेचं वागणं-बोलणं मी पाहिलेलं आहे. निम्न आर्थिक परिस्थितीच्या बाह्य आवरणाखाली वावरणार्‍या या बायकांचे आपापसांतले मतभेद, राग-लोभ मोठे विचित्र वाटायचे. आर्थिक परिस्थिती आणि त्यात सापडलेल्या स्त्रियांची ही अगतिकता, मान-अपमान… मोठा अस्वस्थ करणारा मुद्दा असायचा.

मुळात ही कथा सुचली, ती त्या दृश्यामुळे. नगरपालिकेच्या ऑडिटला आलेलो होतो इथे. संध्याकाळच्या सुमारास गावाबाहेरच्या टेकडीवर असलेले ते पंप हाऊस- पाण्याची टाकी, त्या टाकीवर आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती. तो पंप ऑपरेटर होता व्यवस्थेला. टाकीवरून सगळ्या गावाचं मनोहर असं दृश्य दिसायचं, ते पाहतानाच नजर जवळ आली. टाकीच्या खालच्या बाजूला त्या ऑपरेटरची दोन खोल्यांची ती क्वार्टर. अंगणात, लिंबाच्या झाडाखाली एक म्हातारी बाजेवर आरामात निजून रेडिओच्या भसाड्या आवाजात स्टेशनं फिरवत होती. मला गंमत वाटली होती. रेस्ट हाऊसला परतताना नगरपालिकेच्या कर्मचार्‍याकडे चौकशी केली आणि ती हकीकत कळाली. म्हातारीचा अपघात, तिच्या पायाचं अधू होणं, नुकसानभरपाईची मोठी रक्कम आता मिळणार, या कल्पनेत गुंतलेलं ते संग्रामचं कुटुंब.

म्हातारी दूरवरून दिसलेली आणि संग्रामची बायको दिसलीच नाही, तरीही या दोघींचं वागणं कसं असेल- अपघातापूर्वी आणि आता अपंग झालेल्या सासूचं अन् सुनेचं… शिवाय, मोठी रक्कम मिळणार ही शक्यता. त्या वेळी मला कुतूहल वाटलं होतं, कथा सुचली नव्हती. मात्र जेव्हा या संग्रामचे नोकरीशिवायचे अन्य उद्योग ऐकले, त्या वेळी कथेचे विचार येऊ लागले. नोकरी लावायची ज्या अधिकार्‍याच्या, किंवा पदाधिकार्‍याच्या हाती असते, त्याच्याशी ‘संपर्क’ ठेवून असणारा हा संग्राम होता. गरजू उमेदवार संग्रामकडे यायचे, पैशांची अनामत त्याच्या हवाली करायचे, हा संग्राम मग ती रक्कम संबंधिताकडे पोचवायचा, या दलालीत चार पैसे मिळवायचा.
नुकसानभरपाईची कोर्टाची केस आणि ही दलाली या दोन्ही अघाड्यांत पराभव होतो आणि पुढे काही दिवसांनी मला समजलं, की हा संग्राम पळून गेला, फरारी झाला.
…आणि संग्रामची ही हकीकत मला कथेसाठी फार अनुकूल वाटली. पण कथालेखनाची ही एक अढी असते- कथा उत्तम होईल याची ‘खात्री’ असते, कथेतले सगळे मुद्दे समजलेले असतात, काय लिहायचं, कसं लिहायचं, कुठे थांबायचं, सगळं सगळं स्पष्ट दिसत होतं. अस्वस्थ होऊ लागलो, कथालेखनाची चुळबूळ होऊ लागली, पण… कथा लिहिताच येईना!
प्रत्यक्ष कथा लिहिली ती पंधरा-सोळा वर्षांनी! त्याची दोन कारणं. एक म्हणजे, सगळंच मनात ‘तयार’ असताना प्रत्यक्ष लिहिताना मोठं नाटकी वाटत जातं! कथेवरचा भरवसा कमी होतो, आत्मविश्वास कमी होतो, आपण ‘प्रसिद्धी’साठी लिहीत आहोत की काय, अशा बावळट विचारांचाही त्रास होतो. कथा मनात पूर्ण तयार असली, की येणारे प्रत्यक्ष कथालेखनातले हे अडथळे.

पण कथा लिहावी लागली, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या संग्रामच्या जीवनात आलेली वळणं. त्या नगरपालिकेचा अकाऊंटंट माझा मित्र होता. फोनवर संपर्क होता. व्यवहारात नियमांच्या काही अडचणी आल्या, की हमखास मला विचारायचा. आणि मीसुद्धा आवर्जून विचारायचो, ‘संग्राम काय करतो आहे, त्याच्या केसचं काय झालं…’ त्याच्या हकीकती कळायच्या. या महिन्यात त्याचा निकाल आहे, त्यानं नोकरीसाठी बर्‍याच जणांकडून पैसे घेतले, पण नेमणुकीला स्टे आल्याने लोक त्याला पैसे मागत आहेत, वगैरे. पुढे असंच एकदा कळालं, की संग्राम पळून गेला आहे. फरारी. त्यालाही साताठ वर्षं झालेली होती. अशात संपर्क नव्हता.
एकदा अकाऊंटंटचा फोन आला, ‘‘साहेब, कर्मचारी सात वर्षांनंतरही फरारी असेल, तर त्याला मृत म्हणून घोषित करून त्याच्या वारसाला नोकरी मिळते ना…’’
‘‘हो, मिळते की…’’ नियमाचा हवाला देऊन मी फोनवरून म्हटलं.
‘‘आम्ही संग्रामच्या बायकोला नोकरी दिली होती बघा, आणि आता संग्राम परत आलाय आठ वर्षांनी, आता काय करावं?’’
माझं ऑडिटचं ज्ञान उघडं पडलं! मलाही माहीत नव्हतं आता काय करायचं ते. पण मनातला लेखक खडबडून जागा झाला! काय जबरदस्त वळणं आहेत ही. दीर्घकथा होईल, असं वाटू लागलं. कथा-लेखन-मोह आवरेना झाला, तरीही कथा लिहिली नाही. आणखी तीन-चार वर्षं झाली, मग त्या गावाला गेलो. नेहमीचंच गाव, मित्रमंडळी… आता संग्राम पुन्हा परागंदा झालेला होता. आणि मनाच्या अवकाशात भरकटणारी ती कथा कक्षेत येऊ लागली. लिहायची, असं ठरवलं. पंप हाऊसवर आता दुसरे कर्मचारी आलेले. मग ओळखीच्या कर्मचार्‍याला सोबतीला घेऊन पंप हाऊसचं सगळं काम समजून घेतलं. नदीच्या पंप हाऊसवर पाईपलाईनच्या अंगानं पायी गेलो, तिथलं पंप हाऊस पाहिलं, पाणी कसं येतं? पुन्हा मुख्य टाकीवर आलो. तिथली रचना, कार्यपद्धती, त्यांचे शब्द समजून घेतले. मनात संग्राम भरून होता. त्याची म्हातारी दरम्यान गुजरल्याचं कळलं. तिचं बाजेवरचं रेडिओ ऐकणं नजरेसमोर दिसू लागलं. …त्याला आता पंधरा वर्षं झाली होती.

आणि पुन्हा जाणवू लागला, संग्राम. आर्थिक समस्येसोबतच त्याची आई-त्याची बायको यांचं नातं. मग कथा लिहिली, प्रसिद्धही झाली, ‘भरपाई’ या नावानं. कथेत, अपघातापूर्वी, अपघातानंतर आणि कोर्टाच्या निकालानंतर आलेली ही वर्णनं, सासू-सुनेच्या वागण्या-बोलण्यातल्या तफावती दाखवून जातात.
१. त्या दिवशी जोरदार भांडण झालेलं होतं. अर्थात, म्हातारीचा आवाज खाली पडलेला होता. तिची मजाल नव्हती, सुनेला उलटं बोलायची. ‘चा वडून गुमान जा की! आता चुलीत काय हात-पाय सारू का मी?’ असं म्हणून तिनं म्हातारीला नदीकडे सरपण आणायला धाडून दिलं होतं. म्हातारी गेलीही होती. दुपारपर्यंत भलीमोठी सरपणाची मोळी डोक्यावर बांधून ती आणायची. मजाल नव्हती तिची पुन्हा चहा मागायची.
२. ‘सुशीले, आगं खायला घालतीस, का मारून टाकतीस म्हातारीला उपाशीच? मग मजा मारा तुमी पैसे घिऊन!’ संग्रामची बायको मुकाट्यानं भाजलेल्या शेंगदाण्याचा कटोरा घेऊन हवाली करायची म्हातारीच्या. आणि मग आपल्या कामाला लागायची. …राखेत विस्तवानं जीव धरून असावं, तसं ॉटचा विचार संग्रामच्या बायकोच्या मनात यायचा. म्हातारीबद्दलचा राग धुमसत असायचा, तिची काळजी घ्यायची जोखीम मनात राहायची.
३. ‘पैसे मिळणार नाहीत’, हे ऐकल्यावर म्हातारी पिसाट झाली होती. छाती बडवून घेऊ लागली, गळा काढून रडू लागली. ट्रकवाल्याला, वकिलाला शिव्या घालू लागली. (संग्रामची) बायको बाहेर येऊन मग कडाडली होती, ‘आता मुकाट्यानं बसता, की कसं?’ आणि दिवसभर वाचा गेल्यासारखी म्हातारी गप्पच होऊन गेली होती. काहीच बोलेना.

प्रत्यक्षात न पाहिलेली ही म्हातारी आणि तिची सून, पण कथेतल्या तणावामुळे मन भरून गेलेलं होतं, या दोघी शब्दांतून मला दिसू लागल्या होत्या, जाणवू लागल्या होत्या. इतकंच नाही, कोर्टाच्या वातावरणाचा कधीही अनुभव नसताना कोर्टात, बायको-म्हातारीला संग्राम घेऊन जातो… खरं म्हणजे मीच त्यांना कथेत घेऊन जातो. त्या तिघांना काहीही माहिती नव्हती आणि मला तरी कुठे होती? माझा संग्राम झाला होता, माझीच म्हातारी झालेली, माझीच अवस्था त्या सुनेसारखी झालेली… समस्येला तोंड देताना, त्या तणावातून माणसाचं वेगळं रूप आपोआप प्रकट होत असतं, याचा प्रत्यय या ‘भरपाई’ कथेनं आला होता. नजरेत स्पष्ट नसलेल्या या दोघी शब्दांतून स्पष्ट झाल्या होत्या.

जवळपास तीस पानांची माझी ‘भरपाई’ ही कथा लिहिली गेली, ती पंधरा-सोळा वर्षांनंतर, हे खरंच. पण कथा प्रसिद्ध झाल्यावरसुद्धा कथेतल्या या सासू-सुनेचं हे असं बदलणारं नातं मनातून काही जाईना. कथा संग्रामची होती, तो नायक होता कथेचा, नोकरी-दलाली-कोर्टाच्या केसचा प्रश्न अशा तिन्ही समस्यांना तोंड देणारा संग्राम. त्याच्या अनुषंगानं त्याची बायको आणि त्याची आई या परिस्थितीतून जाताना त्यांच्या आपापसांत झालेला बदल हा काही मनातून जाईना. वाटू लागलं, संग्रामच्या बायकोच्या नजरेनं ही सगळी कथा पाहिली पाहिजे.

कथालेखनाचा दृष्टी-बिंदू (पॉईंट ऑफ व्ह्यू) हा महत्त्वाचा मुद्दा असतो. लेखक कुणाच्या ‘नजरेनं’ ही कथा सांगतो आहे, त्यावरून वाचकाचीही कथा समजून घ्यायची एक नजर ठरून जाते. प्रथम पुरुषी निवेदन, तृतीय पुरुषी निवेदन आणि सर्वसमावेशक दृष्टीचं निवेदन असे कथा-निवेदनाचे प्रकार असतात. लेखकाला कथा ‘कशी’ जाणवते, त्या अनुषंगानं ती त्या दृष्टी-बिंदूतून लिहिली जाते. ‘भरपाई’ कथा संग्राम आणि संग्रामच्या समोरच्या समस्या, या दृष्टीतून पाहिली गेली आणि तृतीय पुरुषी निवेदनातून लिहिली. अशा प्रकारच्या कथालेखनात कथालेखक कथांच्या घटनाक्रमांत गुंतून गेलेला असतो, त्याची पात्रं त्या तर्‍हेनं वागत-बोलत असतात. पात्रांच्या मनात डोकावण्याची लेखकाला सवड नसते. (आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे, कथेच्या मुख्य पात्राच्या डोक्यावर लेखकानं ‘सीसी कॅमेरा’ लावलेला असतो!) अशा कथेत कधी मुख्य पात्राच्या मनातल्या विचारांचे, त्याच्या मन:स्थितीचे तपशीलसुद्धा येतात.

हीच कथा आता संग्रामच्या बायकोच्या नजरेनं पाहू लागलो. या नायिकेचे कोणते प्रश्न असतील, नवर्‍याच्या या समस्या तिनं घरात-मनात कशा तर्‍हेनं अनुभवल्या असतील, तिनं कसं तोंड दिलं असेल या सगळ्यांना. महत्त्वाचं म्हणजे, संग्राम जेव्हा घराबाहेर असायचा, तेव्हा ती काय करत असेल, आपल्या सासूची काळजी आणि तिच्याबद्दल राग-लोभ कसा व्यक्त होत असेल, एका पोराचा आणि शेळीचा सांभाळ करताना, या स्त्रीचं दैनंदिन कसं झालेलं असेल… असे विचार आले आणि एक नवी कथा जन्माला आली, ती तुलनेनं छोट्या आकाराची. ‘लचका’ या शीर्षकानं. असा प्रयोग त्याच दिवसांत आणखी एक वेळा झालेला आहे, तो वेगळ्या लेखात सांगता येईल. मात्र या ‘भरपाई’ कथेतली, त्याच समस्येला तोंड देणार्‍या स्त्रीची बाजू मला महत्त्वाची वाटली. त्यातून काही शोधावं वाटलं. ‘लचका’ ही कथा त्याचाच एक प्रयत्न होता.

आज पुन्हा या कथा तपासल्या, तेव्हा लक्षात आलं, ‘भरपाई’ या कथेची सुरुवात संध्याकाळच्या वर्णनानं झाली, तर ‘लचका’ची पहाटेच्या.
…म्हातारी उठून बाजेवर बसली होती. उजव्या गुडख्याखाली उशी घेऊन दात घासत होती. मंजन डाव्या तळव्यावर, उजवी तर्जनी तोंडात घोळवत तिनं विचारलं, ‘‘आन संग्राम कुठं गेला, सायकल घिऊन?’’
संग्रामची बायको चिडली. म्हातारीचं बोलणं समजलं नव्हतं, आणि तिला काय करायच्यात उठाठेवी? एरवी विचारलं असतं, तर जोरदार चिरक्या आवाजात तिनं सुनावलं असतं, ‘तुमाला काय करायचंय आत्या? गुमान जा की सर्पनाला, आं!’ …पाय मोडला अन् म्हातारी उरावर बसली आपल्या. कमरेवरची घागर उतरवताना धाप लागलेल्या आवाजात तिनं सांगितलं, ‘‘सायबाकडे.’’ पुन्हा सावरून म्हटलं, ‘‘वकील सायबाकडे.’’ वकिलाचं नाव काढलं, की म्हातारी फाटे फोडत नाही.
अशा वर्णनानं कथा पुढे जाते. अर्थात, ‘लचका’ कथेची नायिका- तिच्या अनुषंगानंच ही कथा आहे. संग्रामची कथा त्याच्या परिस्थितीवर, तर सुशीलाची- ही नायिका- तिच्या मन:स्थितीवर बेतलेली. कथालेखक म्हणून मला एक वेगळं कुतूहल, वेगळी ओढ लागली होती. ‘भरपाई’ कथेत संग्रामसोबत मी बाहेर जायचो, साहेबांना-वकिलाला भेटायला जायचो. आता, संग्राम कामाला बाहेर गेला, की मी त्याच्या बायकोसोबत घरी राहू लागलो. कथेत या बायकोच्या दिसण्याचं वर्णन नाही. मीच कुठे पाहिलं होतं अशा पोरगेल्या संसारी स्त्रीला… पण तालुक्याच्या गावात- बाजारात, बस प्रवासात, दुकानांत, रस्त्यांवर बर्‍याच स्त्रियांना पाहिलेलं असतं, त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे लक्षही गेलेलं असतं. अशाच निरीक्षणाच्या अवकाशातून या नायिकेची प्रकृती मनात स्थिरावली होती, त्यात माझा स्वभाव मिसळला होता आणि उभी राहिली होती ही नायिका- सुशीला.

दरम्यान, ‘भरपाई’ कथेतल्या मुख्य घटना ही कथा लिहितानाही कामाला आल्या, पण गंमत होऊ लागली ती ही, की ज्या प्रसंगात संग्राम आणि त्याची बायको आहे, त्याकडे आता बायकोच्या अनुषंगानं पाहू लागलो आणि संग्राम बाहेर गेला, की या नायिकेच्या अनुषंगानं विचार करू लागलो. अशा वेळेला नायिकेच्या भूतकाळात वावरता आलं, या स्थितीत तिची मनःस्थिती काय याचा अदमास घेता येऊ लागला. महत्त्वाचं म्हणजे, या सासूचं- या म्हातारीचं काय करायचं, दिवसरात्र सोबतीला असलेल्या या अपंग अशा सासूचं… संग्रामच्या समस्येपेक्षा त्याच्या बायकोचा प्रश्न महत्त्वाचा वाटू लागला.
‘लचका’ कथेत मी गुंतून गेलो. संग्रामनं ॉटसाठी बयाणा रक्कम भरल्याचा उल्लेख ‘भरपाई’ कथेत होता, आता इथे नायिकेला भेटायला तिचा मामा आला. हाच तो, ज्याला बयाणा रक्कम दिलेली. तो आता उरलेली रक्कम मागायला घरी आलेला, नात्यातला. …संग्रामच्या बायकोनं त्याला जेवू घातलं, त्याची समजूत घालून परत धाडलं. घरधन्याच्या माघारी, घर सांभाळणार्‍या स्त्रीची मनःस्थिती कशी असते… शिवाय, येऊ घातलेल्या घटनेला टांगून असणारं मन. एका ठिकाणी दुपारचं वर्णन असं आलं आहे –
…दुपारच्या वेळेला सगळ्या फिल्टर हाऊसचा परिसर शांत होता. उन्हाच्या झळा सुरू झाल्या होत्या. आणि तशा वातावरणात रेडिओचा चित्रविचित्र आवाज संग्रामच्या बायकोला ऐकवेना झाला. ती दारात बसून हातातल्या बांगड्या मागेपुढे करत म्हातारीकडे नजर लावून बसली. तिच्या लक्षात आलं, म्हातारीचा उजवा पाय उघडा पडला होता. उठून तिनं म्हातारीची चादर नीट केली…

कधी प्रश्न पडतो, कथेपासून आपल्याला काय अपेक्षा असतात… करमणूक-रंजन ही अपेक्षा वेगळी. त्या कथाही वेगळ्या. पण जेव्हा कथालेखक मित्र होऊन वाचकाशी सहभागी होतो, त्याला गांभीर्यानं काही सांगू पाहतो, तेव्हा त्याच्या कथनात काय असतं… आपण कोणत्या हेतूनं त्याचं कथन ऐकत असतो… लिहिणारा एक हकीकत सांगत असतो. ती आपण मन लावून ऐकत असतो. हे कथन असतं, जीवनानुभवाच्या एका तुकड्याचं. तो ‘दुसर्‍याचा’ अनुभव असतो, ‘दुसर्‍याची’ समस्या असते, म्हणून कदाचित आपण अधिक गुंतून गेलेलो असतो. कथेतून आपल्याला अपेक्षा असते, असं म्हणण्यापेक्षा काहीतरी समजून-उमजून घ्यायचा प्रयत्न असतो. कोणत्याही समस्येचं उत्तर देण्याची जबाबदारी कथेची नसते. त्या कथाही वेगळ्या असतात. अशा कथेत समस्येची निर्मिती, तिचा तणाव आणि मग सुचवलेला उपाय असतो (आणि वाचकाची सुटका!). एखादी कथा आपल्याला अवचितपणे घेरते. वाट अडवून उभी ठाकते. जंगलात अचानक वाघ समोर आला, की जनावर एकदम उभंच राहतं म्हणतात. धावण्याचं, निसटून जाण्याचं भानही हरवून जातं. कथेतल्या पात्रांना, कथालेखकाला आणि वाचकालासुद्धा अशी कथा कोपर्‍यात गाठावी तशी गाठते. …असं होत असतं जीवनात, याची स्पष्ट जाणीव कथा आपल्याला करून देत असते का? होय, कथेची अशीही प्रकृती असते.

…रात्र झालेली आहे. संग्राम अद्याप आलेला नाही. आज निकालाचा दिवस असतो. जसजशी वेळ होत जाते, संग्रामच्या बायकोच्या मनात पाल चुकचुकत जाते. रात्री उशिरा नवरा येतो. निराश झालेला आणि दारू घेऊन आलेला. केस हरल्याचं कळतं. पैसा मिळणार नाही, हे लक्षात येतं. संग्रामच्या बायकोची विचित्र तगमग होते. आता काय करावं? ती दारात उभी राहते. ती पाहते –
अस्वस्थ झालेल्या संग्रामच्या बायकोची नजर बाजेवर गेली… बाजेवर म्हातारी उताणी निजली होती. गाढ झोपली होती. उजव्या गुडघ्याच्या खाली उशी घेऊन. तिच्या अंगावरची चादर सरकली होती. उजवा- कापलेला पाय उघडा पडला होता. काळी नितळ मांडी दिसत होती. केवळ सवयीनंच संग्रामची बायको उठली आणि बाजेजवळ गेली. म्हातारीच्या उघड्या पायावर चादर ओढताना तिचं लक्ष पहिल्यांदाच गेलं,
लाईटच्या पिवळ्या प्रकाशात कापलेल्या उघड्या पायाचं तोंड आवळून घेतल्यासारखं दिसत होतं, पायाची शिवण इंगळीसारखी वाटत होती…
प्रत्यक्षात न पाहिलेल्या या कथेतल्या नायिका- संग्रामची आई आणि संग्रामची बायको. अंधारातून माणसं जाणवावीत तशा या दोघी कथालेखनातून मला दिसल्या, जाणवल्या. ‘भरपाई’ या मोठ्या कथेतून एक हिस्सा काढून त्याची तयार झालेली ही तसं पाहिलं तर स्वतंत्रच कथा ‘लचका’.

– मधुकर धर्मापुरीकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.