Now Reading
नाईट बिफोर वेडिंग

नाईट बिफोर वेडिंग

Menaka Prakashan

‘एक, दोन, तीन, चार… हुश्श हुश्श! जमेल जमेल आपल्याला…’ रमानं जागच्या जागी दहापर्यंत आकडे मोजत उड्या मारल्या. उड्यांपेक्षा काळजीनं तिला श्‍वास लागला.
ओढण्यांची दोरी सोडून तिनं तिसर्‍या मजल्यावरून खाली वाकून पाहिलं. ती वैतागलीच.
‘शीट! हे तर मधेच लटकतंय. आता आणखी एक ओढणी कुठून आणू. जिथवर लटकतीये तिथवर घसरून उडी मारावी का?’ तिनं पुन्हा खाली वाकून अंदाज घेतला. उंची माहीत असूनही तिला दचकायला झालं. ‘पडलो बिडलो तर क्कायच्या काय भावात जाईल ते. नाय नाय नाय. पण मग आता…’ रमा नखं कुरतडत विचार करू लागली. आणि तिला एका मस्त कल्पना सुचली. तिनं पटकन आपली लेगिंग्ज घेतली. ती ओढणीला बांधली.

‘बेस्ट!’ ती स्वत:वर खूष झाली आणि पुढच्या क्षणी तिला एका वास्तवाची जाणीव झाली. ‘बेस्ट काय? मधेच टरटर फाटत गेली तर…! कसली डोकेदुखीये ही. किती वेळची मी या बेसिकमध्ये अडकलेय. गच्चीकडे तोंड करायचं की पाठ… ओढण्यांची गाठ ओढून बघावी की नको… यदाकदाचित बॅडलकीत ती सुटलीच, तर काय करायचं… कशाची कशाला टोटल नाहीये. त्या पिक्चरमधल्या नटव्यांना कसं जमतं रे? दहा सेकंदांत सातआठ ओढण्यांना एकेकच गाठ मारतात अन् त्यावरून तश्शा सर्रकन खाली उतरतात. वरून त्यांच्या अंगावर तो भरगच्च गरारा-शरारा असतो. भलेमोठ्ठे दागिने आणि वरून तो इतका थापलेला ब्रायडल मेकअप. आणि मी इथे चार-चार गाठी मारतीये, तरी मला भीती वाटतेय. मोठा अवघड कार्यक्रम झालाय. इथून सुखरूप पळाले ना, की पिक्चरमधल्या सगळ्या पळून जाणार्‍या नटव्यांची लिस्ट करून केस ठोकणार त्यांच्यावर. फिक्शनच्या नावावर किती फसवायचं!’
रमाची अखंड उलघाल सुरू होती. तिला कसंही करून उद्याचं तिचं लग्न टाळायचं होतं. हां, पण त्यासाठी तिला ओढण्यांवरून उतरणं भाग होतं आणि त्यावरून नेमकं कसं उतरायचं, हेच तिला ठरवता येत नव्हतं…

तिची चिडचिड जाम वाढली होती. एकतर रात्रीचे साडेबारा झाले होते. अजून जरा वेळ गेला, तर अक्षतांचा पाऊस इथूनच सुरू होईल, अशी एक सुप्त भीती वाटू लागली होती. तिला तर सनईचा आवाजही ऐकू येऊ लागला होता. तिनं दीर्घ श्‍वास घेतला. मनाचा हिय्या केला. मोजून दोन जोड ड्रेसेस घेतलेली बॅग आधी लॉनवर खाली फेकली. ओढणी आणि लेगिंग्जची केलेली भेळ रेलिंगवरून खाली सोडली आणि… आणि… आणि… आपटली. पाठीवर दण्णकन आपटली. फार जोरात नसलं, तरी एकदम आपटल्यानं घटकाभर तिला काही सुधरलं नाही.
दोनेक मिनिटांनी रमाचं डोकं ताळ्यावर आलं. पार्श्‍वभाग चोळत ती उभी राहिली. जिथून पळून जायचा ती विचार करत होती ते मामाचं फार्महाऊस तिच्यासाठी नवीन नव्हतं. दर दिवाळी-उन्हाळी सुट्टी तिची इथेच तर गेली होती. त्यामुळे अंधारातही मोबाईलच्या नुसत्या स्क्रीनच्या उजेडातही तिला पुढचा सगळा रस्ता नीट कळत होता. तेवढ्याशा सोयीनंही ती खुषीत आली. ‘फार्महाऊसवर लग्न करण्याचा हट्ट केला नसता ना, तर आत्ता तुमच्या भाचीची अशी सोय झाली नसती. लव यू मामा…’ विचार करता करता तिचं लक्ष टेरेसकडे गेलं. टेरेसवरचे हॅलोजन व्यवस्थित सुरू होते. तिथे तिची भावंडं पत्ते कुटत बसली होती.

‘या येडचापांना माझ्या लग्नात नखरे करायचेत, नटण्या-थटण्याचं प्लॅनिंग करायचंय, पोरींवर टप्पे टाकायचेत. यांच्यातल्या एकाला तरी नवरी-नवर्‍याचं काही पडलंय का? एक मिनिट… मी स्वत:ला नवरी का म्हणते आहे? आपण तर पुढच्या पाचच मिनिटांत इथून वन्टास होऊ.’ तिनं स्वत:ला एक टपली मारली.
अंधारात जवळ जवळ धावत ती अर्ध्या मिनिटात बंगल्याच्या मागच्या मांडवापाशी पोचली. तेवढ्यात तिला आई आणि मामा बोलत उभे दिसले. आपल्याला कुणी सुखासुखी पळून जाऊच देणार नाही का? तसंही ही वेळंय का गप्पाटप्पा करण्याची… दुरूनच पण ते दोघं काय बोलतायेत ते ऐकण्याचा प्रयत्न करू लागली.
आई मामाला म्हणत होती, ‘‘दादा, कुणालसाठी आणलेला पांढरा कुर्ता रमाच्या बॅगेतच ठेवलाय. सकाळी तो हळदीच्या वेळी मागेल, तेव्हा तुझ्या लक्षात असू दे.’’
‘‘हो, ते माहितीये मला.’’ मामा.
रमाला मात्र कुणालचा कुर्ता तिच्या बॅगेत ठेवलाय, हे ऐकून फारच विचित्र वाटलं. ‘ही काय शाणपत्ती! माझ्या बॅगेत कुणालचा कुर्ता का ठेवायचा? त्याचा आणि माझा आणि माझ्या बॅगेचा काऽऽऽय संबंध!… या मोठ्यांना मनानंच उचापात्या करायला कोण सांगतं… किमान आधी मला विचारायचं तरी…’ रागानं ती फसफसत होती. मग एकदम साक्षात्कारी क्षण गवसावा तशी शांत झाली. मग स्वत:लाच तिनं हलकं हलकं थोपटलं, ‘कूल रमा, कूल… आपल्याला ना त्या बॅगेची गरज पडणारे, ना कुणालला त्या कुर्त्याची.’
तेवढ्यात तिला पुन्हा आईचा आवाज आला. ‘‘बरं दादा, ऐक ना, तुला ह्यांचा स्वभाव माहितीये ना. अप्पांसारखेच फटकळेत रे. आता अप्पांना काय बोलणार, पण तू ह्यांंना तरी समजावून सांग बाबा.’’
‘‘हो, दाजींना मघाशीच समजावलंय. तू हे सारखं काळजी करायचं सोडून दे. तुझी लेक चांगल्या घरात चाललीये. मी कुणालला त्याच्या लहानपणापासून पाहतोय, एकदम चांगला मुलगा आहे.’’

‘‘ते काय मला माहीत नाही का आणि तुझ्यावर आहे विश्‍वास… तरी सगळंच कसं घाईत झालंय ना. तीनच आठवड्यांत बघणं, बैठक आणि उद्या… उद्या कुठे? आत्ता बारा वाजून गेलेत म्हणजे आज सकाळीच लग्नाचा मुहूर्त. कुणाल एकदा माझ्या रमाला भेटला असता, तर कसं छान झालं असतं. पण तो ना बघण्याच्या कार्यक्रमाला आला, ना नंतर. वेळच पुरेसा नव्हता म्हणा. म्हणजे कामानिमित्त तो बाहेरगावी अडकला, मान्य. तरी… रमासुद्धा आठ दिवस ‘हे असं लग्न ठरवतात का’ म्हणून धुसफुसत होती. अप्पांमुळे गप्प राहावं लागतं, पण म्हणून रमावर अन्याय नको ना व्हायला. आता काल तो भेटला, तेव्हा फारच बरं वाटलं. रमाशी ज्या आदबीनं तो बोलत होता. तिची छोट्या छोट्या गोष्टीत जशी काळजी घेत होता, ते पाहून सुखावले मी. पहिल्या भेटीतच त्याच्याविषयी जिव्हाळा वाटू लागलाय. मुलांच्या राजीखुषीनं व्हावं इतकंच तर आपलं म्हणणंं.’’

‘ओ हालो… इकडे बघा. एका भेटीत कुणालचं इतकं कौतुक… त्याच्याविषयी आपुलकी… कमाल! पंचवीस वर्षांपासून मला बघतायेत, तर माझ्या मला काय हवं ते कुणालाच ओळखता येईना…’
आई आणि मामा दोघांनाही तिनं जाताना पाहिलं, तशी तीही चालायला लागली. दोन मिनिटांत ती मागच्या गेटपाशी पोचलीच असती, पण पुढच्या सेकंदाला तिनं कपाळावर हात मारून घेतला. मामानं त्या बाजूचं गेट केटरिंगवाले, फुलवाले, सजावटवाले यांच्यासाठी आधीच उघडून ठेवलेलं होतं. एक छोटा टेम्पोही गेटवर उभा होता, त्यातून सामानाची ने-आण सुरू होती. कामगारांची ये-जा सुरू होती. तरी तिनं विचार केला, की ‘आपण सरळ चालत गेलो, तर कुणाला काय कळायचंय. केटरिंग, सजावटवाल्यांना काय माहीत नवरी कशी दिसते.’
पण पुढे होण्याआधी ती जागीच खिळली. गेटवर तिचे तीन-तीन हट्टेकट्टे नौजवान बंधू उभे होते. सख्खा भाऊ दीपक, मामेभाऊ राज आणि संज्या. दीपकनं ‘स्टॅच्यू’ दिल्यावरही ती एका जागी खिळायची नाही, पण आत्ता त्यांना पाहून तिचे पाय जमिनीत रुतून बसले. रमाला धडकी भरली. तेवढ्यात ते गेटवरून माघारी चालायला लागले. त्यांच्या वीस-पंचवीस ढांगांत रमाची ग्रेटभेट त्यांना एकदमच शक्य होती.
रमाला समोरच एक डेरेदार झुडूप दिसलं. पुढचा मागचा विचार न करता ती त्याच्यामागे लपली. तेवढ्यात दोन घुशी एकामागून एक तिच्या पायावरून सुळसुळत गेल्या. रमा दबक्या आवाजात किंचाळून बाजूला पळाली आणि एकदम आदळली. तशी त्या आवाजानं झुडपाजवळच्या बेंचवर बसलेला कुणाल दचकला.
‘‘कोणंय?’’ तोही एकदम ओरडला.

कुणाल अर्ध्या तासापासून त्या झुडपाजवळच होता. त्याच्या कंपनीचा मुख्य क्लाएंट न्यूयॉर्कबेस्ड होता. त्यामुळे पंधरा दिवसांच्या सुट्टीवर जाण्याआधी सविस्तर बोलण्यासाठी तो लॉनवर आला होता. चर्चेतले मुद्दे मेल करण्यात गुंतला होता, एवढ्यात रमाच्या पडण्याच्या आवाजानं दचकला.
मोबाईलच्या टॅार्चमध्ये तो इकडे तिकडे बघू लागला. प्रकाशानं रमाचे डोळे दिपले.
‘‘अरे, कोण आहे बोलत का नाहीये?’’
रमा टॉर्चच्या प्रकाशानं इरिटेट झाली. ‘आता हा कोणंय… पार डोळ्यांत लाईट मारतोय.’ विचार करत तिनं झटकन मागे वळून पाहिलं. भावड्यांनी कूच केली होती. कुणालला काहीही कळायच्या आत तिनं त्याच्या हातातला मोबाईल हिसकावला आणि दुसर्‍या हातानं कुणालच्या नाकावर जोराचा बुक्का मारला. हे इतकं क्षणार्धात घडलं, की कुणाल चांगलाच बावचळून गेला. आता पुढे काय करायचं, हे रमाला सुचत नव्हतं. पण तोवर कुणाल भानावर आला होता.
‘फक! व्हॉट नॉनसेन्स…’ म्हणत त्यानं तिचा हात मागे उलटा वळवला आणि चेहर्‍यावरचा स्कार्फ खसकन खेचला. समोर रमाला पाहून पुढचे काही सेकंद तो चमत्कारिक मौनात गेला. रमाही कुणालला पाहून चांगलीच गांगरली. रमाचा चेहरा विलक्षण केविलवाणा झाला. धडपडल्या जागेवर तसाच स्तिमित होऊन कुणालनं ‘रमाऽऽऽ’ असा आश्‍चयोद्गार काढला.

‘‘रमा, तू…! अगं, पडलीस कशी? वरून मलाच असा पंच मारून मोबाईल हिसकावलास. हा काय प्रकार आहे.’’ तो नाक चोळू लागला.
‘‘अरे, पंच ना… हां हां, पंच. म्हणजे तसा काही माझा विचार नव्हता. एकदम चुकून… अगदी चुकूनच बसला.’’
‘‘चुकून? आर यू शुअर?’’ कुणालनं अविश्‍वासानं तिच्याकडे बघितलं.
‘‘अरे, म्हणजे तू मधेच असा कडमडलास, त्यामुळे मी पण कडमडले. अं, म्हणजे घाबरले. त्यात तू ती मवाल्यासारखा डोळ्यांत लाईट मारलास. तो डोळ्यांत… डोक्यात गेला म्हणून दिला ठेवून बुक्का… तू मधेच असा आला नसतास, तर मी कशाला दिला असता ना तुला दणका. म्हणजे आपण काय शत्रू नाहीयोत… आपलं काही बिनसलं नाहीये. आपण ओक्के आहोत. वुई आर लाईक फ्रेंड्स… फिलॉसॉफर… आणि वाटाड्या. मितवा… अं, म्हणजे जाऊदे ना कुणाल…’’ रमा त्याच्या झाडाझडतीनं त्रासून गेली.
कुणाल मात्र अजूनही तिच्या बोलण्याचा अर्थ लावत होता. ‘‘तू, काय बोलतीयेस. मी डोळ्यांत लाईट कशाला मारेन. मी तर आवाज झाला, कुणी तरी पडलंय म्हणून पाहायला चटकन आलोे. तू असं डोळ्यांत लाईटबिट काय… मी खरंच तुला मवाली वाटतोय?’’
रमा ः ‘‘नाही, मी कुठे असं म्हणाले.’’
कुणाल ः ‘‘आत्ताच तर म्हणालीस…ते मवाल्यासारखं टॉर्च…’’
रमा ः ‘‘हां. जाऊदे ना. तू किती ताणतोय. सॉरी म्हणाले ना तुला.’’
कुणाल ः ‘‘कधी? कधी म्हणालीस?’’
रमा ः ‘‘म्हणाले की. परत एकदा म्हणते. सॉरी. मला माहीत नव्हतं तू आहेस म्हणून.’’
यानंतर काही क्षण कुणीच काही बोललं नाही. एक अवघड शांतता होती. अचानकच का होईना, पण रमाला भेटण्याची संधी मिळाल्यानं कुणाल खूष झाला होता. पण रमाला तिथून शक्य तितक्या लवकर पळून जायचं होतं. अवघड शांततेवर शेवटी रमानंच बाण मारला.
रमा ः ‘‘कुणाल, अच्छा! ओके बाय!’’
कुणाल ः ‘‘बाय? बाय काय? आत्ताच तर आलीस. अगं, पण इतक्या रात्रीची तू इथे काय करत होतीस?’’
यावर एकदम रमानं आवाज चढवत त्यालाच उलट विचारलं, ‘‘तू इतक्या रात्रीचा इथे काय करत होतास?’’
कुणाल ः ‘‘मी तर फोन करण्यासाठी… अगं, पण मी तुला विचारलंय ना.’’
रमा ः ‘‘मी पण तुला विचारतेय ना.’’
कुणाल ः ‘‘बरं बाई, मी आधी सांगतो… मग तू सांग. मी माझ्या क्लाएंटशी बोलायला आलो होतो. तिथे एकतर रेंज नाही. रेंज मिळालीच तरी आधीच बंगल्यात केवढा गोंधळ सुरूये… जरा शांतता हवी होती म्हणून इथे आलो. तू?’’
रमा ः ‘‘अं, तेच की. तेच. बंगल्यात किती गोंगाट ना… म्हणून.’’
कुणाल ः ‘‘म्हणून?’’
रमा ः ‘‘म्हणून… म्हणून… मी… मी इथे आले.’’
कुणाल ः ‘‘हां, पण इतक्या लांब? तुला कुणी अडवलं नाही? तुझ्यावर पाळत ठेवून आज्याबिज्या बसल्या नाहीत? नाही, ते काय नवर्‍या मुलीला बाहेर कुठे जाऊ देत नाहीत ना.’’
रमा ः ‘‘आणि नवर्‍या मुलानं फिरायचं का गावभर. ते चालतं का? त्याच्यावर आज्या पाळत ठेवायला नसतात?’’
कुणाल ः ‘‘ओह माय गॉड! इतका राग! चिल! मी सहज म्हणालो. आया-आज्या म्हणत असतात ना, नव्या नवरीनं हळद लागली, चुडा भरला, की इकडे तिकडे जाऊ नये दृष्ट लागते, नजर लागते काईंड ऑफ. आणि तसं त्या मलाही म्हणत असतात बरं… त्यावरून मला वाटलं, आमच्यासारख्या सनातन आज्या तुमच्याकडेही काठ्या रोवून उभ्या असतील… त्यात तुमचं गाव तालुक्याचं म्हटल्यावर हमखास असणार. कालपासूनच मी अशा नजर पेरून असणार्‍या लहानथोरांच्या आयस्कॅनर झोनमध्ये आहे. पण काळजी करू नकोस, माझा अशा भाकडगप्पांवर विश्‍वास नाहीये. ऑन द कॉन्टररी, नवरी लग्नाच्या दिवशी पार्लरमधूनच नाही का येत?’’

रमा त्याचं म्हणणं ऐकल्यावर शांत झाली. आपण उगीचच तणतणलो, असं तिला वाटलं. पण तरीही अजिबात माघार न घेता रमा त्याला ‘एनीवे गुड फॉर यू’ असं म्हणून तिनं जमिनीला टेका देऊन उठण्याचा प्रयत्न केला. रमाची आपलंच घोडं दामटण्याची तर्‍हा पाहून कुणालला हसू आलं. तो उठून उभा राहिला आणि त्यानं रमापुढे हात धरला.
‘‘बरं दे, हात दे.’’
‘‘का? हात कशाला?’’ तो मदतीसाठी हात देतोय, हे लक्षात न आल्यानं रमा एकदम फिस्कारली. पण कुणाल तिला मिश्किलपणे म्हणाला, ‘‘भविष्य बघायला! अगं, उठायला मदत करतोय.’’
‘‘ओह… हां… नको. माझी मला मदत करता येते.’’
‘‘आणि दुसर्‍याचं नाक तोडता येतं. आईगं! सॉलिड बसलाय पंच. नाक अजून चुरचुरतंय… हात आहे की हतोडा!’’
रमानं स्वत:वर खूष होत ‘थँक्स’ म्हटलं.
‘‘हेय! इट वॉजन्ट अ कॉम्प्लिमेंट…’’
‘‘आय नो, पण बघनेवाली की नजर पे डिपेंड करता हैं।’’ असं म्हणून ती हसू लागली.

कुणाल हसू लागला. ‘‘तुझा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त दिसतोय. मला ना, तुझ्या या वाक्यावरून किस्सा आठवला एक. शाळेतले सर एकदा रागावून म्हणाले होते, ‘एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? कानांत तेल घालून ऐकत जा.’ झालं. एक वर्गमैत्रीण दुसर्‍या दिवसापासून कानांत तेल घालून येऊ लागली. सर तिला म्हणाले, ‘अगं, तो वाक्प्रचार आहे.’ तर ती हुशार. सरांना म्हणे, ‘हो, पण ते कुणीतरी करून पाहिल्यावरच लक्षात आलं असेल कानांत तेल घातलं, की नीट ऐकू येतं. मला तर उलट कानांत गुदगुद होतंय…’ ’’
‘‘हंहंहं वियर्ड… इट इज सो वियर्ड?’’ रमा खोटं हसत म्हणाली.
‘‘ए, पण तू नाहीस ना तशी वियर्ड. म्हणजे मघापासून तू जे बोलतेय ते हिब्रू असल्यासारखंच वाटतंय मला.’’ बोलता बोलता त्याच्या लक्षात आलं, की रमानं चेहर्‍याभोवती स्कार्फ वगैरे व्यवस्थित गुंडाळलेला होता. तिच्या पाठीवर बॅग पण दिसत होती आणि ती एखाद्या चोरासारखीच या झुडपातून बाहेर येऊन धडपडली होती. तो क्षणभर नजर रोखून तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या एकटक पाहण्यानं रमा अस्वस्थ झाली. तिनं नजर फेरली, पण कुणालनं विचारलं, ‘‘तू हे असं इतकं स्कार्फ वगैरे पॅक बांधून बंगल्यापासून इतक्या लांब का आलीस? तेही अशी चोरासारखी. मी तुला येण्याविषयी मघाशीही विचारलं, तर तू काय तर भलत्याच ट्रेनमध्ये मला चढवलंस…’’
‘‘माझ्यावर शंका घेतोयस की काय…?’’ रमानं चलाखीनं डाव उलटवायचा प्रयत्न केला.
‘‘अगं ए, मी फक्त स्वाभाविक प्रश्‍न विचारला. आता परत म्हणशील शंका घेतोय, पण ही सॅक? स्कार्फ? तुझं रात्रीच्या एक वाजता असं बाहेर निघणं… काही कळत नाहीये. तुझं नेमकं चाललंय काय? वरून मलाच शंका घेतोय म्हण… तुला सांगायचं नसेल तर ठीके. इतर कुणाला तरी विचारतो.’’
‘आता झाली का पंचाईत. इतर कुणाला हा विचारणार म्हणजे सगळं बिंग आत्ताच फुटेल.’

‘‘इतरांना काय विचारायचंय… मी सांगते ना…अं, हां. जॉगिंग. स्कार्फ बांधून जॉगिंग केल्याने रक्तप्रवाह चांगला होतो. प्रदूषित वारा नाकात जात नाही ना…’’
‘‘कुठल्या जमान्यातलं सायन्स आहे हे… स्कार्फ बांधून जॉगिंग. प्लीज हं, तू असल्या भाकडगप्पांवर विश्‍वास ठेवत असशील, यावर माझा विश्‍वास नाहीये. काय आहे ते सरळ सांग.’’ कुणाल बोलायचा एकाएकी थांबला. त्याच्या एकदम लक्षात आलं, की रमा नुसतीच जॉगिंग करण्याविषयी बोलत नाहीये, तर तिनं जॉगिंगचा टीशर्ट-ट्राऊझरही घातलाय. तो आश्‍चर्यानं ओरडलाच, ‘‘तू खरंच जॉगिंग ड्रेसमध्ये आहेस की. तू भलतीच हेल्थ कॉन्शस दिसतेस… पण हे जरा अति आहे असं नाही वाटत का आणि या जॉगिंगशी तुझ्या सॅकचा काय संबंध?’’ कुणाल टोटल बुचकळ्यात पडला होता. पण रमा फुल फॉर्ममध्ये आली होती. ती एकाहून एक वाट्टेल ते अजब बोलत होती.
‘‘हं, ते आर्मी शाळेत होते ना. तू पिक्चरमध्ये पाहिलं नाहीस? ग्राऊंडवर सॅक घेऊन पळायला लावतात ते.’’
‘‘शाळेत? ते डिफेन्सच्या ट्रेनिंगमध्ये करतात. रमा, तू… तुझं सगळं व्यवस्थित आहे ना… डोकं ताळ्यावर तर आहे ना. तापबिप, आजारी नाहीस ना… म्हणजे आता एक वाजता तू जॉगिंग काय… सॅक काय… मला तुझी काळजी वाटतीये… रमा, आर यू ओके?’’
‘‘नाही ना, अजिबात बरं नाहीये. दोन दिवस जॉगिंग करायला मिळालं नाही ना, म्हणून जरा गिल्ट येत होता. म्हणजे रोजची सवय आहे ना मला… नाही केलं की रात्रीची झोप येत नाही. जॉगिंग केलं की कसा घाम सुटतो. मग कसं फ्रेश वाटतं. व्यायाम झाला की मन शांत राहतं. मन शांत राहिल्यानं आपल्या अंतर्मनाच्या चेतना जागतात. चेतना जागृत असल्या की शरीर प्रसन्न राहतं… आणि… शरीर प्रसन्न असलं की…’’

‘‘हां हां हां, आलं आलं लक्षात.’’
‘‘हां, तर चल, मी निघते आता. जॉगिंग करते आणि जाऊन झोपते.’’
‘‘चल, मग मीही तुझ्यासोबत जॉगिंग करतो. आपण जरा फिरून येऊयात का? तसंही तुझ्यासोबत वेळच कुठे मिळालाय. कालपासून तुला एकटीला भेटण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, पण मित्रांनी सोडलंच नाही. रमा, तू मला भेटायला उत्सुक नव्हतीस? या चांदणप्रकाशात… लग्नाच्या अगदी काही घटिका आधी तू माझ्या इतकी जवळ… असा विचारही मी केला नव्हता. आयुष्याची कसली रोमॅन्टिक सुरुवात आहे ही… तू भलेही कशासाठीही इथून चालली असशील, पण आपलं भेटणं मुकर्रर होतं तर…’’
रमा अस्वस्थ होती. तिच्या चेहर्‍यावर सटकून जायचे भाव होते. कुणाल मात्र तिच्याकडे हसतमुखानं पाहत होता. त्याला आत्ता सारं जग गोठून जावं, असं वाटत होतं. कसंही करून रमानं अजून थोडा वेळ थांबावं, अशी कुणालची इच्छा होती. तो स्वत:हूनच हळुवारपणे म्हणाला, ‘‘रमा, आय थिंक देअर इज समथिंग मोअर इम्पॉर्टंट दॅन जॉगिंग. आपलं लग्न ठरल्यापासून आपल्याला एकांतच मिळालेला नाही, म्हणजे बोलायला. संवाद साधायलाही मिळालेला नाही.’’
‘‘ती तुझी चूक. तुला वेळ नव्हता.’’ रमा नाक फुगवत म्हणाली.
‘‘अं हो, माझ्यामुळेच नाही झालं. सॉरी फॉर दॅट.’’ तो अपराधभावानं म्हणाला. कुणालचा अपसेट झालेला चेहरा पाहून मग रमाच म्हणाली, ‘‘उद्या बोलूयात की निवांत. आपल्याला काय कामंय उद्या. मी तुला फोन टाकेन की. पण आत्ता कसंय ना मी ते चक्कर…’’
रमाचं जॉगिंग, चक्करपुराण संपत नाही म्हटल्यावर कुणालही जरा वैतागला. थोडासा खडसावूनच म्हणाला, ‘‘तुझा काय वेडेपणा चाललाय गं? एखाददिवशी नाही केलंस जॉगिंग तर चालत नाही का?’’
‘‘नाही ना! नाही चालत. देवाला नवस केलेला असतो. तोडता…’’
कुणालनं रमाच्या ओठांवर बोट ठेवून तिला गप्प केलं.
‘‘नॉट मच बट कॅन वुई हॅव लिटील ग्रेसफुल टॉक बिसाईड धिस जागिंग अँड ऑल? माझ्या कामामुळे आपल्याला भेटता आलं नाही, मान्य! पण आत्ता काय हरकत आहे? माहितीये, तसंही उद्या आपलं लग्न आहे. पण त्याआधी मित्रासारखे बोलूयात की… प्लीज. लग्नाच्या आधल्या रात्री असं भेटायचा कितीजणांना चान्स मिळतो? इथे कुणीही नाही. हा छान एकांत. भंकस करण्यापेक्षा एकमेकांबद्दल बोलूूया ना…’’ कुणाल तिच्या डोळ्यांत पाहत होता. त्याच्या अशा अचानक एकशे ऐंशी डिग्रीत बदललेल्या टोननं रमा गारद झाली होती.
तो तिच्या आणखी थोडा जवळ येतोय, हे लक्षात येताच रमा म्हणाली, ‘‘अं हा… तू म्हणतोस ते बरोबरंय. खूप रात्र झालीये. रात्रीची झोप झाली, तरच आपण उद्या फ्रेश दिसू. व्यायामाची ही वेळ नाहीये. एखाद्या दिवशी चक्कर न मारल्यानं बिघडत नाही. हं, रात्र झालीये. गुड नाईट.’’ असं म्हणून रमा सरळ चालायलाच लागली.

कुणाल तिच्या रूक्ष वागणुकीनं पुरता गोंधळला. एका सेकंदात फीलिंग्जचा कचरा. ‘मी बोललो ते तिला कळलंच नसेल का? की मुद्दामच आपल्याला उचकवायला असं करतीये.’ तिच्याशी एकांतात बोलण्या-भेटण्याची ही चालून आलेली संधी अशीच सोडून देणं त्याच्या जिवावर आलं होतं. त्याला ती थोड्या वेळापूर्वी संगीत प्रोग्रॅममध्ये डान्स करताना जवळ आलेली रमा आठवली. पण ते पुन्हा सर्वांदेखत होतं… आप्तेष्टांच्या नजरकैदेत… अंतर राखून. त्याला आत्ता असा तिच्याशी समोरासमोर वेळ घालवायचा होता. काय करावं ते त्याला सुचत नव्हतं.
दुसरीकडे कुणाल मागे मागे येऊ लागल्यानं रमाला फार वेग वाढवता येत नव्हता, तिनं कुणालला काहीबाही थापा मारल्या, तरी इतर कुणी समोर उभा राहिलं, तर तिची काहीच खैर नव्हती. मागच्या गेटमधून पळायचं इतकंच ठरवलं होतं. त्यामुळे आगंतुकासारख्या येऊन भेटलेल्या या घोटाळ्यांना कसं हाताळायचं हे तिला कळतं नव्हतं. कुणालनं पिच्छा सोडला नाही, तर बंगल्यालाच प्रदक्षिणा घालत बसाव्या लागतील, याची तिला पूर्ण जाणीव होती. लग्नापासून पळायचं आणि नवरदेवानंच गाठायचं, अशी भलतीच गोची झाली होती.
कुणालनंच दोन-चार ढांगांत तिला गाठलं.
‘‘रमा, तुला चक्करच मारायची होती ना… मग मी काय म्हणतो, आपण इथून बाहेर जाऊन एक चक्कर मारली तर…’’
‘‘नाही, मला झोप येतीय.’’
‘‘तू उगाच भाव खातीयेस, असं नाही वाटत तुला?’’
‘‘उगाच नाही, मी खरंच भाव खातीये.’’
कुणालनं तिचा हात धरून तिथल्याच एका बेंचवर बसवलं. ‘‘जाशील, माहितीये किती झोप येतीये तुला! डोळे तर टकाटक उघडेत. मघाशी तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायची राहिली. संगीत प्रोग्रॅममध्ये सॉलिड दिसत होतीस तू. आय मीन आत्तासुद्धा, पण मघाशी जास्त. आणि तू जो डान्स परफॉर्म केलास ना… बाप! एकदम बाप! तुला ना खोटं वाटेल, पण मला खरंच तिथलं कुठलंच म्युझिक ऐकू येत नव्हतं. मला फक्त तुझे श्‍वास ऐकू येत होते. फुल फ्लॅट झालो मी…’’ बोलता बोलता त्यानं तिच्या केसांमध्ये अडकलेलं गवत काढलं. त्याच्या स्पर्शानं रमाच्या संपूर्ण शरीरभर विजा कडाडल्या. ती झटदिशी काही अंतर बाजूला सरकली. तोही सहजपणे तिच्या बाजूला सरकला.
‘‘पण ते पुलावासोबत इडली-सांबांराचं कॉम्बिनेशन बेक्कार होतं.’’ कुणाल मघाचं जेवण आठवून म्हणाला.
‘‘इडली-सांबार? पुलावासोबत इडली सांबार होतं? काय सांगतोयस. माझ्यापर्यंत तर पुलावही आला नाही म्हणा. मला तर साखरेत पोहत असलेला शिरा दिला होता. नवरीनं गोडच खायचं असतं म्हणे. हां, तरीच त्या दिवशी आजी इतकी उचकली होती. मुलाकडच्यांना जेवणातलं काही कळत नाही, असं म्हणत होती ते याच्यावरून होय… सॉरी बॉस! पण हा मेनूच तुमच्याकडून आला होता.’’
‘‘होऽऽऽ! मग हे असलं सजेशन मामाचं असणार. त्याला बेक्कार आवडते इडली. हॉलभर सांबाराचा वास पसरला होता. यु नो, जेवणाच्या वेळी त्या सांबाराच्या वासानं मला एकाएकी आपलं लग्न म्हणजे साऊथची फिल्म वाटायला लागली होती. म्हणजे कुठल्याही क्षणी ढीगभर गुंड अवतरतील. हातात चाकू-सुरे, मग लुंगीतला हिरो… आणि मग तो तमीळमध्ये म्हणेल, ‘रमा इज माय लव्ह…’ आणि मग तू त्याच्यासोबत पळून चाललीयेस…’’
‘‘काहीही…’’ रमाचा चेहरा गोरामोरा झाला.
‘‘शीट! तू मिस केलंस. मला वाटलं, म्हणशील, ‘तमीळमध्ये रमा इज माय लव्ह कसं म्हणेल?’ ’’
‘‘गुड जोक!’’ असं म्हणनू रमा खोटं हसली. तो पळून जाण्याविषयी बोलायला लागला, तशी रमाची उगीच धाकधूक वाढली. नर्व्हसनेस तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसू लागला. ते कुणालच्या लक्षात आलं.
‘‘तुझा चेहरा काय असा पिवळा पडलाय… आय वॉज जस्ट जोकिंग यार!’’
‘‘याह, आय नो. खरंतर मला लुंगीवाले हिरो आवडतात… विजय सेतुपती, सिद्धार्थ, फहाद, दलकिर, नवाझ…’’
‘‘नवाझ! तो साऊथचा नाही.’’
‘‘असूदे रे, पण तो बर्‍याचदा लुंगी घालतो… काय यार! कसलं भारी वाटलं असतं ना साऊथचा हिरो येऊन म्हणतोय रमा इज माय लव्ह…’’
‘‘पण मी म्हणू शकतो.’’ कुणाल मिश्किलपणे म्हणाला.
‘‘तू काय साऊथचा हिरो आहेस?’’ रमा त्याला उडवून लावत म्हणाली.
कुणाल त्यावर काहीतरी बोलणार होता, पण तितक्यात रमाच्या छोट्या काकाचा आवाज आला.
‘‘अरे पोरांनो, काय करताय रं तिकडं तुमी… झोपायचं सोडून गप्पा काय झाडताय…’’ हाक अगदी शंभर फूट अंतरावरून आली होती. रमा आणि कुणाल दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघंही क्षणभर गळाठले, पण लगेच त्यांच्या लक्षात आलं, ते पोरांना म्हणजे रमाच्या भावंडांना म्हणत होते. तरी त्यानं मान वळवून जरा इकडे तिकडे पाहिलं असतं, तर रमा-कुणाल त्याच्या नजरेच्या टप्प्यात होते. अंधार असला तरी झाडाझुडपांतल्या हालचालींना काकाची नजर चांगलीच सरावलेली होती. रमा मग झटकन उसाच्या बागेत शिरली. तिच्या मागे कुणालही.

उसाच्या त्या उंचच पिकातून रमा वाट काढत होती, तसा कुणालही तिच्या मागे मागे चालत होता. रात्रीचा मस्त गार आणि भणाण वारा सुटला होता. पिकं डुलत होती.
‘‘तुला ऊस असा डायरेक्ट दातांनी चावून खाता येतो का?’’ कुणालनं विचारता विचारता हातानं अ‍ॅक्शन केली, पण रमानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
‘‘माझ्या आत्याच्या गावालाही अशीच बाग आहे. आम्हा भांवडांत सर्वात जास्त ऊस कोण खाणार म्हणून स्पर्धा लागायची. एकजण सत्तूर घेऊन बसणार उसाच्या खोंडाचे तुकडे करणार… आणि पोरांनी ते खायचे. ज्याच्या सर्वात जास्त चिवट्या असतील तो जिंकला. पण नुसतंच तोंडात घेतलं आणि चावून फेकलं असं नाही हं. नीट एकदम चावून चावून चोथा झालाय अशा दिसणार्‍याच चिवट्या मोजल्या जायच्या…’’ कुणाल बोलत सुटला होता. रमा खिशातून मोबाईल काढून त्यावर वेळ पाहत होती. ‘‘तू काय गं नुसतंच इग्नोर मारतीयेस’’ म्हणत तो तिच्याजवळ सरकला आणि तिच्यामागचं दृश्य बघून स्तंभित झाला. समोर झोपडीवजा घर, किंवा घरवजा झोपडी असंच काहीसं होतं. झोपडीसारखं उतरत्या कौलांचं छप्पर. चारही बाजूंनी अर्धवट बांधलेल्या दगडी भिंती. आत लाकडी पसरट बेंच. राखण ठेवायला आलेला माणूस निवांत झोपू शकेल इतका पसरट. झोपडीत मंद पिवळा प्रकाश. तो प्रकाश आणि तिथली एकूण रचनाच इतकी लोभस होती, की कुणालच्या तोंडून सहजच ‘‘वॉव! सच अ रोमँटिक प्लेस!’’ असे शब्द बाहेर पडले.

ती जागाच तशी होती. रमाची तर अगदी फेवरेट. पण आत्ताच्या एकूण परिस्थितीत रमाला काहीही रोमँटिक वाटत नव्हतं. शिवाय गेल्या आठ दिवसांत तिच्यासमोर उठताबसता चिमटे काढत, चिडवाचिडवी करत प्रेम, रोमान्स, रोमँटिकपणा, लग्न, हनीमून, सोबत, सहवास, अमकंढमकं या शब्दांची इतक्यांदा उजळणी झाली होती, की आता त्या शब्दांचा कुणी सहजही उच्चार केला, तरी ती चिडीला येत होती. पण रमानं चिडून काहीतरी बोलण्याआधी कुणालच त्या जागेविषयी भरभरून बोलू लागला.
‘‘ए रमा, आधी का नाही सांगितलंस या जागेविषयी. उगीच काय तो कृत्रिम फुलांचा खोटा डिझायनर मांडव घालण्यापेक्षा इथेच लग्नमंडप उभारला असता की. या जागेला आतूनच हॅप्पीवाला फील आहे. समोर शेत, डोंगर आणि दूर कुठेतरी झुळझुळ वाहणार्‍या नदीचा आवाज. फार मस्त वाटतंय इथे.’’
रमाची उलघाल वाढत होती. मागच्या अर्ध्या तासापासून ती त्याच्यापासून दूर जाण्याचा जितका प्रयत्न करत होती, तितका पेच वाढत होता. तो तिला क्षणभरही डोळ्यांआड होऊ देत नव्हता. त्यामुळे त्याला चकवून पळण्याची तिला एकही संधी मिळत नव्हती. ‘हा काही बर्‍या बोलानं जाणार नाही, काही तरी ठोस करावं लागणार…’ रमा असा विचार करत होती. तिची तंद्री लागल्याचं पाहून कुणालनं मुद्दामच घसा खाकरला. ती भानावर आली.
‘‘कसला ताजेपणा आहे ना इथे. पहाटे तर काय बाप दिसत असेल चारही बाजूंनी.’’ कुणाल आजूबाजूला पाहत म्हणाला.
‘‘हे बघ कुणाल, तुला ही जागा आवडलीये ना, तू इथे मस्त चिल कर. पण आता प्लीज, माझ्या मागे मागे येऊ नको. तिथून बंगल्याकडे जायला रस्ता आहे. मीही निघते. खूपच उशीर झालाय. टाटा बाय बाय!’’

‘‘सारखं सारखं काय जायचं जायचं लावलंयसय’’ कुणाल किंचित चिडून म्हणाला. ती दचकली. कुणालनं कानाला हात लावून लागेच सॉरी म्हटलं. त्यानं तिचा हात हातात घेऊन तिला थोडं जवळ खेचलं. मग कट्ट्यावर बसण्याचा इशारा केला. रमा बसली नाही. तिनं हात सोडवून घेतला. कुणालनं पुन्हा तिला इशार्‍यानंच बसण्याची खूण केली. किंचित वैतागत पण रमा कट्ट्यावर बसली.
‘‘तू तर काय त्या लाजर्‍याबुजर्‍या मुलींसारखी नाहीस. आत्ताही तशी तू काही लाजतबिजत नाहीयेस, मग सारखंच काय टाटा बाय बाय…’’ बोलता बोलता कुणाल तिच्याजवळ सरकला. त्यानं तिचा हात हातात घेतला. ‘‘रमा, तू मला उगाच त्रास देण्यासाठी मुद्दाम असं इग्नोर मारणं, ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं करत आहेस, की खरंच माझं काही चुकलंय. मी मघापासून पाहतोय, माझ्याशी बोलण्यात तुला जराही इंटरेस्ट नाहीये. तू वेगळ्याच कुठल्या तरी धुंदीत आहेस.’’
कुणालनं तिची अवस्था ओळखली, ही गोष्ट तिला आवडली होती. तिच्या मनात पहिल्यांदा त्याच्याविषयी एक पॉझिटिव्ह रिमार्क होता- सेन्सिबल गाय… रमा काहीच बोलत नाहीये, असं पाहून तो पुन्हा तिला कंफर्टेबल करण्याच्या प्रयत्नात म्हणाला,
‘‘सी, इफ यु आर नर्व्हस देन दॅट आय कॅन अंडरस्टँड. मी दाखवत नसलो, तरी मी पण नर्व्हस आहे, पण तू मला टाळते आहेस वाटतंय, का?’’
रमानं थोडीशी चुळबूळ केली.

काय बोलावं ते तिला सुचत नव्हतं. ती जागची उठली. आपल्याला हे लग्न करायचं नाहीये आणि त्यासाठी पळून जायचंय हे त्याला सांगवं तरी कसं, हे तिला आता ठरवता येत नव्हतं. ती पाठमोरी झाली. तरीही तिला जाणवत होतं, की तो तिच्याकडेच पाहतोय. त्याला झुलवत ठेवण्यापेक्षा काहीतरी बोलणं गरजेचं आहे म्हणून तिनं रँडमलीच त्याला विचारलं, ‘‘तुला चिमामांडा एन्गोझी माहितीये? ती म्हणत असतेे, ‘वुई शूड ऑल बी फेमिनिस्ट…’ ’’
‘‘व्हॉट! आर यु क्रेझी… मी काय विचारतोय तू काय बोलतीयेस…’’ त्यानं तिला खांद्याला धरून वळवलं.
‘‘मी पण ना, वेडीच आहे. तुला कशाला माहीत असेल ती? तिची पुस्तकं. जस्ट फर्गेट. मी आपलं सहज आठवलं म्हणून विचारलं.’’
‘‘ओके, तुला मी विचारतोय ते टाळायचं असेल, तर मी यावर काय बोलणार…’’ कुणाल नाराजीनं म्हणाला, ‘‘आणि… माहितीये मला. वाचतो मी. आधी तिचा टेड टॉक झालाय मग त्याचंच पुस्तक. राजकीय-आर्थिक-सामाजिक स्तरावरची समता असा फेमिनिस्टचा सुंदर अर्थ सांगितलाय तिनं… आता काय! अशी काय अवाक् होऊन पाहतेस… मला काय अंगठाबहाद्दर समजत होतीस.’’
‘‘तू अशी पुस्तकंसुद्धा वाचतोस? मग फबीवर तर तू हत्ती-मुंगीचे विनोद, नाहीतर गुड मॉर्निंग… अगर तुम्हारे ख्वाब बडे है तो संघर्ष कैसे छोटा हो सकता है… असला येडझवेपणा का शेअर करतोस? बर्‍या गोष्टी टाकता नाही आल्या, तर टाकूच नये काही. झुक्यानं थोडंच कम्पल्सरी केलंय.’’
‘‘वंडरफुल! तू माझी वॉल फॉलो करतेस? मग माझी फ्रेंड रिक्वेस्ट का अ‍ॅक्सेप्ट केली नाहीस?’’

चूक पकडली गेल्याने रमानं सवयीनं डोळे मोठ्ठे केले. पण आपल्याकडेही त्याच्यासाठी एक वार आहे, हे लक्षात येऊन तिनं लगेच तलवार काढली, ‘‘नुसत्या फोटोवरून लग्न ठरवणार्‍यावरून त्याची अक्कल एफबीवरच्या पोस्टवरून लक्षात आल्यावर रिक्वेस्टी अ‍ॅक्सेप्ट करून वाढीव घोळ कशाला करायचा.’’
‘‘म्हणजे? काय म्हणायचंय काय तुला? मी बेअक्कल. आणि फोटोवरून लग्न ठरवलं म्हणजे काय? स्पष्ट बोलशील?’’ कुणालही उसळून म्हणाला.
‘‘शहाण्याला शब्द कळतो. ती त्या चिमामांडाची पणजीसुद्धा फेमिनिस्ट होती. मनाविरुद्ध लग्न होणार होतं, तर पळून गेली आणि आवडत्या माणसाशी लग्न केलं. आता बघ हां तिची पणजी. त्यात नायजेरिया. त्यातलं कुठलंसं खेडं. तिचा तो काळ. मागास… त्यात तिनं हे धाडस करावं म्हणजे…’’ रमानं भुवया उंचावल्या. तिच्या वागण्याचा अर्थ जणू ती कुणालला विचारत होती. मघाशी उसळून आलेला कुणाल काहीच न बोलता तिच्याकडे पाहत होता. ही घटना सांगण्याचं कुणाल जणू प्रयोजन विचारत होता. रमा अस्वस्थ झाली.

‘‘तू असा काय टकाटका पाहतोय…’’
‘‘मघापासून तू जे पळायचं पळायचं म्हणतीये ते हे पळायचंय… लग्नापासून…’’
रमा काही क्षण गप्पच राहिली. मघापासून त्याला टाळावं, त्याला कळू नये, पण पळावं यासाठी तिचे हजार प्रयत्न सुरू होते. पण इतकं सरळ स्पष्टपणे त्यानं विचारल्याने ती क्षणभर कचरली, पण क्षणभरच. दुसर्‍याच क्षणी तिनंही स्पष्टपणे त्याला उत्तर दिलं,
‘‘मला हे लग्न करायचं नाहीये.’’
‘‘का?’’
‘‘मला हे लग्न करायचं नाहीये. कुठलंही अरेंज मॅरेज एकदम पकाऊ, टाकाऊ आणि फ्रस्टेटिंग असतंय. मी भलेही छोट्या शहरात वाढलेली असेन. कुटुंबाच्या असंख्य मनमान्यांना त्यांचे संस्कार म्हणत चालवून घेतलं असेल, पण लग्नाच्या बाबतीत… आय कान्ट टेक रिस्क.’’
कुणालनं एक अस्वस्थपणे फेरी मारली. मग तो क्षीण हसला. ‘‘तुला लग्न नकोय. पण ते कळून कसं घेऊ? आणि मग मघाशी काय होतं ते… काही तासांपूर्वीचीच तर गोष्ट. तूच होतीस ना त्या संगीत नावाच्या प्रोग्रममध्ये फुल ऑन कल्ला करणारी. खुर्चीतून अजिबात उठायला तयार नसणार्‍या सगळ्या लहानथोरांना डान्स करायला लावणारी. तूच होतीस ना? आणि मग माझ्याकडे पाहून ‘आके मेरे आंगन में वापस ना जाना…’ म्हणत दिलखेच परफॉर्म केलंस ते काय होतं… आणि मी डान्स करणार नव्हतो, तरी मला गळ घालून माझ्यासाठीसुद्धा गाणं निवडणारी तूच होतीस ना… गाणं काय होतं, ‘तेनू लेके मै जावंगा…’ आणि आता तू तर एकटीच पळायच्या बेतात. मी पार गोंधळून गेलोय.’’

‘‘तो धिंगाणा घालणारीदेखील मीच होते… तर मग काय? त्याचा काय संबंध? लग्नाच्या आदल्या रात्री जर संगीत नावाचा बॉलिवुडप्रकार करायचा असं ठरलंच असेल आणि सकाळ-संध्याकाळ गाणं ठरलं का, डान्स ठरवला का, अशी कानीकपाळी गर्जना होत राहिल्यावर मी काय करणं अपेक्षित आहे? शिवाय, मला आवडतं नाचायला. नाचासाठी मी काय पण करू शकते, हे अख्ख्या गावाला माहितीये. अशा वेळी मी जर नाचणार नाही म्हटलं, तर कुणी माझं ऐकलं असतं. शंभर प्रश्‍न, त्यांचे शंभर उपप्रश्‍न. त्यापेक्षा नाचलेलं बरं, असं वाटलं मला. तुला काय माहितीये माझ्याविषयी? मी ना कितीही नाचू शकते? पण नाचत होते, कल्ला करत होते म्हणून लग्न नाही करू शकत.’’ ती वैतागली.
‘‘मग आधीच पळून जायचंस ना.’’
‘‘गेले असते, पण चान्स मिळाला नाही.’’
‘‘म्हणून इतकं बेभान होऊन नाचत होतीस. म्हणे, डान्स इज माय पॅशन…’’
‘‘ए हॅलो, डान्स इज डिफरन्ट अँड मॅरेज इज डिफरन्ट.’’
‘‘एक्झॅक्टली! डान्स इज डिफरन्ट अँड मॅरेज इज डिफरन्ट.’’
‘‘हं, पण तुला कुठे कळतंय ते. हे बघ इतके दिवस लग्नाच्या नावानं होत असलेली हौसमौज, कपड्यांची खरेदी, दागिन्यांची खरेदी पाहून मी आपला एकेक दिवस लोटला. शॉपिंगमुळे उलट ताण थोडासा घालवायला मदत झाली.’’
‘‘ओह! सीरिअसली रमा, लग्नाची खरेदी म्हणजे काय तुला कॅज्युअल हौसमौज वाटली?’’
‘‘आय अ‍ॅम सॉरी, पण नुसत्या फोटोवरून मुलगी पसंत करणार्‍या मुलानं मला तरी कॅज्युअलनेसविषयी काही सांगूच नये.’’
‘‘याचा अर्थ काय? मघाशीदेखील तू हेच असं काहीतरी बोललीस.’’
‘‘मग स्पष्ट सांगते. नुसता फोटो पाहून तू हे लग्न ठरवलंस ना? असं कोण करतं? तेही आजच्या या डेटिंग अ‍ॅपच्या काळात. इतका महत्त्वाचा निर्णय इतक्या बेफिकिरीनं…’’
‘‘ए, बेफिकिरीनं नाही. अच्छा, अच्छा… तुला वाटतंय, हा निर्णय मी कॅज्युअली घेतलाय. मी कसा असा मूर्खपणा करेन. तू मला खरंच आवडलीयेस. मी तुला पहिल्यांदा पाहिलेलं तेव्हाच…’’
‘‘पहिल्यांदा म्हणजे कधी? फोटोतच पाहिलंस ना? फोटो पाहून काय कळतं? कुणाल, तू मेट्रोसिटीत राहतोस. मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पोस्टवर आहेस. एखाद्या शर्टचा फोटो कुणीतरी सिलेक्ट करून पाठवावा, तशी तू पार्टनरची निवड करणार? आणि वर हाईट बघ… लग्नाच्या आधी घरोबा वाढावा, ओळखी वाढाव्यात म्हणून या फार्महाऊसवर रमा अँड फॅमिली… कुणाल अँड फॅमिली यांनी लग्नाच्या दोन दिवस आधीच एकत्र यायचं ठरवलं. पण त्यांच्यापैकी कुणाला हे नाही वाटलं, की तुझी आणि माझी ओळख होणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण आयुष्यभराची गाठ बांधायची ती कशाच्या आधारे, तर एका फोटोच्या आधारे…’’ रमा ताडताड बोलत होती.

कुणाल तिच्याकडे फक्त बघत राहिला. त्याला स्वत:ची रिअ‍ॅक्शनच ठरवता येत नव्हती. तो सुन्न होऊन कट्ट्याला रेलून उभा राहिला. तशी तीच पुन्हा बोलू लागली, ‘‘महिन्यापूर्वी मामी तिच्या मावसबहिणीच्या चुलतभावाच्या मुलाचं म्हणजे तुझं स्थळ घेऊन आली. तुझ्या घरून पाहण्याच्या कार्यक्रमासाठी पंचवीसएकजण आले. पण त्यात नवरामुलगा नाही. अनोळखी माणसाशी बोलू नये म्हणणारी हीच माणसं ‘लग्नाची पहिली रात्र’ म्हणत दोन अनोळखी माणसांना एका खोलीत डांबतात. याला लग्न म्हणायचं. अगदी दुपारपर्यंत मी मला पटवायचा प्रयत्न करत होते. जगात अशी लग्नं होतात रमा, चिल. पण जस जशी वेळ पुढे सरकतीये ना, मी… मी… मला कळतंय, लग्नासाठी माझी मानसिक तयारी झालेली नाहीये… सॉरी, नाही जमणार मला. आय हॅव टू गो.’’
तिचं बोलून झालं, तरी कुणाल काहीच बोलला नाही. ती नकार देतीये हे कळत होतं, तरी तो शांतच होता. मोजकेच निःशब्दतेचे बोचरे क्षण हवेत विरून गेल्यावर कुणाल तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. तिच्याकडे एका दुखर्‍या नजरेनं पण स्मित करून म्हणाला,
‘‘तुझं बरोबर आहे. आपण कुणाही अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करणं हा मूर्खपणाच आहे. लग्नाआधी नात्यात किमान मैत्री तर हवीच. पण तू हे थोडं आधी का नाही सांगितलं? इतकं सगळं असं तोंडावर आल्यावर… म्हणजे मला माहितीये, मी आसाममध्ये दुर्गम गावात होतो. कनेक्टिव्हिटी नव्हती. पण परवा सकाळी तिथून बाहेर पडल्याबरोबर मी तुला कॉल केला. दिवसातून तीन-चारदा तरी बोललो, तेव्हा तरी सांगायचं. संध्याकाळी व्हिडिओकॉलमध्ये तर तू किती कूल दिसत होतीस.’’
‘‘पर्सनल कॉल नव्हतेच ते. अप्पा समोर असायचे. व्हिडिओकॉलच्या वेळेस तर झाडून सगळेच आजूबाजूला उभे होते. कसं आणि काय सांगणार होते. आणि हा विषय मेसेजवर बोलण्यासारखा नव्हता. त्यामुळे मी स्वत:लाच तयार करण्याचा प्रयत्न केला. नाही जमलं रे. शिवाय तूही कुणा अनोळख्या मुलीबरोबर का लग्न करावं? कुणाल, आय नो की माझ्या या निर्णयामुळे अचानक खूप गोंधळ होणार आहे. स्पेशली तुला सॉरी. माझी वेळ चुकलीये, पण इतकीही नाही. सो… बाय मिस्टर कुणाल.’’
कुणाल क्षणभर विचारात पडला. रमा सॅक घेऊन स्कार्फ बांधून उभी राहिली.
‘‘रमा, एकदा परत सांगशील… तुला हे लग्न करायचं नाहीये ना…’’
‘‘किती वेळा तेच विचारशील?’’
‘‘म्हणजे निर्णय पक्का आहे, राईट?’’
‘‘दोनशे टक्के फायनल.’’
तो एक सुस्कारा सोडत म्हणाला, ‘‘ओके, मग बस इथे.’’ रमानं डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं.

‘‘बस, बस म्हणतोय ना… दोन मिनिटं तर बोलता येईलच… लाईक अ‍ॅडल्ट्स! तुला लग्न करायचं नाहीये, तर तू इथून जायची गरज नाहीये. हे तुझ्या मामाचं गाव आहे. इथून उद्या आम्ही जाणारच आहोत. सी… पळून जाणं हे सोल्युशन होऊ शकत नाही. तू निघून गेलीस, तर इथे नुसता गोंधळ नाही, तर जगबुडीच येईल. अपमान, मनस्ताप, भांडण अँड व्हॉट नॉट… आहेत त्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड करण्यात काय अर्थ आहे. तुझा निर्णय नक्की आहे. मी तुझ्यासोबत आहे. तर मग पळून जाऊन गुंता कशाला वाढवायचा?’’
‘‘हॅ! तू माझ्या अप्पांना ओळखत नाहीस. मी इथे थांबले ना, तर उद्या मांडवात दिसणारच.’’
‘‘अगं, पण तू घर सोडून गेलीस, तर घरी परत यायचा चान्स राहतो का? तुला सोप्पं वाटतंय का हे पळून जाणं? मग कित्येक जण/कित्येक जणी गेल्या नसत्या का…’’
‘‘प्लीज, तू माझा गोंधळ करू नको. किती डेअरिंग करून मी हा निर्णय घेतलाय ते माझं मला माहीत. आता परत माघार नाही घेणार.’’
‘‘पळून जाण्यासाठी तू हिंमत गोळा करू शकतेस, तर तुला जे सांगायचं त्यासाठी नाही? जस्ट फेस देम.’’
‘‘नो मॅन! कुण्णी ऐकणार नाही. मोठाच राडा होईल.’’
‘‘आणि तुझ्या घर सोडून जाण्यानं होणार नाही? हे बघ, मी तुझ्यासोबत आहे ना. तुला इमोशनल ब्लॅकमेल करतायेत, असं दिसलं तर मी स्वत: हे लग्न मोडेन. तुझ्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही. झालं तर.’’ रमानं त्याच्याकडे पाहिलं. तो खरं बोलतोय यात तिला कुठलीच शंका वाटली नाही. थोडा वेळ तीदेखील शांतच राहिली. विचार करत राहिली. पळून जाणं हा मार्ग तर तिलाही प्रशस्त वाटत नव्हता, पण पर्याय नाही म्हणून तो निवडला होता आणि पहिल्यांदाच तिचं कुणीतरी ऐकून घेत होतं. सोबत करण्याची भाषा बोलत होतं. ती गोंधळली. काय करावं कळेनासं झालं तिला.
तो तिला पुन्हा म्हणाला, ‘‘तुझ्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही, ट्रस्ट मी. आय विल नॉट लेट यू डाऊन.’’
‘‘तू… आय मीन कॅन आय रिअली… ट्रस्ट…’’
‘‘डोळे झाकून विश्‍वास ठेव. प्रेम नसतानाही लग्नं होतात… टिकतातही… प्रेम असताना लग्नं होतात अन् ती काही वेळा तुटतातही… पण या सगळ्यात जर मैत्री अजिबातच नसेल ना… तर मग त्या नात्याला कसला फ्लेवरच नसतो. मला मनापासून तुझी बाजू पटलीये आणि मी तुला पाठिंबा देणार.’’
‘‘थँक्स कुणाल. थँक्य यू सो मच!’’
‘‘लग्नाला नकार दिला म्हणून?’’
‘‘माझं ऐकल्याबद्दल आणि मला समजून घेतल्याबद्दल.’’
‘ते तर आयुष्यभर करणार होतो मी…’ कुणालच्या अगदी ओठांवर आलेले हे शब्द त्यानं एका स्मिताअल्याड दाबून टाकले.
‘‘कुणाल, मघाशी मी ताडताड बोलले. सॉरी…’’
‘‘नाही गं. सॉरी कशाला. बोललीस म्हणून तर कळलं.’’ रमानं स्मित केलं. मन मोकळं झाल्यानं तिला अगदी हलकं हलकं वाटत होतं. तो दुखावला होता, पण तिच्या मनाविरुद्धही त्याला काही करायचं नव्हतंच. ती खूष आहे म्हटल्यावर तोही स्वत:च्या मनात शांतता अनुभवत होता. ती ‘निघूयात’ असं म्हणण्याच्या बेतात होती. त्याला मात्र त्या दोघांमध्ये आत्ताच सुरू झालेला संवाद संपू नये वाटत होता. मनासारखं घडत नसतानाही तो अनुभवत असलेली शांतता, तिच्या सहवासातून मिळत असलेला आनंद या सगळ्याला इतक्यात पूर्णविराम द्यायची इच्छा नव्हती.
‘‘बाय द वे, एक विचारू?’’ तो उत्सुकतेनं म्हणाला.
‘‘व्हॉट! अ‍ॅम आय एंगेज्ड?’’
तो खळखळून हसला. ‘‘नाही गं. नाही…’’
‘‘पळून कुठे जाणार होतीस?’’
‘‘गावातच. मामाच्या गावातल्या घरी. सगळे इथेच असल्यावर तिकडे कुणीही जाणार नाही, याची खात्री होती.’’
मग दोघांनाही हसू आलं.
‘‘गंमत सांगू तुला एक? कॉलेजात असताना प्रेमात पडून पळून जायचं, अशा खूप फॅन्टसीज होत्या. तेव्हा एक बॉयफ्रेंडही होता. कॅज्युअलच होतं सगळं. माझ्या पळून जाऊन संसार करण्याच्या कल्पनेनंं सारखा टरकलेला असायचा. त्याला वाटायचं, की मी खरंच पळवून नेईन त्याला आणि मग आमचे खूनबिन होतील. तो मारवाडी होता ना… त्यामुळे कॉलेज संपताच त्यानं माझाही निरोपसमारंभ उरकला. मी सीरिअस नव्हतेच. मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहेत, तर मलाही हवा इतकं साधं होतं, काहीही दु:ख झालं नाही.’’
‘‘अगदीच भयंकर आहे हे. पण त्यानं तुझा निरोप घेतला, हे चांगलं झालं. नाही तर आत्ता आपली औटघटकेची का होईना, भेट कुठे झाली असती? जे होतं ते भल्यासाठी त्याचा आत्ता कुठे अर्थ लागला.’’
‘‘तू काय एकदम अध्यात्म चॅनेल सुरू केलंस. बाबाजी जमींपर पधारो।’’ ती हसली. ‘‘ए कुणाल, मी एक विचारू?’’
‘‘दोन-तीन-चार-पाच कितीही विचार. पुन्हा कुठे अशी संधी मिळणार आहे.’’
‘‘पुन्हा तेच. असं का बोलतोयस?’’
‘‘हे विचारायचंय?’’
‘‘नाही रे… तू… तू नुसत्या फोटोवरून लग्नाचा निर्णय?’’ ती अडखळत अर्धवटच बोलली.
कुणाल जोरजोरात हसायला लागला, ‘‘तुझी गाडी अजून तिथेच अडलीये. मला वाटलं, तो विषय पूर्ण संपलाय.’’
रमानं घुश्शानं नाक उडवलं.
‘‘अ‍ॅक्चुअली मी तुझा फोटो पाहिलाच नाहीये.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘आपण प्रत्यक्षात भेटलोय रमा…’’
‘‘कधी?’’
‘‘जग्गीच्या लग्नात. साधारण वर्षभरापूर्वी. तुझ्या मामीच्या मावसबहिणीची मुलगी. जग्गी ही माझी बहीण. तिथे तू आम्हा सगळ्यांची डान्स मास्टर होतीस. मी नाचात अगदीच वाईट होतो. हां, म्हणजे अजूनही आहेस… तेव्हा तू मला जे म्हणाली होतीस, ते अजून आठवतंय. ‘तुला डान्स येत नाही ना, मग तसंच समजून प्रॅक्टिस कर ना. उगाच शायनिंग मारायला जाऊ नको.’ माझ्या सगळ्या भावंडांसमोर तू माझ्या इज्जतीचं लोणी केलं होतंस. तुझ्या या रागावण्यावरून सगळ्यांनी मला खूप छळलं होतं. सारखं आपलं ‘उगाच शायनिंग मारायला जाऊ नको,’ असं इकडून तिकडून म्हणत राहायचे. माझ्या अख्ख्या खानदानाला कळलं होतं, की तू जातेस तिथे मी आहेच. फक्त तुझं लक्ष नव्हतं. आणि मग तुमच्या घरून लग्नाचा प्रस्ताव आला. तुझ्या मामींकडूनच तुझं प्रपोजल आलं.’’
‘‘आमच्या घरून?’’
‘‘हो, तुमच्याकडूनच आलं. तुझ्या मामीनं आणलेलं. मला वाटलं, तुझीही त्यात संमती आहे.’’
‘‘पण मामी तर म्हणाली, की हे स्थळ तुमच्याकडून आलंय.’’

‘‘खरं काय ते मग मामीलाच माहीत… किंवा मग आईनं माझा होकार मिळवण्यासाठी मला तुमच्याकडून स्थळ आल्याचं सांगितलं असण्याचीसुद्धा शक्यता आहे. मी लग्नाला तयारच होत नव्हतो म्हणून तीही वैतागलीच होती. पण नाही म्हटलं, तरी मला तू आवडली होतीस. मी एकदा धाडस करून तुमच्या गावीसुद्धा आलो होतो, पण तितकंच. पुढे यायची हिंमत झाली नाही. तुझ्या घरावरून गेलो फक्त. फेसबुकवर तुला फ्रेंड रिक्वेस्टही तेव्हाच पाठवली होती, पण तू काही ती अ‍ॅक्सेप्टच केली नाहीस. पुढे मी ऑफिसच्या प्रोजेक्टमध्ये बेक्कार अडकलो. तुझ्या घरून प्रपोजल आलं, तेव्हा मी ‘नाही’ म्हणण्याचा प्रश्‍नच नव्हता. आणि रमा, पाहण्या-बघण्याचा कार्यक्रम मला अजिबात आवडणारा नव्हता. मी तुला पाहिलंय. तू आवडतेस तेव्हा पाहण्याचा कार्यक्रम करण्याऐवजी तुम्हालाच आमच्या घरी बोलावू, असंही सांगितलं. पण तुमच्या अप्पांना आवडणार नाही म्हणत हा कार्यक्रम ठरला. पण नेमकं तेव्हा एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी मला आसामला जावं लागणार होतं. झालं, दरम्यान घरच्यांनी सगळं उरकून घेतलं. पंधरा दिवसांत येणार होतो, ते आणखी दिवस वाढले. तुला भेटायला यायचं राहिलं. तिकडे इतक्या रिमोट एरियात होतो, की रेंजचा प्रॉब्लेम. त्यामुळे फोन झाले, तरी नीट बोलताच आलं नाही. पण या सगळ्या प्रक्रियेत तू मला साधं पाहिलेलंही नाहीस, ही गोष्ट माझ्या ध्यानातच आली नाही. तुला मला भेटायचं असेल, मला जाणून घ्यायचं असेल, हे मुद्दे माझ्या लक्षात आले नाहीत. भवतालाच्या ज्या संस्कारात तुम्ही वाढता, ते तुम्हाला मान्य नाहीत, असं म्हणता म्हणता काही वेळा ते तुमच्या मेंदूचा आपसूक ताबा घेऊन असतात. माझंही बहुदा तसंच झालं. मी आवडत्या माणसाची इतकी सहज सोबत मिळतेय, या गोष्टीच्या इतक्या प्रेमात पडलो, की मी तुलाच महत्त्व कमी दिलं. मघाशी तू सांगितलं नसतंस, तर कदाचित कधीच लक्षात नसतं आलं. तुझा होकार गृहीत धरला. खूप गिल्टी वाटतंय.’’
‘‘मुद्दा तुला गिल्ट देण्याचा नाहीये. तूच सांग, एकदम अनोळखी माणसाच्या घरात कायमचं राहायला कसं जायचं? मैत्री तर सोड, साधी ओळख…’’
‘‘अ‍ॅब्सल्युटली! यु आर राईट. मीही जर तुझा फक्त फोटो पाहिला असता, तर कदाचित मीही असाच रिअ‍ॅक्ट झालो असतो.’’
‘‘कुणाल, मला तुझी ही गोष्ट आवडली. तू तुझ्या चुका समजून घेतोस. मान्य करतोस. फार कमी जणांना जमतं हे.’’
‘‘हॅहॅहॅ… अगं, भलतासलता भ्रम करून घेऊ नकोस हं. मी आणि चुका मान्य करणं! घरच्यांना विचार. मनमानी, हट्टीपणा करेन, पण चूक मान्य करणार नाही. मला माझी चूक पटली असली, तर चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो, पण ते न सांगता. पण तुझ्याबाबत तसं नाहीये. तुझ्यापुढे चूक, अंहकार काहीही लपवावंसं वाटलं नाही.’’
थोडावेळ कुणी काहीच बोललं नाही. कुणाल शांतपणे आकाशातल्या चांदण्या पाहत होता. रमादेखील समोरच्या अंधारात काजव्यांना पाहू लागली.
‘‘चल, निघूयात.’’

झुंजुमुंजू पहाट होऊ लागली होती. बराच वेळ दोघांनीही एकमेकांच्या सोबत एकमेकांचं न बोलणं अनुभवलं होतं. दोघंही उसाच्या बागेतून न बोलताच चालू लागले. दूर कुठेतरी कोंबड्याचं आरवणं, गायीचं हंबरणं ऐकू येत होतं. मोटारीचा पंप ही कुठे तरी सुरू झाला होता. त्यामुळे झुळुझुळु पाण्याचा नाद ऐकू येत होता. सोबतीला दोघांच्या पावलांचा आवाज. फक्त दोघं बोलत नव्हते. कुणालचे पाय जड झाले होते. त्याचा वेग मंदावलेला होता. तो खिशात हात घालून आपल्याच तंद्रीत मंदपणे चालला होता. रमा काही अंतर पुढे गेली होती. कुणाल मागेच आहे, हे लक्षात आल्यावर तीही किंचित रेंगाळली. तो सोबत येईपर्यंत थांबून राहिली. तो आल्यावर दोघं पुन्हा काहीही न बोलता पायवाटेवरून चालत राहिले. दोघांमधलं मौन ऐकत राहिले.
‘‘चल, मी मागच्या मांडवातून जातो.’’
‘‘का? सोबत गेलो तरी हरकत नाहीये. तसंही मी विचार करतीये, की आत्ताच सगळं सांगून टाकावं.’’
‘‘आत्ताच. पावणेचारच होतायेत.’’
‘‘हो, मग कधी? वधू-वराच्या वेषात लग्नमंडपात येऊ तेव्हा?’’
‘‘अगं, तसं नाही, पण जरा चहापाणी तर होऊदे. एकदम पहाटेच धक्का द्यायचा म्हणजे…’’ कुणाल अजूनही सगळ्यांची काळजी करतोय, हे पाहून रमाला हसू आलं. आपण बॉम्ब टाकायचा म्हणतोय आणि हा चमच्यानं पाणी टाकायचं…
‘‘कुणाल, ही काय मुहूर्त पाहून करण्याची गोष्ट आहे? हे बघ, तुला जर इतकंच त्यांच्या खाण्यापिण्याचं पडलं असेल ना, तर मग अडवलंस कशाला?’’
‘‘सगळं तर तुझ्याच मनासारखं करतोय. आत्ताच तर आत्ता सांग. बस्स. पण चिडतेस कशाला?’’
रमा-कुणाल दोघंही बंगल्यात शिरले. चार-दोन म्हातार्‍या बायका मिशरी चोळत बसल्याच होत्या. रमानं जाऊन आई-बाबा, आजी-आजोबा, कुणालचे आई-बाबा आणि त्याच्या भावाला उठवलं.
‘‘मला महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज, बाहेर चला,’’ असं म्हणत ती सगळ्यांना हॉलमध्ये घेऊन आली.
कुणाल शांतपणे एका कोपर्‍यात उभा राहिला. त्याला ही वेळ बरोबर वाटत नव्हती. पण कधीही सांगितलं, तरी पुढे ड्रामा होणारच होता.
‘‘काय झालंय बेटा. काय बोलायचंय?’’ रमाचे बाबा प्रेमानं म्हणाले.
रमानं कुणालकडे पाहिलं. त्यानं नजरेनंच ‘तू बोल’ असं खुणावलं.
‘‘मला हे लग्न करायचं नाहीये.’’
‘‘हा काय मूर्खपणा आहे.’’ अप्पा चिडले. ‘‘इतक्या पहाटे उठवून नको ते बोलण्याची हिंमत कशी झाली.’’ बोलता बोलता त्यांना ढास लागली. आईदेखील घाबरून तिच्याजवळ गेली.
‘‘आई-बाबा, हे लग्न ठरवताना रमाची साधी विचारपूस झाली नाही, मला समजून घेण्याची तिला एकही संधी मिळाली नाही. मीदेखील स्वत:च्या आनंदात तिला गृहीत धरलं.’’ कुणालनं थेट स्वत:च्या आई-बाबांकडे मोर्चा वळवला.
‘‘हे कुणी सांगितलं तुम्हाला? रमा लग्नाला तयार आहे. तिची मर्जी घेणार नाही का आम्ही…’’ अप्पा पुन्हा गरजले.
‘‘मर्जी ठरवली जात नाही. ती विचारावी लागते. तुम्हाला तुमच्या साध्या गोष्टीत ढवळाढवळ चालत नाही. तुमच्या रूटिनमध्ये बदल नको असतो आणि मी माझ्या मनाचा विचार न करता कुणाही कुणालबरोबर लग्न करावं?’’ रमा म्हणाली.
रमाच्या बाबांनी रमाकडे पाहिलं. ‘‘बाबा, नुसता फोटो पाहून मी लग्न करावं, ही अपेक्षा चूक नाहीये का?’’ रमाची आई तर धाय मोकलून रडायलाच लागली. उत्साही वातावरण अचानक तणावपूर्ण झालं.
‘‘तुमची काही भांडणं झाली असतील, तर तसं सांगा. मिळून सोडवू. अकराचा मुहूर्त आहे आणि हे काय? परमेश्‍वर आपल्यावर शुभाशीर्वादाचा वर्षाव करत असताना हा करंटेपणा काय सुरूये. कसली अवदसा सुचतीये तुम्हाला?’’ कुणालची आई म्हणाली.
‘‘भांडणं सोडवायला तयार आहात, पण आम्ही जे व्यवस्थित बोलून ठरवलंय ते महत्त्वाचं वाटत नाहीये. दोन माणसांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं नाही का?’’ रमा शांतपणे म्हणाली.
‘‘झालं ते झालं. अख्खं आयुष्य आहे समजून घ्यायला. चला, आवरायला घ्या.’’ मामा-मामी म्हणाले.
‘‘प्लीज, या सगळ्यावर फार चर्चा नकोय. तिच्या मनाविरुद्ध हे लग्न होणार नाही. सकाळ होताच आपण सगळे इथून निघतोय आई.’’
‘‘हो. मामा, तुम्ही मोठ्यांनी ठरवलेलं लग्न आम्ही का करायचं… मी तर नाही सॉरी…’’ रमा.
कुणालची आई समजावत म्हणाली, ‘‘कुणाल, तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात. त्रास होईल तुला.’’
‘‘होऊदे ना. तसंही मला यात माझी स्वत:ची चूक अधिक वाटते. जिच्याशी लग्न करायला चाललो होतो, तिला एकदाही मी विचारलं नाही, की तुला माझी सोबत आवडेल का? तेवढी अक्कल जरा आधी असती, तर कदाचित हे इतकं घडू दिलं नसतं. बट आय मिस्ड माय चान्स.’’ कुणालचा कंठ भरून आला.
‘‘बट यु कॅन टेक वन मोअर चान्स.’’ कुणालनं तिच्याकडे पाहिलं. तोच काय, पण तिथे उभ्या असलेल्या कुणालाच काही कळेना, आता ही परत काय बोलायला लागली.
‘‘हं… तू अजूनही चान्स घेत नाहीयेस ना… तू आत्ताही मला विचारू शकतोस… तुझी सोबत आवडेल का?’’
कुणाल हादरला. बाकीच्यांची अवस्था तर काहीच कळत नसल्यासारखी झाली होती. घडीत एक घडीत दुसरं या मुलीचं चाललंय तरी काय, असं झालं होतं.
‘‘कुणाल, मोठ्यांनी ठरवलेलं लग्न तर मला करायचं नव्हतंच. ते आपण मिळून मोडलंय. मोठ्यांना त्यांचा प्रॉब्लेम, त्यांचा इगो, त्यांच्या परंपरपरांचा फोलपणा कळायला हा अख्खा जन्म द्यावा लागेल. आपण त्यांना त्यांची चूक सांगितली आणि त्यांना ते पटलं, अशा चमत्काराची मला अपेक्षा नव्हतीच. मला फक्त त्यांना तुम्ही चुकलात, एवढंच सांगायचं होतं. पण तू तर माझं सारं काही ऐकलंस. समजून घेतलंस. अ‍ॅरेंज मॅरेज हा इतका काही बोगस प्रकार नाहीये. अर्थात, अपग्रेड होण्याला खूप स्कोप आहे! आणि म्हणूनच तुझी हरकत नसेल, तर मी हा एक चान्स घ्यायला तयार आहे.
‘‘सॉरी, पण मला कळत नाहीये. म्हणजे आपल्या लग्नाचं स्टेटस काय आहे…’’

‘‘स्टेटस को समज…’’
‘‘तू प्लीज, स्पष्ट सांग ना…’’
‘‘आपल्या ठरलेल्या लग्नाची अवस्था अजूनही अधांतरी आहे, असं समज. तुझी हरकत नसेल, तर आपण आणखी थोडं भेटू. बोलू. समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण काय खातो-पितो-ल्यातो यानं तसा फरक पडत नाही, पण आपण काय विचार करतो, यानं नक्कीच पडतो. तू तयार असशील, तर हे लग्न इथे स्थगित आदरवाईज मोडीत.’’
‘‘पण अशा भेटींतूनही आपण एकमेकांना बर्‍यापैकी ओळखलंय. हे कसं ठरणार?’’
‘‘माहीत नाही. ट्राय करून पाहूयात. हां, म्हणजे काही भेटींतून कुणाहीविषयी काय कळतं आपल्याला… अगदीच खरंय. पण ऊन-वारा-पावसात जमून जाईल इतकं तर कळत असेल. मी तुझं प्रपोजल कन्सिडर करायला तयार आहे. तुलासुद्धा विचार करायला, माझ्या बाबतीला निर्णय तपासायला वेळ मिळेल… आर यू रेडी?’’
‘‘दुसर्‍यांदा चान्स मिस करणारी गाढवं असतात. मी तो नाही. आय अ‍ॅम इन…!’’
कुणाल आणि रमानं एकमेकांना टाळी दिली. तणावपूर्ण घरात सगळ्यात जास्त आनंदी प्राणी फक्त ते दोघंच होते.
‘‘गुड मॉर्निंगची वेळ आहे, पण गुड नाईट करूयात.’’ रमा हसत म्हणाली.
‘‘मघाशी झोप उडाली होती, पण आता कदाचित आराम हवाय.’’

दोघं दोन दिशांना आपापल्या रूमकडे वळले.
बाहेर उजाडायला लागलं होतं. घरातला बदललेल्या परिस्थितीची बाहेर कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे केटरिंगवाल्याचीं नाश्त्याची तयारी सुरू झाली होती. गेटवर फुलांच्या माळा चढत होत्या. ‘कुणाल वेड्स विथ रमा’ नावाची पाटी सजत होती. आणि घरातले बाकी सगळेजण त्या दोघांच्या दिशांकडे रागमिश्रित निरागस कुतूहलानं त्यांच्या माहीत नसलेल्या पुढच्या भविष्यावर आशा लावत गोंधळलेल्या नजरेनं बघत राहिले.

– हिना कौसर खान-पिंजार

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.