Now Reading
दुर्गव्वा

दुर्गव्वा

Menaka Prakashan

दुर्गव्वा आणि गंगव्वा या दोघी विजापूर जिल्ह्यातल्या एकाच गावच्या, समवयस्क, वयाच्या साधारण चौदा-पंधराव्या वर्षी एका दलालाकरवी कोल्हापुरातल्या वेश्यावस्तीत आल्या.
दोघींची कथा सर्वसाधारण सारखीच होती. घरातल्या अठरा विश्वे दारिद्य्रात उत्पन्नाचं साधन म्हणून घरच्यांनी त्यांना तिथे पाठवलं होतं.
त्यांच्या इथल्या आसपासच्या गावातल्या कितीतरी बायका अशाच शहरात जात आणि घरी पैसे पाठवत. हळूहळू घर उभं राही, घरातली बाकीची मुलं काहीतरी शिकत. काही कामधंदा पाहत. जिच्यामुळे हे दिवस आले, त्या ताईचं चार दिवस माहेरपण करत. हे असं वर्षानुवर्षं चाललं होतं, त्यामुळे लपवण्याचा प्रश्नच नसायचा. त्यात कुणाला काही वावगं वाटतही नसे.
साधारण बर्‍या दिसणार्‍या मुलींना मुंबई, किंवा पुण्याला पाठवत. बाकीच्यांना लहानसहान शहरात. खरंतर गंगव्वा दिसायला चांगली होती, पण तिनं दुर्गव्वाचा हात धरून कोल्हापूरलाच पसंती दिली.

तिथे आल्यानंतर मावशीनं आठवड्याभरात दोघींनाही खोल्या दिल्या. गिर्‍हाइकांकडून मिळणार्‍या रकमेतले साठ टक्के मावशीला, घरी पाठवायचे तीस टक्के आणि दहा टक्के फक्त स्वतःजवळ ठेवायचं ठरलं.
गिर्‍हाइकाची खास बक्षिसी असली, तर मात्र स्वतःजवळ ठेवायची मुभा होती. त्या बाबतीत मावशी दिलदार होती, पण गिर्‍हाईक घेऊन येणार्‍या दलालांशी घासाघीस करावीच लागे.
दुर्गव्वा अबोल आणि पटकन नजरेत भरणारी नव्हती. तिचं पहिलं गिर्‍हाईक म्हणजे शहरात नवा आलेला, त्या वस्तीत अगदी शेवटी पोचलेला, प्रचंड दारू प्याल्यामुळे कशाचंच भान नसलेला माणूस होता.
त्या माणसानं खरंतर तिला काहीच केलं नाही. मात्र तो तिथेच झोपला. त्याला जाग आल्यावर तिनं त्याला चहा करून दिला आणि मग तो पैसे ठेवून तिथून निघून गेला.
दुर्गव्वा सकाळी मावशीकडे पैसे घेऊन गेली.
मावशीनं तिला दमात घेतलं, ‘‘एका रात्रीत एकच गिर्‍हाईक… परवडत न्हाई आमाला. धंदा करायचा तर सरळ कर, नाहीतर चालती हो!’’ दुर्गव्वा मुकाट्यानं खोलीत परतली. मनाशी काहीएक ठरवून तिनं तिला मिळालेल्या पैशांचं एक डोरलं आणलं. गणपतीसारखा दिसणारा एक लहान दगड आणि बारकी महादेवाची पिंड दिसेल असा वाळूतला दगड आणून खोलीत ठेवला.
त्यांची पूजा करून, त्यांच्या समोर बसून त्या अनामिक गिर्‍हाइकाच्या नावानं तिनं ते डोरलं स्वतःच्या गळ्यात घातलं.
आणि त्यानंतर तिनं धंदा करायचं साफ नाकारलं.
मावशीनं दम भरला. मारहाण केली. ती तरी किती दिवस हिला असंच पोसणार!

दुर्गव्वा म्हणायची, ‘‘मी तुमची सगळी कामं करते, पण एका मालकाला सोडून दुसरीकडे मला जमणार नाही.’’ तिला खूप मार बसला, उपाशी ठेवलं गेलं.
दुर्गव्वानं जीव द्यायचा प्रयत्न केला, तेव्हा तिला एका दलालानं वाचवलं. पण तिनं त्यालाही तिच्या अंगाला हात लावू दिला नाही.
मावशीनं तिला खोली सोडायला सांगितलं. भर पावसाळ्याचे दिवस होते. खोलीच्या बाहेर चिखलात… न खाता-पिता, पावसात भिजत पाच दिवस ती पडून राहिली. तिथल्या सगळ्या बायका-पोरींना, तिला मदत करायची नाही, अशी सक्त ताकीद देण्यात आलेली होती.
शेवटी गंगव्वानं धीर करून मावशीला विनवलं आणि दुर्गव्वाला तिच्या खोलीत घेतलं. चहा दिला. दुर्गव्वा तापानं फणफणत, अगदी आजारीच होती.
गंगव्वाच्या खोलीतल्या कॉटखाली ती झोपून राही, कारण तिथे तेवढीच जागा होती.
ती रात्रभर घाबरून जागीच राहायची.
पण दिवसा गंगव्वा, दुर्गव्वाची अगदी पोटच्या पोरीसारखी काळजी घेई.
ती तिला भात शिजवून वाढी. वेळेवर दवापाणी करी. तिनंच मावशीला सांगून दुर्गव्वाला फुलांचं छोटंसं दुकान काढून दिलं.
मावशीच्या घरची स्वैपाकापासून सगळी कामं दुर्गव्वा मुकाट्यानं करी. फुलांच्या दुकानात मिळालेले पैसेही मावशीलाच द्यावे लागत.
दुर्गव्वा तरुण होती. तिला त्या वासनांच्या राज्यात लोकांपासून सांभाळण्याचं काम गंगव्वा एखाद्या नागिणीसारखं करी. दोन-तीन वर्षं अशीच गेली. कशी कोण जाणे, पण मावशी आणि दलाल सर्वांनाच तिची दया आली. त्यामुळे तिला एक अगदी बारकी खोलीही मिळाली.
त्या वस्तीतली कॉट नसलेली ती एकमेव खोली असेल! दुर्गव्वाला पाय लांब करून तिथे झोपताही येत नसे एवढी ती लहान होती. पण तिथे तिची चूल आणि देव होते.

कितीजणांनी तिला धाक दाखवावा, मारावं… तरीही त्या अत्यंत असुरक्षित जगात मावशीच्या सावलीत तिला थोडी तरी सुरक्षितता होती. बाहेर पडलं तर कुत्रंही हाल खाणार नाही आणि गावाकडे परतण्यात अर्थ नाही, हे तिला खरंतर कळत होतं. त्यामुळे वस्ती सोडूनही जायचं नाही आणि धंदाही करायचा नाही, यावर ती ठाम होती. भल्या पहाटे जेव्हा ती वस्ती झोपी गेलेली असे, तेव्हा दुर्गव्वा कामाला सुरुवात करी, रस्ता झाडून काढी, मावशीच्या घरातली भांडी, धुणी करी. मिळेल ते काम करून पैसे साठवून मावशीला देई. थोडेसे गावाकडेही पैसे पाठवावे लागत. गंगव्वा गावाकडे जाऊन येई, पण हिला कोण नेणार? घरच्यांनी तर केव्हाच तिचं नावच टाकलं होतं.

इकडे वस्तीमध्ये ‘दुर्गव्वाचं घर आणि तिची पहिल्याच मालकावरची श्रद्धा’ हा अगदी चेष्टेचा विषय होता.
दुर्गव्वाला खरंतर तिच्या त्या अनामिक मालकाचा चेहराही आठवत नसे. पण ती रोज संध्याकाळी त्याच्यासाठी खोली आवरून ठेवी. उदबत्ती लावी. घराच्या अडसरात पळी घालून ठेवी. लांब गेलेला घरचा माणूस घरी परतावा, यासाठी तशी पद्धत होती म्हणे. आणि एक दिवस खरंच तो आला.
त्याला कुणीतरी दुर्गव्वाबद्दल सांगितलं आणि केवळ कुतूहलापोटी तो पुन्हा आला. आता तो शहरातला बरा व्यापारी होता. त्याला कुणाकडून तरी दुर्गव्वाबद्दल कळलं होतं. त्यालासुद्धा तिचा चेहराही आठवत नसणार. तरीही तिलाही त्याची ओळख पटली. तिनं अक्षरशः त्याच्या पायावर डोकं टेकवलं आणि तोसुद्धा काहीही न बोलता फक्त पैसे ठेवून निघून गेला.
दुर्गव्वानं त्या दिवशी सार्‍या वस्तीला पेढे वाटले. तिच्या मालकाचे पैसे तिनं देवात ठेवले. दररोज संध्याकाळी ती त्याची वाट पाही.
त्यानंतर सहा महिन्यांनी कधीतरी तो परत आला, तेव्हा दुर्गव्वानं त्याला जेवून जायची विनंती केली. तिनं त्या दिवशी त्याच्यासाठी स्वयंपाक रांधून त्याला जेवायला घातलं.

त्या वेळी तो थोडे जास्त पैसे ठेवून निघून गेला.
ती आणि तो… खरंतर त्यांच्यात फारसं काही बोलणंही होत नसे आणि काही घडतही नसे. पण तिच्या त्याच्यावरच्या श्रद्धेनं का असेना, पण तो तिच्याकडे वर्षाकाठी दोन-तीन वेळा तरी येत राहिला.
त्याचा व्यापार दिवसेंदिवस वाढत होता. कधीतरी तो साडी घेऊन येई. कधी एखादं धान्याचं पोतं.
तो येऊन गेला, की दुर्गव्वा अगदी दिवाळी साजरी करी. देवाला पूजा घालून वस्तीला प्रसाद वाटे.
१९९९ साली ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोगा!तर्फे त्या वस्तीतल्या ‘स्त्रियांची पुनर्वसन क्षमता’ अभ्यासण्यासाठी मी प्रथम तिथे गेले.
माझ्यासाठी ते जग अर्थातच भयंकर नवीन, भेदरवणारं, किळसवाणं आणि आपण किती भाग्यवान आहोत म्हणून सुस्कारा सोडावा, असं होतं.
त्या प्रकल्पाच्या काळात हळूहळू त्या बायका माझ्याशी बोलायला लागल्या. त्यांच्या दुःखाच्या पोतड्या माझ्यासमोर उपड्या करायला लागल्या. तेव्हा तिथे मला ही आगळी वेगळी दुर्गव्वा भेटली.
त्या मुलाखतींच्या वेळी बाकीच्या बायका हिरीरीनं बोलायच्या, रडायच्या, त्यांच्या घरच्यांच्या नावानं बोटं मोडायच्या. पण दुर्गव्वा कधीच काही बोलली नाही. तिची कहाणी गंगव्वानंच मला सांगितली होती.
आता ती वस्ती तिथून उठवलेली आहे.
मी तर दुर्गव्वाला पार विसरूनही गेले होते.
पण अगदी कालपरवा ती मला पुन्हा भेटली. एका मिठाईच्या दुकानात मी रात्री थोडी उशिरा गेले होते.
त्या दुकानात दुर्गव्वा रात्रीच्या वेळची झाडलोट करत होती. तिनंच मला ओळखलं. तिनं गंगव्वाबद्दल सांगितल्यावर मीही तिला ओळखलं.
त्या दुकानातली माणसं म्हणाली, ‘‘ताई, माणसांच्यातली देवी आहे ही बाई. रस्त्यावरच्या भटक्या भिकार्‍यांना खायला घालते आणि त्यातल्या आजार्‍यांची सेवा करते.’’

दुसर्‍या दिवशी न राहवून मीच दुर्गव्वाच्या खोलीवर गेले. गंगव्वाही आता तिच्याचकडे होती. आजारी, अशक्त गंगव्वा अगदी म्हातारी दिसत होती. दुर्गव्वा तिला सांभाळत होती.
बाकी वस्ती उठली, तरी दुर्गव्वाची खोली मात्र तिथेच आहे. उलट आता तर शेजारची मोठी खोलीही तिला मिळाली आहे.
दुर्गव्वा गंगव्वाचेच काय, पण कुणाचेच उपकार विसरलेली नाही. वस्तीतले अनेकजण शेवटी तिच्याकडे येतात. ती त्यांची मनापासून सेवा करते. जमेल तसं खाऊ पिऊ घालते.

तिचं ते देवघरही तसंच आहे. गणपती, शंकर आणि तिची ती पैशांची पेटी. नाही म्हणायला स्वयंपाकाची भांडी थोडी जास्त आहेत.
तिला तिच्या त्या मालकाबद्दल विचारायची माझी काही हिंमत झाली नाही, पण गंगव्वानंच सांगितलं, ‘‘तो वस्ताद आता जिवंत नाही, पण दुर्गव्वाला ते मान्य नाही.’’ तसंही त्याच्या मानवी अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन तिनं त्याला आपलं मानलं आहे. एवढा ठामपणा आणि मनाचा खंबीरपणा कुठून आला असेल तिच्याकडे!
ही अशी अकल्पित वाटणारी कहाणी… एकट्या दुर्गव्वाची नाही, तिला मदत करणार्‍या गंगव्वाचीही आहे आणि त्या जीवघेण्या व्यवसायातून बाहेर पडायची इच्छा ठेवणार्‍या प्रत्येकीची आहे.

– मंजूषा देशपांडे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.