Now Reading
तडजोड

तडजोड

Menaka Prakashan

वत्सलाबाई हॉलच्या बाल्कनीतल्या आरामखुर्चीत डोळे मिटून शांत बसल्या होत्या. सकाळचा चहा, खाणं, अंघोळ, पूजा उरकून त्या थोडा वेळ विश्रांती घेत बसणार होत्या. पण हॉलमधल्या त्यांच्या दोन नातवांच्या संभाषणामुळे त्यांची मनःशांती पूर्णपणे नाहीशी झाली. त्या अतिशय बेचैन झाल्या होत्या.

वत्सलाबाईंच्या घरात त्या, त्यांचा मुलगा अविनाश, सून अवनी, दोन नातू- मोठा आयुष वय वर्षं सोळा आणि धाकटा अर्पित वय वर्षं बारा- असे राहत असत. फ्लॅट वत्सलाबाईंच्याच नावावर होता आणि चांगला तीन बेडरूम्सचा असल्यानं तशी अडचण नव्हती. पैशाला कमतरता नव्हती. मुलगा मोठ्या कंपनीत मोठ्या जबाबदारीच्या जागेवर, त्यामुळे पगार चांगलाच. सूनदेखील मल्टीनॅशनल कंपनीत, तिला उत्तम पगार, शिवाय मधे मधे परदेशवार्‍या. दोन्ही मुलं अभ्यासात उत्तम. मोठा अकरावीत, तर लहान आठवीत. त्यांना निरनिराळे क्लासेस, स्पोर्ट्स क्लासेस इत्यादी लावलेले. वत्सलाबाईंचे पती जाऊन दहा वर्षं झालेली. सर्व सेव्हिंग्ज त्यांच्या नावावर. त्याचं व्याज आणि पतीची अर्धी पेन्शन यामुळे आर्थिक परावलंबित्व नव्हतंच. मग सुख कुठे दुखत होतं?

तसं वरवर घरात सगळं छान चाललेलं. अविनाश-अवनी आपापल्या दिनक्रमात अगदी व्यग्र असत. पण तरीही कुठेतरी काहीतरी मुलात आणि सुनेत बिनसलं आहे असं का कोण जाणे, पण त्यांना सतत जाणवत असे. कधीकधी त्या दोघांत थोडी वादावादी होत असे, पण मर्यादेतच. तरीही वत्सलाबाईंना सतत असं वाटत होतं, की हे सारं मुखवटे घालून चाललंय, खरं काही वेगळंच आहे. कारण दोघंही एकमेकांबद्दल फारच अलिप्त वाटत. त्या स्वतःला समजावत असत, की सर्व चांगलं चाललंय, आपणच उगाच अशा कल्पना करून घाबरतोय, की मुलाचं आणि सुनेचं पटत नाही, त्यांच्यात विसंवाद आहे. पण आज त्यांनी आपल्या दोन नातवांचं जे संभाषण ऐकलं, त्यानं त्या पार विस्कटून गेल्या आणि आपल्याला येणारी ती दुष्ट शंका खरी असल्याचं त्यांना कळून चुकलं. झालं असं- त्या बाल्कनीत असल्यानं आणि डोळे मिटलेले असल्यानं नातवांना त्या झोपल्या आहेत, असं वाटलं आणि तसंही ती दोघं लहानच असल्यानं त्यांना बोलताना भान राहिलं नव्हतं. मोठा नातू धाकट्याला सांगत होता, ‘‘अर्पित, तू जितक्या लवकर मी सांगतो आहे ते समजशील, तर बरं होईल. मम्मी-पप्पांच्या भांडणामुळे तू कशाला अपसेट होतोस? अरे, त्यांचं आयुष्य ते एन्जॉय करतात, तसं आपलं आयुष्य आपण करायचं. ते आपला विचार करतात का? अरे, लवकरच ते डिव्होर्स घेणार आहेत. तसंही ते वेगळे झालेलेच बरं. मी त्या दोघांनाही एकमेकांचे मोबाईल चेक करताना पाहिलंय. मम्मी अंघोळीला गेली, की लगेच पपा तिचा फोन चेक करतात. पपांचा फोन दोन-तीनदा तिनं चेक केल्याचा संशय त्यांना आल्यावर त्यांनी आता फोन नेहमी स्वतःबरोबर ठेवायला सुरुवात केलीये. अगदी बाथरूम-टॉयलेटमध्येदेखील. पपा मम्मीच्या फ्रेंडवरून संशय घेतात आणि मम्मी पप्पांच्या! माझा काही प्रश्‍न नाही. मी बारावी झाल्यावर या घरात राहणारच नाही. मला होस्टेलवरच राहायचंय. शिवाय ते वेगळेे झाले, तर बरंच आहे. कुणीच आपल्याला ओरडणार नाही. दोघंही लाडच करणार, आपली गिल्ट कॉम्पेनसेट करायला. दोघांकडूनही पैसे मिळणार. बर्थडे दोनदा दोघांबरोबर सेलिब्रेट होणार आणि दोन गिफ्ट्स मिळणार. अरे, आपली तर निकल पडी. तू लहान असल्यानं तुला मात्र घरीच ठेवतील. तुला थोडं वाईटही वाटेल, पण तुला मॉम, किंवा पप्पा यांपैकी कुणाकडे राहायचं, याचा चॉईस असेल. माझं ऐकशील तर तू ज्याच्याजवळ आजी असेल तिकडे राहा म्हणजे तुझं सर्व व्यवस्थित होईल. अरे, म्हणता म्हणता दिवस जातील. एकदा बारावी झाली की तू पण फ्री बर्ड!
डरने का नही। ये अपनी लाईफ पै।
आता जरा मोठा हो. मम्मीच्या, आजीच्या पाठी पाठी फिरणं बंद कर. हां, अभ्यास मात्र जोरात कर. हव्या तेवढ्या ट्युशन्स वगैरे लावून घे. हे दोघंही पैसे खर्च करायला तयार असतात, हे एक बरं आहे. त्यांच्या भांडणाकडे लक्ष देऊ नकोस. ते आपला विचार करतात का? आपणही त्यांचा विचार करायचा नाही. ओके? बी ए ब्रेव्ह बॉय!’’

वत्सलाबाईंचं डोकं हे संभाषण ऐकून गरगरायला लागलं. म्हणजे आपला संशय खरा आहे तर? परवाच मुलाचं आणि-सुनेचं कानांवर पडलेलं उच्च स्वरातलं संभाषण त्यांना आठवलं. अर्पिता म्हणत होती, ते पण अगदी थंड, भावनाशून्य स्वरात, ‘‘हे बघ अविनाश, मला वाटतं हे असंच सुरू ठेवण्यात काही अर्थ नाही. मला माझ्या मनाप्रमाणे माझं आयुष्य जगायचंय. तू प्रत्येक गोष्टीत मला कंट्रोल करणं सोडून दे. माझ्या मिनिटामिनिटाचा हिशोब तुला देणं ही तर फार दूरची गोष्ट आहे. मीदेखील तुझ्याइतकेच पैसे मिळवते. थोडे जास्तच. प्रश्‍न उरला मुलांचा. त्यांना मी समजावेन. लेटअस सॉर्ट आऊट द थिंग्ज.’’ यावर अविनाशचं उत्तर त्यांना ऐकायला आलं नाही, पण धाडकन दार आपटल्याचा आवाज आला.

‘सुखी, समाधानी दिसणार्‍या या घरात हे काय चाललंय? अजून मुलांचं सर्व मार्गी लागायचंय आणि या दोघांना हे काय सुचतंय?’ त्या थराथरायला लागल्या. ‘आत्तापर्यंतचा सर्व संसार कसा सरळ रेषेत नीटनेटका पार पडला. मग आयुष्याच्या उत्तरार्धात हे कसलं संकट?’
पण मन एकदम भूतकाळात गेलं. ‘खरंच का संसार आखीवरेखीव झाला? की तडजोड एकतर्फीच होती?’ डोळ्यांसमोर संसारातले अनेक प्रसंग तरळू लागले.
लग्न वयाच्या अठराव्या वर्षीच झालं. वत्सला दिसायला सुंदर, पण घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे मागणी आल्याबरोबर तिला बोहल्यावर चढावं लागलं. वयातलं अंतर हा मुद्दा गौण होता. त्याची मोठ्या हुद्द्यावरची, मोठ्या पगाराची नोकरी; जबाबदार्‍या नाहीत, स्वतःचं घर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुंडा तर नाहीच, पण लग्नाचा डामडौलही, म्हणजे पर्यायानं खर्चही त्यांना नको होता. स्वभाव वगैरे याचा विचार करणं म्हणजे मूर्खपणाच ठरला असता. तशा श्रीनिवासमध्ये सर्व गोष्टी चांगल्याच होत्या. रूप, उंची, शिक्षण इत्यादी, पण स्वभाव लग्नानंतरच लक्षात आला. तो फारच हेकेखोर, आढ्यतेखोर होता. सर्व गोष्टी स्वकर्तृत्वानं, परिश्रमानं मिळवल्यामुळे त्याला एक प्रकारचा गर्व झालेला. त्यात आजूबाजूला सर्व पोषक वातावरण.

बायको म्हणजे सहधर्मचारिणी, एक लाईफ पार्टनर हा विचार त्याच्या मनाला शिवतही नव्हता. वत्सला याबाबत काहीशी अनभिज्ञ होती. तिच्या घरी गरिबी होती, तरी मोकळं वातावरण होतं. वडील आईचा योग्य तो मान ठेवत. त्यांच्यातलं वातावरण निकोप होतं. वत्सला पण श्रीनिवासशी आदरानं पण प्रसन्नतेनं, खेळीमेळीनं वागायची. त्याला हे आवडत नाही, अशी शंकाही तिला आली नाही. एका गोष्टीचं तिला आश्‍चर्य वाटायचं, की इतर सर्व लोक आपल्या रूपाचं, वागण्याचं कौतुक करतात, पण नवरा कधीच कौतुक करत नाही. उलट जरासा अलिप्तपणे, तुसड्यासारखा वागतो. गप्पा वगैरे तर कधीच नाहीत. जणू एकेक शब्द म्हणजे माणिक-मोतीच. उगाच खर्च करायचे नाहीत. आणि हे फक्त तिच्याच बाबतीत. ती मात्र त्याच्याशी मोकळेपणानं वागायची. श्रीनिवास आपल्याशी असं का वागतो, हे तिला समजायचंच नाही. लग्नानंतर दोनच वर्षांनी मुलगा झाला. तिला खूप आनंद झाला. वाटलं होतं, आता श्रीनिवास बरोबरीनं वागवेल, थट्टा-मस्करी करेल, पण नाहीच. शेवटी तिनं पण ती अपेक्षा करणं बंद केलं, पण त्याचं तुच्छतेनं वागणं काही बदललं नाही. त्यातच एकदा चुकूनमाकून दोघं बोलत असताना तो म्हणाला, ‘तुझ्यासारख्या बायकांचं बरं असतं. सगळं आयतं, आरामशीर मिळतं. मान, पैसा, सुख आराम- कशासाठीही तुम्हाला झगडावं लागत नाही. तुला इतरांच्या जगण्याची, त्रासाची, कष्टांची, हालअपेष्टांची कशाला कल्पना येईल?’

ती अवाक्च झाली. याच्या मनात चाललंय तरी काय? तिला काही समजेचना. दिसायला तर संसार नीट आहे, पण काहीतरी सलतंय. नेमकं काय?
आणि त्या दिवशी तिला सर्व गोष्टींचा उलगडा झाला. इतकी वर्षं झाली, पण ती तो दिवस कधीच विसरणार नाही. वत्सलाला आठवलं-
‘श्रीनिवासचा एक लांबचा चुलतभाऊ होता- विकास. दिसायला स्मार्ट, उंची सहा फूट, भरगच्च केस, छान हसरा तरुण होता तो. एक नोकरी करत होता. त्याच्या घरची परिस्थिती अगदी बेताचीच होती, पण तो आनंदी असे. घरी आल्यावर तो श्रीनिवासशी अगदी जवळिकीनं बोलत असे. त्याला ‘ए श्री’ असंच संबोधत असे. लहानपणापासून प्रसंगानुरूप एकत्र खेळलेले-वाढलेले त्यामुळे ते साहजिकच होतं. श्रीच्या चेहर्‍यावर मात्र नेहमीचा शिष्ट भावच असे. नंतर विकासची नोकरी सुटल्याचं कळलं. तेव्हा नोकर्‍यांची वानवाच होती. त्यात तो काही उच्चशिक्षित नव्हता. आता विकासच्या आमच्याकडच्या फेर्‍या वाढल्या. तसंच त्याचा अगदी अवतार झाल्याचं दिसायला लागलं. तेच ते मळके कपडे, झिडलेल्या स्लिपर, वाढलेली दाढी. त्याच्याकडे बघून मला कसंसंच होत असे. हे तर उघड उघड त्याच्याकडे तुच्छतेनं बघत. मी प्रत्येक वेळी त्याला चहा-खाणं देत असे. ह्यांना ते अजिबात आवडत नसे, पण शक्यतो ते बाहेर हॉलमध्ये येण्यापूर्वीच त्याला मी झटकन चहा, नाश्ता देत असे. प्रत्येक भेटीत विकास ह्यांची विनवणी करत असे. ‘श्री, जरा पाहा ना, माझ्यासाठी कोणत्या तरी कंपनीत शब्द टाक ना, आत्तापर्यंत तू कितीजणांना नोकरी मिळवून दिली आहेस.’ हे नुसते मान डोलवायचे. त्याच्या अनेक फेर्‍या झाल्या आणि अवतार आणखी आणखी वाईट होत चालला. एकदा मी ह्यांना म्हणालेदेखील, की ‘त्या विकासचं काम करा ना.’ ह्यांनी माझ्याकडे तुच्छतेनं पाहिलं. शेवटी तो दिवस उजाडला. विकास अगदी दयनीय अवतारात आमच्याकडे सकाळीच आला. आता अगदी खंगलेला दिसत होता. त्याला मी हॉलमध्ये बसायला सांगितलं. हे अजून आतच आपलं आवरत होते. मला बरंच वाटलं. मी झटकन मोठा मग भरून चहा आणि नाश्त्याला केलेले पोहे त्याला देऊन आले. एक डोळा ह्यांच्या हालचालींवर होता. विकासनं पाच मिनिटांत सर्व संपवलं. मला वाईट वाटलं, पण ‘अजून हवं का’ विचारायला धजलेच नाही. मी कामासाठी आत वळले. हे बाहेर गेल्याचं जाणवलं. आज तरी ह्यांनी विकासचं काम करावं, अशी मनोमन प्रार्थना केली. तेवढ्यात बाहेरचा फोन वाजला. माझ्या कुणा मैत्रिणीचा, नातेवाईकांचा फोन नसूदे, असा धावा केला, कारण सकाळी मी फोनवर बोललेलं ह्यांना अजिबात चालत नसे. (मोबाईलचा जमाना फार दूर होता.) मी हॉलच्या दाराजवळ जाऊन कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. एका रिंगनंतरच फोन बंद झालेला, पण डोळ्यांसमोरचं दृश्य पाहून मला धक्काच बसला. हे खुर्चीत बसलेले आणि विकास त्यांच्यासमोर जमिनीवर बसून त्यांच्या पायांवर डोकं टेकून होता. ह्यांच्या चेहर्‍यावर छद्मी हास्य होतं. मी थरथरत स्वयंपाकघरात गेले. पुढच्याच आठवड्यात संध्याकाळी विकास हसर्‍या चेहर्‍यानं पेढ्यांचा बॉक्स घेऊन आला.

‘वहिनी, जॉब लागला! साहेबांना आणि तुम्हाला पेढे आणलेत.’ त्याच्या तोंडून ‘श्री’ऐवजी ‘साहेब’ ऐकून एका क्षणात मला माझ्याच परिस्थितीचं आकलन झालं. त्या दिवसापासून मी ह्यांना ‘साहेब’ म्हणायला सुरुवात केली आणि आमच्यातलं वातावरण बदललं. हे थोडंफार प्रेमानं बोलू लागले. माझ्या परिस्थितीची आणि माझ्या औकातीची, तसंच संसारातल्या माझ्या स्थानाची मला एकदम लख्ख जाणीव झाली.
आता मुखवटा घालून दुय्यम भूमिकेतच संसार करायचा, तर मग नीटच अभिनय करावा, हा शहाणपणा मला उशिरा का होईना सुचला. आता कधीमधी गप्पा मारताना मी त्यांना म्हणायला लागले, की ‘तुमच्यामुळे हे सर्व मला उपभोगायला मिळतंय. हा मान, दोन-दोन फ्लॅट, गाडी, विमानप्रवास, हॉलिडे ट्रिप्स, मुलाला महागडं शिक्षण ही तुमचीच कृपा.’ दोन वेळा जेवायलाही मिळतंय, हे वाक्य मात्र उच्चारता आलं नाही. कारण तेवढे पैसे तरी नोकरी करून मी मिळवत होतेच. आता काहीच प्रॉब्लेम नव्हता.’

वत्सलाबाई परत वर्तमानात आल्या. काळ किती बदललाय! संसार टिकवण्यासाठी त्यांना त्या मिळवत्या असूनही तडजोड करावी लागली. संसारात कधीही बरोबरीचं स्थान नव्हतं. ‘तुझी लायकी नसताना हे वैभव तू केवळ माझ्यामुळे उपभोगतेस,’ हे नवर्‍यानं स्पष्टपणे सांगूनदेखील केवळ मुलाकडे पाहून त्यांनी संसार पार पाडला. पण आता सून किती सहजपणे वेगळं होण्याचं सांगते अन् तेही दोन वाढत्या वयाची मुलं असताना. क्षणभर त्यांना सुनेचं कौतुक आणि हेवा वाटला, की ती किती ठामपणे स्वतःचे निर्णय घेऊ शकते. दुसर्‍याच क्षणी तिचं कौतुक वाटल्याबद्दल रागही आला. पण एक स्त्री म्हणून त्यांना आतून कुठेतरी बरं वाटलं, पण आता सर्व लक्ष मुलांवर केंद्रित करायचं होतं. कारण या प्रकारात मुलांवर निश्‍चितच अन्याय होणार होता. शिवाय मोठ्याचे विचार ऐकून त्या थक्क झाल्या होत्या. स्वतःच्या मनाला त्यांनी समजावलं, ‘वत्सलाबाई, उठा! आता संसारातल्या नव्या तडजोडीच्या अध्यायाला सामोर्‍या जा!’

– अनघा दाणी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.