Now Reading
पतिधर्म

पतिधर्म

Menaka Prakashan

तुमच्या बायकोच्या मैत्रिणी कधी अशा टोळी करून तुमच्या
घरी येतात का हो? त्याही सकाळी सकाळी? माझ्या घरी आल्या ना आज!
मला काही याची सवय नाही हो. सकाळी घरी कधी असायचो यापूर्वी? याच वर्षी निवृत्त झालो; आणि बाकी सगळ्यांचं माहीत नाही, पण मी मात्र घरात रिकामा पडून राहून जाम खूष आहे. म्हणजे, होतो आत्तापर्यंत. आज सकाळी मी आपला आरामात सोफ्यावर लोळत पेपर वाचत असताना अचानक ही आली.

‘‘ए, ऊठ ऊठ! माझ्या मैत्रिणी येताहेत. आत्ता मला रेखाचा फोन आला.’’
हे अनपेक्षित होतं. ‘‘त्या आत्ताच येतायत? सकाळी सकाळी?’’ मी आश्चर्यानं विचारलं.
‘‘सकाळ नाही, अकरा वाजायला आलेत. ऊठ ऊठ. किती पसारा घातलाय! जरा मदत कर आवरायला.’’ ही सोफ्यावरच्या उश्या नीट ठेवायला लागली. मी अनिच्छेनंच उठलो.
‘‘तो चहाचा कप जरा आत घेऊन जा. आणि ही कुठली कापडं आणून टाकलीत मधेच?’’
‘‘अगं अगं? असं काय गुंडाळतीयेस? माझ्या की-बोर्डचं कव्हर आहे ते. सकाळी तूच नाही का कुठल्या त्या मस्त गाण्याची आठवण करून दिलीस? तेच वाजवायचा प्रयत्न करत होतो मघाशी.’’
‘‘मी आठवण करून दिली?’’
‘‘मग? सकाळी नाही का, मला उठवत होतीस तेव्हा?’’ मी ओढणीची टोकं धरून तिला जवळ ओढत गुणगुणायला लागलो, ‘कह दिये होश में आ लूं, तो चले जाईयेगा…’
‘‘पुरे झाला पाचकळपणा.’’ माझ्या दंडावर चापटी मारून ती म्हणाली, ‘‘मी नाही, तुलाच सुचायला लागलं होतं नको ते. तेव्हाही उशीर केलास आणि आत्ताही करतोयस. चल, सोड मला आणि आत जाऊन बस.’’
‘‘आत काय जाऊन बस? पूर्वी परके लोक आले, की बायकांना अंतःपुरात डांबून ठेवत म्हणे. मला पडद्यात ठेवायचा विचार आहे की काय?’’
‘‘अरे, अजून अंघोळसुद्धा व्हायचीये तुझी. तू जा, तयार हो, टीव्ही बघ, सुडोकू कर, मजेत राहा. आमच्यात तुझं काय काम?’’
‘‘वा गं वा! माझे मित्र आले, की मी तुला आवर्जून बाहेर बोलावतो, नवीन असतील तर ओळख करून देतो. तू तर मला आत कोंडून ठेवायला निघाली आहेस. देवा देवा! केवढा हा घाला आहे पुरुष स्वातंत्र्यावर!’’
मला अजून एक चापटी मिळाली. ‘‘मला बाहेर बोलावतोस ते चहा करून द्यायला, खायला घालायला. तू काय करणार आहेस आमच्यासाठी? पोहे?’’
‘‘माझे मित्र कधीपासून चहा मागायला लागले? गरीब बिचारे लोक असेल ते ड्रिन्क घेतात, द्याल तो चकणा खातात आणि खूष होतात. त्यांच्या बायका येतात, तेव्हाच चहाबिहा करावा लागतो. आज कितीजणी नवर्‍यांना घेऊन येणार आहेत?’’
‘‘का? तो रामन कधी दारू पितो? आणि अल्ताफ? चहाच मागतो तो. मीच करते म्हणून माझ्या बरोब्बर लक्षात आहे.’’
‘‘ओके ओके! आहेत खरे काही नतद्रष्ट चहाबाज. अगदी मान्य. माझ्या यडपट नॉन ड्रिन्कर मित्रांना तू चहा पाजतेस, तर तुझ्या मैत्रिणींपैकी ज्या कुणी सरळ समजदार असतील, त्यांना मी बियर पाजायला तयार आहे. शेव, दाणे वगैरेसुद्धा मीच देईन. त्यांना कम्पनीही देईन, विनातक्रार. शेवटी पतिधर्म म्हणून काही आहे की नाही!’’
मला आणखी एक जोरदार चापटी मिळाली.

किरण पळसुले, पुणे (एअर व्हाईस मार्शल – निवृत्त)
kppalsule@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.