Now Reading
गिफ्ट इयर

गिफ्ट इयर

Menaka Prakashan

कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात झालेल्या उलथापालथीतही परिस्थितीशी सर्वाधिक कुणी जुळवून घेतलं असेल, तर ते आपल्या मुलांनी. पण ‘मुलांना काय कळतंय’ ही आपली टिपिकल भारतीय मानसिकता आणि आपलं वयानं आलेलं मोठेपण थोडं दूर सारत मुलांच्या विश्वात डोकावून पाहिलं, तर काय दिसतं? हे संपूर्ण वर्ष मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं तरी अगदी मनसोक्त जगली. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्यांना शाळा-क्लासेसच्या रूटिनपासून श्वास घ्यायला त्यांच्या आजवरच्या चिमुकल्या आयुष्यात पहिल्यांदाच फुरसत मिळाली. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं सतत कशात तरी गुंतून राहण्यापेक्षा काही न करताही दिवस घालवता येऊ शकतो, हे त्यांना प्रथमच कळलं.

कमलेश वालावलकरलिखित ‘बाकी शून्य’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. या कादंबरीतल्या नायकाला शाळा-कॉलेजमध्ये असताना सतत छळणारा प्रश्न म्हणजे आपण जे काही शिकतोय, ते का शिकायचं. उदाहरणार्थ, बारावी सायन्सला ङळाळीीं, ऊशीर्ळींरींर्ळींशी का शिकायचं? वास्तविक तो स्वतः खूप हुशार आहे. बोर्डात आलेला आहे. तो हा प्रश्न त्याच्या सगळ्या मित्रांना-शिक्षकांना विचारतो. सगळेजण त्याला गणित कसं सोडवायचं इतकंच सांगताहेत, पण कुणीच त्याला ते का शिकायचं, हे सांगत नाही. सगळे करताहेत त्यामुळे मेंढरासारखं आपणही ते करायचं, भरघोस मार्कं पाडायचे आणि मोकळं व्हायचं, अशी एकूण सगळ्यांची गत आहे. खरंतर हा प्रश्न वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आणि मुलांच्या बाबतीत कोणत्याही यत्तेत पडू शकतो. माझ्या सहा वर्षांच्या मुलाला- निर्मोहला- फार वेळ एका जागी बसून लिहायला आवडायचं नाही. त्याऐवजी तो हा सगळा वेळ खेळून-उड्या मारून सत्कारणी लावायचा. त्यामुळे मग माझ्या बायकोनं- मोहिनीनं- आणि मी ठरवलं, की त्याच्यावर अक्षरं गिरवण्याची, किंवा छोटी छोटी वाक्य लिहिण्याची अजिबात सक्ती करायची नाही. सुदैवानं तो ज्या शाळेत जातो, तिथेही मुलांना पहिलीपर्यंत औपचारिक लिखाण देण्यात येत नसल्यानं बालवाडीत त्याच्यावर लिखाणाचा ताण तसाही पडला नव्हता. दुसरीकडे त्याचा जन्म ऑगस्टमधला असल्यानं सहा वर्षं पूर्ण व्हायला दोन महिने बाकी असतानाच तो पहिलीत गेला होता. शक्यतो सहा वर्षं पूर्ण होईपर्यंत त्याच्या हातात वही-पेन्सिल न देण्यावर बाप म्हणून मीही अगदी ठाम होतो. लॉकडाऊनचं वर्ष हे त्यामुळेही तसं आमच्या पथ्यावरच पडलं. याचा चांगला परिणाम असा झाला, की तो आधी गोष्टीच्या पुस्तकांतून, दुकानाच्या पाट्या बघून, वर्तमानपत्रातले बातम्यांचे मथळे बघून छोटे छोटे शब्द वाचायला शिकला. मग त्याची त्यालाच तो जे काही वाचतोय ते लिहून बघायची ऊर्मी निर्माण झाली आणि तो आपसूक लिहायला लागला. यात आई-बाप म्हणून आम्ही काही केलं असेल तर ते इतकंच, की त्याला त्याचा वेळ दिला, अवकाश दिला.

शिक्षण विभागानं दवडलेली संधी
कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे पुढचं किमान वर्षभर शाळा सुरू होणार नाहीत, याची कल्पना गेल्या वर्षी मे-जूनमध्येच सगळ्यांना आली होती. त्यामुळे 2020-21 हे शैक्षणिक वर्ष गॅप इयर म्हणून घोषित करण्याची आगळीवेगळी संधी देशाच्या आणि राज्याच्याही शिक्षण विभागाकडे होती. कोरोनाचा मुद्दा बाजूला ठेवला तरीही वेगवेगळ्या कारणांनी हे वर्ष शिक्षणाच्या बाबतीत गोंधळाचंच ठरलं. विशेषतः मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला न्यायालयानं स्थगिती दिल्याने अकरावी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेचा पुरता खेळखंडोबा झाला. अजूनही ती प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालीये का, हा संशोधनाचाच विषय आहे. तर कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे टळलं नसल्यानं दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाही उशिरानं तर होत आहेतच, पण त्या देतानाही मुलांच्या तोंडावर मास्क आणि मनावर दडपण असणारच. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारनं या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हे वर्ष गॅप इयर म्हणून घोषित केलं असतं, तर पुढचे अनेक घोटाळे टळले असते. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात एका मुख्याध्यापकांनीही खासगीत बोलताना ही अपेक्षा व्यक्त केली होती. पण शिक्षण विभागाची धोरणशून्यता परत एकदा प्रबळ ठरली आणि शैक्षणिकदृष्ट्या हे वर्ष कसंतरी रडतखडत पार पडतंय. यामागे खासगी शाळा-कॉलेजांमधलं शुल्काचं अर्थकारण, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार हे मुद्दे प्रबळ तर ठरलेच, पण बहुतांश पालकही अशा कोणत्याही चाकोरीबाहेरच्या निर्णयाला अजिबात तयार नव्हते.

करोनाचा वाढता संसर्ग बघता, ‘काही झालं तरी मी माझ्या मुलाला शाळेत पाठवणार नाही. उलट मुलांना हे वर्ष रिपीट करावं लागलं, तरी माझी काही हरकत नाही,’ अशी भूमिका एका व्हॉट्सअ‍ॅप समूहावर एका पालकानं मांडली. त्याला प्रत्युत्तर देताना एक उच्चविद्याविभूषित बाबा म्हणाले, की ‘मीही हा विचार करून पाहिलाय. पण आपल्या मुलांचं आता हे वर्ष ‘वाया’ गेलं, तर आणखी दहा-बारा वर्षांनी जेव्हा ते पदवीधर होतील, तेव्हा त्यांना नोकरी मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा करावी लागेल!’ स्वतःला बुद्धिवादी म्हणवणार्‍या या बाबांचं स्वतःच्या मुलासंदर्भातलं हे सखोल चिंतन वाचून मला हसावं की रडावं, हेच कळेनासं झालेलं. आज एकविसाव्या शतकातही टक्केवारीचं आणि मार्कवादाचं भूत आपल्या मानगुटीवर पक्कं बसलं आहे. या अघोरी शर्यतीत जी मुलं चमकतील तीच पुढे जातील, हा समज कोरोनाचं जिवावर बेतलेलं संकटही बदलू शकलं नाही, हेच खरं. बाकी खूप वर्षांपूर्वी एका होम स्कूलिंगवरच्या लेखात एका आईनं लिहिलेलं ते या निमित्तानं मला नमूद करावंसं वाटतंय. ती म्हणालेली, की ‘मला अनेक पालक विचारतात, की तुमची मुलं होम स्कूलिंग करत असल्यानं त्यांना बाहेरचं एक्स्पोजर मिळत नाही. असंच राहिलं तर ती उद्या मोठी झाल्यावर स्पर्धेच्या जगाला कसं तोंड देणार?’ त्यावर त्या आईचं म्हणणं होतं, की ‘माझ्या मुलांनी मोठं झाल्यावर करीअरच्या गळेकापू स्पर्धेत उतरण्यापेक्षा आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वतःचं विश्व निर्माण केलं, तर मला अधिक आनंद होईल. ’

ऑनलाईनची मेख
माहिती तंत्रज्ञान (आयटी), त्या क्षेत्रात सुरुवातीलाच मिळणार्‍या बड्या पॅकेजच्या नोकर्‍या, परदेशी वार्‍या, किंवा थेट परदेशीच स्थायिक होण्याच्या संधी यांमुळे गेल्या दोन दशकांत ‘आयटी’ला भलतीच डिमांड आली आहे. त्यामुळेच एखादी गोष्ट वही-पेन, पाटी-पेन्सिल हातात घेऊन करण्यापेक्षा, किंवा पुस्तक समोर धरून वाचण्यापेक्षा ती कम्प्युटर-लॅपटॉपवर केली म्हणजे जीवन धन्य होतं, अशी आपली मानसिकता. फक्त ग्रामीण, निमशहरीच नव्हे, तर शहरी पालकांचीही. त्यामुळेच या संपूर्ण वर्षात कसलं पेव फुटलं असेल, तर ते ऑनलाईन शिक्षणाचं. त्यालाच जोडून मग लहान वयातच मुलांनी कोडिंग शिकावं, ही आणखी एक खुळी लाट आली. ऑनलाईन एज्युकेशन क्षेत्रातल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी मग अनेक क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधल्या मठ्ठ तार्‍यांना सोबत घेऊन जाहिरातींचं मोठं कँपेनच केलं. देशातले लाखो पालक या चकचकीत जाहिरातींना भुलले असतील आणि आपलं आठ-दहा वर्षांचं मूल आता सॉफ्टवेअर इंजिनीअर होणारच, या दिवास्वप्नात मश्गुलही झाले असतील.

वास्तविक कोणतीही गोष्ट शिकताना त्याच्या कंटेंटइतकंच माध्यमही महत्त्वाचं असतं, हे आपल्या गावीही नाही. त्यामुळेच मग मोबाईलसमोर, किंवा कम्प्युटरसमोर बसून का होईना, शिकतंय ना पोरगं मग झालं तर, असाच बहुतांश पालकांचा सरधोपट विचार होता. शाळा-कॉलेजांनाही येनकेनप्रकारेण हे शैक्षणिक वर्ष काही करून एकदाचं पार पाडायचं असल्यानं मग बाहेरून तांत्रिक साहाय्य घेत शिक्षण संस्थांनी शिक्षकांना तंत्रज्ञानाचे धडे दिले आणि त्यांना ते मुलांना द्यायला लावले. शाळेत बाकावर बसून बाईंनी शिकवलेलं समरस होऊन ऐकणं, समजून घेणं आणि तेच झूम तासिकेला करणं, यात किती महदअंतर आहे, हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. पण कदाचित ते पटवून घ्यायची आपली तयारी नव्हती. माझ्या मुलाच्या शाळेत आम्ही काही मोजक्या पालकांनी आम्हाला मुलांना स्क्रीनसमोर बसवायचं नसून, आम्ही शाळेनं दिलेला अभ्यास आमच्या आम्ही घरी करून घेऊ, अशी भूमिका घेतली. सुदैवानं पालकांच्या दृष्टिकोनाचा आदर बाळगणारी शाळा असल्यानं शाळेनंही आम्हाला कोणतीही खळखळ न करता तशी मुभा दिली. त्यामुळे झालंय असं, की माझा मुलगा अजूनतरी मोबाईल-लॅपटॉपपासून दूर आहे. झूम मीटिंग, व्हिडिओ कॉल, चॅटिंग हे शब्द अजूनही त्याच्या गावी नाहीत. मुलाला गॅजेट्सपासून दूर ठेवण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ‘माहेर’च्या 2018 च्या दिवाळी अंकात मी लिहिलेला ‘अटळ युद्ध’ हा लेख. शून्य ते अठरा वयोगटातल्या मुलांना लागणारं मोबाईलचं, सोशल मीडियाचं, गेमिंगचं, पॉर्नचं व्यसन आणि ते लागावं म्हणून मानसशास्त्रज्ञांच्या मदतीनं तंत्रज्ञान क्षेत्रातल्या दादा कंपन्यांचे सुरू असलेले पद्धतशीर प्रयत्न, हा त्या लेखाचा विषय होता. त्या लेखाची तयारी करताना वाचलेल्या संशोधन प्रबंधांमुळे, नेटवरच्या बातम्यांमुळे मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. त्यामुळे शक्य होईल तेवढं मुलाला या सगळ्यापासून दूर ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. तंत्रज्ञानाच्या या आक्रमणापासून मी त्याला आणखी किती काळ, किती वर्षं दूर ठेवू शकेन, हे खरंतर मलाही माहीत नाही. गॅजेट्सच्या अतिवापरामुळे मुलांचं बालपण करपतं, त्यांना डिप्रेशनसारख्या गंभीर मानसिक व्याधी होऊ शकतात, हे आजवर अनेक संशोधनांतून सिद्ध झालं आहे. त्यामुळेच लहान वयात मुलांच्या हाती मोबाईल देण्यापेक्षा त्यांना पुस्तकं दिली, मैदानी खेळांची गोडी लावली, तर मोठं झाल्यावर ते या आयुष्य समृद्ध करणार्‍या पर्यायांचा किमान विचार तरी करू शकतील, असं मला वाटतं. माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं, तर माझ्या कामाच्या स्वरूपामुळे मला स्वतःला सोशल मीडियावर सक्रिय राहणं आणि दिवसातले किमान सात-आठ तास लॅपटॉपवर काम करणं भाग आहे. त्यामुळे आमच्याकडे थोडं उलटंच आहे. मी मुलाला काही म्हणण्यापेक्षा तोच मला ‘बाबा किती वेळ मोबाईल बघताय’ म्हणून टोकत असतो. त्याच्या धाकानं मग मीही माझा स्क्रीन टाईम कमी करायला आता शिकलोय.

सर्वंकष मूल्यमापनाचा अभाव
‘शिक्षण हक्क कायद्या’नुसार मुलांचं सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अपेक्षित असलं, तरी आपल्या शिक्षण व्यवस्थेत ते तसं खरंच होतं का, हा प्रश्नच आहे. वयाच्या ठरावीक टप्प्यांनुसार मुलांचा भाषिक, गणितीय विकास झालाय का, केवळ हेच ढोबळमानानं पाहिलं जातं. वयाला साजेशा शारीरिक कृती मूल करतंय का, ते इतरांमध्ये मिसळतंय का, नसेल तर त्यामागची कारणं काय आहेत, अभ्यासाव्यतिरिक्त त्याला कोणकोणत्या गोष्टींत गती आहे, याकडे आवश्यक तितकं लक्ष दिलं जात नाही. कोरोना वर्षाचा विचार करता घरी बसूनही मुलं केवढं काय काय शिकली. माझ्या ओळखीची एक छोटी ताई छान कविता करायला लागली. तर एक छोटा दादा मस्त चित्र रेखाटायला शिकला. कुणी सायकल शिकलं, कुणी गावातल्या विहिरीत पोहायला शिकलं, तर कुणी पत्त्यांच्या नवनवीन डावांतून आणि सापशिडीसारख्या खेळांतून मस्त आकडेवारी शिकलं. कुणी आपल्या आई-बाबांसोबत शेताच्या वावरात उतरलं, तर कुणी घराजवळच्या टेकडीवर जाऊन तिथल्या झाडांशी, पक्ष्यांशी बोलायला शिकलं! एरवी शाळेच्या चार भिंतींत मुलं जितकी शिकली नसती, तितकं काय काय ती या वर्षात त्यांच्याही नकळत शिकली. दुर्दैवानं या कशाचीच नोंद मुलांच्या प्रगतिपुस्तकावर होणार नाही. कारण कुणीतरी शिकवल्याशिवाय मुलं शिकत नाहीत, हा आपला ठाम विश्वास आहे.

मुलांचा भावनिक बुद्ध्यांक
लॉकडाऊनमध्ये घरी अडकून पडल्यानं मुलांचा भावनिक बुद्ध्यांक (इमोशनल क्वोशंट/इंटलिजन्स) आणखी विकसित झाला, हे माझं निरीक्षण आहे. मुलं दिवसागणिक बदलणार्‍या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला आपसूक शिकली. गेल्या वर्षी मार्चमध्ये एका दिवशी अचानक शाळा बंद झाल्या आणि आता परत शाळेत कधी जायचं हे माहिती नाही, हे खरंतर त्यांच्यासाठी मोठं स्थित्यंतर होतं. शाळेतल्या ताईंना, जवळच्या मित्र-मैत्रिणींना अनेकजण अजूनही भेटलेले नाहीयेत. पण त्यांनी हा मोठा बदलही मनापासून स्वीकारला. वास्तविक सिंगल चाईल्ड असलेल्या पालकांसमोर वर्षभर मुलांना कसं नादी लावायचं, हा मोठा प्रश्न होता. पण मुलं त्यांचे खेळण्याचे, रमण्याचे आपापले मार्ग शोधत राहिली. उलट शक्य होईल तेव्हा त्यांनी आपल्या समजूतदार वागण्यातून परिस्थितीमुळे अस्वस्थ-असुरक्षित झालेल्या पालकांनाही धीर दिला. एरवी मुलांना पुरेसा वेळ देता येत नसलेल्या आई-बाबांनाही भरपूर वेळ मुलांसोबत घालवता आला. क्वॉलिटीसोबतच क्वाँटिटी टाईमही देता आला. मुलांचे आणि आई-बाबांचे बंध आणखी दृढ झाले. क्वचित कधी रुसवेफुगवेही झाले, पण आई-बाबा आपल्या कायम सोबत आहेत, ही जाणीव मुलांना सुखावणारी ठरली. त्यामुळेच या वर्षीच्या ऑनलाईन शाळेमुळे मुलं पुढच्या इयत्तेत जाणार असली, तरी बहुतेकांसाठी हे वर्ष म्हणजे हवंहवंसं गिफ्ट इयर ठरलं.

– निरंजन मेढेकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.