Now Reading
कॉफीच्या कपातलं वादळ

कॉफीच्या कपातलं वादळ

Menaka Prakashan

कॉफीशॉप ही एक संस्कृती आहे. तिथे जायचं ते केवळ कॉफी प्यायला नाही, किंबहुना मूळ उद्देश तो नसतोच बर्‍याचदा. आता माझंच पाहा, मी इथे ‘सीसीडी’ म्हणजे ‘कॅफे कॉफी डे’मध्ये येऊन बसलेय सकाळी सकाळी, ते फक्त कॉफी पिण्यासाठी नाही. मी आलेय ते लिहिण्यासाठी. उद्या छापायला पाठवायला हवं, आज लिहून पूर्ण करायला हवंच, नितांत गरज आहे. ‘रिद्धी’ या स्त्रियांच्या मासिकासाठी लिहिते. तसं काही चालतं, कथा, स्फुट लेखन वगैरे. पण इंटलेक्च्युअल इंटलेक्च्युअल वगैरे नाही. ही एक नवीन जमात आहे, स्वतःला इंटलेक्च्युअल समजणारी. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग.

इथे शांतपणा आहे. मी अगदी कोपर्‍यातल्या टेबलवर बसलेय. इथून सगळी टेबलं दिसतायेत. समोर मध्यम वयाचे श्रीकांत काळे पाठमोरे बसलेत. त्यांचे केस काळे-पांढरे मिश्र दिसतायेत. किंचित पोक काढून, खांदे पडून बसलेत. जबाबदार्‍यांचं ओझं जाणवतंय. त्यांच्या समोर तरुण मुलगी स्नेहा बसलेली दिसतेय. तिचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये. काहीतरी लिहितेय. मित्रमंडळीशी गप्पा चालल्या आहेत. या माणसाला किती कंटाळा आलाय! नक्कीच. मी खात्रीनं सांगते, कारण तेच माझं काम आहे, माणसाचं मन वाचण्याचं. तिलाही कंटाळा आलाय, पण स्नेहा नेटानं बसलीये. वडील भेटायला आलेले तिला अजिबात आवडलेलं नाही. ती शिक्षणासाठी इथे येऊन राहिलीये. ती घरी जातच नाही.

‘‘लवकर काय तो उपदेश करा, पापा. मला कंटाळा आलाय बसून बसून.’’ती तुसडेपणानं म्हणाली.
‘‘तुझ्या आईला आणि मला तुझी काळजी वाटते. तुझं असं ‘लिव्ह-इन रिलेशन’मध्ये राहणं…’’
ती उसळून म्हणाली, ‘‘मग काय करू? तुम्ही सांगितलेल्या मुलाशी लग्न करू? आणि मग ताईसारखा घटस्फोट घेऊ? तुम्ही जात-धर्म-गोत्र वगैरे पाहून ठरवलं होतंत ना?’’
‘‘तू शोध हवं तर. जातपात वगैरे प्रश्न नाही. ‘लिव्ह-इन’मध्ये राहतेस त्याच्याशी कर.’’ त्यांनी रुमालानं घाम पुसला.
‘लिव्ह इन’ला पटतं. म्हणजे लग्न करायचं असेल, तर आधी पुरेशी ओळख असायला हवी. स्नेहा बरोबर सांगतेय. तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा अति आळशी, नोकरी सोडून घरी बसला होता. त्याला बायकोच्या पैशांवर सुखानं जगायचं होत. मी पण होते ‘लिव्ह इन’मध्ये. मग तुटलं. त्याला आणखी कुणी आवडलीये. तिच्याबरोबर राहायचंय. ‘लिव्ह-इन’मध्ये इतकं सोपं असतं.
खरंच असतं का? पुन्हा तोच विचार. मला काही लिहायला हवं. एक कॉफी मागवते. गरम गरम.
काऊंटरवरची मुलगी छानसं हसून बोलली. पटापट टाईप करून बिल दिलं.

‘‘ओट्स विथ हनी कुकीजची दोन पॅकेट्स द्या.’’ पाठच्या बाईनं आपले सरळ केलेले केस पाठी सरकवत गॉगल केसांवर चढवत म्हटलं. तिच्या चेहर्‍यावर मेकअपची पुटं दिसत होती. आणखी बरीच रंगरंगोटी होती. वजन कमी करण्यासाठी ओट्स, साखर नको म्हणून मध. पण बिस्कीट खाऊन वजन कसं कमी होईल? फॅशन म्हणून खात असेल. जिममध्ये जाऊन आल्यावर लागतात म्हणून. हिचा फक्त चेहराच सुकलाय, बाकीचे प्रांत विस्तारलेत. वजन कमी करणं कठीण काम आहे. मीही प्रयत्न केला होता. त्यामुळे ही डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली आणि तो सोडून गेला ते वेगळंच.
लॅपटॉप उघडून लिहायला सुरुवात करूया. वेळ फुकट घालवलाय.

ही समोरची सरिता काहीतरी क्राफ्ट करतेय. एकटीच बसलीये. साडी नेसलेली, कपाळावर कुंकू, हातात सोन्याच्या आणि काचेच्या बांगड्या, केसांची घट्ट वेणी अशी स्त्री ‘सीसीडी’मध्ये फारशी दिसत नाही आणि एकटी तर मुळीच नाही. नियमच आहे जणू. कॉफी देणारी मुलगी सरकली, की दिसेल नीट. कॉफी नाही, लेमन टी घेणार आहे आणि चक्क क्विलिंग करतेय. मन लावून करतेय. कुठेच लक्ष नाहीये तिचं. कागदाचे रंगीबेरंगी तुकडे पसरलेत आणि मोठ्या सुईवर गुंडाळून पाकळी तयार करतेय. एक निळी डिंकाची बाटली दिसतेय. सुबक पाकळ्या झाल्यात.

‘‘मला वेळ लागेल. अजून वेटिंग आहे.’’ ती फोनवर बोलली. ‘‘नको, तू नको येऊस. बरी आहे मी. अजून आतल्या पेशंटचं सेशन संपलं नाहीये. संपेल आता.’’ मग थोड थांबून पुन्हा म्हणाली, ‘‘तासभर तरी कमीत कमी. पुन्हा ट्रॅफिक असेलच. तुम्ही जेवून घ्या सगळे.’’ तिनं फोन ठेवून दिला.
घरात राहून दम घुटतो. चोवीस तास घरात, तेही इतक्या माणसांत. स्वतःसाठी वेळ नाही, स्वतःचं असं खासगी आयुष्य नाही. रात्री बेडरूममध्ये सुद्धा नवरा असतोच. म्हणून अशी फुफ्फुसं निर्माण करावी लागतात. डॉक्टरला फी न देता ते पैसे असे वापरायचे. स्वतःच स्वतःचा इलाज. मी वाचलं होतं कुठेतरी, की ती ज्युलिया रॉबर्ट्स म्हणे मनाच्या शांतीसाठी विणकाम करते. एकच एक क्रिया पुन्हा पुन्हा करत राहिल्याने मन एकाग्र होतं. शांत वाटतं. असंही लिहिलं होतं. या नट्यांचे चोचले फार, पण खरं असलं पाहिजे.
या कोपर्‍यातले दोघं आत्ताच येऊन बसलेत बहुतेक. त्या पेंटिंगच्या खाली बसलेले.

इतका वेळ एकट्या बसलेल्या प्रणवसमोर आत्ता मरून रंगाचा, गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक घातलेली कमनीय मुलगी येऊन बसलीये. त्याचा चेहरा नीट दिसत नाहीये, पण तिचा दिसतोय. यांची टिंडरवर ओळख झाली, चॅट करून झालं. आता भेटायचं ठरलं. ती थोडी अवघडलेली दिसतेय. तो लगेच सावरून बसला.
‘‘हाय तान्या!’’
‘‘मला उशीर नाही ना झाला.’’
‘‘मीही आत्ताच आलोय.’’ काही क्षण शांततेत गेले. तो तिला निरखून पाहत होता. तिनं भुवई उंच करत त्याच्याकडे पाहिलं.
‘‘तू फोटोपेक्षा जास्त सुंदर आहेस.’’ ती हलकं हसली.
‘‘आपल्या बर्‍याचश्या आवडी जुळतात.’’
‘‘हो आणि काही जुळत नाहीत.’’ तान्या.
‘‘मी नास्तिक आहे, पण तुझ्याबरोबर सत्यनारायणाला बसेन आणि आपण गणपती पण आणू.’’ तो घाईनं म्हणाला.
‘‘मीही तुझ्याबरोबर ट्रेकिंगला येईन. आणि स्वयंपाक करायला शिकेन. मला फारसं काही करता येत नाही.’’ तान्या त्याच्याकडे पाहत म्हणाली .
तो खळखळून हसला, ‘‘ओके, पण मला येतं.’’

हे डेटिंगअ‍ॅप आता आपल्या समाजाचा भाग झालंय. मुला-मुलींचे फोटो असतात, माहिती असते. आपल्याला कुणी आवडलं तर बोलता येतं, भेटता येतं. पण निवड करायची संधी मिळते. मलाही फोनवर डाऊनलोड करायला हवं. या वेळी अशी चूक नको व्हायला.
उजव्या कोपर्‍यात चारजणी बसल्यात. क्रॉप टॉप, स्कर्ट, स्कार्फ वगैरेंमधून स्वतःवर आधुनिकतेचं लेबल लावून घेतायेत. यांचे नवरे कामावर गेलेत आणि मुलं शाळेत.
‘‘हे ब्रेसलेट बघा.’’ हिर्‍याचं ब्रेसलेट मैत्रिणींना दाखवत पूनम म्हणाली, ‘‘व्हॅलेंटाईन डेची गिफ्ट आहे समरकडून.’’
‘‘किती सुंदर आहे.’’ मनाली म्हणाली, ‘‘या वेळी अतुलनं मला विचारलं होतं, काय हवंय? आता काय घेणार? हिर्‍याची इतकी महागडी ब्रेसलेट माझ्याकडे आहेत. मी म्हटलं, युरोप टूर करूया.’’
पूनमनं लगेच हात पाठी घेतला.
‘‘तू बंगालीबाबूकडून तर घेत नाहीस ना हिरे?’’ नयना म्हणाली, ‘‘त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. थोडे पैसे वाचतात, पण काय उपयोग?’’
आपापल्या श्रीमंतीचं प्रदर्शन मांडण्याची चढाओढ लागली आहे. यांचे विषय हेच – दागिने, कपडे, सिनेमा. अर्धा वेळ ब्युटीपार्लरमध्ये जातो, उरलेला अर्धा कपडे खरेदी करण्यात.
सिल्विया इतका वेळ ऐकत होती. तिनं बोलायला सुरुवात केली, ‘‘या वेळी मी त्याला गिफ्ट दिलं. एकदम खास.’’ तिघी कुतूहलानं पाहत होत्या. ‘‘कॉस्मेटिक सर्जरी करून घेतात ना, मी पण करून घेतली.’’
तिघी चक्रावल्या, ‘‘कसली?तुझ्यात काही बदललेलं दिसत नाहीये.’’ तिला न्याहाळत म्हणाल्या.
सिल्वी हसली आणि हळू आवाजात म्हणाली, ‘‘कूारपेश्रिरीीूं. हूाशप पुन्हा जोडून घेतलं.’’ डोळा मारत म्हणाली, ‘‘मार्टिन एकदम खूष.’’
मनाली बुचकळ्यात पडली. ‘‘म्हणजे काय?’’
‘‘अगं, अप्सरांना कसा वर होता ना, पुन्हा कौमार्य प्राप्त होण्याचा. तसंच.’’
तिघीजणी जवळ जवळ किंचाळल्या, ‘‘ओह माय गॉड!’’

सिल्वी म्हणाली, ‘‘मी ‘रिद्धी’मध्ये वाचलं होतं. डॉक्टरांचा पत्ता लिहून घेतला. चुपचाप त्यांच्याकडे गेले आणि करून घेतलं. मार्टिनसाठी मोठं सरप्राईज!’’ तिघी एकमेकींकडे पाहत राहिल्या. सिल्वी म्हणाली, ‘‘मी ऑर्डर करून येते. आज पार्टी माझ्याकडून.’’
ती उठल्यावर पूनम म्हणाली, ‘‘हिला असं करायची गरज काय पडली?’’ तिघींनी एकमेकींकडे पाहिलं, ‘‘हिला मार्टिनबद्दल समजलं की काय?’’ मनाली म्हणाली.
‘‘ओह! पुअर गर्ल.’’ तिघी म्हणाल्या.
ओफ! बराच वेळ बसलेय. अजून काही लिहून झालं नाही. या जागेत काहीतरी गडबड आहे. दुसरीकडे बसून पाहते, तो डावा कोपरा रिकामा आहे.
इथून काऊंटर पूर्ण दिसतोय. बिल करणार्‍या मुलीचं फक्त डोकं दिसतंय. तिच्या बाकीच्या वेशाशी नाकातली चमकी शोभत नाही. ते काळे अगदी समोर दिसतायेत. त्यांची कॉफी पिऊन झालेली दिसतेय.
‘‘मी आता ‘लिव्ह इन’मध्ये नाहीये.’’ स्नेहानं मोबाईल खाली ठेवत म्हटलं.
काळे पाठ सरळ करून बसले. चेहर्‍यावरची चिंता थोडी कमी झाली.
‘‘मी बोलणार होते तुमच्याशी पापा. मी स्ट्रेट नाहीये. लेस्बिअन आहे.’’

त्यांचे डोळे विस्फारलेत. हात थरथरतोय. तोंडातून शब्द फुटत नाहीये.
तिनं त्यांच्या हातावर थोपटलं, ‘‘मला कळतंय पापा, तुमच्यासाठी किती कठीण आहे हे स्वीकारणं. मला तुमची खूप काळजी वाटते.’’
काळे चक्क रडतायेत. स्नेहा त्यांचा हात थोपटतेय. काळे उठलेत. तिच्याकडे न पाहता गेले. स्नेहा तशीच बसून राहिलीये, पुतळ्यासारखी.
माझ्या घशाला कोरड पडलीये. पाणीच हवं. स्नेहाच्या धाडसाला दाद द्यायला हवी. आधी स्वतःला पटवणं कठीण आणि त्यात इतरांना सांगणं, तेही ठामपणे. अशक्यच. एवढी हिंमत माझ्यात नाही.

सरितानं चार-पाच फुलं तयार केलीयेत. सगळी एकसारखी दिसतायेत. त्यांची वेगवेगळी रचना करून पाहतेय. कधी आडव्या रांगेत, कधी गोलाकार.
तिचा फोन वाजतोय. ‘‘हो, येतेय. रस्त्यात आहे. डॉक्टरांनी पुन्हा अपॉईंटमेंट दिलीये.’’ तिनं पर्स उचलली. फुलं तिथेच टेबलावर ठेवली आणि निघून गेली. काऊंटरवरची मुलगी वेटरला म्हणाली, ‘‘पुन्हा कचरा करून गेली. जा, टेबल साफ कर. कुठून कुठून येतात हे अजब लोक!’’ तिनं वैतागून मान झटकली.
माझी दोन कप कॉफी पिऊन झालीये. काही खायला हवं. नाहीतर पोटात जळजळ होईल. इथे चव, पौष्टिकता आणि किंमत यांच व्यस्त प्रमाण आहे. तरीही मी इथेच तुकडे मोडणार. आई विचारायची, ‘झाले का उकिरडे फुंकून?’ खरंच आहे.
प्रणव आणि तान्याच्या गप्पा रंगत आल्यात. अजून दोघांनीही कॉफीला हात लावलेला नाही.

‘‘प्रणव, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्यानंतर तुझा निर्णय बदलला, तरी मी तुला दोष देणार नाही.’’ तान्या मान खाली घालून म्हणाली. प्रणव म्हणाला, ‘‘तुझं आधी काही अफेअर असलं, तरी माझी हरकत नाहीये.’’
‘‘माझी आई, बाबांची लग्नाची बायको नाहीये, दुसरी बायको, किंवा रखे…’’ ती बोलू शकली नाही.
प्रणवनं तिच्याकडे पाहिलं. क्षणभर शांतता पसरली. मीही श्वास रोखला.
मग तो हसला आणि म्हणाला, ‘‘सेम हियर. माझंही तसंच आहे.’’ त्यानं तिचे हात धरले, ‘‘आपण एकमेकांसाठी अगदी अनुरूप आहोत.’’
लिहून झालंय आणि अगदी सहज. जरा मोठाच झालाय लेख. आजचं काम झालं. मेल करून टाकते. ओफ! किती वाजले? फार वेळ गेला.
एकदा बोलायला लागल्या, की रिकाम्या खुर्च्याही फार बोलतात.

– डॉ. अस्मिता हवालदार

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.