Now Reading
नालायक

नालायक

Menaka Prakashan

प्रसिद्ध छायाचित्रकार रमेश जाधव यांना स्वतःबद्दल खूप अभिमान होता.
आज सकाळीसुद्धा ते आपला नेहमीचा सकाळचा पळायचा व्यायाम करून घरात आले, तेव्हा त्यांच्या चालीतून तो जाणवत होता. ते आत आले तेव्हा त्यांच्या घरचा फोन वाजत होता.
ते आपल्या नेहमीच्या रुबाबदार चालीनं दिवाणखान्यातल्या फोन जवळ गेले. ‘किती वेळ वाजतोय हा कुणास ठाऊक? घरी काय माणसं नाहीत की काय,’ असं म्हणत त्यांनी फोन उचलला.

‘‘मी रमेश जाधव बोलतोय…’’ फोन कानाला लावत ते आपल्या नावाच्या उच्चारात ‘रमेश’ यावर जास्त जोर देत म्हणाले. आपलं नाव म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व असतं आणि तुम्ही ते ज्या पद्धतीनं उच्चारता, लोकांच्या समोर सादर करता, त्यावरून समोरचा माणूस त्याच्या मनात तुमची एक प्रतिमा तयार करत असतो. तुम्ही जीवनात यशस्वी आहात का नाही, याबद्दल समोरचा एक आडाखा बांधत असतो. आपण एक मातब्बर छायाचित्रकार आहोत आणि समाजात आपल्याला एक वजन आहे, हे समोरच्याच्या मनात सतत बिंबवायला हवं, असं रमेश जाधव यांचं मत होतं. त्यानुसार त्यांनी आपली चाल, आपलं बोलणं आणि आपला पोशाख खूप विचार करून ठरवला होता. ते पन्नाशीत आले होते, पण ते अजूनही चाळीस वर्षांचे असावेत, असं वाटत असे. दररोज सकाळी योगासनं आणि प्राणायाम, नंतर घरापासून जवळ असलेल्या बागेत पळायला जाणं. मग बागेतल्या दररोज भेटणार्‍या मित्रांशी गप्पा. आत्ता त्यांनी नायकेची ट्रॅक पँट आणि ब्रँडेड टीशर्ट घातला होता. निळसर रंगाची पँट आणि गर्द हिरव्या रंगाचा टीशर्ट. माणसानं नेहमी कसं रुबाबदार दिसलं पाहिजे. त्यांचे केस अजूनही काळे होते. धारदार नाक, करारी डोळे, ओठावर नीट कापलेली टोकदार मिशी, गव्हाळ रंग आणि बांधेसूद शरीर, या सगळ्याचा सार्थ अभिमान त्यांच्या शब्दांतून ओसंडून वाहत असे नेहमी. तसाच तो आत्ता त्यांचं नाव सांगताना जाणवत होता.

‘‘मी रमेश जाधव बोलतोय…’’
‘‘नमस्कार जाधवसर, मी ‘अखिल भारतीय छायाचित्रकार संघा’तून किरण मुळीक बोलतो आहे. आपलं अभिनंदन करण्यासाठी फोन करतो आहे. आपलं छायाचित्र Please save me याला या वर्षीचं पहिलं बक्षीस मिळालं आहे. दहा लाख रुपये आणि मानपत्र असं हे बक्षीस आहे.’’
‘‘धन्यवाद! तुमचे आणि छायाचित्रकार संघाचे. आपण माझ्या चित्रातले सौंदर्यगुण हेरलेत आणि माझा सन्मान केल्याबद्दल…’’ रमेश जाधव आपल्या आनंदावर नियंत्रण ठेवत म्हणाले. हे असले पुरस्कार आपल्याला नेहमी मिळतात आणि त्यात काही विशेष नाही, असा समोरच्या माणसाचा ग्रह झाला पाहिजे, असं रमेश जाधवांना दाखवायचं होतं.
‘‘आपण आज दुपारी चार वाजता घरी थांबू शकाल का? आमचे कार्यवाह अजित होळकर तुम्हाला भेटायला येणार आहेत. हा सन्मान तुम्हाला मिळाल्याचं पत्र ते तुम्हाला देतील. पुरस्कार समारंभ मुंबईला पुढच्या महिन्यात १० तारखेला आहे. त्याचं आमंत्रणसुद्धा ते देतील.’’
‘‘मी नक्की थांबेन. अजित होळकर हेसुद्धा एक प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत. आमची ओळख आहेच. मलासुद्धा त्यांना भेटायला आवडेल.’’
मग थोडा वेळ असंच काहीतरी अति नम्रपणे बोलून रमेश जाधवांनी फोन ठेवला. समोरच्याशी नेहमी नम्रपणे आणि आपुलकीनं बोलण्याची लकब त्यांनी आत्मसात केली होती. स्वतःचं मार्केटिंग करायला याचा खूप उपयोग होतो, असा त्यांचा अनुभव होता.

‘‘उमा, उर्मिले… ताबडतोब बाहेर या… एक आनंदाची बातमी आहे.’’ रमेशनी पुकारा केला. त्यांची मुलगी उमा आणि पत्नी उर्मिला लगबगीनं बाहेर आल्या. बातमी ऐकून त्यांचासुद्धा आनंद गगनात मावेना. मग उमानं विचारलं, ‘‘बाबा तो फोटो कुठे आहे? आपण तो मस्त फ्रेम करून घेऊ.’’
रमेशनी मग तो फोटो उमाच्या हवाली केला. ती थोड्या वेळानं तो फोटो फ्रेम करून आणणार होती. मग उर्मिला- त्यांची पत्नी- आपले सर्व नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना फोन करायच्या मागे लागली. रमेश मग किती तरी वेळ आपल्या आवडत्या खुर्चीत बसून त्या फोटोचा विचार करायला लागले.

कोल्हापूरला मोठा पूर आला आहे. पंचगंगा शहरात शिरली आहे, अशा बातम्या यायला लागल्यापासूनच रमेश जाधव कोल्हापुरात जाऊन तिथली अवस्था आपल्या कॅमेर्‍यात टिपून ठेवायला अधीर झाले होते. पण तिकडे जायचे रस्ते बंद आहेत. शहरात जाणं म्हणजे जिवाला धोका आहे, असं समजल्यानं त्यांनी आपलं जाणं पुढे ढकललं होतं. थोडा पाऊस आणि पूर कमी झाल्यावर ते कोल्हापुरात पोचले होते. गावाबाहेर एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम ठोकला होता. मग आपल्या कॅमेर्‍यााची बॅग घेऊन ते रिक्षानं गावाजवळ पोचले. तिथून चालत ते गावातला पूर पाहायला बाहेर पडले. दिवसभर काहीही न खाता त्यांनी बराच भाग पिंजून काढला. पूर आता बराच उतरला होता, पण गावाचं नुकसान खूप झालं होतं. कितीतरी घरं पडली होती. झाडं पडली होती. रस्त्यात सगळीकडे चिखल आणि वाहून आलेली घाण पसरली होती. त्यांनी बरेच फोटो काढले, पण त्यांना हवा तसा फोटो काही मिळत नव्हता. एखादी नाव भाड्यानं घेऊन नदीच्या मुख्य पात्राजवळ जायला हवं होतं. बरीच शोधाशोध आणि अनेक ओळखीच्या लोकांना फोन केल्यावर ‘राष्ट्रीय संघ’ नावाच्या संस्थेचे लोक अनेक रबरी बोटी घेऊन लोकांना मदत पोचवायला जात होते. एका बोटीतून त्यांनी रमेश जाधवांना घेऊन जायचं कबूल केलं. मग दुसर्‍या दिवशी सकाळी दहाला बोटीतून जाऊन तिथल्या परिस्थितीचे फोटो काढायचे. त्यांचा निश्चय पक्का झाला.

हा बक्षीस मिळालेला फोटो त्यांनी कसा काढला, हे आठवून आत्तासुद्धा त्यांच्या अंगावर काटा आला. पंचगंगा नदी काठाचं एक छोटंसं गाव. त्या गावाचं नावसुद्धा त्यांना आठवत नव्हतं. का त्यांच्या अंतर्मनाला ती आठवणसुद्धा नको होती म्हणून ते नाव कुठेतरी आत खोल मनाच्या कोपर्‍यात दडून बसलं होतं? कुणास ठाऊक? ‘राष्ट्रीय संघा’च्या दोन स्वयंसेवकांसोबत त्यांच्या रबरी बोटीतून रमेश जाधव त्या गावात गेले होते. गावात बरंच पाणी शिरलं होतं. घरांचं बरंच नुकसान झालं होतं. घराघरांत जाऊन पिण्याचं पाणी आणि अन्नाची पाकिटं यांचं वाटप करत त्यांची रबरी बोट गावाच्या मध्यभागी आली. इथून पुढे पाण्याचा ओघ खूप जोरात होता. डोंगरावरून येणारं पाणी थोड्याच अंतरावर असलेल्या नदीत वेगानं मिसळत होतं. पाऊस आता थांबला होता, तरी पाण्याचा जोर कमी झालेला नव्हता. एका घरापाशी बोट बांधून स्वयंसेवक गुडघ्यापर्यंत येणार्‍या पाण्यातून वाट काढत पाणी आणि अन्नाची पाकिटं वाटत होते. रमेश जाधव बोटीत बसून वेगवेगळे फोटो काढत होते. त्यांनी रेनकोट आणि पावसाळी बूट घातले होते. ते वेगवेगळ्या बाजूंनी नुकसानीचे फोटो काढत होते. तेवढ्यात एकदम काही स्वयंसेवक जोरात ओरडले. ‘‘मुलगी पाण्यात पडली… वाचवा वाचवाऽऽऽ’’

जाधवांनी आपल्या डावीकडे बघितलं, तर एक लहान मुलगी पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत येत होती. जाधवांनी आपला कॅमेरा सरसावला. डोक्यात आपोआप त्यांचे आडाखे सुरू झाले.
‘अंतर किती आहे? प्रकाश कसा आहे? ती मुलगी आपल्या जवळ केव्हा येईल? तेव्हा अंतर किती असेल?’ त्यांनी झूम लेन्स फिरवली. आता ती मुलगी त्यांच्या बोटीपासून अगदी सहा-सात फुटांवर आली. जाधवांनी लेन्समधून पाहिलं. त्या मुलीनं आपले दोन्ही हात उंच केले होते. चेहर्‍यावर भयचकित भाव… तोंडावर आलेले अस्ताव्यस्त केस… तिचे काळेभोर डोळे जणू त्यांच्याकडे आशेनं पाहत होते. मग ती जाधवांच्या बोटीजवळ आली. तिनं एक हात जाधवांच्या दिशेनं उचलला. एकच क्षण… जाधवांना वाटलं, जणू काळ थांबलेला आहे. खळाळत्या पाण्याचा आवाज… लोकांचा आरडाओरडा… त्यांना काही म्हणजे काही ऐकू येईनासं झालं. त्यांनी कॅमेर्‍याचं बटन दाबलं. मग एक क्षणभर कॅमेर्‍याच्या स्क्रीनवर पाहिलं. सगळ्या यांत्रिक हालचाली. वर्षानुवर्षं फोटो काढण्याचा अनुभव… जणू प्रतिक्षिप्त क्रिया… मग ते एकदम भानावर आले. गळ्यातला कॅमेरा एका हातानं बाजूला सरकवत पुढे झुकून आपला एक हात त्या मुलीच्या दिशेनं केला. त्या मुलीच्या त्यांच्या दिशेनं पुढे केलेल्या हाताचा त्यांना पुसटसा स्पर्श झाला, असं त्यांना वाटलं. का तो भास होता? ती मुलगी पाण्याच्या ओघात पुढे जोरात ओढली गेली. हा हा म्हणता एकदम पाण्यात बुडाली. एक-दोघांनी प्रवाहात उडी मारून त्या मुलीला शोधायचा प्रयत्न केला. पण ती मुलगी एकदम दिसेनाशी झाली. त्या गढूळ पाण्याचा प्रवाह मग तसाच जणू काहीच घडलं नाही अशा आविर्भावात वाहत राहिला. तिला शोधायला पाण्यात उतरलेले निराश होऊन कसेबसे परत आले. जाधव किती तरी वेळ सुन्न होऊन एकदा आपल्या कॅमेर्‍याकडे आणि एकदा पाण्याच्या प्रवाहाकडे पाहत राहिले. ते तिथून परत कसे आले, पुण्यापर्यंत प्रवास त्यांनी कसा केला, हे सगळं जाधवांना अगदी अंधुकसं आठवत होतं.

दोन-तीन दिवस असे बधीरतेनं गेल्यावर त्यांनी काढलेला तो त्या मुलीचा फोटो चेक केला. आपण आत्तापर्यंत काढलेल्या फोटोत हा सर्वोत्तम फोटो आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तो योग्य प्रक्रिया करून ‘अखिल भारतीय छायाचित्रकार संघा’च्या स्पर्धेसाठी पाठवून दिला. आत्तापर्यंत त्यांनी अनेक वेळा या स्पर्धेत भाग घेतला होता, पण त्यांना नेहमी दुसरं किवा तिसरं बक्षीस मिळत असे. या फोटोला मात्र आपल्याला पहिलं बक्षीस मिळणार, याची त्यांना खात्री होती आणि झालंसुद्धा तसंच.
रमेश जाधवांना पहिलं बक्षीस मिळालं. त्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. ते बक्षीस जाहीर झालं आणि जणू पुढचे काही दिवस त्यांच्या घरात धामधूम सुरू झाली. त्यांचं अभिनंदन करणारे फोन सारखे येत होते. घरात वेगवेगळ्या लोकांकडून सारखे पुष्पगुच्छ येत होते. मग मुंबईला ते पुरस्कार घेण्यासाठी गेले. त्या समारंभाला त्यांची मुलगी उमा आणि पत्नी उर्मिलासुद्धा आल्या होत्या. त्यांचे कितीतरी मित्र आणि प्रथितयश छायाचित्रकार उपस्थित होते. समारंभानंतर त्या सर्वांशी हस्तांदोलन करता करता त्यांचा हात दुखायला लागला.

मग किती तरी दिवस रमेश जाधव त्या प्रसिद्धीच्या झोतात स्वतःला विसरून गेले. कितीतरी वृत्तपत्रांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. एका संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत दूरचित्रवाणीवर आपली मुलाखत ते पाहत होते. मुलाखत संपल्यावर त्यांनी उमाचा- आपल्या मुलीचा- हात हातात घेतला आणि एका अतीव समाधानानं ते तिला म्हणाले,
‘‘मग उमा, एका प्रसिद्ध छायाचित्रकाराची मुलगी असल्याचा तुला अभिमान वाटतो आहे का नाही?’’
त्यांच्या बायकोनंसुद्धा त्यांच्याकडे कौतुकानं पाहत हसून त्यांना दाद दिली.
उमा मात्र एकदम गंभीर झाली. ती म्हणाली,
‘‘नक्कीच अभिमान वाटतो बाबा. तुम्हाला हे बक्षीस मिळालं. मला आनंदच आहे. तुमचं हे चित्र अतिशय वेधक आहे. सभोवतालचं वातावरण… नदीचं खळाळतं पाणी… आणि तिचं ते रौद्र रूप आणि त्यातून असाहाय्यपणे वाहून जात असणार्‍या त्या लहान मुलीच्या चेहर्‍यावरचे भाव तुम्ही योग्य क्षणी कॅमेर्‍यात पकडले आहेत. पण…’’
‘‘पण काय बेटा?’’
‘‘तुम्ही रागावणार नसाल, तर एक विचारू?’’
‘‘नाही रागावणार. तुझं मत मला नेहमीच अमूल्य वाटतं.’’
‘‘तुम्ही हे छायाचित्र मला दाखवलं, तेव्हापासून माझ्या मनात हा प्रश्न आहे. त्या वाहून जाणार्‍या कोवळ्या मुलीचं पुढे काय झालं? तिला पाण्यातून कुणी बाहेर काढलं का? तिला कुणी तरी वाचवलं का?’’

रमेश जाधवांच्या अंगावर वीज पडावी असं झालं. उमाची… या आपल्या मुलीची त्यांना मनातल्या मनात खूप भीती वाटे. ती किती तरी वेळा असे नको ते प्रश्न विचारत असे. असे अंतरंगात भिडणारे प्रश्न तिनं विचारू नयेत, असं त्यांना नेहमी वाटे. त्यांनी आपल्याभोवती हे प्रसिद्धीचं. आपल्या उत्कृष्ट छायाचित्रकार असण्याचं, आपण खूप पैसा मिळवला आहे, आपण खूप यशस्वी आहोत, याचं जे एक वलय निर्माण केलं होतं ते भेदून थेट आपल्या अंतरंगात घुसायचं कसब हिनं कुठून मिळवलं? ते बराच वेळ शांत बसले. त्यांनी पुन्हा एकदा तो प्रसंग डोळ्यांसमोर आणला. नदीचा तो पूर, ते उग्र रूप, गढूळ पाणी, रबरी बोटीत बसून फोटो काढणारे ते… आणि त्या पाण्यातून वेगानं वाहत जाणारी ती लहान मुलगी. तिचे काळेभोर डोळे… घाबरलेल्या हरिणीसारखे… त्यांच्या दिशेनं केलेला तिचा लहानगा हात… सगळं आठवलं. मग आठवलं आपल्या कॅमेर्‍यातून त्या मुलीकडे पाहणारे ते स्वतः… त्यांच्या डोक्यातल्या सभोवारच्या प्रकाशाची जाणीव… कोणत्या कोनातून कॅमेरा रोखायचा? चेहर्‍यावर कसा फोकस करायचा? आणि त्या वेळी त्या मुलीच्या वाहत जाण्याचा वेग याचं गणित…
सगळं आठवलं. त्यांनी कॅमेर्‍याचं बटन दाबताच झालेला खर्र… टक असा विशिष्ट आवाज… त्यांचा अतिशय आवडता… सगळं आठवलं. अगदी स्पष्ट.
‘‘मला नीटसं सांगता येणार नाही उमा. मी कॅमेरा डोळ्यांसमोरून बाजूला केला. अवतीभोवती लोकांचा आरडाओरडा सुरू होता. एक-दोघांनी पाण्यात उडीसुद्धा घेतली होती, पण त्यांना पाण्याच्या जोरामुळे परत यावं लागलं. तोपर्यंत ती मुलगी प्रवाहाबरोबर पुढे गेली. पुढे कुणी तरी तिला वाचवली असेल. त्या क्षणी… पाणी वाढतं आहे आणि आपल्याला कॅमेरा सांभाळत सुखरूप परत पुण्याला परत जायचं आहे, इतकीच जाणीव माझ्या मनात होती.’’

उमा एकदम जागेवरून उठली. त्यांच्या शेजारून उठली. जणू तिला त्यांच्यात आणि तिच्यात अंतर निर्माण करायचं होतं. थोडी पुढे जाऊन खिडकीपाशी उभी राहिली. बाहेर पाहत तशीच स्तब्ध… मग हळूच तशीच त्यांच्याकडे न बघता म्हणाली,
‘‘म्हणजे आपण काढलेला फोटो चांगला आला असेल का? आपण कॅमेर्‍यासहित सुखरूप परत जायला पाहिजे, याची जाणीव होती. पण त्या मुलीचं काय झालं, असा पुसटसा प्रश्नसुद्धा तुमच्या डोक्यात नव्हता?’’
‘‘हे बघ उमा, मी छायाचित्रकार आहे. तो माझा व्यवसाय आहे. माझा कॅमेरा मला जीव की प्राण आहे. हे प्रश्न माझ्या डोक्यात असणारच ना? आणि ती मुलगी माझ्या डोळ्यांसमोर समोर वाहून गेली. तिचं काय झालं, हा प्रश्न कुठेतरी मनात नक्कीच होता.’’ रमेश जाधव कसंबसं म्हणाले.
‘‘बरोबर आहे बाबा. तुम्ही छायाचित्रकार आहात. पण त्याआधी तुम्ही माणूस आहात ना?’’ असं म्हणत उमा खिडकीपासून बाजूला झाली. मग परत त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. अगदी त्यांच्यासमोर. मग नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या हातानं आपले केस डोळ्यांवरून मागे घेत तिनं अगदी सहजपणे प्रश्न केला,
‘‘बाबा, मला सांगा… जर तुम्ही फोटो घेत नसता आणि त्या बोटीतून पुढे झुकून त्या मुलीचे हात पकडून त्या मुलीला तुमच्या बोटीत खेचले असते, तर ती मुलगी वाचली असती का?’’
प्रसिद्ध छायाचित्रकार रमेश जाधवांनी आपली मान खाली घातली. एक अस्पष्ट हुंदका त्यांच्या घशातून बाहेर पडला. आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही डोळ्यांवर घट्ट दाबून धरत ते अगदी अस्पष्टपणे म्हणाले,
‘‘हाच प्रश्न उमा मला त्या क्षणापासून छळतो आहे. फोटोच्या मागे लागलो नसतो, तर… मी त्या मुलीला वाचवू शकलो असतो का? उत्तम छायाचित्रकार होण्याच्या नादात माणूस म्हणून मी नालायक ठरलो का? सर्वोत्तम फोटो मिळाला, पण त्यासाठी त्या अश्राप मुलीचा जीव गेला का? नाही उमा, माझ्याकडे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.’’

मग प्रसिद्ध छायाचित्रकार रमेश जाधव सोफ्यावरून उठले आणि काहीही न बोलता आपल्या बेडरूममध्ये निघून गेले आणि त्यांनी धाडकन दार लावून घेतलं. तो आवाज मग किती तरी वेळ उमाच्या आणि उर्मिलेच्या मनात घुमत राहिला.

– जयंत नाईक

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.