Now Reading
पप्पा

पप्पा

Menaka Prakashan

नेहमीप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता मी दारावरची बेल दाबली. ऑफिसमधून येण्याची ही रोजचीच वेळ. ज्योतीनं दार उघडलं अन् आत येतो न येतो तोच टिनू आतल्या खोलीतून धावत आला आणि अक्षरश: उडी मारून गळ्यात पडला. टिनूचा हा नेहमीचाच प्रकार. गळ्यात पडून मला त्यानं घट्ट मिठी मारली. जोपर्यंत मी त्याचे लाड करत नाही, तो मिठी सोडत नाही. मग टिनूचे खूप लाड करत त्याची खूप सारी पप्पी घेतली, तेव्हा तो अंगापासून वेगळा झाला. टिनू माझ्या अंगापासून वेगळा झाल्यावर बघतो, तर पप्पा हॉलमध्येच बसलेले होते आणि आम्हा दोघांकडे एकटक बघत होते. मी त्यांच्याकडे बघताच त्यांनी मान वळवळी. ऑफिसची बॅग अजून तशीच पाठीवर होती. बॅग खाली घेऊन तिच्यातला डबा ज्योतीकडे देत मी परत पप्पांकडे बघितलं. पप्पा आता खिडकीबाहेर नजर खिळवून होते. कसल्या तरी विचारात हरवल्यासारखे ते बाहेर बघत होते. माझ्याकडे आणि टिनूकडे बघताना पप्पांच्या चेहर्‍यावर विलक्षण भाव होते. अशा प्रकारचे भाव पप्पांच्या चेहर्‍यावर उभ्या आयुष्यात बघितले नव्हते. आताआतापर्यंत आम्ही पप्पांच्या नजरेशी नजर भिडवण्याची हिंमत करत नव्हतो. चुकूनही त्यांच्या नजरेशी नजर भिडली, तरी हात-पाय गार पडत. आज त्याच नजरेत एक विलक्षण करुणा होती. खूप प्रेम होतं. काहीतरी विलक्षणच होतं त्या नजरेत. पप्पांना कधीच असं बघितलं नव्हतं.
पप्पा अजूनही खिडकीबाहेर बघत होते.

‘‘बरं झालं, तुम्ही हॉलमध्ये येऊन बसलात.’’
पप्पांच्या बाजूला बसत मी पप्पांची तंद्री मोडली. माझ्या बोलण्यानं ते एकदम भानावर आल्यासारखे झाले.
‘‘कसला विचार करताहात पप्पा?’’
‘‘अरे, आलास तू?’’ माझ्या प्रश्‍नाला टाळण्यासाठी हा पप्पांचा प्रश्‍न लक्षात आला माझ्या.
‘‘हो, आत्ताच आलो, तुमच्या समोरच.’’
‘‘अरे हां, बघितलं. टिनू येऊन बिलगला होता तुला. किती जीव लावतो रे टिनू तुला, कशी माया करतो तुझ्यावर!’’ पप्पांच्या चेहर्‍यावर आतासुद्धा तसेच विलक्षण भाव होते. आज पप्पा काही वेगळेच जाणवत होते. त्यांना अशा प्रकारे बोलतानाही आम्ही कधीच बघितलं नव्हतं. पप्पा आणि असं भावनात्मक बोलणं हे समीकरण कधीच जुळलं नव्हतं.
‘‘ओरडत जाऊ नकोस रे त्याच्यावर, लहान आहे अजून तो. आणि मारत तर अजिबात जाऊ नकोस. काल तू खूप जोरात ओरडलास त्याच्यावर, परिणाम होतो असा मुलांवर…’’
टिनू जितका मायाळू आहे, तितकाच बदमाश पण!
काल ज्योतीनं अनेकदा जेवणासाठी बोलावूनही हा पलंगावरून उठत नव्हता. तसाच मोबाईल खेळत बसला होता. मी त्याला बोलवायला गेल्यावर माझ्यावर जोरात खेकसला,
‘‘थांब ना पप्पा पाच मिनिटं! दिसत नाही का मी गेम खेळतोय?’’ बर्‍याच वेळचा दाबून ठेवलेल्या माझ्या रागावरचा ताबा टिनूच्या या खेकसण्यानं सुटला. रागावरचा ताबा सुटला, की मी खूप आक्रमक होतो आणि माझं रौद्र रूप समोर येतं. मग टिनूच्या अंगावर धावून जाऊन, त्याला हाताला पकडून फरफटत जेवणाच्या टेबलाकडे नेलं आणि खूप जोरात त्याच्यावर ओरडलो.

‘‘मम्मी किती वेळा तुला हाका मारतेय. ऐकू येत नाही का? मोबाईल खेळायचा नाही, सांगितलंय ना तुला? मग लक्षात ठेवता येत नाही?’’
माझा आवाज वाढतच होता. रागाचा पारा चढतच होता. एका हातानं टिनूचे दोन्ही गाल पकडून त्यांना दाबत होतो, तेवढ्यात ज्योती आणि मम्मी मधे आल्या आणि त्यांनी मला टिनूपासून लांब केलं. मी चिडलो, की खूप अक्राळविक्राळ रूप धारण करतो. कधीकधी घडतो हा प्रकार टिनू आणि वेधावर.
आरडाओरडीचा हा प्रकार होऊन तासभर झाला असेल. मी टीव्ही बघत बसलो होतो. टिनूशी बोलणं बंद केलं होतं. मी रागावलेला असलो, की टिनू खूप अस्वस्थ राहतो. मग आता माझा राग घालवण्यासाठी त्याचं माझ्या आजूबाजूला गोंडा घोळणं सुरू झालं. मी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागलो. मुद्दाम माझ्या आणि टीव्हीच्या मधून जाणं-येणं करत माझं लक्ष वेधून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. माझ्या दुर्लक्ष करण्यानं तो अजून बेचैन झाला. माझं सगळं लक्ष टीव्हीकडे. आता मात्र तो बरोबर माझ्या आणि टीव्हीच्या मधे येऊन उभा राहिला. मान वाकडी करून टीव्ही बघण्याचा मी प्रयत्न करू लागलो, पण तो परत नवीन मार्गावरही अडथळा बनून उभा राहिला. तशाच गंभीर चेहर्‍यानं, अतिशय गंभीर स्वरात मी त्याला म्हटलं, ‘‘बाजूला हो.’’
‘‘मी नाही होणार बाजूला, अगोदर तू हस.’’
‘‘तू आमचं काहीच ऐकत नाहीस. मी नाही हसणार.’’

‘‘ऐकतो ना पप्पा. आजच नाही ऐकलं आणि ऐकेन यापुढे. तू हस ना, हस ना, हस ना…’’ असं म्हणत तो पोटाला गुदगुल्या करायला लागला. क्षणात माझ्या चेहर्‍यावरचा गंभीरपणाचा मुखवटा गळून पडला आणि ओठांनी हसरी कमान उभी केली. मी हसायचा अवकाश, की टिनू लगेच गळ्यात पडला आणि मला घट्ट मिठी मारली. मी नाराज असलो, की त्याला अजिबात चैन पडत नाही. जोपर्यंत मी नॉर्मल होत नाही, तो शांत बसू शकत नाही.
मी त्याच्यावर कितीही ओरडलेला असलो, रागावलेला असलो, मारलेलं असलं, तरी तो अबोला नाही धरत. उलट मी नाराज असतो म्हणून तो अस्वस्थ, बेचैन असतो. आणि प्रत्येक वेळेला मला असाच हसवायचा प्रयत्न करतो. माझा राग, माझी नाराजी घालवण्याचा प्रयत्न करतो.

‘‘चल, आत जाऊया.’’ पप्पांनी मम्मीला बोलावताच मी भानावर आलो. मम्मीचा आधार घेत पप्पा आतल्या खोलीत निघून गेले. पप्पा-मम्मी राहायला औरंगाबादला. तिथे स्वत:चा बंगला. स्वत:च्या घरात स्वतंत्रपणे मनमुराद आयुष्य जगावं, या त्यांच्या इच्छेनं ते स्वत:च्या घरात स्वतंत्र वास्तव्य करून होते. तिघाही मुलांकडे जाऊन परत आपल्या घरी. मे महिन्यात औरंगाबादमध्ये सूर्य आग ओकायला लागला, की जमिनीतलं पाणीही आटून जाई. बोअरचं पाणी बंद झालं, की पाण्याची तीव्र टंचाई सुरू होई. आणि मग मम्मी-पप्पांचा मुक्काम आमच्याकडे ठाण्यात स्थलांतरित होई. जानेवारीमध्ये पप्पांना कॅन्सर असल्याचं निदान झालं. सर्व डॉक्टरमित्रांशी चर्चा झाल्यावर उपचार मुंबईत करायचं ठरलं आणि मम्मी-पप्पा माझ्या घरी ठाण्यात आले.

‘पप्पांना कॅन्सर’ हे समीकरणच पटण्यापलीकडचं होतं. सहा फूट उंच, मजबूत शरीरयष्टी, करारी आवाज, बघताचक्षणी समोरच्याच्या मनात धडकी भरावी असं भारदस्त व्यक्तिमत्त्व. पप्पा विद्यापीठात प्राध्यापक होते आणि त्यांचा विद्यापीठात दरारा होता. पप्पा घरात असले म्हणजे घरातला पाहुणा पण दबकत दबकतच बोले. पप्पा घरात असताना आम्ही कधी हिंदी सिनेमाचं गाणंसुद्धा टेपरेकॉर्डरवर लावत नसू. पप्पा घरात नसतानाच गाणं लागायचं, पप्पांची स्कूटर घराच्या गेटसमोर दिसली, की इकडे गाणं बंद व्हायचं. मी पप्पांसोबत दोनतीन वेळा त्यांच्या विद्यापीठाच्या सहलीला गेलो आहे. विद्यार्थ्यांसोबतचं त्यांचं नातं मला विलक्षण आवडे. विद्यार्थ्यांवर त्यांचा तसाच धाक, परंतु तरीदेखील सर्व विद्यार्थ्यांचे आवडते आणि सगळ्या विद्यार्थ्यांकडून आदरही तेवढाच.
वेगळ्याच मातीचे बनलेले होते. कॅन्सर झाल्याचं कळाल्यावरही मी त्यांना आजाराशी हार पत्करलेलं नाही बघितलं. संपूर्ण आजारपणात कधीही त्यांच्या तोंडातून हताशेचं वाक्य मी ऐकलं नाही.

पप्पा कितीही कडक वागत असले, तरी माझ्या उभ्या आयुष्यात मी कधीच त्यांना हताश, लाचार होताना नाही बघितलं. जे आयुष्य ते जगले, ते खूप स्वच्छंद! त्यांनी कधीही कुणाचीच फसवणूक केली नाही. कुणालाच दुखावलं नाही. कित्येक वेळा मी त्यांना गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करताना बघितलं आहे.
कॅन्सरमुळे सहा महिने पप्पा माझ्याकडे होते, पण एका मिनिटासाठी देखील आम्हाला वाटलं नाही, की घरात कॅन्सरचा पेशंट आहे. वाढत जाणार्‍या आजारानं त्यांची खाण्याची इच्छा संपवून टाकली होती आणि तेच एक कारण असायचं, की आम्ही त्यांना खाण्याचा आग्रह करायचो आणि ते विरोध.
एक मात्र खरं, की उभ्या आयुष्यात ज्या बापाला वाघासारखं वावरताना बघितलं, त्याच बापाला जर्जर आजारानं ग्रासलेलं बघतानाच्या वेदना शब्दांत मांडणं अशक्यच.
‘‘काय विचार करताय एवढा?’’
ज्योतीच्या प्रश्‍नानं मी एकदम शुद्धीवर आलो. पप्पांच्या विचारांमध्ये एकदम हरवलो होतो मी.
‘‘काही नाही गं, असंच.’’ माझं उत्तर.
अचानक आठवलं, म्हणून लगेच ज्योतीला विचारलं.
‘‘अगं, संध्याकाळी मी ऑफिसमधून आलो आणि मी आणि टिनू एकमेकांना बिलगून होतो, तेव्हा तू पप्पांना बघितलंस का?’’
‘‘हो रे, मला पण संध्याकाळपासून सारखं तेच मनात येतंय, पप्पा असं का बघत असावेत तुम्हा दोघांकडे?’’
‘‘मला असं वाटतंय, की तुम्ही तिघं भाऊ लहान असतानाचे दिवस आठवले असतील पप्पांना.’’

याच विचारांसोबत मला माझं टिनूसोबतचं आणि वेधासोबतचं वागणं आठवलं. मी मुलांसोबत खूप मित्रासारखा वागतो. टिनू आणि वेधा मला कधीच ‘अहो जाहो’ करत नाहीत. मला ते दोघंही नेहमी ‘अरे कारे’ करूनच संबोधतात. मी मुलांसोबत इतका मित्रासारखा राहतो, की टिनू अक्षरश: माझ्या सुटलेल्या पोटाकडे बोट दाखवत मला ‘ऐ जाडीयाँ’ असा आवाज देतो. टिनू आणि वेधा माझ्यासोबत हवं तसे वागतात. कधी माझ्या केसांना हेअर क्लिप्स लावतात, कधी मला टिकली लावतात, कधी लिपस्टिक, कधी काजळ, सगळे प्रकार करतात आणि मग माझा फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅप फॅमिली ग्रुपवर टाकतात.
खरंच टिनू आज जसा माझ्याशी वागतो, तसा मी पप्पांशी वागू शकलो असतो का? माझ्या मनात हा विचार चमकला. टिनू जसा मला ‘जाडीयाँ’ म्हणतो, तसा मी कधी माझ्या पप्पांना ‘ऐ जाडीयाँ’ असं म्हणू शकलो असतो का? बापरे! नुसत्या विचारानं मनात थरकाप होतो. मी आणि पप्पांना असं बोलणं? अशक्य! आणि चुकून बोललोही असतो, तरी माझ्या अशा बोलण्यावर पप्पांनी काय केलं असतं माहीत नाही. अरे हो! पण पप्पासुद्धा माझ्यावर कधीच रागावले नाहीत. हात उगारणंं तर दूरच, पप्पा कधीच माझ्यावर जोरानं ओरडले पण नाहीत. या विचारानं माझी विचारांची दिशाच बदलून टाकली. खरंच! पप्पांचा धाक कायम होता, पण पप्पा कधीच ओरडले नाहीत, जोरानं मारलं तर कधीच नाही. तरी मी त्यांना किती घाबरून होतो. याउलट मी टिनूवर किती ओरडतो, रागावतो, मारतो, पण तरी तो रोज मी ऑफिसमधून आल्यावर अंगाला बिलगतो. मी नाराज असेन, त्याच्याशी अबोला असेल, तर खूप लाडीगोडी लावतो. बापरे! किती हा विरोधाभास. टिनूला कितीही रागावलो, मारलं, तरी तो राग न धरता मला मनवायला आजूबाजूला घोटाळतो आणि शेवटी मला घट्ट मिठी मारूनच सोडतो. म्हणजे आजपर्यंत माझ्या आणि मुलांमधल्या खेळीमेळीच्या वातावरणाचं श्रेय मी जे मला स्वत:ला देऊन घेत होतो, ते खरंतर वास्तविक कारण नाहीये. खरं कारण तर टिनूचं वागणं आहे. तो माझ्याशी सर्व रागवारागवीनंतर पण दूर राहू शकत नाही. मला आता मीच कुठेतरी चुकल्यासारखं वाटू लागलं. मी पण टिनूसारखं पप्पांच्या धाकाकडे दुर्लक्ष करत त्यांच्याशी खेळीमेळीनं राहिलो असतो तर? रोज ते विद्यापीठातून आल्यावर मी त्यांना जाऊन बिलगलो असतो तर… अरे यार! का नाही वागलो मी असा? मी असा वागलो असतो, तर घरातलं वातावरणच बदललेलं राहिलं असतं. धाकमय वातावरणाऐवजी गमतीदार वातावरण राहिलं असतं घरात आणि पप्पांसोबत पण किती मित्रत्वाच नातं राहिलं असतं.

जिथे मला स्वत:ला मुलांसोबतच्या खेळकर नात्याचा अभिमान वाटत होता. अचानक मनातल्या विचारानं एक बेजबाबदार मुलगा असल्याची भावना मनात येऊ लागली. अशीच विचारांची धारा सुरू असताना अचानक मनात एक विचार चमकला. या विचारानं मी खाडकन जागा झाल्यासारखा झालो, डोळे मोठे झाले, तोंड आऽऽ करून उघडं पडल्यासारखं झालं. संध्याकाळी पप्पांना असं तर नसेल वाटलं ना, की मी कधीच असा टिनू येऊन बिलगतो, तसा त्यांना बिलगलो नाही. बापरे! असा विचार पप्पा करत असतील, तर किती वाईट वाटत असेल त्यांना. आयुष्याचे काहीच दिवस उरले आहेत हे माहीत असलेल्या व्यक्तीला हे असे जिवाभावाचे, प्रेमाचे क्षण सर्वात मोलाचे वाटत असणार.
‘‘पप्पांना असं वाटत असेल का गं, की मी त्यांच्याशी टिनूसारखा नाही राहू शकलो कधीच?’’ ज्योतीला म्हणाले.
‘‘तू जो विचार करतोयस विनित, तो अगदी बरोबर आहे. पप्पांच्या मनात संध्याकाळी तुला वाटतो तसा विचार येत असेलही, किंवा नसेलही, परंतु तुला आज जे वाटतंय, की तू पप्पांना लहानपणी बिलगू शकला नाहीस, ते तू आत्ता करू शकतोस.’’
‘‘काय! आत्ता?’’ मी मोठ्ठा ‘आ’ वासत ज्योतीकडे बघत होतो.
‘‘हो, आत्ता!’’
‘‘काही पण बोलतेस तू ज्योती. लहानपणापासून तशी सवय असती, तर ते शक्य होतं. आता मी पप्पांना कसा जाऊन बिलगू? कशी मिठी मारू?’’
‘‘हे बघ विनित, तुझ्या मनानं स्वत: तुला सांगितलं आहे, की तू पप्पांना अशी मिठी मारायला पाहिजे होती. तुला स्वत:ला वाटतंय, की पप्पा असा विचार करत असतील, की ‘हा टिनूसारखा का नाही वागला माझ्याशी?’ अजूनही वेळ गेलेली नाही. तू लहानपणी जे करू नाही शकलास, ते आज करू शकतोस. पण एकदा का वेळ निघून गेली, की मग तुझी किती पण इच्छा झाली, तरी ती पूर्ण होणं अशक्य आहे. जा, आत्ता जा आणि जाऊन पप्पांच्या छातीवर डोकं ठेवून घट्ट मिठी मार त्यांना.’’

ज्योतीचं सगळं बोलणं पटत होतं, पण पप्पांचा हात कधी हातातही घेतला नाही. त्यांना जाऊन मिठी मारायची कशी?
‘‘जा विनित, आत्ता जा तू पप्पांच्या रूममध्ये,’’ असं म्हणत तिनं अक्षरश: मला पप्पांच्या रूमकडे ढकललं. रात्री झोपण्याच्या अगोदर असाच मी रोज मम्मी-पप्पांसोबत थोडा वेळ त्यांच्या रूममध्ये घालवून, गप्पा करून मगच झोपायला जात असे. मी पप्पांच्या रूममध्ये आलो. आज मनात विचित्र कालवाकालव सुरू होती. मम्मी पेपर वाचत खुर्चीत बसली होती. पप्पा अंथरुणात नेहमीसारखे वर छताकडे बघत पडले होते. मी आत आल्यावर त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्यांच्या रूममध्ये आलो, की मी सरळ त्यांच्या बाजूला जाऊन लोळत असे. तसाच आजही त्यांच्या बाजूला जाऊन पडलो, पण मनात खूप काही विचार. माझा चेहरा बघून पप्पांनी काहीतरी गडबड असल्याचं ओळखलं. ‘‘काय झालं? एवढा शांत का?’’
‘‘काही नाही, असंच. औषध घेतलं तुम्ही?’’
‘‘आत्ताच औषध दिलं.’’ मम्मीनं सांगितलं.

पप्पा बाथरूमसाठी उठले, की त्यांना जाऊन बिलगूया, असा विचार केला. झोपण्याअगोदर बाथरूममध्ये जाण्याचा त्यांचा नेहमीचा ठरलेला नित्यक्रम. मी विचार केला आणि त्यांनी मम्मीला ‘बाथरूममध्ये घेऊन चल’ म्हणून सांगितलं. अशामध्ये ते एकटे चालूच शकत नव्हते. प्रत्येक क्षणी मम्मी सोबत असायची. मी आणि मम्मीनं त्यांना उठवलं. मम्मी त्यांना बाथरूमला घेऊन गेली. मी बाहेर थांबलो. बाथरूममधून आल्यावर त्यांना घट्ट मिठी मारावी, मनाशीच ठरवलं. पप्पा बाथरूममधून बाहेर आले, मी त्यांच्या दिशेनं सरसावलो. तोच पप्पा म्हणाले,
‘‘जा, जाऊन झोप. खूप थकलेला दिसतोस आज.’’
मी त्यांच्या जवळपर्यंत गेलो, पण मिठीत जाण्याचं धाडसच नाही करू शकलो. खाली वाकून त्यांच्या पाया पडलो आणि रूमच्या बाहेर पडलो. माझ्या वागण्याचं मम्मी-पप्पांना नक्कीच नवल वाटलं असणार. आमच्या रूममध्ये जाऊन ज्योतीला काय घडलं ते सांगितलं.
‘‘काही हरकत नाही. उद्या सकाळी ऑफिसला जाण्याअगोदर त्यांच्या मिठीत जा, मग जा ऑफिसला. झोप आता. सकाळी तुला लवकर उठायचं असतं.’’ ज्योतीनं दिवे मालवले. मी उघड्या डोळ्यांनी अंथरुणात पडून होतो.

रात्रभर डोळ्याला डोळा नाही. सकाळी केव्हातरी झोप लागली. सकाळी ज्योती मला उठवत होती. ‘‘ऊठ, तुला ऑफिसला उशीर होईल.’’ उठून मी ब्रश करून अंघोळीची तयारी करत होतो. ज्योती रूममध्ये आली. ‘‘मला माहीत आहे, तू रात्रभर झोपला नाहीस. संपूर्ण रात्र तू एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर होत होतास. हे बघ विनित, आज जर तू संकोच केलास, तर आयुष्यभर हे ओझं मनात घेऊन तुला जगावं लागेल आणि पप्पांना पण शेवटपर्यंत त्यांना मुलांचं प्रेम मिळालं नाही, असं वाटेल. पप्पांनी ही अतृप्त इच्छा घेऊन या जगातून जावं, असं वाटतं का तुला?’’
मी फक्त मानेनं ‘नाही’ केलं.
‘‘मग जा आणि तुझ्या मनातलं वादळ पप्पांच्या मिठीत शांत कर. तुझ्या मनात लागलेली आग पप्पांच्या मिठीतच विझू शकते, नाहीतर आयुष्यभर ही धग धगधगत राहील. तुझ्या मिठीत जाण्यानं पप्पांना पण किती आनंद होईल, सुख मिळेल. तो पण विचार कर ना.’’

ज्योतीचं बोलणं तंतोतंत पटत होतं. मन खूप पक्कं केलं पप्पांच्या मिठीत जाण्याचं. अंघोळ करून पप्पांच्या रूममध्ये जायचं मनातच ठरवलं. अंघोळ करून ऑफिसचे कपडे घालून मग ज्योतीकडे बघितलं. तिनं मानेनंच पप्पांच्या रूममध्ये जाण्याचा इशारा केला. ऑफिसला जाण्याअगोदर पप्पांना सांगून जाणं हा नित्यक्रम, पण ज्योतीनं मानेनं जे सांगायचं होतं ते कळालं होतं मला. पप्पांच्या रूमचा दरवाजा उघडून मी आत गेलो. पप्पांच्या औषधांची तयारी मम्मी करत होती. पप्पा अंथरुणात पडून होते. रोडावलेलं पप्पांचं शरीर बघितलं, की हृदयात एक चमक निघत असे. पप्पांना असं बघून त्यांना बिलगून खूप रडावंसं वाटत होतं. पप्पांच्या बेडजवळ गेलो. आता छातीला बिलगून जावं, असं वाटत होतं. पण मनातला संकोच पुन्हा पूर्ण ताकदीनं सर्व विचारांवर विजय मिळवत होता. जवळ जाऊन ‘येतो मी’ म्हटलं पप्पांना, त्यांनी मान डोलवली. माझी पावलं रूमच्या बाहेरच्या दिशेनं पडू लागली. कालपासूनचे सगळे विचार मला ‘मागे वळ आणि जाऊन पप्पांना घट्ट मिठी मार’ सांगत होते. त्याच्याच सोबत मनातला संकोच या सगळ्या विचारांवर मात करत माझं एक-एक पाऊल रूमच्या बाहेर नेत होता. मी बाहेर आलो. ज्योती बाहेर माझी वाटच बघत होती. आमची नजरानजर झाली. मी नकारार्थी मान हलवत काही न बोलता ऑफिससाठी निघून गेलो. ऑफिसमध्ये कामाच्या व्यापातही विचारांना आराम नव्हता. दुपारच्या जेवणानंतर खुर्चीवर थोडा निवांत बसलो, तर पुन्हा विचार आक्रमक झाले. लहानपणी परीक्षेत कमी मार्क्स मिळाले होते. तेव्हा प्रगतिपुस्तक पप्पांना दाखवावं लागेल, या विचारानं शरीराचा थरकाप उडाला होता. पण पप्पा कधीच कमी मार्कांसाठी रागावले नव्हते. पप्पांच्या खूप सार्‍या जुन्या आठवणींमध्ये मन हरवून गेलं. त्यांच्या सोबत फिरायला गेलेले दिवस आठवले. त्यांना गमावण्याची भीती खूप त्रास देत होती. उद्या ते आपल्यात राहतील की नाही, या विचारानं डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरू झाल्या. ऑफिसमध्ये कुणाची नजर पडू नये, म्हणून कसंबसं स्वत:ला सावरून पुन्हा कामाला सुरुवात केली.

ऑफिसमधून निघायला आज सहा वाजले, रोजच्यापेक्षा उशीरच झाला. ऑफिसला आमचं जाणं-येणं कार पूलनं. आज माझी कार नव्हती. मी मागच्या सीटवर जाऊन बसलो. मन उदास उदासच होतं. कारनं हेलकावे खायला सुरुवात केल्यावर आपोआप माझी मान मागे झुकली आणि डोकं सीटला टेकवून डोळे बंद केले. रात्रभर झोप नसल्यानं केव्हा मी गाढ झोपेत गेलो कळलंच नाही. झोपेत मला लहानपणचा मी दिसू लागलो. शाळेतून मी घरी येत होतो. खूप आनंद दिसत होता माझ्या चेहर्‍यावर, एका हातात प्रगतिपुस्तक होतं. ब्लॅक अँड व्हाईटमधलं ते दृश्य होतं, आठवी-नववीतलं असावं. मी घराजवळ पोचताच आनंदानं उड्या मारत मारत मी घरात जातो. घरात हॉलमध्ये मम्मी-पप्पा दोघं बसलेले असतात. मी मम्मीला प्रगतिपुस्तक दाखवतो. ती खूप खूष होते. पप्पांना सगळे मार्क्स वाचून दाखवते. पप्पा मार्क्स ऐकून खूप खूष होऊन म्हणतात, ‘वा रे माझ्या पठ्ठ्या! ये इकडे माझ्या मिठीत,’ असं म्हणत ते माझ्यासाठी दोन्ही हात पसरवून मला बोलावतात. मी आनंदानं धावत त्यांच्या दिशेनं निघतो. त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या मिठीत पडणार, तेवढ्यात पप्पा अदृश्य होऊन जातात.

सगळ्या घराचा कायापालट होऊन जातो. सगळं वातावरण धुरकट धुरकट, घर जुनं झाल्यासारखं. मी एकदम थबकतो, पप्पा कुठे गेलेत म्हणून आजूबाजूला बघायला लागतो. मन खूप घाबरल्यासारखं होतं. जत्रेच्या गर्दीत हरवलेलं एखादं छोटं मूल घाबरलेल्या चेहर्‍यानं, कंठ दाटून आपल्या आई-वडलांना शोधत असतं, तसा मी पप्पांना शोधायला लागतो. ‘पप्पा, पप्पा कुठे आहात तुम्ही? मला तुमच्या मिठीत घ्या ना,’ असं ओरडत ओरडत सगळ्या घरात त्यांना शोधत पळत असतो. पप्पांना बघण्यासाठी तो छोटा जीव आसुसलेला होता. पप्पांना नेहमीसाठी गमावल्याच्या भयानक भीतीनं त्याचा जीव घाबरत होता, पप्पा कधीच दिसणार नाहीत, या विचारानं कंठ असा दाटून आला होता, की रडणं सुद्धा तोंडातून बाहेर पडू शकत नव्हतं. या अवस्थेत तो शेवटच्या खोलीत पोचतो, तिथे बेडवर पप्पांचा चष्मा, पुस्तक, शर्ट आणि लुंगी दिसते. त्यांच्या कपड्यांना छातीशी कवटाळून तो छोटा जीव ओक्साबोक्शी रडायला लागतो. ‘कुठे आहेत पप्पा? मला एकदाच बघायचंय तुम्हाला, एकदाच तुमच्या मिठीत यायचंय मला…’ रडता रडता तो पप्पांना बघण्यासाठी विनवण्या करत होता. रडत रडत तिथेच बेडजवळ गुडघ्यांवर बसून तो पप्पांच्या उशीवर डोकं टेकून रडत राहतो. एकदम कारमध्ये माझा डोळा उघडतो. श्‍वास खूप जोरजोरात येत होता. सगळं अंग घामानं भिजलं होतं, कारमध्ये एसी सुरू असूनसुद्धा. छातीत खूप धडधडल्यासारखं होत होतं. पप्पांना गमावल्याच्या प्रचंड भीतीनं खूप अस्वस्थता होती. पप्पा नीट असतील ना, आज दिवसभर त्यांना फोन करणं पण नाही झालं. ज्योतीला घाईघाईनं फोन लावला, तिचा फोन एंगेज्ड येत होता. बापरे! ही मला काही बातमी देण्यासाठी तर फोन करत नसेल ना. मी लगेच मम्मीला फोन लावला. पूर्ण रिंग होऊन गेली, पण मम्मीनं फोन नाही उचलला. माझी अस्वस्थता आता मला स्वस्थ बसू देईना, मी चिडून गाडी चालवणार्‍या मित्राला ‘लवकर चल ना’ म्हणून ओरडलो. ज्योतीला परत फोन लावायला गेलो, तर फोनची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज होण्यातच होती. ज्योतीचा फोन लागला. तिनं उचलताच बोलायला सुरुवात केली. ‘‘अरे, किती वेळ तुझा फोन एंगेज, कुठे…’’ आणि फोन पूर्ण डिस्चार्ज, काय बोलत होती ज्योती? काय सांगायचं होतं तिला? घर अगदी दोन मिनिटांवर आलं होतं. माझी छाती खूप धडधड करत होती. मनात नको ते विचार येत होते. कार बिल्डिंगजवळ थांबताच मी उडीच मारली बाहेर. बिल्डिंगखाली पाचसहा बिल्डिंग्जमधली माणसं उभी बघून मनात धस्स झालं. ते सगळे माझ्याकडे बघत होते, मी धावत लिफ्टकडे पळालो. लिफ्ट ग्राऊंडफ्लोअरवरच होती. पटकन आठव्या माळ्याचं बटण दाबलं. छातीतली धडधड प्रचंड वाढली. लिफ्टचं दार उघडताच नको ते सगळे विचार डोक्यात, काय दृश्य बघायला मिळणार, या कल्पनेनं खूप घाबरलेलो. लिफ्टमधून बाहेर आलो, तर घराचं दार उघडंच होतं. मन अजून जास्त घाबरलं, बूट न काढता मी तसाच घरात धावत गेलो, हॉलमधून सरळ पप्पांच्या रूममध्ये येऊन थडकलो. रूममध्ये बघतो, तर औषध दिल्यानंतर मम्मीनं पप्पांना उभं केलं होतं. मला धावत येताना बघून दोघं मला बघायला लागले. मी पप्पांच्या रूमच्या दारातच थकलो होतो. पप्पांना समोर उभं बघून मनाचा बांध पूर्ण सुटला. ऑफिसची बॅग हातातून गळून पडली. मनातल्या सगळ्या भावनांनी डोळ्यांतून वाट काढली. पप्पांकडे एकटक बघत मी जड पावलांनी त्यांच्याकडे सरकू लागलो.

स्वप्नामध्ये दोन्ही हात पसरवून ‘ये माझ्या मिठीत’ म्हणणारे पप्पा आठवले. मी पप्पांच्या अगदी समोर येऊन उभा राहिलो. डोळ्यांतल्या धारा थांबायचं नाव घेत नव्हत्या. पप्पांना जणू माझ्या मनाची पूर्ण जाणीव झाली. पप्पांच्या अगदी जवळ येऊन मी उभा राहिलो आणि भयंकर मनुष्यहानी झालेल्या युद्धातून मुलगा परत आल्यावर आईनं जसं मुलाला कवटाळावं, तसं मी पप्पांना कवटाळलं. त्यांना जोरात मिठी मारून, त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून ढसाढसा रडायला लागलो. त्यांच्या छातीला बिलगून मी ढसाढसा रडत असताना एक विलक्षण सुखाचा अनुभव घेत होतो. एव्हाना नेहमीप्रमाणे मी ऑफिसमधून आलो म्हणून मला बिलगण्यासाठी टिनू धावत पप्पांच्या खोलीत आला आणि मला आबांच्या मिठीत बघून तिथेच थबकला. ज्योती पण पप्पांच्या रूममध्ये आली. मला पप्पांच्या मिठीत बघून टपकन तिच्या डोळ्यांत पाणी आलं. तिनं टिनूला जवळ ओढून त्याला कवटाळलं. मम्मीच्या डोळ्यांतून कधीच पाण्याच्या धारा सुरू झाल्या होत्या. मी पप्पांना अजूनही घट्ट चिकटलेलो. ओक्साबोक्शी रडण्यावर थोडा आवर घालत मी पप्पांकडे बघितलं. आजपर्यंत कधीच ज्यांच्या डोळ्यांत साधा ओलावा पण बघितला नाही, त्या वाघाचे डोळेही अश्रूंनी डबडबले होते. डोळ्यांतल्या अश्रूंनी मला अजून गहिवरून आलं. पुन्हा त्यांना घट्ट मिठी मारत, ‘‘तुम्ही खूप छान आहात पप्पा, खूप छान आहात. खूप छान वाढवलंत आम्हाला तुम्ही, त्या काळी चांगल्या चांगल्यांना मिळत नव्हतं असं सगळं दिलंत तुम्ही आम्हाला. तुमच्यामुळेच आज आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी झालो आहोत. खरंच तुम्ही खूप छान आहात, तुमच्यासारखे पप्पा कुठेच नाहीत…’’ रडता रडता माझं बोलणं हे पप्पांच्या मिठीतच. आता टिनू पण आम्हा दोघांना येऊन बिलगला. मी थोडा सावरलो. बघतो तर मम्मी, ज्योती पण तिथेच. टिनूसोबत ज्योती पण आम्हाला येऊन बिलगली. मग मम्मीला पण आम्ही जवळ घेतलं. काही क्षण आम्ही तसेच होतो. सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी. मग मम्मी म्हणाली, ‘‘अरे, पप्पांना जास्त वेळ उभं नाही राहता येत. त्राण नाही त्यांच्या पायांत, बसू दे त्यांना.’’ पप्पांना लगेच पलंगावर बसवलं. पप्पांचा चेहरा एकदम खुलल्यासारखा वाटत होता. चेहर्‍यावर खूप प्रसन्न भाव होते. बोलण्याची ताकद नव्हती पप्पांमध्ये, पण डोळ्यांतून त्यांच्या भावना प्रकट होत होत्या. बसलेलो असताना मी पप्पांचा हात हातात घेऊन बसलो. मधेच त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलो. ज्योती ‘चहा टाकते’ म्हणून उठली आणि ती माझ्याकडे बघत रूमच्या बाहेर जात होती. आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो. न बोलताही त्या एका क्षणात आम्ही खूप काही बोलून गेलो.

दोन आठवड्यांनंतर पप्पांना ‘आयसीयू’मध्ये अ‍ॅडमिट केलं.
त्या दिवशी पहाटे चार वाजता उठून मी ‘आयसीयू’मध्ये गेलो, तर पप्पा डोळे उघडून बघत होते. त्यांना शुद्धीवर बघून खूप छान वाटलं. मी त्यांच्याजवळ गेलो. बोलायला खूप कष्ट होत होते त्यांना. मी जवळ गेलो, तर म्हणाले, ‘‘जातो आता.’’ त्यांच्या तोंडातून निघालेल्या त्या शब्दांनी हृदयाचे तुकडे तुकडे झाले.
‘‘चिठ्ठी ठेवली आहे.’’
मी विचारलं, ‘‘माझ्यासाठी?’’
त्यांनी डोळ्यांनीच होकार दिला.
‘‘माझ्या कपाटात.’’ खूप कष्टानं बोलत होते.
थोडाच वेळ शुद्धीवर होते पप्पा. परत शुद्ध हरपली. एव्हाना एक रूम मिळाली आणि त्यांना ‘आयसीयू’मधून रूममध्ये हलवलं. मी ज्योतीला चिठ्ठी शोधायला सांगितली आणि हॉस्पिटलला येताना घेऊन यायला सांगितलं.
रूममध्ये पप्पांसोबत ज्योती, मम्मी आणि मी. मी चिठ्ठी उघडली, तशी ज्योती म्हणाली, ‘‘मोठ्यानं वाच, सगळ्यांना कळेल.’’
मी चिठ्ठी वाचू लागलो.

‘प्रिय छोटू,
तू जेव्हा ही चिठ्ठी वाचत असशील, तेव्हा कदाचित मी या जगातही नसेन. पण एक गोष्ट खात्रीनं सांगू शकतो, की मी खूप आनंदानं या जगाचा निरोप घेणार आहे.
आजारपणाचं कळलं, तेव्हाही मी डगमगलो नाही. याच्यावर मात करून मी बरा होईन, असाच विचार मी करत होतो. पण जसजसा वेळ पुढे सरकू लागला, तेव्हा लक्षात आलं, की आता याच्यातून सुटका नाही. आणि मग सुरू झाली आयुष्यातल्या कृत्यांची बेरीज-वजाबाकी. तसं बघितलं, तर या जन्मामध्ये मला जे काही मिळालं ते खूप समाधानकारक मिळालं. कुणाकडे काही तक्रार करावी, असं काहीच नाही. मल हवं तसं आयुष्य मी जगलो. एकच खंत होती, तुम्ही तिघं भाऊ ज्या मित्रत्वाच्या नात्यानं माझ्या नातवंडांसोबत राहता, तसा मी तुमच्यासोबत नाही राहू शकलो. जेव्हा केव्हा तुम्हाला मुलांशी खेळताना, मजामस्ती करताना बघू लागलो, तेव्हा तेव्हा ही खंत अजूनच टोचू लागली. मनात एक जडपणा आला होता. मनमोकळेपणानं बोलण्याचा स्वभाव नसल्यानं ही दुविधा कुणाला सांगूही शकत नव्हतो, पण काल तू येऊन असा काही बिलगलास, की मनाची मरगळ एकदम गळून पडली. काळ्या ढगांच्या पावसानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडावा तसं मन प्रसन्न झालं. पोटच्या पोराला छातीला कवटाळून घट्ट मिठीत घेण्यात किती सुख आहे, याची अनुभूती तुझ्यामुळे आली. उभ्या आयुष्यात मी जे करू शकलो नाही, ते तुझ्यामुळे शक्य झालं. जाता जाता का होईना, पण तुझ्यामुळे हे सुख मिळालं.
आता या जगाचा निरोप घेताना कसलीच अपूर्ण इच्छा नाही. मी प्रत्यक्षात तुमच्यासोबत नसेन, पण प्रामाणिकपणे आयुष्य जगताना, गरजूंना मदत करताना मी नेहमीच तुमच्या पाठीशी असेन, हे लक्षात ठेवा.
तुमचा पप्पा.’

– विनित वाघ

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.