Now Reading
‘गाडी वाली मेमसाब’…

‘गाडी वाली मेमसाब’…

Menaka Prakashan

नुकताच सुरू झालेला पावसाळा… काहीतरी वेगळंच असतं त्या वातावरणामध्ये… त्यात पुण्यातला पावसाळा पल्लवीला खूपच आवडायचा. जोरानं वाहणारे थंड वारे, तिच्या खिडकीतून दिसणारे दूरवरचे डोंगर, त्यावरून पळणारे ढग आणि पावसाची रिमझिम… हे सगळं म्हणजे वीक पॉईंटच होता जणू तिचा.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, दुपारच्या डुलकीनंतरची कॉफी… ‘वा!! क्या बात!! जीने के लिए और क्या चाहिए?’… असंच वाटायचं तिला. तिच्या त्या आवडत्या खिडकीमध्ये बसून… ‘कॉफी टाईम’… तिथे बसली, की ती नेहमीच हरवून जायची, पण अलीकडे तिच्या या पिक्चर परफेक्ट फ्रेममध्ये, नव्यानंच पूर्ण होत आलेली एक बिल्डिंग, थोडासा अडथळा निर्माण करत होती.

त्या बिल्डिंगमध्ये लोक राहायला देखील येऊ लागले होते. जसजसे लोक राहायला यायचे, तसतशी पल्लवी मनामध्ये त्या माणसांबद्दल काहीतरी आराखडा बनवायची. अनोळखी व्यक्तींचा अभ्यास करणं, तसाही तिचा छंदच!!… त्याच बिल्डिंगच्या पेंट हाऊसमध्ये नुकतंच एक कुटुंब राहायला आलं. हिला भारी उत्सुकता… ‘कशी असेल बरं ही फॅमिली?…’ थोड्याच दिवसांमध्ये तिला बर्‍यापैकी अंदाज आला. नवरा-बायको, त्यांची दहा-बारा वर्षांची मुलगी, आणि र्हीीज्ञू लीशशव चा एक कुत्रा… त्या मंडळींचा जाण्या-येण्याचा रस्ता पल्लवीच्या अगदी नजरेच्या टप्प्यातला असल्यामुळे त्यांचा दिनक्रम साधारणपणे तिच्या लक्षात आला. रोज ती बायको सकाळी आठला जिमला जायची. नवरा देखील जिमला जायचा, पण वेगळ्या वेळेमध्ये… ती परतायची नऊ-साडेनऊला… परत तयार होऊन साडेदहाच्या सुमाराला बाहेर पडायची. तिचं वर्णन करायचं झालं तर…!!! एकदम मेंटेन केलेली फिगर, स्टायलिश वेस्टर्न ड्रेसिंग सेन्स, रोजच्या रोज सेटिंग आणि स्ट्रेटनिंग केलेली हेअर स्टाईल, थोडक्यात एकदम मॉडेल… तो (तिचा नवरा)… तोदेखील तिला साजेसा स्टायलिश होता. मुलगीदेखील अर्थातच गोड…

दिवसभरातून तिच्या दोन-दोन तासाला सारख्या येरझार्‍या सुरू असायच्या. तिच्याकडे आणि तिच्या नवर्‍याकडे दोघांकडेही टॉप ब्रँडच्या हाय एंड कार्स होत्या. क्वचितच दोघं एकत्र जायचे. त्यांना बघून पल्लवीला खूप प्रश्न पडायचे. ‘ही काय करत असेल? की फक्त शो डॉल असेल?… लांबून दिसते (हिरॉईन) तशीच जवळून छान दिसत असेल का? त्या दोघांच्यात कसं बाँडिंग असेल? ही मुलीकडे कधी लक्ष देत असेल?…’ इत्यादी इत्यादी.

असेच काही महिने गेले. पल्लवी आणि तिचा नवरा रोहित एकदा डिनरला गेले होते. त्याच रेस्तराँमध्ये त्या ‘गाडीवाली मेमसाब’चा नवरा येताना दिसला. आणि रोहितकडे पाहून, हसून बोलू लागला, ‘कसे आहात? खूप दिवसांनी…’ असं औपचारिक बोलणं झाल्यावर तो निघून गेला. पल्लवीनं रोहितला विचारलं, ‘‘कोण हा?’’ त्यावर रोहित म्हणाला, ‘‘अगं, आपल्या इकडेच राहतो हा…’’ सगळ्या चौकशीअंती सारांश असा निघाला, की अगदी हिंदी सिनेमाची स्टोरी शोभेल अशा पद्धतीनं त्यांचं लव्ह… मग मॅरेज झालं. लग्नानंतर तिच्या अटीप्रमाणे (याची कर्तबगारी काहीही नसताना…) त्यानं कसलासा बिझनेस सुरू केला. तो होता चेनस्मोकर, बर्‍याचदा रात्री उशिरापर्यंत पार्टी असायची, सध्या खूप कर्ज आहे, म्हणून लगेचच ते घर विकायला काढलंय, तिचं बुटीक आहे, ती त्याला अजिबात किंमत देत नाही… त्यात याची प्रकरणंदेखील सुरू आहेत… आणि सरतेशेवटी सध्या घटस्फोटाची केस सुरू आहे… इति बोंबाबोंब!!!
पल्लवीच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. ती रोहितला म्हणाली, ‘‘तरीच तो हल्ली दिसेनासा झालाय.’’ त्यावर रोहित म्हणाला, ‘‘तो सध्या त्याच्या आई-वडलांबरोबर राहतो आहे.’’

थोड्या महिन्यांनंतर ‘ती’ पल्लवीच्या बिल्डिंगमध्येच शिफ्ट झाली. त्यांचा घटस्फोट झाल्याची बातमीदेखील कानांवर आली. आता तरी, पल्लवीला ती नेहमीच अगदी जवळून दिसू लागली होती. आता दरवेळी तिला पाहिलं, की पल्लवीला वाटायचं, ‘काय काय लपलं आहे, या चकचकीत मेकअप केलेल्या चेहर्‍याच्या मागे? कसलं दिशाहीन आणि निष्क्रिय आयुष्य!! छे…’ लीगली सेपरेट झाले असूनदेखील तो अधूनमधून यायचा, भरकटलेला असायचा. कायम सिगारेट ओढतच असायचा. त्या लेकराकडे ना आईचं लक्ष, ना बाबाचं… अशी सगळी रामकहाणी…

अगदी सुरुवातीला पल्लवी जेव्हा त्यांना पाहायची, तेव्हा कितीतरी वेळा तिला असं वाटलं होतं, की कसलं भारी आहे बाबा यांचं लाईफ!!! त्यावर रोहित तिला म्हणायचा, ‘‘तुला तर कोण नको म्हणतंय का? घे ना, तू पण एक गाडी आणि फिर तिच्यासारखी स्टाईलमध्ये… पण मला एक सांग, तिचे ग्रुप्स आहेत, ती पार्ट्या करते. तू काय करणार?… तुझे ना असले ग्रुप्स, ना तुला असल्या कशाची आवड… तुझं एंजॉय करणं म्हणजे… तुझ्या ‘ाश ींळाश’ मध्ये गझल, किंवा गाणी ऐकत कॉफी पिणं इतकीच तुझी उडी…’’ त्यावर दोघंही खूप हसले होते. हसता हसता पल्लवीनं रोहितच्या चेहर्‍याकडे पाहिलं. थोडासा गंभीरपणेच तो म्हणाला, ‘‘आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तिला घरात, तिच्या मनात समाधानच नाही गं… म्हणून ती अशी भिरभिर फिरते बाहेर. जो खरा समाधानी असतो ना, त्याला या सगळ्याची काहीच गरज भासत नाही.’’ असं म्हणताना तो देखील तिच्या डोळ्यांतले भाव वाचत होता. आणि ती देखील नजरेच्या भाषेतूनच त्याला सांगत होती… ‘अरे, मी खरंच खूप समाधानी आणि आनंदी आहे अगदी अंतर्बाह्य!’

कसं असतं ना? आपण समजतो एक आणि असतं दुसरंच… भुलभुलैया आहे हा सगळा. जीवनामध्ये कशाला महत्त्व द्यावं, हे ज्याला उमगत नाही, त्यांचा खराच ‘भगवान मालिक!’…
वस्तू विकत घेताना, वस्तू कशी आहे हे न पाहता, वरच्या चकचकीत पॅकिंगचा मोह धरला, तर हाती निराशा ही ठरलेलीच आहे… आणि भांडं कितीही घाण झालं, तरी ते आतून स्वच्छ होणं महत्त्वाचं असतं… बाहेरून थोडं डागाळलेलं राहिलं, तरी हरकत नाही. जीवनाचं गणितदेखील तंतोतंत तसंच आहे.
अजूनही पल्लवीची दुपारच्या कॉफीची वेळ आणि तिची (गाडीवाली मेमसाब) बाहेर पडायची वेळ एकच असते. रोजच ती दिसते. दर सहा महिने-वर्षाला एक नवीन गाडी येणारच. हा सिलसिला सुरूच आहे. मग काहीही झालं, तरी बेहत्तर हाच आविर्भाव असतो…

पण हल्ली ना, पल्लवीची नजर तिच्याकडे वळत नाही. ती… तिचे आवडते डोंगर… आणि त्यावरून पळणारे ढग… यांच्यामध्ये आता कुणीही येत नाही.

– मनीषा पाटील

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.