Now Reading
जाणीव

जाणीव

Menaka Prakashan

सोसायटीच्या गेटजवळ आल्यावर निशाच्या लक्षात आलं, लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. मीटर बॉक्सजवळ पाच-सहा माणसं उभी राहून काहीतरी करत होती.

अंधाऱ्या जिन्यातून ती वर आली. सवयीचं असलं तरी धडपडायला झालंच. लॅच उघडून आत आल्यावर तर मनाची दमणूक जास्त जाणवून गेली.

बाल्कनीचं दार उघडल्याबरोबर हवेचा हलकासा झोत सुखावून गेला. रस्त्यावरचा गलबला, वाहणारे रस्ते, माणसांची गर्दी… विलक्षण गती असलेलं चित्र. क्षणभर त्यात हरवून व्हायला झालं.
दाराची कडी वाजते आहे…? का हा भास? तिनं दार किलकिलं करून बघितलं. शेजारच्या घरातून परवचा म्हणण्याचा आवाज येत होता.

फारश्या आशा, अपेक्षा नसणारं कुटुंब. त्यांचा हेवा करावा की कीव…?
वाऱ्याच्या झोतानं थरथरणाऱ्या, हेलकावे खाणाऱ्या ज्योतीकडे ती बघत राहिली.

ठोके दिल्यासारखा दरवाजा बडवण्याचा आवाज येत होता.

दार उघडताच सावंतनं सुधीरचं मुटकुळं आणून सोफ्यावर ठेवलं.

”लाईट नाऽही? सालंऽ एक धड…..” तिनं मुकाटपणे तांब्या-भांडं आणून समोर ठेवलं. गटागटा पाणी पिताना सावंतच्या घामेजलेल्या गळ्याचा कंठमणी वर-खाली हलत होता. शर्टच्या बाहीला तोंड पुसत तो उठला.
”निघतो ताई…”

”चहा ठेवते.”
”नको. आज जरा घाई आहे.”

सवयीनं तिनं सुधीरच्या पायांवर चादर घातली. चादर भिरकावून देत तो जोरात ओरडला, ”आधीच उकडून जीव चाललाय अन् त्यात हे! लाईट कधी येणार, ते चौकशी कर जरा. सगळे डँबिस… हरामखोर भरलेत. आज चहा पण नाही केलास, त्या सावंतला मात्र…”

झडीवर झडी कोसळत राहिल्या. ती सुन्न झाली. कधीकाळची स्वप्नं, आशा-आकांक्षांची पार होळी झाली होती. तळाशी फक्त राख राहिली होती.
”काही तोंडात टाकायला तरी दे जरा. नुसती ठिय्या दिल्यासारखी बसून राहिलीयेस.”

अंतःकरणातली कळ दाबत ती आत निघून गेली.

लाईटच्या भक्कन प्रकाशानं डोळे दिपले. सोफ्यावर बसून हात मानेमागे गुंतवत तो तिच्या हालचाली निरखत होता.

”लाईट असतानाच सगळं आवरून घ्यायचं नाऽऽ” निर्विकार नजरेनं ती दुसरीकडे बघत राहिली. हा त्याचा उपदेश आहे का सल्ला… का जाब विचारणं? शहाजोगपणाचा आव आणायला बरोबर जमतं याला! तुटकपणे तिनं फक्त हुंकार दिला.
”कशाचा काही नेम असतो का? आपण आपलं आवरून घ्यावं. आत्ताचंच बघ ना…”

निशाचा ताणलेला चेहरा, आक्रसलेल्या भुवया… त्याच्या खिजगणतीतच नव्हतं…. तो अजून गुर्मीतच.
”बस, ट्रेन पकडून यायला किती कसरत करावी लागते. तू सुद्धा यातून गेला आहेस. माहीत…”

”आहे ना! हे काय, हे पायच तर… ऑफिसनं इथेच बदली करून दिली म्हणून… अन् तुझ्यामुळेच सगळं चाललंय… असंच ना!” दाणकन घाव घालून, दुसऱ्याच क्षणाला तो टीव्ही बघण्यात दंग झाला.
व्हीलचेअर पकडताना कुबडीवरचा त्याचा हात निसटताना बघून निशा एकदम धावून गेली.

”थोडक्यात निभावलं. जरा सावकाश!”

”प्रत्येक वेळी तू का मधे मधे कडमडतेस? नको ना करूस. माझं मी मॅनेज करीन ना. चार पावलंसुद्धा धड चालू देत नाहीस.”
फाडकन थोबाडीत बसावी, तशी ती मागे सरकली. श्वास कोंडला गेला. शब्द घशातच अडकले.
घायाळ नजरेतून जे ठिबकलं, ते त्याच्यापर्यंत पोचलंच नाही.

अतार्किक विचार करणाऱ्याला कसं समजावणार? मग तिला स्वतःचाच राग आला. आपणच चुकतोय. त्याला समजून घ्यायला हवं. नैराश्याची जागा दयेनं घेतली.
”सुधीर, हे पुस्तक नक्की वाच. मी तर इतकी भारावून गेले ना वाचून!”

”करायचं काय वाचून? सगळा फालतूपणा… खोटं अन् आभासी, नुसता भंपकपणा.”
”तसं नाही रे, कठीण प्रसंगाला सामोरं जातानाची जिद्द, धैर्य, कणखरपणा हे वास्तव सगळं खूप…”
”म्हणून तू मला वाचायला सांगतेस? तू नाऽऽ एक नंबरची…”

पुस्तक तिच्या अंगावर भिरकावून देत तो जोरात ओरडला. शेजारची कुबडी भिंतीवर आपटून वेगानं दाराला जाऊन धडकली.
”सगळ्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. तुझं तर जास्तच.”

त्याचं हे रूप नवीनच होतं. दोघांच्याच अशा लहानशा विश्वातला मधला पूलच कोसळला होता. दोघांभोवती स्वतंत्र रिकामी पोकळी तयार झाली होती. ओठ घट्ट मिटून घेत ती आतल्या खोलीत निघून गेली.

सकाळी जाग आली, तरीही उठावंसं वाटत नव्हतं. जडशीळ डोळ्यांनी छताकडे बघत ती पडून राहिली. नकळत अस्वस्थपणा मनात ठुसठुसत राहिला. मन आवरून ती उठलीच. हॉलमधला पसारा बघून निशाचा पुतळा झाला. आळोखेपिळोखे देत सुधीर तिच्याकडे बघत होता. चपापल्याचे भाव क्षणभरच त्याच्या चेहऱ्यावर उमटले. बघता बघता त्याचा नूर पालटला.

”हे तर होणारच. असंच चालणार! तुझा नवरा ठोंब्या, बिनकामाचा आणि निरुपयोगी आहे…”

निगरगट्टपणाबरोबर आता कांगावखोरपणाही वाढत चालला होता. तिला चक्कर आल्यासारखं झालं. कोरड्या, भकास नजरेनं ती पुढे झाली. तणाव, घाई… सगळ्यापासून तो अलिप्त, बेफिकीर. त्याचं सगळं आवरून देणारा मुलगा अजून आला नव्हता. तिचा खोळंबा झालेला.

”आता हा सावंत… हा पण उशीर करणार. बघ तू…” मानभावीपणानं तो म्हणाला, ”वेळेची किंमत नाही. सगळे माजलेत साले!”

आज महत्त्वाची मीटिंग होती. पॉईंट्स काढलेला कागद तिनं पर्समध्ये ठेवला. काही मेल्स करायचे होते, डेटापॅक पण संपत आला होता. जमलं तर ट्रेनचा पास पण काढायचा होता. तेवढ्यात,

”चलाऽऽ, चला लवकर… नंतर मला मुलांना शाळेत सोडायला जायचं आहे. आटपा पटकन.” सावंत म्हणाला.

”अरे व्वा! उशीर केलास तू. आणि वर मलाच…! शिरजोरी नको हं तुझी. सांगून ठेवतोय.”

”रस्ता काही माझ्या बापाचा नाही. ट्रॅफिक आहे, सिग्नल आहे… सोप्पं नाही राव! दोन-चार मिनिटं तर इकडे तिकडे होणारच ना. चला, उठा आता…”
”मला उठता आलं असतं, तर तुला कशाला…”

”बास झालं ठणाणाऽऽ आता.” पालथ्या हाताची मूठ तोंडावर आपटत सावंत जोरात ओरडला.

आजूबाजूच्या दारं-खिडक्यांमधून डोकावणारे चेहरे, कुजबुज… पराभूतासारखी मान खाली घालून ती आत निघून गेली.

बसलेला हबका मोठा होता. अंधाऱ्या गुहेतून बाहेर जाण्याचा मार्गच सापडू नये, तशी अवस्था झालेली. मानहानी आणि बेइज्जतीनं शरीराचा अणूरेणू पेटून उठला होता. संध्याकाळी ऑफिसमधून निघायलाच उशीर झाला. मीटिंग बरीच लांबली होती.

”आता बससाठी थांबायला नको. टॅक्सीनं तुला स्टेशनवर सोडून मी पुढे जाते.” रेणूचा पर्याय योग्य होता.

झोकदार वळण घेऊन मेहतासाहेबांची गाडी समोर येऊन थांबली.

”चला, सायनला सोडतो दोघींना. उशीर खूप झाला आहे. पण मीटिंग चांगली झाली. तुम्ही काढलेले पॉईंट्स… त्यामुळे बऱ्याच गोष्टी अचिव्ह करू शकलो. गुड जॉब!” अतीव समाधान चेहऱ्यावर पसरत गेलं.

”आज आता आराम अन् मस्त एंजॉय कर.” पाठीवर थाप मारत रेणूनं निरोप घेतला.
धावत पळत, धापा टाकत निशा घरी आली, तेव्हा साडेनऊ वाजून गेले होते.

”आठवण झाली म्हणायची! नशीब आमचं… रात्रीचं असं बरं दिसतं का?”

तिच्याकडे रोखून पाहत त्यानं अंदाज घेतला. त्याचा उद्देश तिला कळत होता.
”मीटिंग उशिरा संपली. बाकी तुला काय समजायचं ते समज. मला काही फरक पडत नाही.”

”हंऽऽऽ, ती सायनची मीटिंग ना!”

क्षणभर तिला थिजल्यासारखं झालं. निग्रहानं ती आत निघून गेली.

आतापर्यंत जगण्याचं केंद्र फक्त ‘तो’ होता. त्याचे मूड्स, त्याच्या सोयी, त्याचं अमुक आणि त्याचं तमुक. आता तो आराखडाच बदलण्याची गरज होती.

”आज एकदम कडक इस्त्रीची साडी! काही…?”
”सावंत आला, की तू निघ. मी जाते.”
”आज लवकर? का? परत…”

चकार शब्द न काढता, पाठ फिरवून ती निघून गेली. उत्तर मिळाल्याप्रमाणे तो चमकून गप्प झाला. नकळत भीती मनात ठाण मांडून बसली. ‘सावंत येईल ना… मला काही झालं तर?’ थरारल्यागत होऊ लागलं. व्हीलचेअरवरची पकड घट्ट झाली. रात्री सुधीरची नजर परत घड्याळाकडे गेली. बघता बघता पावणेअकराचा टप्पाही ओलांडला गेला होता. काळजाचा ठोका चुकला.

चढत जाणारी रात्र, भोवतीचा जीवघेणा एकांत… भयाण पोकळीत अंगावर धावून येणारा एकटेपणा…

व्हीलचेअर फिरवून तो बाल्कनीत गेला. रहदारी कमी झाली असावी. निर्मनुष्य रस्त्यावरून ही कशी येईल? येईल ना परत? का…? विचारानंच चेहऱ्यावर घामाचं थारोळं जमा झालं. रस्त्यावरचा मंद प्रकाश… सगळीकडे सामसूम… काटेरी कुंपणात करकचून बांधल्यासारखा तो बसून राहिला. दुर्बल शरीर अन् पराभूत मन… निदान एक फोन तरी का नाही? आपल्याला सुद्धा कसं नाही सुचलं?

आत जाण्यासाठी त्यानं घाईघाईनं खुर्ची फिरवली. वेगानं जाणारं चाक दाराला धडकलं अन् काय होतंय कळायच्या आत सोफ्याला घासत गर्रकन फिरलं. कलंडता कलंडता खुर्ची थांबली. प्राण कंठाशी आलेल्या अवस्थेत, गलितगात्र स्थितीत किती वेळ गेला. थरथरणाऱ्या शरीराला अन् मनाला कसलंच भान नव्हतं.

कसल्याशा आवाजानं त्यानं निर्जीवपणे डोळे उघडले. लॅचमध्ये किल्ली सरकवली जात होती.

चाहूल लागलेल्या मांजराप्रमाणे कान टवकारून तो बघत राहिला. डोळे विस्फारले गेले…
मिठाईचा बॉक्स हातात घेऊन प्रफुल्लित चेहऱ्यानं निशा आत येत होती.

”अरे, आज प्रमोशन्स डिक्लेअर झाली. मला तर सगळ्यात…”

पालवी फुटल्यागत तिचा चेहरा आनंद आणि उत्साहानं डवरला होता.
अश्रूंच्या पडद्याआडून सुधीर फक्त तिच्याकडे बघत राहिला.
***

– वर्षा परांडेकर
७२७६३ ८६३३८

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.