Now Reading
निरिया आजी आणि तिचं खेळघर

निरिया आजी आणि तिचं खेळघर

Menaka Prakashan

तुर्कस्तानातल्या मनिसाजवळच्या जंगलाच्या एका बाजूला अजून एक छोटंसं जंगल दिसेल, त्याचं नाव आहे ‘निरिया आजीचं खेळघर’. ही निरिया म्हणजे त्या जंगलाची मालकीण.
ती होती एक आजी, पांढर्‍या शुभ्र केसांची आणि गोरीपिट्ट. सायीसारखा चेहरा होता तिचा, पण चालायला एकदम ताठ. भराभर चालायला लागली, तर तरुण मुलंही धापा टाकायची.
ही कुणा मुलांची आजी नव्हती, तर ती होती तिच्या खेळघरातल्या त्या प्राण्यांच्या पिल्लांची आजी. ही कुणी साधीसुधी आजी नव्हती, तर ती होती एक निसर्गतज्ज्ञ.
युरोपातल्या अभ्यासकांमध्येही निसर्गतज्ज्ञ म्हणून तिचा दबदबा होता. आपल्याला उचलताही येणार नाहीत, एवढे मोठे ग्रंथ तिनं लिहिले आहेत, असं त्या गावचे लोक सांगत. त्या आजीच्या ‘निरिया’ या अजब नावाचा अर्थ म्हणजे सूर्याची किरणं!
जंगलाच्या बाजूला तिचं ते मोठ्या अंगणाचं आणि त्यात आठ छोटी तळी असलेलं घर होतं. तिच्या लहानपणापासूनच ती तिथे राहायची.
ते लोक कुठून तरी बाहेरून आलेले होते.

कशासाठी आणि कुठून आले… काय… याचा कुणालाच पत्ता नव्हता. अर्थातच गावातले लोक आपसांत त्याबद्दल नेहमीच चर्चा करतच असत.
तिचे बाबा वैद्य होते, याशिवाय निसर्ग आणि आकाशातल्या तार्‍यांचे अभ्यासक. दिवसभर ते गावात जाऊन लोकांना औषधं देत आणि रात्री मात्र ते बाप-लेक उशिरापर्यंत आकाशातल्या तार्‍यांकडे पाहत, कंदिलाच्या प्रकाशात काही लिहीत बसलेले दिसत.
तिच्या आईला कधीच कुणी पाहिलं नव्हतं.
निरिया छोटी होती, तेव्हाही ती त्या घराच्या कुंपणाच्या आतच बागडे. कितीही कुणी बोलावलं, तरी ती खेळायलासुद्धा कधीही बाहेर जात नसे.
निरिया आणि तिचे वडील बाहेर तर कुठे मिसळत नसतच, पण एकमेकांशीही फारसे बोलत नसत, असं
त्यांच्या घरी कामाला जाणारी मेरिना सांगे. त्यांच्या घरात काय चालतंय, याच्या बातम्या… ती गावातल्या लोकांना तिखटमीठ लावून सांगे आणि त्यांचं त्या घराबाबतचं कुतूहल शमवे.

एकदा काय झालं, वैद्यबुवांसाठी काही तरी पत्र घेऊन एक सैनिक घोडेस्वार आला. निरियाच्या बाबांना तिथल्या सुलतानानं बोलावणं धाडलं होतं. सुलतानाचा हुकूम तो! मोडणार कसा? पण निरियाला एकटीला तरी कसं ठेवणार… म्हणून त्यांनी मेरिनाला आठवडाभर त्यांच्या घरी राहायची विनंती केली होती. मेरिना काय खूषच, पण त्या वास्तव्यातही तिला त्यांच्या घराबद्दल फारशी काही… म्हणजे तिला अपेक्षित असलेली माहिती मिळाली नाहीच.
तर तो सुलतान… तो म्हणे भलताच दुष्ट होता, असं लोक सांगत. तो कोणत्याही कारणावरून लोकांची डोकी उडवी. त्यामुळे त्याच्याकडे गेलेल्या कुणालाच तिथून सुखरूप परत येऊ, याची खात्री नसे. सुलतानाचा असा फतवा आला, की सर्वत्र रडारड माजे.

सुलतानाकडे जायच्या अगोदरच्या रात्री निरियाच्या बाबांनी निरियाला, तिला कदाचित यापुढे एकटंच राहावं लागेल, याची पूर्वकल्पना दिली होती. रात्रभर बाप-लेक बोलत होते. त्यांनी अगोदरच तिच्यासाठी जन्मभर पुरेल एवढी संपत्ती आणि ज्ञानाचा साठा करून ठेवला होता. त्याचबरोबर त्यांनी तिला तिचा जन्मही अपुरा पडेल एवढं कामही देऊन ठेवलं होतं. ते काम म्हणजे, त्या जंगलातल्या प्रत्येक झाडाची माहिती, त्याचा आकार कसा, ते फुलतं कधी, फळं कशी असतात, त्यावर हवामानाचा कसा परिणाम होतो, आकाशातल्या वेगवेगळ्या तारकासमूहांच्या गतीबरोबर कोणती झाडं फुलतात, झाडं आणि जंगलातले प्राणी यांंच्यातल्या नात्याच्या निरीक्षणावरून त्या झाडातले औषधी गुणधर्म शोधायचे, ही सगळी माहिती समजून आणि त्यावर विचार करून लिहून काढायची, हेच तिचं जीवनकार्य आहे, असं त्यांनी तिला निक्षून सांगितलं होतं.
तिनं शक्यतो लग्न करू नये आणि केलंच तर मुलग्याला मुळीच जन्म देऊ नये, असाही त्यांनी तिला सल्ला दिला होता, कारण कुणीही सुलतान भविष्यात त्याला स्पर्धक होऊ शकेल अशा लांबच्या नातेवाईक मुलांनाही शोधून मारून टाके.

कुणालाही त्या रात्री झोप लागली नाही. बाबांनी पहाटे निघताना निरियाला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला आशीर्वाद देऊन ते त्या घोडेस्वाराबरोबर रवाना झाले. निरियाचे बाबा म्हणजे त्या सुलतानाचा सावत्र भाऊ होते, पण त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्या काळचे सुलतान सिंहासनावर हक्क सांगू शकणार्‍या त्यांच्या सर्व नातेवाइकांना मारून टाकत असत. हा सुलतान राज्यावर बसताच निरियाच्या बाबांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलग्यांना कसंबसं देशातून समुद्रमार्गे बाहेर पाठवून दिलं होतं आणि ऐनवेळी वादळ आल्यामुळे ते आणि छोटी निरिया मात्र जाऊ शकले नव्हते.
त्या बाबांना राज्याचा मोह नसला, तरी जगायची मात्र तीव्र इच्छा होती. ते उत्तम वैद्य आणि निसर्गरहस्याचे अभ्यासक होते. म्हणूनच तर गेली बारा वर्षं राजधानीपासून दूर त्या जंगलात निरियाला घेऊन ते राहत होते. त्या काळात त्यांनी कितीतरी हस्तलिखितं निर्माण केली होती आणि त्यांचं काम ते युरोपियन विद्वानांकडे पाठवत. अर्थात, त्यामुळेच त्यांच्या वास्तव्याचा सुगावा सुलतानाला लागला होता.

पण त्यांनी ठरवलेलं त्यांचं बरंच काम झालं होतं, पुढचं काम करण्यासाठी निरियाला त्यांनी तयार केलं होतं. फक्त एकच काळजी होती, ती म्हणजे सुलतान त्याच्या एखाद्या शाहजाद्यासाठी निरियाला मागणी घालेल आणि तिला राजधानीत घेऊन जाईल. अर्थात, त्यासाठी निरियाचं मत महत्त्वाचं असणार होतं. त्या दुष्ट सुलतानाला, कसं की कोण जाणे, पण आश्चर्यकारकरीत्या स्त्रियांचं मत महत्त्वाचं वाटे, त्यामुळे तिचा नकार असेल, तर तिच्यावर लग्नासाठी कदाचित जबरदस्ती झालीही नसती.
आठवडाभरानंतर तो घोडेस्वार निरियाच्या बाबांचे कपडे, दागिने आणि राजचिन्ह असलेला खंजीर, तसंच सुलतानाचं पत्र घेऊन आला.
निरियानं डोळ्यांत पाणीही न येऊ देता तिच्या बाबांचं सामान घेतलं आणि सुलतानाचं पत्र न वाचता फाडून टाकलं. तिच्या घराच्या मागच्या अंगणात तिने एक खड्डा खणून तिच्या बाबांचं सामान त्यात ठेवलं आणि वर माती सारून त्यावर त्यांच्या स्मारकाचा दगड ठेवला आणि त्यांची आवडती पांढर्‍या फुलांची झाडं लावली. चंद्रप्रकाशात ती फुलं चमकत आणि आसमंतात त्यांचा सुवास दरवळत राही.

त्या स्वर्गीय सुगंधात तिचे बाबा तिला रोज भेटतात, असं तिला वाटे. ती आता एकटीच राहणार होती, कारण तिला अभ्यासाला भरपूर वेळ हवा होता. भल्या पहाटे उठून ती जंगलात जाई. दुपारी उशिरा परत येई. ऊन असो, की बर्फ पडत असो, की पाऊस… निरियाचा नेम कधी चुकला नाही. मेरिना आपली तिच्या घरचं सगळं काम उरकत असे. वर्षामागून वर्षं गेली. निरिया तरुण होती, तरी तिचं कुठेही लक्ष नसे. मेरिना तिच्यासाठी गावातल्या तरुणांची प्रेमपत्रं घेऊन येई, पण निरिया ती उघडूनही पाहत नसे.
हळूहळू मेरिनाही म्हातारी झाली. एक दिवस निरियानं तिच्या हातावर नाण्यांनी भरलेला एक बटवा ठेवला आणि तिनं कामासाठी परत तिच्या घरी येऊ नये, असं तिला निक्षून सांगितलं.

मग मेरिनानं तिच्या मुलीला- मनोवेलला- तिच्याकडे पाठवायला सुरुवात केली. ही मनोवेल मोठी गोड आणि कष्टाळू मुलगी होती. ती निरियाचं काम मोठ्या आवडीनं करी. तिच्या पायाला तेल चोळी. तिच्या आवडीचा स्वयंपाक करून ठेवी. निरियालाही मनोवेल आवडे. यथावकाश मनोवेलचंही लग्न झालं. आता मनोवेल सकाळची कामं आणि स्वयंपाक आवरून घाईनं तिच्या घरी परते. आठवड्यासाठी लागणारं सामान मनोवेल आणि तिचा नवरा आणून देत. निरिया मात्र वय वाढेल तशी अधिकाधिक कामात गढून जायला लागली. पाहता पाहता निरियानं लिहिलेल्या कागदांचा ढीग एवढा झाला, की एक अख्खी खोली त्यासाठी कमी पडायला लागली. बाप रे! केवढं काम! मनोवेलची मुलं म्हणत. गावातल्या बायकांचं म्हणणं असं की… काय उपयोग आहे निरियाचा, ना नवरा… ना पोरंबाळं. असली कसली बाई. पुरुषांचं तर आणखी वेगळंच मत होतं… ते तिचं तरुणपणीचं रूपडं आठवून सुस्कारे टाकत.
अर्थातच, हे सगळं निरियाला कळायचा काही मार्गच नव्हता.

एके दिवशी ती पहाटे जंगलात जाताना घराला कुलूप सरकवत होती, तर बाहेर अस्वलाचं पिल्लू कुडकुडत असलेलं दिसलं. अगोदर तिला वाटलं, की चुकलं असेल कुठे तरी, येईल त्याची आई शोधत. पण ती दुपारी घरी आली, तरीही ते तिथेच पडून होतं. त्याला तिथेच पाहून तिनं शेगडी पेटवून दूध गरम केलं. एका मोठ्या वाडग्यात मटणाचे छोटे तुकडे आणि दूध घालून दिलं. पिल्लानं सगळं फस्त केलं. निरियानं त्याच्याकडे पाहिलं, तर त्याच्या काळ्याभोर डोळ्यांत कृतज्ञता जणू भरून वाहत होती. रात्री जेवण करून पाय मोकळे करायला ती बाहेर आली, तर ते पिल्लू मजेत खेळत होतं. बाहेर थंडी होतीच, पण निरियानं त्याच्यासाठी जुन्या मऊ ब्लँकेटची घडी घालून एका टोपलीत ठेवली.

दुसर्‍या दिवशी दुपारी जंगलातून आल्यावर पाहते तर काय, वाघ आणि सिंहाची अशीच छोटी छोटी पिल्लं तिच्या अंगणात खेळत होती. त्यांनाही तिनं ते वाळवलेले मटणाचे तुकडे आणि दूध दिलं. हळूहळू तिचं अंगण म्हणजे जणू जंगलातल्या पिल्लांचं खेळघर झालं. तिच्या घरातल्या त्या आठ तळ्यांतल्या पाण्यात कितीतरी प्राण्यांची आणि पक्ष्यांची छोटी छोटी पिल्लं आनंदानं खेळत असत. त्या पिल्लांच्या अद्भुत खेळघराची वार्ता गावात पसरायला वेळ लागला नाही. शाळा संपली, की दुपारच्या वेळी माणसांच्या पोरांचाही थवा तिच्या घराकडे वळे. गावोगावची मुलं आणि त्यांचे शिक्षक निरियाचं ते खेळघर पाहायला येत.

आयुष्यभर एकट्या राहिलेल्या निरियाला आलेल्या पाहुण्यांशी गप्पा मारण्यात, त्यांच्यासाठी नाना प्रकारचे खाऊ बनवण्यात खूप मजा येई. कधी नव्हे, ती निरिया गावातही फेरफटका मारायला लागली होती. तिच्या वडलांसारखं तिलाही वैद्यकीचं ज्ञान होतं, शिवाय हाताला गुणही होता. बायकांच्या दुखण्यावर तर तिच्याकडे हमखास इलाज असे. आता गावातल्या बाया तर तिच्यावर जीव ओवाळून टाकत. सगळ्यांच्या शेतातल्या ताज्या भाज्या, दूध, अंडी वगैरे तिच्याकडे अगोदर पोचलेलं असे. निरियाबरोबर सगळ्या जणी भाज्या निवडायलाही येत. कोवळे दाणे मोरासाठी; भाज्या ससे आणि हरणांसाठी; मटण, मासे, अंडी बाकीच्या प्राण्यांना. दूध तर भरपूर जमा होई. सहलीसाठी येणार्‍या मुलांसाठीही खाऊ बनवायला लागायचा. निरियाला ती मुलं गाणी म्हणून नाच करून दाखवत. निरिया खळखळून हसायला शिकली.

आयुष्यभर पुस्तकं लिहून शिणलेल्या तिच्या बुद्धीला, मनाला आणि शरीराला हा विसावा खूपच आनंददायी होता. आयुष्यात कधी न मिळालेल्या दोस्तीच्या आनंदानं तिचं मन भरून जात असे. खरंतर तिच्या आयुष्याचा जवळ जवळ मध्य उलटून गेला होता. आता तिच्या बाबांनी तिला सांगितलेलं कार्यही पूर्ण होत आलं होतं. निसर्गरहस्याची दहा पुस्तकं तिच्या नावे जमा होती. खरंतर स्त्रीच्या नावे लिहिलेलं पुस्तक वाचायला विद्वान प्रथम तयारच नसत, परंतु एकदा एकानं चुकून ते वाचलं आणि मग त्या सर्वांना ती स्त्री आहे की पुरुष, यानं फरकच पडेनासा झाला.
अर्थातच, निरियाला त्याची काही कल्पनाच नसल्यामुळे त्यासाठी तिला काही झगडावंही लागलं नाही.
तिच्या पिल्लांच्या खेळघरात नवनवीन पिल्लं येत. खेळून झालं की परतही जात. ही पिल्लं मोठी झाली, तरी खेळघराला भेटी देत.

एकदा एका पांढर्‍या वाघाच्या पिल्लाच्या पायात काटा घुसला. निरियानं हळुवारपणे तो काटा काढून अंगणातली माती भिजवून आणि गरम करून त्याला लावली, थोड्याच वेळात पिल्लू परत उड्या मारायला लागलं.
आता घरी आलेल्या प्राण्यांच्या पिल्लांचे डोळे, हात, पाय, कुठे जखमा आहेत का ते पाहा, हाही तिला एक उद्योगच होऊन बसला. हे सगळं एकदम भारी चाललं होतं.
त्या वेळी अजूनच एक नवल घडलं.
तिचं जंगली ऑर्किड्सवरचं पुस्तक वाचून रूसमधला ईगोर खूप प्रभावित झाला. तो होता खरंतर मोठा योद्धा आणि चित्रकार. मात्र सततच्या लढाया आणि हिंसा यामध्ये त्याची चित्रकला विसरली गेली होती. पण तो फावल्या वेळात पुस्तकं वाचायला लागला होता.
निरियाचं पुस्तक वाचून आणि खरंतर त्यातली चित्रं पाहून त्यानं त्याचं खंजीर, तलवारी, धनुष्यबाण सगळं सैनिकांमध्ये वाटून टाकलं आणि तो निरियाच्या शोधात मनिसाला येऊन पोचला.
पुढे काय घडलं असेल ते आपण जाणू शकतोच.
एवढं खरं, की निरिया तिच्या म्हातारपणी तिच्या तरुण काळापेक्षा कितीतरी अधिक सुंदर, तृप्त आणि समाधानी दिसायला लागली, असं लोक म्हणायला लागले. खेळघराला आता आजीबरोबर आजोबाही मिळाले.

– मंजूषा देशपांडे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.