Now Reading
ठिपका

ठिपका

Menaka Prakashan

उन्हानं सावल्यासुद्धा गिळून टाकल्या होत्या. प्रत्येक वळणावर उडालेली धूळ बंद काचांवर जमली होती. रेअर व्ह्यू मिररमध्ये दूरपर्यंत कुणीही नसलेल्या मागच्या लाल मातीत टायरचे ठसे स्पष्ट दिसत होते. कुणीतरी बुक्का उधळल्यासारखी धूळ कणाकणांत नाचत होती. आकाशाल तडे गेल्यासारखी बोडकी झाडं बांधाबांधावर गुडघ्यात वाकून उभी होती.

देवळाची घंटा ऐकल्यावर आदिला थोडं ओळखीचं वाटू लागलं. देवळाचा कळस दिसू लागल्यावर आता घर जवळ आलंय, असं आपसूकच वाटलं. इतक्या वर्षांनंतर काही जागांवर आपल्याला अगदी तसंच कसं वाटतं?
खराट्याचं खिळखिळं झालेलं अंग सुतळीनं त्यानं ताठर बांधून घेतलं. उलट करून जमिनीवर ठोकून त्यानं सर्व काड्या एकसारख्या लावून घेतल्या. उडालेल्या धुळीमुळे त्याला खोकल्याची उबळ आली, त्याकडे दुर्लक्ष करून अंगणातल्या पालापाचोळ्याबरोबर तोही तसाच पुढे सरकत राहिला आणि मागच्या आठवणी त्याच्या मागून फिरू लागल्या. बाप मेल्यावर रावसाहेबांनी त्याला महारवाडा सोडून आपल्या घरी आणलं होतं.
समाजाची त्याला जेवढी भीती होती, त्याहून जास्त किंमत रावसाहेबांच्या शब्दाची, त्यामुळेच ‘चल भिका’ असं म्हटल्यावर त्यांच्यामागे तो नेसत्या वस्त्रानिशी चालू लागला. आईसाहेबांनी सांगितलेल्या मुलीशी मान खाली घालून त्यानं लग्न केलं होतं. महारवाड्यापासून गावातच नव्हे, तर वाड्याच्या आवारातच संसार म्हणजे खाली नागवं आणि डोक्यावर मुकुट!

गाडीची घुरघुर दुरूनच ऐकल्यावरही भिका गुडघे धरून उभा राहिला, गाडी फाटकापाशी उभी राहिल्यावर लगबगीनं पुढे गेला. ‘‘कसे हात छोटे मालक?’’
‘‘बरा आहे की. अरे, राहूदे एकच तर बॅग आहे, उचलेन मी.’’
‘‘आसं कसं म्हनता…’’ असं म्हणतच भिकानं बॅग डोक्यावर घेतली. भिकानं ओसरी अगदी रोजच्या वापरात असल्यासारखी स्वच्छ केली होती. तसंही गेली वीस वर्षं त्यानं ते घर जमेल तसं राखलं होतं. माठातलं गार पाणी पिऊन आदिला शांत वाटलं. थोडं त्यानं डोळ्यांनाही लावलं. भिका आदिला न्याहाळत अर्धवट हसत उभा होता. आदिच्या आठवणीतल्या भिकामध्ये आता बदल झाला होता. पूर्वी भिका रांगडा दिसत असे. त्याच्या दगडी चेहर्‍यावर तो लाल टिळा लावत असे. त्याचे भांग न पाडता उलटे विंचरलेले केस मानेवर रुळत असत. आईसाहेब त्याला प्रेमानं ‘विठोबा’ म्हणत. भिकाच्या लग्नात त्याच्या बायकोचं नाव त्यांनीच तर ‘रुक्मिणी’ ठेवलं होतं. ‘आमचा भिका लाकडाचेच नाही, तर कातळाचे एका घावात दोन तुकडे करतो,’ असं रावसाहेब स्वत:च्या मिश्यांवर बोट फिरवत ज्याला त्याला सांगत.

भिका आता वाळला होता. त्याचा ताडमाड बांधा वाकून चालल्यामुळे खुरटा वाटत होता. दाढी वाढल्यामुळे साधूप्रमाणे दिसणार्‍या त्याच्या चेहर्‍यावर गतवर्षांच्या खुणा सुकल्या होत्या. त्याच्या जाड भुवयांच्या मधे एखाद्या काळ्या दगडी मूर्तीवर वर्षानुवर्षं कुंकू वाहिल्यानं तयार व्हावा तसा एक गुळगुळीत डाग दिसत होता.
‘‘न्हाऊन घेणार का, न्हाऊन घ्या अन् तेवढं जेवनाचं…’’
‘‘हो हो, भूक आहे ना, पण मी अंघोळ करूनच जेवेन.’’
‘‘जेवण… तेवढं जरा सामान आणायचं म्हंजी पैकं…’’
‘‘अरे, हे घे. तसं मला पिठलं-भाकरीही चालेल.’’ आदि पैसे देत म्हणाला.
‘‘पन पैकं…’’
‘‘बरं, बरं…’’
अंगावर न्हाणीघरातलं पाणी पडल्यावर कसं ऊन वाटलं, प्रवासाचा शीण थोडा कमी झाला. आदि बराच वेळ अंगावर कोमटसर पाणी घेत राहिला. ‘पुरे आता बाहेर ये आदि.’ आईची हाक त्याला सरावानं ऐकू आली आणि आईसारखेच घासून त्यानं केस कोरडे केले. आदिला कडकडून भूक लागली होती. दीड वाजला तरी जेवणाचा पत्ता नव्हता. त्याच्या कपाळावर अगदी रावसाहेबांसारखीच एक आठी उमटली. शक्यतो राग न दाखवता तो भिकाला म्हणाला, ‘‘अरे, आगाऊ पत्र लिहिलं होतं ना, मग आधीच का तयारी नाही केलीस? शहरातल्या लोकांना इतका वेळ नसतो. दोन दिवसांत निघायचंय मला.’’
छोटे मालक अजूनही तसेच चिडतात, हे पाहून हसल्यावर अजून राग येईल, म्हणून खाली मान घालत भिका म्हणाला, ‘‘अजून राग तसाच हाय व्हय उसळल्यासारखा.’’

आदिला अगदी लहान लहान झाल्यासारखं वाटलं. कितीतरी वर्षांनी कुणी तरी त्याला असं बोलत होतं. भिका गेल्यावर आदि स्वत:चं घर बराच वेळ न्याहाळत राहिला.
‘‘मालक… छोटे मालक, सामान आनलंय आत्ता पिटलं-भाकरी होतेय बगा. हा चा घ्या तवर.’’ भिकानं तळाला गोलाकार पोक आलेलं फुलपात्र बराच प्रयत्न करून मेजावर उभं ठेवलं.
माजघरातल्या नेहमीच्या खिडकीत पाय सोडून बसावं म्हणून तो गेला खरं, पण आता ती खिडकी त्याला लहान असल्याची जाणीव झाली. सवयीनं त्याची बोटं सळ्यांवर फिरली आणि आता मात्र तोच मंजूळ आवाज उमटला. तुळशीचा हिरवेपणा आता तुळशीवृदांवनावर वाढलेल्या शेवाळावर उतरला होता. खिडकीत उमटणार्‍या या रोजच्या चित्राकडे पाहताना आई नसल्याची तीव्र जाणीव त्याला झाली.
‘‘घेता नव्हं का च्या?’’
‘‘अं… हो, हो.’’
चहाचा घोट घेताक्षणी गवती चहाची चव त्याच्या जिभेवर रेंगाळली आणि आनंदून त्यानं भिकाला म्हटलं, ‘‘अरे, तुझ्या अजून लक्षात आहे मला गवती चहा आवडतो ते?’’
‘‘आँ? मला कुटं, मी तुमाला दूदच पिताना पायलंय, सुमी म्हनली पाती घालून च्या आवडतो तुमाला. तिनंच केलाय तो.’’
‘‘सुमी…’’
‘‘आँ?’’ भिका थोडा खिन्न झाल्यासारखा वाटला. ‘‘मघा विचारायचं म्हनून रायलं, मला काय कापडं असतील धोतर, पंचा जरा बगता का?’’
‘‘सदरा घेऊ आपण तुला.’’
‘‘बरं, पन धोतरच बगा की असंल घरातच जुनंपानं.’’
‘‘बरं, बघूया.’’
‘‘जरा बगाच!’’ असं म्हणून भिका तिथेच रेंगाळू लागला. ‘‘थांबू मी, की बगा जरा.’’
‘‘उद्या घेऊन देतो मी तुला.’’
‘‘उद्याला? नगं, आत्ताच बगूया की.’’
‘‘त्याशिवाय जेवण मिळणार नाही का मला?’’
‘‘काय तरीच…’’ पण तरीही भिकाला आजच कापडं मिळाली तर बरं होईल, असं सारखं वाटत राहिलं.

चहाबरोबर सुमीची आठवणही आदिला एक-एक घोट उबदार करू लागली. ‘याच खिडकीच्या सळ्या कशा मंजूळ वाजतात, हे पाहून मोठे डोळे करून हसणारी, तिरका भांग पाडल्यानं एक छोटी आणि एक मोठी वेणी घालणारी सुमी… मला हळूच चहा प्यायला शिकवणारी सुमी. आज ती काही धूसर, काही स्पष्ट यात उभी होती.
‘‘घ्या की भाकर अजून…’’ भाकरीच्या कडांवर बोटं नक्षीसारखी गोलाकार उमटली होती.
‘‘नको, झालं की बरं वाटलं पिठलं खाऊन,’’ असं म्हणत आदिनं कांद्यावर पिळलेली लिंबाची फोड तोंडात टाकली.
‘‘पातळ सालीचं लिंबू हाय, सालच खात्याल ते सुमी म्हनली मला.’’
लहानगी सुमी त्याच्या हातावर पाणी घालते आहे, असं त्याला उगीचच वाटलं. ‘सुमीच्या डोळ्यांत काजळ नेहमीच अस्ताव्यस्त असे. आबा गेल्यावर या घरातून बाहेर पडलो ते नेहमीसाठी. आबांच्या कायम मागे मागे करायच्या सवयीमुळे आईही त्यांच्याच मागे निघून गेली. या सगळ्यानं बावरून जायच्या वयात भिका आणि सुमीचं काय झालं, असे प्रश्न पडले नाहीत. मामा सांगेल तसा मन लावून अभ्यास केला. सुमीचा या घरात किती वावर होता.’ असे अनेक विचार त्याच्या मनात कुजबुजू लागले.
‘‘तेवढं कापडाचं…’’ भिका अजूनही बाहेर उभा होता.
‘‘हो भिका, मी पाहतो, नाहीतर जाताना तुला बाजारातूनच घेऊन देईन बघ.’’
‘‘नगं, जुनीपानीच बरी. देशमुखाच्या कापडाचीच सवय हाय अंगाला.’’
‘‘असं काय म्हणतोस, पण ठीक आहे, बघतो मी.’’ मानेनंच ‘हो’ म्हणत भिका निघून गेला. खरंच त्याचं धोतर खूपच जीर्ण झालं होतं.

घरातल्या प्रत्येक वस्तूची आठवण बनून राहिली होती. दोन-तीन उड्या मारल्याखेरीज त्या पलंगावर त्याला चढताही यायचं नाही. ओसरीवरून माजघरात येण्यासाठीही त्याला एक छोटीशी उडी मारावी लागत असे. खांबावरची नक्षी एका ठिकाणी चुकली आहे, ते शोधण्याचा आवडता खेळ त्याला आठवला. आईला कुंकू लावता येईल अशा उंचीवर भिंतीवर लावलेल्या आरशात आता तो रावसाहेबांसारखाच वाकून पाहत होता. त्याच भिंतीला असणार्‍या देवळीत आता दिवा जरी नसला, तरीही साचलेल्या काजळीत त्याचं अस्तित्व जिवंत होतं. माजघराच्या दारात मामानं लाकडी उंबरठ्यावर जुनी नाणी खिळ्यानं ठोकली होती. पूर्वी याच दाराला वर हिरव्या-लाल मण्यामण्यांचं तोरण असे. लहरीसारख्या हलणार्‍या या तोरणावरचा गणपती सतत डोलत असल्यासारखा दिसे. आणि अगदी सकाळभर याच उंबरठ्यावर सूर्यकिरणं लांबपर्यंत पसरत. याच दारातून अगदी समोर दिसणार्‍या स्वयंपाकघराला मामानं आणलेला मुंबई फॅशनचा पडदा होता. स्वयंपाकघरातल्या प्रत्येक खमंग वासागाणिक तो झुळझुळत राही. त्यातून अस्पष्ट दिसणारी ताटाळी त्या नक्षीचाच एक तलम भाग बनून हलत राही.

भिंतीलगतच्या कपाटावर दोन ट्रंका निमूट बंद होत्या. वरचे ऑईलपेंटचे पापुद्रे निघून आता आतला गंजेचा रंग दिसू लागला होता. थोडा जोर देऊनच आदिनं त्या उघडल्या आणि लोलकाचं मोठ्या आयामाचं घड्याळ, त्याचा वाड्यात घुमणारा आवाज, कुठल्याशा साहेबानं दिलेला रंगीत पीस डोक्यावर असलेला टाक, काकाआजोबांचा चांदीचा अडकित्ता, कधीतरी भिंतीलाच फुटल्यासारखी वाटणारी काळविटाची शिंगं, घरासाठी सतत झिजलेल्या आजीची सहाण, काचेचे शोभेची पक्षी, अशा अप्राप्य गोष्टींना त्यानं सहज हात लावला. एका ट्रंकेच्या अगदी तळाला दोन सोन्याचे मणी, पोवळी, एक लाल धोतरजोडी आणि भिकबाळी दिसली. ती आपल्या कानाला लावून पाहताच आपण किती आबांसारखे दिसतो, असं आदिला वाटलं.

संध्याकाळी त्याची पावलं आपोआपच भिकाच्या घरी वळली. भिका लंगोटीसारखं काहीतरी घालून पसरला होता. त्याचं फाटकं धोतर दोरीवर लटकत होतं. म्हैस धावत गेल्याप्रमाणे त्याच्या धोतराला जागोजागी भोकं होती. भिकाची झोपडी भिकालाच टेकून उभी आहे, असं वाटत होतं. भिका जरा जरी हलला तर ती पडेल की काय, अशी ती उभी होती. बकरी बांधायचा खुंटा, कोंबड्या, त्यांची खुराडी, कुठलासा जुना पिंजरा, सुमीनं चिमण्यांसाठी ठेवलेलं पाणी, अशा अनेक गोष्टींची लाल माती झाली होती. अंगणात असलेल्या विहिरीचा गळा अंधारानं भरून आला होता. आदिला पाहताच भिका लगबगीनं उठून धोतर नेसू लागला.

‘‘आँ… तुमी? बसा.’’
इकडे तिकडे पाहत तो जागा शोधू लागला. ओसरीवर जिथे तिथे खोलगट झालं होतं. आदि स्वत:च जागा शोधून बसला. आदिची नजर घरावरून कळवळून फिरू लागली, जिथे तिथे ठेचकाळल्यासारखी झाली. मोडक्या बांबूत मुंग्या, कसर, नाना किड्यांनी आपली घरं पक्की केली होती. ओसरीलगतच्या ताटक्यांची पोटं फुगली होती. काही ठिकाणी फुटलीही होती. खिडकीवर मळका पडदा हलू नये म्हणून खाली खिळ्यात अडकवला होता. त्यानं काही विचारायच्या आतच भिका म्हणाला, ‘‘रावसायब गेलं आणि तुमचं मामा तुमाला आणि आईसायबाला घेऊन गेलं. आमचं नशीब तुमच्यासंगं गेलं बघा. म्हटलं, तुम्ही परत याल आज न उद्या, पन तुमी आला नाई. बातमी आली आईसायब गेल्याची. मागचे नारल इकून दिवस ढकलले.’’
‘‘इतर कुणाची कामं करायचीस. गावात घरं कमी आहेत का?’’
‘‘मन मानिना, रावसायबाचा नोकर असल्याचा सुदा मान आसतु बगा छोटे मालक.’’
‘‘अरे, कामानिमित्त पुढच्या गावात आलो मी, आणि सहज घरी यावंसं वाटलं. कायमचा नाही आलोय मी. एक दिवसाचा मुक्काम.’’
‘‘आँ? म्हंजी हितं नाय का र्‍हानार?’’
‘‘एकदा शहरात गेलेला माणूस परत येत नाही भिका. पायवाटेवर चालणारा माणूस घड्याळाच्या काट्यावर कधी चालू लागतो, त्याचं त्यालाही कळत नाही.’’
‘‘म्हंजी जानार तर, पण बरं झालं, येकदा तरी आलात. या घराशी पिढ्यांची नाळ गुतली बघा. रावसायबांनंतर आमी उरलो लव्हाळी उरतात तशे, पन कोनाच्या दारात गेलो न्हाई. उसनवार केला नाय, तरी पोरीसाठी गेलतो एक-दोन घरी, म्हारवाड्यातून हाकलून दिलं आमाला. कोन देनार काम… लोक वर बोट दाखवून हसत, ‘जा, रावसायबांकडं काम मागा…’ असं म्हनायचे. पोरीची साळा सुटली. कारभारनीनं धक्का घेतला. उरलो मी अन् सुमी. आता तुमी एक डाव तरी आलात. शेवटचा दिस गोड व्हावा.’’

झोपडीचा दरवाजा उमलल्यासारखा झाला आणि आतला अंधार डोळ्यांत उतरला. आत किणकिणलेल्या चहाचं फुलपात्र भिकानं लगेच उठून आणून दिलं. आदिला गवती चहाची चव अधिकच अस्वस्थ करू लागली. बरोबर आणलेली लाल धोतरजोडी त्यानं भिकाला दिली. एक विशेष आनंद भिकाच्या चेहर्‍यावर पसरला, पण तो पाहायला आदि तिथे थांबला नाही. खिडकीत दिसणारे दोन डोळे त्याच्या पाठीला जाणवत राहिले, तरीही त्याची पावलं घराकडे झपझप चालू लागली. पूर्वी फार वाटणारं अंतर आदिनं काही पावलांतच पार केलं. पापणी मिटावी तसा अंधार झाला. थोडा चाचपडतच तो ओटीवर गेला आणि कंदील पेटवला. ओटीवर कंदिलाखाली एक मोठा अंधाराचा ठिपका घालून भिंतीवर उजेड पसरला, तसा त्यानं भिंतीवर हरण, ससा करून पाहिलं. कुठल्याशा कारणानं रुसलेली सुमी पुन्हा हसू लागली. स्वत:ची मोठी सावली पाहत आदिला झोप लागली.

‘‘मालक… छोटे मालक.’’
भिकाच्या हाकेनं आदिला जाग आली. उन्हाचा एक चौकोनी तुकडा छतातून आत आला होता. अंथरुणातच भिका काही बोलण्याच्या आतच आदि म्हणाला, ‘‘मी निघणार आहे आज भिका, मी घरीच येतो चहासाठी.’’
‘‘आँ? त्येच सांगाया आलू. सुमीनं च्या केलाय, घरला या.’’
‘‘ती म्हणाली तसं.’’
‘‘आँ?’’
भिका आदिकडे बघतच राहिला.
‘‘नाही म्हणजे…’’
‘‘आसूद्या, या लवकर म्हंजी झालं.’’
कुठेतरी सुमी भेटावी, अशी तीव्र इच्छा आदिच्या मनात जागी झाली होती. ‘मी का तिला हाक मारून बोलावलं नाही काल. खरंच इतके मोठे झालो आम्ही आणि इतके दूर गेलो. किती सहज भेटायचो आम्ही एकमेकांना अगदी वेळ काळ न मानता. पुढे काय झालं? आबांबरोबर तीही गेली आपल्या आयुष्यातून… मामाच्या घरी सुमी कधी होती का? का ती याच घरात एका कोपर्‍यात बसून राहिली जुन्या ट्रंकेसारखी.’

‘गवताची काडी दोन्ही बाजूंनी उभी फाडत आणून अगदी मध्यावर पुन्हा आडवी फाडत हतकडी तयार करून ती मोडू नये म्हणून कितीतरी वेळ सगळ्या हालचाली सावकाश करत हिंडत असू आम्ही. जास्वंदीची कोवळी पानं हातावर उलट ठेवून लटकवून हलणारे पोपट पाहणं… ताटक्यांमधून सारख्या अंतरावर दिसणारे प्रकाशाचे बिंदू मोजणं… असे अनेक खेळ शिकवणारी सुमी…’
भिकाच्या झोपडीचा दरवाजा आज उघडाच होता. आत कौलातून नाणी मुक्यानं सांडली होती, त्यांचा मंद प्रकाश त्यांच्याच भोवती फिरत होता. भिका आज जरा मूठभर जास्तच हसत होता. ‘बसा बसा,’ असं सारखं म्हणत होता. मधून मधून मान डोलवत होता. कोवळ्या उन्हात गवती चहाचा दरवळ पसरला होता. कालचीच किणकिण आदिला ऐकू आली. पण भिकाच्या हालचालीत लगबग नव्हती. गुडघे धरून तो बसला होता. दारात हालचाल झाली. सावळ्या हातांनी सुमीनं आदिजवळ चहा ठेवला. भिका मान डोलवत चहाचे झुरके घेऊ लागला.

‘‘हा चहा बघ कसा लागतो, दूध काय पितोस, लहान बाळू आहेस का?’’ लहानगी सुमी किंचाळून बोलत होती. दुधामुळे ओठांवर आलेली पांढरी मिशी पुसून आदिनं चहाचा ग्लास तोंडाला लावला. आणि सुमीला खळी पडली. सुमीनं आज अगदी तसंच हसावं, असं आदिला वाटलं.
सुमीला पाहताच आदिला एक लाल तप्त चटका बसल्यासारखं झालं. भिकाला दिलेली धोतरजोडी सुमीनं साडीसारखी गुंडाळली होती. तोकडा पदर सावरत ती आत निघूनही गेली. भिका अजूनही मान डोलवत ‘बसा बसा’च म्हणत होता.

काही न बोलता आदिनं बॅग उचलली. गाडीची किल्ली उगीचच दोनदा फिरवली. गाडीजवळ भिका धावत आला. त्याला थोडे पैसे द्यावे म्हणून आदिचा हात खिशाकडे गेला, त्यानं काच खाली केली. ‘‘मालक, पुरुषमानसाला बोटभर कापड चालतं बगा. बाईमानसाला हातभर सुदा कमीच पडतं. म्हनून त्रास दिला.’’ भिका म्हणाला. आदिला अगदी फाटकं आणि तोकडं वाटू लागलं. खिशातला हात खिशातच राहिला. बालपण मागे टाकत गाडीनं वेग घेतला.
आत रेअर व्ह्यू मिररमध्ये झोपडीच्या दाराशी एक लयबद्ध लाल रेषा उभी होती. हळूहळू तिचा एक ठिपका झाला. तो दिसेनासा व्हायची आदि कितीतरी वर्षं वाट पाहत राहिला.

– सीमा आरोलकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.