Now Reading
तत्त्वांची तालीम

तत्त्वांची तालीम

Menaka Prakashan

तो अंथरुणातून उठला, तेव्हा भिंतीवरच्या घड्याळात साडेसात वाजले होते. त्याची उठण्याची चाहूल लागताच तिनं कुशी बदलली. त्याच्या तिरप्या नजरेतून तिच्या चेहर्‍यावर पसरलेले केस त्याला दिसले. स्वत:च्या चादरीची घडी घालता घालता त्यानं तशीच ठेवली. मान बाहेर काढत तो मच्छरदाणीच्या बाहेर आला. रोजच्या सवयीप्रमाणे तो खिडकीपाशी गेला. मच्छरदाणीची दोरी सोडायला त्याचे हात वर आले, पण त्यानं मच्छरदाणी सोडली नाही. दरवाजा हळूच उघडला. आतली पायपुसणी पायरीवर सरकवली. पुन्हा दरवाजा आवाज न करता ओढून घेतला.

बाहेरचा गारठा त्याला उत्साहित करून गेला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी चार-दोन कोंबड्या अंगणात फिरताना दिसल्या. बराच वेळ तो कोंबड्यांकडे, त्यांच्या चोचीकडे, पिसांकडे बघत उभा राहिला. पूर्वेकडचा डोंगर काळाशार दिसत होता. आजूबाजूची शांतता पाहून त्याला क्षणभर वाटलं, आपण एकटेच लवकर उठलोत की काय? मग तंद्री भंगल्याप्रमाणे त्यानं नळाखाली बादली लावली. तेवढ्यात त्याला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तो बादली उचलून संडासमध्ये शिरला.

आज दिवसभराच्या कार्यक्रमाची तो उजळणी करत राहिला. विद्याताईंचा निरोप त्याला रात्रीच पोचला होता. मेळाव्यात त्याला ‘स्त्रीमुक्तीची नवी व्याख्या’ या विषयावर बोलायचं होतं. जेवण झाल्यावर त्यानं चार पानी भाषण लिहून काढलं होतं. इतकी वर्षं विविध व्यासपीठांवरून बोलण्याचा सराव असला, तरी विद्याताईंसमोर बोलण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. म्हणून त्यानं आरशासमोर उभं राहून दोन-तीन वेळा भाषण वाचलं. सराव केला. त्याला माहीत होतं, शब्दांच्या बुडबुड्यांपेक्षा कामावरची निष्ठा, आत्मीयता अधिक प्रभावी असते. गेली अकरा वर्षं स्त्रीमुक्ती चळवळीत राहून त्यानं हा अनुभव मिळवला होता. पण तो हेही जाणत होता, की प्रभावी वत्कृत्वामुळेच तो या चळवळीत ओढला गेला होता. पुढे भूमिका कळली, तत्त्वं जुळली, काम आवडत गेलं, हा भाग नंतरचा. पण महाविद्यालयीन जीवनात एका व्याख्यानमालेत विद्याताईंना ऐकलं नि तो भारावून गेला. घरच्या एकूणच आर्थिक परिस्थितीशी तोंड देताना आणि कोणतीच शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्यामुळे ‘पुढे काय?’ असा प्रश्न त्याच्यासमोर होताच. पण विद्याताईंच्या शब्दांमुळे, भूमिकेमुळे त्याला आपलं करीअर निवडायला मदत झाली. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ‘एमएसडब्ल्यू’चा कोर्स करायचा, असं ठरवलं. वसतिगृहापासून विद्याताईंच्या संस्थेचं कार्यालयही जवळच होतं. संस्थेची प्रकाशनं मोफत वाचायला मिळत. तो अधाश्याप्रमाणे वाचायचा. त्यातूनच तो स्त्रीमुक्ती चळवळीशी जोडला गेला.

गावातली बस पावणेनऊला निघते, म्हणून तो घाईचा विचार करू लागला. बाहेर येऊन त्यानं हात धुतले. तशी ती बादली घेऊन त्याच्या समोरून गेली.
तो दार लोटून घरात शिरू लागला, तसा दरवाजा अर्धवट उघडला. गादी तशीच पसरलेली होती. मच्छरदाणी सोडायची होती. पांघरुणंही तशीच होती. त्यानं मनातला राग कमी केला. आधी मच्छरदाणी सोडली. घडी करून कोपर्‍यात ठेवली. दोन्ही चादरीच्या घड्या केल्या. उश्या एकावर एक ठेवल्या. मग गादी गुंडाळून पलंगाखाली सरकवली. घड्याळाकडे त्याचं लक्ष गेलं, तर काटे साडेआठची वेळ दाखवत होते. त्यानं पाणी तापवत ठेवलं. पटकन ब्रश केला. गालावरून हात फिरवला. दाढीचे खुंट वाढलेले वाटले. सात-आठ मिनिटांत त्यानं दाढी केली.

त्याला वाटत होतं, तिनं येऊन चहा तरी करून द्यावा. त्याला चहाची आठवण झाली. त्यानं दुधाचं पातेलं फ्रीजमधून काढलं. गॅसवर ठेवलं.
बादलीत पाणी ओतलं. टॉवेल घेऊन बाथरूममध्ये गेला. अंघोळ करताना तो ती आत येण्याचा कानोसा घेत राहिला. भिंतीवरचं घड्याळ त्याला वाकुल्या दाखवत होतं. टॉवेल गुंडाळून तो बाहेर आला. दुधाखालचा गॅस पेटवला आणि तो कपडे करू लागला. तेवढ्यात ती घरात आली. इकडे तिकडे बघत बाथरूमकडे गेली. ब्रश घेऊन दात घासू लागली. त्याच्या जिवाचा जळफळाट होत होता. तिला काही विचारावं, तर तिच्या तोंडात फेस होता. उत्तर मिळालं असतं, पण तितका वेळ त्याच्याकडे नव्हता. कपात दूध ओतून घेतलं. चमचाभर साखर टाकून ढवळलं. चमचा दुधात गरगर फिरवताना तो भाषणाचे मुद्दे आठवत राहिला. चेहर्‍यावरचं हसू आठवत राहिला. भाषणातली अवतरणं आठवत राहिला. चमचा खाली ठेवून, थोडं गार झालेलं दूध गपकन पिऊन टाकलं. शबनममध्ये भाषणाचे कागद कोंबले. पायात चपला सरकवत तो बसस्टॉपकडे निघाला.

‘वृंदा अशी कशी वागतेय? आपलं काही चुकत असेल, तर तिनं मोकळेपणानं सांगायला हवं. आपण तिच्याकडून मोकळेपणाची अपेक्षा करतोय, तसं आपणही मनमोकळेपणानं आपली घुसमट सांगायला हवी. वाद नको म्हणून मौन बाळगण्यात अर्थ नाही. चूक असेल, तर कबूल करायची. चूक सुधारायची. खरंतर आपण असा पुढाकार खूप वेळा घेतला आहे. पण हल्ली वृंदा काही गोष्टी मुद्दामहून करतेय, असं वाटत राहतं. आता जाऊदे… संध्याकाळी घरी आल्यावर नक्की बोलू.’ खिडकीतली जागा बसायला मिळाल्यावर तो पटकन बसला. मेळाव्याचं चित्र त्याच्या डोळ्यांपुढे सरकत होतं.

शहरातल्या मुख्य चौकातल्या कोपर्‍यावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. खरंतर या अगोदर अशा अनेक मेळाव्यांच्या आयोजनाची जबाबदारी त्यानं पार पाडली होती. व्यासपीठ, साऊंड सिस्टीम, बैठकव्यवस्था ते प्रमुख पाहुण्यांच्या येण्या-जाण्याच्या व्यवस्थेपर्यंत तो पाही. पण आज मात्र तो वेगळ्या भूमिकेत होता. महिला-पुरुष यांनी भरलेला मंडप पाहून त्याला चळवळीच्या प्रगतीविषयी अभिमान वाटत राहिला. विद्याताई यायच्या होत्या, म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झालेली नव्हती. नेहमीप्रमाणे त्यानं कार्यकर्त्यांशी चर्चा केली. अडचणी विचारल्या. बोर्डावरचे प्रमुख वक्ते म्हणून स्वतःचं नाव पाहून क्षणभर तो शहारला. पण क्षणभरच, कारण चळवळीची तत्त्वं त्याला आठवत होती. प्रसिद्धीपेक्षा आपल्या विचारांची साखळी चळवळीशी जोडता आली, याचा त्याला आनंद वाटत होता.

कुणीतरी ‘विद्याताई आल्यात,’ असा निरोप आणला. सर्व मान्यवर मंचावर बसले. नेहमीच्या प्रथेप्रमाणे स्त्रीमुक्तीची प्रार्थना झाली. शहरातल्या शाखाप्रमुख कार्यकर्तीनं प्रास्ताविक मांडलं नि विद्याताईंच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला. विद्याताईंची स्पष्ट सूचना होती, कार्यक्रम साधेपणात, कमी खर्चात आणि सुरक्षित झाला पाहिजे. हारतुरे, सोफा-खुर्च्या भेटवस्तू इत्यादी नकोच. इतक्या वर्षांनंतर कार्यकर्त्याही या साधेपणाला सरावल्या होत्या.
‘यानंतर आपल्याच परिवारातले श्रीकर देसाई ‘स्त्रीमुक्तीची नवी व्याख्या’ या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत.’ निवेदन करणारी महिला बोलून गेली नि तो भानावर आला. उठावं नि विद्याताईंना नमस्कार करावा, असं त्याला वाटलं. पण विद्याताईंना तसं आवडलं नसतं. त्यानं विद्याताईंकडे पाहिलं. विद्याताईंनी स्मितहास्य केलं नि तो माईकसमोर उभा राहिला.
त्याच्या खर्जातल्या आवाजानं सारे श्रोते एकाग्र झाले. भाषण रंगात आलं.
‘‘स्त्रीमुक्तीची चळवळ ज्या विचारांच्या प्रेरणेनं सुरू झाली, ते विचार चिरंतर असले, तरी तत्कालीन परिस्थितीत बदल झालेले आहेत. या बदलानुसार चळवळीचा रस्ता तपासायला हवा. म्हणजे बघा, एखाद्या रोगाच्या निदानासाठी आपण औषध घेत राहतो. रोग बरा होऊ लागतो. पण पोटात घेतलेल्या औषधांची काही प्रमाणात शरीराला बाधा झालेली असते. निरोगी आणि निरामय जीवनासाठी या अँटीबॉडीज त्रासदायक होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.’’

क्षणभर मंडपात सन्नाटा पसरला.
तो बोलतच होता. ‘‘पुरुषवृत्तीच्या जोखडातून सुटण्यासाठी सुरू झालेल्या स्त्रीमुक्ती चळवळीत जे विचार आले, उपाय आले, कायदे निर्माण झाले, त्यातून सुरुवातीला फायदा झाला. समाजप्रबोधन होण्यास मदत झाली. प्रश्नांची वीण सैल झाली. पण पुढच्या पिढीनं या उपायांना, विचारांना बंदिस्त चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, सर्वांनीच नव्हे, पण बर्‍याच सुरक्षित, स्वावलंबी, नवविचारी स्त्रिया या उपायांना कायदा समजून, शस्त्र म्हणून वापर करताना आढळतात. खरंतर हे एखाद्या नसलेल्या आजारावर औषधोपचार केल्यासारखं आहे. आधी रोगाचं निदान व्हायला हवं, त्यासाठी संवाद हा मार्ग आहे. नवविचारी स्त्रियांनी मुक्ततेचा विचार जरूर करावा, पण त्यातही मुक्तता म्हणजे काय, कशातून मुक्तता, कशासाठी मुक्तता, याचा विचार केलेला बरा. मुक्तता मिळाल्यावर पुढे काय, हाही विचार व्हायला हवा. इतरांची लढाई, आपली होऊ शकत नाही. आपली लढाई ही आपण लढली पाहिजे. केवळ स्त्रीमुक्तीचा विचार न करता स्त्री-पुरुष समानतेपर्यंत हा प्रवास घडला पाहिजे. त्यासाठी वाहन, मार्ग बदलायची तयारी ठेवली पाहिजे.’’

श्रीकर न अडखळता बोलत होता. भाषण संपलं, तेव्हा सार्‍यांच्या चेहर्‍यावर आश्चर्ययुक्त आनंद दिसत होता. कित्येक कार्यकर्त्यांनी श्रीकरला भेटून आपल्या भावना व्यक्त केल्या. जाता जाता विद्याताई पाठीवर हात ठेवत म्हणाल्या,
‘‘श्रीकर, तुझ्यासारख्या कार्यकर्त्यावरच चळवळीचं यश अवलंबून आहे. नव्या पिढीची स्पंदनं आपल्याला ओळखता आली पाहिजेत. आपण काही राजकारणी नाही, पण समाजातले नवे प्रश्न आपल्याला हेरता आले पाहिजेत. या प्रश्नांसाठी, समाजाच्या भल्यासाठी आपली ही चळवळ आहे. ’’
भारावलेल्या स्थितीतच तो बसस्टॉपवर आला. एका बाजूला मोठी जबाबदारी पार पडल्याचा मोकळेपणा, तर दुसरीकडे विद्याताईंचे शब्द कानांत ऐकू येत होते. बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. बसायला जागा नव्हती. उभ्यानं प्रवास करतानाही श्रीकर प्रसन्न होता.

घरात आला तेव्हा वृंदा मोबाईलवर मालिका बघत होती. स्त्रीदाक्षिण्य म्हणून नव्हे, पण माणुसकी म्हणून वृंदानं विचारायला हवं, की ‘दुपारी जेवले का? काय खाल्लं?’
तो शबनम ठेवून कपडे उतरवत राहिला.
‘‘काय बेत आहे आज जेवणाचा?’ श्रीकरनं सुरुवात केली.
कानांतले एअरफोन्स काढत वृंदा म्हणाली, ‘‘बटाटे संपलेत, तुला कालच सांगितलं होतं. तिखट वरण बनवलं आहे. थोडा भात घातला आहे.’’
‘‘मग दुकानातून आणायचेस ना? कुणाला तरी पाठवायचं होतं?’’ श्रीकरचा प्रश्न.
‘‘हे बघा, आल्या आल्या वाद घालू नको. आपलं काय ठरलंय?’’ वृंदाचा निश्चयी आवाज. नजर मात्र मोबाईलवरच.
‘‘अगं, काय ठरलयं?’’ श्रीकर.
‘‘ते तूच आठवून बघ श्रीकर.’’
‘‘अगं, मी जेवणाबद्दल नाही बोलत. जे काही बनवलंयस, ते मी मुकाटपणे खाईनच. पण एखाद्या वस्तूची उणीव आहे, तर ती तू उपलब्ध करावी. एवढंच माझं म्हणणं आहे.’’ श्रीकर समजुतीच्या स्वरात म्हणाला.
‘‘मग आपलं असंही ठरलंय, की बाहेरची कामं तू करायचीस, घरातली कामं मी निपटायची.’’ वृंदा नजर देऊन बोलू लागली.
‘‘अगं, हे आपल्या व्यवस्थापनशास्त्रातलं सूत्र. घर-संसार नीट व्हावा म्हणून केलेली कामाची विभागणी.’’ श्रीकर.
‘‘मग दरवेळी मीच का समजुतीनं घ्यावं. आज तूही भाजीशिवाय जेव.’’ वृंदा.
‘‘जेवणाविषयी माझं काहीचं म्हणणं नाही. तू चिडचिड करू नकोस.’’ श्रीकर बाथरूममध्ये गेला. थंड पाण्यानं अंघोळ केली. शरीरासोबत मनही थंड झालं. आता चहाची अपेक्षा करण्यात अर्थ नाही, हे त्यानं ओळखलं. बाथरूममधून बाहेर पडताना त्याला जाणवलं, त्याचे सकाळचे ओले कपडे धुवायचे तसेच ठेवलेत. मग त्याला पांघरूण, मच्छरदाणी, त्याच्या डायर्‍या अस्ताव्यस्त दिसल्या. कपडे घालून तो पलंगावर बसला. मोबाईलमध्ये मग्न असलेल्या वृंदाला भानावर आणण्यासाठी तिच्या डोक्यावर टप्पल मारली.
‘‘काय गं, अशी का वागतेस? काय चुकतंय माझं.’’ श्रीकरचा आवाज वाढला होता.
‘‘हे पाहा, तुम्ही मला परत स्पर्श करायचा नाही.’’ वृंदा.
‘‘बरं बाई, काय चुकलं माझं?’’ श्रीकर.
‘‘ते तुमच्या चळवळीच्या तत्त्वज्ञानात शोधा. स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारता व्यासपीठावर आणि घरात मात्र पारंपरिक विचारधारा चालते.’’ वृंदाचा टोला.
वृंदाच्या शब्दानं विव्हळ झालेला श्रीकर जरा ओरडूनच बोलला, ‘‘तुझ्या मनात मत्सराची भावना वाढत चाललीये. केवढ्या आशेनं तुझ्याशी लग्न केलं नि आज तू अशी वागतेस?’’
‘‘माझ्यावर उपकार करण्यासाठी तू लग्न नाही केलंस, ती तुझीही गरज होती.’’ वृंदाचा दुसरा बाण.
‘‘लग्नाअगोदर चळवळीबद्दल बोललो होतो मी. तुझ्या वडलांनीच प्रस्ताव मांडला होता. चळवळीतलं त्यांचं योगदान पाहून वाटलं, की तुझ्यावर त्यांचे संस्कार झाले असावेत.’’ श्रीकर.

‘‘जर-तर, असतील-नसतील अशा शक्य-अशक्यतेच्या गोष्टींवर चळवळी चालतात. घर, कुटुंब नाही चालत. आणखी महत्त्वाचं म्हणजे माझे वडील नि माझं जीवन यात फरक कर. मी काय त्यांची झेरॉक्स कॉपी नाही. माझे विचार वेगळे आहेत. मला तुम्ही त्यांच्यासारखं गृहीत धरू नका.’’
‘‘ते तर गेल्या वर्षापासून दिसतंच आहे. उशिरापर्यंत डाराडूर झोपणं. कोणतीच गोष्ट वेळेवर न करणं. जेवणाला तर अजिबात चव नसते तुझ्या. कायम मोबाईलमधल्या मालिकेत डोकं खुपसून बसल्यावर काय व्हायचंय म्हणा! मी रात्री अंथरूण घातलं नाही, तर रात्री दीड-दोन वाजेपर्यंत मोबाईलमध्येच तडपडतेस. एखाद्या दिवशी गादी पसरली, तर सकाळी मीच आवरली पाहिजे, असा तुझा दंडक! तुझ्या हातून पडलेल्या वस्तू आम्ही उचलायच्या नि तू मात्र आम्हाला आमचा पसारा दाखवायचा. हेच तुझे संस्कार आहेत… तू तत्त्वज्ञानाच्या बाता मला शिकवू नकोस…’’ श्रीकरचा राग शब्दांतून व्यक्त होत होता.
‘‘मग करायची होतीस एखादी राबराब करणारी. तुझ्यापुढे आरती ओवाळून तुझ्या तत्त्वज्ञानाच्या बड्या बाता ऐकणारी! कुणीही भेटली असती की! आणि काय रे, इतके दिवस माझ्याच हातचं खाल्लं ना? मग तेव्हा बरी चव कळली नाही. मी म्हटलं, तुला जाग आल्यावर मला उठव, तर म्हणालास तुझा तू अलार्म लाव. आणि मोबाईलचं म्हणशील, तर तुला आठवतं, लग्नानंतर मी तुझी तासन्तास वाट पाहायचे. पण तुझा पत्ता नसायचा. तुझी चळवळ महत्त्वाची असायची. मग मन रमवण्यासाठी मी मोबाईलचा आसरा घेतला. पण तू मात्र असामान्यांच्या खुणा सांभाळत जगत राहिलास.’’ वृंदाचे सडेतोड बाण.
‘‘अगं, पण एक घर, संसार म्हणून तुझी जबाबदारी तुला कळायला नको का? स्वयंपाक करणं, कपडे धुणं, भांडी घासणं या कामांचाही तू डंका पिटतेस. ही कामं करतेस म्हणजे उपकार केल्यासारखं वागतेस. एका कामाच्या बदल्यात दुसरं काम करायला भाग पाडतेस. सूडबुद्धीची आहेस. कधी जेवताना पिण्याचं पाणी घेत नाहीस. म्हणतेस, ‘स्वयंपाक मी केलाय, किमान ताट नि पिण्याचं पाणी तरी घे…’ अस्सा तिळपापड होतो, पण काय करू?’’ श्रीकर आता मात्र उफाळून बोलत होता.

‘‘मग त्यात काय चुकीचं आहे. तुला साधं खरकट टाकायला सांगितलं, तर तू दोन दिवस फुरगंटून बसलास. कपडे धुवायचे राहिले, तर तू चिडलास. बरं, तोंड वर करून म्हणतोस कसा? ‘या कामातच मला अडकवू नकोस. मी इतर कामं करतोच ना… बाजारहाट, ओझी उचलणं, गॅस सिलेंडर आणणं, पैपाव्हण्यांच पाहणं…’ तू सांग, यात माझ्यासाठी म्हणून काय आहे? आम्हा सामान्यांच्या सामान्य अपेक्षा तरी पूर्ण व्हायला पाहिजेत की नको.’’ वृंदा. ‘‘तुझ्या साथीनं स्त्रीमुक्ती चळवळीसाठी अधिक वेळ देता येईल, अशी स्वप्नं पाहिली होती मी. पण तूच माझा अडथळा होऊन बसलीस. मी ही सारी कामं केलीयेत. त्या कामाबद्दल मला आदरही आहे. फक्त त्यांचा प्राधान्यक्रम बदललाय.’’ श्रीकर समजुतीच्या स्वरात बोलू लागला.
‘‘चूक, माझ्या मदतीवर तू चळवळीला वेळ देऊ पाहतोयस. तू मला गृहीत धरतोयस. मलाही माझा व्यासंग जोपासायचाय. मलाही तुझी मदत हवीये. तू मला मदत करायलाच हवी. कामांची वाटणी तूच करायची. हा कोणता नियम? उद्यापासून मी बाजारहाट करीन. तू स्वयंपाक कर, भांडी धू, कपडे धू, स्वच्छता कर. मी पाहुण्यांसोबत गप्पा मारीन. पैशांचा हिशोब मी लिहून ठेवीन. बस्स!’’ वृंदा निश्चयी स्वरात बोलत होती.
श्रीकर पलंगावरून उठला. त्याच्या घशाला कोरड पडली होती. वृंदाशिवाय दोन खोल्यांचा संसार कसा दिसेल, याचं क्षणभर चित्र डोळ्यांसमोर आलं. पोटातली भूक केव्हाच मेली होती. तो दारात उभा राहिला.

‘‘सूडबुद्धीचं म्हणालास, पण तूच राग मनात ठेवतोस. माझी चूक दाखवण्यासाठी अट्टहास करतोस. खरंतर ही घरकामं याआधी मी फारशी केलेली नव्हती, ना मला करण्याचा सराव होता. तरी मी करत राहिले, पण तू कधी विचारलं नाहीस. तुला घरातली स्त्री समजून घेता आली नाही, तर समाजातल्या स्त्रिया कधी कळणार? प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येकानं प्रत्येक स्त्रीला समजून घेतलं, तर स्त्रीमुक्ती चळवळीची गरजच उरणार नाही.’’ वृंदा आत्मविश्वासानं बोलत होती.
‘‘तुम्हाला समजून घ्यायचं म्हणजे तुमचे गुलाम होऊन राहायचं का? घरातल्या कामातच गुंतून राहिलो, तर अन्य प्रश्नांसाठी वेळच देता येणार नाही.’’
‘‘आता कसं खरं बोललास! हीच मनोवृत्ती खर्‍या समस्येचं कारण आहे. आमची गुलामी कुठे दिसते तुम्हाला. आम्ही मदतीची अपेक्षा करतो, तर तुम्ही त्याला दुबळेपणा समजता. वा रे! मुक्तीवाले कार्यकर्ते! अशानं चळवळीचं काम कधीच थांबणार नाही. थेट समस्येला भिडा, म्हणजे उपचारांची गरज लागणार नाही.’’ वृंदा.
‘‘म्हणजे?’’ श्रीकर
‘‘घरातल्या प्रत्येक स्त्रीला माणूस म्हणून जगताना किमान अडथळा होऊ नका, जमल्यास मदत करा, सहकार्यासाठी हात द्या. नाही जमलं हे सारं तरी चालेल, पण तिच्या खांद्यावर पाय देऊन पायदळी तुडवू नका. तशी तुम्हा एकट्याची हिंमत नाहीच असं करण्याची. तुम्ही झुंडींचा उपयोग करता. व्यवस्था हाताशी धरता. परंपरा, धर्माच्या बेड्या घालता. आणि अपरिहार्यपणे मदत केलीच, तर उपकाराचा आव आणता. हे असं वागतांना तुम्ही स्त्रीला आपलं कधीच मानत नाही. तिच्यासोबत जगतानाही ती परगग्रहावरची आहे अशा पद्धतीनं वागवता. प्रत्येक स्त्री ही जेव्हा स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून मान्यता पावेल, तेव्हा तुमच्या चळवळीतले प्रश्न थोडेफार सुटू शकतील.’’

पाठमोरा श्रीकर गर्रकन वळून वृंदाकडे पाहत राहिला. तीही जागेवरून उठली. दोन ताटं मांडली. वाटीत तिखट वरण, बाजूला बटाट्याची भाजी, थोडा भात, दोन पोळ्या वाढल्या. पाण्याचे दोन ग्लास जरा जोरानं आपटत आवाज केला.
‘‘चला! कार्यकर्ते, जेवायला चला. भाषण देऊन भूक लागली असेल.’’ वृंदाच्या शब्दांत मवाळपणा होता.
तरी श्रीकर उभा राहून आकाशाकडे बघत होता. ऐकून न ऐकल्यासारखं.
‘‘हो, कार्यकर्ते चला, उद्या पुन्हा चळवळीसाठी वेळ द्यायचाय. चला आता जेवायला.’’ वृंदा जवळ जात श्रीकरला म्हणाली.
‘‘जेव तूच, उद्धटपणानं बोलताना लाज नाही वाटली.’’ श्रीकर.
‘‘आता उगीच वाद घालू नको. यात उद्धटपणापेक्षा सत्यता जास्त आहे. आणि खरं बर्‍याच जणांना बोचतं. आणि जेवणावर राग काढू नये, असं विद्याताई नेहमी सांगतात ना!’’ वृंदा.
वाढलेल्या ताटाकडे श्रीकर पाहतच राहिला. बटाट्याची भाजी बघून तो वृंदाकडे पाहू लागला.
‘‘अरे, हा गृहपाठ होता तुझा. विचारांची रिहर्सल होती ही. कागदावर मांडलेले विचार प्रत्यक्ष जमिनीवर कसे शोभतात ते पाहिलं म्हणजे हे चित्र दिसतं. असूदे.’’ वृंदा.
‘‘म्हणजे?’’ श्रीकरचा प्रश्न.
‘‘वाघाचे पंजे, उंटाची मान…’’ वृंदा.
‘‘आता खरी कार्यकर्त्याची मुलगी शोभतेस.’’ श्रीकर.
‘‘कार्यकर्त्याची मुलगी आहेच, पण कार्यकर्त्याची पत्नी म्हणूनही भूमिका निभवायचीये मला.’’ वृंदा.
जेवताना वृंदा बटाट्याची भाजी आग्रहानं वाढत होती. श्रीकर तोंडाचा मचमच आवाज करत मुद्दाम भाजीच जास्त खात होता.

– यशवंत सुरोशे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.