Now Reading
परंपरा आणि नवता

परंपरा आणि नवता

Menaka Prakashan

पारंपरिक गोड पदार्थ

पुरणपोळी
साहित्य : अर्धा किलो हरभराडाळ, अर्धा किलो गूळ किंवा (पाव किलो गूळ व पाव किलो साखर), वेलची, एक टी स्पून जायफळपूड, चिमूटभर मीठ.
पोळीसाठी : दीड वाटी कणीक बारीक चाळणीनं चाळून, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी तेल, लाटण्यासाठी पिठी, चिमूटभर हळद.
कृती : हरभर्‍याची डाळ निवडून धुऊन स्वच्छ करावी आणि मऊ शिजवून घ्यावी. पुरणाची डाळ शक्यतो साधीच (कुकर नको) शिजवावी. नंतर चाळणीवर ओतून घेऊन निथळावी. डाळ चांगली निथळली की त्यात गूळ व साखर घालावी. जाड बुडाच्या पातेल्या शिजवावं. गूळ आधी पातळ होईल, पण मग आळत जाऊन डाळीत उलथनं उभं राहिलं की गॅस बंद करावा. हे पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमध्ये बारीक करावं/वाटून घ्यावं. त्यातच वेलची ,जायफळ घालावं.
नंतर कणीक भिजवताना आधी नेहमीच्या कणकेप्रमाणे कणीक-मैदा-मीठ-मोहन घालून कणीक भिजवावी. चिमूटभर हळदही घालावी. नंतर परातीत तेल आणि पाणी घालून अगदी पातळसर अशी कणीक तिंबून घ्यावी. वर-खाली ओढली तर तुटत नाही, तार येते.
आता हातावर पिठी घेऊन या कणकेचा लहान गोळा घ्यावा. त्याचा वाटीच्या आकाराचा खोल उंडा करावा. त्यात मावेल तेवढं पुरण घालून वरून तोंड बंद करावं. पिठीत बुडवून हलक्या हातानं पातळ लाटावं. नाॉनस्टिक किंवा बिडाच्या तव्यावर पोळ्या भाजाव्या. एका बाजूला गुलाबी ठिपके आले की उलटून दुसरी बाजू वर टाकावी. वरून तूप लावावं. पोळी उगीच फार वेळ उलटू नये. एक पोळी झाल्यावर तवा पुसून दुसरी पोळी टाकावी.

गुळाची पोळी
साहित्य : अर्धा किलो गूळ, अर्धी वाटी हरभराडाळीचं पीठ, अर्धी वाटी वनस्पती किंवा साजूक तूप, एक टे. स्पून तीळ, एक टे. स्पून खसखस आणि एक टे. स्पून सुकं खोबरं हे तिन्ही भाजून, प्रत्येकी अर्धा टी स्पून वेलदोडे व जायफळ पावडर.
पोळीसाठी : दोन वाट्या कणीक, एक वाटी मैदा, एक टे. स्पून हरभराडाळीचं पीठ, एक टे. स्पून तेलाचं मोहन, अर्धा टी स्पून मीठ, चिमूटभर हळद, लाटण्यासाठी पिठी.
कृती : गुळाचे मोठे मोठे तुकडे करून घ्यावे आणि एका हिंडालियमच्या जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात टाकावे. त्यावर दीड चमचा पाणी टाकून गॅसवर ठेवावं. गॅस बारीक ठेवून गूळ पातळ होईपर्यंत हलवावं. दुसर्‍या एका कढईत तूप टाकून त्यात डाळीचं पीठ भाजून घ्यावं. मंद गॅसवर खरपूस भाजावं. तूप पिठापेक्षा जास्त असू द्यावं. हे पीठ पिठल्याइतपत पातळ असलं पाहिजे. खसखस, तीळ, खोबरं भाजून मिक्सरमध्ये त्याची जास्तीत जास्त बारीक पूड करावी (पेंड झाली तरी चालेल). गरम पिठातच गूळ, खसखसपूड, वेलचीपूड वगैरे घालून नीट कालवावं. गूळ पातळ दिसला तरी घाबरायचं कारण नाही. पंधरा मिनिटांत तो आळून येतो. अगदी पुरणाप्रमाणे मऊ होतो.
नंतर कणीक-डाळीचं पीठ-मोहन-मैदा असं सगळं एकत्र करून मऊ भिजवावं. सैल नको. कणीक मळून मळून मऊ करावी.
पोळ्या करायच्या वेळी कणकेच्या लहान लहान दोन गोळ्या घेऊन हातानं पार्‍या कराव्या. त्यात मधे गोळीएवढीच गुळाची पारी ठेवावी व वरून खालूनच्या कणकेच्या पार्‍या कडा दाबून बंद कराव्या. पोळ्या तांदळाच्या पिठावर हलक्या हातानं लाटाव्या. जितक्या पातळ असतील तेवढ्या उत्तम! पण गूळ बाहेर न येण्याची खबरदारी घ्यावी.
महत्त्वाचं म्हणजे गुळाच्या पोळ्या नेहमी नॉनस्टिक तव्यावर भाजाव्या म्हणजे गूळ बाहेर आला तरी पोळ्या चिकटत नाहीत. या पोळ्या फार वेळा उलट्यापालट्या पण करू नये. गॅसवर एक बाजू खरपूस गुलाबी झाली की उलटून दुसरी बाजू भाजून घ्यावी. भाजलेल्या पोळ्या टेबलावर/ओट्यावर वर्तमानपत्र पसरून त्यावर पसरून ठेवाव्या आणि पूर्ण गार झाल्यावर मगच डब्यात भराव्या म्हणजे मऊ होत नाहीत. नेहमी या पोळ्या दोन-चार तास आधीच करून ठेवाव्या. या अर्धा किलोच्या प्रमाणात साधारणपणे वीस ते बावीस पोळ्या होतात.

खव्याची पोळी
साहित्य : पाव किलो खवा, तीन वाट्या साखर, पाऊण वाटी तांदूळपिठी, एक टी स्पून वेलची-जायफळपूड, दीड वाटी कणीक, दीट वाटी मैदा, एक वाटी दूध, अर्धा टे. स्पून चागलं तूप.
कृती : प्रथम साखर मिक्सरमध्ये बारीक करावी व मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यावी. तांदळाची पिठी अर्धा चमचा तुपावर रंग न बदलता मंद आचेवर भाजावी. खवा मोडून घेऊन भरपूस भाजावा. तूप सुटलं पाहिजे. गार झाल्यावर पिठी व साखर घालून मऊ मळावा.
मैदा व कणकेत मिठाची चिमूट घालून दूध व लागेल तसं पाणी घालून मऊ भिजवावी. नंतर खव्याच्या लिंबाएवढ्या गोळ्या कराव्या. तेवढ्याच कणकेच्या पण कराव्या.
पोळी करताना कणकेच्या गोळ्याच्या दोन पार्‍या करून मधे खव्याची पारी घालून बंद कराव्या. मैदा किंवा तांदूळपिठीवर पातळ लाटाव्या. मध्यम आचेवर भाजाव्या. शक्यतो नॉनस्टिक तव्यावर पोळ्या भाजाव्या.

पारंपरिक भात

नारळी भात
साहित्य : दोन वाट्या खवलेला नारळ, दोन वाट्या बासमती तांदूळ, चार वाट्या चिरलेला गूळ, पाव वाटी तूप, पाव वाटी काजू तुकडा, एक टी स्पून वेलची+जायफळ पावडर, चार लवंगा, चार वेलदोडे, चिमूटभर मीठ.
कृती : खवलेला नारळ (कोरडाच) मिक्सरमध्ये जरा फिरवावा. मग तीन वाट्या पाणी एका पातेल्यात घालून त्यात तो टाकावा. थोड्या वेळानं चाळणीवर ओतून पाणी व चव वेगळे करावे. तांदूळ धुऊन अर्धा तास दुसर्‍या चाळणीमध्ये ठेवावे. मग जाड बुडाच्या कढई/कुकर/पातेल्यात तूप घालून ते गरम झाल्यावर वेलची व लवंग टाकावी. तांदूळ परतावे. काजू परतावे व मग त्यात नारळाचं पाणी व मीठ टाकून भात शिजायला ठेवावा. शीत अर्धवट शिजलं की त्यात नारळाचा चव घालून हलके हलवत मिसळावं आणि पुन्हा झाकण घालून मंद आचेवर भात शिजवावा.
भात शिजला की जरा मोकळा करावा. वाफ गेल्यावर थोडा गरम असतानाच त्यात गूळ मिसळून पुन्हा मंद गॅसवर ठेवावा. गूळ पाघळून भात मोकळा झाल्यावर उतरवावा. मधून मधून झाकण ठेवावं. वरून वेलची-जायफळ पावडर घालावी आणि सारखा करावा.

जयपुरी मीठा पुलाव
साहित्य : प्रत्येकी पाव वाटी काजू व बदाम काप, एक वाटी अंगूर, मूठभर बेदाणे, दोन वाट्या बासमती तांदूळ, दीड वाटी साखरपिठी, अर्धी वाटी तयार गुलाबजाम कुस्करून, एक डाव तूप, दोन लवंगा, दोन वेलची, चिमूटभर मीठ, दहा-बारा केशराच्या काड्या, एक टे. स्पून लिंबूरस, दीड कप नारळाचं दूध.
कृती : तुपावर लवंगा व वेलची टाकून तडतडू द्यावं. त्यावर बेदाणे व काजू बदाम काप परतावे. दरम्यान तांदूळ धुऊन त्याला लिंबूरस लावून ठेवावा. हा धुतलेला तांदूळ त्या तुपावर चांगला परतावा आणि त्यात मीठ व नारळाचं दूध घालून मंद आचेवर शिजू द्यावा. भात बोटचेपा शिजला की मग उतरवून परातीत उपसावा आणि त्यात अंगूर, साखर, गुलाबजाम चुरा मिसळावा आणि पुन्हा एकदा जाड कढईत घालून परतावा. केशर चुरून पसरावं. हवं तर कडेनं चमचाभर तूप सोडावं.

सॅलड

सॉमटॉम
थोड्या चमचमीत, झणझणीत चवीचं असं एक सॅलड म्हणजे सॉमटॉम. हे थायलंडमधलं अत्यंत लोकप्रिय असं सॅलड आहे.
साहित्य : तीन कप कच्च्या पपईचे मोठे तुकडे, तीन टी स्पून भाजून सोललेले शेंगदाणे, पाच लसूणपाकळ्या, तीन लाल मिरच्या, पाच चेरी टोमॅटो (न मिळाल्यास एक मोठा टोमॅटो बिया काढून चिरावा), तीन टी स्पून लिंबूरस, एक टी स्पून साखर, दोन टी स्पून लाईट सोयासॉस, एक टी स्पून मीठ, एक कप लांब कापलेला कोबी.
कृती : पपईची साल काढून पातळ लांबीत कापावी (धागे वाटावीत अशी). मिरच्यांच्या बिया काढून तुकडे थोडा वेळ पाण्यात भिजवून मग लसूण-मिरची भरड वाटून पपईला चोळावी. त्यातच टोमॅटोचे तुकडे (चेरी टोमॅटोचे चार-चार तुकडे करून), शेंगदाणे, कोबी घालावा. मग लिंबूरस, सोयासॉस, मीठ व साखर घालून खायला द्यावं. (थायी चिकट भाताबरोबर हे देतात.)

ब्रोकोली इन मस्टर्ड ड्रेसिंग
साहित्य : तीन कप भरून ब्रोकोलीचे छोटे छोटे तुरे, थोडं मीठ, अर्धा टे. स्पून ऑलिव्ह ऑईल (नसल्यास रिफाईंड), एक टे. स्पून लिंबाचा रस, एक टे. स्पून व्हिनेगर, एक टी स्पून मोहरी.
कृती : ब्रोकोलीचे तुरे पाण्यात मीठ घालून अर्धा तास ठेवावे. नंतर निथळून वाफवावे. दरम्यान तेल, मीठ, व्हिनेगर, लिंबूरस, थोडं मीठ हे सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये वाटावं आणि ते तुर्‍यावर घालून नीट मिसळून सर्व्ह करावं.

कोकोनट सॅलड
साहित्य : साधारण एक कप अर्ध्या नारळाचं दूध काढून, एक टे. स्पून मैदा, एक टे. स्पून रिफाईंड, अर्धा कप ओल्या नारळाचा चव, एक कप वाफवलेल्या भाज्या (सीझनप्रमाणे असतील तशा – मटार, गाजर, फ्लॉवर, कोबी, फरसबी, बटाटे यांपैकी), अर्ध्या सफरचंदाची सालं काढून चिरून, असल्यास अर्धी वाटी अननस, अर्धा कप साय, अर्धा टे. स्पून साखर, पाव टे. स्पून मीठ, अर्धा टी स्पून मिरेपूड.
कृती : तेलावर मैदा हलके हलके परतावा. रंग बदलता कामा नये. त्यात नारळाचं दूध टाकून हलवत राहावं. कस्टर्डप्रमाणे घट्ट असा व्हाईट सॉस तयार करावा. त्यात मीठ, मिरेपूड घालून फ्रिजमध्ये थंड करून ठेवावं. आयत्या वेळी इतर सगळ्या भाज्या/ फळं, साय व साखर वगैरे एकत्र करून त्यावर हा व्हाईट सॉस घालून व्यवस्थित कालवावं. त्यावर सजावटीसाठी कोथिंबीर, चेरी लावावी.

दहीबुंदी
साहित्य : एक वाटी खारी बुंदी (तयार बाजारात मिळते), एक लहान कांदा बारीक चिरून, मूठभर चिरलेली कोथिंबीर, एक वाटी दही, पाव टी स्पून मीठ, पाव टी स्पून साखर.
कृती : दही घुसळून घेऊन त्यात बुंदीखेरीज सर्व पदार्थ कालवावे. अगदी जेवायच्या वेळी त्यात बुंदी मिसळावी. नीट कालवावी. (बुंदी आधीच घातली तर फार गिजगा होतो, मऊ पडते.)

भाज्या

मसूरडाळ
साहित्य : दोन वाट्या मसूरडाळ, एक मोठा कांदा, मीठ, हळद, पाच हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, अर्धा टी स्पून धणेपूड, चवीला थोडा गूळ, फोडणीसाठी तेल, मोहरी, बडीशेप, हिंग.
कृती : डाळ दोन तास भिजवावी. कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरच्या उभ्या चिराव्या. नंतर फोडणीसाठी तेल टाकून त्यात मोहरी, हिंग, बडीशेप टाकावी. हळद घालावी. मग कांदा टाकून परतावा. कोथिंबीर घालावी. त्यावर डाळ घालून परतावी. मीठ, गूळ घालून हलवावी. वाफ आणावी. मग पुन्हा झाकण काढून त्यात धणेपूड घालावी व परतावं. डाळ शिजल्यावर उतरवावी.

मटारची कढी
साहित्य : अर्धा किलो मटारचे दाणे, एक तुकडा आलं, दोन-तीन हिरव्या मिरच्या, दोन वाट्या दही, एक टी स्पून लाल तिखट, हळद, एक टे. स्पून साजूक तूप, एक टी स्पून जिरं, एक टी स्पून आमचूर, दोन टे. स्पून मुगाची डाळ, मीठ, दोन-तीन लाल मिरच्या.
कृती : मटारचे दाणे धुऊन मिक्सरमध्ये आलं, मिरच्यांबरोबर जाडसर वाटावे. दह्याचं ताक करावं. त्यामध्ये वाटलेलं मटार मिश्रण, तिखट, हळद, आमचूर पावडर, मीठ घालावं. दुसर्‍या भांड्यात तुपाची फोडणी करून त्यामध्ये जिरं लालसर भाजावं. पाणी टाकून डाळ शिजवावी. किंवा डाळ भिजवून वाटून फोडणीवर टाकावी. डाळ शिजल्यावर त्यावर मटार-ताक मिश्रण ओतावं. उकळी येऊ द्यावी. झाकण ठेवावं. शेवटी राहिलेल्या तुपाची फोडणी करून त्यावर लाल मिरच्यांचे तुकडे टाकून कढीला वरून फोडणी द्यावी. जेवताना एकजीव करून गरम भाताबरोबर कढी वाढावी.
भरली कोबी
साहित्य : हिरवागार ताजा कोबी (गड्ड्याचे प्रत्येक पान वेगळे करून पानं स्वच्छ धुवावी. मीठ घातलेल्या उकळ्त्या पाण्यामध्ये नंतर बाहेर काढून ठेवावी).
आतलं सारण : तीन उकडलेले बटाटे कुस्करून, एक टी स्पून लसूणपेस्ट, लोणी, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, पुदिना, कोथिंबीर बारीक चिरून, एक टी स्पून चाट मसाला, एक टी स्पून लिंबूरस, कढीलिंब, मीठ.
कृती : थोड्या तेलावर हिंग-मोहरीची फोडणी वरून त्यावर बटाट्याच्या फोडी चांगल्या परताव्या. इतर सर्व साहित्य घालून एक चमचा लोणी घालावं. आवडत असल्यास किसलेलं चीज घालून भाजीमध्ये लिंबूरस घालून थंड होण्यासाठी ठेवावी. नंतर प्रत्येक पानामध्ये भाजीचं मिश्रण भरून पानाची गुंडाळी करून वरून लवंग खोचावी. अशा सर्व पानांच्या गुंडाळ्या कराव्या. हिंग-मोहरीची फोडणी कढीलिंब घालून तयार ठेवावी. गुंडाळीचे तुकडे करून त्यावर फोडणी घालावी किंवा हलके गरम करावी.

भरले टोमॅटो (वेगळा प्रकार)
साहित्य : अर्धा किलो घट्ट व लालबुंद टोमॅटो, दहा-बारा लसूणपाकळ्या, एक इंच आलं, एक टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून गरम मसाला, एक वाटी पनीर, दोन कांदे, पाव वाटी काजूचे तुकडे, पाव वाटी बेदाणे, पाव वाटी टोमॅटो सॉस, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, अर्धा टी स्पून लवंग-दालचिनी व वेलचीची पूड , दोन टे. स्पून तेल, थोडी घोटलेली मलई, चवीनुसार मीठ.
कृती : आलं, लसूण व कांदे बारीक चिरावे. तेल तापवून त्यावर कांदा, आलं-लसूण हे परतावं. लालसर झाल्यावर तिखट, गरम मसाला, काजूचे तुकडे व बेदाणे घालावे. पनीर कुस्करून घालावं. चांगलं परतून टोमॅटो सॉस घालावा. कोंथिबीरही घालावी. टोमॅटोची वरची चकती कापून त्यातला गर पोखरून काढावा व तोही पनीरमध्ये मिसळावा. नंतर हे मिश्रण कोरडं करून टोमॅटोमध्ये भरावं. मलई व लवंग-दालचिनीची पूड एकत्र घोटून ती थोडी-थोडी सारणावर घालावी आणि वर चकत्या पूर्ववत लावून टोमॅटो ओव्हनमध्ये पंधरा मिनिटं बेक करावे.

आलू-पालक
साहित्य : तीन मोठे बटाटे, दोन जुड्या पालक, एक टी स्पून आलं-लसूण-हिरव्या मिरच्यांची पेस्ट, पाव टी स्पून हळद, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, एक कपभर दूध, एक टी स्पून कॉर्नफ्लोअर, एक टी स्पून गरम मसाला, तेल, थोडं लोणी.
कृती : पालक निवडून धुऊन अगदी बारीक वाटावा. बटाट्याच्या लहान लहान चौकोनी फोडी कराव्या. तेलावर गुलाबी करून हळद व आलं-लसूण-मिरच्यांची पेस्ट परतावी. बटाटे व मीठ घालून अंगच्या वाफेवर शिजवावं. नंतर पालक व थोडं दूध घालून पालक मऊ शिजवावा. गरम मसाला व चवीनुसार मीठ घालावं. उरलेल्या दुधात कॉर्नफ्लोअर मिसळून ते घालून भाजी दाटसर होईपर्यंत शिजवावी. वाढताना थोडं लोणी घालावं.

मेथीची भाजी
साहित्य : एक जुडी मेथी, एक जुडी पालक, एक टी स्पून धणेपूड, एक टी स्पून बडीशेपपूड, एक टी स्पून आलं-मिरची-कोथिंबीरपेस्ट, अर्धा कप गोड घट्ट दही, एक टी स्पून मसाला, अर्धा टी स्पून तिखट, तूप किंवा लोणी.
कृती : दोन्ही भाज्या निवडून स्वच्छ धुऊन घ्याव्या. अगदी बारीक चिराव्या. पॅनमध्ये तूप किंवा लोणी घालून त्यात जिरं-हिंगाची फोडणी करावी. त्यावर दोन्ही भाज्या घालाव्या. थोडा वेळ परतून त्यात वरील सर्व मसाला घालून पुन्हा परताव्या. जरा शिजत आल्यावर घट्ट दही घालावं. खायला देताना वरून थोडंसं लोणी घालावं.

भोपळा रस्सा
साहित्य : अर्धा किलो लाल भोपळा, एक टी स्पून गरम मसाला, एक टी स्पून साखर, लिंबाएवढी चिंच, अर्धा टी स्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ व साखर, तेल, फोडणीचं साहित्य.
कृती : कढईत तेल घालून हिंग-जिर्‍याची फोडणी करावी. त्यावर भोपळ्याच्या मोठ्या फोडी घालून थोडा वेळ परताव्या. त्यात दोन कप पाणी घालून वरील सर्व मसाला घालून उकळी आली की चिंचेचा कोळ व चवीपुरती साखर घालून पुन्हा उकळी आणावी आणि खाली उतरवावा.

अक्रोडची उसळ
साहित्य : एक वाटी ओल्या अक्रोडचे तुकडे, एक वाटी हिरवे वाटाणे, एक वाटी शिजवलेले मक्याचे दाणे, अर्धा टी स्पून गरम मसाला, अर्धी वाटी साजूक तूप, अर्धा टी स्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट, अर्धा टी स्पून आलंपेस्ट, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार साखर व मीठ.
कृती : पॅनमध्ये लोणी घालून त्यावर हिरव्या मिरचीची फोडणी करावी. त्यात अक्रोडचे तुकडे व वाफवलेले वाटाणे तसंच मक्याचे दाणे घालून थोडा वेळ परतावं. खमंग वास आला की त्यात वरील इतर मसाले घालून एकत्र करावं. झाकण ठेवून थोडा वेळ वाफ येण्यास ठेवावं. शेवटी मीठ, साखर मिसळावी. वरून लिंबू पिळावं व खोबरं, कोथिंबीर पसरून उसळ खायला द्यावी.

तुरीच्या डाळीची कोफ्ता करी
साहित्य : एक कप तूरडाळ, दहा-बारा लाल मिरच्या, किंचित हिंग, मीठ.
ग्रेव्हीकरता : आठ-दहा हिरव्या मिरच्या, अर्धा कप नारळाचं खोबरं, एक इंच आलं, एक टी स्पून जिरं, प्रत्येकी पाव टी स्पून धणे, मेथीदाणे, एक टी स्पून हरभराडाळ.
कृती : डाळ एक तास भिजत घालून त्यात लाल मिरची, मीठ व हिंग घालून रवाळ वाटून घ्यावी. गरम केलात त्याचे भज्यांप्रमाणे गोल गोटे तळून घ्यावे. वरील वाटलेला मसाला दह्यात कालवून त्यात अर्धा कप पाणी घालावं. त्यात हळद, मीठ व कढीलिंब घालावा. वरील मिश्रण गॅसवर ठेवून उकळू द्यावं. दुधाप्रमाणे वर येऊ लागलं की खाली उतरवून त्यात वरील डाळीचे गोटे घालावे आणि वरून त्याला मोहरी-हिंगाची झणझणीत फोडणी द्यावी.

भात, पुलाव, बिर्याणी

भाताचे तिखट प्रकार
काळा/मसाले भात
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, अर्धी वाटी दही, दोन टी स्पून काळा (गोडा) मसाला, चार हिरव्या मिरच्या, मूठभर काजू तुकडा, अर्धा टी स्पून किसलेलं आलं, पाच-सात कढीलिंबाची पानं, एक टी स्पून धणे-जिरं पावडर, अर्धा टी स्पून गरम मसाला, अडीच टी स्पून मीठ, दीड टी स्पून गूळ किंवा साखर, फोडणीचं साहित्य, मूठभर कोथिंबीर.
कृती : तांदूळ धुऊन त्यावर घुसळलेलं दही ओतून ठेवावं. नंतर पातेल्यात/कुकरमध्ये (डायरेक्ट) डावभर तेल घेऊन जिरं, मोहरी, हिंग, कढीलिंब, मिरच्या, हळद घालून फोडणी करावी. त्यातच आलं व काजू परतावे. त्यावर दहीवाले तांदूळ परतावे. त्यात मीठ, साखर, मसाले घालून धणे-जिरं पावडर घालून जरा पतरावं. तीन वाट्या पाणी घालावं व उकळी आल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर भात शिजू द्यावा. दहा मिनिटांनी पाणी आटत आल्यावर एकदा कालथ्याच्या दांड्यानं ढवळून पुन्हा झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवावा. वाढताना खोबरं, कोथिंबीर पेरावी.

काबुलीचणा पुलाव
साहित्य : आपण पिंडी छोले केलेत त्याप्रमाणे करून दोन कप घ्यावे (भाजी प्रकारात पाहावे), दोन कप बासमती तांदूळ, अर्धा टी स्पून शहाजिरं, तीन लवंगा, दोन तुकडे दालचिनी, एक मोठी वेलची, एक तमालपत्र, एक टी स्पून मीठ, चार टी स्पून तूप, तळलेला कांदा.
कृती : तांदूळ धुऊन निथळावे. मग पातेल्यात तूप गरम करावं. अख्खे मसाले टाकावे. तांदूळ टाकून परतावं. चार कप पाणी व मीठ घालून शिजवावे. शिजल्यावर अर्धा भात काढावा. मध्ये पिंडी छोले पसरावेत व वरून उरलेला भात पसरावा. घट्ट झाकणी लावून वाफेत पंधरा-वीस मिनिटं शिजू द्यावे. वरून तळलेला कांदा भुरभुरावा.

एट ज्युवेल राईस
साहित्य : एक कप तांदळाचा मोकळा भात करून घ्यावा. त्यात प्रत्येकी अर्धी वाटी – शिजवलेलं मटण, शिजवलेले खेकड्याचं मटण, शिजलेली कोलंबी, शिजलेले चिकनचे बोनलेस तुकडे, वाफवलेले मटारचे, मश्रुम चिरून घ्यावं. शिवाय दोन अंडी उकडून मोठे मोठे तुकडे करून घ्यावी, दोन टी स्पून सोयासॉस, दोन टी स्पून चिली गार्लिक सॉस, तेल, मीठ व पार्सली आणि कांदापात.
कृती : शिजलेला भात गार करून मोकळा करावा. कढईत तेलावर मटण परतावं. मग कांदा व पात घालावी. मग मश्रुम, मटार, चिकन, उरलेलं मटण घालावं. सॉस, मीठ, साखर घालावी. त्यावरती भात परतावा व पार्सली घालून सर्व्ह करावा.

हिरवा चटपटीत पुलाव
साहित्य : दोन वाट्या बासमती तांदूळ किंवा कुठलाही लांब तांदूळ, पंधरा-सोळा पालकाची पानं + मूठभर कोथिंबीर + चार-पाच लसूण पाकळ्या + चार हिरव्या मिरच्या यांचं वाटण, दोन टी स्पून मीठ, एक टी स्पून साखर, अर्धा टी स्पून शहाजिरं, तीन-चार लवंगा, दोन तमालपत्रं, दोन-तीन दालचिनीच्या काड्या, एक लहानसा कांदा बारीक चिरून, अर्धं लिंबू, दोन टे. स्पून वनस्पती/ चांगलं तूप/ रिफाइंड.
कृती : तांदूळ धुऊन निथळून घ्यावेत. त्याला लिंबू चोळून ठेवावं. आता डायरेक कुकरमध्येच दोन टे. स्पू तेल/तूप/ वनस्पती घालावं. तापल्यावर शहाजिरं, लवंग, दालचिनी, तमालपत्र वगैरे टाकून जरा परतावं. त्यावरच कांदा टाकून तो गुलाबी रंगावर परतावा. आता त्यावर वाटण टाकून (हिरवं) तेही दोन-तीन मिनिटं परतावं. आता तांदूळ टाकून तेही परतावे. तूप सगळीकडे लागलं पाहिजे. दोन-तीन मिनिटं परतल्यानंतर त्यात चार वाट्या पाणी घालून त्यात मीठ व साखर टाकावी. (पाण्याचं प्रमाण तांदळावर ठरवावं. तांदूळ जुने असल्यास पाणी जास्त लागेल.) मीठ, साखर जरा ढवळून घेऊन झाकण लावावं आणि मंद गॅस ठेवून नेहमीच्या भाताप्रमाणे शिट्ट्या कराव्या. वाढताना त्यावर खोबरं खवून घालावं.

झटपट पुलाव
साहित्य : दीड वाट्या भरून मोठे मोठे तुकडे केलेल्या भाज्या – मटार, फ्लॉवर, गाजर, श्रावणघेवडा, डबलबी, बटाटा, पनीर, टोमॅटो यांपैकी असतील त्या, एक कांदा बारीक चिरून, दोन वाट्या बासमती किंवा दिल्ली राईस, अर्धी वाटी रिफाइंड किंवा वनस्पती किंवा चांगलं तूप, एक टी स्पून तयार गरम मसाला (किंवा वेलदोडे, दोन-तीन लवंगा, एक-दोन दालचिनी, दोन-तीन मिरे, चिमूटभर शहाजिरे आणि दोन तमालपत्र), दीड टी स्पून मीठ, एक टी स्पून साखर.
कृती : कुकर किंवा फ्रायपॅनमध्ये (खालची जाळीची ताटली काढून टाकून) वनस्पती/ तूप टाकावं. तापल्यावर त्यात कांदा टाकून गुलाबीसर परतावा. परतत असतानाच गरम मसाला पावडर किंवा अख्खा त्यात टाकावा आणि परतत राहावं. भाज्या चिरून धुऊन घ्याव्यात व त्या ह्यावर टाकून परताव्यात. धुतलेले तांदूळपण दोन-तीन मिनिटं परतावेत. आता त्यात साडेचार वाट्या पाणी, मीठ, साखर घालून चांगलं ढवळावं आणि नेहमीच्या भाताप्रमाणे मंद गॅस ठेवून त्यावर दोन किंवा तीन शिट्ट्या कराव्या. शिट्ट्यांचं प्रमाणे ज्याच्या त्याच्या कुकरवर अवलंबून आहे. तांदूळ न मोडता सुरेख मोकळा भात होतो.

वांगी भात/तोंडली भात (जरा वेगळा प्रकार)
साहित्य : पाव किलो वांगी/तोंडली, एक मोठा कांदा, मूठभर कोथिंबीर, तीन मिरच्या, चार लसूण पाकळ्या, मूठभर ओलं खोबरं, एक टी स्पून धने पावडर, एक टी स्पून जिरे पावडर, अर्धा टी स्पून गरम मसाला, एका लिंबाचा रस, दोन वाट्या तांदूळ, दोन टी स्पून मीठ, एक टी स्पून साखर, एक डाव तेल, फोडणीसाठी – हळद, मोहरी व जिरं.
कृती : तांदूळ धुऊन त्याला लिंबाचा रस चोळून ठेवावा. तोंडली/वांगी धुऊन देठं काढून, प्रत्येकी चार उभे तुकडे करावे. कुकरमध्ये तेल टाकून त्यात हे तुकडे परतून बाजूला ठेवावे. कांदा, खोबरं, मिरच्या, कोथिंबीर, लसूण सगळं एकत्र वाटावं. आता उरलेल्या तेलात जिरं-मोहरीची फोडणी करून हळद घालावी. त्यावर ही वाटणाची गोळी परतावी. त्यावर तांदूळ परतावे. त्यात चार वाट्या पाणी घालून उकळी आणावी. त्यातच मीठ, साखर, मसाले घालावे. परतलेली वांगी/तोंडली घालावी. झाकण लावून मंद आचेवर दहा-बारा मिनिटं शिजवावं. मग कालथ्याच्या दांड्यानं एकदा हलवून परत झाकण लावून पाच मिनिटं मंद आचेवर शिजू द्यावा.

गोडाचे पदार्थ -1

मोदक
श्रीगणेशाच्या आगमनाबरोबरच वेध लागतात ते मखरं, तोरणं, नवी गाणी, उत्सवी वातावरण आणि अर्थातच मिष्टान्नाचे. त्यातही ‘मोदकां’चे. हे मोदक परंपरेनं अनेक घरांत तळलेले/उकडीचे, गुळाचे, साखरेचे, पंचखाद्याचे असे थोड्याफार फरकानं होतच असतात. त्यातही काही वेगळेपणा/ नवी पद्धत ट्राय करायला काय हरकत आहे? हे जरा वेगवेगळे मोदक.

झटपट मोदक (पिठी नसतानाही करता येतात)
साहित्य : एक वाटी पाणी, एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी ओलं खोबरं खवून, पाव वाटी गूळ, एक टी स्पून साखर, अर्धा टे. स्पून तेल, पाव टी स्पून मीठ, वेलची व बेदाणे.
कृती : एक वाटी पाण्यात तांदूळ भिजत घालावे. साधारण दोन-अडीच तासांनी त्या पाण्यासह मिक्सरमध्ये वाटावे. त्या वाटलेल्या पेस्टमध्ये मीठ व तेल घालावं. एका नॉनस्टिक भांड्यात ओतून झाकून मिश्रण शिजवावं. मिश्रण पारदर्शक झाल्यावर उकड झाली. ती गरमच मळावी. दरम्यान गूळ, साखर एकत्र करून त्यात खोबरं घालून कढईत गरम करावं. गूळ विरघळला की गॅस बंद करून वेलची, बेदाणे, काजू घालावे. सारण गार होऊ द्यावं.
उकडीचा लिंबाएवढा गोळा घेऊन पारी करून, एक-दीड चमचा चमचा सारण घालून मोदक करावे. इडली/मोदकपात्रात उकडावे.

ज्वारीच्या पिठाच्या उकडीचे मोदक
जोंधळे धुऊन वाळवून दळावे. मैद्याच्या चाळणीनं पिठी चाळावी आणि एक वाटी ज्वारीच्या पिठाला एक टे. स्पून कॉर्नफ्लोअर मिसळावं. नेहमीसारखी उकड काढावी. उत्तम होतात. असेच वर्‍याचे, मैद्याचे मोदक होतात.

आंब्याचे मोदक
साहित्य : एक वाटी पिठी, अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी आंब्याचा रस, थोडं तूप, मीठ.
सारणासाठी साहित्य : आंब्याच्या बर्फीचे दोन तुकडे किंवा अर्धी वाटी आंब्याचा मावा, अर्धी वाटी नारळ आणि पाव वाटी साखर एकत्र गरम करून सारण करावं.
कृती : आंब्याचा रस, पाणी, तूप, मीठ हे एकत्र करून उकळावं आणि त्यात पिठी घालून ढवळून मंद आचेवर दोन वाफा आणाव्या. मग मळून त्यात सारण भरून नेहमीप्रमाणे उकडीचे मोदक करावे. रंग व स्वाद फार छान येतो.

काजूचे मोदक
साहित्य : पाव किलो काजू, पाव किलो साखर, एक टे. स्पून कॉर्नफ्लोअर, दीड टी स्पून तूप, अर्धा टी स्पून वेलची पावडर.
कृती : काजू अर्धा तास पाण्यात भिजवावे. साखर मिक्सरमध्ये दळून घ्यावी. अर्ध्या तासानं काजू चाळणीवर निथळत ठेवावे. पूर्ण निथळल्यावर पंचावर ओतून पुसावे व मिक्सरमध्ये वाटावे. त्यातच साखर, वेलदोडेपूड सुद्धा घालावी व वाटावं. मग एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून घोटावं आणि मोदकाच्या साच्यात गोळ्या करून घालाव्या व मोदक करावे. सजवायचं असल्यास साच्यात तळाला दुधाचा मसाला/ केशरपूड/ पिस्ता-बदाम काप काहीही घालावं.

– जयश्री कुबेर, पुणे
मोबाईल : 9975067067
jayashree.kuber@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.