Now Reading
नकटी

नकटी

Menaka Prakashan

(एका गावातून दुसर्‍या गावात विनाकारण कुणी जात असतं का? माझ्या घरच्यांना तसं करणं अजिबात आवडत नव्हतं. पण मला दुसर्‍या गावाचा वास नवीन कपड्यांसारखा, पुस्तकांसारखा येतो. तो हवाहवासा वाटतो. घरचे विचार करतात, का, कुणामुळे, कशासाठी आपण आपलं बस्तान सारखं हलवायचं? आणि मी? पण केवळ, तीच गोष्ट केवळ माझी होती, असं मला वाटायचं. अचानक अंधारात गावच सोडलं नसतं, तर कोण असते मी. मी ‘मी’ त्यामुळे आहे.)

नवीन गावात बस्तान हलवतानाच माझ्या मनात विचार येत असे, आता तिथे जाऊन काय करावं? म्हणजे करण्यासारखं काहीतरी असेलच, पण नक्की काय, याचा उलगडा होईपर्यंत मी बेचैन असायचे. तो काळ मला आवडायचा पण आणि आवडायचा पण नाही. मनाचं नुसतं भिरभिरं व्हायचं.
जूनमध्ये मी दुसर्‍या गावी गेले. मागच्या गावाच्या आठवणी काढत आणि नव्या गावाची नवी स्वप्नं पाहतच मी झोपले. दुसर्‍या दिवशी सकाळी एक मुलगी माझ्याकडे आली. मला कळेना, ती माझ्या दारात एवढ्या सकाळी का आली ते. मी तिला आत घेतलं. मला असं अनोळखी माणसाबरोबर ओळखीचं बोलायला खूप आवडतं. शिवाय या गावातली ती माझी पहिली मैत्रीण असणार होती. तो मान तिचाच होता, पण ती काहीच बोलली नाही. मी माझं बांधलेलं सामान उघडून आवरायला घेतलं आणि मधून मधून तिच्याशी बोलू लागले. पण तिनं एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मी माझ्या पुस्तकाच्या गोण्या सोडायला लागले. त्यातली काही पुस्तकं बाजूला ठेवून, इतर पुस्तकं उचलून मांडणीत ठेवायला गेले, तेव्हा ती मुलगी पुस्तकं हाताळू लागली. त्यांची पानं उलटू लागली. ती असं करताना मी जेव्हा तिच्याकडं पाहिलं, तेव्हा तिची एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे तिचं नाक, ते थोडंसं अपरं होतं. म्हणजे ती नकटी होती. आणि ते तिला फार शोभून दिसत होतं. तरीही माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच भावना तयार होईनात. मी तिला आपलं म्हणू की नको, या विचाराच्या भानगडीत मी पडले नाही. कारण त्याचवेळी तिनं माझ्याकडे डोळे वर करून पाहिलं. हे डोळे माझ्या ओळखीचे होते. मी असे डोळे कुठे कुठे पाहिलेले आहेत. ती मात्र पुस्तकांच्या पानांचा स्पर्श अनुभवण्यात गर्क होती. तिच्या या कृतीमुळे मला तीव्रतेनं कळलं, की मी या नवीन गावात काय उद्योग करू शकते. तिला मी त्याबद्दल सांगणार, तेवढ्यात ती निघूनच गेली.

मी आजूबाजूच्या मुलांसाठी ‘पुस्तकांचं घर’ सुरू केलं. त्या दिवशी संध्याकाळी माझ्या गल्लीत आणि पलीकडच्या गल्लीत, मैदानावर जिथे म्हणून मुलं दिसतील, तिथे जाऊन मी आमंत्रण देऊन आले, की ‘या, आपण मिळून पुस्तकं वाचूया.’ मला वाटलं, की माझ्या एकदा सांगण्यानं कुणीसुद्धा येणार नाही. पण मुलं आली. त्यातली काहीजण तर रोज येऊ लागली. आता मला माहीत झालं होतं, की कोणती मुलं कुठे उभी राहतील, कुठे बसतील, कोणती पुस्तकं वाचतील आणि कोणती मुलं घरी पुस्तकं घेऊन जातील. मुलांचं असं अवतीभवती असणं मला फार फार आवडायचं. त्यांच्या बोलण्याचा, प्रश्न विचारण्याचा, सतत पुस्तकं बदलून घेण्याचा त्रास व्हायचा नाही. आवडलं नाही, तर नाही म्हणण्याची मुलांची ही ताकद मला मोहून टाकायची. कोणत्याही गोष्टीचं ओझं त्यांनी बाळगू नाही, असं मला सतत वाटत राहायचं. अचानक घर सोडण्याचं ओझं परिस्थितीनं त्यांच्यावर टाकलं, तर कुणाची नाही, पण त्यांना शब्दांची नक्की सोबत होईल. वापरून वापरून चिपाड झालेले शब्द कधीकधी स्वतःसाठी नवीन अर्थ घेऊन येतात, याचा अनुभव मी पांघरला होताच की.

ती पहिल्या दिवशी भेटलेली नकटी मुलगी दोन महिन्यांनंतर अचानक सोमवारी उगवली. त्या दिवशी माझं पुस्तकांचं घर मी बंद ठेवत असे. कारण इकडे तिकडे, अस्ताव्यस्त झालेली पुस्तकं मी अलकाकडून लावून घेई. अशा वेळी अलकाला तिथे कुणी आलेलं आवडत नसे. म्हणून मग सोमवारी आम्ही कुणीच तिथे जात नसू. मी माझी सगळी बाहेरची कामं सोमवारीच करत असे, कारण त्या गावात मंगळवारी बाजार बंद असे. सोमवारी इतरही पाहुणे माझ्याकडे येत. तसंच कुणीतरी आलं असेल, असं अलकाला वाटलं, म्हणून तिनं त्या मुलीला बसवून घेतलं. मी जाऊन बघितलं, तर ही नकटी मुलगी होती. मी तिला सांगितलं, की ‘आज ‘पुस्तक घर’ बंद असतं. तू परत कधीतरी ये.’ पण ती जागची हलली नाही. बाहेर पाउस पडत होता. तिच्याकडे छत्री होती. तिनं अंगात जास्तीचे कपडेही घातले होते. ती अशी अचानक आलेली पाहून खरंतर मला खूप राग आला होता. एकतर ती त्या दिवसानंतर आज उगवली होती म्हणूनही तो असावा. तरी पण मी तिला विचारलं,
‘‘तू याआधी इथे आली होतीस ना?’’
ती नकटी मुलगी काहीच बोलली नाही. नुसती उभी राहिली. मग मीच आपणहून म्हटलं, ‘‘अगं, तू जूनमध्ये माझ्याकडे आली होतीस.’’ पण तरीही तिनं काहीच प्रतिसाद दिला नाही.
‘‘तुला एखादं पुस्तक हवं आहे का?’’ तरीही तिनं तोंड उघडलं नाही. पुस्तकाची निवड मोठ्या माणसांनाही लगेच करता येत नाही, हे मला माहिती होतं. म्हणून मीच आपणहून तिच्यापुढे काही पुस्तकं धरली. तिनं ती हातात घेतलेली पाहून मी मुलांच्या नावांची वही काढली. तिचं नाव लिहण्याच्या उद्देशानं मी तिला नाव विचारलं, तर ती माझ्याकडे बघतच राहिली. या ठिकाणी मला अचानक माझ्या काकूची आठवण झाली. ती अशा लवकर न बोलणार्‍या लोकांना ‘मुकेश’ म्हणायची, पण मला तसं काही म्हणावं वाटलं नाही. मी वाट बघत राहिले. तिला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती. मी तिच्याकडे बघत असणार, असं नक्की वाटत असणार. शेवटी त्या मुलीनं वर माझ्याकडे थेट पाहिलं आणि म्हणाली, ‘‘मला सगळे ‘नकटी’च म्हणतात.’’
मी क्षणभर दचकले. माझ्या मनातलं हिनं वाचलं की काय? तरी पण मी तिला विचारलं, ‘‘अगं, ते सहज गमतीत म्हणत असतील. तुझं असं काहीतरी नाव असेलच ना?’’
‘‘छेः, मला कुणीच नावानं हाक मारत नाही. ‘नकटी’च म्हणतात.’’ ती हसून म्हणाली. मी तिच्या चेहर्‍यावर दुःख शोधत राहिले, पण ती इतकी केविलवाणी हसली, की मी माझी नजर दुसरीकडे वळवली.
‘‘माझी आई मला ‘पौर्णिमा’ म्हणते.’’ ती म्हणाली.
‘‘अरेव्वा!’’
‘‘ती म्हणते, की नाक आपल्याला निसर्गतः मिळतं. ते आपल्यातल्या गुणांनी मोठं होतं. म्हणून मला नकटी म्हटलं तरी चालतं.’’ तिच्या या बोलण्यानं माझा अपराधभाव कमी करण्याचा प्रयत्न तिनं केला, की मलाच असं वाटलं माहीत नाही.

तिचं लक्ष पुस्तकांकडे होतं की नव्हतं, हे मला आठवत नाही. ती पुस्तकातली एखादी ओळ वाचून माझ्याकडे बघायची. तिला वाचण्यासाठी माझ्या मदतीची गरज होती का? मी मुळीच करणार नाही. मुख्य म्हणजे आज भलत्या वेळी येणार्‍या या मुलीमध्ये मी रसच घ्यायला नको होता. गेली असती परत. एकीकडे मला तिचा असा राग येत होता आणि एकीकडे तिनं जाऊ नये म्हणून मला काय करता येईल, याचा मी विचार करत होते. मी घाईनं स्वयंपाक घरात गेले आणि तिच्यासाठी आळूची वडी घेऊन आले. आज सकाळीच मी बागेतला आळू काढून आणला होता. ताज्या आळूच्या वड्या अधिक चांगल्या होतात. मी त्या खरपूस तळल्या होत्या. त्या वड्या मी तिच्यासमोर ठेवल्या. जणू ती भुकेली झाली होती, तिनं माझ्या हातातून ती ताटली घेतली आणि मी ‘खा’ म्हणायच्या आत तिनं खायला सुरुवात केली. तिच्या मचमचीचा त्रास होत होता आणि ती खाते आहे याचं समाधानही वाटत होतं. मी तिच्याकडे लक्ष ठेवून दुर्लक्ष करत होते. याला चांगलं वागणं म्हणता आलं असतं.
तिचं लक्ष वेधण्यासाठी आणि खाण्यातून तिनं माझ्याकडे पाहावं म्हणून मी तिला विचारलं, ‘‘तुझ्या घरी कोण कोण असतं?’’
‘‘सगळेच.’’ जास्त बोलली नसती, तर एखादी आळूवडी संपली असती, म्हणून तिनं थोडक्यात उत्तर दिलं.
‘‘तू शाळेत जातेस का?’’ मी.
तिनं फक्त मानेनं ‘हो’ म्हटलं. शाळा आवडते यालाही तिनं मान हलवली.
‘‘तुला काय काय येतं? काय काय आवडतं करायला?’’ ती जणू माझ्या कथेचं पात्र होती, अशी मी तिच्या मागे लागले. पण ती सारखीच माझ्या हातातून निसटत होती. मी तिच्याकडे पाहिलं, तर ती बावचळल्यासारखी हसत होती. ती काय आणि का वागते आहे, हे तिला कळतंय, याचा मला जोरदार संशय आला. ती मला खिजवत होती का? मग ती का हसते आहे?
तिनं तिची छत्री घेतली आणि निघाली. मी तिच्याकडे धावत गेले आणि म्हटलं, ‘‘अगं, पाऊस थांबू तर दे, मग जा. तुला या वादळाची, त्याच्या आवाजाची भीती नाही वाटत?’’
तिनं फक्त ‘नाही’ची मान हलवली.

मला तिच्यामागे जायचा मोह झाला. मी तिच्याबरोबर निघाले, पण रस्त्यात तिनं मला ओळख दाखवलीच नाही. ती छत्रीच्या बाहेर हात काढून पाऊस पीत होती. तिनं माझ्याकडे एकदा बघावं, मी तिच्या मागे कितीतरी लांब चालत आले आहे, याची दखल घ्यावी म्हणून मी धडपडत होते. पण ती तोंडातून काहीतरी आवाज काढत गाणं गात होती. मधेच एखादी गिरकी घेत होती. झाडाच्या ढोलीत लपलेले पक्षी नीट आहेत, याकडे बघत होती. तिचे ओले झालेले कपडे न सावरता ती चालली होती. ती एकटीच होती. आत आणि बाहेर तिला फक्त पावसाची सोबत होती. मी दमून एका झाडाखाली थांबले, ती पुढे जात राहिली. ती तलावाच्या गल्लीत शिरलेली मी पाहिली. तिथे आजूबाजूला खूप चिखल झाला होता. निसरडं झालं होतं. कशी जाईल ती तिथून? मी काळजीनं तिथेच उभी राहिले.

तलाव ओलांडून पुढे गेल्यावर एक मोठी वस्ती लागते. ती स्थलांतरितांची वस्ती आहे, असं मी खूप दिवसांपासून ऐकत होते. माझ्या आधीच काही दिवस ही माणसं इथे आली होती. गावात त्यांना कुणी जागा दिली नाही, म्हणून गावाच्या बाहेर त्यांनी ही वस्ती केली होती. त्यांची भांडीकुंडी जिथे जागा मिळेल त्या जागेवर बसली होती. पण यांना आपली जागा कुठे हे माहीत नव्हतं. ती कुणी हिसकावली होती का? सगळेचजण आले होते का? की घरातली कुणी म्हातारी माणसं तिथेच पडली होती? माहिती नाही. त्या विचारांची भीती वाटत होती. मग ही मुलगी एवढ्या लांबून माझ्याकडे का आली असेल? तिला वाचता येत होतं का? मग? भूक लागली असेल का? त्या वस्तीत शेगड्या पेटल्या होत्या. धूर झाला होता. ओली लाकडं पेटवली, की असंच होणार. त्यांचा काही धूर त्यांच्या म्हणून गावातही असणार. त्यांना त्याचा वास कायम येणार. माहिती होतं मला. मला तिच्या आणि वस्तीतल्या लोकांच्या जीवनाबद्दल खूप विचार करायचा होता, पण मी खूप दमले, तिथेच ओल्यात मी बसून घेतलं. नकोच तो कोणताही चूक, बरोबर करायला लावणारा विचार. त्यापेक्षा शांतपणे पाहत राहू सगळं. फक्त पाहत राहायचं? मग काय करू? मी खूप मान हलवत होते, जोरजोरात मान हलवत मी तिथून पळ काढला. माझा एक बूट त्या चिखलात अडकून पडला. शरीराला जोडलेला पाय आला माझ्या बरोबर, पण त्याच्या खुणा पुसायला तयार नाहीत. त्या नंतर खूप टोचतात. पुढे तिलाही त्या टोचतील का?
मी धावतच घरी आले. टेबलावर सगळा पसारा पडला होता. मी ते कागद ओलेत्यानं खाली वर केले. सगळा विचार फेकून देता आला तर? आम्हाला जसं स्वतःला माहीत नसलेल्या जागेवर फेकून द्यावं लागलं तसं. टेबलावरच्या पसार्‍यात एक फोटो होता. तो मला खरंतर फेकून द्यायचा होता, पण तो मला चिकटून बसला होता. माझ्या आत्याच्या लग्नातला तो फोटो, नवरीच्या मागे मी उभी होते. काहीतरी खेळत होते. केस कापलेले, कुरळे आणि नाक मात्र एवढंसं छोटं नकटं.

– अश्विनी बर्वे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.