Now Reading
परिपूर्ण

परिपूर्ण

Menaka Prakashan

रात्र होत आली होती. अजून अरविंद आणि सौमित्र आले नव्हते. अरविंदानं उशीर होणार असल्याचा फोन केला होता. सौमित्रचं हे नेहमीचंच झालं होतं आणि नेमकं आज अवंतीला ते दोघं कधी घरी येतील, असं वाटत होतं. काकू येऊन स्वयंपाक करून निघून गेल्या होत्या. त्यामुळे अवंतीला एकटीला घरात करमत नव्हतं. आणि तेही आजच्या दिवशी तर तिला आनंदानं अगदी काय करू आणि काय नको, असं झालं होतं.

अवंती पूर्वी, म्हणजे सौमित्र व्हायच्या आधी चित्रपटांत काम करत होती आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. पण अरविंदाशी लग्न झाल्यावर आपोआप ती चित्रपटसृष्टीतून बाहेर पडली. संसार अन् सौमित्र हेच तिचं विश्‍व बनलं. तिनं चित्रपटांना रामरामच ठोकला आणि आता मात्र तिला खूप सुनंसुनं वाटू लागलं. दोघं त्यांच्या कामात दंग असत, त्यात सौमित्रची अनुष्काशी वाढती जवळीक… त्यावरून त्याच्याशी होणारा अवंतीचा वाद… या सार्‍यांमुळे ती कंटाळली होती. ताण असह्य होत होता.
आत्ताही सौमित्र अनुष्काबरोबरच असणार, तिला खात्री होती. तशी अनुष्का वाईट नव्हती, पण अवंतीच्या सुनेबद्दल ज्या कल्पना होत्या, त्या ढाच्यात बसणारी ती नव्हती. अवंतीही तशी पारंपरिक वळणाची नव्हती, सुनेला मोकळीक देण्याइतपत ती नक्कीच ब्रॉडमाईंडेड होती. पण का को जाणे, अनुष्का सौमित्रसाठी योग्य नाही, असंच तिला वाटायचं. पण आज तरी ती सौमित्रला त्या विषयी काही बोलणार नव्हती. आज तिला स्वतःच्या आनंदावर विरजण पाडून घ्यायचं नव्हतं.
आज तिला राजनचा फोन आला होता.

राजन एकेकाळचा तिचा चित्रपटातला नायक. आणि त्या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीची होती. अवंती चित्रपटांमधून बाहेर गेली, तरी राजन सिनेसृष्टीत काम करतच होता. बरेच चित्रपट त्यानं केले, मग दिग्दर्शक म्हणून आणि आता तो निर्माता म्हणून पदार्पण करणार होता. स्त्रीकेंद्रित चित्रपट तो निर्माण करणार होता आणि नायिकेच्या आईची भूमिका त्यानं अवंतीला ऑफर केली होती. त्यामुळेच अवंती भयंकर खूष होती. ही बातमी फोनवर सांगण्यापेक्षा प्रत्यक्षच सांगावी, असं तिनं ठरवलं.
कंटाळून तिनं टीव्ही बंद केला आणि ती आतल्या खोलीत आली. आरशासमोर उभी राहून ती स्वतःला न्याहाळू लागली. ‘चित्रपट करायचा म्हणजे आता परत ग्रूम करावं लागणार. उद्याच पार्लरची अपॉईंटमेंट घ्यायला हवी. हल्ली तर सोशल मीडियामुळे सर्वत्र आपली जाहिरात होणार, तेव्हा अप टू डेट राहायला हवं. तसं आपण चांगलंच राहतो म्हणा, पण तरीही लक्ष द्यावं लागणार.’
ती विचारात गढलेली असतानाच बेल वाजली.
अरविंद आणि सौमित्र दोघंही आले होते.

‘‘दोघं एकत्र?’’
‘‘हं, खाली पार्किंगमध्ये भेटला सौमित्र. फोनवर बोलत होता. मग एकत्रच आलो वर.’’ अरविंदानं म्हटलं.
‘‘छान!’’ अवंतीला किंचित वैषम्य वाटलंच. ‘आपण इतक्या आतुरतेनं वाट पाहत होतो आणि दोघं आपल्याच नादात आहेत. असो. त्यांना काय ठाऊक?’
ती शांतच राहिली.
दोघं कपडे बदलून आले, तेव्हा तिनं डायनिंग टेबलावर जेवण मांडून ठेवलं आणि त्यांची वाट बघत ती ताटकळत होती.
‘‘काय अवंती, आज काय विशेष?’’ अरविंदानं शर्टच्या बाह्या दुमडत विचारलं. खुर्ची मागे सरकवून तो खुर्चीत बसला.
‘‘का रे? असं का वाटलं तुला?’’ अवंतीनं विचारलं.
‘‘त्याशिवाय जेवणासाठी हा बेत करणार नाही तू?’’ अरविंदानं मार्मिकपणे म्हटलं. सौमित्रनं त्यांच्याकडे बघून दाद दिल्याचा शेरा मारला.
‘‘निरीक्षण छान आहे तुझं! बाय द वे, मला राजनचा फोन आला होता.’’ अवंतीनं एकदाची विषयाला सुरुवात केली.
‘‘काय म्हणतोय राजन? त्याची मुलगी कशी आहे?’’
‘‘चांगली आहे. तो नवीन सिनेमा काढतोय.’’
‘‘छान!’’ अरविंदानं उत्स्फूर्तपणे म्हटलं.
‘‘त्यात त्यानं मला चांगला रोल ऑफर केलाय.’’
‘‘काय सांगतेस? अरे वा!’’ अरविंदानं विचारलं, ‘‘रोल कसा आहे?’’
‘‘उत्तम! सशक्त भूमिका वाटतेय. मी ‘हो’ म्हटलं आहे.’’ मग बोलता बोलता तिच्या लक्षात आलं. सौमित्रचं लक्षच नाहीये. एवढी आपण महत्त्वाची घटना सांगितली, तरी त्याला समजलं नाहीये.
ती अरविंदाशी चर्चा करत होती, पण मन मात्र दुखावलं होतं.

राजनला ती कितीतरी दिवसांनी पाहत होती.
‘‘मला तर इतका मोठा धक्का दिला आहेस तू!’’ ती म्हणाली.
‘‘चांगलाच ना?’’
‘‘अर्थात!’’
तो तिचं स्वागत करत म्हणाला. ‘‘ये… निदान या निमित्तानं माझ्या घरी आलीस तरी. कसा चालला आहे तुमचा बिझनेस?’’
‘‘मी कुठे लक्ष देते त्यात? मी घरीच असते.’’
‘‘कमाल आहे! म्हणजे तू काहीच केलं नाहीस?’’ त्यानं आश्‍चर्यानं विचारलं.
‘‘ये बस…’’ तो तिला बसायला सांगून आत गेला.
इटालियन फ्लोअर, काश्मिरी गालिचे आणि देशाविदेशांतल्या उत्तमोतम वस्तूंनी भरलेला दिवाणखाना त्याच्या श्रीमंतीची साक्ष देत होता.
मराठी चित्रपटात हिरो, हिंदी चित्रपटांमध्ये साईड हिरो, क्वचित नोकरही. पण पैसे मिळताहेत म्हणून हिंदीतल्या भूमिका स्वीकारल्या, म्हणून तर हे ऐश्‍वर्य दिसत होतं. क्षणभर अवंतीला वाटलं, आपण ही संधी गमावली का?
‘पण अरविंदानंही काही कमी पडू दिलं नाही, आपणही काम केलं असतं चित्रपटात, तर आज आपण खूप वरच्या आर्थिक स्तरावर असतो. जाऊदे. हा आपलाच निर्णय होता ना तेव्हा.’ ती मनोमन हळहळली.
राजन लगेच आला.

‘‘महत्त्वाचा फोन होता. बोल, काय म्हणतेस? तुझा होकार मी गृहीत धरला आहे.’’
‘‘होकार तर आहेच रे.’’ अवंती म्हणाली, ‘‘पण तू मला कसं काय निवडलंस?’’
‘‘का कुणास ठाऊक, हे स्क्रिप्ट वाचतानाच तू डोळ्यांसमोर आलीस. आणि आई म्हणजे टिपिकल आईची भूमिका नाहीये. तू वकिलाची भूमिका करते आहेस. तू अन्यायाविरुद्ध लढणार्‍या तुझ्या मुलीला साथ देतेस आणि शेवटी मात्र त्या वकिलाचा खून होतो. आणि ती मुलगी तडफेनं झुंज देते.’’
‘‘ओहो!’’
‘‘तू स्क्रिप्ट वाच, म्हणजे तुला अंदाज येईल.’’ राजननं तिच्याकडे फाईल दिली. तिनं फाईल घेतली आणि पानं चाळू लागली.
‘‘तुला आवडेल हा रोल आणि मग आपण पैशांचं बोलू.’’ राजननं स्पष्ट म्हटलं. त्याचा स्पष्टपणा तिला आवडला.
‘‘ठीक आहे.’’
पद्मा- राजनची बायको- आली.
अवंतीशी ती गोड हसली. दिसायला जशी गोड होती तशीच.
‘‘कशी आहेस?’’
‘‘मी उत्तम.’’
तिच्यापाठोपाठ त्याचा नोकर खाद्यपदार्थांचा ट्रे घेऊन आला.
‘‘नंतर कॉफी आण रघू.’’ पद्मानं म्हटलं.
‘हो’ म्हणून तो गेला.
‘‘तुझी ओळख आहे ना पद्माशी?’’
‘‘हो. आपला शेवटचा चित्रपट होता एकत्र, तेव्हा ती तुला भेटायला यायची ना सेटवर…’’ अवंतीनं म्हटलं.
‘‘तब्बल दहा वर्षं सुरू होतं आमचं डेटिंग!’’
‘‘एवढी वर्षं लागली?’’ अवंती चकित झाली.
‘‘हो, आईला पसंत पडायला दहा वर्षं लागली.’’ राजननं सांगितलं, ‘‘तू हिला बघितलंस, तेव्हा नुसतीच ओळख होती. पण मला माहीत होतं, की पद्माच माझ्यासाठी चांगली बायको आहे. कारण माझ्या कल्पनेत बसणारी होती ती. आणि खरंच तसंच झालं.’’
अवंती अंतर्मुख झाली.
थोड्याफार गप्पा झाल्या आणि अवंती राजनच्या घरून निघाली. सोबत बरेच सारे प्रश्‍न घेऊन…

‘‘सौमित्रऽऽ’’ अवंतीनं त्याला हाक मारली.
‘‘काय गं? किती ओरडतेस?’’ तो कुरकुरत आला.
‘‘आज घरी लवकर ये.’’
‘‘का?’’
‘‘तू नेहमी मोबाईलवरच असतोस, मग एफबीवर बघितलं नाहीस?’’
‘‘काय?’’
‘‘आज तुझ्या बाबांचा वाढदिवस आहे. मी टेबल बुक करून ठेवतेय. आपण बाहेर जायचं आहे.’’ तिनं सांगितलं.
‘‘हो आई, लक्षात आहे माझ्या बाबांचा वाढदिवस आहे ते. पण तू कार्यक्रम ठरवला आहेस ते मला कुठे माहीत आहे?’’ तो म्हणाला, ‘‘म्हणून तर मी विचारलं ना का म्हणून?’’
अवंतीनं सौमित्रकडे एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकला.
‘‘तू अनुष्कामध्ये इतका गुरफटला आहेस, की आम्हाला विसरून चालला आहेस! दरवर्षी आपण असंच करतो ना?’’
‘‘ओहो! पण तू तशीच राहिली नाहीस ना? माझं सगळं म्हणणं तू ऐकून घ्यायचीस, शांतपणे बोलायचीस. आता तू तुझंच म्हणणं खरं करतेस.’’
‘‘काय बोलतोस तू?’’
अवंती खचलीच. अंगातलं त्राण नाहीसं झाल्यासारखं ती सुन्नपणे बेडवर बसली. सौमित्रलाही ते बघून पश्‍चात्ताप झाला. आपल्या बोलण्याचा. तोदेखील मग तिच्या शेजारी बसला.
‘‘काय चुकलं रे माझं?’’ तिनं कळवळून विचारलं, ‘‘तू… तुझ्यासाठी मी माझं करीअर सोडलं. तुला वाढवण्यात काय कसूर झाली माझी…’’
‘‘काही चूक झाली नाही…’’ सौमित्र एवढंच म्हणाला. त्याला म्हणावंसं वाटतं होतं, ‘हे असं सारखं सारखं ऐकवून काय मिळतं आईला? मी थोडंच करीअर करू नको वगैरे सांगितलं होतं.’ पण तो बोलला नाही.
‘‘मग का असं वागतोस?’’
‘‘आई, तू अनुष्काला भेट.’’
‘‘मी भेटलेय तिला…’’
‘‘हो, पण एका भेटीत तू ठरवून मोकळी झालीस. ती स्वभावानं खूप चांगली आहेच. मुख्य म्हणजे आमचं एकमेकांवर प्रेम आहे.’’
‘‘तुला सुंदर मुलगी मिळेल सौमित्र! मी एक चांगली हिरॉईन होते आणि माझी सून अगदी सामान्य रूपाची…’’ तिनं विचारलं.
सौमित्र हतबल झाला.
‘‘मी तरी कुठे देखणा आहे आई? पण आमची मनं जुळली ते खरं नव्हे का?’’ तो उद्विग्नपणे म्हणाला, ‘‘त्याला काहीच महत्त्व नाही का? सुंदर मुलीशी लग्न केलं आणि तिचा स्वभाव चांगला नसला तर?’’
‘‘तू उगीच असा विचार करतोस!’’
‘‘ती खूप चांगली आहे गं. ती अगदी छान सांभाळते घर. शिवाय नोकरी तर करतेच. ती हुशार आहे. म्हटलं तर बाबांचा बिझनेसही सांभाळू शकेल.’’ सौमित्र तिला समजावू पाहत होता.
पण अवंती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. म्हणून शेवटी तो गप्प झाला.
‘‘ठीक आहे.’’ तो उठला, ‘‘मी ऑफिसमधून लवकर येतो.’’
तो निघून गेल्यावर अवंती हताशपणे उठली. मनःस्थिती चांगली नसली, तरी शूटिंगला जावंच लागणार होतं. राजन लवकर रजा देणार होता आज म्हणून ती निर्धास्तपणे गेली. पण मनावर सौमित्रबरोबरच्या वादाचं ओझं होतंच. अवंतीच्या स्वभावामुळे ते स्वाभाविकच होतं.

अरविंदानं गॅसवर चहाचं आधण ठेवलं आणि सौमित्र लॅच उघडून घरात आला.
‘‘या सौमित्रराव! आज माझ्या हातचा चहा घ्या…’’ अरविंदानं त्याला पाहून म्हटलं.
‘‘का? काकू कुठे आहेत? आणि तुम्ही घरी कसे?’’
‘‘अरे, घरी गेल्या त्या. दुपारी घरी चक्कर मारून येतात. आज मी मुद्दाम लवकर घरी आलो.’’ ते म्हणाले.
‘‘आई?’’
‘‘ती शूटिंगला गेली आहे. आता भरपूर बिझी असणार आहे ती. सिनेमा रिलीज होईपर्यंत.’’ अरविंदानं ट्रे तयार करत म्हटलं. ट्रेमध्ये त्यानं कप, बिस्किटं ठेवत चहाची तयारी केली.
‘‘वा! किती वर्षांनी चहा बनवतोय आज. तू ये हातपाय धुऊन!’’
सौमित्र त्याच्या खोलीत जाऊन कपडे बदलून आला. टीशर्ट आणि ट्रॅक पँट घातल्यावर त्याला बरं वाटलं आणि घरात सामसूम आहे तेही बरंय. ‘आपणही असंच लवकर यायला हवं. घरात एकटंच बसावं. खरं म्हणजे असं वाटायल नकोच, पण आई गेले कित्येक दिवस, दिवस काय महिने आपल्याशी नीट बोलतच नाहीये. म्हणून वाटतंय. उलट ती घरी असावी, आपली तिनं प्रेमानं विचारपूस करावी, दिलखुलास गप्पा माराव्या, असंही प्रकर्षानं वाटतं, पण तसंतरी कधी घडतंय?’
तो सोफ्यावर आरामात बसला. अगदी स्वतःला झोकून देत.
‘‘तू आज कसा काय लवकर आलास?’’
‘‘बाबा, कंटाळलो होतो आज ऑफिसमध्ये. अनुष्का पण नाहीये. ती तिच्या भावाच्या लग्नाला गेली आहे गावाला. मग काय, सगळे मित्र त्यांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये. मग म्हटलं घरी यावं. आईचा रागरंग बघावा. चांगला नसेल, तर परत बाहेर जावं. बाहेरचीही कामं आहेतच की!’’
‘‘हे असं काय म्हणतो आहेस?’’ अरविंदानं त्याला चहाचा कप देत म्हटलं, ‘‘त्या दिवशीही मी तुला समजावलं होतं. आईचा रागरंग वगैरे काय?’’
‘‘बाबा, तुम्ही आईशी कोणत्या कारणासाठी लग्न केलंत?’’ सौमित्रनं म्हटलं, ‘‘तुम्हाला दुसरी कुणी हिरॉईन, तिला दुसरा कुणी बिझनेसमन आवडला असता तर?’’
‘‘तुझं काहीतरीच!’’ अरविंदानं तो प्रश्‍न झटकून टाकत म्हटलं, ‘‘असं कसं म्हणतोस तू?’’ शेवटी एकमेकांना पसंत पडलो आणि वाटलं ना, की आम्ही संसार करू शकू.’’
‘‘म्हणजे नक्कीच काहीतरी खात्री होती म्हणून आणि आईनं काम का सोडलं?’’
तो आता सगळंच शंकानिरसन करून घेत होता.
‘‘तेव्हाचा काळ तसा होता रे. हिरॉईननं लग्न केलं, की तिच्याकडे येणार्‍या कामाचा ओघ थांबतोच. आईच्या, बहिणीच्या वगैरे दुय्यम भूमिका मिळतात. शिवाय तू झालास. तुला सोडून तिला जावंसं वाटेना. तेव्हापासूनच ती तुझ्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह असावी.’’
‘‘दॅट्स इट! ती पझेसिव्ह आहे म्हणून माझ्या लग्नाला ती ‘नाही’ म्हणतेय.’’
‘‘चुकतोस तू! तुझ्या लग्नाला ती कशाला ‘नाही’ म्हणेल? ती अनुष्काला ‘नाही’ म्हणतेय.’’
‘‘मला शोभेची बाहुली नकोय ना बाबा!’’ सौमित्र उखडून म्हणाला, ‘‘मला चारचौघांत मिरवण्यासाठी कचकड्याची देखणी बायको नकोय! मला जोडीदार हवी आहे. आणि अनुष्का मला तशी आहे.’’
अरविंद क्षणभर शांत राहिले आणि मंद स्मित करत म्हणाले, ‘‘छान! मला आवडलं. तू तुझ्या मतावर ठाम आहेस बघून मला बरं वाटलं.’’
‘‘आय अ‍ॅम सॉरी. बाबा, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं.’’
‘‘म्हणजे मी तसं, त्या कारणासाठी लग्न केलं, असं म्हणायचंय?’’
‘‘नाही.’’
‘‘मीही तुझ्या बोलण्यातून तो अर्थ काढलाय, असं वाटून घेऊ नकोस.’’ अरविंद म्हणाले. ‘‘अवंतीचा स्वभाव मला आवडला आणि आईलाही ती आवडायची. असो. मी तुझा प्रश्‍न समजू शकतो. त्रास करून घेऊ नकोस.’’
तितक्यात बेल वाजली.
संतोष आला होता. संतोष अरविंदाचा साहाय्यक.
‘‘सर, सह्या हव्या होत्या अर्जंट म्हणून…’’ तो म्हणाला.
‘‘ओके! ये.’’ अरविंदानं म्हटलं आणि सौैमित्रकडे बघून ते म्हणाले, ‘‘तू कुठे जाऊ नकोस. काकूंना सांग येऊ नका. आपण दोघं बाहेर जेवायला जाणार आहोत.’’
‘‘आई?’’
‘‘ती बाहेरून जेवून येणार. हॉटेलमध्येच आहे तिचा कार्यक्रम.’’
‘‘बरं…’’ त्यानं म्हटलं.
अरविंदानं संतोषनं आणलेल्या फाईलमध्ये लक्ष घातलं आणि लॅपटॉप सुरू करून चेक करू लागला.

‘‘तर अवंती, आज तू फक्त झोपून राहणार तर!’’ राजन हसून म्हणाला.
‘‘हो, पण कुठे?’’ तिला उत्सुकता वाटली.
‘‘अगं, जयप्रकाशनं सीन लिहिलाय काल. तू इथे या…’’ त्यानं आजूबाजूला बघितलं आणि मग तो तिथल्या मुलाला म्हणाला, ‘‘ते बांबूू जोडले का रे? जोड जा लवकर. शॉट सुरू होईल मग जाग येईल तुम्हाला.’’
मग तो अवंतीला म्हणाला, ‘‘सरणावर झोपून राहायचं. मग मेघनाचा लाँग शॉट आहे. डायलॉग बराच मोठा आहे. तेव्हा बराच वेळ लागेल.’’
‘‘पण इथे सरणावर?’’
‘‘हो, तुला तसं पाहून ती बदलते. टर्निंग पॉईंट यू नो? सिनेमाचा क्लायमॅक्स असणार आहे हा.’’ राजन म्हणाला.
‘‘अच्छा! म्हणून माझी भूमिका महत्त्वाची आहे आहे का?’’ ती खट्याळपणे म्हणाली.
तोही हसला. ‘‘छान! इतकी चांगली भूमिका देऊन किती कौतुक करतेस?’’
‘‘हां हां! चला, आज आराम करायचे पैसे मिळणार तर!’’
‘‘हं…’’ त्यानं तिला टपली मारत म्हटलं. ‘‘तयार होऊन ये लगेच…’’
ती मेकअपदादांसमोर बसली.
सेट लावून होईपर्यंत ती तयार झाली.
अ‍ॅक्शनची घोषणा झाली आणि शॉट सुरू झाला.
जखमी अवस्थेत मृत झालेली अशा स्थितीत अवंती सरणावर झोपून होती. हालचाल न करता, मंद श्‍वास… डोळे बंद…
मेघना ग्लिसरीनच्या साहाय्यानं रडत होती. आवेशपूर्ण भाषण सुरू व्हायला वेळ होता… मोठं दृश्य घ्यायचं असल्यामुळे अवंतीला बराच वेळ पडून राहायचं होतं. काही वेळानं ती शवासनात गेली.
अवंतीला हळूहळू तंद्री लागली.

आजूबाजूचं वातावरण विसरून ती आत्मविश्‍वात मग्न झाली.
तिला क्षणभर वाटलं, ‘खरंच आपण आता उरलोच नाही आहोत. आपला मृत्यू झाला तर? कधी ना कधी होणारच. आज ना उद्या… आपल्याला मग जाळतील.’
तिच्या अंगावर शहारा आला.
‘या निगा राखलेल्या शरीराची राख होईल. चिमूटभर राख.
आणि हा आत्मा, त्याला मुक्ती मिळेल? म्हणजे काय कुणास ठाऊक? सिनेमात काम करतो, म्हणून आपली प्रतिमा लोकांच्या लक्षात राहील, पण शंभर-दोनशे वर्षांनी? किंवा या सृष्टीचाच अंत झाल्यावर? कोण आपण? कोण अरविंद? कोण सौमित्र? सगळंच नश्‍वर. पुढच्या जन्मी एकमेकांशी संबंधच राहणार नाही कदाचित! सात जन्म, किंवा जन्मोजन्मी हाच नवरा असू दे म्हणतात, किंवा तसं असलं, तर अरविंदाशी असेल पण सौमित्र? आणि सौमित्रच्या पुढच्या जन्मी आपण नसू. मग कोण? अनुष्का? की कोेण?
आणि खरंच आत्ताच मेलो तर? सौमित्रचं लग्न अनुष्काशीच होणार. तो तिच्याशीच लग्न करणार!’
ती हडबडली…
‘की आपण मेलो, आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तो तिच्याशी लग्न नाही करणार? शक्यता नाहीच. आणि आपणच शिल्लक नाही राहिलो, तर आपली इच्छा तरी कुठे असणार? त्याला अर्थच नाही आणि नंतर सौमित्र आईनं विरोध केला म्हणून नाराज असणार. अनुष्काही. दोघांच्या मनात माझ्याविषयी किल्मिष राहणार…
सुंदर शरीर असो वा कुरूप, मेल्यावर त्याची राख होणार. ते जाळल्यावर, किंवा पुरल्यावर ते मातीतच मिसळणार. मग काय? खूप पूर्वी कोण कसं दिसायचं माहीतही नाही. महाराणी पद्मिनी, मस्तानी प्रत्यक्षात कशा सुंदर होत्या? मग सौंदर्याला महत्त्व का? आपणही हा हट्ट सोडून दिला तर? तर सौमित्र खूष होईल. तो खूष तर आपण खूष!
बाईचंही अवघडच असतं. तिला एखादा पुरुष आवडला, तर दुसर्‍याबरोबर ती कशी एकरूप होईल आणि अनुष्का चांगली असेल, तर आपल्यामागे ती सौमित्रकडे नीट लक्ष देईल… हं… आपण ‘हो’ म्हटलं तर?
कदाचित एकत्र राहू, नाहीतर वेगळे राहू. हल्ली एकत्र राहतच नाही कुणी, पण सौमित्र दुरावणार नाही ना?
अनुष्काबरोबर तो जास्त आनंदी राहील.
‘हो’ म्हटलं, तर तो आपल्यावरचा राग विसरेलही.
ती तशी सुंदर नाही, पण वाईटही नाही. स्वभावानं, कर्तृत्वानं हुशार आहे. चांगली आहे, खूप देखणी नसली तरी. कुणीही परिपूर्ण नसतं.’
तिचं मन हळूहळू गुंत्यातून मोकळं होत चाललं होतं आणि एका टप्प्यावर तिनं निर्णय घेऊन टाकला. अनुष्का आणि सौमित्रच्या लग्नाला संमती देण्याचा…
एकीकडे मेघना आणि सहकार्‍यांचं काम झालं होतं.
राजन तिला उठवायला आला. जाग आलेली अवंती मनमोकळं हसली. सिनेमाचं शूट पूर्ण झालं होतंच, पण अवंतीचं मनही आनंदानं काठोकाठ भरून परिपूर्ण झालं होतं.

– श्‍वेता कुलकर्णी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.