Now Reading
तंत्रचक्र (एक मिथक कथा)

तंत्रचक्र (एक मिथक कथा)

Menaka Prakashan

‘भरत नाट्य’ला ‘फिरोदिया करंडका’च्या स्पर्धेला सुरुवात झालेली म्हणून मिताली उत्सुकतेनं ‘भरत नाट्य’ला आलेली. ती नाट्यगृहात पोचली आणि बसली तेव्हा सीन असा होता…
नाट्यगृह तुडुंब भरलंय. मुंगी शिरायलासुद्धा जागा नाहीये. जो तो आपापला ग्रुप पकडून बसलाय. रंगमंचासमोरच्या जागेत खाली सिंथेसायझर वाजवणारा बसलाय, त्याच ओळीत लाईट, साऊंड मॉनिटर करणारे बसलेले. लॅपटॉपवर अ‍ॅडजस्टमेंट सुरू झालेली.
वाट पाहणार्‍या प्रेक्षकांनी आता टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली. या टाळ्यादेखील एक र्‍हीदम पकडून वाजवल्या जातायत. फक्त दोन मिनिटांत टाळ्यांची जागा घोषणांनी घेतलेली. प्रेक्षकांत बसलेले ज्या त्या कॉलेजचे पंटर आपापल्या कंपूसाठी आवाज द्यायला लागतात…‘आव्वाज कुणाचाऽऽऽऽ’
‘…एमआयटीचा!!’
‘वर्धमानचा…’
‘वर्धमान की जयऽऽऽ कीऽऽऽ जयऽऽऽ की जय… आमचा आव्वाज… जोरकस आव्वाजऽऽऽ’
आणि मग जोरात रायव्हल ग्रुपची कुणी गँग ओरडते…‘अस्सं होय! मग आई बोलावतेय ऽऽऽ घरी जा घरी जा ऽऽऽ’
मग कितीतरी वेळ तेच सुरू… ‘घरी जाऽऽऽ घरी ऽऽऽ जा…’
आरोळ्या सुरू. पोरं चेकाळलेली…
वातावरणात ईर्षेनं भारावलेली एक जिवंत सळसळ. इतक्यात पडद्यामागून पहिली उद्घोषणा होते. ‘फिरोदिया करंडका’च्या पहिल्या फेरीतलं पहिलंच नाटक सादर करत आहेत- ‘तंत्रचक्र – एक मिथक कथा’!’

अजून पडद्यामागे प्रॉपर्टी लावण्याचं काम सुरू आहे. दोन मिनिटं संपता संपता धूपदान फिरवल्यामुळे वातावरणात धुपाचा वास फिरायला लागलाय. तिसरी घंटा होते नि हळूहळू नव्हे, तर झपदिशी पडदा वर जातो. स्टेजवर झिरमिळ्यावाली केशरी पगडी घातलेला, धोतर नेसलेला एक तरुण अंगावरचं उपरणं घाईघाईनं सावरत हात जोडून उभा, त्याच्या शेजारी नाकात नथ घातलेली अंगावर शेला पांघरलेली नऊवारीतली एक मुलगी हात जोडून उभी. रंगमंचाच्याखालच्या अंगाला बसलेला सिंथेसायझर वाजवणारा सिंथेसायझरवर सुरावट सुरू करतो. त्यासरशी रंगमंचावरची ती दोघं नाटकाच्या नांदीला सुरुवात करतात…

नांदी संपताच तरुण रंगमंचावरून निघून जाण्याऐवजी डोक्यावरची झिरमिळ्यावाली केशरी पगडी आणि अंगावरचं उपरणं काढतो. मग झटक्यात दोन्ही मागे फेकतो नि डोक्याला टापशी गुंडाळून हात जोडत म्हणतो, ‘‘मी सूत्रधार!’’
नाकात नथ घातलेली ती मुलगी नाकातून नथ काढून टाकत अंगावरचा शेला पटकन मागे टाकून, हातात मोबाईल पकडत त्या तरुणाशेजारी उभी राहत म्हणते, ‘‘मी नटी!’’
नटी सूत्रधाराला विचारते, ‘‘श्री तंत्रचक्राच्या विजयाची पताका मिरवणारं कोणतं आख्यान लावणार आहात सूत्रधार तुम्ही? बोला ना बोला!’’
सूत्रधार हळूच नटीच्या हातातल्या मोबाईलमध्ये डोकावत म्हणतो, ‘‘मी कळवलं होतं की तुला, आख्यानाची महती तुला सांगायची आहे म्हणून…’’
‘‘ओह! माय गॉड!! ट्विटर… इन्स्टाग्राम… व्हॉट्सअ‍ॅप… काय काय चेक करायचं रे तुझा मेसेज बघण्यासाठी?’’
सूत्रधार चिडलेला, तरीही कसंबसं आपल्या रोलचं बेअरिंग सांभाळत पुटपुटतो, ‘‘तुझी आपली कायम लो बॅटरी… साधा मेसेज चेक करता येत नाही फटाफट?’’
मग डोकं खाजवत आठवल्यासारखं करत सूत्रधार नटीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, ‘‘प्रिये, तूच पाहा, काय समोर येतं ते.’’
(मग हलकेच ती दोघं मागे सरत जातात नि उभी राहतात बघत.)
(अतिशय रम्य परिसर, परिसरात तळं, देऊळ, सुरेख हिरवीगार हिरवळ त्यापलीकडे उंच झाडं आणि मग एक रस्ता. रस्त्याजवळ मोबाईल टॉवर. तिथे एक कचराकुंडी भरून वाहणारी आणि एक बाकडं जरा मोडलेलंच, असा ड्रॉप लावला जातो.)
ट्राऊझर्स आणि हायनेक टीशर्ट घातलेली ‘ती’ खांद्यावर लटकावलेली लॅपटॉपची बॅग आणि पर्स एका हातानं सांभाळत दुसर्‍या हातात मोबाईल पकडून त्यात डोकावत तिथे येते. घाईघाईनं कचराकुंडीजवळच्या बाकड्यावर बसते.
(स्टेजच्या मागे सरकलेले सूत्रधार आणि नटी आपापसात मोठ्यानं कुजबुजतात… ‘‘काय हे. हीच जागा मिळाली हिला, अरे देवा! सुंदर देऊळ… हिरवळ… काहीही तिला दिसू नये एका मोबाईलच्या रेंजशिवाय?’’)

कचराकुंडीजवळच्या बाकड्यावर बसलेली ती भलती हवालदील झालीये. एकसारखी हातातल्या मोबाईलमध्ये काहीतरी शोधतेय, एकसारखी काहीतरी टाईप करत सुटलीये. तिचं लक्ष नाही. तोंडानं ‘डॅम इट… व्हॉट नॉनसेन्स? स्टील नो रिाय?… गूगल डू समथिंग …युवर सर्च इंजिन इज फकिंगली डल…’ असं सतत काहीतरी पुटपुटत आपला स्ट्रेस वाढवतीये.
(नटी सूत्रधाराच्या कानात, ‘‘हिच्या पोस्ट्सना एरवी किती लाईक्स मिळतात… व्हर्चुअल दुनियेत किती मित्र-मैत्रिणी हिला, पण आत्ता ही एकटी! हा हंत! हंत!’’ सूत्रधार टप्पू मारून तिला गप्प करतो.)
बाकड्यावर बसलेली ती मुलगी आता अगदी रडकुंडीला आलीये, एवढ्यात लेव्हायसची फेडेड स्टायलिश जीन्स आणि काळा टीशर्ट घातलेला एक किडकिडीत तरुण पुन्हा एकदा हातातल्या मोबाईलवर लोकेशन चेक करतो नि हलकेच तिच्याशेजारी येऊन बसतो. त्याची सावली तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पडल्यामुळे ती दचकते, वर बघते नि आश्चर्यानं ओरडते, ‘‘दिनेश तू!’’
तो असतो तिचा शाळेतला दोस्त. किती वर्षांनी भेटलेला, पण तिच्या मनातली त्याची प्रतिमा अजून तशीच. तेव्हा म्हणजे शाळेच्या दिवसांत तो असतो चोर- पेन्सिली… रबरं… वह्या… चोरणारा. त्या शाळकरी दिवसांतसुद्धा तो तिला सगळं सगळं अगदी शपथ घेऊन सांगे, त्यानं काय काय चोरलं ते आणि दर खेपी ती त्याला ‘पुन्हा असं करायचं नाही’ म्हणून पुन्हा पुन्हा सांगे. खूप दोस्ती होती त्यांची त्या वयात. पुढे कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत हा कसा पोचला देव जाणे, पण होता त्यांच्या वर्गातच. आता त्याचे उद्योग फारच वाढलेले होते आणि एक दिवस तर तो दिसत नाहीसा झालेला. ड्रॉप आऊट चक्क कॉलेजमधून. ती मात्र शिकत राहते खूप जिद्दीनं. त्या काळात देखील त्याची एक गोष्ट मात्र भारीच असते. दर खेपेला ‘सॉरीऽऽ सॉरी’ म्हणत तिला सगळं सगळं खरं खरं सांगितल्याशिवाय त्याला करमत नसतं. तो तोच असतो, तेव्हाचा तिचा दोस्त दिन्या ऊर्फ दिनेश.

त्याची एकूण लक्षणं तिला चांगलीच माहिती असल्यामुळे पटकन आधी पर्स… आणि मोबाईल घट्ट पकडत ती ओरडते, ‘‘दिनेश तूऽऽऽ?’’
दिनेश एकदम खूष. हसून म्हणतो तिला, ‘‘ओह! गॉड!! अजून नाहीच विसरलीस मला. न सांगता मैत्री तोडलीस. तुझ्या लग्नालासुद्धा बोलावलं नाहीस, तेव्हा वाटलं मनातून पुसलंस मला. पण नाही, अजूनही आहे मी तुझ्या मनात. दॅट्स ग्रेट!’’
ती मान फिरवते नि खिन्नपणे हलकेच म्हणते, ‘‘दिनेश, काय बोलायचं इतक्या वर्षांनी! तेव्हा तू सुधारला असतास तर… तर जाऊदे! सुधारला नाहीस ना अजून? ते तसंच चाललंय सगळं?’’
त्यावर हसत तो म्हणतो, ‘‘म्हणून तर आत्ता इथे आलोय मी. ते जाऊदे. तू इतकी चिंतातूर का दिसतेयस? सज्जन माणसाशी लग्न करूनसुद्धा हे असं?’’
‘‘नाही जमलं आमचं, पण आता काय त्याचं? हे बघ, आधीच माझंच मला झालंय ओझं, त्यात तुझी कटकट नको.’’ हे बोलताना ती अगदीच घायकुतीला आलेली. तिची ती केविलवाणी अवस्था बघून जरा जास्तच नाटकीपणे कमरेत वाकून तिच्यासमोर उभा राहत दिनेश तिला म्हणतो, ‘‘तुला एवढं वैतागायला काय झालंय बोल. आजही तुझ्यासाठी मी हजर आहे.’’
ती सांगायला लागते, ‘‘हौसेनं डिजिटल कॉम्प्लेक्समध्ये नवं घरं घेतलं. घरीच ऑनलाईन ऑफिसचं काम करू लागले. अधूनमधून सहज चॅटिंग करून नवे मित्र मिळवू लागले, तरी एकटेपण संपेना म्हणून मग ठरवलं, जसं घर घेतलं ऑनलाईन… मित्र-मैत्रिणी जमवल्या ऑनलाईन, तसा नवरा मिळवावा ऑनलाईन!…’’

बाकड्यावरची ती सांगायला लागते फार इमोशनल होऊन, ‘‘एकजण स्काईपवर पाहिला, छान वाटला. मग सगळं मोजून मापून हिशोबात जमवू लागले. चॅटिंग करू लागले. स्काईपवर भेटीगाठी होऊ लागल्या. मग बरिस्तात कॉफी प्यायलो एकत्र. आणि मग सगळं कसं झटपट ऑनलाईन उरकून लग्न केलं. ऑनलाईन मिळवलेला नवरा तो! पण सज्जन खराच.
माझं एकटेपण सरलं आणि खरंच चार दिवस बरे गेले. एकत्र मोबाईलवर गेम्स खेळून झाले. कोडी सोडवून झाली. पोर्नो फिल्म्स बघता बघता लव्हमेकिंग अगदी तसं जमत नाही, हे पण समजलं. खूप लवकर कंटाळलोच एकमेकांना. सगळंच जाम बोअर व्हायला लागलं.’’
बाकड्यावरची ती घायाळ आवाजात पुढे सांगायला लागते. ‘‘आणि मग गेम सुरू झाला. (आता तबल्याचा ठेका आणि त्या ठेक्यावर ती बोलायला लागते. प्रेक्षागृहात एकदम शांतता पसरलेली.)… भेटायला वेळ नाही. बोलायला वेळ नाही. मेसेजवर मेसेज केले, टेक्स्टवर टेक्स्ट केले. भांडणंसुद्धा मोबाईलवरून केली. वाटे, समोरासमोर यावं, कडकडून भांडावं. मारामार्‍या कराव्या. स्टेटस आडवं आलं मांजरासारखं. हाय… हाय… पण आता करायचं काय! दिवसा मी घराबाहेर. रात्री तो घराबाहेर. ऑनलाईन नवरा केला. गेम झाला त्याचा आणि माझा. झाले ना वांदे! म्हटलं त्याला, ‘घर माझं! तू जा.’ तर गेला लगेच. जसा जायसाठी टपलाच होता. बोका मेला!’’

डोळे पुसत ती पुढे बोलायला लागते, ‘‘तसा गरीब स्वभाव त्याचा. घर सोडताना मोठ्या मनानं त्याचं जे जे होतं- इन बिल्ट कॅमेरावाला स्मार्ट टीव्ही सेट, एअर कंडिशनर, अ‍ॅलेक्सासकटचा एको स्पीकर सगळं माझ्यासाठी घरात ठेवलं. मीसुद्धा मग लगेच त्याच्या आणि माझ्या कॉमन काढलेल्या बँक डिपॉझिट्सवरचा हक्क सोडला. ऑनलाईन लग्न, ऑनलाईन डिव्होर्स! नो कसलंच झंझट!! चार दिवस बरे गेले नि ही पीडा सुरू झाली.’’
तिचा हात हातात घेत दिनेश प्रेमानं म्हणतो तिला, ‘‘सांग मला नेमकं काय झालंय?’’
‘‘काय सांगू तुला, वैताग आलाय मला. सकाळी निघाले ऑफिसला. डिजिटल कुलूप लावलं दाराला. तंत्रचक्र लावून बंदोबस्त केला पक्का. पण दगा झाला. कॉम्बिनेशन फसलं. कुलूप गप्पच बसलं. घर बंद. मी घराबाहेर… मग कसंतरी उघडलं.
त्यानंतर कुलपाचा कोडनंबर चेंज करू लागले रोज!
आता निदान घरात तर येते. स्वस्थ बसून शांत होते. टीव्ही लावते. पण समोर स्क्रीनवर मुलगी गाणं म्हणायला लागते, मी तल्लीन होते नि… नि टीव्ही आपला बंद होतो. बंद म्हणजे एकदम त्याचं मुस्काट बंद! हवेत गरमी म्हणून एसी ऑन करावा. छान गार हवा यायला लागली म्हणून खूष व्हावं, तर लगेच कुणी चुगली खाऊन त्याला मी आनंदात आहे हे सांगितल्यासारखा एसी बंद पडतो. दुरुस्तीसाठी मेकॅनिक बोलवावा घरात, तर एसी व्यवस्थित सुरू. आणि कहर म्हणजे पुन्हा दुसर्‍या दिवशी तेच नाटक. खरंतर माझं घर सेक्युरिटी अलार्मनं फुल प्रोटेक्ट केलेलं, तरी ही कथा. घरात शिरायचीसुद्धा भीती वाटायला लागलीये.’’

(एकदम भीषण म्हणावी अशी शांतता पसरते.)
दिनेश चढ्या आवाजात तिला म्हणतो, ‘‘भीतीपोटी इथे बसून गूगल करून हेल्पलाईनची लिंक शोधून काढलीस. त्यांना मेल करून तुझ्या घराचे डिटेल्स दिलेस ते दिलेस, शिवाय पुन्हा त्यांची फी म्हणूून भक्कम पैका दिलास. बरोबर?’’
आश्‍चर्यानं थक्क होत ती विचारते, ‘‘ पण हे सगळं तुला कसं कळलं?’’
‘‘हा काय प्रश्न झाला? बरं, ते जाऊदे. तुझ्या सज्जन नवर्‍यानं घरात मागे सोडलेल्या सर्व डिजिटल वस्तू टीव्ही सेट, एसी, स्पीकर… झाडून सगळं आत्ता त्याच्या ताब्यात आहे. तुझा तो सज्जन नवरा कम बोका महा डांबिस आहे. तुमच्या कॉमन काढलेल्या बँक डिपॉझिट्सची रक्कम घातलीन स्वतःच्या घशात आणि आता तुझ्यावर लक्ष ठेवतोय. त्यानं तुझा सेक्युरिटी कोड चोरलाय. शिवाय तुझ्या घरातले लाईट्स, ़कॅमेराज, स्पीकर्स, थर्मोस्टॅट्स हे सगळं इंटरनेटला जोडलंय, तुझ्या सज्जन नवर्‍यानं त्याच्या स्मार्ट फोनमध्ये. त्यानं एक त्यासाठी अ‍ॅप वापरलंय आणि तो घरात न शिरता कंट्रोल करतोय सगळं.’’
हे ऐकून तिला भयंकर धक्का बसलेला प्रेक्षकांना स्पष्ट जाणवतो. मितालीला तर तिची दयाच येते.

ती बाकड्यावरून कोलमडायच्या बेताला येते. तो तिला जवळ घेत, थोपटत शांत करतो नि म्हणतो, ‘‘मी आहे ना, काळजी नाय करायची. आता घरात शिरलीस, की पयले झूट रिसेट बटण वापरून ही सगळी उपकरणं डिसेबल करून टाक. घराच्या वाय-फाय सिस्टीमचा पासवर्ड देवाला नमस्कार करतेस तसा रोज बदलत चल. तरीही आता तुझ्या डिजिटल घराचं सेक्युरिटी चेक करायला हवं. आता नवा डिजिटल कोड घ्यायला लागेल, भाराभर खर्च करावा लागेल, पण त्याला इलाज नाही. एवढं करूनसुद्धा जर थोड्याच दिवसांत पुन्हा कुलूप नाठाळपणा करायला लागलं… टीव्ही बंद पडायला लागला… एसी बंद पडायला लागला तर… तर माझ्याकडे ये थेट, पुन्हा पुन्हा डिजिटल कोड बदलण्यासाठी उगाच पैसे खर्च करत बसू नकोस.’’
दिनेश हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवतो नि मग दमदार पावलं टाकत कॉलर ताठ करत मोठ्या मिजाशीत तिथून बाहेर पडतो.
ती मात्र बुचकळ्यात. ‘हा एवढं सगळं कसं काय शिकला? आणि हा इथे आलाच कसा? काय म्हणाला हा… मी गूगलवरून हेल्पलाईनला मदत मागितली म्हणून हा इथे! हा तर पक्का चोर, याचा काय संबंध हेल्पलाईनशी? असो, मदत केलीन हे खरं.’

ती जागची उठते नि घराकडे निघण्याआधी मोबाईल पर्समध्ये ठेवण्यासाठी पर्स उघडते तर आत दिनेशनं त्याचं व्हिजिटिंग कार्ड टाकलेलं.
तिला हसावं का रडावं ते कळेनासं होतं. ‘चोर तर चोर वर स्वतःची स्वतंत्र वेबसाईट चालवतोय, गुपचूप व्हिजिटिंग कार्ड ठेवून जातोय. कम्माल झाली अगदी,’ असलं काहीसं पुटपुटत ती पर्स उचलते, तर ती जड लागते तिच्या हाताला. यानं आणखी काय गोंधळ घातलाय कोण जाणे, म्हणत घाबरून ती पर्समध्ये हात घालते, तर तिच्या हाताला पैसे लागतात. ती पैसे मोजून बघते, तर हेल्पलाईनला भरलेले सगळे पर्समध्ये परत आलेले असतात. ती थक्क. कारण तिला कळलेलंच नसतं यानं कधी पर्स घेतली नि कधी उघडली ते. ती मोठ्यांदा म्हणते, ‘‘खरंच, अगदी पक्का चोर आहे, पण हेल्पलाईन याच्याशी लिंक्ड आहे? माय गॉड!’’
‘एक खरं, दिनेश अजूनही प्रेम करतो आपल्यावर. त्यानं चोरी करायचं थांबवलं, तर त्याच्यासारखा मित्र नाही.’
दाराचं कुलूप कॉम्बिनेशन फिरवताच मुकाट उघडतं. घरात शिरताच ती रिसेट बटण वापरून सगळी उपकरणं डिसेबल करून टाकते. आता तिला ऑफिसमध्ये बसल्या बसल्या घरातला विसरून सुरू राहिलेला एसी बंद करता येणार नसतो, की टीव्हीवरचा कार्यक्रम डाऊनलोड करता येणार नसतो. ती म्हणते स्वतःशीच, ‘जरा सगळं निवांत झालं, की बदलून टाकू डिजिटल सेक्युरिटीची कंपनीच.’ त्याच आवेगात ती वाय-फाय सिस्टीमचा पासवर्डसुद्धा बदलून टाकते. मग खुषीत स्मार्ट फोनवरून पिझ्झा मागवते नि खूप दिवसांनी पोटभर जेवते.
दिनेशच्या मदतीनं ती नव्या डिजिटल सेक्युरिटी सिस्टीमशी टाय-अप करते.
आता तिनं एसी सुरू केला, की तो व्यवस्थित सुरूच राहू लागतो. एकूणात सगळीच उपकरणं नीट आज्ञेत आहेत म्हटल्यावर ती बिनधास्तपणे टीव्ही ऑन करून तिच्या आवडत्या चॅनेलवर जाते.
फुकटात सगळं निस्तरलं म्हणून ती दिनेशवर खूष असते. दिवसभराच्या दगदगीनं ती इतकी दमलेली असते, की तिला बसल्याजागी बर्‍याच दिवसांनी निवांत झोप लागते.
(पडदा पडतो.)

(नटी आणि सूत्रधार रंगमंचावर येत असताना रंगमंच हलकेच उजळून निघायला लागतो.)
नटी सूत्रधाराला म्हणते, ‘‘ ‘इस दुनिया में हर काम सिर्फ और सिर्फ फायदे के लिये ही किया जाता है!’ या डायलॉगवर माझा पूर्ण विश्वास आहे. आता हा डायलॉग कोणत्या सिनेमात कुणी कधी मारला मला आठवत नाही. तरी पण, दिनेशनं तिला इतकी मदत केली ती फक्त तिच्यावरच्या प्रेमापोटी असेलसं मला वाटत नाही. इतका पोचलेला चोर! तो काय सहजासहजी काही करेल कुणासाठी?’’
सूत्रधार तिला विचारतो, ‘‘तू प्रश्न विचारलास, की ‘चोरी’ हे प्रोफेशन असलेल्या माणसाबद्दल स्टेटमेंट केलंस? एक सांगतो, दिनेश जरी चोर आहे, तरी तो माणूस आहे. आणि प्रत्येक माणसाच्या काही ना काही कमजोरी असतात. दिनेशची कमजोरी ही मुलगी आहे. त्याची शाळेपासूनची दोस्त, ती त्याला मिळावीशी वाटत होती, पण मिळाली नाही म्हणूनच ती त्याची आज कमजोरी आहे. आणि म्हणून त्यानं तिला मदत केलीये. आजही तो प्रेम करतोय तिच्यावर. एक लक्षात ठेव, इट इज ईझी टू डिलिट अ नंबर… इग्नोअर फोन कॉल्स, बट डिफिकल्ट टू फरगेट अ पर्सन टू हूम यू आर कनेक्टेड बाय हार्ट.’’
‘‘पटत नाही. पैशांशिवाय चोर कधी काही करेल? अशक्य!’’ नटी म्हणते.
‘‘मी हे सिद्ध करून दाखवीन.’’ सूत्रधार इरेला पेटल्यासारखा बोलतो.
‘‘लागली पैज! जो हारेल त्यानं फोर जी नेटवर्कच काय, पण टू जी नेटवर्कसुद्धा वापरायचं नाही… किमान चार दिवस तरी. आहे कबूल?’’ सूत्रधाराच्या हातावर टाळी देत म्हणते.

‘‘ठीकाय. चला तर मग त्या तिथे पलीकडे ती माणसं चहा-फराळाच्या दुकानात काय करताहेत ते बघूया,’’ असं बोलत दोघं आत विंगेत उभं राहायला जातात.
स्टेज रिकामं तब्बल दोन मिनिटं. तरीही फार वावगं वाटत नाही, कारण या काळात तबल्याचे बोल वाजत असतात नि त्या ठेक्यावर नटी विंगेतून बोलू लागते. ‘‘काय सांगता! दिनेश साधा चोर नव्हे, तो आहे वर्किंग पार्टनर सेक्युरिटी पुरवणार्‍या अनेक कंपन्यांचा… आणि हॅकर्सच्या मंडळाचा अध्यक्षसुद्धा?’’
एवढ्यात बॅक स्टेजवरून ढोल वाजावा तशा कर्कश आवाजात कुणी म्हणतं, ‘ती आलीये त्याच्याबरोबर त्यानं नुसती हाक मारताच. ती शिकलेली. मोप पैका कमावणारी. लग्नाच्या घाईत पोळलेली. एकाकी. उपाशी. कुणी आपली म्हणावं म्हणून आसुसलेली. आणि तो? चोर खरा, तरी पण खरंच प्रेम करतोय का तिच्यावर? मे बी! मे नॉट बी!!… मे बी! मे नॉट बी…’ आवाज घुमत असताना… हॉटेलचा लावलेला ड्रॉप स्पष्ट दिसायला लागतो.
तिला घेऊन दिनेश हॉटेलमध्ये येतो.
त्याला बघून नटी म्हणते, ‘‘लेव्हायसची ब्रँडेड स्टायलिश पँट… ग्रीन कलर टीशर्ट. मस्त सेंट मारलेलं. एकदम कडक हिरो माफिक टकाटक दिसतोय की हा चोर!’’
त्याच्याबरोबर आलेली ती आजदेखील भलती डिप्रेस्ड… रडवेली अशीच दिसत असते. खुर्चीवर बसताच डोळे ओले होतात तिचे.
विंगेत उभं राहून हे सगळं बघणारा सूत्रधार लगेच संधी साधत म्हणतो, ‘‘युगं बदलली, तरी बायकांच्या डोळ्यांतलं पाणी काय आटलं नाय हो. ते येतंच्चाय आणि पुरुष विरघळतोच्चाय त्यात. आता दिनेशचंच बघ ना, एवढा मोठा अट्टल चोर, पण चटकन म्हणालाच ना तिला, ‘रोना नाही, मै हूँ ना!’ ’’ (विंगेतून डोळे मोठे करून आणि टाचा उंचावून नटी आणि सूत्रधार बघू लागतात.)
ती त्याच्या जवळ सरकत त्याचा हात हातात घेत म्हणते, ‘‘सज्जन माणसाशी लग्न करून जरी पस्तावले असले, तरी आजही माझी अट कायम आहे. मला चोराशी नाही लग्न करायचंय. दिनेश, तू खरंच खूप चांगला आहेस रे! मला आवडतोस.’’
दिनेश हसतो. त्याचे डोळे चमकतात. तो लाजत म्हणतो, ‘‘ते मला माहीत आहे.’’ मग तिचे हात प्रेमानं दाबत मनापासून म्हणतो, ‘‘मेरा ये नोबल प्रोफेशन बंद करुंगा मैं। लेकिन आपनी भी एक शर्त है।’’

‘‘कसलं डोंबलाचं नोबल प्रोफेशन रे तुझं? उद्या तू चोरी करणं सोडणार असलास, तर मी तुझी वाट्टेल ती शर्त मान्य करीन. तू फक्त बोल.’’ ती उत्तेजित होत म्हणते.
गडगडाटी हसत तो सांगायला लागतो, ‘‘मी नवी बिझनेस डील्स घेणार नाय. पण हाती घेतलेली डील्स पुरी करायला मला चार दिवस लागतील. खरं सांगतो, चार दिवसांनंतरसुद्धा आपल्याला कॉल्स येत राहणार. अरे! स्कील्ड हॅकर्सना लई डिमांड असते म्हटलं! तरी पण मी गप्पच राहीन. दिला शब्द पाळीन. अरे, आपल्या प्रोफेशनचं पण एथिक्स असतं राव! मी चोरी करायला जाणार नाय. त्यानंतर मी या बिझनेसमधून बाहेर पडेन कंप्लिट. तुझ्या एक्झिक्युटिव्ह म्हणून असलेल्या स्टेटसला शोभेसा हंड्रेड परसेंट जंटलमन बनणार मी. फक्त चार दिवस दे मला, आहे कबूल? नीट विचार करून सांग.’’
‘‘अरे, हे तर एकदम मस्तच आहे, फक्त चार दिवस आणि तू सगळं संपवणार. ग्रेट! डन.’’ ती उडीच मारते भलती खूष होऊन.
तो आईस्क्रीम मागवतो तेदेखील तिच्या खास आवडीचं, कसाटा! ती आणखीच अडकते त्याच्यात. इतक्या वर्षांत तो तिची आवड विसरला नाही म्हणून. दोघं आईस्क्रीम खाऊन उठतात. बिल देण्यासाठी तो खिसा चाचपत म्हणतो, ‘‘च्यायला, विसरलो माझी पर्स.’’ आणि तिचं क्रेडिट कार्ड घेऊन जातो बील भरायला. जाता जाता म्हणतो तिला ऐकू जाईल असं, ‘‘आता या नव्या सिस्टीममध्ये क्रेडिट कार्डचा पिन नंबर नाही द्यावा लागत. डोंट वरी, आय विल डू दि नीडफूल.’’
‘‘बिल इथेच टेबलापाशी येईल…’’ ती म्हणत असते, पण तो ऐकत नाही. ती त्याच्या उपकारांखाली अजूनही दबलेली. डिजिटल सिस्टीम पुन्हा बसवायची, तर किती पैसा खर्च झाला असता, त्यानं एक पै देखील घेतलेली नाही.
तो बिल भरून परत येतो नि तिला तिचं क्रेडिट कार्ड परत करतो. मग पडतात दोघं हॉटेलबाहेर. ती भलती रंगात आलेली. आपणहून त्याचा हात हातात घेत ओठ टेकते त्याच्या हातांवर. तर तो तिला जवळ घेत म्हणतो, ‘‘अजूनही यु लूक सो हॉट!’’
(ती दोघं हॉटेलमधून बाहेर पडताच नटी आणि सूत्रधार अधीरतेनं आता पुढे काय होतंय, याची वाट बघायला लागतात.)
रंगमंचावर हलकेच प्रकाशाचा कवडसा येऊन स्थिरावतो.
दृश्य बदलतं. रस्त्याचा सीन येतो.
भोंडल्याच्या गाण्याची सुरावट सुरू होते. रंगमंचावर चार मुलं आणि चार मुली येतात आणि मध्यभागी लॅपटॉप, स्मार्ट फोन, पेन ड्राईव्ह ठेवून त्याच्या भोवती फेर धरून गाणं म्हणायला लागतात…
‘ऐलमा पैलमा श्री तंत्रदेवा
बिझनेस आमचा वाढून दे… करीन तुमची सेवा
बरकत त्याला येऊ दे… करीन तुमची सेवा
हॅकर घुमतो सेक्युरिटी कोडवर
रक्षण करिसी सेक्युरिटी कोडचं
पासवर्ड चोरी नक्को देवा
बिझनेस आमचा वाढून दे… करू
तुमची सेवा’

दिनेश ते ऐकतो नि एकदम भडकतोच, जोरात ओरडून विचारतो, ‘‘कुठल्या गँगची रे तुम्ही हरामखोरांनो… हॅकर घुमतो सेक्युरिटी कोडवर काय! आणि काय… पासवर्ड चोरी नक्को? जा, जाऊन सांगा तुमच्या त्या भुक्कड मकबूलला, ‘गेलास तू आता बाराच्या भावात.’ आपल्या एरियात हा माज नाय खपवून घेनार!’’
मुलं एकदम गांगरतात, चिडीचूप होत पटकन वर्तुळात ठेवलेला लॅपटॉप, स्मार्ट फोन, पेन ड्राईव्ह उचलून पळ काढतात.
संतापलेला दिनेश बोलत राहतो, ‘‘मी सांगतो, हॉटेलमध्ये त्या मकबूलची पोरं बसलेली असणार आपल्यातला डायलॉग ऐकत. म्हणूनच भडव्यांनी सुरू केली ही असली नौटंकी…’’
मुलं पळून गेलेली. गाणं थांबलेलं. रस्ता तसा निवांत झालेला. शांत झालेल्या रस्त्यावरून ती दोघं एकमेकांच्या हातात हात घालून चाललेली. ती त्याला म्हणते, ‘‘कशाला रे त्या मुलांंवर एवढा डाफरतोस? आणि तू काय पासवर्ड चोरणारा… सिनेमाची लिंक हॅक करणारा हॅकर थोडाच आहेस? आणि आता तर संपलंय सगळंच, मग कशाला कुणा ऐर्‍यागैर्‍यांवर रागावतोस?’’
‘‘तुला नाही कळायचा त्यांचा डाव. वेळ आली तर मकबूलला सोडणार नाय आपण! उगा खुन्नस दिलीन त्यानं.’’ धुमसत दिनेश बोलतो.
ती त्याची समजूत घालत त्याला शांत करत राहते. बघता बघता ते डिजिटल कॉम्प्लेक्समधल्या तिच्या फ्लॅटपाशी येऊन पोचतात. आत पाऊल टाकताच तो तिला समोर बसवतो नि त्याच्या स्मार्ट फोनवरून सोशल मीडियावर जाऊन एक घाऊक मेल टाकतो. ‘नो मोअर बिझनेस डील्स!’ मग एकदम निवांत झाल्यासारखा तो तिच्या कुशीत शिरतो नि एकदम निष्पाप मुलासारखा गाढ झोपी जातो. तिला सगळं सगळं खरं खरं सांगितल्याशिवाय ज्याला करमायचं नाही तो शाळकरी दिनेशच जसा.
ती मात्र जागी, देवाचे आभार मानत. आजपर्यंत ‘इंडियन पीनल कोड ३०२’खाली खुनाच्या किंवा सेक्शन ३९४ च्या जबरी चोरीसाठी. त्याला कधीही अटक झालेली नाही म्हणून.
(पडदा पडतो.)

(पडदा हळूहळू वर जातो, फ्लॅटच्या आतला खोलीचा सीन दिसू लागतो. घराची सजावट अतिशय पॉश. उंची फर्निचर, कोपर्‍यात टीव्ही सेट, म्युझिक स्टिस्टीम, ती दोघं आरामात सोफ्यावर बसून बेगम अख्तरची ठुमरी ऐकत असतात.)
लाईटच्या फोकसमध्ये त्या दोघांचं रोजचं आयुष्य सुरू झाल्यासारख्या हालचाली सुरू होतात. ती ऑफिस-घर, ऑफिस-घरच्या फेर्‍यात अडकलेली. आणि दिनेश! तो मात्र सतत स्मार्टफोनला चिकटून बसलेला. कारण त्याचं क्लाएंटेेल भलतं दांडगं, मोठमोठ्या शॉपिंग मॉल्सचे मॅनेजर्स… सिनेमांच्या प्रॉडक्शन हाऊसेसचे डिस्ट्रिब्युटर्स… डिजिटल घरं विकणार्‍या कंपन्यांचे मालक… अशा घरांना कॉम्बिनेशन कुलपं विकणार्‍या कंपन्यांचे डायरेक्टर्स… अशा डिजिटल घरात राहणार्‍या पण अडचणीत सापडलेल्यांना ऑनलाईन हेल्प पुरवणार्‍या कंपन्यांचे मालक… सर्व राजकीय पक्षांचे नेते… यादी अजून संपलेली नाही. तरी पण या नमुन्यांवरुन त्याच्या विस्तारलेल्या साम्राज्याची कल्पना यावी.
‘जो जो जे जे वांछील ते ते लाहो’ या बुद्धीनं दिनेश पुढच्या चार दिवसांत कुणाला हवा असलेला पासवर्ड पुरवतो, तर कुणाला डिजिटल सिस्टीमचा कोड नंबर पुरवतो, तर कुणाला अख्खा डेटा पुरवतो.
चार दिवस मान मोडेस्तवर तो काम करत राहतो. आज पाचवा दिवस. पोलिस कमिशनर दामलेसाहेबांचं सकाळी सकाळीच आलेलं चहासाठीचं निमंत्रण तो नम्रपणे नाकारतो नि आपण आपला शब्द पाळणार असल्याचं तिला दाखवून देतो. आता तिला तिचा शब्द पाळायला हवा म्हणून मग ते दोघं लगेच देवळात जाऊन लग्न करतात.
(पडद्यामागे सनई-चौघडा वाजत राहतो.)
आता तो अधिकारानं घरात वावरू लागलेला असतो.
त्यांचा दिनक्रम फिक्स होतो. ती तिच्या ऑफिसात अधिकच जबाबदारीच्या कामात गुंतते. तो आता राजरोस चार तरुण मुलं आणि मुली जमवून समोर लॅपटॉप, स्मार्ट फोन, पेनड्राईव्ह… असलं काय काय घेऊन या पोरांना काहीबाही शिकवायला लागलेला असतो.
हे सारे नग ‘गुड फॉर नथिंग!’ असा शिक्का बसलेली आसपासच्या कॉलन्यांमधली शाळा-कॉलेजातली ड्रॉप आऊट्स अशी ‘टप्पोरी’ पोरं आणि पोरी आहेत हे तिला समजतं, तेव्हा ती म्हणते, ‘‘बरं झालं, हा मुलं सुधारायच्या मागे लागलाय. तेवढंच पापक्षालन.’’
पण हळूहळू मध्यरात्री मुलांचं येणं सुरू झालेलं, ती मुलं त्याला ‘बॉस’ म्हणायला लागलेली. शिवाय आता एका लॅपटॉपवर त्यांचं भागेनासं झालेलं. चार-चार लॅपटॉप्स… दोन फ्रेमचे कम्प्युटर्स… वेगवेगळ्या कंपन्यांचे दहा-बारा स्मार्ट फोन्स… ती चक्रावते. तो तिला दिला शब्द पाळत असतो. चोरीमारी करत नसतो, तरीही कायम फोनवर बोलत असतो, टेन्शन घेत असतो. कसलं टेन्शन याला? कुणाशी बोलतो हा एवढं तासन्तास ते देखील एकदम हळूहळू? तिला समजत नसतं.

पण मग सगळंच उघडं पडतं. त्याचं असं होतं, ती नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला निघाली असताना डिजिटल कॉम्प्लेक्समधल्या त्यांच्या उच्चभ्रू वस्तीला न शोभणारा राडा होतो तोदेखील नेमका तिच्या घरासमोर. मकबूल शिवीगाळ करत खच्चून ओरडतोे, ‘‘मेरे बच्चे भगाकर यहाँ लाता है तू! तुझे बहुत महंगा पडेेगा। तेरी ये ‘हॅकिंग एक्सपर्ट इन्स्टिट्यूट’ कैसी चलती देखता हूँ। नही बंद करवाई तो मेरा नाम मकबूल नही।’’ आणि तो पाय आपटत निघून जातो.
ती थक्क! दिनेश मात्र गप्प असतो. त्यांच्या घरात त्यानं हॅकिंगसाठी रीतसर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच काढलीये? तिला शॉक बसलेला.
ऑफिसला न जाता ती घरात परत जाते नि संतापून म्हणते त्याला, ‘‘शेवटी गेलासच चोरांच्या जातीवर. फसवलंस मला. वचन मोडलंयस तू. का केलंस असं सांग?’’ हे विचारताना तिनं त्याची कॉलर पकडलेली असते. ती बेभान. तो शांत.
थंडपणे तो तिला हाताला धरून आपल्या समोर बसवून घेतो नि सांगायला लागतो त्याची मजबुरी, ‘‘माझ्या प्रत्येक क्लाएंटला माझी रिप्लेसमेंट हवी, तीदेखील हायली स्किल्ड पर्सनची. आणायची कुठून एवढी स्किल्ड माणसं? धंदा तर इतका जोरात आहे, की स्किल्ड चोरांचा तुटवडा आहे भयंकर. शप्पथ सांगतो, एकदा का माझ्या क्लाएंट्सना प्रॉपरली ट्रेंड स्किल्ड लोक पुरवून झाले, की मी नक्की बंद करणार हे सगळं.’’
ती चिडलेली, संतापून म्हणते, ‘‘तू बदलला नाहीस मुळीच… मला नकोयस तू, आपण वेगळे होऊ.’’

तिचं बोलणं तो ऐकतो नि मग बर्फासारख्या थंड नजरेनं तिच्याकडे बघत बोलतो, ‘‘तुला मिळवायचं माझ्या डोक्यात शाळेपासून होतं. तू मिळालीस. आता हट्टानं तुला जर जायचं असलं तर जा तू, पण महागात पडेल तुला ते. तुझी डेबिट-क्रेडिट कार्ड्सची डिटेल्स… पर्सनल इन्फर्मेशन… प्रायव्हेट फोटोज्… तुझ्या सगळ्या अ‍ॅप्सचे पासवडर्स माझ्या सेक्युरिटी सिस्टीमवर आहेत, त्यामुळे यापुढे तुला फक्त मी आणि मीच सेक्युरिटी पुरवू शकतो. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर केव्हाही लीक होऊ शकतात आणि ते फारच महाग पडेल, खरं ना? तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव आणि इतके दिवस करायचीस, तसंच प्रेम करत राहा. रात्र गडद झाली, की मी हाक मारीन, तेव्हा माझ्या कुशीत मुकाट यायचंस म्हणजे पुन्हा ऑनलाईन नवरा मिळवायची धडपडसुद्धा करावी लागणार नाही. हेच वर्केबल प्रपोझल आहे आणि अधिक सोपंसुद्धा.’’ तो मोठ्या खुषीत गडगडाटी हसत असतो. स्वतःवरच बेफाट खूष असल्यासारखा.
ती समजते काय समजायचं ते. तेव्हापासून एकदम गुमसूम राहायला लागते. आणि तरीही स्मार्ट फोन फेकून द्यावा, डिजिटल कॉम्प्लेक्समधल्या घरातून निघून जावं, ही गोष्ट तिला जमत नाही, कारण ती गुलाम आहे डिजिटल युगाची.

सूत्रधार खिन्न झालेला. नटीनं पैज जिंकलेली, तरी ती भयंकर अस्वस्थ झालेली. दोघंही आपापल्या हातातल्या स्मार्ट फोनमध्ये असलेल्या अ‍ॅप्समध्ये साठवलेल्या गोष्टींचा विचार करायला लागतात, तशी घाबरून जातात. आणि… आणि सरळ रंगमंचावरून थेट खाली उडी मारून दाराबाहेर पळून जातात.
पडदा पडतो. प्रेक्षागृहात एकदम सन्नाटा पसरतो. कुणाला काही सुचेनासं होतं. अशी दोन मिनिटं जातात नि मग टाळ्यांचा कडकडाट होतो. बंद पडदा वर उचलला जातो नि पुन्हा अगदी सुरुवातीला रंगमंचावर आलेली ती दोघं दिसायला लागतात. झिरमिळ्यावाली केशरी पगडी डोईवर चढवून अंगावरचं उपरणं घाईघाईनं सावरत हात जोडून सूत्रधार उभा आणि त्याच्या शेजारी नऊवार साडीतली, नाकात नथ घातलेली, अंगावर शेला पांघरलेली नटीसुद्धा उभी. त्यांच्या हातात एक बोर्ड धरलेला. बोर्डावर लिहिलेलं असतं..
‘तंत्रचक्र – एक मिथक कथा’साठी डिसक्लेमर-
‘हे तंत्रचक्र फारच क्रूर आहे. त्यानं श्राद्ध घातलंय तुमच्या खासगी आयुष्याचं, तुम्हीच डाऊनलोड केलेल्या तुमच्या मोबाईलवरच्या प्रत्येक अ‍ॅपच्या दारात. तेव्हा सावधान!
शिवाय या मिथक कथेमुळे कुणाच्या घरात संशयकल्लोळ सुरू झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नाही.
चूकभूल द्यावी घ्यावी.
धन्यवाद!’

– योगिनी वेंगुर्लेकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.