Now Reading
कथा

कथा

Menaka Prakashan

पहाटे पहाटे वाजणार्‍या फोनच्या कर्कश रिन्गनं सुनीता गाढ झोपेतून जागी झाली. अशुभाच्या कल्पनेनं तिचं मन थरारलं. ‘‘उचल तो फोन आधी.’’ बाजूला झोपलेला तिचा नवरा नितीन खेकसला, तशी ती चटकन उठली. ‘‘मन्झी, अगं मोबाईल कुठे आहे तुझा? कधीपासून ट्राय करतोय. तीनदा तरी रिन्ग गेली असेल. शेवटी हा फोन लावला. नितीनरावही डिस्टर्ब झाले असतील अवेळी. पण माँला अ‍ॅडमिट केलंय रात्री. तू लवकर नीघ. मला कळव तसं. स्टेशनवर पाठवतो मी धीरजला.’’
‘‘हो, निघते. कळवते मी तसं.’’ तिनं अवरुद्ध गळ्यानं कसाबसा होकार दिला. दोन-तीन दिवसांपूर्वीच अनुभाभीचा पण फोन आला होता. ‘माँची तब्येत काही ठीक नाही, जमल्यास येऊनच जा’ म्हणत होतीच, पण माँबद्दलच्या त्याच त्याच तक्रारींचा पाढाही वाचत होती, ज्यावर काहीच उपाय नव्हता. पण आता जावंच लागणार होतं. ऑफिसमधल्या कामांचा डोंगर आठवून तिनं आवंढा गिळला.
‘‘मी नागपूरला जातेय. म्हणजे निघावंच लागेल. माँला अ‍ॅडमिट केलंय.’’ ती स्वगत बोलतेय, की नवर्‍याला सांगतेय, तिलाही कळत नव्हतं. नितीननं ‘हूं’ म्हणत कूस पालटली. माँला काय झालंय याच्याशी त्याला काहीच देणं-घेणं नव्हतं. नरमगरमच तब्येत असते तिची आजकाल, ठाऊकच आहे की त्याला. तिनं स्वतःच्याच मनाची समजूत काढली.
हॉस्पिटलमध्ये सुया टोचलेली माँची वळकटी पाहिली आणि मन्झीला भरून आलंं. आता ती अशीच जाणार का किल्मिषाचं गाठोडं मनात ठेवून? कालपासून हाच प्रश्‍न तिला छळत होता. नकळत तिचे डोळे वाहू लागले. ‘‘रिकव्हरी आहे म्हणालेत डॉक्टर. येईल हळूहळू शुद्धीवर.’’ बडकूभैय्या तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला.
‘‘मन्झी, तू थांब माँजवळ. मी आज दुकान उघडतो. तीन दिवसांपासून बंदच आहे. धीरजचीही एक्झाम जवळ आली आहे. नोकराच्या भरवशावर राहता येत नाही आजकाल.’’
ती भैय्याकडे मान हलवत बघत राहिली. गुलाबाचं सुंदर फूल कडक उन्हात सुकून जावं तसाच सुकलेला, केविलवाणा चेहरा दिसत होता त्याचा. ‘‘छुटकूला कळवलं की नाही? निघाला का तो? कधी पोचतो म्हणाला?’’ तिच्या अधीर प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करत भैय्या तिला पुन्हा काही सूचना देऊ लागला, ‘‘काही वाटलंच तर नर्सला बोलावून घे. धीरज येईलच नंतर तुझा जेवणाचा डबा घेऊन.’’
‘‘भैय्या, छुटकूला बोलावून घे ना तातडीनं. सांग तसं त्याला.’’
‘‘कळवलं आहे त्याला, बघू आता. यायला तर पाहिजेच त्यानं या वेळेस.’’
भैय्याच्या बोलण्यातली निराशा तिला जाणवली. ‘‘पण तू लगेच निघालीस हे फार बरं केलंस.’’ भैय्या मनापासून म्हणाला.
ती माँच्या अगदी जवळ गेली. माँच्या केसांवरून, सुरकुतल्या चेहर्‍यावरून तिनं मायेनं हात फिरवला. हिला आपला स्पर्श जाणवत असेल का? माँचा चेहरा निर्विकार होता. छातीचा भाता संथपणे हलत होता. ती हळूच पलंगाशेजारच्या खुर्चीवर बसली. तिला आता हॉस्पिटलमधला टिपिकल वास जाणवला. भक्ष्यावर श्‍वापदानं दबा धरून बसावं, तसा तो शांत एकांत वाटू लागला. आपण छुटकूला फोन लावून पाहू, तो ऐकेल का आपलं? ती खांद्यावर पर्स चाचपू लागली आणि तिच्या लक्षात आलं, निघताना अनुभाभीनं एवढी घाई केली, की आपण पर्स घरीच विसरलो.
एवढा निवांत वेळ फार क्वचितच मिळत असे तिला. अशा वेळेस मनातला आठवणींचा गुंडाळा काढून ती तो स्वतःभोवती लपेटून घेत असे.
ते तिघंही तिला ‘माँ’ म्हणत, याचं सगळ्याच नातेवाइकांना आश्‍चर्य वाटे. ‘आई म्हणत जारे’ असं कुणी कुणी त्यांना टोकतही असत. पण माँच त्यांना ‘आई’ म्हटलं, की रागे भरत असे. माँचं माहेर मध्यप्रदेशातल्या देवासचं. तिची माँ म्हणजे आई, ती तान्हुली असतानाच देवाघरी गेली. तिचा सांभाळ दादीबुआनं केला होता. त्यामुळे ‘‘माँ शब्द कहने के लिए मैं हमेशा तरसती रही।’’ तिनं एकदा मन्झीला तिचं लग्न झाल्यानंतर सागितलं होतं, तेव्हा ‘माँ’ शब्दाची एक निरगाठ उकलली, असं मन्झीला वाटून गेलं होतं. कारण तिच्या बाबांना माँनं बडकू, मन्झी, छुटकू अशी हाक मारलेली आवडत नसे, पण ते कामानिमित्त सतत फिरस्तीवर असत. माँच घराची कर्तीधर्ती होती. घरी आले तरी ते माँला एवढ्यातेवढ्यासाठी रागावत नसत, पण तिन्ही भावंडांनी आपसांत मराठीतच बोलावं, या बाबतीत मात्र ते आग्रही होते. बाबा घरी आले, की घराचं आनंदी गोकुुळ व्हायचं, विशेषतः मन्झीचं खूप कोडकौतुक व्हायचं. आयुष्यातल्या याच आठवणी तिच्यासाठी मखमली होत्या. नंतरचं जीवन खडतरच होत गेलं, तिच्यासाठी.
रूमचं दार उघडून नर्स, पाठोपाठ डॉक्टर आत आले. ती उठून उभी राहिली. तपासणी झाल्यानंतर ‘‘स्टेबल आहे आता, होतील लवकरच नॉर्मल,’’ असं म्हणाले आणि तिनं एक मोठ्ठा निःश्‍वास सोडला. माँनं पाय थोडेसे हलवले. तशी ती तिच्याजवळ जाऊन उभी राहिली. ‘माँ, माँ’ तिनं हलक्या आवाजात हाका मारल्या. पायांवरची चादर व्यवस्थित करून ती पुन्हा चेअरवर टेकली. बाबा लवकरच गेले आणि तिघांचंही बालपण कोमेजून गेलं. ते आजारी असतानाच तिनं टायपिन्गचा कोर्स करून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं, ते स्टेनोची नोकरी करतच. बडकूभैय्याच्याही आधी तिनं घर सावरण्यास हातभार लावला. ती तिचा सगळाच पगार माँच्या हातात देत असे. छुटकूचं तर शिक्षणच तिच्यामुळे पार पडलं होतं. बाबा गेल्यानंतर माँनं तिला, तिच्या पैशााला नेहमीच गृहीत धरलं होतं, अगदी ती सासरी गेल्यानंतरही.
धीरज दार लोटून आता आला, त्याच्या हातातली डब्याची पिशवी बघून मन्झी म्हणाली, ‘‘अरे, लवकर आणलास जेवणाचा डबा. नाश्ता करूनच तर निघाले होते मी.’’
‘‘आत्या, तुझी पर्स, मोबाईल आहे त्यात. सारखा वाजतोय, बहुतेक तुझ्या ऑफिसचे कॉल्स असावेत. म्हणून लवकर आलो. तू विसरलीस बहुतेक पर्स घरीच. सोबत डबाही घेऊन आलो. पुन्हा येणं-जाणं नको तेवढ्यासाठी.’’ तिनं पर्समधला मोबाईल काढून चेक करण्यास सुरुवात केली. नितीनचा एकही कॉल, मेसेज दिसला नाही, तशी हिरमुसली. पण तिच्या स्वभावानुसार त्याला पोचल्याचा मेसेज करून दिला तिनं.
‘‘आत्या, हे तुझ्यासाठी.’’
‘‘काय आहे हे?’’ ती काचेच्या बरणीतल्या गुलाबी द्रावणाकडे बघत म्हणाली.
‘‘डाळिंब ज्यूस.’’
‘‘माझ्यासाठी? अरे, माँसाठी असेल ते.’’
‘‘नाही, तुझ्याचसाठी. बाबांनी फोन करून आईला पाठवायला सांगितला. लगेच घे.’’ तिच्या हृदयातली एक बंद कळ दाबली गेली खटकन्. डोळ्यांतून वेदनेचा झरा वाहू लागला.
‘‘काय झालं आत्या? माँ तर ठीक होणार आहे, आई म्हणत होती.’’ धीरज गांगरून म्हणाला. ती कसनुसं हसली.
‘‘मन्झी, डाळिंबाचा रस मिळावा म्हणून तू मुद्दाम ताप आणलायस का?’’ माँ तिला रागावत होती. ताप आलेल्या बडकूभैय्याला रस देताना पाहून तिनंही रसासाठी हट्ट केला होता. माँनं रसाचा प्याला पाठीमागे लपवत तिला बाहेर पिटाळलं होतं. तत्क्षणी ‘मुद्दाम ताप आणलायस का?’ विचारणारी माँ खूप परकी, अनोळखी वाटत होती. आणि मग हे अंतर वाढतच गेलं. डाळिंबाच्या रसाची निरगाठ मनात पक्की गेली होती. ती माँसारखी, बडकू, छुटकूसारखी सुंदर नव्हती, गोरी नव्हती. माँ हेसुद्धा तिला सतत जाणवू द्यायची. अशा खूपशा गाठी जमा होत गेल्या होत्या मनात. आणि मग एक दिवस त्याचा स्फोट झाला तो माँमुळे छुटकूचं लग्न मोडू लागलं तेव्हा. ‘‘माँ आपल्या संसारात असेल, तर मी परत येणार नाही.’’ अंजलीनं त्याला निर्वाणीचा इशारा दिला. माँही जिद्दीला पेटलेली होती. मन्झी माँला समजावत होती, ‘‘छुटकूचा संसार सुखानं होऊ दे माँ. तो प्रेम करतो तिच्यावर. तू बडकूभैय्याकडे, नाहीतर माझ्याकडे राहा. काही दिवसांनी निवळेल सगळं.’’
माँ ऐकायलाच तयार नव्हती काही. आणि त्याच वेळेस तिनं मनाची जखम उघडी करून, भळभळून वाहून दिली होती. माँवर तोंडसुख घेतलं होतं, तेव्हाच डाळिंबी रसाची ती गोष्ट, तिनं लहानपणापासून मनात ठेवलेली बघून माँ चपापली होती, दुखावली होती. नंतर काय झालं ते कळलंच नाही. छुटकूनं तिची रवानगी इकडे केली, ते आजतागायत तिचं तोंडही बघितलं नव्हतं.
‘‘मन्झी, हे बघ, वाच आधी.’’ बडकूभैय्यानं आल्याबरोबर एक डायरी तिच्या हाती दिली. ‘‘काय आहे?’’ तिनं पानं पलटवत विचारलं. लहान मुलानं गिरवावं तसं, पानापानांवर ‘मन्झी, डाळिंबाचा रस पी’, ‘छुटकू, जाते मी, सुखी राहा’, ‘बडकू, खूप केलंस माझ्यासाठी तू’ असं लिहिलं होतं.
‘‘हे माँनं?’’
‘‘हो, मन्झी, मलाही आजच कळलं. तिच्या उशीखाली ही डायरी सापडली. आपण बोललेलं ती असं गिरवत राहिली, पानापानांवर. आणि हो, उद्याच्या फ्लाईटनं छुटकू आणि अंजली दोघंही येताहेत. बस, आता माँनं डोळे उघडायला पाहिजेत.’’
‘‘होय, मी त्याचीच वाट बघतेय. मनातल्या या निरगाठी विरघळायलाच हव्यात. त्यासाठी तरी माँनं डोळे उघडायला पाहिजेत, एकदा तरी!’’

वंदना दर्यापूरकर, अमरावती
vandu61@gmail.com
मोबाईल : ९४२२८ ४०६०४

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.