Now Reading
निरीची मिनी

निरीची मिनी

Menaka Prakashan

‘तुला पाहतेय रोज, सतत. तू रोज तोच आहेस. बदलत नाहीस. माझ्या बाबतीत तर अजिबातच बदलत नाहीस. पण मी मात्र तशी नाही. मी क्षणाक्षणाला बदलत असते. मला समजत नाही मी कशी आहे? जास्त उन्ह झालं, की मी उन्हासारखी होते. जास्त पाऊस झाला, की मी पावसासारखी होते. माझं सगळंच कसं आजूबाजूच्या गोष्टींवर अवलंबून आहे कळत नाही. तू माझा बाप असूनही किती वेगळा आहेस. जगावेगळा. मला समजत नाहीस तू.’

मिनी खुर्चीवर निवांत बसली होती. आणि डोक्यात तिच्या विचारांचा भुंगा सुरू होता. तिला समजत नव्हतं नेमकं काय सुरू आहे तिच्या मनात. मन तिच्याशी बदफैलीपणा करत होतं. तिच्या वडलांबद्दल तिच्या डोक्यात गेल्या चार दिवसांपासून विचार सुरू होते. ती त्यांना ‘अरे तुरे’ करते. अगदी लहानपणी जेव्हा त्यानं तिला कुशीत घेतलं, तेव्हा तिनं कशी त्याच्या हातांवर शू केली पासून ते तिच्या पाळीच्या पहिल्या दिवसाचा तो कसा साक्षीदार होता इथपर्यंत तिला त्यानं सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या. आणि आता इतक्या वर्षांचा त्याचा मिळालेला सहवास तिला गेल्या काही दिवसांपासून जास्तच आठवत होता. कारण, त्याला कारण खूप वेगळं होतं. तिनं त्याला पत्र लिहिलं होतं. तिच्या बापाला एक पत्र लिहिलं होतं. तशी तिनं त्याला अनेक पत्रं लिहिली होती, पण हे पत्र खूप खास होतं. त्यावर तो एक अवाक्षर बोलला नव्हता. त्यामुळे त्याला पत्र दिल्यापासून तिच्या मनाची अवस्था खूपच बिकट झाली होती. त्याला पत्र देऊन पूर्ण एक दिवस होऊन गेला होता.
‘तो असा कसा शांत राहू शकतो? रोजची कामं करतो. माझ्याकडे बघून हसतो, पण बोलत काहीच नाही. एकदा मी विषय काढला. पण त्यानं अजिबात हुं की चूं केलं नाही.’
तिला खूप राग आला. रोज एकत्र राहूनही तो तिच्याशी विशेष काही बोलत नव्हता. तिच्या पत्राचं उत्तर देत नव्हता. तिला त्याच्यासाठी लिहिलेलं पत्र पूर्ण दिवसभर आठवत राहिलं…

‘प्रिय बाबा,
स. न. वि. वि.
तुला आज विशेष कारण आहे पत्र लिहिण्याचं. मी जरा संकटात सापडले आहे. म्हणजे मला कळत नाही, तुला कसं सांगू. पण आता सांगणं भाग आहे. म्हणजे खरंतर बोलायला हवं तुझ्याशी, पण माझी हिंमत होत नाहीये. खूप विचार करून तुला लिहिते आहे. ीज, तू समजून घे मला.
गेल्या वर्षी मी एका मुलाच्या प्रेमात पडले. इटलीतल्या. ब्रीझो त्याचं नाव. त्याचं नाव मी अनेकदा तुझ्याशी बोलताना वारंवार सांगितलं, पण त्याला कधी तुला भेटवलं नाही. तूही मला कुठला उपदेश केला नाहीस. आई तर आपल्यात आता नाही. याला कित्येक वर्षं झाली. तूच माझी आई आणि बाबा झालास. तू कधीही माझ्यावर कुठल्या बाबतीत जबरदस्ती केली नाहीस. मी अशीच का वागले, तशीच का वागले, याबद्दल एक अवाक्षरही काढलं नाहीस. तू खूपच चांगला आहेस. मला खूप आवडतोस.
पण मला तोही आवडू लागला. प्रेम कधी करू लागले ते समजलं नाही. त्यानं मला खूपच विलक्षण अनुभव दिला. तो मी शब्दांत सांगूच शकत नाही. तो भारतात वर्षभर होता. मागच्या महिन्यात तो इटलीला निघून गेला. तेव्हा माझी अवस्था अतिशय बिकट होती. तो फक्त वर्षभरासाठी भारतात आला होता. त्याच्याकडून मला अनेक गोष्टी शिकता आल्या. त्याचं आणि माझं नातं खूप मस्त फुललं. आम्ही कधी जवळ आलो ते समजलं नाही. म्हणजे मलाही आमच्यातल्या निसर्गाची अजिबात कल्पना नव्हती. म्हणजे मी तर कधीच तो अनुभव घेतलेला नव्हता. तूही मला त्याबद्दल कधी सांगितलं नव्हतं. तुझ्या मते मी अजूनही लहानच होते. पण बाबा, माझ्यातला निसर्ग थांबला नाही. तो इतका पुढे गेला आहे, की सध्या तो माझ्या पोटात वाढतो आहे. आणि त्याला तब्बल तीन महिने उलटून गेले आहेत. मी माझ्याकडे दुर्लक्षच केलं. तो त्याच्या देशात परत जाणार, या वेदनेत मी पूर्ण बुडून गेले. तो गेल्यावरही मला समजत नव्हतं. माझ्या दोन पाळ्या चुकल्या. तशा त्या सहसा चुकतात म्हणून मीही कधी लक्ष दिलं नाही, पण तिसरी पाळी चुकली आणि माझ्या काळजाचा ठाव चुकला. मी तपासणी केली आणि मला हे समजलं.

हे समजून फक्त चार दिवस झाले आहेत. मी त्याला संपर्क केला आहे. तो मला ‘भारतात परत येतो’ म्हणाला आहे. पण मी काय करू ते कळत नाही, कारण त्याला यायला किमान दोन महिने लागतील. पण बाबा, खरं सांगू का? मला ना आधी थोडी भीती वाटली, पण आतून खरा आनंद झाला. माझ्यात एक जीव वाढतोय. तो रोज श्वास घेतोय. तो हलतोय. ही गोष्ट किती विलक्षण आहे. मला भारी वाटू लागलं. मी जमीन झालेय, आणि त्यावर आता एक झाड उगवणार आहे, असं फीलिंग सध्या माझ्या मनात आहे. पण नंतर तुला काय वाटेल? लोक काय म्हणतील? या विचारानं मी घाबरले. आणि वाटलं, तुला आवडेल की नाही माहीत नाही, पण तुला हे सांगितलं पाहिजे. मला ना काय करावं ते सुचत नाहीये. मी ईशाच्या कानांवर घातलंय. ती डॉक्टर आहे ना, पण तिनं मला तपासलं आणि म्हणाली, ‘गर्भपात करता येणार नाही. तू अशी बारीक आहेस आणि जीव बराच वाढला आहे. रिस्की आहे.’
बाबा, तू रागावू नकोस. मला तुझी साथ हवी आहे. ब्रीझो येईल असं एक मन म्हणतं आहे. पण जरी तो आला नाही, तरीही मी या जिवाला वाढवायचं ठरवलं आहे. तू देशील ना साथ मला?
तुझ्या उत्तराची वाट पाहते.
तुझी लाडकी,
मिनी.’

पत्र इतक्यांदा वाचून झालं होतं त्याचं. काल दुपारी त्याच्या हातात पडलं आणि तो ढसाढसा रडायला लागला. त्याला त्याच्या बायकोची- निरीची- आठवण आली. इतकी वर्षं दाबून ठेवलेला सगळा भार त्याला हलका करावा, असं वाटून गेलं. पण भरून आलेल्या मनाला त्यानं खूप कष्टानं थांबवलं. ती घरातच होती. तिच्यासमोर तो दोनदा गेला, तिला जेवण दिलं, चहा दिला, पण तिच्या नजरेकडे त्यानं पाहिलं नाही. तो एक शब्दही स्वतःहून बोलला नाही. ती आजूबाजूला जरी असली, तरी निरीच उभी आहे, असं त्याला वाटायचं. पण तिला उत्तर देणं भाग होतं. तो मनाचा हिय्या करून लिहायला बसला.

‘प्रिय मिनी,
तुझं पत्र वाचलं. काय बोलू? तुझं तू सगळं ठरवलं आहेसच. मी फक्त तुझा बाबा आहे. लहानपणापासून तुला सांभाळत आलो. तुला निरी गेल्यावर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, पण तुझ्यापासून एक गोष्ट मी लपवून ठेवली आहे. आज ती गोष्ट सांगण्याचा योग आला आहे. तुला सांगायलाच हवी.
तुझी आई निरी ही एक अतिशय मनस्वी बाई. स्वतःवर भरपूर प्रेम करणारी, दुसर्‍यांवरही करणारी. एकदम मोकळी. मी तिच्या प्रेमात तिला पाहिल्यावर पडलो. तिच्या नादी लागलो. अगदी वेडापिसा झालो. निरीशिवाय मला काहीही सुचायचं नाही. म्हणून तर मी अजूनही लग्नाच्या भानगडीत पडलो नाहीये. तुला हे चांगलं माहीत आहे, की तू जन्माला आलीस आणि वर्षभरानं निरी, म्हणजे तुझी आई दगावली. तशी तुला आमची प्रेमकहाणी मी अर्धवट सांगितलेली आहेच. पण तिच्या जाण्याला काही कारण नव्हतं, असं म्हणता येणार नाही. तिचे श्वास तितकेच होते. जे होते ते तिनं अगदी भरभरून जगून घेतले. तिच्या मनाला येईल ते तिनं केलं. अर्थात, ते तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं होतं. तिला खूप मित्र होते. तिचे सगळे मित्र खूप दिलदार होते. तीही त्यांच्याशी दिलदार वागली, पण लग्न तिनं माझ्याशी केलं. मला तेव्हा खूप भारी वाटायचं. सगळेजण माझा हेवा करायचे. मी खूप आनंदात होतो. तीही होती, असं मला वाटायचं. आम्ही लग्न केलं, त्यानंतर काही दिवसांनीच सगळं विस्कटून गेलं. तिनं मला जे सांगितलं, त्यानं मी पूर्ण हादरून गेलो. हे मात्र तुझ्यापासून कटाक्षानं लपवलं होतं.

एके दिवशी तिनं मला तुझ्याबद्दल सांगितलं, म्हणजे तू पोटात होती तेव्हा. मला खरंतर आनंद व्हायला हवा होता. पण ती म्हणाली, ‘हे तुझं नाही. लग्नाच्या आधीपासूनच मी गरोदर आहे. तुझ्यापासून लपवून ठेवलं.’ ती हे बोलली आणि मी खाडकन तिच्या मुस्काटात मारली. तिनं मला फसवलं, ही भावना माझी एक पुरुष म्हणून साहजिक होती. तिनं मुकाट्यानं थोबाडीत खाल्ली. तेव्हा आमच्या लग्नाला दोन महिने झाले होते आणि तीही तिसर्‍या महिन्याच्या मिनीला, म्हणजे तुला पोटात वाढवत होती. तुला हे काहीही आम्ही सांगितलं नाही. तुझ्या जन्मानंतरही नाही, आणि तुला हे कधीच सांगायचं नव्हतं. पण काळानं त्याचं गुपित तुझ्यापुढे आणलं.

मी तिचा नवरा होतो. तिच्याशी पूर्ण एकनिष्ठ होतो. शरीरानं, मनानं मी तिचा झालो होतो. तिच्यावर मनापासून प्रेम करत होतो, पण ती कुणाचीच नव्हती. ती फक्त स्वतःची होती. मी तिच्याकडून तुझा बायोलॉजिकल बाप हुडकून काढण्याचा खूप प्रयत्न केला. ती गरोदर होती, तरीही मी तिच्याशी जनावरासारखं वागलो. पण तो कोण, हे न सांगण्यावर ती अतिशय ठाम होती. तिनं मला सोडून स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला, तेव्हा मी पाघळलो. तिच्याशिवाय मला कुणीच नव्हतं. मी विना आई-बापाचा मुलगा होतो. एकट्याच्या जिवावर जगत होतो. ती आली आणि माझ्या आयुष्यात नंदनवन आलं होतं. मी खूप विचार केला आणि तुझा बाप होण्याचा निर्णय घेतला. आजही तुझा बाप म्हणून मी तुझ्यासोबत आहे. ती संसार अर्धवट सोडून कायमची निघून गेली, पण तिनं जे काही मला तुझ्या रूपात दिलंय ते माझ्यासाठी पुरेसं होतं. तू तिच्यासारखीच दिसतेस, म्हणून तुझं नाव मी मिनी ठेवलं. निरीचं छोटं व्हर्जन. तुझा बाप कोण, हे अजूनही मला ठाऊक नाही. आणि तू झाल्यावर मी तो शोधायचा प्रयत्न केला नाही. आणि कुणी दुसरा पुरुषदेखील तुझा क्लेम करायला आला नाही. पण तू माझ्यापासून झाली नाहीस, तरीही मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आणि करतो आहेच. तू माझ्या हाडामासाची नाहीस, पण माझी आहेस. तुझे सगळे मूड, तुझा राग, तुझं प्रेम सगळं मी गेल्या अनेक वर्षांपासून पाहतो आहे. तू अगदी तिच्यासारखी आहेस, हे तू सिद्ध केलंस. आणखीन काय लिहू?
मला आता नातवंड होणार, याचा मी स्वीकार करणार नाही, असं तुला वाटायला नको आणि तुझ्या जन्माची अर्धवट उत्तर असलेली कथा तुला त्या निमित्तानं सांगण्याचा योग मला आला. फक्त तुझ्या बाबतीत तुझ्या होणार्‍या जिवाचा खरा बाप कोण, हे तुला माहीत आहे. ही गोष्ट चांगली आहे. तुझा तो मित्र लवकर येवो. तो आला नाही, तरीही तुझा हा बाप तुझ्या मुलाचा आजोबाही होईल आणि बापही. आणखीन बोलण्यासारखं काही नाही. थांबतो.
सर्वस्वी तुझा असलेला,
बाबा.’

त्यानं पत्र लिहिलं. आणि कित्येक वर्षांपासून मनात साठवून ठेवलेला तो एक दुखरा कोपरा पत्रातून उलगडला. त्याला मोकळं वाटलं. त्यानं पत्र दुमडून तिच्या एका पाकिटात ठेवलं आणि तिच्या खोलीत तो गेला. पत्र टेबलावर ठेवून दिलं. ती खोलीतच बसली होती, काही वाचत. तिला खुणेनं त्यानं पत्र दाखवलं आणि तिला म्हणाला,
‘‘खायला करू का काही? चहा पण घेऊयात. मी झालं की हाक मारतो. तोपर्यंत हे वाच.’’
ती मानेनं ’हो’ म्हणाली. तिला त्याच्याशी खूप बोलायचं होतं, पण शब्द फुटत नव्हते. ती जरा घाबरली होती, पण तो नॉर्मल आहे, हे तिनं ओळखलं. ती त्याच्या जवळ गेली, पण तो शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेला. मग तिनं टेबलावर ठेवलेल्या पत्रावर झडप मारली. आणि ती ते उघडून वाचू लागली.

– अमृता देसर्डा

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.