Now Reading
कोरडे ते कोरडे

कोरडे ते कोरडे

Menaka Prakashan
View Gallery

या कथेतील पात्रांचा आणि घटनांचा प्रत्यक्षातील कोणत्याही पात्रांशी अथवा घटनांशी मेळ जुळला तर त्यात रुपाली आणि रोहितला, तिच्या भावाला, ते कळल्याशिवाय रहाणार नाही. कारण ही कथा त्यांचीच आहे. अर्थात ही सर्वाना सांगतली जावी की न याविषयी त्यांचं, विशेषतः रोहितचं, दुमत असू शकतं. पण असं आहे, की खऱ्या आयुष्यात क्वचितच एवढया ‘हाहाहा कथा’ अनुभवायला येतात. आणि अशा कथा सांगितल्या गेल्या नाहीत तर न सांगणाऱ्याचं पोट दुखतं. तेंव्हा मी केवळ स्वसंरक्षणासाठी ही कथा सांगते आहे असं म्हटल्यास रुपाली अथवा रोहित काही करू शकणार नाहीत. हाहाहा!!

तर वर उल्लेख केल्याप्रमाणे रुपाली व रोहित ही तिशीतील भावंडे. रुपाली हुशार. रोहित ढ नाही. पण तसला हुशार नाही की भविष्यावर बिलकुल विश्वास ठेवणार नाही. भविष्य म्हणजे भविष्य सांगणे. या विषयी भारतवर्षात अजिबात जास्ती काही सांगायला नको. काही सांगायला जावे तर दर वेळी आपलेच शिक्षण होते. तेंव्हा, काही जण भविष्य सांगतात, उरलेले ते ऐकतात. कारणे, स्पष्टीकरणे काहीही असोत. याला नावे ठेवणाऱ्या आगाऊ लोकांचा एक पंथ आहे. पण तो अतिशयच अल्पसंख्यांक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तरी चालतं. रुपाली त्या आगाऊ पंथातली होती.

नेमका तिचाच घनिष्ठ मित्र समीर वरचेवर एका भविष्यवेत्त्याकडे जात असे. हा भविष्यवेत्ता मोठा नामी होता. कशाच्याही आधाराने तो भविष्य सांगू शकत असे. पत्रिका वगैरे तर मोठं साधन झालं, कधी नुसतेच मनात आकडे धरायला सांगून, तर कधी केवळ चेहेरा बघून तो ‘भविष्य’ सांगत असे. समीरला या सद्गृहस्थाचा मोठा आधार वाटत असे. तिथे जाऊन आलं की ‘बरं वाटतं’ असं तो म्हणत असे. रूपालीला या बऱ्या वाटण्याचा अर्थ ठाऊक नव्हता. समीर अजून कोंबडं-बकरं देत नाहीये किंवा खिसा हलका होईल असं कोणतं काम करत नाहीये तोवर ती त्याच्याकडे दयाळू दुर्लक्ष करत होती. अर्थात ती त्याला टोकत जरूर असे. समीरच्या मनात जेंव्हा जेंव्हा असं येई की आज कोरडेंकडे जावं, कोरडे म्हणजे ते भविष्यवेत्ते, तेंव्हा तेंव्हा ती त्याला म्हणे, ‘मी सांगते ना ते काय सांगतील ते. तुझं लोनचं काम होत नाहीये ना, अजून १५ दिवस थांब!’. यावर स्वतःच खळखळून हसत वर असंही म्हणत असे, ‘मला दे पैसे, त्यांना जे देणार आहेस ते मला दे.’ समीरला ही चेष्टा आवडत असेल की काय! अनेकदा त्यांच्यात यामुळे भांडणं देखील होऊ लागली होती.

रोहितशी गप्पा मारताना एकदा तिनं समीरच्या या ‘वेडा’बद्दल सांगितलं. आणि झालं वेगळंच. रोहितचे डोळे चमकले. त्याच्या मनात समीर बद्दल एक प्रकारचं बंधुत्त्व दाटून आलं. रूपालीचा राग येऊ लागला. आणि तो तिला म्हणाला, ‘सगळेजण तुझ्यासारखे नसतात. तुला कळत नाही.’ बंधुराजांचा हा पवित्रा बघून रुपाली चमकली. घडू नये ते घडून गेलं होतं. ‘तुला कशाला त्याचा एवढा पुळका यायला हवाय?’ रुपाली टिंगलीच्या स्वरात म्हणाली. ‘मला काही पुळका आलेला नाहीये. पण तू कशाला टिंगल करतेस?’ रोहित करवादला. ‘जा, आपल्यासाठी चहा कर.’ ही शेवटची ऑर्डर म्हणजे भावाने बहिणीला समेटाची संधी दिली होती. हे असे समेट बहिणींना पुष्कळ करावे लागतात! त्याप्रमाणे रुपाली उठली. चहा झाला. आणि ती सारं विसरूनही गेली.

रोहित मात्र काही विसरला नव्हता. एक दिवस रुपाली बाहेर गावी कुठेतरी कामावर असताना तिला बंधुराजांचा मेसेज आला. ‘मला कोरडयांचा नंबर दे ना.’ अरे देवा, आता याला कशाला हवाय त्यांचा नंबर!? रोहितला त्याची ट्रॅव्हल एजन्सीमधली नोकरी सोडायची होती, हे रुपालीला ठाऊक होतं. पण त्यानंतर त्याला काय करायचंय हे मात्र तिला ठाऊक नव्हतं. ते तर रोहितलाही ठाऊक नव्हतं. हेच, ही अशी मंडळीच तर कोरडे यांचे श्रोतृगण! रुपालीला हे कसं कळावं. म्हणजे तिला कळलंच. ती थोडी वैतागली सुद्धा. मिळवतोय त्यातले पैसे भाऊराया या कोरडेंना देणार यानं ती चडफडली. त्याऐवजी तो काय काय करू शकला असता…कुणाकुणाशी बोलू शकला असता! पण असल्या प्रश्नांचा काही उपयोग नसतो. तिनं समीरकडे कोरड्यांचा नंबर मागितला. ‘तुला? तुला हवाय त्यांचा नंबर?’ समीर मेसेजमधून ओरडलाच. ‘अरे, रोहितला हवाय.’ ‘ओह आय सी.’ समीरनं स्मायली आणि नंबर पाठवला.

गोष्टीची सुरवात आता होते. सावधान. आमची रुपाली काय काम करते हे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही. तर रुपाली आहे एक लँडस्केप कन्सल्टंट. म्हणजे तेच, चकाचक ऑफिसेस, गृहप्रकल्प यांच्या आजूबाजूला हिरवळी, कारंजी, शोभिवंत झाडंबिडं लावून देतात ते. अर्थातच रुपालीच्या फोन यादीत त्या सगळ्यांचे नंबर होते जे या विषयाशी संबंधित होते. त्यात एक कोरडेही होते. अर्थातच हे दुसरे कोरडे होते, आणि यांचा व्यवसाय होता…थांबा, आपण बघूया.

तर अशाप्रकारे रुपालीने रोहितला कोरडे यांचा नंबर पाठवला. आणि ती त्याबद्दल विसरून गेली. इकडे रोहितने कोरडे यांना फोन लावला.

‘हॅलो, मला कोरड्यांशी बोलायचं होतं.’

‘बोलतोय.’

‘नमस्कार. मला तुम्हाला भेटायला यायचं होतं. तुमची वेळ हवी होती.’

‘अच्छा. काय काम होतं?’

‘प्रत्यक्ष भेटून सांगितलं तर चालेल का?’

‘अं..हो..हो..चालेल. चालेल. तुमचं नाव काय म्हणालात?’

‘रोहित. रोहित साकवे.’

‘ओके. या ना. कधीही या.’

‘उद्या येऊ चार वाजता?’

‘जरूर. मी तुम्हाला पत्ता पाठवतो.’

झालं. रोहित खूष. त्याला फोन झाल्यापासूनच बरं वाटू लागलं. (हे तर प्रयोगाअंती सिध्द झालेलं आहे. आपण योग्य निर्णय घेतला आहे असं मेंदू ठरवतो आणि स्वतःच स्वतःला बक्षीसही देतो. आपल्याला बरं वाटतं.) त्यानं उत्साहाच्या भरत अजून एका मित्राला, संकेतलाही हे सगळं सांगितलं. संकेत म्हणाला मलाही यायचंय. रोहित म्हणाला, चल. अशाप्रकारे दोघे मित्र एका उन्हाळी रविवारी पत्ता शोधत कोरडे यांच्या घरी दाखल झाले. कोरडे बंगलीच्या दारातच उभे होते. पत्ता नीट सापडला ना वगैरे चौकशा झाल्या. दोघा मित्रांनी माना डोलावल्या. कोरडेंनी आतिथ्यशीलपणे आत चहा सांगितला. आणि आता तिघेही चुळबुळ करत बसून राहिले.

मोठी अवघड शांतता. ‘अशा’ ठिकाणी नेमकं काय करायचं असतं? रोहितचा हा पहिलाच अनुभव. ते आपलं निरीक्षण करत असतील का? कदाचित आपल्याकडे बघूनच एखादी गोष्ट सांगतील. इत्यादी इत्यादी..हे सगळं झालं रोहितच्या मनातलं..

सामने भी तो बेचैनी थी. नेमकं काय विचारायचं असेल? एवढं प्रत्यक्ष भेटून बोलू म्हणाले. तरुण पोरं दिसतात. बऱ्या घरची दिसतात. हल्ली काय सांगता येत नाही. शेतीबीती घेतली असेल..

(बरोबर आहे मंडळी..आता रंग चढू लागला होता.) संकेत दोघांकडेही नखं चावत बघत बसला होता.

शेवटी घसा खाकरून कोरडेंनी बोलण्याची सुरवात केली.

‘काय करता आपण?’

‘मी एका ट्रॅव्हल एजन्सी मधे कामाला आहे. मॅनेजर आहे.’

‘अच्छा.’ कोरडेंसाठी ही ओळख पुरेशी गोंधळात पडणारी होती. या मुलाचं माझाकडे काय काम असेल?

‘ आणि हे?’ हा रोख अर्थातच संकेतकडे होता.

‘मी..आमचं दुकान आहे सायकलींचं, बिबवेवाडीला.’ संकेतनं घाईघाईनं सांगितलं. त्याच्या हातांना जणू असं सांगायचं होतं की आज माझं काही काम नाहीये. आज रोहितचं भविष्य सांगा. त्यात व्यत्यय नको यायला. मी येईन पुन्हा वेळ घेऊन.

‘अस्सं.’ कमाल आहे. कोरडेंच्या मनात आलं. यात अजूनही आपल्याकडे काय काम हे काहीच कळत नाहीय. त्यांनी संभाषण पुढे रेटलं, ‘जमीन वगैरे आहे कुठे?’

हां. इथे काहीतरी सुरवात वाटते आहे. रोहितच्या मनात आलं. आपल्या नशिबात काय जमीनबिमीन आहे की काय कुठे?

‘अजून तरी नाही..’ तो स्मित करत म्हणाला.

कोरडे अजून गोंधळात.

‘आमचं जीवामृत आणि शेणखत प्रचंड चालतंय सध्या. लांबून लांबून लोक येतात विचारायला.’ कोरडेंनी पुढे रेटलं.

जीवामृत आणि शेणखत? रोहितचा चेहेरा कडू झाला. पण त्यानं फार काही दाखवलं नाही. कदाचित जोडधंदा असेल. की आपल्याला न माहित असलेलं या क्षेत्रातलं काहीतरी? संकेत डोळे मोठे करून बघू लागला.

आपण देत असलेल्या कोणत्याच ‘लीड’चा काहीच उपयोग होत नाहीये, हे बघून शेवटी कोरडेंनी थेटपणे विचारलं,

‘काय काम होतं?’

तेवढयात चहा आला. एक बाई सगळ्यांना हातात कप देत होत्या. त्या बहुधा मिसेस कोरडे असाव्यात. रोहितने ताडलं. बोलावं की थांबावं? पण त्यांना सवय असेल. प्रश्न विचारलाच आहे. उत्तर किती टाळणार?

‘थोडं विचारायचं होतं..नोकरी बाबत.’

‘…’

‘म्हणजे सोडावी असा विचार चाललाय. कळत नाहीये.’

‘….. . तशी तर एजन्सी पण घेतात आमच्याकडून आमच्या प्रोडक्टची. चांगला आहे धंदा. कुठे सेल करायचा आहे तुम्हाला?’

‘सेल?’ आता मात्र रोहितला काही कळेना झालं.

‘तुम्हाला आमच्या शेणखताची आणि जीवामृताची एजन्सी हवी आहे का?’

‘काय?’ इथे संकेत भयंकर हसण्याच्या उमाळ्यात होता. पण त्यानं रोखलं.

‘नाही हो. मी भविष्य विचारायला आलो होतो. भविष्य सांगता ना तुम्ही?’

‘भविष्य?’ इथे चहा देऊन परत जायला निघालेल्या बाई थबकल्या. त्यांनी वळून मुलांकडे पाहिलं. नवऱ्याकडे पाहिलं.
भयंकर घोटाळ्याची स्थिती.

‘मला समीरनं तुमचा नंबर दिला. तुम्ही त्यांना सांगता ना भविष्य?’
‘कोण समीर? मला वाटतं काहीतरी घोटाळा झाला आहे.’

‘इतक्या अवघडलेपणी चहा पिणं कोणालाच शक्य होत नव्हतं.
हळूहळू रोहितच्या डोक्यात प्रकाश पडला.

हे आपल्या बहिणीचं कर्तृत्त्व! तिच्या माहितीतले हे खतं पुरवणारे गृहस्थ होते. तिनं ‘त्यांचा’ समजून ‘यांचा’ नंबर आपल्याला दिला…तिला आपण त्यांच्याकडे जायला नकोच आहे.

रोहितच्या मनात बहिणीला बुकलण्याचे विचार येऊ लागले. आधी इथून बाहेर तर पडायला हवं..कपभर चहा पिणं कधीच एवढं अवघड गेलं नव्हतं. कसंबसं संपवून माफी मागून रोहित आणि संकेत निघाले. कोरडेंच्या चेहऱ्यावर अजूनही न कळल्याचे भाव होते. हे काय झालं? आपल्या शेणामृतात हे काय मिसळलं? बायको संशयानं बघत होती ते वेगळंच. काय कुठून कुठून लोक येतात. त्यांनी एकदाचं घराचं फाटक लावून घेतलं.

गाडीला किक घालून रोहित आणि संकेत निघाले आणि गल्लीच्या टोकापाशी येऊन थांबले. इतके हसले इतके हसले की ज्याचं नाव ते. डोळ्यात पाणी येईपर्यंत हसल्यावर त्यांनी रूपालीला फोन केला, ‘तू घरी ये मग बघतो.’

त्यादिवशी रुपाली आल्यावर मग धपाटे आणि अजून एक हसण्याचा राउंड झाला.

आपला भाऊ आज ‘तिथे’ जाऊन आला नाही यानं रूपालीला बरंच वाटलं. आणि एक असाही योगायोग की दुसऱ्याच दिवशी रोहितला आणखी एका ठिकाणी नोकरीसाठी कॉल आला. त्याला ती नोकरी आवडली, त्याचं सिलेक्शन झालं आणि तो इतका बिझी होऊन गेला कि मूळ ज्या कोरडेंकडे जायचं होतं ते राहूनच गेलं. आता अजूनतरी सगळं बरं चालू असल्यामुळे रोहित लगेच तिकडे जाऊया असं काही म्हणत नाहीये. समीरची भयंकर करमणूक झालीच. अजूनही समीर, रोहित आणि संकेत यांना मधूनच कधीतरी असं वाटतं की हे रुपालीनं मुद्दाम केलं असेल की काय? की ही एकप्रकारची फ्रोईडीयन स्लिप? आपला भाऊ ‘तिथे’ जाऊ नये म्हणून? मला तर वाटतं अजून रोहितची ‘वेळ आलेली नाही.’ मग तो योग्य त्या कोरडेंकडे नक्की जाईल. मधल्या मधे शेणखताचा अभ्यास करून आला आणि त्या कोरडेंना या मुलांना चहा पाजावा लागला ही वेगळी गोष्ट!

कोरडे मात्र हा किस्सा रंगवून रंगवून सांगतात. पुढे मागे असाही व्यवसाय करता येईल असा विचार ते करतात. त्यात शेणखतापेक्षा जास्त पैसे मिळतील की काय? हे न पेरलेलं काय बरं उगवून आलं?

कोरडेंचा व्यवसाय अजूनही चांगला चालू आहे. समीर अजूनही त्यांच्याकडे जातो. पण पूर्वीपेक्षा कमी.

रुपालीनं एक दिवस हे सगळं मला सांगितलं. आणि मी तुम्हाला. प्रत्यक्षात यातल्या कोणत्याही व्यक्ती आढळल्या तर योगायोग समजू नका. तुम्हाला यातल्या कोणत्याही कोरडेंचा नंबर लागला तर

…………..

मृणालिनी वनारसे, पुणे
ioraespune@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.