Now Reading
तो गेला, न परतण्यासाठी!

तो गेला, न परतण्यासाठी!

Menaka Prakashan

रस्त्याकडेच्या फुटपाथला लागून असलेल्या दोन्हीकडच्या बोळातून आत गेलं, की दोन लांबलचक तीन मजली आडव्या चाळी, पाठीला पाठ लावून उभ्या असलेल्या. बहुतेक मधली भिंत कॉमनसुद्धा असेल…

पण शेवटची खोली असावी अशा रस्त्याकडे तोंड असलेल्या दोन खिडक्यातून लोक डोकी बाहेर काढून एकमेकांशी बोलताना दिसायचे. बहुतेक एकाच मालकाच्या दोन जुन्या चाळी, पण एन्ट्रन्स दोन्ही बाजूंच्या बोळातून… या टोकाच्या खोल्यांच्या दोन-दोन खिडक्या रस्त्याच्या बाजूला म्हणजे त्या भाडेकरूंची चैनच, चाळीत असूनही! त्यातल्या एका खिडकीतून पाणी भरलेले हंडे-कळश्या दिसायच्या. तिथे बहुतेक मोर्‍या असाव्यात. आता जुनाटपणामुळे बिजागर्‍या निखळून लोंबणार्‍या एक-दोन झडपा नि निखळलेले आडवे गज, त्यामुळे खिडकीबाहेरच्या खुंट्यांना नायलॉनच्या दोर्‍या लावून त्यावर कुणी कुणी कपडे वाळत घातलेले… बहुतेक साड्या, खालच्या मजल्यावरच्या खिडकीत पोचतील अशा…

क्वचित कुणीतरी लावलेले लोखंडी ग्रिल ही त्यातली सुधारणा.

दुसर्‍या मजल्यावरच्या उजवीकडच्या खिडकीत बहुतेक वेळा खुर्चीत ती बसलेली असायची. कारण तिचा नुसता चेहरा दिसायचा. क्वचित हातवारे करून खालून वर बघणार्‍या ओळखीच्या कुणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करायची. ट्रॅफिकच्या आवाजात बोलणं ऐकू येणं शक्य होत नसावं. मग बाजूच्या खिडकीतनं दोरी लावून कुणीतरी खाली सोडलेल्या पिशवीकडे बोटं दाखवायची. तेव्हा त्या वर बघणार्‍या माणसाला कळायचं, की तिला तो गाडीवाला पिशवीत ठेवत असलेली फळं म्हणजे बहुधा केळीच आणि क्वचित पालेभाजी वगैरे हवी आहेत. रस्त्यावरचा माणूस चाळीतला शेजारी असेल, तर वर घेऊन यायचा.

ती मग डोकं आत घ्यायची नि आतमध्ये कामवालीला म्हणायची, ‘‘काय राहीबाई, तुम्ही विसरलात ना आणायला? ते बघा, म्हापसेकर केळी घेऊन येतील ती घ्या नि मला हाक मारा पैसे द्यायला.’’
घरातल्या घरातही ती पाकीट तिच्या त्या झंपरमध्येच ठेवत असे. ते काढून पैसे मोजायची. स्वत:शीच बडबडत…

‘‘पेन्शन कशी उडून जाते कापरासारखी, कळत नाही. ह्यांच्यासारख्या निवृत्त शिक्षकाची, तीही अर्धी पेन्शन असून असून किती असणार? ही बया पगार बॅन्केत घेते नि लागेल तेवढेच एटीएममधनं काढून आणते, संध्याकाळी येताना… असो… आपलीच मुलगी आहे. काय करणारे एवढे जमवून तीच जाणे. एकटा जीव नि… किती हाव. आता झालीच आहे रिटायर व्हायला, तेव्हा समजेल, माझे औषधपाण्यात कसे उडून जातात ते…’’

पुन्हा डोकं खिडकीत घालून तिची स्वत:शीच हातवारे करत बडबड, मधेच त्या राहीबाई दुसर्‍या खिडकीशी मोरीजवळ आल्या की दिसायच्या. चहाचा कप म्हातारीच्या हाती देऊन मोरीत घुसायच्या. एकटी असली, की मग तिलाच जाणवायचं नि उगाच अपराधी पण वाटायचं. मुलीच्या विस्कटलेल्या भवितव्यासाठी ती मग स्वत:ला जबाबदार समजायची…

‘‘वडील अकाली गेले नसते, तर वंदनाचंही लग्नकार्य वेळेवर झालंच असतं की… मग तडजोडीसाठी करावं लागलेलं नि जवळपास फसलेलं अशा लग्नाच्या गुंतवळ्यात तिची परवड झाली नसती! हे गेले तेव्हा समोरच्यांनी ठरत आलेलं लग्न मोडलं. पसंतीचा प्रॉब्लेम होताच. कारण या बयेच्या अंगावर मांस वाढलंच नाही कधी… पाठीपुढे सपाट… बघणारा तरी काय बघणार! शरीराला उभारी कशी ती नाहीच. मनालाही नव्हतीच! अगदी निर्लेप नि निरीच्छ!

तरीही खर्चाची तरतूद करून ह्यांनी निरोप दिला होता, पण ह्यांचा दुर्लक्ष केलेला रक्तदाब अचानक वाढला नि कळेकळेपर्यंत सारं संपलं…’’

वंदनाच्या पाठचाच थोडा लहान विद्याधर नुकतंच शिक्षण संपवून दिल्लीजवळ कुठे नोकरीसाठी गेलेला. तो मग तिथेच स्थायिक झाला… पण ते पुढे… वडलांच्या दिवसांना आलेल्या त्याला जेव्हा वंदनासाठी आलेल्या त्या स्थळाकडे विचारणा करायला पाठवलं, तेव्हा त्यांनी थातूरमातूर कारणं सांगून त्याची बोळवण केली. अजूनही एक कारण सांगितलं त्यांनी. मूर्खासारखं!

बाहेरून मिळवायच्या पदवीसाठी वंदना ‘प्रार्थना समाज’च्या नाक्यावरच्या क्लासमध्ये जायला लागली होती. आधी टायपिन्ग झालंच होतं, तिथला भडकमकर नावाचा कोण इन्स्ट्रक्टर तिच्या ओळखीचा झाला होता… तोही नोकरीच्या शोधात होता, बरोबर असायचा!

पुढे दोघंही कम्प्युटर शिकायला जायचे. नोकरीच्या शोधासाठी भेटायचे, बरोबर जायचे-यायचे, त्यात वावगं काहीच वाटलं नाही कधी आणि या मुलुंडच्या स्थळाकडे असली मुळात काही नसलेली बातमी पोचवली कुणी?

कायतरी निमित्त करून त्यांना मोडायचंच होतं. त्यांना बहुतेक हुंडा वाढवून हवा असावा. बोलणारं मोठं कुणी नाही. ही स्वत: क्लासखेरीज फारशी घराबाहेर पडायची नाही नि आमच्या ह्यांच्या फटकून राहण्याच्या स्वभावामुळे जवळचे नातलगही दुरावलेले. पुढे लग्नाचं मग राहिलंच! राहिली बिचारी नोकरी करत… तो भडकमकरही गेला कुठेतरी न सांगताच. ही नुसती सुन्न झाल्यासारखी!

‘‘म्हणूनच तिनं बहुतेक लग्नाशिवाय राहायचा निश्चय केला असणार! निदान तेव्हातरी…
पण मग पुढे का ठरवलं असेल…?

जवळपास चाळिशी उलटून गेल्यावर समोरून हे स्थळ आलं. सोलापुराहून तिच्याच मैत्रिणीच्या मामानं कळवलेलं… पण दुसरेपणावर! सोलापुरातल्या सूतगिरणीतला बिजवर. दोन मोठाली, वयात आलेली मुलं…

तडजोड म्हणून गेली बिचारी. आपल्याला एकटं वाटू नये म्हणून नेलं होतं काही दिवस… पण पुढची पाच-सहा वर्षं जाऊन-येऊन नोकरी संभाळली नि अगदी सोडायची, असं ठरत असतानाच जावई गेले. नशीब! मुलांची लग्नकार्यं तरी झाली होती.

नियतीनं बहुतेक त्यासाठीच तिची योजना केली असावी. राजीनामा नव्हता दिला, म्हणून आली परत… आता आपलं आहे तेच एकटेपणाचं तिचंही दु:ख आहेच की… पैसे पुरवून वापरेल, तर निदान त्याच्या लोभानं तरी कुणी विचारेल…

तसा तिचा नातू येत असतो अधनंमधनं ‘माई माई’ करत… सुट्टीसाठी आलं की मुंबईत उतरायला हक्काची जागा आहेच.

तसा तर सवतीचा नातू. हिनं मुलं मोठी झालेल्या बिजवराशी लग्न केलं तेव्हा झालाही नव्हता. मुलांची लग्नंच मुळी हिनं लावून दिली नि काय झालं शेवटी? जावई हार्ट अ‍ॅटॅकनं गेले नि मुलांनी कारखाना ताब्यात घेतला. ही आली परत मुंबईलाच, आईच्याच घरी. माझं म्हातारपण हे कारण होतंच. भाऊ तिकडे दिल्लीला जाऊन राहिलाय. त्याचं राहिलंच, पण ही तरी मला सोलापुरात घेऊन जाणार होती, तेही राहिलंच की, नि मग हीच इकडे आली!

लेकी-सुनेची बाळंतपणं झालीच होती. ही मोकळीच. पण कधी ‘माई या इकडेच विश्रांतीला…’ असं म्हणत नाहीत. बघूया, रिटायर झाल्यावर तरी जाते का ते. बरं तर बरं. जावयांच्या आग्रहावरनं नोकरी सोडायचं ठरलं होतं ते रद्द झालं, त्यांच्याच जाण्यानं! अधनंमधनं रजा घेऊन पाच-सहा वर्षं काढलीन, मग बदली घ्यायचं चाललं होतं तो तेच गेले. आली मग परत.

अशी तरी मुलांना कुठे हवी असते आई! तीही सावत्र! जाणतेपणी घरात आलेली, स्वयंपाकाची बाई एवढंच, तिचं अस्तित्व मर्यादित होतं.

आता तर सख्खा असून माझाही नाही का राहतोय दिल्लीत! सून तिकडचीच, ती कसली नेते तिकडे. बरंय; तिचं ते मानभावीपणे उगाच ‘माँजी माँजी’ म्हणत पुढे पुढे करणं नको.

लेकीला पाठवते केव्हातरी सुट्टीत चार दिवस. ती राहून जाते. ‘दादी दादी’ करत… सख्खी असून परकी झालेली नाती…

वंदनाचं तसं नाहीये. मतलबासाठी का होईना, सावत्र तर सावत्र, नातवंड येतंय भेटायला… तेवढं तरी आहे तिच्या नशिबात…

नि आपलं काय? कसलं हे आयुष्य! आपणही दुसरेपणावरच आलो या घरात. लेकीसारखाच सवतीचा मुलगा स्वतःचा समजून सांभाळला, तरी जाणता झाल्यावर पळालाच घरातून, आपल्याला अपयश देऊन! आपणही काही कमी नाही केलं अवधुताचं. वाटलंवतं, याचाही हातभार लागेल संसाराला, तो हा निघूनच गेला…

ह्यांच्या शाळेच्या नोकरीवर घर सांभाळून तीन-तीन मुलांचं करायचं सोप्पं नव्हतं. तशा शिकवण्या करायचे. पण हा बाबा स्वतंत्र असल्यासारखा काही न सांगता सवरता निघूनच गेला की. म्हणजे अगदी बेपत्ताच झाला. चिठ्ठी-चपाटी नाही, की कुणाशी काही बोलणंही नाही.

आधी बापाशी कुठे धड होतं, घुम्या मेला, बोलायचाच नाही. मग ह्यांनीही फारसे कष्ट घेतले नाहीत त्याला शोधायला. का त्यांना काही कळलं होतं तेच जाणोत. तेव्हा बोलले मात्र काहीच नाहीत. अवधुतालाही काही वाटलं नसेल का? बापाबद्दल तरी! की आकसच वाटल्यामुळे तो निघून गेला? नंतर केव्हा तरी हे म्हणाले, की त्याच्या पत्रिकेतच घरापासून दूर जाण्याचा योग होता. आपण मात्र अपयशाचे धनी. बोलले नाहीत, तरी ह्यांनीसुद्धा त्याचीच तर हाय खाल्ली नसेल ना… हे जाईपर्यंत तरी रुखरुख जाणवायची. मग दिलं सोडून. आपल्याही मुलांचं करायचं होतंच की…

ही पोर तेव्हापासूनच विक्षिप्तासारखं वागायची. बाहेरून क्लासात जाऊनही शिक्षणात फारशी प्रगती झालीच नाही. तो भडकमकरही दुरावलाच होता.

सहज नाही मिळाली, तरी हिनं टायपिस्ट म्हणून नोकरी धरलीन, त्या सरकारी अकाऊन्टन्ट खात्यात… फॅशन, कपडेलत्ते कधी धड नसायचे. नटणं-मुरडणं तर औषधालाही नाही. नंतर योगच आला नाही, तरी कुठे स्थळ बघायला जावं, तर काहीतरी खुसपटं काढून नकार द्यायची.

‘‘हे बघ बाई, तुझं तू जमवलंयस का कुठे तर सांग. अगदी जातीबाहेरसुद्धा चालेल.’’
असं नुसतं म्हणायचीही चोरी. वाटलंवतं, की…
‘तो क्लासमधला भडकमकर आहे का गं अजून लग्नाचा?’ असं एकदा विचारावं…
काय बिशाद! अशा नजरेनं बघायची की भीतीच वाटायची.

अगदीच रूक्ष ही बाई! तेव्हा जे मोडलं ते लग्न बरीच वर्षं राहिलंच. बहुतेक ती निराशेच्या आवर्तात सापडल्यासारखी झाली. आपण नि आपलं ते रूक्ष जगणं, याचीच बहुतेक सवय झाली असावी; अगदी निरीच्छ झाल्यासारखी!

शेवटी काय झालं? तडजोडच करावी लागली बिजवराची. बरं, पैसेवाला बघितला तरी हिच्या हाती काय लागलं?

हे लवकर गेले नि मग बघणारं कुणी नाही, म्हणून तेव्हा राहिली तरी स्वतः नाही, तरी भावाला शिकवत राहिली, हे बरीक चांगलं केलंन… भाऊ नोकरीला लागला, पण शेवटी गेला दूरच…!

या देवधरांच्या घरात माणसं घरापासनं लांब जाण्याची प्रथाच असावी बहुतेक.

हेही कोकणातलं घर नि आयशीला चुलत्याच्या हवाली करून मुंबईत आलेले, म्हणजे पळूनच. ते अगदी वळून बघितलेनी देखील नाहीच.

अगदी एक मूल ठेवून पहिली बायको गेली, तरी ह्यांनी आयशीला आणलेनी नाही. लग्न वाडीला जाऊन करून आलो! मी आले तीच लहान लेकरू पुढ्यात घेऊन बसले. मलाही सासूच्या पाया पडायला नेलेनी नाहीतच कधी! तीही बाई अगदी निर्लेप, दिराची उष्टी काढत राहिलेली… तिकडे मजेत असावी…

इकडे माझ्याहीबद्दल या पोराच्या मनात काय अढी होती काय जाणे… बोलायचा नाहीच कधी काही… अगदी बापाशीसुद्धा. घुम्याच राहिला नेहमी नि शेवटी गेलाच तो निघून…

श्रीहरी श्रीहरी… असो. आपलं हे कर्मकांड असंच जवळपास संपत आलेलं… या वंदनाचं काय होईल, तो श्रीहरीच जाणे…

आता या दुखर्‍या पायानं खाली जायला होत नाही. या पोरीलाच काय ते येताना आण म्हणून सांगावं लागतंय. ती दोरी सोडल्यावर कोण तरी पाठवतं त्यातनं. पण काय, तर गाडीवरची पालेभाजी, नाहीतर केळी. आणि तिला हे असलं लोकांचे उपकार घ्यायला नाही आवडत.

अजून बया दिसली नाही खाली, पण यायला झालीये. ती येईतो राहीबाईंना चहा सांगावा का?

‘‘राहीबाई…’’ गेल्या वाटतं या! न सांगताच जातात, तेही गॅलरीतलं दार उघडं टाकून. आता ही बया आली नि दार उघडं दिसलं, की करवादेल… आलीच वाटतं…’’

लेकीची चाहूल घेत आपलं स्वगत संपवून पाय ओढत मग ती दारापर्यंत जाते… लेकीच्या स्वागताला… का भीतीपोटी ते अजून तिलाच कळलं नाहीये.

दारातल्या शूस्टॅन्डवर ठेवलेली केळी मात्र तिला दिसतात.

‘हे काय? राहीबाईंनी हाक नाही मारलेनी पैसे द्यायला? का म्हापसेकरच इथे ठेवून गेले? आता उद्या तायडीच्या हाती द्यावे पाठवून.’

स्वतःशी बोलतानाच राहीबाईंनी जाताना अर्धवट ओढून घेतलेली दाराची एक झडप ती पूर्ण उघडते. तो दारात समोर एक अनोळखी रामदासी म्हणावा असा लुंगी नि कफनी ल्यालेला, रापलेल्या चेहर्‍याचा, खांद्यापर्यंत लांब केसांचा दाढीदारी उभा!

वाढलेल्या दाढीत लपलेलं हसू उलगडलं नि शब्द सांडले. तो इसम इतकंच बोलला, ‘‘ओळखलं नाहीस ना माई?’’

तिची फक्त मान हलली, नकारात्मक. पण विचार आलाच मनात, ‘आपल्याला माई म्हणणारी एकच व्यक्ती! म्हणजे… म्हणजे हा अवधूत तर नव्हे?’

कदकाठी, रंगरूप नि आवाज… कश्शाचा मेळ बसत नव्हता. कसा बसणार? गेला तेव्हा नुकतीच शाळा संपली होती, म्याट्रिक का काय, तेही झाला नव्हता धड. म्हणजे आता जवळपास चाळिसावर वर्षं लोटली होती. आणि तरी त्यानं मात्र ओळखलं होतं…

क्षणभर डोक्यातले विचार थांबवून ती मागे सरली. तिची विचारशक्तीच संपल्यासारखी झालेली, तरी तिनं त्याच्याकडे अचंब्यानं पाहत फक्त दारातल्याच खुर्चीकडे बोट केलं. तो बसतोय तोवर तिला भान आलं नि चाचरत म्हणाली, ‘‘अवधुता तू? काय ही दशा झालीये तुझी!’’

पुढे तिच्या तोंडून ‘बाळा’ असा उच्चार होता होता राहिला.

‘‘युगं लोटली तुला जाऊन नि होतास कुठे इतकी वर्षं?’’
‘‘तिकडे उत्तरेत… म्हणजे लगेच नाही गेलो. आधी कुंभमेळ्यात उज्जैनला नि मग बरीच वर्षं हरिद्वारच्या आश्रमात होतो.’’
‘‘म्हंजे गावी त्या साखरप्याला का कुठे ते आज्जीजवळ गेलाच नाहीस?’’
‘‘आगीतनं फुफाट्यात? मग इथेच नसतो का राहिलो?’’
‘‘म्हणजे इथे कुठली आग होती बाबा? मी तर तुला लहान असल्यापास्नं संभाळलं!’’
‘‘आई मला आठवतच नाही. मी तुलाच आई समजलो. पण बाबांशी कुठे धड होतं! सदा कावलेले. मी गेल्यावर त्यांनी केला का माझा तपास?’’
‘‘नाही, म्हणजे चार-आठ दिवस सगळ्या नातलगांकडे चौकशी केलीच. पण नोकरी सांभाळून ते कुठे जाणार होते, आणि जोडलेली माणसं होतीच कुठे फार…’’
‘‘जी होती ती तुझ्यामुळेच. त्यांना माझ्या हातून मुखाग्नी नकोच होता बहुतेक! इथे असतो तरी नसता दिला…’’
‘‘असं बोलू नये रे. अरे, बापमाणूस थोडा कडक असायचाच. त्यात काय एवढं?’’
‘‘आणि असंही तिकडे काकानं टिकू दिलं असतं का मला? तो ह्यांचाच भाऊ. इस्टेटीतला वाटेकरी कुणाला हवा असणार!’’
‘‘म्हंजे तुम्हा देवधरांच्या घरात घर सोडून जाण्याची प्रथाच असावी! हेही पळूनच आले असावेत बहुतेक, ते वळून बघितलेनी नाही नि मग तू गेलास तो आत्ता उगवतोयस. तेही या अवतारात!’’
‘‘ते जाऊदे गं… तुझं हे असं झालेलं उशिरा कळलं मला. पण ते गेले कधी?’’
तिच्या गळ्याकडे सहेतुकपणे पाहत त्याचे प्रश्न सुरूच.
‘‘त्यांना जाऊन युगं लोटली… पण तू काय केलंस बाबा?’’
‘‘तसं माझ्या कानांवर आलेलं ते वेगळंच होतं कायतरी… नोकरीत काहीतरी गडबड झाल्याचं!’’

‘‘शिक्षकाची नोकरी. कंटाळून लवकर सोडली थोडी. नंतर शिकवण्या करत होतेच की! त्यात काय? लोक बोलतच असतात काय काय, त्यांची तोंडं कोण धरणार!’’

काहीच न सुचून मग ती भिंतीजवळच्या खाटेवर बसता बसता बोलली, ‘‘आणि ते गेले, स्वतःहून निवृत्ती घेतल्यावर लगेचच… दाखवलेनी नाही तरी बहुतेक तुझी हाय खाल्ली त्यांनी.’’

‘‘इतक्या दिवसांनी? मी गेलो तेव्हा नाही काही झालं? काय तरी नक्कीच घडलं असेल… कुणास ठाऊक!’’ एवढंच तो तुटकपणे उद्गारला नि हातानं पाण्याची खूण केली, तेव्हा तिला जाग आली.

अचानक, तेही अनपेक्षितपणे समोर आलेल्या त्याच्या या अवतारानं भारावलेली ती आता जरा सावरली. तोवर स्वत:शीच…
‘हे काय जुनं उकरून काढायला लागलाय? तायडीचं तसं नि याचं हे असं…’

मग गुडघ्यांवर हात देत पाणी द्यायला उठली. तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी घेऊ का उठून तुला त्रास होत असेल तर? पण मला स्नानबिन करावं लागेल आधी.’’

त्याला हातानंच थोपवून ती आत गेली. स्वत:शीच आश्चर्य करत. कारण लहानपणापासून जवळपास पंधराएक वर्षं तो तिच्याजवळच तर होता, कधी मोकळं बोलायचाच नाही. त्याला पाणी देऊन ती पुन्हा खाटेवर बसताना त्याला म्हणाली, ‘‘चहा टाकते, तायडी यायला झालीच आहे.’’

‘‘तुझा झाला असेल तर नको.’’
‘‘माझा राहीबाई करून जातात, पण आज विसरल्या बहुतेक. आणि तायडीला ताजा लागतो. झालीच यायला…’’
पाण्याचा ग्लास हातात धरून तो आत खिडकीजवळच्या मोरीपाशी जाताना म्हणाला,
‘‘ठेवतो मी. तू नको उठूस. आणि मधे हे पार्टिशन कधी घातलं?’’
‘‘झाली असतील बरीच वर्षं… कोण जाणे! तू आलाचेस कित्तीतरी वर्षांनी. अरे, कुणी आलं असलं, तं आम्हा बायांचं अडतं ना कपडे बदलायला!’’
‘‘तेव्हा आम्ही लहान होतो म्हणून चाललं, पण तायडी आहे कोणत्या ऑफिसात?’’
‘‘ते अकाऊन्ट का काय ते सरकारी… करायलाच हवी ना बाबा नोकरी, मला तुझ्या बाबांची अर्धी तरी पेन्शन मिळतेय… पण तिला कोण बघणार… माझ्या माघारी. शिक्षण झालं नि विद्याधर गेला दिल्लीजवळ कुठे ते गुरगांवला नोकरीसाठी. हिचीच काळजी होती…’’
‘‘तिच्या लग्नाचं कुणी बघितलंच नाय का मग?’’
‘‘होतं कोण बघायला? शेवटी उंच वयात स्वत:च बिजवर बघितलान नि लेकी-सुनांची बाळंतपणं करून आली परत, माझ्याचसारखी होऊन. नशीब असतं एकेकाचं बाबा!’’
‘‘म्हंजे? ते क्लासमधल्या त्या भडकमकराचं काय खरं नव्हतं म्हणायचं!’’
‘‘तू पण लोकांसारखंच बोलायला लागलाहेस… अरे, खरं म्हणावं असं होतंच कुठे काय? आणि तुला कसा म्हायती तो भडकमकर?’’
‘‘मला तो…’’ बोलता बोलता त्यानं शब्द गिळले.
‘‘अगं, म्हंजे मी असतानाच ती क्लासला जायला लागली होती ना म्याट्रिकच्याही आधी!’’
‘‘पण तेव्हा ठरलं असं काहीच नाही. नाकासमोर चालणारी तायडीसुद्धा काही बोलली नव्हती. पुढे तुझे बाबा ठरवून आलेले, तेही मोडलं.’’
‘‘कुणी मोडलं?’’ त्याचा सडेतोड प्रश्न.
‘‘म्हंजे? अरे, त्या मुलाकडच्यांनी. म्हंजे बाबा गेल्यावर घरात जाणतं कुणी नाही तं हुंडा वाढवून मागणार कुणाकडे? ते असतील थाटमाटवाले. आपली पत तुला माहितीच…’’
‘‘म्हंजे तायडीचंही काही धड झालं नाहीच!’’
‘‘तू इथे असतास तर झालंही असतं कदाचित. तिचंच काय, तुझंही झालंच असतं की! उगा वणवण करत राहिलास.’’
‘‘प्राक्तन होतं ते!’’ एवढंच बोलू शकला तो.

स्वत:च्याही नकळत त्यानं फक्त एक सुस्कारा सोडला. माई चहाला उठलेली पाहून त्याच्याही डोक्यात काहीतरी घोळायला लागलं होतं.
‘या वेळी ठरलेलं लग्न मोडल्याचं तिला विशेष काही वाटलं नसावं का? का हा दुसरा धक्का तिला पेलवला नाही? पण ती त्या भडकमकरच्यात कितपत गुंतली होती? कोण जाणे, तो मात्र नक्कीच गुंतला असणार. म्हणूनच तर…

पण मधे इतकी वर्षं गेल्यावर बिजवर का पत्करला असेल तिनं? माई म्हणाली त्यावरून जवळपास वीसेक वर्षं तरी ती तशीच राहिली होती, म्हणजे तीही भडकमकरची वाटच बघत होती. असणार तर! आणि वैराग्य आल्यासारखा हा माणूस मात्र खात्री करून न घेताच परागंदा झाला… जाऊदे!…’

अवधूत आपल्याच तंद्रीत असताना दरवाजाची अर्धवट बंद असलेली झडप उघडली नि वंदना आत आली. चपला काढताना नजरानजर झाली नि ती अचंबित होऊन क्षणभर पाहत राहिली.

त्याचं दाढीतनं डोकावणारं अस्फुट स्मित ओळख पटायला तिला पुरेसं होतं. हातानं चष्मा काढून पुसत तिनंही तसाच प्रतिसाद दिला आणि कॉटवर बसताना बोललीच…

‘‘घराची आठवण आली म्हणायची! किती वर्षांनी?’’
‘‘कुणी मोजलीयेत! आता बघ की तुला चष्माही लागलाचंय…’’
‘‘मी आता रिटायर व्हायला आले बाबा… तू तर चार वर्षांनी मोठा म्हणजे तुला जाऊन चाळीसावर वर्षं उलटली.’’
‘‘जवळपास पंचेचाळीस! अवतार बघ काय झालाय…’’ आता माई सहभागी झाली.
‘‘खरंय. माई म्हणतेय तेवढी असतीलही… भटकंतीत काळवेळ कळलीच नाही.’’
‘‘होतास कुठे पण तू? का तेही माहीत नाही? आणि हे टेंगुळ कसलं डोक्यावर?’’
‘‘तसंच आहे ते इतक्या वर्षांचं. परिक्रमेची निशाणी… आणि इतक्या ठिकाणी गेलो, कुठे स्थिर नाहीच. मग काय सांगू?’’
‘‘आणि सामान? ते कुठंय?’’
‘‘ही काय खांद्यावरची झोळी! आहे काय विशेष… दोन जोड्या लुंगी-कफनीच्या, गमछा नि डायरी बस्स…! अनवाणी पायांनी कुठेही जाऊ शकतो. मीच गरजा कमी केल्याहेत. त्यामुळे कुणावर अवलंबून राहायला लागत नाही.’’
‘‘आणि आजारपण आलं तर?’’ माईची रास्त शंका.
‘‘सहसा होत नाही असं… आणि आलंच तरी कुठल्या तरी मुक्कामावर सोबती काळजी घेतात. आजवर कधी चोचले केले नाहीत म्हणूनच शरीर साथ देत आलंय. एकेक तप काढलंय एकेका ठिकाणी…’’
‘‘म्हणजे? अजून परत जायचा विचार आहे काय? बाबारे, आता पुरे झाली भटकंती!’’
‘‘वयाचा विचार कर. राहा इथेच. आम्ही दोघी, त्यात तू तिसरा. काय कमी नाय पडायचं.’’ मधेच माई.
‘‘मी ठरवून भटकंतीला नव्हतो गेलो माई. तेव्हा काय कळत होतं? हां, आधी बाबांना कंटाळून घराबाहेर पडलो, तेव्हा भरकटलो होतो. पण भूक योग्य दिशेला घेऊन गेली नि नंतर ध्येय नक्की झालं. एका भल्या माणसामुळे उज्जैनला स्वामी भेटले नि मग निश्चय झाला… आधी परिक्रमा… परिक्रमा पूर्ण झाल्यावर हरिद्वारला गेलो. आधी पाठशाळा नि मग इतर उपक्रम नि स्वामींच्या आश्रमातूनच मानवसेवा सुरू झाली.’’
‘‘हे सगळं एवढ्या लहान वयात कसं सुचत गेलं तुला?’’ वंदना.
‘‘तायडे, घर सोडलं त्या क्षणीच अवघं विश्व माझं घर झालं. भक्तिभाव म्हणून नव्हे, वेगवेगळ्या माणसांतून फिरत असताना सेवाभाव मात्र जाणवला. असूदे ते. तुझं काय?’’
‘‘काय असायचंय, बघतोचस ना… नोकरी करतेच आहे. नि लग्नाचा अनुभव घेतला नि मुलं न होता मुलांचाही!’’ ती क्षीणसं हसली.
‘‘तू जर ठाम उभी राहिली असतीस, तर तुझा स्वत:चाच संसार संभाळला असतास. माईनं सांगितलं मला. बाबांच्या कडक वागण्यानं कंटाळून मी घर सोडलंच होतं, तूही सोडायचंस.’’
‘‘काय बोलतोयस तू? मी कुठे जाणार होते?’’
‘‘का? भडकमकर तयार होता तुला गावी घेऊन जायला…’’
‘‘हे तुला कुणी सांगितलं?’’
‘‘त्यानंच. तो भेटला होता मला, माझ्यासारखाच परिक्रमेला निघालेला. इथून गेला तेव्हा सुरुवातीला बरेच दिवस बडोद्यात कुठल्या तरी नातलगाकडे होता. मग कोण भेटलं ते, गेला परिक्रमेला… नंतर शेवटच्या काळात हरिद्वारला आम्ही काही दिवस एकत्रच होतो. बरंच बोलणं व्हायचं आमचं. पुढे आमच्या वाटा वेगळ्या झाल्या.’’
सांगावं का नाही, अशा संभ्रमात असल्यागत तो थबकला.
‘‘त्याचं काय झालं पुढे?’’ माई.
त्यानं फक्त सुस्कारा सोडत म्हटलं, ‘‘त्यानं हरिद्वारच्या भेटीत मला सगळं सांगितलं होतं.’’
‘‘कशाबद्दल?’’ वंदना.
‘‘तुमच्या पळून जाण्याच्या बेताबद्दल. त्याला तू आवडली होतीस. तुला तो काही दिवस गावी नेऊन ठेवणार होता, पण हे कळल्याबरोबर बाबांनी तुझं लग्न ठरवलं, घाईघाईत.’’
‘‘हे सगळं त्यानं सांगितलं तुला? त्याला कसं म्हाईत?’’ त्या वेळची थोडीफार कल्पना असलेल्या माईलाही आता हे ऐकून धक्का बसला.
‘‘कारण तायडीनं जाऊ नये म्हणूनच बाबांनी दुसरीकडे बोलणी केली, लग्न ठरवलंही आणि त्यांनीच पुढे…’’
‘‘पुढे काय?’’ वंदना.
‘‘मोडलंही! दुसर्‍याकडून भडकमकरचं प्रकरण त्यांना कळवून त्यांनीच तुझं लग्न मोडलं.’’
‘‘काय? असं का करतील ते? चांगला हुंडा देऊन…’’ माई.
‘‘ते सगळं वरवरचं. कारण त्यांची स्कूल कमिटीसमोर चौकशी सुरू होती. पैसे घेऊन मुलांना पास करण्याबद्दल. नोकरीचा राजीनामा द्यावा लागणारच होता. मग घर कोण चालवणार? त्यांची तेव्हाची पेन्शन पुरणार नव्हतीच.’’
दोघी मायलेकी एकमेकींकडे पाहत सुन्न होऊन एकमेकींचा हात धरून बसून राहिलेल्या.
‘‘हे तुला सांगायचं नव्हतं. पण भडकमकरनं तुझ्याकडे पाठ फिरवली नव्हती हे तुला कळावं, अशी त्याची इच्छा होती म्हणून सांगितलं.’’
‘‘इतकं सगळं केलंनी असेल असं वाटलं नव्हतं… फक्त लग्नाचं पुढे बघू म्हणाले होते…’’ एक सुस्कारा सोडत माई बोलली.
तिघंही सुन्न होऊन बसून राहिले. मग वंदनाला भान आलं नि ती चहा द्यायला उठली.
‘‘माई, जास्त केलायेस? दादा, तुझाही चहा व्हायचाय ना?’’
‘‘अगं, माझाही नाही झाला. आज राहीबाई तशाच गेल्या. त्यांना नको असला, की निघून जातात…’’
माईनं वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला.
‘‘अवधुता, आता तू कुठ्ठे जाऊ नकोस बाबा… आम्ही दोघीच कशा दिवस काढणार?’’
‘‘जावं तर लागेलच. माझ्यावर जबाबदारी आहे आश्रमाची. मी नाशकातला महाकुंभ झाल्यापासनं महाराष्ट्रात फिरतोय. आता परतायची वेळ आलीये. त्याला कुठून कळलं माहीत नाही, पण बाबा गेल्याचंही मला भडकमकरनंच सांगितलं होतं. तेव्हा नाही जमलं, पण आता वाटलं, तुम्हा दोघींना भेटून जावं.’’
वंदना सुन्न झाली होती नि माईला काही सुचतच नव्हतं. जेवणं धड झालीच नाहीत. अवधूत ‘रात्री जेवत नाही’ म्हणाला…
‘‘मी उद्या सकाळीच निघेन. तुम्हाला जाग यायला नको, बाहेरच झोपेन बाकड्यावर…’’
थोड्याफार ऑफिसच्या गप्पा झाल्यावर अवधूत स्नान करून फक्त दूध घेऊन झोपला, तेही गॅलरीतल्या बाकड्यावर! झाल्या घटनांचा लवलेशही मनात न ठेवता अगदी निर्लेप, निरीच्छ झाल्यासारखा; तिच्यासारखाच!
दुधाच्या पिशवीसाठी वंदनानं दार उघडलं. बाकडं रिकामं होतं. दार लावताना सहज तिचं लक्ष गेलं, तो कालची केळी त्या शू रॅकवर तशीच राहिलेली. ती उचलताना त्याखाली अवधूतची चिठ्ठी होती, दोन ओळींची. तिनं ती उघडून मोठ्यानं वाचली.
‘‘गेला तो! कधीच न परतण्यासाठी! होय. त्याच्या उत्तराखंडमधल्या आश्रमवासींनी त्याच्याच सांगण्यावरून मला कळवलं होतं… तोंडावर तुला सांगायची माझी हिंमत नाही झाली!’’
‘‘काय?’’ दोघी एकमेकींकडे पाहत एकदमच उद्गारल्या.
वंदना दाराजवळच्या खुर्चीत मटकन बसली. तिला कळत नव्हतं आपल्याला रडू येतंय का! आणि काही न सुचून माई उभ्याउभ्याच तिच्या पाठीवरनं हात फिरवत राहिली, बराच वेळ.

विजय खाडिलकर, मुंबई
vijay.s.khadilkar@gmail.com
मोबाईल : ९८२१२२२०४२

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.