Now Reading
कोर्निसीतलं आनंदघर : नातिया आणि इराकिलची खानावळ

कोर्निसीतलं आनंदघर : नातिया आणि इराकिलची खानावळ

Menaka Prakashan

युरोप आणि आशिया यांच्यामधे सँडविच झालेला पूर्व युरोपातला जॉर्जिया हा देश त्यांची वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती, आनंदी जीवनशैली आणि आतिथ्य यांमुळे जगाभरातल्या खाद्यप्रेमींचं आकर्षण ठरलेला आहे. तिथल्या एका कोर्निसी नावाच्या गावातल्या एका खानावळीची ही गोष्ट. सुमारे हजार वर्षांपूर्वींची तरी सहज असेल. घनदाट अरण्यं आणि लांबवर बर्फाच्छादित हिमशिखरं दिसत असलेल्या कॉकेशस पर्वताच्या पायथ्याशी एक छोटी समृद्ध आणि सुसंस्कृत मानवी वस्ती होती. तेच कोर्निसी गाव. हे गाव फळफळावळ, सुकामेवा आणि लाकूडकामासाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.

हे देखणं गाव म्हणजे युरोप आणि आशिया या दोन्ही खंडातलं प्रमुख व्यापारी केंद्र होतं. त्या गावाच्या मध्यवस्तीत एक मोठी बाजारपेठ होती. तिथे त्या वेळच्या जगातले व्यापारी आपापला माल घेऊन येत. त्यामध्ये मसाले, चंदन, रेशमी कापड, हस्तिदंत, लोकरी वस्त्रं, सोन्या-चांदीचे दागिने, भांडी, घोडे अशा नाना वस्तू असत. कोर्निसीतले व्यापारी मेंढ्या, फळफळावळ, सुकामेवा, जंगलातली औषधी विकत. कोर्निसीतल्या लाकडाच्या वखारी जगातल्या सर्वोत्तम वखारी समजल्या जात. तिथल्या लाकडांनीच जगातले बहुसंख्य राजवाडे सजलेले असत.

गावात व्यापार्‍यांची एवढी सततची वर्दळ असल्यामुळे त्यांच्यासाठी घरगुती खानावळी आणि तात्पुरती निवासस्थानंही असत. त्यामुळेच कोर्निसीतल्या जवळ जवळ प्रत्येक घराच्या मागच्या बाजूला परदेशी पाहुण्यांसाठी खानावळ आणि राहायची सोय केलेली असे. त्यातली एक खानावळ इराकिल आणि नातियाची होती. त्या खानावळीलाच सगळेजण ‘कोर्निसीतलं आनंदघर’ असं म्हणत.
इराकिल हा अझरबैजानच्या एका कापड व्यापार्‍याचा मुलगा. तरुण असताना कधीतरी तो कोर्निसीला आला आणि नातियामध्ये जीव गुंतल्यामुळे तो तिथेच स्थायिक झाला होता.

आता व्यापार्‍यांची वर्दळ म्हणजे गावाला जत्रेसारखं स्वरूप असणारच आणि घडीभर विश्रांतीसाठी गाणंबजावणं आणि थोडंफार सुरापानही व्हायचंच. कोर्निसीची राणी ‘तमार’. त्या राणीच्या राज्यात बायकांना पूर्ण सुरक्षितता होती. हां, पण एखाद्या तरुणीला एखादा व्यापारी आवडला, किंवा व्यापार्‍याचा जीव तिथल्या एखाद्या मुलीत गुंतला, तर कुणी फारसा आक्षेप घेत नसे. त्या परदेशी व्यापार्‍यांना जंगलाची सैर करवणारे तरुण-तरुणींचे गटही भरपूर असत. ही मंडळी व्यापार्‍यांच्या करमणुकीसाठी नवनवीन गाणी, नाच आणि नृत्यनाटिका बसवत. तिथल्या मुला-मुलींना जंगलाची माहिती तर असेच आणि ते गाणंही उत्तम गात. ते नाना प्रकारची वाद्यं वाजवत. त्या व्यापार्‍यांकडून त्यांच्या भाषेतली गाणी शिकत. खरंतर निखळ मनोरंजन असंच त्या भटकण्याचं स्वरूप असे. अर्थातच तसं असलं, तरी काही वेळा व्यापार्‍यांचा मुक्काम अधिक लांबल्यामुळे ते ‘संबंध’ अधिक खोलवर रुतत. पण मग त्या व्यापार्‍याला राणीच्या समोर जाऊन ‘होणार्‍या मुलाची जबाबदारी स्वीकारेन,’ अशी ग्वाही देऊन मुलाचं आणि आईचं पालनपोषण करण्यासाठी भरपूर रक्कम आगाऊ द्यावी लागत असे, किंवा त्या मुलीशी लग्न करावं लागे.

आपल्या इराकिलचं मात्र तसं नव्हतं. त्याचं मनापासून त्याच्या बायकोवर, म्हणजे नातियावर प्रेम होतं, म्हणून तर त्यानं बापाच्या घरचं वैभव सोडून त्याची एकेकाळची प्रेयसी नातियाबरोबर कोर्निसीत संसार थाटला होता आणि पिढीजात व्यापारउदीम सोडून त्यानं नातियाचा खानावळीचा व्यवसाय पुढे सुरू ठेवला होता.

तसं पाहिलं, तर इराकिल आणि नातियाच्या लग्नाला आणि त्यांच्या खानावळीच्या धंद्यालाही त्याच्या घरून खूप विरोध झाला होता, पण इराकिल ठाम होता. त्याचं झालं असं, की नातियाची आई एका खानावळीसाठी ब्रेड भाजून देई. खरंतर ब्रेडचं एवढं काय, पण तिच्या त्या चवदार ब्रेडवर भले भले जीव टाकत, एवढं मात्र खरं! इराकिल जेव्हा जेव्हा आपल्या बाबांबरोबर व्यापारासाठी तिथे जाई, तेव्हा तेव्हा तो नातियाच्या घरीच मुक्काम ठोके.

पण मायलेकी इतक्या चतुर, की त्या ब्रेडची पाककृती काही त्याला कळू देत नसत. इराकिलला मात्र हळूहळू ब्रेडपेक्षा देखील नातिया अधिक आवडायला लागली. नातियालाही थोडा नादिष्ट, पण प्रामाणिक, कष्टाळू, निळ्या डोळ्यांचा आणि सोनेरी झुलपांचा इराकिल बेहद पसंत पडला. मग काय, अगोदर मैत्री नंतर प्रेमात पडून लग्न, असा सगळ्यांचा आणि सगळीकडे होतो, तसा त्यांचा प्रवास झाला. त्यानंतर नेहमीप्रमाणेच त्यांच्या संसारवेलीवर मनाल आणि झुराब ही दोन फुलं उमलली. मनाल मुलगी असूनही झुराबपेक्षा खर्चाचे हिशेब वगैरे व्यवस्थित ठेवी, तर झुराब खानावळीतल्या स्वयंपाकात, कोणत्याही कामासाठी तयार असे.
नातवंडांबरोबर यथेच्छ वेळ घालवल्यानंतर कसल्याशा आजाराचं निमित्त होऊन नातियाच्या आईनं इहलोकाचा निरोप घेतला.

नातियाची आई गेल्यावरच खर्‍या अर्थानं इराकिलला तिच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळाला. तोपर्यंत तो आपला त्या दोघींच्या हाताखाली वरकामच करी. त्यांचं स्वयंपाकघर अतिशय नीटनेटकं होतं. तिच्या त्या स्पेशल पावाच्या भट्टीशेजारी वेगवेगळ्या धान्यांच्या पिठाचे डबे, मसाले आणि चीजच्या मोठाल्या लाद्या ठेवलेल्या होत्या. गायीच्या तुपानं तर डबे हारीनं मांडलेलेे होते. खारवलेले मासे, मटणाचे तुकडे, सुकामेव्याच्या माळा, भाज्या, फळफळावळ, मसाले… सगळं कसं बेतशीर भरलेलं होतं. इराकिलनं अगदी खूष होऊन स्वयंपाकघराचा ताबा घेतला. लवकरच तो स्वयंपाकात एवढा प्रवीण झाला, की गावच्या सुगरण बायकाही त्याच्याकडे सल्ले मागायला येत. अशा वेळी नातियाचं डोकं भयंकर दुखत असे, हे वेगळं सांगायला नको.

नातियाच्या आईनं नवरा गेल्यानंतर त्यांची अक्रोड, बदाम, द्राक्षं आणि सफरचंदांची चांगली पन्नास एकरांची फळबाग शेजारच्या ताहिरीला कसायला दिली होती. त्यानं लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे गावात घर असूनही ताहिरी फळबागेतल्या एका खोपटात राही. तसं पाहिलं, तर तोही त्या कुटुंबातलाच घटक होता. तो नाना फळांच्या वाईन्स उत्तम बनवी. त्या घरात येणार्‍या अभ्यागत व्यापार्‍यांचं स्वागत एक मोठी वाईनची बाटली देऊन केलं जाई. पण त्या खानावळीचं आकर्षण म्हणजे वाईन एवढंच नव्हतं. इराकेल, नातिया आणि मुलांनी आवर्जून बनवलेले नवनवीन खाद्यपदार्थ चाखण्यासाठी व्यापार्‍यांचीच काय, पण स्थानिकांचीही तिथे झुंबड उडायची. इराकेल आणि नातिया जुन्या पदार्थांना देखील त्यांच्या कल्पनेनं रंग चढवत.

दुपारचं जेवण झालं, की थोड्या वेळाची विश्रांती घेऊन सर्व कामाला लागत. मनाल आणि झुराब सगळं मागचं अंगण झाडून काढत. ताहिरी आजोबांनी बनवलेले छोटे छोटे कंदील झाडांवर लटकवत. सुगंधी फुलांच्या माळा सोडत. तोपर्यंत नातिया ‘खेमली सुनेली’ म्हणजे कोरडा मसाला त्यामध्ये धणे, सेलरीच्या बिया, वाळवलेली तुळशीची पानं आणि बिया, त्याबरोबर शेपू, पार्सेली, निळी, मेथी, तमालपत्र, झेंडू, पुदिना, समर सॅव्हरी यांची वाळवलेली पानं हे सगळं विशिष्ट प्रमाणात घेऊन त्याचा कोरडा मसाला आणि तांबड्या मिरच्या, लसूण, कांदा आणि कोथिंबीर असा ओला मसाला वाटून ठेवी. रोजच्या जेवणासाठी ताजेच मसाले असले पाहिजेत, असा परिपाठ तिच्या आईनंच घालून दिलेला होता.

हे सगळं झालं, की पाचही जण मिळून ‘अन्नपूर्णा देवी’ची आराधना करत. त्याची पण एक गंमतच होती. नातियाच्या आईची खानावळ काही फारशी चालत नसे. अर्थात, त्यावाचून काही अडत नसे, पण नातियाच्या आईला स्वयंपाकाची आणि त्याहूनही अधिक म्हणजे दुसर्‍यांना खाऊ घालण्याची अतिशयच आवड होती. मात्र कुणी त्यांच्याकडे फारसं फिरकतच नसे.

एकदा म्हणे ताहिरी आणि नातियाचे वडील जंगलात फिरत असताना त्यांना ही हातात पळी घेतलेली लाकडी मूर्ती सापडली. एकदा नातियाच्या आईनं स्वयंपाक करण्याच्या अगोदर तिच्यापुढे डोळे मिटून प्रार्थना केली आणि योगायोग असा, की त्या रात्री… अगदी उशिरापर्यंत सगळी मेजं भरलेली होती. तिच्या आईला परत परत स्वयंपाक रांधावा लागला. तेव्हापासून रोज अन्नपूर्णेसमोर घरातले सगळे डोळे मिटून प्रार्थना करत आणि मगच मुख्य स्वयंपाकाला सुरुवात होई.
नातियाचा स्वयंपाक होईपर्यंत मुलं प्रत्येक मेजावर पांढरेशुभ्र टेबलक्लॉथ घालून भल्यामोठ्या डिशमध्ये निवडक फळं मांडून ठेवत असत. त्याचबरोबर लहान-मोठ्या बश्या आणि खास खिंकालीसाठी मोठा लाकडी बाऊल, दोन खाण्याच्या काड्या आणि चमचे ठेवत. खिंकाली म्हणजे आपले मोदकच, पण त्यामध्ये किसलेलं बीफ, तूपकट पोर्क, कोथिंबीर आणि कांदा यांचा सरबरीत मसाला भरलेला असतो, त्यामुळे खिंकाली खाताना त्या मोदकाचं नाक वर करतात आणि सुर्र करून आतलं मसालेदार पाणी चोखतात. त्या पाण्याच्या चवीनंच खरंतर तृप्ती पण येते आणि भूकही जोरात खवळते. जातीचे खवैय्ये तर अशा कितीही खिंकाल्या खाऊ शकतात.

नातिया बनवत असलेले खाद्यपदार्थ अतिशय खास असत. तिच्या शोतीसा या भट्टीतले विविध प्रकारचे ब्रेड. त्यासाठी ती गव्हाच्या पिठाबरोबर मका, राय, बार्ली आणि ओट्स ही पिठं वापरी. तिची खासियत म्हणजे आजची जॉर्जियाची नॅशनल डिश ‘खाचापुरी आदजर्ली’. त्यासाठी बनपावासारखा पण दोन्ही बाजूंचे कोपरे चिमटून ब्रेड खरपूस भाजून तो ब्रेड गरम असताना मधोमध खोलगट असा कोरून त्यामध्ये लोणी, चीज आणि अंडी फोडून, किंवा भाज्या आणि बीन्स घालत. नातिया हा ब्रेड करतानाही त्यामध्ये कधी पुदिना, तर कधी बेसिल घाले. याशिवाय लोबिआनी म्हणजे बीन्स भरलेला जाडसर पराठ्यासारखा ब्रेड, त्यात कधीकधी व्हिनेगर, झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि मिरच्या घातलेली राजम्याची उसळही भरत. बोरेक या बटाटे, मटार, किंवा मटण आणि चीज भरलेल्या पेस्ट्रीज्ही त्या खानावळीत उत्तम मिळत.

नातिया कितीतरी प्रकारचे ब्रेड बनवी. तिची मत्सावदी म्हणजे आपल्याकडचे जणू कबाबच. त्यामध्ये मटणाच्या तुकड्यांबरोबर कच्च्या प्लमच्या आंबटगोड रसात मॅरिनेट केलेल्या भाज्याही असत. त्याचबरोबर आक्रोड, हेझलनट्स, दालचिनी, मध आणि वेगवेगळ्या फळांचे रस घातलेले मेश्खुरी, गोझैंकी, नाझुकी, पाछकी, पखलवा आणि शकरलामा म्हणजे आपले शंकरपाळे असे टिकाऊ आणि थोडे कडक आणि गोड ब्रेड तिथे उत्तम बनत.

ब्रेडबरोबर खायला ‘अजापसंदली’ करत. म्हणजे आपलं वांग्याचं भरीतच म्हणा ना, पण करायची पद्धत थोडी वेगळी. त्यासाठी वांगं भाजून गर काढत. त्यावर तेलावर भाजून कुरकुरीत केलेली भोंगी मिरची आणि टोमॅटो आणि लसणीचा दाटसर रस ओतत. त्यावर कोथिंबीर पसरली की झालं. त्यानंतर एकीकडे पखाली तयार होई. उकडलेले गाजर, बीट, किंवा पालकाची लिंबाचा रस, लसूण आणि अक्रोड घालून चटणी वाटतात. ही चटणी ब्रेडवर पसरवूनही खाता येते.
बटाटे, बीन्स, मासे, किंवा मटण घातलेले ‘खारचो’सारखे कितीतरी प्रकारचे स्ट्यू असत. मुळात त्या प्रदेशात धान्यं, तेलबिया, भाजीपाला, विविध प्रकारचं मांस, मासे, दूधदुभतं याला काही तोटा नसे.

त्यांच्यातलं सगळ्यात भारी म्हणजे त्यांचे डेझटर्स. चुरच्खेला म्हणजे काही गंमत नाही. तो बनवायला चिकाटी आणि कसलेला हात लागेे. अक्रोडाच्या माळेवर द्राक्षांच्या दाट रसाचे कितीतरी थर देऊन वाळवलं, की हा कुरकुरीत गोड चुरच्खेला तयार होई. तक्लापि आपल्या आंबा, किंवा फणसपोळीसारखी मात्र एका लांबरुंद पेक्तयावर पिकलेल्या फळांच्या रसाचा पातळ थर देऊन वाळवत आणि त्याचे अक्षरशः कापडाच्या ताग्यासारखे तागे बांधत. हे दोन्ही पदार्थ व्यापारी प्रवासासाठी आणि घरच्यासाठीही बांधून नेत. याशिवाय तिथे अक्षरशः रोज नवीन प्रकारच्या कोशिंबिरी आणि सूप्सही बनवली जात. खिंकाली फक्त जागेवर वाढली जाई. बाकीचे पदार्थ मधोमध ठेवलेल्या मेजावर मांडून ठेवले जात. रोजचे पदार्थ नावीन्यपूर्ण, ताजे आणि चवदार असले पाहिजेत, यावर त्यांचा कटाक्ष असे. या सगळ्याबरोबर रोज संध्याकाळी झुराब आणि मनाल त्यांच्या मित्रमंडळींबरोबर ‘रंगारंग’ नावाचा करमणुकीचा कार्यक्रम सादर करत असत. त्या गोड पोरांबरोबर खानावळीत आलेले सर्व पाहुणेही नाचायला आणि गायला लागत. सर्वात शेवटी नातिया, इराकिल आणि ताहिरीही त्यांच्यात सामील होत. त्यानंतर शेवटचं गोड पुडिंग खास खानावळीतर्फे सर्वांना मोफत दिलं जाई.
संध्याकाळी सुरू झालेला हा सोहळा जवळ जवळ रात्रीपर्यंत चालत असे. त्या खानावळीतून परतताना प्रत्येकाचं मन आनंदानं भरून गेलेलं असे. मुलं झोपी जात, पण इराकिल, नातिया आणि ताहिरी तिघंही जण तृप्त मनानं शेवटची आवराआवर करत.

आठवड्यातला एक दिवस ती खानावळ बंद असे, त्या वेळी घरातले सगळे सूर्योदयापूर्वी उठून जंगलात सैर करायला जात. कारण रोज रात्री झोपायला उशीर होत असल्यामुळे सूर्योदय पाहता येत नसे. त्या पहाटे पाखरांची किलबिल ऐकणं, हाही त्या कुटुंबाचा आवडता छंद होता. त्या दिवशी शेजारच्या मायराच्या खानावळीतून नाश्त्यापासून रात्रीपर्यंतच्या जेवणाची व्यवस्था केलेली असे. त्या सुट्टीचा उपयोग नवी ऊर्जा मिळवण्यासाठीची विश्रांती म्हणून केला जाई. त्यामुळे त्या कुटुंबातला आणि त्यांच्या व्यवसायातलाही आनंद आणि अर्थातच नवेपणा टिकून राही.

हळूहळू कालनियमाप्रमाणे इराकिल आणि नातिया दोघंही म्हातारे झाले. झुराब आणि मनालच्या आयुष्यात नवीन माणसं आली आणि त्या आनंदाच्या खानावळीतला आनंद कितीतरी पटींनी वाढला. पुढच्या कित्येक पिढ्यांपर्यंत तो वाढतच गेला.
कधी तरी त्यानंतर… कोणत्या तरी युद्धाच्या वेळी ती खानावळ नाहीशी झाली, पण त्या गावात अजूनही ती अन्नपूर्णेची लाकडी मूर्ती आहे. त्याचबरोबर आजही तिथे त्या ‘इराकिल आणि नातियाच्या आनंदाच्या खानावळीची कथा’ त्यांच्या पारंपरिक गीतातून सांगितली जाते.

– मंजूषा देशपांडे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.