Now Reading
कोन्या गावची मेलिना

कोन्या गावची मेलिना

Menaka Prakashan

कोन्या हे अल्बानियातलं छोटंसं गाव, गावाभोवती गर्द जंगल, एका बाजूला व्हाल्बोना नदी आणि दुसरीकडे आल्प्स पर्वताची सोनेरी बर्फाच्छादित शिखरं. अतिशय देखणं गाव!
त्या गावाची मुखिया होती एक तरुणी, मेलिना.
सात वर्षांपूर्वी मेलिना अगदी सर्वसामान्य मुलगी होती. तिचे आई-वडील तिच्या लहानपणीच निवर्तल्यामुळे ती मावशीच्या घरी राही. तिची मावशी कपडे शिवत असे आणि मावसोबा सुतारकाम करत. कुटुंब खूप सधन नसलं, तरी खाऊनपिऊन सुखी होतं. मेलिनावर त्यांचं प्रेम होतं. ती गावातल्या मुलींबरोबर द्राक्षं, संत्री, पीच, पेअर अशा फळबागांमध्ये फळंतोडणीला जाई आणि सुगीच्या काळात पैसे मिळवे. तिचं एक स्वप्न होतं. तिला स्वतःच्या लग्नात घालायला जाळीदार कापडाचा घोळदार पांढरा शुभ्र झगा आणि हिर्‍यांचा ब्रुच घ्यायचा होता, त्यासाठी खरंतर ती पैसे साठवत होती.
मेलिना तशी अबोलच होती, पण सगळी वाद्यं तिला जन्मतःच जणू वश होती. विशेषतः ती व्हायोलिन वाजवायला लागली, की माकडं उड्या मारायची आणि पक्षी किलबिलायचे थांबत. गावातली तरुण मुलं तिच्या वादनावर गात आणि फेर धरत.

मेलिना आता पंधरा वर्षांची झाली होती. तिच्या शेजारी राहणारा तिचा बालमित्र लिओ आता बराचसा वेळ तिच्याबरोबर घालवू लागला होता. मेलिनालाही तो खूप आवडे. लिओच्या वडलांची छोटीशी फळबाग होती. लिओची आई फळांची लोणची, जाम वगैरे करून शहरात विकायला पाठवे. लिओ अतिशय सुंदर चित्रं काढे आणि कविताही करे. गावात कुणी पाहुणा आला, की त्याच्या सन्मानार्थ लिओ शीघ्र कविता करून देई.
तो कवितांचं पुस्तक लिहून तिथल्या राजाकडे जाणार होता, मग त्याला राजदरबारी नोकरीही मिळाली असती. मेलिनाही त्यासाठी त्याला मदत करायची. त्याच्या कविता ती सुंदर अक्षरात लिहून काढी. त्यावर काढायच्या चित्रांच्या रंगासाठी ती रानात फिरून नाना रंगांची फुलं जमा करी. एकदा लिओनं ते पुस्तक राजाकडे सुपूर्त केलं, की मग तो मेलिनाला रीतसर मागणी घालणार होता.
पण सगळं सुरळीत चाललं, तर मग कहाणी कसली…

एकदा गावात तार्तारांची टोळी आली आणि त्यांनी सगळ्या गावकर्‍यांना मारून टाकलं. नेमकी मेलिना जंगलात फुलं गोळा करायला गेली होती म्हणून वाचली. टोळीवाले सगळं लुटून, वर आग लावून गेले होते. त्यामुळे सगळं गाव बेचिराख झालं होतं. फारसं कुणीही उरलं नव्हतं. मेलिनानं उरलं सुरलं सामान गोळा केलं आणि त्या भकास गावात ती एकटीच राहायला लागली. अनेकदा ती मोठ्यांदा रडे. एकदा अशीच तिनं व्हाल्बोनात जीव देण्यासाठी उडी मारली खरी, पण तिला उत्तम पोहता येत असल्यामुळे तो प्रयत्न विफलच झाला.
असंच काहीतरी आवरता आवरता तिला तिचं व्हायोलिन सापडलं. हल्लेखोरांच्या तावडीतून ते कसं की काय अगदी सुरक्षित राहिलं होतं.
मग मात्र मेलिना पुरती सावरली, तिनं गावभर फिरून घरटी अशीच तिच्यासारखी जिवंत राहिलेली एखाददोन माणसं होती, त्यांना एकत्र केलं, धीर दिला. पण लिओचा मात्र काहीच पत्ता नव्हता. हळूहळू ते दहा-पंधरा माणसांचं गाव सुरू झालं.
त्यानंतर एक-दोन वर्षांतच आणखी काही लोक आले आणि गाव गजबजायलाही लागलं.
मात्र मेलिनाकडेच गावाचं मुखियापद आलं. त्या पदाच्या जबाबदार्‍या, शिवाय लिओची फळबाग आता तिच्याच मालकीची होती. ती भरपूर कष्ट करी. लिओच्या कविता आठवतील तशा पूर्ण करून त्याचं पुस्तकाचं स्वप्न पूर्ण करायचं तिनं ठरवलं होतं.

मुखिया म्हणून तर ती फारच उत्तम काम करत असे. गावातले रस्तेबांधणी, मुला-मुलींसाठी शिकण्याची व्यवस्था, व्यापारी, कर वसुली… कुठे म्हणून ती कमी पडत नसे. एवढंच कशाला, परत अशी लुटारू टोळी आली, तर संरक्षण व्यवस्था म्हणून तिनं गावातल्या सगळ्या मुला-मुलींना संरक्षणाचे आणि गनिमी काव्याचे धडे दिले होते. लूट एकदम होत नाही, अगोदर टेहळणी होते, हे लक्षात घेऊन मेलिना परक्या व्यापार्‍यांचीसुद्धा जातीनं कडक तपासणी करवून घेई.
गावालाही तिचा सार्थ अभिमान होता. पाहता पाहता सात वर्षं उलटली. आता ती बावीस वर्षांची झाली होती, तिच्या बरोबरीच्या मुली एक-दोन मुलांच्या आयाही झाल्या होत्या. मेलिनाला आताशा लिओची खूप आठवण येत असे. ब्रेड भाजताना, केक करताना, आपल्याही आजूबाजूला आपली मुलं खेळत ओरडत असावीत, असं तिला सारखं वाटे. पण आता मेलिना गावची मुखिया होती. गावातल्या सर्वांना तिच्याबद्दल आदर वाटे, पण अशी खंबीर मुखिया आपली प्रेमिका व्हावी, असं कुणाला वाटणार!

आणि मग एके दिवशी तो राजदूत आला. तिथल्या राजाच्या कानांवर मेलिनाच्या खंद्या नेतृत्वाची कीर्ती पोचली होती. त्याला त्याच्या दरबारात तिचा सत्कार करायचा होता. त्यानं एक राजदूत कोन्या गावात पाठवला. अर्थातच त्या राजदूताला गावात सहजी प्रवेश मिळालाच नाही. बर्‍याच प्रकारच्या खातरजमेनंतर गावातल्या पोरांच्या पलटणीसह राजदूत गावाच्या मध्यवर्ती चौकात आला. बरेच गावकरी जमलेत असं पाहून त्या राजदूतानं राजाचं पत्र वाचून दाखवलं. खरंतर तिथे मेलिना नव्हतीच आणि तिला बोलवावं, हेही कुणाला अगोदर सुचलं नाही. पण पत्रातला मजकूर कळल्यावर सगळ्यांना खूपच आनंद झाला. ‘मेलिनाला बोलवा, मेलिना की जय!’ असा एकच गिल्ला झाला.

मेलिना तिच्या घराच्या ओसरीत तिच्या एका मैत्रिणीच्या बाळाला घेऊन बसली होती. तिच्या मैत्रिणीला जुळी मुलं असल्यामुळे त्यातलं एक मूल कायम मेलिनाकडे असे. तिच्या नावाचा गजर ऐकून ती घराबाहेर आली. सगळे तिच्या घराकडेच येत होते. राजदूतानं तिला आदबीनं वाकून नमस्कार केला आणि राजाचं पत्र तिला पुन्हा वाचून दाखवलं. पुढच्या महिन्यात होणार्‍यां राजपुत्राच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यातल्या गुणी माणसांचे सत्कार केले जाणार होते, त्यात मेलिनाचंही नाव होतं. मेलिनालाही खूप आनंद झाला. राजदूतानं तिला सांगितलं, की तिनं गावातल्या पाच माणसांबरोबर समारंभाच्या आदल्या दिवशी पोचायचं आहे. तिची आणि त्या माणसांची सगळी व्यवस्था केलेली असेल. बक्षीस घ्यायला जाताना मेलिनाला राजदरबाराची शाल घ्यावी लागेल आणि प्रत्येक दहा पावलांवर राजाला लवून नमस्कार करावा लागेल आणि बक्षीस घेतल्यावर राजाला पाठ न दाखवता मागे चालत जाऊन बसावं लागेल.
त्या वाढदिवसाच्या रात्री होणार्‍या नाचगाणी आणि भोजन समारंभातही तिला आणि तिच्याबरोबर येणार्‍या मंडळींना भाग घ्यायची परवानगी होती. एवढं सांगून राजदूत म्हणाला, ‘‘ राजाला चुकून जरी तुझी पाठ दिसली, तरी सगळा जन्म तुरुंगातच काढावा लागेल. एवढं सांगून तो घोडा वळवून जायला निघाला.
मेलिना त्याला म्हणाली, ‘‘दादा, अहो किती लांबून आलाय तुम्ही! थोडं दूध-पाणी घ्या आणि जेवून झोपा आता रात्री आणि मग सकाळी लवकर उठून जा.’’
राजदूत खरंच खूप थकला होता. पहाटेपासूनच बाहेर पडला होता. ही पहाडी चढून दमही लागलेला, शिवाय भूक पण लागली होती. पण तो पडला राजाचा शिपाई. तो गुरकावून म्हणाला, ‘‘ठीक आहे, दे काही तरी लवकर खायला म्हणजे मला रात्रीच्या आत राजवाड्यात पोचता येईल.’’ मेलिनानं त्याला हातपाय धुवायला गरम पाणी दिलं आणि त्याच्यासमोर कॉफी आणि फळं ठेवली. राजदूताचं एवढं प्रेमानं स्वागत कधीच कुणी केलं नव्हतं. थोड्याच वेळात त्याच्यासमोर साधं आणि रुचकर जेवण आलं. तो पोटभर जेवला आणि त्याला झोपही लागली. त्याला जाग आली, तेव्हा दुपार उलटून गेली होती. त्याच्या घोड्याला खराराही झाला होता. त्यांच्या भागात संध्याकाळीच काळोख व्हायला सुरुवात होई. रात्री पहाडी उतरणं धोक्याचं होतं. आता तिथे राहावं लागणार. मेलिना पडली तरुण, एकटी राहणारी अविवाहित मुलगी, तिच्याकडे कसं राहणार. थंडीही खूप होती, बाहेर झोपणं शक्य नव्हतं. पण मेलिनानं त्याची व्यवस्था तिच्या मैत्रिणीच्या घरी केलेलीच होती. तिची मैत्रीण तिच्या घरी येणार होती आणि त्या मैत्रिणीच्या घरी दोन बापई झोपले असते. हा राजदूत मेलिनाच्या शांत, शहाण्या आणि अगत्यशील स्वभावानं अगदी भारावून गेला. दुसर्‍या दिवशी पहाटेच तो गावातून राजधानीकडे जायला निघाला, पण त्याचं हृदय त्यानं मेलिनाकडेच ठेवलं होतं. पण तिची परत भेट व्हायची, तर महिनाभर वाट पाहावी लागणार होती.

इकडे गावकरी महिलांनी उत्साहानं तिच्या समारंभाच्या ड्रेसवर भरतकाम करायला सुरुवात केली. नवी बांबूची टोपी विणली आणि त्यावर सुंदर पिसं खोचली. शेवटी एकदाचा जाण्याचा दिवस उजाडला. तिच्याबरोबर जाण्यासाठी घोडे आणि पाच मंडळीही तयार झाली. चार पुरुष आणि मेलिनाच्या सोबतीला एक मावशी. त्याचबरोबर राजवाड्यात भेटी देण्यासाठी फळांच्या मोठ्या करंड्या, जामच्या बरण्या, द्राक्षांच्या वाईनच्या बाटल्या, भरतकाम केलेल्या चादरी, निवडक रोपं… त्या सामानासाठीच एक घोडा लागला. मंडळी मजल दर मजल करत राजधानीत पोचली. मोठा शामियाना उभारलेला होता. ठिकठिकाणी फुलांनी लगडलेल्या वेली, इकडून तिकडे लगबगीनं जाणारे रेशमी भरजरी कपडे घातलेले स्त्री-पुरुष, गालिचे… मेलिना आणि मंडळी तर दबकूनच गेली. कुणाला विचारावं… तेवढ्यात तो राजदूत दिसला, त्यानं त्या सर्वांना त्यांचं क्षेमकुशल विचारून त्यांची राहण्याची जागा दाखवली. अबब! केवढा तो महाल… त्या फुलदाण्या, ती झुंबरं… केवढे तरी पदार्थ. त्यातले कितीतरी तर त्यांना माहितीसुद्धा नव्हते. मंडळी थकलेली असल्यामुळे थोडंसं खाऊन त्यांनी लगेच त्या मऊमऊ गाद्यांवर अंग टाकलं. सगळेच एकदम खूष झाले होते. मेलिनाचं कौतुक चाललं होतं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. बाप रे! उग्र दिसणारे राजाचे चार शिपाई आत आले. त्यांच्यामागून एक उंची कपडे घातलेली एक प्रौढ स्त्री, तिच्या मुकुटामुळे ती राजघराण्यातली असणार, हे कळत होतं. तिच्याबरोबर आलेल्या शिपायांकडे आलेल्या मंडळींसाठी नजराणे होते आणि मेलिनासा़ठी खास समारंभाचा रत्नजडित पोशाख. मेलिनानं तिला राजदूतानं शिकवल्याप्रमाणे तीनदा लवून नमस्कार केला. ती स्त्री म्हणजे त्या राज्याची महाराणी होती. तिलाही या मंडळींनी आणलेल्या भेटी खूप आवडल्या. महाराणी बाहेर पडल्यानंतर एक शिपाई आत आला आणि त्यानं मेलिनाच्या हातात एक पत्र दिलं. त्या महाराणीनं मेलिनाला तिच्या महालात रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रण दिलं होतं.

खरंतर संध्याकाळ सरतच आली होती आणि दुपारचे जेवणच जड झालं होतं. पण अर्थातच राणीचा हुकूम ती कसा मोडणार. ती तयार झाली आणि पाहते तर काय, स्वतः राजदूतच तिला न्यायला आला होता. ती राणीच्या महालात पोचली, तर राजदूतही एका सिंहासनावर बसलेला, तो काही साधासुधा राजदूत नव्हता, तो होता राजाचा मोठा मुलगा, युवराज रूस्तुम… खरंतर मेलिनापेक्षा बराच मोठा होता आणि त्याला त्याची राणी म्हणून मेलिना खूप आवडली होती. राजा-राणीनं मेलिनाला विचारलं. ती तर भांबावूनच गेली होती. तिनं चाचरत विचारलं, ‘‘लग्नानंतर मला इथेच यावं लागेल ना?’’ ती पुढे म्हणाली, ‘‘मी गावाची मुखिया आहे. कुणाला तरी शिकवून तयार केल्याशिवाय मला गाव सोडता येणार नाही.’’
हे काय नवीनच! राजपुत्र रूस्तुमशी लग्न करायला किती तरी राजकन्या तयार होत्या. त्यात ही साधीसुधी मुलगी अटी घालतेय म्हणजे काय!
पण राजा म्हणाला, ‘‘मान्य आहे, एखाद्या कुणा होतकरू तरुणाला करू की तुझ्या गावचा मुखिया. तू शिकव त्याला!’’ मेलिना काही बोलली नाही. जबाबदारीचं पद इतकं साधं नसतं.
त्यांचं हे बोलणं सुरू असताना, त्यांच्या दरबारचा चित्रकार आल्याची वर्दी आली आणि काय आश्चर्य. तो चित्रकार म्हणजे तिचा बालमित्र लिओ होता. तोही मेलिनाकडे पाहून आनंदानं हसला.

जेवण झाल्यानंतर लिओ मेलिनाच्या कक्षात गेला आणि तिला त्यानं सांगितलं की तार्ताराच्या तावडीतून सुटून तो कसाबसा राजधानीत पोचला होता आणि खूप प्रयत्नानं तो राजदरबारी चित्रकार आणि
कवी बनला होता. तो मेलिनाला म्हणाला, ‘‘मी आता गावात येऊन तुला मागणी घालणारच होतो. पण तू इकडे आलीस. आता हा समारंभ संपला, की आपण लग्न करू.’’ मेलिनालाही खरंतर लिओ खूप आवडे, तिचा बालमित्र होता तो. पण तिला काय बोलावं हे सुचेना. आजच युवराज्ञी होण्याची पण संधी आली होती. काय करावं… कुणाला विचारावं… रूस्तुमशी लग्न केलं, तर लिओ खूप दुःखी झाला असता. आणि रुस्तुमला नाकारून लिओशी लग्न केलं, तर त्याला कदाचित नोकरी गमवावी लागली असती आणि राजाचा रोषही.

राजा तसा चांगला दिसत होता, पण मनाविरुद्ध गोष्टी त्यानं खपवून घेतल्या नसत्या. तिनं मनाशी काहीएक विचार केला. सकाळी उठून राजाला सगळं सांगायचं, असं तिनं ठरवलं. इकडे तोपर्यंत लिओलाही राजपुत्राचं मेलिनाशी लग्न ठरल्याची बातमी कळली होती, पण खरं प्रेम स्वार्थी नसतं. मात्र त्याच्या प्रेमिकेला त्याला लवून सलाम करावा लागणार होता. पण ती खूप सुखी होणार होती. सारं क्लेशदायकच होतं. शेवटी लिओनं राजधानी सोडून दूर जायचं ठरवलं. अर्थातच समारंभ संपल्याशिवाय जाणं शक्य नव्हतं.

मेलिनाला राजाकडे पोचता आलं नाही, कारण सकाळी खूप माणसं जमली होती. तिच्या सत्काराच्या वेळी तिचं आणि रुस्तुमचं लग्न ठरल्याची बातमी जाहीर करण्यात आली. तिला मोठ्या सन्मानानं रूस्तुमच्या शेजारी बसवण्यात आलं. तिथून तिला लिओ दिसत होता, त्याच्या डोळ्यांतलं दुःखही तिला जाणवत होतं. दुपारच्या जेवणाच्या वेळी लिओनं युवराज्ञीच्या सन्मानार्थ कविता वाचली. त्यात लिहिलं होतं, युवराज्ञीनं भूतकाळ विसरून नव्या भविष्यकाळ स्वीकारावा. गाव विसरून राजधानीचा मान घ्यावा. समारंभ संपल्याक्षणी लिओ घोड्यावर स्वार झाला, काही अंतर गेल्यानंतर मागे त्याला दोन घोडे दिसले. राजपुत्र रूस्तुम आणि मेलिना येत होते. रूस्तुम त्याला म्हणाला, ‘‘जिंदादिल मेलिनाच्या भेकड मित्रा, पळून कसला जातो आहेस. हिंमत दाखव आणि माझ्याशी युद्ध कर आणि मेलिनाला जिंकून घे.’’

लिओ हात जोडून म्हणाला, ‘‘महाराज, मेलिना काही निर्जीव वस्तू नाही, तिला युद्धात जिंकायला.’’ त्यावर राजपुत्र हसला आणि म्हणाला, ‘‘एवढं कळतंय, तर तिच्या भावनांचा विचारही न करता पळतो आहेस ते.’’ मेलिना पुढे झाली, तिनं लिओचा हात धरला. ती म्हणाली, ‘‘तुलाच माझा नवरा मानलं आहे रे मी…’’
आणि मग राजकुमार रूस्तुम मागे वळला आणि त्याच्या घोड्याला टाच मारून निघून गेला.
(अल्बेनिअन लोककथेवर आधारित)

– मंजूषा देशपांडे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.