Now Reading
चक्र

चक्र

Menaka Prakashan

घरातल्या चार भिंतींच्या आत असलेली ती, रोजची घरातली नेहमीची कामं उरकून नुकतीच हॉलमधल्या सिंगल बेडवर टेकली. टेकल्यावर तिला जरा बरं वाटलं. घरातलं सगळं करता करता दुपारचा एक वाजून जायचा. ती आणि तिचा मुलगा अकरालाच जेवण करून घ्यायची. त्यानंतर एकदा चहा. मग रात्रीचं जेवण. दोघांसाठी तितकं पुरेसं असायचं. दोन दिवसांपासून तिच्या कंबरेला चांगलीच रग लागली होती. डॉक्टरकडे जावं की नाही, या विचारात ती दुखणं अंगावर काढत होती. गरम पाण्याच्या पिशवीचा शेक, मलम, तेल सगळं करून झालं होतं. तरीही जास्त वेळ उभं राहिलं, किंवा बसलं, की कंबर चांगलीच दुखायची. एकदा तिच्या मुलाकडून तिनं चोळून घेतलं. थोडं काम, थोडा आराम, असंच तिचं सुरू होतं. काही ना काही दुखण्याची तिला जणू सवयच लागली होती.

आठवडा झाला पेपर आला नाही. रोजच ती पेपर वाचायची, त्यामुळे तिला चुकल्याचुकल्यासारखं वाटायचं. पण घरातला टीव्ही तिच्या सोबतीला होता म्हणून तिला हायसं वाटलं. तिनं टीव्ही सुरू केला. रिमोट हातात घेऊन ती टीव्हीवर काय चांगलं आहे, ते शोधू लागली.
‘ कधी नेहमीसारखं सगळं सुरू होईल कुणास ठाऊक. तरी बरं, शेठनं घरी काम दिलंय. आठ दिवस पुरेल इतकं. मशीनवर बसलं, की सगळं विसरायला होतं. टीप मारून ती रफू करून झाकून टाकली, की कसा आनंद होतो. मग चांगल्या कापडाला लागलेली नजर आपोआप मिटून जाते आणि केलेलं रफूही त्या कापडात एकरूप होतं,’ असं ती स्वतःशी म्हणाली. तिचंही आयुष्य रफूसारखं झालं होतं. तितक्यात तिचा तरुण मुलगा आवरून बाहेर आला. त्याच्या चेहर्‍यावर कसली तरी घाई दिसत होती.
‘‘तू ऐकत जा जरा. उगाच स्टंटबाजी करू नकोस. गप घरात बस. तो शेजारचा गणेश बघ, घरीच असतो. कुठे जात नाही.’’ ती पोटतिडकीनं रिमोटशी चाळा करत त्याला म्हणाली.
‘‘आई, तू काळजी करू नकोस. मला काही होत नाही. आणि त्या गण्याचं काय सांगते तू. तो भित्रा, घरकोंबडा आहे.’’ तो घड्याळाकडे पाहत म्हणाला.
‘‘अरे, दिवस खराब आहेत, म्हणून बोलले. काळजी घेत जा. मास्क काढू नकोस बाहेर गेल्यावर. आणि लोकांपासून जरा दूर राहा.’’ ती त्याच्याकडे बघत म्हणाली.
‘‘मी काही फिरत नाही. लोकांना मदतच करतोय. लांब जात नाही, इथेच असतो.’’ तो चप्पल घालत बोलला. त्यानं नवीन मास्क तोंडाला लावला आणि तिच्याकडे न पाहता दार उघडून निघून गेला.

ती दाराकडे धावली आणि म्हणाली, ‘‘लवकर ये. मी वाट बघते. उशीर करू नको. मी तू आलास, कीच जेवण करीन.’’
‘‘हो, येतो. तू कर आराम. काळजी करू नकोस. जेवणासाठी माझी वाट बघू नको. बाय!’’ तो पाठमोरा होऊन बोलून गायबही झाला.
तिनं दार लावून घेतलं आतून आणि ती बाल्कनीत गेली. तिच्या जाणार्‍या मुलाकडे पाहत होती.
‘किती मोठा झाला हा. उंच आणि बारीक. बापावर गेलाय. माझे काहीच गुण यानं घेऊ नये?’ तिच्या मनात हा विचार हल्ली सारखाच येतो आहे. बाहेर जाऊन नक्की तो काय करतो, हे तिला कळत नव्हतं. ती ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. त्याच्याशी बोलत होती, पण तो तिला काहीच सांगत नव्हता. ‘लोकांना मदत करतो’ इतकंच बोलत होता आणि सकाळी रोज बाहेर पडत होता ते थेट रात्री येत होता. घरात थांबण्याची त्याला अजिबात सवय नव्हती. एका जागी राहून अभ्यास करणं त्याला कधीच जमलं नाही.

‘आठ दिवस झाले, पूर्ण शहर बंद केलं आहे. देशच बंद आहे. आणखीन किती दिवस राहील ही परिस्थिती कुणास ठाऊक. आमच्या दुकानातले सगळे कामगार इथे अडकलेत. त्यांना घरी जायचं आहे. त्यांचंही बरोबर आहे म्हणा. कितीही केलं तरी स्वतःच्या गावी, स्वतःच्या घरी जायची ओढ साहजिक आहे. पण कुणालाही कुठेही जायची परवानगी नाही. आणि हा फिरतोय इकडे तिकडे. समजत नाही मला. त्याचे मित्र कुठले, कुणासोबत तो राहतो, तो काय करतो, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ‘बंद’ वाढत गेला, तर काय करायचं, हा प्रश्न आहेच.’
तिनं एक उसासा टाकला. ती बाल्कनीतून आत आली आणि शिवणाच्या कामाला लागली. हल्ली ती एकदाच शिजवत होती. आणि सकाळी भरपेट जेवून मग थेट रात्रीच त्याच्यासोबत जेवायची. संध्याकाळचा चहा मात्र अजून सुरूच होता. बाजूच्या किरणाच्या दुकानातून तिनं काही जिनसा घेऊन ठेवल्या होत्या. किमान डाळ, भात आणि गहू, साखर घरात पुरेशी होती. तशी फार अडचण काहीच नव्हती. पण पोटाला चिमटा घेऊन राहायची तिची सवय या काळात तिला चांगली वाटत होती.

‘मागच्या महिन्यात शेठनं सगळा पगार दिला, पण या महिन्यात देईल की नाही कुणास ठाऊक. बँकेत व्याज पण जमा व्हायला तीन महिने लागतील. नशीब कसलं कर्ज नाही डोक्यावर. नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक.’ असा विचार करून तिच्या अंगावर काटा आला.
तिच्या डोक्यात पुन्हा विचार सुरू झाले. भिंतीवरच्या नवर्‍याच्या फोटोकडे तिचं लक्ष गेलं. तसं तिचं मन भूतकाळात शिरलं. दिवसभर कामात स्वतःला जुंपून घेतलेल्या तिला घर खायला लागलं. घरात राहून काम करत राहूनही एकट्यानं जगणं अवघड आहे, हे तिला प्रकर्षानं जाणवू लागलं. नवर्‍याची आठवण येऊन तिच्या डोळ्यांत पाणी आलं. कसाही होता, तरी एक नवरा म्हणून त्याचा आधार होता. एक मानसिक सुरक्षितता होती. हल्ली तिला रडून आणि विचार करून पण कंटाळा येऊ लागला होता. येईल तो दिवस कसाबसा ढकलायचा, इतकंच तिनं ठरवलं होतं.
‘रात्रीचे नऊ वाजून गेले. एव्हाना हा यायला हवा. मोबाईल पण बंद. कुठल्या मित्राचा नंबर पण नाही जो कुणी सोबत असेल तर. आधीपासून वाट पाहणं हेच काम. दिवसभर मिश्राच्या टेलरिंगच्या दुकानात काम करायला जायचं. सकाळी नऊ ते दोन काम आणि मग दोन ते चार सुट्टी. घरी येऊन थोडा आराम करून मग पुन्हा चार ते रात्री साडेआठपर्यंत दुकान. रात्री घरी येऊन घरची कामं. ते झालं की टीव्ही आणि तेही झालं, की याची वाट बघत राहायचं. आता या सगळ्यात दुकान सध्या बंद आहे, पण याची वाट बघत राहणं काही बंद नाही झालं.’

ती विचार करत राहिली. बातम्या, रेडिओ सगळ्यावर एकच विषय. ‘घरात राहा, बाहेर पडू नका.’ सगळेजण बजावून सांगतायेत. घरात राहिलं, तरच रोगाचा प्रसार होणार नाही आणि तिचा मुलगा मात्र अगदी विरुद्ध वागतोय. कुठे जातो, काय करतो, कुणाला मदत करतो, हे मात्र सांगत नाही. पदवीही पूर्ण झाली नाही. कॉलेज तर बंदच झालं. क्लास बंद. आधीच शिकण्यात रस नव्हता. तरी त्यानं कसला तरी चांगला कोर्स करून कामधंदा करावा, अशी तिची इच्छा होती. आता सगळं बंद, तर काय करायचं, हा प्रश्न. तिचा नवरा जाऊन आता दोन-अडीच वर्षं झाली. त्याच्या कृपेनं दोन खोल्यांचं घर आणि त्याच्या फंडातून मिळालेले थोडे पैसे गाठीला होते म्हणून ती आणि तिचा मुलगा कसेबसे जगत आहेत. शिवणकाम, विणकाम करून ती कसेबसे दिवस काढतेय. आहे त्यात समाधान मानतेय.

‘त्यानंही घराला हातभार लावायला हवा. नवरा नाही, तर किमान पोरानं तरी त्याची जागा भरून काढायला हवी. त्याला समजायला हवं, माझ्यावर काय बेतलंय ते. एकदा त्याला म्हणाले, ‘माझ्यासोबत चल दुकानात कामाला. मिश्रा चांगले आहेत. घेतील तुला कामावर.’ तर किती राग आला त्याला. मग मी विषयच काढला नाही. या वर्षी वीस पूर्ण होतील त्याला.’
नवरा गेल्यापासून पुढचे सगळे व्यवहार करण्यात, स्थिरस्थावर होण्यात तिला एक वर्ष लागलं. नवरा काम करत होता, त्या जागी नोकरी मिळते का, म्हणून प्रयत्न देखील करून पाहिले. पण ते जमलं नाही. साठवलेले पैसे फिक्समध्ये टाकून तिनं घर चालवायचा प्रयत्न केला. पण नुसत्या तुटपुंज्या व्याजावर घर चालवणं अशक्य झालं. मगच तिनं घरापासून काही अंतरावर असलेल्या गार्मेंटच्या दुकानात नोकरीला जायचं ठरवलं. शिवणकाम ती आधीपासून करायची, त्यामुळे तिला ही नोकरी सहज मिळाली. तीही कामात तरबेज झाली. मुलानं खूप शिकून चांगला साहेब व्हावं, असं तिला खूप वाटत होतं. म्हणून कमावलेल्या पैशांतून ती गुपचूप चार पैसे बाजूला काढत होती, पण मुलाला शिकण्यात रस नव्हता. त्याला बाहेर जायची आणि लोकांमध्ये मिसळायची, बोलायची सवयच. वडील गेल्यावरही त्यानं चार पैसे कमावून आणले नाहीत. उलट ती जे कमावते, त्यातूनच तो बाहेर खर्च करायचा. तिचे पैसे मागायचा. तीही त्याला द्यायची. पण त्यानं मागितले, तर सगळे न देता थोडेच द्यायची. त्यावरून दोघांमध्ये वाद व्हायचा.

‘खाली चक्कर मारून यायला हवं. तो कुठे दिसतोय का, बघायला हवं. एकदा मित्रांच्या घोळक्यात बसला होता, असाच पुन्हा बसला असेल की काय कोण जाणे. गणेशला विचारू का? नको. त्याला तो आवडत नाही. आणि गणेश पण कुठे असतो त्याच्यासोबत. बाकी कॉलनीत काही ओळखीचे आहेत, पण ते त्याच्यापेक्षा मोठ्या वयाचे. बाकी त्याचे सगळे नवीन मित्र जे मलाही माहीत नाहीत. मीच जाऊन बघून येते.’ ती स्वतःशी म्हणाली.
तोंडाला रुमाल बांधून, पायात चप्पल घालून तिनं दाराला कुलूप लावलं. बाहेर शांतता होती.

ती रस्त्यावर आली. तिचा एकुलता एक मुलगा. त्याच्यासाठीच तर जगतेय ती. कुठल्याश्या संस्थेला जॉईन होऊन समाजसेवा करतोय, असं सांगून ‘बाहेर जातो’ म्हणून सांगणारा मुलगा रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजून गेले, तरी आला नाही म्हणून खूप अस्वस्थ झाली. रस्त्यावर कुत्री गपगुमान पडली होती. पिवळे मोठाले दिवे खांबांवर शांत जळत होते. घरं बंद होती. आजूबाजूची दुकानं कुलपात आराम करत होती. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता. हल्ली तर गुराखीही नसतो. येता-जाता गाड्यांचे आवाजही बंद झालेत. कॉलनीतल्या मुलांचा गप्पांचा पार रिकामा होता. निर्जन रस्त्यावर तिच्या चपलांचा फटफट आवाज येत होता. तिची धडधड वाढली होती. तोंडाला बांधलेला रुमाल थोडा सैल झाला होता. तिचं ब्लाऊज घामानं संपूर्ण ओलं झालं होतं. कपाळावरचा घाम तोंडावर बांधलेल्या रुमालाला भिजवत होता. नाकातून जाणारी आणि येणारी हवा तिला जाणवत होती. तिचे डोळे सगळीकडे त्याचा शोध घेत होते. मुलगा सुखरूप असायला हवा. त्याला काय व्हायला नको, इतकीच मनातल्या मनात प्रार्थना करून ती सुनसान रस्त्यावरून त्याला शोधत चालू लागली.
तिची नजर सगळीकडे फिरत होती. चौक, पार, दुकानं सगळीकडे ती बघत होती. अचानक तिला तिचा मुलगा दिसला. अंधुकसा. रस्त्यावर पडला होता. उकिरड्याच्या बाजूला कण्हत होता. चेहर्‍यावर मास्क नव्हता. कपडे चुरगाळलेले. चप्पल नसलेला अनवाणी तो अंधारात बेवारशी झोपला होता. थोड्या अंतरावर एक फाटक्या, मळकट कपड्यांचा माणूस शरीराचं मुटकुळं करून झोपला होता. त्याची दाढी खूप वाढली होती, पण तिनं त्याच्याकडे लक्ष न देता तिचा मोर्चा मुलाकडे वळवला. त्याला पुन्हा एकदा पाहून तो तिचाच मुलगा आहे, याची खात्री तिला पटली. काही क्षण काय करावं, हे कळलं नाही. पण मग ती भरभर त्याच्या जवळ गेली. त्याला हलवलं. हाका मारल्या. तो शुद्धीत नव्हता. त्यानं डोळे किलकिले केले. तिच्याकडे त्यानं अनोळखी नजरेनं पाहिलं आणि तिला तो शिव्या देऊ लागला.

‘‘ए, तू जा. कोण तू? का आलीस? समजतेस काय तू स्वतःला?’’ तो बरळू लागला. त्याच्या तोंडात येईल तो ते तिला बोलू लागला. त्याचा अवतार झाला होता. त्याला खूपच चढली होती.
त्याच्या तोंडातून घाण वास येत होता. उलटीही केली होती. कपडे बरबटलेले होते. रस्त्यावर तो झोपलेला दाढीवाला सोडून एकही माणूस नव्हता, म्हणून तिला जरा बरं वाटलं. तिनं खोचलेला पदर काढून त्याचं तोंड पुसलं. त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण तो जागचा हलेना.
‘‘ऊठ रे, घरी जाऊया. चल, इथे नको झोपू. घरी जाऊन झोप.’’ ती त्याच्या कानापाशी जाऊन म्हणाली.
‘‘घर? कुठे आहे? मी घरातच आहे. तू कोण?’’
‘‘मी तुझी आई आहे. तू रस्त्यावर पडला आहेस.’’ तिला रडू येऊ लागलं, पण तिनं स्वतःला आवरलं. तिची कंबर जास्तच दुखायला लागली. क्षणभर तिला आपण पडतो की काय, असं वाटू लागलं. पण तिनं मन घट्ट केलं. त्याच्या खांद्याला धरून त्याला बसवलं. आणि स्वतःच्या हातांनी त्याला धरून उभं केलं. त्याला भानच राहिलं नव्हतं. त्याच्या कंबरेला आधार देत ती त्याला नेऊ लागली. तोही तिच्यासोबत चालू लागला.

कुणीतरी त्या दोघांना पाहिलं तर काय होईल? आणि ते कुणीतरी ओळखीचे असेल तर? नको, नको. आत्ता कुणी पाहायला नको. तिनं त्याही परिस्थितीत असा विचार केला. तिच्या कंबरेला खोचलेला आणखीन एक रुमाल तिनं काढला आणि मुलाच्या तोंडाला बांधला. स्वतःचा रुमाल घट्ट केला. घाण झालेला पदर संपूर्ण अंगावर घेतला. आणि पुन्हा ती त्याला ढकलत ढकलत घराकडे नेऊ लागली. चालताना तो बरळत होता. काय काय बोलत होता. त्यात तिचं नाव त्यानं एकदाही घेतलं नाही. एका मित्राचं नाव तो वारंवार घेत होता. त्याला बापाच्या नावानं शिव्या देत होता. ती काहीच बोलली नाही, कारण बोलून काही उपयोग नाही, हे तिला समजलं. ती त्याला ओढत ओढत नेऊ लागली.

ती घरापाशी पोचली. सगळ्यांची घरं बंद होती, पण कुणी पाहिलं तर काय, याची धास्ती तिला होती. रात्रीचा एक वाजून गेला होता. तिनं हळूच दार उघडून त्याला आत घेतलं आणि मोरीत नेलं. त्याला कसलीही शुद्ध राहिली नव्हती. समोर आपली विधवा आई आपले कपडे काढून साफ करतेय, याचंही भान त्याला नव्हतं. त्याच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडत होतं. ती शांतपणे सगळं आवरत होती. पोटाला भूक होती, पण चारघास खायची तिची इच्छा नव्हती.
‘असं कसं माझं दुर्लक्ष झालं याच्याकडे. याच्या आधीही तो प्यायला असेल, पण कसं लक्षात आलं नाही. की आज पहिल्यांदाच त्यानं घेतली? यांना तर कितीतरी वेळा मी उचलून आणलं. याला कधीही कळू दिलं नाही. काय करू मी? इतकी कशी मी गाफील राहिले? देवा, काय ठेवलं आहेस तू पुढ्यात माझ्या? तूच सांग मी काय करू?’
एका वेगळ्याच चक्रात ती अडकली आहे. आधी नवरा आणि आता मुलगा.

तिचा नवरा ज्या गोष्टीपायी संसार अर्धवट सोडून गेला, ती गोष्ट आज तिला मुलाच्या रूपात पुन्हा भेटली. ज्या गोष्टीची भीती तिच्या मनात होती, तीच गोष्ट अशी तिच्या इतक्या लवकर अंगावर येईल, याचा विचारही तिनं कधी केला नव्हता. तिनं मुलाला हॉलमधल्या बेडवर आडवं केलं. तो लगेच घोरू लागला. अगदी त्याच्या बापासारखा. तिनं एकवार फोटोत असलेल्या नवर्‍याकडे पाहिलं, तिच्या कंबरेत पुन्हा जोरात चमक भरली. शरीरातल्या, घरातल्या आणि समोरच्या तरुण मुलाकडे पाहून वेदनेची तिला जाणीव झाली, ती मटकन खाली बसली आणि धाय मोकलून रडू लागली.

– अमृता देसर्डा

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.