Now Reading
झटपट साखरांबा

झटपट साखरांबा

Menaka Prakashan

साहित्य : दोन वाट्या तोतापुरी कैरीचा कीस, दीड वाटी साखर, केशर, वेलचीपूड.
कृती : कैरीचा कीस आणि साखर एकत्र करून साधारण तीन-चार तास ठेवावं. चार तासांनंतर त्याला पाणी सुटतं. नंतर एका स्टीलच्या डब्यात सर्व मिश्रण घालावं आणि कुकरला शिजवावं. तीन-चार शिट्ट्या होऊ द्याव्या. झाला साखरांबा तयार. नंतर गार झाल्यावर त्यात केशर, वेलचीपूड घालावी.
टीप : डब्यात वाफेचं पाणी जाऊ देऊ नये, झाकण घट्ट लावावं.

साबुदाणा वडी
साहित्य : एक कप साबुदाणा पीठ, एक टे. स्पून साबुदाणा, एक मोठा उकडलेला बटाटा, जिरेपूड, एक टी स्पून चिलीफ्लेक्स, मीठ, कोथिंबीर.
कृती : एका बोलमध्ये साबुदाणा पीठ घ्यावं. त्यात उकडलेला बटाटा किसून घालावा. अख्खा साबुदाणा आणि वरील सर्व जिन्नस घालून छान मळून घेऊन गोळा तयार करावा. नंतर एका चौकोनी ट्रेला तेल लावून घेऊन हा गोळा वड्या थापतो त्याप्रमाणे थापून घ्यावा. मग सुरीनं वड्या पाडाव्या आणि मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळाव्या. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह कराव्या.

हेल्दी सूप
साहित्य : पाव किलो दुधी भोपळा, दोन मध्यम आकाराचे बटाटे, दोन मध्यम कांदे, एक गाजर, अर्धा कप उकडलेले मक्याचे दाणे, मीठ, मिरपूड , साखर, अर्धा कप दूध, दोन मॅगी सिझलिंग क्युब्ज.
कृती : दुधी, बटाटा, कांदा यांचे चौकोनी तुकडे करून कुकरमध्ये शिजवून घ्यावे. नंतर गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवून पेस्ट करावी. थोडं पाणी घालून गॅसवर उकळायला ठेवावं. त्यात मीठ, मिरपूड, साखर, मॅगी क्युब्ज घालावं.
उकळी आल्यानंतर त्यात किसलेलं गाजर, मक्याचे दाणे घालावे. हे सर्व उकळल्यानंतर गॅस बंद करावा आणि दोन मिनिटांनी त्यात दूध घालावं. हेल्दी सूप तयार!

मसालेदार मखाणा (मखाण्याची भाजी)
साहित्य : दीड कप मखाणे, दोन चिरलेले कांदे, दोन टोमॅटोची प्युरी, दोन हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ, हळद, कोथिंबीर, एक टे. स्पून तूप, गरम मसाला.
कृती : एका कढईत तेल घालून त्यात कांदा, जिरे, हिरवी मिरची बारीक गॅसवर परतून घ्यावं. कांदा शिजल्यावर त्यात टोमॅटो प्युरी, हळद घालावी आणि गरम मसाला घालून, झाकण ठेवून शिजायला ठेवावं. दुसरीकडे एका पॅनमध्ये तूप घालून मखाणे परतावे. गॅस बारीक असावा. तसंच त्यात थोडं मीठ, हळद घालावी म्हणजे मखाण्याला छान रंग येतो. मखाणे परतून झाले, की पाच-सहा मिनिटं थंड होऊ द्यावे. आता शिजलेल्या मिश्रणात मीठ, थोडी कोथिंबीर, थोडं पाणी घालून उकळावं आणि मखाणे घालावे. दोन मिनिटं सर्व मिश्रण छान परतावं. वरून कोथिंबीर घालावी. चविष्ट मसालेदार मखाणे तयार!
(मखाण्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन्स भरपूर असतात.)

पौष्टिक खीर
साहित्य : पाव किलो दुधी किसलेला, साखर, दूध, तूप, तीन टे. स्पून भिजवलेले बासमती/आंबेमोहर तांदूळ.
कृती : प्रथम एका पातेल्यात तूप घालून त्यात दुधीचा कीस परतावा. नंतर दूध घालून शिजवावा. भिजलेले तांदूळ थोडं पाणी घालून वाटून घ्यावे. ही तांदळाची पेस्ट दुधीमध्ये घालून शिजवावी. यामुळे खिरीला छान दाटपणा येतो. तांदळाची पेस्ट घातल्यानंतर सतत ढवळत राहावं. गुठळी होऊ देऊ नये. हे सर्व मिश्रण छान एकजीव झाल्यानंतरच त्यात साखर घालावी आणि उकळू द्यावं.
टीप : तांदळाच्या पेस्टमुळे छान दाटपणा येतो आणि सुगंधही मस्त येतो.

मारी बिस्कीट पुडिंग
साहित्य : मारी बिस्किटं, दूध, कस्टर्ड पावडर, साखर, सफरचंदाचे तुकडे, कॉफी, क्रीम, चेरी.
कृती : प्रथम कस्टर्ड तयार करून घ्यावं आणि ते थंड होऊ द्यावं (कस्टर्डमध्ये गुठळी असू नये). नंतर एका पातेल्यात पाणी, कॉफी पावडर, थोडी साखर हे उकळावं (ब्लॅक कॉफी). गॅस बारीक सुरू ठेवावा. आता ज्या बोलमधे पुडिंग सेट करायचं आहे, त्यात एक-एक मारी बिस्कीट कॉफीत बुडवून लावावं. एक लेअर बिस्किटांचा झाला, की त्यावर पुडिंग घालावं. नंतर त्यावर सफरचंदाचे बारीक केलेले तुकडे घालावे. त्यावर परत मारी बिस्कीट कॉफीत बुडवून थर लावावा. नंतर कस्टर्ड पसरवावं आणि सफरचंदाचे तुकडे घालावे. असे साधारण तीन थर लावावे. नंतर सगळ्यात वरती क्रीम पसरवावं. पूर्ण कव्हर करावं आणि त्यावर चेरी लावाव्या. नंतर फ्रीजमधे साधारण चार-पाच तास ठेवावं. थंड सर्व्ह करावं.
टीप : कॉफीमध्ये दूध घालू नये. ती स्ट्राँग असावी. पुडिंग खाताना कॉफीची थोडी कडसर चव छान लागते.

पालक पोहे टिक्की
साहित्य : बारीक चिरलेला पालक, भिजवलेले पोहे, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, काजूचे तुकडे, मीठ, साखर, कोथिंबीर, धणे-जिरेपूड, तेल.
कृती : बारीक चिरलेला पालक, भिजलेले पोहे, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची व इतर मसाले एकत्र करून छान मळून घ्यावं. नंतर त्यात काजूचे तुकडे, कोथिंबीर घालून त्याच्या टिक्की तयार करून घ्याव्या. नंतर फ्राईंगपॅनमध्ये तेल घालून शॅलो फ्राय कराव्या. टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह कराव्या.
टीप : पोह्यांमुळे टिक्की छान खुसखुशीत होते.
साल्सा सॉस (डीप)
साहित्य : दोन कांदे, दोन टोमॅटो, एक ढोबळी मिरची, मीठ, साखर, टोमॅटो सॉस, सोयासॉस, रेड चिली सॉस.
कृती : कांदे , टोमॅटो, ढोबळी मिरची अगदी बारीक चिरून घ्यावं. नंतर त्यात मीठ, साखर (थोडीच) आणि बाकीचे सॉस घालावेत. झाला तय्यार चटपटीत सालसा सॉस नाचो, वेफर्स साठी सर्हव करावेत.

– सविता कुटुंबे, पुणे
मोबाईल : ९९२१०२५२७९

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.