Now Reading
तारा

तारा

Menaka Prakashan

आईनं ताराचे गोबरे गाल एकाच चापटीनं लाल केले होते. ती खोलीच्या खिडकीच्या कोपर्‍यात मुसमुसत होती. आईनं बडबडत पितळी हंडा, कळशी कमरेवर घेतली आणि खळकन कडी उघडून बाहेर गेली. बाबांनी ताराला जवळ बोलावलं. तेही बादली घेऊन जाणार होते आईच्या मागे, पण जाण्यापूर्वी त्यांना ताराशी बोलायचं होतं. मग बाबाच उठून ताराजवळ गेले. तसं तारानं तोंड फिरवलं. ती खिडकीचा गज नखानं कोरत होती. गजाबाहेरून दिसणार्‍या पाण्याच्या टँकरपाशी बायकांच्या गर्दीत आईकडे घुश्शानं पाहत होती. बाबांनी तिच्या फ्रॉकच्या झालरीला लागलेली माती झटकली, तिच्या फ्रॉकचा बंद बांधला आणि आकाशवाणीसारख्या आवाजात म्हणाले,
‘‘बाळा, असं दुसर्‍याच्या घरात डोकावून नसतं बघायचं. तू वाढदिवसाला गेली होतीस की नाही. परवानगी न घेता दुसर्‍याच्या घरात जाऊ नये. ती तुझी कितीही मैत्रीण असली, तरी दुसर्‍याच्या वस्तूला हात लावायचा नसतो. विचारायचं, की ‘मी घेऊ का?’ आता नाही ना करणार तू असं?’’

खट खट खट
तारा फ्लॅश मारत होती, दुसर्‍याच्या घरात डोकावून, अजिबात परवानगी न घेता, कशीही घुसून. मिळतील तसे फोटो काढत होती. जिकडून पळता येईल तिथून पळत होती. ती सडपातळ असल्यानं चपळ होती. सेक्युरिटी गार्ड मागून ओरडला, तशी ती अंधारात नाहीशी झाली. या बंगलेवाल्यांकडे इतके सेक्युरिटी गार्ड असतात… किती जणांना पैसे चारणार? ती लपली होती त्या शोभेच्या झुडपाला फोनमुळे प्रकाश फुटला. तिनं फोनवरून भराभर फोटो बॉसला पाठवले. तरी बरं, नेटला रेंज होती. पुढचा एक मिनिट फक्त तिला तसंच थांबून राहावं लागणार होतं, तिला किती वेळचं बाथरूमला जायचं होतं. युरिन इन्फेक्शन अजून बरं झालंच नव्हतं. तिला आग होत होती तिथे… तिला नोटिफिकेशन आलं, तिच्या बॉसनं फोटो इन्स्टावर अपलोड केले होते. ती बाथरूम शोधायला उठली.

‘‘आई, तू माझ्या दप्तराला कशाला हात लावत असतीस गं सारखी, मला अजिबात आवडत नाही.’’ आईनं काही ऐकलं नाही.
‘‘तारा, तू जरा शांत हो. मंगल, खरंच तू कशाला तिच्या दप्तराला हात लावतेस?’’ संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या फोटोला गंध लावताना बाबा शांतपणे म्हणाले.
‘‘तुम्ही तिची अजिबात बाजू घेऊ नका.’’
‘‘हे बघ, दप्तर ही तिची वैयक्तिक वस्तू आहे. दुसर्‍यांच्या वस्तूला परवानगीशिवाय हात लावू नये.’’
बाबांच्या या वाक्यावर तारा हसली. तशी आई म्हणाली, ‘‘तुमचं झालं असेल, तर जरा बाहेर जाऊन येता का?’’ आईनं बाबांना डोळ्यांनी खुणावलं. बाबांना इशारा कळला, तसे ते शर्ट घालून बाहेर पडले.
दप्तरामधलं स्टे फ्री काढत आईनं विचारलं, ‘‘हे काय आहे? कुणी दिलं तुला?’’
‘‘अगं, शाळेत एक ताई आली होती तिनं दिलं. तिनं सगळं समजावून सांगितलं, की आपल्याला तिथून चक्क रक्त येतं…’’
‘‘गप्प बस, हळू बोल जरा.’’
‘‘अगं, हळू काय बोलायचं त्यात? तू हे मला काही का नाही सांगितलं?’’
‘‘त्यात काय सांगायचं असतं? तुला पाळी आलीये का अजून.’’
‘‘अगं, येऊच शकते ना पण?’’
‘‘तेव्हाचं तेव्हा बघू… नववीत आलीस, पण तुझी छाती अजून गावरान बोराएवढीच आहे, कधी भरणार तू आणि ही अशी थेरं…’’
‘‘सॅनिटरी नॅपकीन म्हणतात त्याला.’’
‘‘तेच ते, आपल्याला परवडणार नाहीये… कळलं? मी फडकी वापरते तशी तू पण वापरायची.’’
‘‘आणि अंधार्‍या बाथरूममध्ये वाळत घालायची. हो ना…’’
दहावीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत ताराला पाळी आली, तेव्हा आईनं तिला बाजूला बसवलं होतं. बाबांनी विटाळ करून, ताराची परवानगी घेऊन, तिचा स्टुडिओत जाऊन फोटो काढून आणला होता.

तारा आता कुणाचीच परवानगी घेत नव्हती, फक्त फ्लॅश मारत होती. फिल्म सेलेब्रिटी, क्रिकेटर, उद्योगपती, त्यांची लहान लेकरं, त्यांच्या घरातले म्हातारेकोतारे… घरातले नोकर, त्यांचे बॉडीगार्ड, ड्रायव्हर, कुणालाही सोडत नव्हती. त्यांच्या गाड्यांचे नंबर तिच्या जिभेवर होते आणि ती वेगानं त्यांच्या सोबत गाडी चालवत राहायची… ताराला पाठलाग करता यावा, यासाठी सेलेब्रिटी गाडीचा स्पीड थोडा कमीसुद्धा करायचे. सेलेब्रिटी कारमध्ये कुठल्याही अवस्थेत असले, तरी तारा त्यांना फ्रेम इन करत राहायची.

तेल लावून, मोठ्या दातांच्या कंगव्यानं विंचरून एक बाजूला भांग पाडलेला, हनुवटीवर हात ठेवून फक्त करंगळीच्या वाढलेल्या नखालाच नेलपेंट लावलेल्या मुलाचा फोटो सतरंजीवर पडला होता. तो मुलगा तारासाठी आईला पसंत होता, पण आईचे डोळे सुजून लाल झाले होते. ताराचं स्वप्न मोठं होतं. अर्थात, असं तिलाच वाटत होतं. तिनं ‘हां है कोई तो मजा जो जिना का मजा आने लगा’वर… करीनासारखं नाचून पाहिलं होतं, फोटोग्राफरनं सांगितलं होतं, फिगर मस्त आहे, ‘तुझा चेहराही फोटोजेनिक आहे, तू मॉडेलिंग कर…’ झालं मॉडेलिंग म्हणजे पिक्चरमध्ये हिरॉईन हे समीकरण तिला पक्कं माहिती होतं. ऐश्वर्या, सुश्मिता, कतरिना कैफ… अभिनयाचा काही संबंध नसतो, हे त्यांनी सिद्धच केलं होतं की… आणि आता तिला नरसीतून मुंबई गाठायचं होतं. नरसी गावाला संत नामदेव जन्मले, अशी एक अभिमानाची पुंजी… बाकी स्वत:ची ओळख शून्य. पण शून्यातूनच घडतं सगळं, तिच्या बाबांनी सांगितलं होतं की तिला… दुष्काळी का असेना, पण हिंगोली जिल्हा आहे महाराष्ट्रात, असं तिला बाहेर जाऊन सांगावं लागणार होतं. सगळा आक्रस्ताळेपणा करून झाल्यावर तिनं आशेनं बाबांकडे पाहिलं.

‘‘तारा, तुझं आयुष्य तुझं आहे, तू कळती झाली आहेस. मी काय आणि आई काय, तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही. आपण कितीही खूप माणसांत राहिलो, तरी एकटं जगत असतो बघ, आणि हे सगळ्यात खरं आहे… आपल्या जगण्यावर कुणीही आक्रमण करू नये. प्रत्येकाच्या आयुष्याचा आदर केला पाहिजे.’’ कॉलेजच्या चपराश्याच्या नोकरीतून निवृत्त झालेले बाबा बोलत होते, आईनं कपाळावर हात मारून घेतला होता. आपण जाऊ शकतो आणि बाबा कुठल्या तरी आणि कशाच्या तरी आक्रमणाबद्दल बोलतायेत, एवढं फक्त तिला ऐकू आलं होतं. ऐकण्याचा आणि समजण्याचा संबध दरवेळी थोडाच असतो.

तारा सेलेब्रिटी झालेल्या, होऊ पाहणार्‍या प्रत्येकाच्या आयुष्यात आक्रमण करत होती. अर्थात, ही घुसखोरी काही सेलेब्रिटी तिला करूही देत होत्याच की, पण आदर… रिस्पेक्ट… घंटा… ना तिला त्यांच्याविषयी होता, ना त्यांना तिच्याविषयी… अ‍ॅक्ट्रेस बनायला मुंबईत आलेली तारा ‘पापाराझी’ बनली होती. तिनं स्वत:चा पॅरासाईट करून घेतला होता. सेलेब्रिटी उठतात तेव्हा ती उठत होती, ते सिक्स पॅक बनवायला, कंबर बारीक करायला जिमच्या आत, तारा जिमच्या बाहेर गेट जवळ… उभं राहून राहून पोटर्‍यात गोळे यायचे तिच्या. हे एअरपोर्टवर शूटिंगसाठी, किंवा हॉलिडेला जाण्यासाठी, ही त्यांच्यासाठी ताटकळत बाहेर उभी. या बारीक गोर्‍या मांड्या नाचवत पबच्या आत, तारा पबच्या बाहेर. सेलेब्रिटी दयाळू असतात. त्यांना वाटायचं, इतका वेळ ही फोटोग्राफर बाहेर उभी आहे, तेही इतक्या रात्रीची, त्यात मुलगी… वाह मुलगी पापाराझी… ‘मुलगी शिकली प्रगती झाली’. सेलेब्रिटी आणि तारा यांची नजरेची भाषा असायची, ते ‘नाही नाही’ म्हणताना त्यांची ‘आता माझे फोटो काढ आणि आता नको’ ही इच्छा ताराला नेमकी कळायची. ती त्यांना स्टॉक करायची आणि ते तिला, सगळं काही एकमेकांना माहिती… बस दिल ही दिल में… जालीम दुनिया को जिसका पता नहीं। पण त्या जालीम दुनियेलाच सगळं कळलं पाहिजे यासाठीच पसारा मांडला होता की सगळा. कोण कुठे काय करतो, खातो, पितो, झोपतो (कुणासोबत), सगळ्याची फोटोसकट माहिती ताराकडे असायची. हॉट पापाराझी तारा…

तिनं नेहमीप्रमाणे फ्लॅश मारले, समोरचीनं देखील तिला हसून प्रतिसाद दिला. तिची वेळ कधी चुकायची नाही, नाईट शिफ्ट करावी लागलेली असली तरी. काम झालं तशी ती चहा आणि बिडी करायला टपरीवर गेली. आणि तिनं नंबर लावला.
‘‘हॅलो…’’ एक झोपाळू आवाज आला.
‘‘उठ साले!’’ तिनं गोल्डफ्लेकचा झुरका घेत म्हटलं.
बिअरच्या जिभेनं तो म्हणाला, ‘‘अभी तक नही उठी होगी यार करीना जिम के लिये।’’
‘‘नही उठी होगी मतलब?’’
‘‘अरे, कल सारा की पार्टी कितने देर तक थी यार…’’
‘‘मेरे बाबूमोशाय… जरा इन्स्टा चेक कर लिजीये।’’
सौरभचे खाडकन डोळे उघडले. त्यानं चार्जिंग लावून तापलेला फोन उचलला आणि पाहिलं. आणि त्यानं पुन्हा ताराला फोन लावला.
‘‘अरे यार बॉस अभी फिरसे!!!!! ीहळीं ीहळीं… आणि त्याला अचानक आठवलं तैमूर… तसं तो म्हणाला,
‘‘तैमूर नही निकला हो गा ना स्कूल के लिये… करीना घर जाने के बाद ही वो निकलेगा…’’
‘‘अरे सौरभ, अभी समर व्हेकेशन है रे उसका… चल में निकलती हूँ।’’
‘‘किधर जा री तू?’’
‘‘एअरपोर्ट।’’
‘‘मैं भी आता हूँ।’’
‘‘नहीं।’’
‘‘क्यूँ?’’
‘‘तू अभी तैयार हो के जुहू क्लब हैं ना वहाँ पे जा… स्टार किड्स आनेवाले है, तेरी आयटम भी आयेगी… चड्डी पेहेनके।’’
‘‘थँक यू तारा!’’
‘‘लेकीन तुझे पता हैं ना…’’
‘‘ऑफ कोर्स! कमिशन दूंगा यार तुझे।’’
‘‘डायरेक्टली ट्रान्फर कर दे। बाय।’’

खरंतर तारानं असं कधी कमिशन घेतलं नव्हतं. आणि सौरभकडून तर शक्यच नाही, पण सौरभ तिचा जिगरी यार होता. सौरभ आणि त्याची गर्लफ्रेंड हेअर ड्रेसर माहीचं तिनं लग्न लावून दिलं होतं. तिघांची मस्त दोस्ती होती. बाकी कुणी नव्हतं तिचं मुंबईत. पापाराझी म्हणून काम करता करता तिला सात-आठ वर्षं झाली होती, पण आत्ताची वेळ वेगळी होती. कुठेही आणि कधीही घुसून काढलेले फोटो ना पुरत होते, ना त्यातून मिळणारा पैसा पुरत होता. अगदी खर्चाला लागतील इतकेच मोजके पैसे स्वत:कडे ठेवून ती सगळे पैसे गावाला पाठवत होती. तिचा बाप आजारी होता. त्याच्या औषधपाण्याला खूप खर्च येत होता. चपराशी म्हणून मिशी फुटल्या वर्षापासून उभं राहून केलेल्या कामानं त्याच्या कमरेच्या नसा ब्लॉक झाल्या होत्या, एका अपघातात पायाला गँगरीन झालं होतं, ती बापाला तशी पाहू शकणार नव्हती म्हणून गावी जातच नव्हती, ‘ऑल इज वेल’ अशी फिल्मी फिलॉसॉफी स्वत:ला सांगत दोनशे, पाचशे करोड फिल्मचा बिझनेस करणार्‍या आमिर खानचे खाट खाट खाट फोटो काढत होती.

रात्रीचे दोन वाजले होते, तारा नेहमीप्रमाणे शिकार करायला बसली होती. या उन्हाळ्यात जरा उकाडा जास्तच होता. आज बाबाच्या पार्टीतून कुणी किती वाजता बाहेर पडतं आहे, शेवटी कोण कोण बाहेर पडतं आहे, याचे फोटो तिला सगळ्यात आधी द्यायचे होते… या फोटोचे जास्तीचे पैसे मिळणार होते… कारण पार्टीत खूप राडा झाला होता. विशेष म्हणजे त्याचे प्रूफसकट फोटो तिला मिळाले होते. असला माल हाती लागला होता तिच्या… पार्टीची ती जागा सोडली, की तिथून पुढे जाणारी एक वांझोटी गल्ली होती आणि मग एक रस्ता लागत होता. या रस्त्यावर काय होणार, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. ती एक अशी जागा होती जी इतर पापाराझींना जरा लक्षात आली नसती. गाडी इतक्यात काही येणार नाही, हे तिला माहिती होतं. आपण दारूच्या नशेत काय वागू-बोलू, हे सेलेब्रिटीजना माहिती नसलं, तरी ताराला मात्र माहिती असायचं. काय टाईमपास करावा तिला कळेना… ‘च्यायला एक सिगारेट नाही, तो सौरभ पण ना साला सगळं पाकीट कधी मारतो कळत नाही.’ तिला सहज लक्षात आलं आणि तिला तिचंच हसू आलं. ती ज्या दगडावर बसली होती, त्याच दगडावर तिनं पहिली सिगारेट ओढली होती. तेव्हाही असेच कदाचित दोन वाजले असतील.

ती मुंबईत नवीन होती, येऊन जवळपास एक महिना झाला होता. ती दिसायला सावळी असली, तरी… डार्क ब्युटी टाईप्स होती. ती सांताक्रूझच्या एका झोपडपट्टीत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करणार्‍या दोन मुलींसोबत राहत होती. एके दिवशी त्या मुलींना एक फोन आला आणि ‘इथे रात्री दोन वाजता या,’ असं सांगितलं. कुठे आणि कशासाठी जायचं आहे हे त्यांना माहिती होतं, पण ताराला माहिती नव्हतं. त्या तिघी उभ्या होत्या. मग बर्‍याच मुली आल्या चमकदार ड्रेस घालून आणि मग तिथे काही मुलं येऊ लागली. ती त्यांच्याशी मित्रासारखे वागत होती. एक जरा त्यात वयस्कर होता. तो गाडीतच बसून होता. तो ताराकडे पाहत होता. तारा कोणत्या तरी मुलाचा मोबाईल घेऊन फोटो काढत होती. तिला कुणाचं काय चाललं आहे, याच्याशी फार काही देणं-घेणं नव्हतं. तो वयस्कर माणूस थोड्या वेळानं बाहेर आला आणि तारा चालत चालत फोटो काढत दूर गेली होती. तिथे गेला. तो जवळ आला तशी ती एकदम घाबरली. पण तिला एकदम हायसं वाटलं, कारण उजाडायला लागलं होतं. तिनं दूरवर पाहिलं, तिच्या सोबतच्या मुली निघून गेल्या होत्या. त्या माणसानं तिच्या हातातून मोबाईल घेतला. ती नुसतीच इकडे तिकडे पाहू लागली होती. आणि तो तिनं काढलेले फोटो पाहत होता. तिला तर काहीच कळेना काय करावं, घरी कसं जायचं, काहीही तिला माहिती नव्हतं. त्यानं मोबाईल खिशात घातला आणि त्यानं तिला जवळच्या टपरीवर नेलं. सगळ्यात पहिल्यांदा त्यानं तिला तिचं रंगवलेलं तोंड धुवायला सांगितलं आणि चहा प्यायला दिला. बॉबी सिंग… त्यानं ताराला पापाराझी केलं. कधीही तिच्याकडे ‘त्या’ नजरेनं पाहिलं नाही. एवढ्या मोठ्या लोकांचे फोटो काढतोय आपण यात ताराला सगळ्या जगण्याची धन्यता सुरुवातीला वाटत होती. कास्टिंग काऊचचे घाणेरडे प्रकार झाल्यावर सेलेब्रिटीचे फोटो काढता काढता आपल्याला सेलेब्रिटी व्हायचं आहे, हे तारा साफ विसरून गेली. ‘बॉबी नसता तर मुंबईत काय झालं असतं आपलं आणि नरसीला पुन्हा जाण्याची तर इच्छा नव्हती अजिबात…’

तोच जोरात गाडीचा आवाज आला.
तिनं कॅमेरा सरसावला. तिनं एकदा चेक केलं, की मोबाईल चार्ज आहे ना… तो फूल चार्ज होता. नेटला रेंज होती. गाडी येऊन थांबली, ती जवळच्या झुडपात लपली. गाडीत ती आणि तो होता. पहिल्याच फिल्मनं हिट झालेली जोडी. पण त्यांच्यात काही तरी बिनसलं होतं. ती त्याच्याशी भांडत होती. तो तिला समजावत होता. ताराचं काम सुरू होतं, त्याचा ताबा सुटला, तसं त्यानं तिला चक्क मारायला सुरुवात केली. तिनंही त्याला ढकललं… ताराचं काम सुरू होतं… पण गाडीतली ती कमी पडत होती… तो तिला काळानिळा करत होता. ती रडत होती… तारा फोटो काढत होती. ताराचा फोन व्हायब्रेट झाला. तिनं तो न बघता घेतला हेडफोन कानांत होतेच.
गाडीतली ती कोवळी हिरोईन रडत होती…
ताराच्या सुद्धा डोळ्यांना धार लागली होती…
पण फोटो काढणं थांबलं नाही…
दुसर्‍याच्या जगण्याचा, खासगी आयुष्याचा आदर करणार्‍या बापाच्या तेराव्याला गावजेवणाला हे आत्ता काढलेले फोटो, त्यातून मिळणारे भरमसाट पैसे ताराला कामी येणार होते.

‘‘तू कधी येणारे तारा?’’ आईचा आवाज खोल गेला होता.
‘‘निघते आहे पुढच्या एक तासात, एक काम द्यायचं आहे…’’

भकास, धूळ, ऊन, उकाडा जसं सोडून गेली होती तारा, तसंच होतं नरसी.

तारानं माळ्यावरून बाबांची पत्र्याची ट्रंक काढली. ‘‘उद्याच्या पूजेला ठेवायला यांचा एक पण फोटो नाही गं…’’ आईनं आल्यापासून तिच्या मागे धोशा लावला होता. आईचं खरं होत होतं… तारानं कधीही हट्टानं आईचं खरं होऊ दिलं नव्हतं. त्या पत्राच्या ट्रंकमध्ये तरी असेल काही तरी. बाबा किती बुजरे होते, हे तिला माहिती होतं. पण एक पण फोटो नाही… एक पण….त्यांचे लग्नाचे दोन ते तीन फोटो ते तर तिच्या लहानपणीच मागेच हरवले होते… त्या पेटीत काही पत्रं होती… जीर्ण कागद… पेटीच्या तळाशी एक वर्तमानपत्राचं कात्रण होतं, पिवळसर झालेलं.
पाण्याच्या टँकरवर पाणी भरतानाचा आईचा ठळक फोटो छापून आला होता. हातात रिकामी कळशी, उन्हामुळे डोक्यावर घेतलेल्या पदराचा ओठांकडे आलेला भाग दातात दाबलेला, पापुद्रा निघालेला अर्धा हसरा कोरडा ओठ.
आईचा होता… बाबांचा फोटोच नाही मिळाला.

– माधवी वागेश्वरी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.