Now Reading
नैवेद्य

नैवेद्य

Menaka Prakashan

खट्ट बारा वाजले होते. आषाढातल्या रिपरिपीमुळे तशी बारा वाजल्याची काहीच खूण कुठे दिसत नव्हती, पण तिची चिमुकली कोवळी आतडी मात्र तिला बारा वाजल्याची जाणीव करून देत होती.
आईनं टॉवेलात बांधून दिलेलं नैवेद्याचं ताट हातात धरून ती झपाझपा चालण्याचा प्रयत्न करत होती. आताशी तिनं दोन चौक ओलांडले होते. अजून सहा चौक ओलांडून गेल्यावर खालच्या रस्त्याला रानाच्या वाटेला ते देऊळ होतं. हातातल्या ताटातल्या पदार्थांच्या वासानं तर तिच्या पोटात जास्त कलकलायला लागलं. ओठावरून जीभ फिरवून ती पुन्हा चार पावलं पळल्यागत चालू लागली, पण पळलं की पायांवरच्या फोडांवर रस्त्यावरचं चिखलाचं पाणी उडायचं आणि चुणचुण व्हायची.

तिनं हळूच डाव्या हातानं पिंढरीवरच्या फोडांवरचं पाणी पुसलं. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पिंढरीपासून तळपायापर्यंत आणि हाताच्या बेचक्या, डोस्कं सारं खरजेच्या फोडानं भरलं होतं. या खरजेच्या फोडानं तिची शाळा पंधरा दिवस झाले बंद झाली होती. तिला अक्षरशः रडूच येऊ लागलं. तिनं आवंढा गिळला. डोळ्यांतलं पाणी झग्याला पुसलं आणि पुन्हा झपाझपा चालू लागली. तिला आईचे शब्द आठवत होते, ‘दिवरुष्यानं सांगितलंया ‘तू आतापातुर ह्या दुसर्‍यांचं करत राहिलीस. काम काम करूशान कंदी देवीला नीटनेटका निवद दिला न्हाईस म्हनून ह्यो तिचा कोप हाय. काय बी कर आनि औंदा आवसेच्या आदी एक दिस गर्भी अन्नाचा निवद, नारळ घेऊन कुनाला बी पाटव आणि दुसरे दिवशी कोंबडं कापा.’
‘‘म्हंजे, आता ह्यो निवद, नारळ आनि उद्या कोंबडी दिली, की आपली खरूज जाईल तर!’’ ती मनात हुरळली आणि ‘काई घे बाबा, पर ह्यो कोप काड आमच्यावरला. आईचं नि दिवरुष्याचं बरूबर हाये. ह्यो कोपच न्हाई तर काय? न्हाई तर शश्या काय मरन्याजोगा हुता व्हय? चांगलं खात हुता, पीत हुता. तरी समदं डाकटर म्हनायचं, रगातच नाही त्येत्याचं. बाई सांगत्यात, अन्नाचं रक्त हुतं. ह्याच्या अंगात देवीनं रगात हूच दिलं नाही आनि पाच-सहा वर्सांचा आपला शश्या गेला.’

भाऊ शशिकांतच्या आठवणीनं तर तिच्या पायाचा वेगही कमी केला आणि डोळे भरून आले. मोठ्यानं रडावंसं वाटू लागलं. ‘आज वश्यानं शश्याची कापडं घातली होती. छान दिसत होता. आज आई गोडधोड करतीया बघून द्वाडाला सन असल्यागत वाटलं. आन् शश्याची नवी कापडं घालून बसला. गोडबोलणीच्या संतोषगत चांगला दिसला, आता वश्याला त्याची आणि शश्याची कापडं झाली. जरा मोठी होतात, पन म्होरल्या वर्साला चांगली हुत्याली. चार ड्रेस झालं वश्याला! मला मंजीला एकेकच. एकेक काकूनं दिलेला. आईला भारी तिचं कवतिक. मला नाई आवडत ती काकू.’
‘काल सांगायला गेले आईचा निरुप, तर मलाच म्हनती, ‘आईला म्हणावं, निवद नारळ मग कर, पण आधी सगळी पोरं सिव्हिल हॉस्पिटलात नेऊन टोचून आण.’ हिला काय जातंय ‘टोच्यून आन’ म्हनं. तिला वाटलं, आपलं वाकडं तोंड कुणी बघतंय वाटतं!’
विचाराच्या भरात ती अंतर चालली होती. पण आता पावसाची चळक जरा जोरात आली. तिनं इकडे तिकडे बघितलं. बसची पिकशेड मोकळी होती. ती पटकन तिथे शिरली. डोक्यावरचं फडकं बरंच भिजलं होतं. अंगातलं पोलकंसुद्धा तेवढ्या रिपरिपीनं चिप्प झालं होतं. तिला थंडी वाजायला लागली. हातातल्या ताटातला निवद पण आता गारढोण झाला होता.

पावसाला पुन्हा जोर चढला. ती स्टॉपवर असणार्‍या फळीवर बसली. पायांवर पुन्हा पावसाचे थेंब उडू लागले. तिनं हातातलं ताट बाजूला ठेवलं आणि पाय पोटाशी घेऊन मुटकुळं करून बसली. सहज चाळा म्हणून तिनं नैवेद्यावरचा टॉवेल बाजूला केला. कानवले, पोळ्या, मोदक, कुरडया, पुर्‍या, दहीभात, वरणभात एवढा निवद आईनं दिला होता.
‘काल गोडबोलणीनं माझ्याजवळ कामावरून येताना तांदूळ दिल्यात. तिचा सोभाव मला फार आवडतो. तिला लई वाटतं माझं कवतिक. ‘शांत फार शहाणी मुलगी,’ असं मला सारखी म्हणते. नायतरी ‘काकू! किती बी करा- अश्शं करावं, तश्शं करावं’ गोडबोलणीचा संतुष तर लई गोड पोरगा. शश्या आन् त्यो बरूबरचाच. पन शश्याच्या अंगात रगात नव्हतं, तर त्यो निस्ता लाल टमाट्यागत, लालचुटूक ढेकणागत! जरा कुटं सुई टोचली, तर रगाताची चिळकांडीच उडली पाहिजे.’ या विचारासरशी तिला आपलंच हसू आलं. तिनं मान वर करून बघितलं. रस्त्यावर विशेष कुणी नव्हतं. पाऊस कमी झाला नव्हता. तिच्या पोटात कलकलायला लागलं.

सकाळपासून ‘निवदाचं, निवदाचं हाये’ म्हणून आईनं बटराखेरीज कुनालाच काई दिलं नव्हतं. कधीच सुटणार्‍या खमंग-टमंग वासांनी आज तोंडाला पाणी सुटलं होतं. ‘एक कानवला खाल्ला, तर काय हुतंय?’ तिनं हा प्रश्‍न मनाला विचारला असेल नसेल, तोच हातानं आणि तोंडानं आपलं काम करायला सुरुवात केली. विचार करायला अवधीच नव्हता. लागोपाठ दोन-तीन कानवले आणि दोन-चार मोदक सहजासहजी पोटात गेले.
‘अगदी गोडबोलीण पंचमीला दिंडात पुराण भरती, तस्सं आज आयनं भरलंया. खाल्ली एक-दोन म्हनून कोन आयला सांगतंया! पण घरात बाकीची प्वारं आपून निवदाचा परसाद, अंगार नीस्तवर उपाशी बसून राहणार हायती. तिच्या पोटात खाल्लेला कानवला-मोदक पण ढवळायला लागला. डोळे पाण्यानं भरले.

तशीच तडक ती पावसात झपाटल्यागत चालू लागली. खालच्या रस्त्यानं मरीआईच्या देवळाकडे जाणारी बरीच माणसं होती. सार्‍यांच्या हातात नैवेद्याची ताटं होती. पुष्कळ चांगली सूटपँटी घातलेले बाप्या, भारी भारी पातळं नेसलेल्या बाया होत्या. तिला जरा बरं वाटलं त्यांना बघून.
कारण पुढच्या दोन महिन्यांच्या कामाचे पैसे उचलून आईनं ‘निवद’ केला म्हणून काकू, साठीणबाई अशा काई बायका तिच्या आईला ‘ह्यो वेडेपणा आहे. अंधसरधा आहे’ वगैरे कायबाई बोलत होत्या. त्येना म्हनावं, ‘आमी अनाडी असूदे, पर येऊन बगा, की ही तुमच्यागत शिकली-सवरलेली मानसं बी येत्यात. मरीआई- उगीच तिला ‘आई’ म्हटलंय व्हय!’
तिच्या उदबत्त्या भिजल्या होत्या. नैवेद्याच्या ताटात जरा पावसाचं पाणी झालं होतं. पावसाची रिपरिप होतीच. तिनं चालण्याचा वेग वाढवला होता. आता लांबूनच झाडाखाली गर्दी दिसत होती. तिला आनंद झाला. पाय भरून आले होते, पण मन तरारलं होतं.
गर्दीच्या अगदी जवळ पोचली. अगदी जत्राच जणू! दिवरुष्यांची पण कोण घाई. जो तो पुढे जाऊन त्याच्या हातात निवद-नारळ देण्यासाठी धडपडत होता.
‘‘हे बघा, सांगणं आमचं काम. आणणं तुमचं काम. तुम्ही अर्धामुर्धा नैवेद्य, किंवा देणं आणलं, तर देवीचा कोप तुमच्यावर होईल. आम्हाला काय त्याचं. बरं, या देवीचा कोप म्हणजे नुसती शरीरपीडाच नाही, जर ती कोपली तर जिवावर उठते तुमच्या.’’ दिवरुषी कुणाला तरी सांगत होता.

हे शब्द तिच्या चिमुकल्या कानांत कुणीतरी सळ्या तापवून घातल्यासारखे वाटले तिला. ‘आईनं येवस्थित दिवरुषाच्या परमाणं करून दिलेला निवद… आपण खाल्लेले दोन-तीन कानवले, मोदक. मघाचा दिवरुष्याचा चेहरा…’ तिला मेलेला शश्या दिसला. त्याच्या जागी आता आपला चेहरा दिसू लागला. आपल्या अंगावर पडून आई रडतीया. ‘आयोऽऽ’ करून ती मटकन खाली बसली. हातातलं ताट आदळलं गेलं.

‘‘अरेरे! पोर पडली. काय रेटताय? माणसं का कोन तुमी?’’ दिवरुषी ओरडला. कुणीतरी तिचं ताट उचललं. तिला उठवलं. दिवरुषानं विचारलं, ‘‘कुणाची तू?’’
‘‘वाडग्यातल्या रकमाची.’’ तिनं रडत सांगितलं. ‘‘आण निवद दावतो तुजा.’’ त्यानं समजूत घातली. पण तिला फक्त निश्‍चेष्ट शश्यासारखी पडलेली ती आणि तिच्या अंगावर पडून रडणारी आई एवढंच दिसत होतं.

– कादंबरी देशमुख

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.