Now Reading
कॉफी

कॉफी

Menaka Prakashan

‘‘हॅलो बाई, कल्पनाचा नवरा वारला, हे खरयं का हो?’’
‘‘हो. परवा वारला, फार वाईट झालं बाई.’’
‘‘तुम्ही बोलल्या नाहीत पण. तुम्ही गेला होता का तिच्याकडे?’’
‘‘नाही ना. तुम्हाला सांगायचं लक्षात आलं नाही. उद्या सुट्टी आहे, तर सगळ्याजणी जायचं का?’’
‘‘चालेल, गाडी करून जावं लागेल. मी बाकीच्यांना विचारून ठरवते.’’ दिव्यानं मोबाईल बाजूला केला. क्षणभर तिला बाईंचा राग आला होता. इतक्या शेजारी राहतोय. मैत्रिणीचा नवरा वारलाय, याचं दोन दिवसांनी कळतयं, तेही दूरच्या मैत्रिणीकडून! पण धुसफूस करायची ही वेळ नाही म्हणून दिव्यानं बाईंना फोन लावला. बाईही मातीला गेल्या नव्हत्या, हे कळल्यावर दिव्याच्या रागाचा पारा खाली आला होता.

दुसर्‍या दिवशी कॉलनीतल्या पाच-सहाजणी आवरून झाल्यावर नाक्यावर गेल्या. गाडी ठरवली. गाडीत बसल्यावर सगळ्यांनाच कल्पनाचा उमाळा आला.
‘‘कसा काय गेला हो तिचा नवरा?’’
‘‘कावीळ झाली होती म्हणतात. बरेच दिवस कावीळ पोटात राहिली सांगतात.’’
‘‘फार वाईट झाल गं. दोघं अजून तिशीचे नाहीत. एकाच वर्षातला जन्म आहे दोघांचा. पोरंही लहान आहेत अजून.
‘‘कल्पनाचं वाईट वाटत. एकटीनं एवढं आयुष्य काढायचं म्हणजे… बाईच्या जातीचं काही खरं नाही.’’
‘‘तशी कल्पना डगमगणारी नाही. ती सावरेल पटकन. ती एकाच गोष्टीचा फार विचार करत बसत नाही.’’
‘‘खरयं, बाईंच्यासोबत तर चार वर्ष राहिलीये. बाईंना तिच्याविषयी माहिती असेल.’’
‘‘तिला आनंदानं जगायला आवडतं. फार गंभीर विचार करून, चौकोनी चेहरा ठेवून कुंथत जगायला आवडत नाही म्हणे. आहे तोवर घ्या जगून, असं म्हणत असते नेहमी. आम्ही दोघी दुपारच्या जेवणाच्या वेळी एकत्र आलो, की खिदळतच असतो.’’
कुणीतरी ‘शू…!’ म्हणून तोंडावर बोट ठेवलं. ड्रायव्हरकडे बोट दाखवत सगळ्यांना मोजकं बोलण्याचा इशारा केला. मग बोलण्याची संगती तुटली ती तुटलीच. गाडी कल्पनाच्या गावाकडे वळली. मुख्य रस्त्यापासून तीन-चार किलोमीटर आतमध्ये तिचं गाव होतं. गाव कसल, पंधरा-सोळा घरांचा पाडा होता. गाव विस्थापित झाल्यावर कुटुंबांची पांगापांग झाली. त्यातली काही घरं, पाणी, जमीन आणि रस्ता बघून इथे येऊन ठेकली. तोच हा पाडा. उन्हाळ्यात पाड्यावर जायला रस्ता तरी होता. कच्चा, खडीचा. पण पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून, तर कधी चिखल तुडवत जावं लागतं. दहा वर्षं झाली, तरी विस्थापितांचं योग्य नियोजन झालेलं नाही. सरकार दरबारी फेर्‍या मारून गावकरी थकलेत. तरी आज ना उद्या रस्ता होईल, लाईट येईल, पाण्याची सोय होईल, या आशेवर पाडा टिकून आहे. नाहीतर बरीच तरुण मंडळी इकडे तिकडे शहराकडे जाऊ लागलीयेत.

ड्रायव्हर गाडी रस्त्यावरच्या मोठमोठ्या दगडगोट्यांवरून चालवत माहिती देत होता. कल्पनाच्या गावाकडे जाणारा रस्ता बघून तर दोघी-तिघी तर घाबरल्याच. आपण इकडे कशाला आलो, असं त्यांना वाटलं. गाडी नुसती डुचमळत होती. प्रत्येकीचा जीव घाबरा झाला होता.
‘‘अहो, म्हणून कल्पना इथे राहत नव्हती. दोघं नोकरीला. मग तिकडे शहरातच राहायला गेली. तर म्हणे लग्नानंतर तिसर्‍या दिवशी फ्लॅटवर गेली.’’
सगळ्याजणी घरात गेल्या, तर बाहेरच्या ओटीवर पुरुषमंडळी संतरजीवर बसलेली. भिंतीला टेकून खुर्ची. खुर्चीवर शाल नि त्या शालीवर अविनाशचा फोटो. फोटोला घातलेल्या जाड हारामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. जळणार्‍या उदबत्तीचा धूर फोटोभोवती धुक्यासारखा दिसत होता. एक बारकं पोरगं संतरजीवर झोपलं होतं. बरेचजण मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसले होते.

पाच-सहाजणी एकदम आतमध्ये आल्यावर बाहेर बसणार्‍यांमध्ये हालचाल झाली. कुणी दारातून उठून बाजूला बसला. एक आतमध्ये निरोप द्यायला गेला. त्यासरशी एक प्रौढ बाई बाहेर आली. सगळ्याजणींना ‘या इकडं आतच’ म्हणत हात दाखवत कल्पना जिथे बसली होती तिथे घेऊन आली. कल्पना सावरत भिंतीला नीट टेकून बसली. पायांखालची संतरजीची घडी नीट केली. मग सगळ्याजणी तिच्याभोवती बसल्या. मग कुणीतरी पाण्याचा तांब्या-ग्लास आणून ठेवला. बराच वेळ झाला, तरी कुणी काही बोलेना. मग कल्पनाच म्हणाली,
‘‘बरेच दिवस दवाखान्यात होता. कावीळ बरी झाली म्हणून डॉक्टरांनी उपचार बंद केले, पण कावीळ होतीच पोटात. फुप्फुसांची सूज कमी झालीच नाही.’’
‘‘हो का.’’
‘‘डॉक्टराचांही धंदा झालाय. सुरुवातीला काही बोलले नाहीत. नंतरच्या उपचारांपूर्वी म्हणायला लागले, ‘तिकडं मुंबईला न्या.’ बरं वाटायला लागल्यावर माणूस थोडा गाफील होतोच ना!’’
‘‘काय झालं?’’
‘‘सुरुवातीला त्याला बरं वाटलं. त्रास कमी झाला. डॉक्टरांनी सांगूनही त्यानं ऐकलं नाही. रोज दारू प्यायचा. नेहमीपेक्षा जास्तच. त्यामुळे फुप्फुसांना सूज आली. मग मात्र सावरला नाही.’’
सगळ्याजणी कल्पनाच्या तोंडाकडे बघू लागल्या. तिच्या चेहर्‍यावर निरागसपणा होता. बाकीच्यांचा तोंडाचा चंबू व्हायचा राहिला होता.
‘‘नंतर सवय लागली होती का?’’ दबक्या आवाजातला प्रश्न.
‘‘नाही गं. लग्नाच्या आधीपासूनच प्यायचा. लग्नाच्या दिवशीही प्यायला होता. हल्लीची पोरं पितातच बहुतेक. पण तो लवकरच प्यायला शिकला होता. दारू प्यायचा तरी तोल जायचा नाही त्याचा. सुरुवातीला मी ‘नको पिऊस’ म्हणाले, तर त्यानं उडवून लावलं. मी भांडू लागले, तर तो अधिकच धिंगाणा घालायचा. मलाच धरून चेचायचा. म्हटलं, जाऊदे, त्याची तो पितोय. आपल्या पगारात भागवू आपण. मोठ्याचा जन्म झाल्यावर सहा महिने सोडली होती दारू, पण पुन्हा सुरू केली. ती शेवटपर्यंत सुरू राहिली.’’
कल्पना बरेच दिवस कुणाशी बोलली नसावी. ती घडाघडा बोलत होती.
‘‘कधी बोलली नाहीस गं तू?’’
‘‘बोलून नि सांगून काय करू? काय फायदा होणार होता?’’
‘‘मनातलं दुःख हलकं होतं बोलल्यावर.’’

‘‘एक दुःख असेल तर सांगेल माणूस. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी कळलं, की अविनाशनं घाईत लग्न उरकवलं होतं. त्याच्यामुळे एक मुलगी गरोदर राहिली होती. पोलिसांचा ससेमिरा लागला होता. नोकरी धोक्यात आली होती. लग्नाच्या बायकोची साक्ष दिल्यावर केस ढिली होणार होती म्हणे. हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली. आई-वडलांना चिक्कार शिव्या दिल्या मनातल्या मनात. मुलाची नोकरी नि शहरातला फ्लॅट बघून माझं लग्न ठरवलं होतं. या गावाला येऊन गेले असते, तर कोणत्याही बापानं आपल्या मुलीला इथे दिलं नसतं. बापापुढे मला इतर दुनिया कमी अपराधी वाटू लागली. त्या दिवसापासून आपण स्वप्नं बघायची नाहीत, असं ठरवलं. स्वत:चं स्वत: जगायचं. जगून घ्यायचं.’’

बाकीच्या उगाच चुळबूळ करायला लागल्या. कुणाला तरी वाटलं, हिच्या तोंडाला हात द्या. बोलणं बंद करा हिचं. बाहेरघरची, पाव्हणी माणसं बसली आहेत. या बाईला नेमकं दुःख झालयं की नाही, हेच ठरवता येईना. हिच्या सांत्वनासाठी आलोय दुःखी चेहरा करून, तर हिच्या चेहर्‍यावर दुःखाची रेषाही दिसत नाही. तिच्या तोंडाकडे बघता बघता उजेडाकडे, खिडकीतून बाहेर बघू लागल्या.
कल्पना घसा खाकरू लागली. तिला तहान लागली आहे, असं एकीला वाटलं. ती जागेवरून उठून पाणी आणायला जाऊ लागली. तिची लगबग बघून कल्पना म्हणाली,
‘‘बस गं तू. इथे येईल पाणी मला.’’ तिनं घरात आवाज दिला. एका ग्लासात गरम पाणी आणलं गेलं. पाणी पिऊन झाल्यावर ग्लास परत पाठवला. तोपर्यंत कुणीच काही बोललं नाही.
‘‘अगं, सुट्टीत माहेरी जाण्यापूर्वी फर्निचर करायचयं घराचं म्हणून आठ लाख रुपये घेतले माझ्याकडून. पेढीचं कर्ज काढलं नि सगळेच्या सगळे पैसे ट्रान्सफर केले त्याच्या खात्यावर. दहा दिवसांनी आले तर घर मोकळंच. फर्निचरचा पत्ता नव्हता. अविनाशचाही थांगपत्ता नव्हता. स्वारी मित्रांना घेऊन गोव्याला फरार झाली होती. पाच दिवसांनी परतेपर्यंत निम्मी रक्कम खर्ची पडली होती. मग भांडणात दोन महिने गेले. दारू वाढली. उरलेले पैसेही उडवले. अजून हप्ते भरतेय पेढीचे.’’
‘‘घरातले लक्ष नाही का देत?’’ कोपर्‍यातून आवाज आला.
‘‘अगं, तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याला बघायला सासरे नि चुलतसासरे गेले होते. येताना उशीर झाला, तर दोघु दारू पिऊन आलेले. गावातले लोक शिव्या घालू लागले. लाज नाही म्हणे तुम्हाला. तेव्हा कुठे रात्रभर खळ्यावर जाऊन झोपले.’’

दोघी-तिघींना वाटलं, हे जरा जास्तीच होतयं. आपण उठून गेल्यावर घरात कलागती व्हायच्या. दुःख राहायचं बाजूला नि भांडणाला ऊत यायचा. चहा झालाच होता. चुळबूळ वाढली. बहुतेकजणी दाराकडे वळून बघू लागल्या. कुणी मनगटावरच्या घड्याळाकडे पाहू लागल्या. कुणी पर्स जवळ ओढू लागल्या. कुणी मोबाईल चापू लागल्या.
कल्पनानं ओळखलं. तिनं बाईंकडे झुकत म्हटलं, ‘‘मी लवकरच हजर होईन. इथे एकटीला घर खायला उठतंय. पोरं खेळतात दिरांसोबत. मला नाही करमत इथे. रात्री झोपसुद्धा येत नाही लवकर.’’
‘‘भीती वाटत असेल ना?’’
‘‘नाही गं बाई, तसं दीर वगैरे इथेच झोपलेले असतात.’’ बोलता बोलता ती थांबली. आपण काहीतरी वावगं बोललोय, असं तिला वाटू लागलं. ‘‘गाडी आणलीये ना तुम्ही?’’ म्हणत तिनं विषय बदलला. बाकीच्या इशारा समजल्यागत उठल्या. हात जोडून म्हणू लागल्या, ‘‘काळजी घे, स्वत:ला जप. पोरांची काळजी घे. टेन्शन घेऊ नको. काही लागलं, तर नक्की सांग वगैरे.’’ तीही जागेवरून उठून उभी राहिली. चार पावलं पुढे आली. सगळ्यांना निरोप देण्यासाठी ती दारापर्यंत आली.
मग एकेकजणी गाडीत बसल्या. काहींच्या तर आधीच पोटात गोळा आला होता. किमान आपलं तरी चांगलं झालंय, असं म्हणावं लागेल. जिथे रस्ता, पाणी, वीज आहे अशा ठिकाणी तरी आपलं लग्न लावून दिलंय.

गाडी धूळ उडवत निघाली. कधी एकदा मुख्य रस्त्याला गाडी लागतेय, असं झालं होतं. गाडी डुचमळायची कमी झाली तशी सगळ्याजणींनी मोकळा श्वास घेतला. गाडीमागचा धुळीचा लोट कमी झाला. रस्ता सपाट नि गुळगुळीत सुरू झाला. गाडीनं वेग घेतला.
‘‘काय गं, आपण कल्पनाला उगीच दोष द्यायचो. ही अशीच राहते, तशीच राहते म्हणायचो. आज कळलं बाई हिचं दुःख.’’ एकीनं सुरुवात केली.
‘‘मला तर सुरुवातीला ती फारच बोल्ड वाटायची. सदान्कदा केस मोकळे असायचे. ओठांना कायम लिपस्टिक. ऑफिसला तर कधीच पायी आली नाही. कुणी ना कुणी सोडायला यायचं हिला गाडीवर. विचार करायचे, हिलाच कसे ओळखीचे भेटतात. बिच्चारी कल्पना!’’
‘‘अगं, ओळखीचे कसले? ही नाक्यावर उभी राहायची. मग हिची वागण्याची रीत बघून काहीजण मुद्दाम गाडी घेऊन उभे राहायचे. ही बसमधून उतरली, की गाडीवर बसून आणण्यासाठी पैजा लागायच्या. ही काही कमी वस्ताद नाही, हिनं त्यांना आठवड्याचे वार ठरवून दिले. म्हणायची नुसतं गोड बोलायला काय जातंय.’’ बाकीच्या सगळ्या फिदीफिदी हसायला लागल्या. गाडीतलं वातावरण हलकंफुलकं झालं. दोघी-तिघींनी ड्रायव्हरला आरशात निरखलं. तो गाडी चालवण्यात मग्न होता.
‘‘पण काय गं, हिच्या तोंडावर दुःखाचा लवलेश नाही, असं कसं?’’
‘‘अगं, ती म्हणत असेल, सुटले एकदाची.’’
तेवढ्यात ड्रायव्हरच्या खुदकन हसण्याचा आवाज आला. सगळ्या सावध झाल्या. एकमेकीना मांडीला ढोसत इशारा करू लागल्या. डोळे मारू लागल्या. क्षणभर शांतता पसरली.
ड्रायव्हरला संयम ठेवता आला नाही. तो म्हणालाच, ‘‘लोक म्हणतात, ती पोरं त्या अविनाशची नाहीत. तो सदान्कदा दारूतच बुडालेला असायचा. रात्र-रात्र बाहेरच असायचा. आता लोकांच्या तोंडाला कोण हात लावणार?’’
गाडीतल्यांना थोडी भीती वाटली. बाई! हा ड्रायव्हर तर भलताच निघाला. आपण जे बोललो ते पुन्हा जाऊन सांगेल की काय, अशी शंका त्यांना यायला लागली. सगळी धुक्यागत गप्प झाली. गाडी कॉलनीपर्यंत आली, तरी कुणी काही बोललं नाही.

बाईंच्या डोळ्यांपुढे कल्पनाचे फोटो तरळत होते. गेल्या वर्षीच्या गेटटूगेदरला कल्पनानं नेटची साडी नेसली होती. अपरं ब्लाऊज, त्यात उतरलेला गळा नि तिचं नेटच्या साडीतून दिसणारं अर्धअधिक उघडं गोरं पोट सर्वांच्या नजरा आकर्षून घेत होतं. लॉनवर म्हणे, साहेबांनी कल्पनाला सर्व्ह करून जेवण वाढलं. दुसर्‍या दिवशी तीच चर्चा रंगली होती. कल्पना मात्र फायलींच्या ढिगामागे उडणारे केस मागे लोटत एक-एक पान तपासत होती. बाईंसमोर ती नेहमीप्रमाणेच वागली. बाई तिच्या प्रमुख होत्या, तर कल्पना त्यांची साहाय्यक. ती तिच्या कामात चोख असायची. त्यामुळे तिच्या वैयक्तिक वागण्या-चालण्यात बाईंना डोकावण्याचा प्रश्नच नव्हता. बाईंचा तसा स्वभावही नव्हता. त्या सोबतीण असल्याप्रमाणे वागवायच्या तिला.

वीस-एकवीस दिवसांनी कल्पना कार्यालयात आली. बाईंना भेटली. बाई आधी भांबावल्या. मग स्वत:ला सावरत म्हणाल्या, ‘‘काय घाई होती हजर व्हायची? रिपोर्ट दे. आज जमेल तेवढचं काम कर.’’ बाई कल्पनाकडे बघण्याचं धाडस करत नव्हत्या. कल्पना जशी अगोदर नटूनथटून यायची तशीच आज कामावर आली होती. मग माहीत झाल्यावर कार्यालयातले एक-एक सहकारी कल्पनाला भेटून जाऊ लागले. काहीजण तिलाच पाहायला येत होते. ती सर्वांना, ‘हो, हो ना, खरंय, चालेल, या, मग,’ असं म्हणून कटवत राहिली. फायलींमध्ये डोकं खुपसून काम करत राहिली. तरी लोक येत राहिले. सहानुभूती दाखवत राहिले. ‘अरेरे, च्यॅकच्यॅक, वाईट झालं, कसं निभावणार?’ असले शब्द नि आवाज ऐकून ती वैतागली. तिला वाटलं, यापेक्षा घरी बरं होतं. ती नात्यातली माणसं होती. खास करून वेळ काढून आलेली होती. तिचं कामात मन लागेना.

साडेचारला चहापानाची सुट्टी झाली. तिनं पर्स उचलली. कँटीनमध्ये आली. मग भरून कॉफी घेतली. तिच्या अगोदर बरेच सहकारी कँटीनमध्ये येऊन बसले होते. मंद आवाजात संगीत सुरू होतं. प्रत्येकजण चहा-कॉफी घेऊन बाकड्यावर बसला होता. तिनं कँटीनभर नजर फिरवली. प्रत्येक बाकड्यापाशी जाऊन तिनं घोळक्या-घोळक्यांशी चौकशी केली. मग सर्वांच्यामध्ये येऊन गरमागरम कॉफीचे घोट घेत राहिली. तिच्याकडे बघता बघता काहीजण चहा-कॉफी घ्यायचे थांबले.
मंद संगीत सर्वांच्या कानांवर पडू लागलं.

– यशवंत सुरोशे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.