Now Reading
ओझं

ओझं

Menaka Prakashan

‘‘आई, हा मोबाईल घ्या. घरचा फोन बंद केलाय, हा फोन नीट वापरा. फार बोलत बसू नका. तुम्ही फोन केला, तर दोन शब्द बोला. फोनवर कुणी जास्त बोलू लागलं, तर ‘नंतर फोन करते’, किंवा कोणतंही कारण सांगून फोन बंद करा, नाहीतर…’’
‘‘पुरे झालं गं! समजलंय तिला. नंतर संध्याकाळी सांग. चल, उशीर होतोय. आई, निघतो आम्ही.’’ मुलानं बायकोच्या कंबरेला हात घालून तिला बाजूला घेतली. दोघं भरभर तिच्या खोलीतून निघाली.
सुनेनं दिलेला मोबाईल तिनं हातात घेतला. आता घरचा फोन बंद! मोबाईलवर जास्त बोलायचं नाही. संभाषण त्रोटक. दुसरीकडून कुणी फोन केला, जास्त बोलू लागलं, तर काहीतरी कारणं सांगून मोबाईल बंद करायचा.
मोबाईल न्याहाळता न्याहाळता तिच्या मनात नव्या नव्या प्रकट होणार्‍या सोयींबद्दल हसू आलं. एकदम वाटून गेलं, किती प्रगती झालीये माणसाची! सोयीच सोयी करून घेतल्या त्यानं. चालण्याचे, बोलण्याचे, काम करण्याचे कष्टच कमी झाले. या यंत्रांनी माणसाला सुखसोयींची गच्च भरलेली अलिबाबाची गुहाच उघडी करून दिलीये.
तिला तिचं तरुणपण आठवलं. तेव्हा पोरवयापासूनच मसाला वाटणं, शिकणं झालं. मग सासरी गेल्यावर तर ‘वाटणं’ इतकं असायचं, की कंबर मोडून जायची. पिठलं करायचं तर वाटा डाळ. पुरणपोळी करायची तर वाटा गोडाची डाळ. मसाला, चटणी तर रोजच! सणावारी तर वाटणाचं संकटच असायचं, पण सुस्कारासुद्धा टाकायचा नाही. प्रसन्न चेहरा ठेवून कामं करायची. पाव्हण्यारावळ्यांनी घर भरायचं. मोकळेपणानं व्हायचं सारं. कधीकधी नणदाबाळांसाठी कर्ज काढून सण करावा लागायचा, पण त्याचं वैषम्य वाटत नसायचं.
पुरणपोळीसाठी डाळ वाटतानाची गंमत तिला आठवली म्हणून हसू आलं. सणाच्या दिवशी नणदांच्या-जावांच्या मुलांनी अंगण भरून जायचं. पुरणाचा वास आला, की पोरंबाळं धावत यायची. ‘मामी, पुरण घेऊ’ म्हणत पसापसा पुरण उचलायची. ‘कसं झालं बघू’ म्हणून काही बडी मंडळी पण हसत पुरण घ्यायची. असं खाण्यावारी पुरण जाणारच, हे लक्षात ठेवून किलो- छे! कुठलं किलो? शेरभर डाळ जास्तच शिजवायला घ्यायची. पुरण कमी पडायचं नाही. भरपूर पुरणपोळ्या व्हायच्या. पुरणाच्या त्या स्वयंपाकाचा शीण यायचा तो धरणीला पाठ टेकल्यावर. मग आठवायचं,
‘‘वहिनी, स्वयंपाक छान झाला.’’
‘‘मामी, केवढी मोठी पुरणपोळी! आणि पुरण तर गच्च भरलेलं! मस्तच! आमटी पण झकास!’’
हे सगळं स्तुतीचं बोलणं. हा स्तुतीचा लेप पाठीच्या दुखण्यावर आपोआप लागायचा. शरीर-मन कसं तृप्त असायचं. कामाचा एवढा व्याप असूनही ‘आपण कित्ती केलं?’ ही भावना मनात आलीच नाही. मनात मोकळेपणा असायचा. सासरी जाणार्‍या नणदांच्या डोळ्यांतलं पाणी आपल्या डोळ्यांत भरून यायचं. त्या वेळी खर्च किती झालाय, होतोय, असं मनात यायचंच नाही. ‘आपलं कर्तव्यच आहे हे. त्यात काय एवढा मोठा डोंगर आपण उचलला?’ असंच वाटायचं.
आता सुखसोयींची बरसात झालीये. आता मसाला वाटावा लागत नाही. मिक्सर आले. चिरण्या-कापण्याची सोय झाली. रेडिओला मागे टाकून टीव्ही आले आणि आता तर आपल्या घरात यंत्रांचं युगच अवतरलंय. बसल्या जागी जग हातात आलंय. आपल्या नजरेच्या टप्प्यात. मुठीत. माणसाच्या बुद्धिमत्तेची ही जादू, ही किमया. सुखाच्या राशीत कसं लोळता येईल यासाठी रोजच होणारे प्रयोग. मनोरंजनाचं तर आभाळच खाली उतरलंय. सोयी पदरात पडू लागल्या. माणूस बदलत चालला. आपलेपणा संपला. नात्यातला विरळपणा वाढला. स्वतःकडे जास्त लक्ष देऊ लागली माणसं. सौंदर्यस्पर्धा वाढल्या. आपण जास्तीत जास्त सुंदर कसे दिसू याकडे बाईचा, पुरुषाचा कल वाढला. पांढर्‍या केसांची भीती वाटू लागली. त्यासाठी कलप आले. टक्कल पडू लागल्यावर टकलावर केस उगवून देणारे डॉक्टर जन्माला आले. सोप्यात सोपं म्हणून टकलावर झाकायला भरघोस केस असणारे कृत्रिम टोप आले, त्यानं माणूस खुलला. पांढर्‍या केसांचं, टकलाचं भय संपलं.
पैशाचं महत्त्व खूप वाढलं. सोयीसाठी खूप पैसा हवाय, मग पैशासाठी पळणं आलं. घरासाठी, सजवण्यासाठी, नटण्यासाठी, मजा करायला, हॉटेलचं खाण्यासाठी, सहलीसाठी, छानछौकीसाठी पैसा हवा! पैसा आणि पैसाच! पैशांसाठी कामं वाढली. फक्त जगायचं आपल्यासाठी, ही भावना वाढीला लागली. नात्यांचा कचरा झाला. आपली बायको, आपली मुलं आणि आपण! त्रिकोणी, चौकोनी, आखीवरेखीव कुटुंबं! इतर नात्यांचं जग आक्रसून गेलं. कोमेजून गेलं. नंतर नंतर संपूनच गेली काही नाती. राहिला फक्त पाचोळाच. लग्न, बारसं, मर्तिक इतपत उडणारा नात्यांचा पाचोळा!
कुरीअरनं आलेल्या पत्रिका. ‘या नाहीतर नका येऊ, पत्रिका दिलीये,’ असं स्पष्ट सांगणार्‍या. अगत्य संपलंय नात्यातली अंतरं इतकी वाढली, की ‘भेटीसाठी’ हा शब्दच संपला. लग्नघरी न जाता परस्पर कार्यालयातच माणसं जाऊ लागली. जेवताना, किंवा कार्य संपेपर्यंत खुर्चीत बसल्यावर जे बोलणं होईल तेवढंच. त्या बोलण्यातला आत्मीयतेचा-मायेचा ओलावा संपला. ‘हाय-फाय’ जग आलं? हाय-फाय जगात काय असणार? नुसतीच ‘हाय-हाय’ मागे वळून बघायचं नाय!
पैशानं माणसाला बाह्य जगातले अनोखे रंगढंग आपल्या अंगाखांद्यावर मिरवायला मिळाले. बाह्यमन खूप विशाल झालं. सुखाचा आस्वाद देणारं. तर अंतर्मन खुरटं झालं. इतरांची जी चिंता होती, ती संपली. आई-बापासाठी आश्रम आले. मुलांची सोय झाली. ही अडगळ गेल्यानं तरुणाई खूष झाली. तारुण्याच्या सुंदर बगिच्यात पडलेलं वार्धक्य! तेही आता आश्रमात गेलं. कर्तव्याची माती झाली आणि त्यात स्वार्थाचं उदंड पीक आलं. भरभरून वाढू लागलं. आभाळाला टेकण्याची ऊर्मी मनात घेऊन.
परवाची गोष्ट तिला आठवली. अंगणातली बाग फुलांनी, सुगंधानं भरलेली. आपल्याला मोहवणारी बाग. ओले केस वार्‍यानं छान सुकणार होते. पेपर वाचत, मुद्दाम केलेल्या सिमेन्टी बेन्चवर बसलो होतो. बंद गेटच्या आत. गेट उघडं असलं, की कुत्री-मांजरी बागेत येतात. घाण करून जातात. मग सायली चिडते. तासभर ओरडा करते. म्हणून गेट बंदच असतं. बागेत बसल्यावर सुगंधाचा वास, पानांची सळसळ आणि वार्‍यानं सहज सुकणारे केस! असे अनेक लाभ मिळतात.
इथे झोपाळा असावा, असं बर्‍याच वेळा वाटलं, पण सायलीला आवडत नाही. मग तो विचार सोडूनच दिला. तिला हसू आलं. आपण काय काय सोडून दिलं? खूप खूप. दुसर्‍याला आवडत नाही म्हणून. दुसरा तरी आपलाच, आपल्याच कुटुंबातला! त्याचा विचार अगोदर व्हायचा, मग आपला. त्याला किंवा तिला आवडेल का, असंच यायचं मनात. अचानक सायलीचा आवाज कानांवर आला. तिचं मन भूतकाळातून पुन्हा वर्तमानकाळात आलं.
सायली म्हणाली, ‘‘केस छान सुकताहेत तुमचे! एवढे पाठीवरून केस पसरलेत. चांगले लांब आणि भरदार आहेत की! कशामुळे?’’ तिनं स्मित केलं आणि म्हटलं,
‘‘माहीत नाही. लहानपणापासून आहेत. आईचे केस लांब होते म्हणून असतील.’’
फुलं घेऊन घरात जाता जाता सायली जे पुटपुटली ते ऐकून तर खूप हसू आलं, पण तिनं ते दाबून टाकलं.
ती म्हणाली, ‘‘टेन्शन नाही ना कसलं! मग केस कसे गळणार? म्हणून तर एवढे लांब आणि भरगच्च आहेत. भाग्यवान आहेत या! तरुणपण छानच गेलं असणार. आणि आता म्हातारपणी पण चेहर्‍यावर तजेला आहेच! कसलीच चिंता नाही ना, असतं एकेकाचं नशीब. दुसरं काय!’’
सायली घरात गेल्यावर काही बोलली असली, तरी पुढचं काही तिला ऐकू आलंं नाही.
‘सायली बोलली ते बरोबरच आहे. टेन्शन हा इंग्रजी शब्द नव्हता मनात त्या वेळी. चिंता, काळजी हे शब्द होते. सगळ्याच बाबतीत काळजी घ्यावी लागायची. महिन्याचं सामान महिनाभर पुरवलंच पाहिजे, असा दंडक होता. पै-पाहुणा गृहीत धरलेला होता. सासूबाई सर्व साहित्य काढून देत फडताळातून. नोकरीचं कौतुक? मुळीच नाही. खुलं बोलणं नाही, घरी मोलकरीण नव्हतीच. नोकरीवरून आल्यावर घरची कामं. घरची कामवाली व्हायचं मग! नोकरीची साडी बदलून कामं आणि कामंच! उसंत नाही. बसणं, गप्पा काही नाही.
मोठे केस म्हणून जावा, नणदांना वैषम्य होतं. म्हणायच्या, ‘या राक्षसी केसांना मणभर तेल आणावं कुठून?’
गौरवर्णाला, मोठ्या केसांना, चविष्ट स्वयंपाकाला मिळाला पुरस्कार. तो होता दुःस्वास! तिरस्कार! मत्सर आणि हेवा! प्रेम-माया नव्हतीच. तरी पण देवाचं देवपण आपल्या पाठीशी होतंच. मानत होतो त्याच्या देवत्वाला. म्हणूनही असेल सौंदर्य आणि प्रसन्नता हातात हात घालून उभीच होती. उदासीपणा नाहीच उमटला चेहर्‍यावर. त्याचाही आगडोंब होताच सर्वांच्या मनात.
‘माणसं अशी का वागतात? घरातली असून?’ या प्रश्‍नाचं उत्तर कधी मिळालंच नाही. आणि आता तर प्रश्‍न-उत्तरांचा पिच्छाच संपवून टाकलाय.
इतरांचं नाही वाटायचं काही, पण पतीचा पण आधार नव्हता. याची सल मनाला विद्ध करायची. आपल्या सुंदरतेला गालबोट लावून जावा-नणदांनी त्याच्या मनात संशयाची सुई टोचलेली. त्यानं तो नेहमीच संशयाच्या सावलीत उभा असलेला. ही ज्वाला अंगावर लपेटून जगलो आपण.
आज घरात आलेली मुलगी-सून म्हणते, ‘तरुणपण टेन्शनविरहित गेलं आणि आता म्हातारपणसुद्धा टेन्शन नसलेलं! नशीबवान आहत!’
सुनेनं दिलेला हा आहेर पण आपण स्वीकारलाय. मत्सराचं वारं आता सुनेकडून पण अंगावर भिरकावलं जातंय. त्याचं काय एवढं वाईट वाटून घ्यायचं? इतकी सवय झालीये, की आपण ते मत्सराचं ओझं मनावर घेतच नाही. शांतपणे ढकलून दिलं.’
स्वच्छ, शांत मनात आता कसलेच तरंग नकोत. त्यामुळेच मनाच्या प्रसन्नतेला कुठेही टवका पडत नाही. मनावर आता कसलंच ओझं नसतं. पैशाचं, हेव्यादाव्याचं, मत्सराचंं. कसलंच ओझं नसलेली ती वृद्धत्वाचा डोलारा मस्तपैकी सांभाळत आहे.
तिच्या कल्पनेवर ती मनसोक्त हसली. ते हास्याचं चांदणं मग तिच्या गालभर पसरत राहिलं.

नलिनी भोसेकर, पुणे
मोबाईल : ७७२०० ३६७०८

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.