Now Reading
नवरा हवा आहे!

नवरा हवा आहे!

Menaka Prakashan
View Gallery

प्रशस्त हॉल मधील सोफ्यावर बसलेल्या गोदावरीअम्मांचं मन काही थार्‍यावर नव्हतं. त्यांचे डोळे समोरचा टीव्ही पहात होते पण मन मात्र मुलीबद्दलच्या विचारांनी भरून गेलं होतं. आज दुपारीच होसपेठेतून लक्ष्मीअम्माचा फोन आला होता. ‘हे पहा गोदम्म, वेंकोबारायाचा मुलगा पुढच्या महिन्यात अमेरिकेतून येतो आहे.त्याच्यासाठी वधू शोधण्याची गडबड चालली आहे वेंकोबाची. कशी काय कोण जाणे? पण मला तुझी संध्या आठवली. जोडा अगदी छान शोभून दिसेल. आपण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?’ गोदावरीअम्मा हल्ली याच विचारात असायची. त्यात लक्ष्मीअम्माचा फोन आल्यापासून त्यांची मनःशांती पार ढळून गेली होती.

गोदावरीअम्मांच्या समोर सगळी सुखं अगदी हात जोडून उभी होती. देवाच्या कृपेने काही कमी नव्हतं. संध्या, त्यांची मुलगी मोट्ठी ऑफिसर होती. सात जन्म अन्न वस्त्राला कमी पडणार नाहीत इतके पैसे बँकेत होते, पण मनाला काही शांती नव्हती. कारण कितीही आग्रह केला तरी मुलगी लग्नाचं काही मनावर घेत नव्हती. लग्नाचा विषय काढला की ती फक्त हसायची. सगळं हसण्यावारी न्यायची. तिच्या अम्माचं आतडं किती तुटतय ते तिला जणू दिसतच नव्हतं. त्यांनी हा विषय काढला की ती थट्टेत उत्तरं द्यायची.

‘अग बाई, अशीच किती दिवस राहणार आहेस?’ आज त्यांनी संध्याजवळ परत लग्नाचा विषय काढला तेव्हा
‘अम्मा, लग्न कोणाला करायचं आहे? तुला की मला?’ असं म्हणून तिने प्रेमाने आईचे गाल घरले.

‘चल, बाजूला हो. लाडात येऊ नको. तू अशी कन्याकुमारी होऊन रहाणार आणि मी काय नुसती पाहत बसू? तुझ्या एवढी असताना मला दोन मुलं होती. तू कशी बाई आहेस ग? की झाडाची फांदी आहेस? लोक काय म्हणतील, असं तुझ्या मनात काहीच येत नाही का? माझं काय आता, उद्या असेन नसेन. माझ्यामागे तुझं काय?’

‘अम्मा, असं काही मनात आणू नको. तुला काहीही होणार नाही. तुला नातवंडं खेळवता येतील असं काही तरी लवकरच मी घडवून आणणार आहे.’

हे ऐकून गोदावरीअम्मांचा चेहरा फुलून आला.

‘खरच की काय? कसं साखरेसारखं गोड बोललीस ग बाई. लवकर लग्न कर. चांगली चार मुलं होऊ देत. तुझी बाळंतपण केल्याशिवाय काही मी जात नाही.’

पण मुलगी तिचा शब्द विसरली होती. अम्मा मात्र ती ऑफिसातून आल्या आल्या याच विषयावर बोलत राहायच्या आणि शेवटी निराश होऊन, आपलं कर्तव्य आपण करत राहायचं,आपल्या हातात दुसर काय आहे? असं मनाला बजावत राहायच्या.

त्या दिवशी बाहेर कार थांबल्याचा आवाज आला व अम्मानी दार उघडलं. त्या कधीपासून आतुरतेने मुलीचीच वाट पाहत होत्या. ती घरात आल्या आल्या, ‘संध्या, होसपेठेतून लक्ष्मीचा फोन आला होता आज. त्या व्यंकोबाचा मुलगा अमेरिकेत असतो ना तो पुढच्या महिन्यात येणार आहे. या वेळी लग्न करूनच पाठवणार आहेत त्याला. वडील काळे-कळकट आहेत पण मुलगा सोन्यासारखा आहे. त्याने त्याच्या आईचा रंग घेतलाय. मी पाहिलाय तिला.’ असं म्हणून त्या तिच्याकडे आशेने पाहू लागल्या.

‘अम्मा, लग्न मला करायचं आहे ना? मग तू का स्थळं पहाते आहेस? माझा जोडीदार मी शोधीन. तू त्यात डोकं घालू नकोस. तू असं माझ्यावर दडपण आणू लागलीस तर मी लग्नच करणार नाही.’ संध्याने सांगून टाकलं.

‘तूच शोधणार म्हणते आहेस, पण कधी? अग,लग्नाचही एक वय असतं.’ अम्मा हताशपणे म्हणाल्या.

‘हे सगळं मला तू सांगायची गरज नाही. मला कळतय. आता फक्त दोन तीन दिवस धीर धर. अर्थात माझ्या पसंतीला तू होकार दिलास तरच.’ संध्या म्हणाली.

आता गोदावरी अम्मा खरोखरच घाबरल्या. काय हे बोलणं हिचं. हिने खरच नवरा शोधला आहे की काय?आणि लग्न ठरवलं सुद्धा? त्या काळजीत पडल्या. अजूनपर्यंत, एकदा अक्षता पडल्या की झालं, असं वाटत असताना आता आई म्हणून त्यांच्या मनात हजार प्रश्न उभे राहिले. कोण असेल तो? त्याची जातपात काय असेल? भाषा कोणती असेल? कुठल्या देशातला असेल? सगळी उत्तरं मिळायलाच हवीत. काहीही करून एकदा लग्न होऊ दे, असं म्हणून चालणार नाही.

आता त्यांचा उत्साह दुप्पट वाढला होता. मुलीच्या लग्नाला उशीर होत होता त्यामुळे नातेवाईकांच्यामधे मान वर करून बोलणही कठीण झालं होतं त्यांना. या विषयावरून त्यांना नेहमीच नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागत होते. समाजात राहायचं म्हणजे सगळ्यांप्रमाणे रहावच लागत. तेच योग्य असतं आणि त्यात समाधानही असतं. म्हणे तिला हवं तशीच ती राहते, स्वतःच्या मनाप्रमाणे वागते. हो वागते. पण विचारणारे तुम्ही कोण? खरं तर मलाही याचा त्रास होतोच. पण तिला काय या सगळ्याचं. सकाळीच बाहेर पडते ती रात्री आठला घरी येते. एवढा उशीर का? असं विचारलं तर ‘अम्मा,मी असिस्टंट कमिशनर आहे. संपूर्ण तालुक्याची केवढी जबाबदारी माझ्यावर आहे. तुला माहीत नाही का?’ असं म्हणते.

तिचंही खरं आहे. ही बया केएएस करून मोठी ऑफिसर झाली तेव्हा मला किती अभिमान वाटला होता. सगळ्यांना किती ताठ मानेने सांगितलं होतं. पण आता ही नोकरी सुरू झाल्यापासून, नकोरे बाबा. डोक्यात घणाचे घाव पडताहेत असं वाटतय. बाकीच्या मुली नाही का नोकर्‍या करत? नोकरी म्हणजे सकाळी दहा ते सहा असं काम. पण हिची नोकरी म्हणजे एवढी जबाबदारी आणि इतकी कटकट असेल हे तेव्हा माहीत नव्हतं. सोडून दे म्हटलं, हट्ट केला. पण नाही ऐकलं. अम्मा आठवणीत गुंतल्या होत्या. तिला सरळ बीए कर म्हटलं तर ठणकावून म्हणाली होती, ‘काय शिकायचं, पुढे काय करायचं ते मला कोणी सांगू नका. माझं मी पाहीन.’ मुलं हुषार, कर्तुत्ववान निघणं ही किती आनंदाची, अभिमानाची गोष्ट..पण त्याचीच आता डोके दुखी झाली होती.

तिच्या धाकट्या बहिणीची मुलंही अशीच हुषार. मुलगी शिकून इंजिनीअर झाली. चांगलं स्थळ येऊन, ठरवून लग्न झालं. आता नोकरी सोडून घर सांभाळत, नवरा व मुलांचं करत किती आनंदात राहते आहे. बहिणीकडे पाहून अम्माना स्वतःचं वाईट वाटायचं. मुलगी इतकी हुषार आहे. तरी आपल्याला समाधान का नाही? आपल्या मुलीला नोकरी सोडून घरी बसणं हा मूर्खपणा वाटतो. हा विषय निघाल्यावर एकदा तर संध्याने लेक्चर दिलं होतं त्यांना. ‘इतक्या कष्टाने इंजिनीअर होऊन नवर्‍याच्या घरी सगळ्यांची सेवा करत बसली आहे ती बया. . एक इंजिनीअर बनवायला सरकारचा किती पैसा खर्च होतो, माहीत आहे तुला?’ हे असं ऐकताना आईच्या मनाला किती यातना झाल्या होत्या हे तुला कसं कळणार.

हिला झालय तरी काय? तालुका सांभाळते आहे पण आईला होणारा त्रास, तिचं सूख याचा विचार करण्याइतका विवेकही नाही का? आई असो किंवा आणखी कोणी असो, आपल्याला किती कष्टाने शिकवलं आहे याची जाणीव नको? अम्माना आतल्या आत त्रास होऊ लागला. हे मोठ्ठं घर, पैसा सगळं त्यांना शत्रूसारखं वाटू लागलं. मुलीला तिच्या इच्छेनुसार इतकं शिकवलं याचं त्यांना वाईट वाटू लागलं. अर्थात आपण नको म्हटलं असतं तर मुलीने ऐकलं नसतच म्हणा. गोदावरी अम्मांचं विचार चक्र काही थांबत नव्हतं.

आता मात्र ती लग्नाला मनापासून तयार झाली आहे हे त्यांना मनोमन कळलं होतं. आता त्यांना त्रास देणार नव्हती ती. बोलताना काही बोलूदे, पण उद्या मी सांगेन तसच वागेल असा विचार करताना त्या थोड्या शांत झाल्या.

‘सतत रामायण, महाभारत, पुराणातल्या कथा तू मला सांगायचीस. त्यातील राजकुमारी स्वयंवर मांडून आपल्या मनाप्रमाणे पतीची निवड करायच्या. पण अम्मा, माझ्या बाबतीत तू असं मान्य करणार नाहीस. पण लक्षात असू दे. माझ्या नवर्‍याची निवड मीच करणार आणि त्यालाच तुला जावई म्हणून स्वीकारावं लागेल.’

‘असं काही घडणार असेल तर मी तोंड बंद करून बसेन.पण एखादा नवरा शोध व लवकरात लवकर लग्न कर. आता उशीर करू नको.’ त्यांनी असं म्हणताच संध्या ‘अम्मा’ असं म्हणून त्यांच्या गळ्यात पडली.

वधू पाहिजे, वर पाहिजे अशा जाहिराती वाचण्याची अम्माना सवय होती.पेपर हातात घेतला की आधी त्यांचं लक्ष अशा जाहीरातींकडे जायचं. पण आजच्या पेपरमधील जाहिरात पाहून त्याना खळखळून हसायला आलं व त्यांनी संध्याला हाक मारली.

‘संध्या, इकडे ये. हे पहा.’
‘काय ग, एवढं हसण्यासारखं काय आहे?’

‘किती गमतीदार आहे पहा. नवरा हवा आहे अशी कोणी पेपरात जाहिरात देतं का?’
‘यात काय चूकीचं आहे? इंजिनीअर हवा असेल तर इंजिनीअर पाहिजे, क्लार्क हवा असेल तर क्लार्क पाहिजे, अशीच जाहिरात देतात ना?त्याच प्रकारची ही नवरा पाहिजे अशी जाहिरात आहे.’
अम्मा वाचू लागल्या,

“नवरा हवा आहे. एका गॅझेटेड ऑफिसर असलेल्या,तीस वर्षे वयाच्या मुलीला नवरा हवा आहे.
अपेक्षा—वय– कमीतकमी एकवीस॰ जास्तीत जास्त तीस,
शिक्षण –बीए,बीएस्सी किंवा तत्सम परीक्षेत नापास असायला हवा. एसेसएलसीला प्राधान्य.
उद्योग, व्यवसाय– निरुद्योगी असावा. नोकरीत असल्यास विवाहापूर्वी राजीनामा द्यावा लागेल.विवाहानंतर कोणत्याही कारणास्तव नोकरी करता येणार नाही.
अविवाहीत असावा. विधूरांचा विचार केला जाणार नाही.
विशेष सूचना: शिफारस पत्र घेऊन येणारा मुलाखतीसाठी अपात्र ठरेल.
मुलाखतीच्या वेळीच सविस्तर बोलता येईल. अर्ज करू नये, फोनवर संपर्क साधून मुलाखतीला यावे.”

‘संध्या, काळ किती बिघडला आहे बघितलस का? आणखी काय काय बघावं लागणार आहे कोण जाणे.’ हसत हसत अम्मा म्हणाल्या.
‘काळ बिघडला नाहीये ग, बदलला आहे. पुढे काय काय होणार आहे काय माहीत,असं म्हणालीस ना? अग,चांगलच घडणार आहे सगळं. त्यालाच बदल असं म्हणायचं, बरं का?’

‘ते जाऊ दे.पण तू अशी जाहिरात बिहिरात देऊ नको बरं.’

‘अम्मा, हे मला आधीच का नाही सांगितलास? ती जाहिरात मीच दिलेली आहे. ‘

अम्माना मोठ्ठाच धक्का बसला. अग काय हे? इतकं शिकलीस, मोठी ऑफिसर झालीस आणि एखाद्या एसएसएलसी माणसाजवळ लग्नगाठ बांधणार आहेस? डोकं फिरलं तर नाही ना?’ असं म्हणत त्यांनी तिच्याकडे रोखून पहिले. परंतू तोपर्यंत संध्या तेथून निघून गेली होती.

‘मुलाखतीसाठी फक्त एका माणसाने संपर्क साधला आहे. बहुतेकांनी फेक जाहिरात आहे असं समजून ती गांभीर्याने घेतली नसावी. आणि काही जणांनी असा विचार केला असावा की अशा बाईबरोबर लग्न करण्यापेक्षा गळ्यात धोडा बांधून विहिरीत उडी घेतलेली बरी.’ संध्या अम्माना म्हणाली. ‘कसं असतं पहा, एखाद्या दुय्यम पदावरील क्लार्कच्या जागेसाठी अर्ज मागवले तर हजारो अर्ज येतात.पण नवरा या पदासाठी फक्त एकच एक. अधिकारी असणार्‍या बाईचा नवरा व्हायला हे का तयार नसतात माहीत आहे? हा पुरुषी अहंकार. प्रत्येक ठिकाणी त्यांचा वरचष्मा हवा. स्त्रियांची जागा त्यांच्या हाताखालीच असायला हवी. हे स्त्रीच कर्तृत्व कधीच मान्य करणार नाहीत. इथे त्यांचा इगो आडवा येतो.त्यांच्या मनात भीती असते एक प्रकारची. ही आपल्यावर दादागिरी तर करणार नाही ना अशी. तुला काय वाटतं?’
‘उद्योगम पुरूष लक्षणं’ अशी म्हण आहे. कुठला पुरुष घरकाम करत घरात बसतो? सांग.’

‘आणि बायकांनी मात्र घरात बसून काम करत राहायचं का? आई तू एक स्त्री असूनही असं म्हणतेस?’
‘बाळा, असं का म्हणतेस? मी काही दिवसभर घरकामात बुडालेली नसायची. आणि तुझे वडील माझी लाडक्या पोपटाची घ्यावी तशी काळजी घ्यायचे.’

‘आता कसं बोललीस? पोपट किती लाडका असला तरी पिंजर्‍यात असतो ना? पिंजरा म्हणजे काय? तुरूंग.’
‘वेडी, असल्या कल्पना तुझ्या डोक्यात कोण भरवतं ग? समाज गिधाडांनी भरलेला आहे. त्यांच्या पासून संरक्षण म्हणून पिंजरा. कळतय ना?’

इतक्यात संध्याचा फोन वाजला. ‘अम्मा, त्याला आजचा वेळ दिला होता. आला आहे तो बहुतेक. तू आत जा. ही मुलाखत अगदी व्यक्तिगत स्वरूपाची आहे. तू मध्येच डोकाऊ नकोस. माझ्या दृष्टीने तो सिलेक्ट करण्यासारखा नसेल तर मी लग्नाला तयार होणार नाही.’
‘मी कशाला मधे येऊन त्रास देतेय? डोळे मिटून शिवाची आराधना करत बसते झालं.’ असं म्हणून अम्मा आत गेल्या.

मुलाखतीला आलेला उमेदवार दिसायला चांगला होता. साधारण संध्याइतकाच उंच, गहू वर्ण आणि मध्यम बांधा.

‘गुड मॉर्निंग मॅडम.’अतिशय विनयपूर्वक नमस्कार करीत तो म्हणाला.मोकळ्या हातांनी आला होता. वेषभूषेवरून पक्का भारतीय वाटत होता. तरी त्याने घातलेला धोतरझब्बा तिला थोडा खटकला होता. अर्थात वर्षातून एकदा सॉफ्ट वेयर इंजिनीअरसारखा ड्रेस घालायचा म्हणजे ते गमतीशीरच दिसतं.

स्मितहास्य करत संध्या म्हणाली,’बसा.’

‘तुमचं नाव?’
‘नारायण’

‘शिक्षण?’
‘बीएस्सी’

‘पास की नापास?’
‘परिक्षाच दिली नाही.’

‘का?’
‘पास व नापास, कशालाच अर्थ नाही’

‘काम काय करता?’
‘या काळात नोकरी मिळणं कठीणच आहे.अर्थात मी त्यासाठी प्रयत्नच केला नाही.—–

‘वय?’
‘एकवीस होऊन गेली आहेत पण अजून पस्तीशी उलटलेली नाही.’

‘हरकत नाही. ओ.के.लग्नाचं काय?’

‘माझ्याकडे डिग्री नाही आणि नोकरीही नाही. मुलींना मुलगे त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेले हवे असतात,चांगली नोकरी असलेले हवे असतात. सध्याच्या काळात बक्कळ कमावणारा म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनीअर तरी किंवा पैसे खाणारा सरकारी नोकर तरी हवा. असं सगळं असताना माझ्या सारख्याबरोबर लग्न करायला कुठची मुलगी तयार होईल?’

‘ही जाहिरात पाहून खूप खूष झाला असाल ना?’
‘नक्कीच. आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या मुलाजवळ लग्नाला तयार होणारी मुलगी या जगात आहे हे या जाहिरातीवरून कळलं. पण तुम्ही माझी गम्मत तर करत नाही ना, मॅडम?’

यावर संध्या फक्त हसली.

‘माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो. पुरुषांपेक्षा आम्ही कुठल्याही क्षेत्रात मागे नाही,कोणत्याच बाबतीत कमी नाही, असा आत्मविश्वास बहुतेक मुली बाळगून असतात. मग त्या डॉक्टर इंजिनीअर, वकील, पोलिस इन्स्पेक्टर कोणीही असोत. पुरुषांच्या बरोबरीच्याच नाही तर आपण त्यांच्यापेक्षा कशा वरचढ आहोत हे सिद्ध करण्याचा सतत प्रयत्न करत असतात.असं असताना लग्नाचा विषय निघाल्यावर आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या पुरुषाबरोबर लग्न करायला एकही मुलगी का तयार होत नाही?’ तो.

‘कुणी नाही कसं? मी तयार आहे ना.’

‘सॉरी मॅडम, पण माझा अजून विश्वास बसत नाहीये. म्हणून तर असं बोललो. मी जर सिलेक्ट झालो तर खरच माझ्याजवळ लग्न कराल?’

त्याच्या चेहर्‍यावरचं कुतूहल,आतुरता पाहून संध्याला आश्चर्य वाटलं.
‘एवढा अस्वस्थपणा? एवढा गोंधळ? का बरं?’

‘हो मॅडम, हा विषय बरेच दिवस माझ्या डोक्यात बसला आहे. बाकी सगळ्या बाबतीत समानतेच्या गप्पा मारणार्‍या बायका कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घ्यायला तयार नसतात. लग्ना पूर्वी मिळवत्या असलेल्या मुली लग्न झाल्यावर नोकरी सोडून घरात बसतात. पुरुषांच्या बाबतीत मात्र असं दिसत नाही.’
‘या विषयावर जास्त चर्चा नको. मला एक सांगा तुम्ही घरी राहण्याचं का ठरवलत?’

‘हे पहा मॅडम, मी चित्रकार आहे. कलेचा वेडा आहे. आहे. परंतू लेखक किंवा कुठल्याही कलाकाराला फक्त कलेतून संसार चालवता येत नाही. सगळे लेखक पहा, एका बाजूला नोकरी किंवा पैसे कमवण्यासाठी काही न काही काम त्यांना करावच लागतं. लेखन हा त्यांचा छंद ठरतो. बांधिलकी समजून, मनापासून लेखन करणारे थोडेच.एकूण काय,त्यातून तुम्ही घर चालवू शकत नाही. चित्रकला हा माझा प्राण आहे. घरासाठी, पैशांसाठी काम करायचं म्हटलं तर मी कलेला न्याय देऊ शकणार नाही हे नक्की. पैसे मिळवण्याकरिता जाहिराती तयार करण्याचं काम करायचीही तयारी मला ठेवावी लागेल,हे मला मान्य नाही. म्हणून तर तुमच्यासारखी कोणी भेटेल याची मी वाट पाहत होतो.’ त्याचं बोलणं संध्या डोळे विस्फारून ऐकत होती.त्याचं बोलणं संपल्यावर तिने विचारलं, ‘तुम्हाला स्वयंपाक करता येतो?’
‘सांगितलत तर शिकेन. तुमच्या चवीचं जेवण बनवायचा प्रयत्न करीन.’
‘मुलांना सांभाळता,खेळवता येतं का?’

‘तुम्हाला आता मुलं आहेत का?’
‘लग्न झाल्यावर होतीलच ना.’

‘मॅडम, काळजी करू नका. सगळं आधीच शिकायला जीवन म्हणजे प्रोफेशनल कोर्स नाही. पाण्यात पडल्यावर पोहायला येईलच.’ यावर संध्या छानसं हसली.
‘मी एक प्रश्न विचारू शकतो का?’

‘माझी परीक्षा घ्यायची आहे का?’

तसं नाही.पण तसं वाटलं तर चूकही नाही. संध्या नारायण हे कोणाचं नाव आहे?’
‘लग्न झाल्यावर माझं नाव बदलणार का?’

‘नाही मॅडम, माझं नाव बदलणार. हे पहा, नारायण लक्ष्मीचं लग्न झाल्या नंतर लक्ष्मी नारायण झालं.त्याच प्रमाणे गौरीशंकर.पूर्वीच्या काळी पुरूषांना बायकांच्या नावाने ओळख मिळायची. आताच्या आधुनिक युगात बायकांना काही स्थानमानच उरलेलं नाही. देवांप्रमाणे मी माझं नाव बदलून टाकीन.’
संध्या त्याच्याकडे पाहतच राहिली. आता ती नवरीमुलगी होती. त्यानेही तिच्याकडे पहिलं, ती त्याला खूपच सुंदर व आकर्षक दिसली.

मुलाखत संपली.

‘मुलगा खरच चांगला आहे. किती छान बोलत होता.मला वेळ घालवायला चांगली सोबत मिळेल. संध्याने त्याचीच निवड करावी रे बाबा.’ देवासमोर बसलेल्या गोदावरी अम्मानी मनापासून देवाला हात जोडले.
…………………….

मूळ कन्नड – सत्यबोध
मराठी अनुवाद – अपर्णा नायगावकर, मुंबई
aparna.s@rediffmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.