Now Reading
कॉलेजच्या वाटेवरूवन…

कॉलेजच्या वाटेवरूवन…

Menaka Prakashan

काय योगायोग आहे पाहा. वीस वर्षांपूर्वी ज्या कॉलेेजात शिकलो, त्याच कॉलेजमध्ये कॉन्फरन्सच्या निमित्तानं जात होतो. खरंतर निमंत्रण मिळाल्यापासूनच मनात हुरहुर दाटून आली होती. गावाशेजारचं हे कॉलेज मुद्दाम बघण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. काय बदल झाला असेल? जुने प्राध्यापक अजूनही असतील का? कॅम्पसमधलं ते चिंचेचं झाड, नि त्याभोवतीचा पार… सगळं आठवत होतं. गावाकडे जाण्याच्या आनंदापेक्षा कॉलेजला जाण्याच्या विचारानं मन सैरभैर झालं होतं.

गावाहून चालत तीन किलोमीटर धसईला यायचं. तिथून सकाळी साडेसातची बस असायची. धसईलाच सगळी बस भरून जाई. सकाळच्या अंघोळीच्या साबणापेक्षा घामाचाच वास दरवळत राही. त्यातही नाकाला एखाद्या गजर्‍याचा वास सापडे. मन मोहून जाई. अचानक दाबलेल्या ब्रेकनं उगीच मनात भीती दाटून येई. नव्या स्पर्शाची, नव्या ऊर्मीची जाणीव होई. मग मुद्दाम जागा राखून ठेवायची. आल्यावर बसायला जागा द्यायची. आपण दिलेल्या जागेवर बसणं हाच मोठेपणा वाटे. बस इतकंच! खिडकीतून पळणारी झाडं पाहायचं भान नसे. मित्रांमध्ये नुसता रमत असल्याचा भास करायचा. मन मात्र उधाणलेलं!

मग फाट्यावर बस थांबे. तिथून ही मुंग्यांची रांग लागे. पुन्हा दीड किलोमीटर पायपीट. पण या ‘सोबत’ चालण्यात प्रचंड ऊर्जा मिळे. कुणाचा कालचा ड्रेस आजही पाहून कळे, की एकच ड्रेस आहे बिचार्‍याला. झिजलेली स्लिपर लपवण्यासाठी काहीजण मुद्दाम मागे राहत. पावसाळा असेल तर मोठीच गंमत! पाऊस आला तर झाडाखाली थांबायचं. दोन वह्या, एखादं पुस्तक छत्रीवाल्या मुलीकडे द्यायचं, भिजू नये म्हणून. पाऊस थांबायचा, पण मन मात्र भिजू लागायचं. पुस्तकं कोरडी राहायची, पण नजरा मात्र भिजायच्या. उन्हाळ्यात याच झाडाखाली मित्राची… नाहीतर मित्राच्या नावानं वाट पाहायची. फक्त आलीये की नाही खात्री करायची. दिसली की सरळ वाटेला लागायचं. दिवस छान सुरू व्हायचा. झाड डवरलेलं असे. मग मनही डवरून जाई. प्रेमाच्या फुलांनी, आनंदाच्या वासानं!

डांबरीवर असतानाच घंटा वाजे. सगळेजण पळू लागत. व्हरांड्यात येईपर्यंत ‘या कुन्देन्दुतुषारहारधवला…’ ही प्रार्थना सुरू होई. प्रार्थना संपली की सगळी वर्गामध्ये नाहीशी होत. रस्त्यातून जाणार्‍यानं पाहिलं तर कुणाला वाटावं, की वर्गात मुलंच नाहीत. शांतिनिकेतन अवतरे!

एखाद्या वर्गातून अख्खा बालकवी शिकवला जाई. तर कधी पृथ्वीचं प्रेमगीत. कधी तेंडुलकरांची ‘रात्र’ आणि इतर एकांकिका… तर कधी ‘त्रिदल’. एखाद्या वर्गात मराठ्यांचा इतिहास, दुसर्‍या वर्गात भारतीय तत्त्वज्ञान, तर कधी कौटिल्याचं अर्थशास्त्र. सगळी पाखरं ज्ञानाची ताकद पंखात भरत असताना दिसायची. प्राध्यापक मुलांच्या डोळ्यांत स्वप्नं पेरत. खिडकीतून आभाळाकडे बोट दाखवत खुणावत.

जगण्याची कल्पना देत. कल्पनेतून वास्तवात आणत. मुला-मुलींच्या गरीब परिस्थितीला जिद्दीचं बळ देत. मग आम्ही मुलं भारावून जायचो. नव्या स्पर्धा, नव्या वाटा शोधत, विचारत राहायचो. प्राध्यापक न्याहाळायचे. जवळ करायचे. खांद्यावर हात ठेवून आत्मविश्‍वास वाढवायचे. ग्रंथालयात नेऊन पुस्तकं निवडून देत. स्वतःच्या नावावर चार-दोन पुस्तकं वाचायला देत. प्राध्यापकांनी जवळ करणं, मार्गदर्शन करणं, हे त्या काळातलं स्टेटस होतं. या स्टेटसपुढे टाय, बेल्ट, शूज, बाईक, रिस्टवॉच यांना काडीची किंमत नव्हती. सरांच्या हाताचा स्पर्श खांद्याला झाला, की मुला-मुलींच्या मनातल्या चंचल भावना पार वितळून जात. प्रत्येकाला आयुष्याचं भान येई. मग ‘श्रावण बरसात’ येई. वक्तृत्व स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, नाट्यस्पर्धा, अर्ध मॅरेथॉन, वेटलिफ्टिन्ग, ग्लास पेन्टिन्ग… एक ना अनेक… सगळेजण कशात नि कशात गुंतत जात. बक्षीस मिळवणार्‍यांची नावं मैदानातल्या बोर्डावर लिहिली जात. त्याला किंवा तिला अख्खं कॉलेज बघत राही. या बघणार्‍या नजरा आणखी प्रयत्न, नवा अभ्यास करायचं बळ देत.

मग अचानक परीक्षा अंगावर आल्यासारख्या यायच्या. घरची शेतीची कामं सुरू झालेली असायची. एखाददुसरा प्रसंग घडलेला असे. कॉलेजला दांडी व्हायची. नेमक्या नोट्स अपुर्‍या असायच्या. पण जोडीदार समजून घ्यायचे. एखादी आपली वही हळूच काढून द्यायची. ‘थँक यू’ म्हणायची औपचारिकता नव्हती. त्याच्या चेहर्‍यावर पसरलेला निर्धास्तपणाचा आनंदच सारं काही सांगून जायचा. घरचे किटकिट करायचे. रोज रोज काय आहे कॉलेजला… सात नि सात चौदा रुपयांचा चुराडा! एक दिवस एकानं, एक दिवस दुसर्‍यानं जायचं. अगोदरची पिढी व्यवहार सांभाळत सल्ले द्यायची. पण कॉलेजात गेल्यावर आपण भारावून जातो, नवी स्वप्नं पाहतो, आपण नवीन होऊन जातो, हे कसं सांगणार घरच्यांना! बांधावरच्या वाळलेल्या गवताकडे पाहून मन उदास होई… सखा वेचायला येणार्‍या पाखराचं कौतुक वाटत राही. कुठून आली ही पाखरं, सखा वेचून खायला… आपण पाखरू व्हायचं… कॉलेजमधल्या शेतात जायचं… तिथले ज्ञानाचे सगळे दाणे टिपायचे. मग उंच उडायचं आकाशात. बांधावरून उठायचं. घरी यायचं. मायनं धुतलेल्या कपड्याला उशीखाली दाबून घडी करायची. उद्या कॉलेजला जायचंच, असं ठरवून गाढ झोपायचं.

पहिल्या सत्राचा निकाल लागल्यावर पुन्हा मन अभ्यासाकडे वळे. दुसर्‍या सत्रातली क्रीडास्पर्धा अंगातली रग तपासायला बरी पडे. पहिल्या सत्रात कमी गुण मिळवणारे क्रीडास्पर्धेत त्याची भर काढत. नव्या हिरोंची ओळख कॉलेजला होई. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस घेताना प्राचार्यांकडे अभिमानानं बघता येई. प्राचार्य मायेनं बघत. ही नजर कित्येकांना आयुष्य देऊन गेली.

एखाद्या विभागाचा शुभारंभ, नाहीतर स्नेहसंमेलन मुलांच्या सांस्कृतिक चळवळीला आव्हान देण्यासाठी असे. लोककला जागृत होत. उपलब्ध साहित्यात सादरीकरण होई. प्रत्येकातला लपलेला कलाकार उजळून निघे. प्रत्येकाला आपापली जागा कळे नि वर्षाची कसोटी पाहणारी वार्षिक परीक्षा भसकन् जाहीर होई. मग सगळेजण शेतावर, मळ्यावर जाऊन झाडाखाली अभ्यास करताना दिसायचे. मुलींना घरातली कामं उरकूनच अभ्यास करायला वेळ काढावा लागे. प्रत्येकजण प्रत्येक घटकाचा अभ्यास करी, कारण कोणत्या घटकावर कोणता प्रश्‍न येईल, याचा नेम नव्हता. मग महिन्याभरानंतर एकदम परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दिवशी भेट होई. भेटायची, बोलायची इच्छा असे, पण परीक्षेमुळे मनावर ताणही असे. मात्र चेहरे पाहिले, तरी मन प्रसन्न होई. त्याच प्रसन्न मनानं परीक्षेचे पेपर भरभरून लिहायचो. पेपर तीन वाजता सुटे. निघताना खाल्लेली भाकरी पचलेली असे. हातगाडीवरचा वडापाव पोटात अग्नी भडकवे. हात खिशात जाई. तिकिटाचे पैसे काढून उरलेल्या पाच रुपयांत वडापाव खायचा. तिथेच मगभर पाणी प्यायचं. पाण्यानं पाव फुगायचा, पोट भरल्यासारखं वाटे. फाट्यापर्यंत पेपरच्या गप्पा रंगायच्या, पण नजर मात्र काहीतरी शोधत असे. परीक्षा संपल्यावर सुट्टी लागणार, मग कसल्या आल्यात गाठीभेटी. मनात आलेले विचार झटकून टाकायचे. पुन्हा दुसर्‍या पेपराचा विचार करत लवकर घरी जाण्यासाठी बसची वाट बघत राहायचं.

घरी पोचल्यावर माय कोर्‍या चहाचा कप पुढे ठेवी. ती चहासाठी थांबलेली असे. दुरडीतली भाकरी पुढ्यात ठेवी. मग वडापाव खाल्ल्याची लाज वाटे. पाच रुपयांचा भार टाकला आणखी घरच्यांवर. आतडं ढवळून निघे. पोटात भाकरी जाईना होई. माय विचारायची, ‘‘कारं, भाकरी गोड नाय लागत का? जागरणामुळे तोंडाची चव गेलीय का? आज कोरड्यासाला कायीच नवतं, उद्या करीन काहीतरी…’’ तिच्या बोलण्यानं आपल्याला रडू येईल की काय, असं वाटे म्हणून भाकरी नि गुळाचा दुमटा करून उंबर्‍यावर यायचो. मायला अधिकच वाईट वाटे. तीच डोळे पदरानं पुसायची. डोेळे पुसता पुसता म्हणायची, ‘‘शीक बाबा. तू तरी शीक. जल्माचं पांग फेड बाबा.’’ म्हणत दुरडी उचलायची नि कामात गुंतून जायची.

मग परीक्षेचा शेवटचा पेपर संपला, की सार्‍या वर्षाची क्षणचित्रं डोळ्यांसमोरून तरळून जात. प्राचार्य प्रत्येक वर्गात येत. नव्या वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया सांगत. करीअरचे नवे मार्ग सांगत. पुन्हा नव्या वर्षाच्या प्रवेशासाठी सगळेजण सुट्टीत रमत. पण चार-आठ दिवस झाले, की घरच्या कटकटी नकोशा होत. गार्‍हाण्यांना तोटा नव्हता. सगळंच आभाळ फाटलेलं. कुणी कुठे ठिगळ लावायचं? एकजण दुसर्‍यावर खापर फोडे. बोलाचाली होई. अबोला वाढे. प्रेमाचा गुलकंद राहूद्या, किमान गुलाबाच्या पाकळ्या तरी दिसूद्या जीवनात असं वाटे… मग कॉलेजची तीव्र आठवण होई. स्वप्नांच्या झुल्यावर झोके घेण्याची ती हक्काची जागा वाटे. उपाशी राहावं लागलं तरी चालेल, पण कॉलेजमध्ये जायला मिळावं असं वाटे. आनंदी जगण्याचा एक कोपरा होता कॉलेज. चिंचेचं झाड, त्याखालचा पार, चिंचेवरचे बगळे नि त्यांची विष्ठा, पोरींचा घोळका, पोरांचा गोंगाट नि प्राचार्य, प्राध्यापकांचं आदर्श जीवनाचं पोषण करत होतं. मग घरच्यापेक्षा कॉलेजच आवडे.

मी मुद्दाम फाट्यावरच उतरलो. पूर्वी याच फाट्यावरून पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र रिक्षा स्टॅन्ड झालाय. मी रिक्षाची रांग ओलांडत पुढे निघालो. रस्त्याच्या दुतर्फा बंगले, घरं, दुकानं, सलून, आरोग्य केंद्रं दिसू लागली. क्षणभर चुकल्यासारखं वाटलं, पण रस्ता तोच होता. माझे पाय पुढेच पडत होते. वीस वर्षांपूर्वी गाव, मुख्य रस्ता यांपासून तुटलेलं हे कॉलेज आज सुविधांनी जोडलं गेलंय. मी आठवणींची झाडं शोधत होतो, पण जुनं एकही झाड दिसलं नाही. शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमातली लहान रोपटी तेवढी दिसली. मन उदास झालं. क्षणभर वाटलं, उन्हाळ्याच्या दिवसांत जाणारी-येणारी मुलं सावलीला कुठे थांबतील? मग विचार केला, की अरे, रस्त्यातून बहुतेक मुलं मोटारसायकलींवरून जाताहेत. मी उगीच हळहळलो. आणखी थोडं पुढे आल्यावर मुलींचा एक घोळका आला. जवळ येईपर्यंत मुली आपल्याच नादात होत्या. मी पाहिलं तर तेच डोळे, तीच नजर, तेच भित्रे भाव, तेच वय… काळ बदलला होता, तरी काही गोष्टी तशाच राहिल्या होत्या. माझ्या सफारी नि वाढलेल्या पोटाकडे पाहून, ‘हे कोण चाललेत’ असं म्हणाल्या. मला तो आवाजही ओळखीचा वाटला. मी स्वतःला सावरलं, पण मन उल्हसित झालं होतं.

मला वाटलं होतं, एखादे प्राध्यापक भेटतील रस्त्यातून जाताना. ते ओळखतील का आपल्याला? आपणच ओळख देऊ त्यांना. सांगू त्यांना आठवणी… पण कुणीच दिसलं नाही.

वळणावर आलो तर कॉलेजची इमारत दिसली नि छातीत धस्स झालं. वाटलं, आज सगळेजण कॉलेजला जमणार आहेत. कोण कुठे असेल? ओळखतील का सर्वांना सर्वजण? सगळ्यांची स्वप्नं पूर्ण झाली असतील का? अजूनही कुणाला आठवण येत असेल का? ते लांब केस, नि लांब वेणी. चालताना कमरेवरून इकडून तिकडे, इकडून तिकडे व्हायची… अबोलीचा गजरा नि चालताना यायचा पैंजणाचा आवाज. वाजतील का ते पैंजण? माझी पावलं पैंजणांच्या तालावर पडू लागली. डावीकडे भव्य गृहनिर्माण उद्योग उभारलेला दिसला. राजस्थानातल्या राजवाड्याप्रमाणे रचना पाहून क्षणभर उभा राहिलो. आता कॉलेज मीटरभर अंतरावर होतं. कम्पाऊन्डच्या भिंतीमुळे नजर पोचत नव्हती. उंच झाडांमधून उंच-लांब इमारत दिसली. जवळ गेल्यावर भलंमोठं गेट, छोट्या गेटवर वॉचमन नि मध्यावर हिरवी बाग दिसली…

याच गेटच्या ठिकाणी प्राचार्य उभे राहत. तीन-चार लेक्चरनंतर पळून जाणार्‍या मुलांना पुन्हा वर्गात आणून बसवत. प्राचार्यपदाची झूल अंगावरची उतरवून ते मुलांचे पालक व्हायचे. त्या जागेवर क्षणभर उभा राहिलो नि कॉलेजकडेे पाहता पाहता नतमस्तक झालो.

यशवंत सुरोशे, मुरबाड
मोबाईल : ९६२३१ ६९४०३

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.