Now Reading
कुलूप

कुलूप

Menaka Prakashan
View Gallery

सकाळी साडेसहाला विकी ठाकूर जेव्हा सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये शिरला, तेव्हा त्याची सटकलीच. कारण त्याच्या गाडीपुढे कुणाची तरी गाडी अशी पार्क केली होती, की त्याला स्वत:ची गाडी काढता येणं शक्यच नव्हतं. विकीनं वैतागूनच सिक्युरिटीला हाक मारली. तो बिचारा धावतच आला.
”येस सर?”
”ये गाडी किसका है? बाहर निकालो।”
तो धावतच केबिनमध्ये गेला आणि परत आला.

”सर, चाबी नही छोडा है।”
”ऐसा कैसा? तुम लोग युसलेस लोग है… गाडी किसका है?”

”चौदासो तीन… शेफाली मॅम का।”

शेफाली मॅमचं नाव ऐकून विकी वरमला. शेफाली त्याची क्लासमेट होती. तिचे वडील गौरव कपूर हे अत्यंत उच्चभ्रू वस्तीमधल्या या सोसायटीचे प्रमोटर सदस्य होते. पण ही मंडळी तर तीन वर्षांपूर्वीच दिल्लीला शिफ्ट झाली होती. शेफाली टिपिकल सुंदर तरुणी होती. टिपिकल म्हणजे श्रीमंत सुंदर तरुणी असतात तशी… गोरीपान, उंच, काहीशी स्थूल आणि अॅटिट्यूड राखणारी…
”सर, कल उनकी जगह पर वो बारासो तीन वाले के गेस्टने पार्किंग किया था नं। तो शेफाली मॅमने उधर पार्क किया… और मुझे चाबी देने को भी भूल गयी। मैं अभी लेके आता।” असं म्हणून तो निघालाही.

”ठैरो,” विकी म्हणाला, ”मैंही लेके आता हूँ।”

असं म्हणून विकी लिफ्टकडे निघाला. विकी या ओशन व्ह्यू सोसायटीत लहानपणापासून राहत होता. तोही टिपिकल देखणा होता. उंच, गोरापान, काहीसा स्थूल… शिवाय उच्चशिक्षित. पंचविशीचा असेल. पण एका मल्टीनॅशनलच्या आयटी डिपार्टमेंटमध्ये मोठ्या पदावर. सुंदर तरुणी हा विकीचा विकपॉईंट होता. आणि तो शेफालीशी नीटच बोलणार होता. अर्थात, या गडबडीत तिला इंटरकॉमवर इन्फर्म करायचं मात्र राहून गेलं.
चौदाशे तीनच्या दरवाजाची बेल विकीनं वाजवली. दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडणारी एक अत्यंत सुंदर तरुणी होती, पण ती शेफाली नव्हती. या तरुणीनं कॉटनची ट्रॅकपँट आणि टॉप घातला होता. सोसायटीतल्या तमाम मुली घरात हॉट डेनिम शॉर्ट आणि सिंग्लेट घालतात, हे विकीला माहीत होतं. त्यामुळेच हिचं वेगळेपण त्याच्या लक्षात आलं. गव्हाळ कांती, रेखीव अवयव, बोलका चेहरा आणि अतिशय पाणीदार डोळे… एवढं सगळं त्या क्षणार्धात विकीनं नोट केलं.

एवढ्यात आतून शेफालीचा आवाज आला.

”दीपा, कौन है?”

”येस प्लीज!” तिनं विकीला विचारलं.
”आय ॲम विकी.”
”शेफाली, मि. विकी हैं।”

”अंदर बुला ले।” शेफाली म्हणाली आणि बाहेर आली. तिनं हॉट डेनिम शॉर्ट आणि सिंग्लेट घातली होती. दीपानं बाजूला होऊन विकीला आत येऊ दिलं.
शेफालीनं विकीला ‘हाय’ केलं.

”ही माझी फ्रेंड दीपा.” तिनं ओळख करून दिली. ”आणि दीपा, हा विक्रम ठाकूर माझा क्लासमेट.” दीपानं विकीला शेकहँड केलं. फक्त एक मंद स्मित केलं आणि अवघडल्यासारखी ती उभी राहिली.
”माझी गाडी तू ब्लॉक केली आहेस शेफाली. चावी दे की. मी सिक्युरिटीबरोबर पाठवून देतो.”

”ओह! आयेम सो सॉरी… अरे, रात्री आम्ही उशिरा आलो, तर माझ्या जागेवर कुणाची तरी गाडी उभी होती. काय लोक असतात नाही? थांब, देते तुला.”
तिनं टेबलावरची चावी उचलून विकीला दिली.

”बाय द वे, दिल्लीहून कधी आलीस?”

”झाले चार-पाच दिवस. आता इथेच राहणार दोन वर्षं. माझं एमबीए कुठे पूर्ण झालंय? दीपाचंही व्हायचंय. मग इथेच अॅडमिशन घेतली. दोघीच राहणार आहोत दोन वर्षं.”
”ग्रेट… चला, कधीतरी येऊन चिटचॅटिंगची सोय झाली.”

”रहने दो हं विकी… तुझं चिटचॅटिंग नसतं.” आपल्या मादक डोळ्यांनी लाडिकपणे त्याच्याकडे पाहत शेफाली म्हणाली. आणि त्यावर दोघंही जोरात हसले.

दीपाला आणखी अवघडल्यासारखं झालं. ‘चावी सिक्युरिटीकडे ठेवतो,’ असं सांगून विकी निघाला.

”एक नंबर फ्लर्ट लडका है।” विकी गेल्यानंतर दार नीट लावून झालंय, याची खात्री करून घेत शेफाली म्हणाली.

”मला वाटलंच होतं. आणि तू सुद्धा त्याचं फ्लर्टिंग अनुभवलेलं दिसतंय.”
”येस आय अॅडमिट… छोड यार! ते सगळं जाऊदे, बट वी आर स्टिल फ्रेंड्स.”
”मला नाही आवडत असं.” दीपा म्हणाली.

”मालूम है यार… तू तो दूध की दूल्ही है। एक दिन दूध फट जाएगा नं तो मालूम पडेगा सबकुछ।”

”देखेगी तू… माझं नाव दीपा पंडित आहे.” दीपा हसत म्हणाली आणि आतमध्ये अभ्यासाला निघून गेली.

खरंतर शेफाली आणि दीपा या दोघींच्याही कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत जमीन-अस्मानाचं अंतर होतं. शेफालीचे वडील गौरव कपूर हे एका मोठ्या कंपनीचे एम. डी. होते. तर दीपाचे वडील त्याच कंपनीत साधे अकाऊंटंट होते. पण दोन्ही कुटुंबांत कित्येक वर्षांचा घरोबा होता. कपूर आणि पंडित एकाच कॉलेजात होते, तेव्हापासून त्यांची घनिष्ठ मैत्री होती. गौरव कपूर शिक्षण घेत घेत पुढे पुढे जात राहिले. त्यांनी स्वत:ची कंपनी काढली. प्रोप्रायटरशिपची पार्टनरशिप, मग प्रायव्हेट लिमिटेड आणि शेवटी पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. मग मल्टीनॅशनलशी कोलॅबरेशन… पंडित मात्र बी.कॉम.च्या पुढे शिकूच शकले नाहीत. कपूरांनी मैत्रीला जागून त्यांना नोकरी दिली होती. दोघांच्याही बायका-मुलांनीही आर्थिक स्थितीतली ही विषमता कधीच संबंधांच्या आड येऊ दिली नाही. म्हणून तर दोघींनीही एम.बी.ए.साठी मुंबईला अॅडमिशन घेतली आणि फ्लॅट रिकामा पडलाच होता, तो वापरायचा ठरवलं.

विकी चावी घेऊन निघाला होता खरा, पण निघालं होतं ते त्याचं फक्त शरीर. त्याचं मन अजून शेफालीच्या फ्लॅटमधल्या सौंदर्यवतीमध्येच रेंगाळत होतं. दार उघडल्यानंतर दिसलेला दीपाचा विलक्षण सुंदर चेहरा आणि प्रमाणबद्ध शरीर त्याला आठवत राहिलं. विकीनं आजपर्यंत पाहिलं होतं आक्रमक सौंदर्य… कित्येक मुलींना श्रीमंतीमुळे आलेला माज, उन्माद त्यानं उतरवला होता. तो फ्लर्ट म्हणून प्रसिद्ध होता, तरीही मुली मागे लागत, याचं त्याला आश्चर्य वाटे. तीन-चारजणी तर लग्नासाठीच त्याच्या मागे लागल्या होत्या. पण अशा मुलींपासून सुटका करून घ्यायचं टेक्निकही विकीला अवगत होतं. सिंपल! दुसरीच्या प्रेमात पडलं, की पहिली रुसे आणि अगदी सहजपणे ब्रेक-अप होई. पहिलीशी झालेला ब्रेक-अप तो दुसरीबरोबर सेलिब्रेट करे. दुसरीशी झालेला तिसरीबरोबर… असे अनेक ब्रेक-अप्स.

पण आता या दीपा पंडितचं काय करायचं? हे प्रकरण खूपच वेगळं होतं, हे त्यानं फेस रीडिंगवरूनच ओळखलं होतं. या पाणीदार डोळ्यांतलं पाणीच वेगळं होतं.

त्या दिवसानंतर कधीकधी त्या दोघींचं आणि विकीचं समोरासमोर येणं जुळून येत होतं. बऱ्याचदा त्या दोघी एकत्रच असत. तीन-चार वेळा दीपा एकटीच आली. पण ओळखीचं मंदस्मित करून ती पुढे निघून गेली होती. एखादी गोष्ट अप्राप्य वाटली, तर ती मिळवण्याचा खटाटोप करणं, हा तर विकीचा स्वभावच होता.

पण हे कसं साधायचं?

आणि अचानक हा योग जुळून आला. दक्षिण मुंबईतल्या ऑफिसमधून आपली मर्सिडीज् घेऊन विकी घराकडे निघाला होता. ट्राफिकमुळे त्यानं गाडी स्लो केली आणि समोरच बसस्टॉपवर दीपा उभी होती. विकीनं हॉर्न वाजवून तिला बोलावून घेतलं. ती पुढे आली.

”घरीच जाते आहेस ना?… बस की.”
”नको, मी बसनं जाईन.”
”नाटकं करू नकोस… बस..”

त्यानं अधिकारवाणीनं सांगितलं आणि ती निमूटपणे बसली.
”आज शेफालीनं बरं सोडलं तुला?”
”तिला दुसरीकडे जायचं होतं.”
”तुम्ही दोघी काय नोकऱ्याबिकऱ्याकरता?”

”नाही. इथे लायब्ररीत बसतो. सकाळी कॉलेज. मग जेवण आणि मग लायब्ररी… नंतर मी घरी जाते.”

”आणि शेफाली?”

”शी इज अ फ्री बर्ड इन द इव्हिनिंग अँड आफ्टर.”

मग तो असंच काहीबाही आणि निरुपद्रवी बोलत राहिला. तिनंही त्याला तशीच निरुपद्रवी उत्तरं दिली. ती पुढेच त्याच्या शेजारी बसली होती, पण बरंच अंतर राखून. तोसुद्धा डिसेंटली बसला होता. डिसेंट वागत होता.
”कॉफी घेऊया का?” त्यानं विनम्रपणे विचारलं.
”नो थँक्स.” तिनंही विनम्रपणे उत्तर दिलं.

त्यानं तिला सोसायटीत सोडलं. तो अकराव्या मजल्यावर, तर ती चौदाव्या मजल्यावर आपापल्या फ्लॅटमध्ये निघून गेले.
रात्री तिनं शेफालीला सांगितलं.

”आज विकी भेटला होता.”
”ओह!… दॅट लेडीकिलर?… बघ हं, तुझं तत्त्व मोडायचं एखाद्या दिवशी.”
”मी दीपा पंडित आहे शेफाली.”

”माहितीये… माहितीये. एक दिवस पाघळशील… लेडी विश्वामित्र.”

शेफालीच्या ‘लेडी विश्वामित्र’ या कमेंटवर दीपाला खळखळून हसल्याशिवाय मात्र राहवलं नाही.

विकीनं आपलं जाळं पसरायला सुरुवात केली होती. ती कोणत्या वेळेला लायब्ररीतून बाहेर पडून बसस्टॉपवर येते, हे त्यानं हेरून ठेवलं होतं. रोज भेटलं तर वाईट दिसेल, हे तो जाणून होता. म्हणून तो आठवड्यतून एकदा तरी तिला अचानक भेटल्यासारखं दाखवून गाडीत बसवी. तो अत्यंत सभ्यपणे तिच्याशी वागत होता. दोघांमधली मैत्री वाढत होती. वागण्यातला मोकळेपणा वाढत होता. एक दिवस तो तिला म्हणाला,
”दीपा, घरचे जाम पकवताहेत.”
”का रे?”
”लवकर लग्न कर म्हणताहेत.”
”मग करून टाक. तुला प्रपोजल्सना काय तोटा!”

”फ्लर्टिंग मटेरिअलशी काय लग्न करणार? मॅरेज मटेरिअल तर हवं ना?”
”तू स्वत: काय आहेस रे?”
”तुला काय माहितीये?”
”तुझा इतिहास मला माहितीये.”
”शेफालीनं सांगितलाय?”
‘ऑब्‌व्हिअसली.”

”साला… हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही. पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो.”
”म्हणूनच तो बिघडणार नाही, याची काळजी घ्यायची.”

”ए आजीबाई, उपदेश करू नकोस… बास!”
तो सिरीअस झाला. सोसायटी येईपर्यंत तो काहीच बोलला नाही. ती उतरण्यापूर्वी त्यानं तिचा हात धरला.
”दीपा, मी वाल्या आहे. मला वाल्मिकी व्हायची संधी देशील?”
तिनं आश्चर्यानं त्याच्याकडे चमकून पाहिलं.
”आय लव्ह यू दीपा… विल यू मॅरी मी?”
तिनं त्याचा हात झटकला. मंद स्मित केलं आणि ती सरळ लिफ्टकडे निघाली.
तो फक्त पाहत राहिला.

रात्री शेफाली उशिरा घरी आली, तेव्हा तिनं हे सगळं शेफालीला सांगितलंच. कधी नव्हे ती शेफाली गंभीर झाली.
”बघ बाई, तुझा तू विचार कर. एकेकाळी तो माझाही बॉयफ्रेंड होता. मी खूप लहान होते तेव्हा… हार्डली ट्वेंटी. बट ही डिच्ड मी.”
”काय सांगतेस? …रिअली?”

”येस… पण लॉयल्टी हा शब्द त्याच्या डिक्शनरीत नाही. मी फ्रँकली सांगते तुला. आमचं ब्रेकअप झालं, तेव्हा मी खूप नर्व्हस झाले होते. पण मग म्हटलं, जाऊदे. आम्ही फ्रेंडली राहायचं ठरवलं. आता मी सगळं विसरून गेलेय. तू विषय काढलास म्हणून…”
दीपा विचारात पडली होती. विकीचा व्याकूळ चेहरा तिला आठवत राहिला.

”पण त्याला सुधारायची संधीसुद्धा आपण द्यायला हवी ना?”
”मग काढ सुधारगृह… मला नको विचारूस.”
दीपा रात्रभर विचार करत राहिली.

त्या प्रसंगानंतरही तो तिला भेटत राहिला. तिनं त्याला ‘नाही’ म्हटलं होतं. पण तो सभ्यपणेच वागत राहिला. जणू त्यानं तिला काही विचारलंच नव्हतं. तो खरोखरच त्या विषयावर गंभीर आहे, असं तिला वाटायला लागलं होतं. एवढं खरं, की त्याचा सहवास तिला आवडायला लागला होता. जास्तीत जास्त वेळ त्याच्याबरोबर राहावं, असं तिला वाटायला लागलं होतं. ती त्याच्याबरोबर आता भरपूर फिरू लागली.
आणि एक दिवस तिनं त्याच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकली. त्यानं त्या वेळी पहिल्यांदा तिला जवळ घेतली. त्याचा स्पर्श प्रेमळ होता. संयमित होता. आश्वासक होता. तो सुधारलाय याची तिला खात्री वाटत होती.

विकीला त्या दिवशी आपण जग जिंकलंय असं वाटलं होतं. ‘साली… आधी आखडत होतीस काय? एका फडतूस अकाऊंटंटची मुलगी. माझ्याशी लग्न करायची स्वप्नं पाहतेयस? इथे कुणाला इंटरेस्ट आहे गं तुझ्याशी लग्न करण्यात? आणि करायचंच असेल, तर एखाद्या गर्भश्रीमंताच्या मुलीशी करेन. एवढी स्थळं येत असतात. हिला कळेल तेव्हा?
आणखी एक ब्रेकअप होईल आणि काय?… आपल्याला त्याची सवय आहे. तिलाही होईल.’

आणि एक दिवस विकी ज्या गोष्टीची वाट पाहत होता, ती आपोआपच घडून आली.

”विकी, शेफाली उद्या नाईट-आउट घेतेय.”
”मग?” आणि हळूच तो तिच्या कानात म्हणाला, ”मी येऊ?”
तिनं फक्त मंदस्मित केलं.

”नुसतं यायचं हं. चिटचॅटिंग करायचं.”
उद्या… उद्या तो दिवस उजाडणार… दिवस नाही… रात्र… धुंदावणारी… गंधाळलेली.
रात्री शेफाली आली.

”काय गं, उद्या रात्री मी नाहीये. राहशील ना एकटी?”
दीपानं मानेनंच नकारार्थ दाखवला.

”मग? कोण येणार आहे? विकी?”
तिनं होकारार्थी मान हलवली.

”पण आम्ही फक्त चिटचॅटिंग करणार आहोत.”
यावर शेफाली खळखळून हसली.

”त्यानं मलाही असंच सांगितलं होतं. दीपा, तुझा लेडी विश्वामित्र झालाय. सांभाळ बाबा…”
आणि असं म्हणून शेफाली गाढ झोपूनसुद्धा गेली. दीपाला मात्र रात्रभर झोप आली नाही. तिला आपले वडील, आई, भाऊ… सगळे आठवत होते. ‘असूदेत आपली मूल्यं मध्यमवर्गीय. पण याच मूल्यांचा भंग होऊ न देता आपण आजपर्यंत जपत आलो. किती विश्वासानं बाबांनी आपल्याला मुंबईला पाठवलंय.
पण मग स्त्रीचं स्वातंत्र्य.. .तिची प्रायव्हसी… तिची स्पेस?

आणि आपल्या स्वप्नाचं काय? आपणही व्हर्जिन असावं. आपल्याशी लग्न करणाऱ्यानंही असावं… पहिलेपणाचं अभूतपूर्व सुख दोघांनीही अनुभवावं.’
तिनं मनाशी काहीएक निर्णय घेतला आणि ती शांत झोपली.

विकी ठाकूरनं अंगावर त्याच्या आवडत्या परफ्युमचा स्प्रे मारला. आणि तो स्वत:चं देखणं रूप आरशात पाहू लागला. आज एका अभूतपूर्व सौंदर्याचा तो उपभोग घेणार होता. ‘अरे, आपल्यापुढे भल्या भल्या रूपगर्वितांचा शीलभंग झाला आहे. तर ही दीपाची बच्ची तर बाएं हाथ का खेल!’
घड्याळात साडेसात वाजले होते. शेफाली तर सात वाजताच निघून जाणार होती. म्हणजे आता दीपा एकटीच असणार.
चौदाव्या मजल्यावर तो लिफ्टमधून बाहेर पडला. त्यानं चौदाशे तीनच्या दरवाजाकडे पाहिलं आणि तो चक्रावला.
दरवाजाला एक भलंमोठं कुलूप होतं. तो नऊ, दहा, अकरा, बारा… चार वेळा येऊन गेला, पण दरवाजाचं ते कुलूप त्याला हसत राहिलं.
दीपा मोबाईललाही उत्तर देत नव्हती.
शेफालीही देत नव्हती.

सकाळी सात वाजता तो मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत होता, त्याच वेळी शेफालीची गाडी आत शिरताना त्यानं पाहिली. गाडीत ती एकटीच होती.

”शेफाली, दीपा कुठे आहे? मला बोलावलं होतं तिनं आणि…”
शेफालीनं त्याच्याकडे निर्विकारपणे पाहिलं आणि त्याला बरोबर चलण्याची खूण केली.
दोघं चौदाव्या मजल्यावर आले.
शेफालीनं कुलूप उघडलं. लॅचही उघडलं आणि हाक मारली.

”दीपा, कॉफी रेडी असेल तर दे गं.”

विकी बघतच राहिला. आतून बाहेर येत दीपा विकीला म्हणाली,

”सॉरी विकी, काही गोष्टी जपायलाच लागतात. त्यांचं संरक्षण करावं लागतं. त्यासाठीच तर कुलपं बनवलीत.”
‘इट्स ओके’ असं म्हणत आणि ओशाळं हसत त्यानं तिनं दिलेली कॉफी घेतली आणि तो बाहेर पडला.
दोघींनी चौदाशे तीनचं दार लावलं. विकीनं बाहेर कडीला अडकवलेल्या त्या कुलपाकडे पाहिलं.
ते कुलूप त्याच्याकडे बघून त्याला खिजवत होतं.

रवींद्र भगवते
ravindrabhagwate9@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.