Now Reading
एकांत

एकांत

Menaka Prakashan

संध्याकाळ होत आली होती. सूर्य थोडासा रेंगाळत डुबायला निघाला होता. दिवसभराच्या भटकंतीनंतर शिणून हातपाय पसरून झोपायच्या तयारीत असल्यासारखा वाटत होता. संध्याकाळच्या अस्वस्थ करणार्‍या वातावरणात उदासी असतेच, ती थोडी गडद झाली होती. माझी पावलं जशी जड झाली आहेत, तशी सूर्याचीही झाली आहेत बहुतेक. माझं ठीक आहे, आता याला काय झालं? याला कुणी त्याचं स्थान दाखवून दिलं?

या शहरात आल्यापासून नियमितपणे दर रविवारी मी नाहीदच्या घरी जात असे. वर्किंग वुमन होस्टेलवर राहून जिवाचा कोंडमारा व्हायचा, त्यातून मोकळीक मिळवण्यासाठी जात असे. या शहरात ती सोडून कुणी ओळखीचं नव्हतं आणि होस्टेलपासून तिचं घरही जवळ होतं. नाहीदची आणि माझी कॉलेजमध्ये असल्यापासून छान मैत्री होती. तिचं कॉलेज सुटलं, तरी टिकून राहिली होती. आमच्या कॉलेजच्या ग्रुपमधल्या सगळ्यांशी तिची मैत्री टिकून आहे. आज पहिल्यांदाच मला समजलं होतं, की मी तिला जितकी जिवलग मैत्रीण समजते, तेवढी ती मात्र मला समजत नाही. याचं आतून मला प्रचंड दुःख झालं, अपमान वाटला आणि शब्दांत नीट सांगता येणार नाही, पण काहीतरी तुटलं.

खरंतर मी या शहरात आले तीच नाखुषीनं. कुठून ती पोस्ट गॅज्युएशन एंट्रन्सची परीक्षा पास झाले, असं मला झालंय. नसती झाले तर कायमची ब्याद टळली असती. दोन वेळा सिलेक्शन नाही झालं, पण आई-बाबांनी खूप आग्रह करून पुन्हा द्यायला लावली. मी तर तशीही म्हणजे, पी.जी. न करताही खूष होतेच की. पोस्ट ग्रॅज्युएशनला अ‍ॅडमिशन मिळाली ती इथे. मला माझं घर सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती. मला या कल्पनेनंच रडू यायला लागलं होतं. पण आई-बाबा खूपच खूष झाले होते. त्यांनी तयारी करायला सुरुवात केली. मी त्यांना असं म्हटलं असतं, की मला एकटी राहायची भीती वाटतेय, किंवा एकटेपणाची भीती वाटतेय, तर ते हसले असते, कुणीही हसेल. चोवीस वर्षांची मुलगी असं बोलतेय म्हणून. पण हो, मला एकटेपणा सहन होत नाही. नुसतं घुम्यासारखं बसणं मला जमतच नाही. माणसं हवीत आसपास. आजी, आजोबा, आत्या वगैरे असलेल्या कुटुंबात मी मोठी झाले म्हणून असेल कदाचित. आमच्या घराला कुलूप लागलेलं मी आजी जाईपर्यंत… म्हणजे अगदी परवापरवापर्यंत पाहिलेलं नव्हतं. आता एकदम जायचं, अख्ख्या खोलीत एकटीनं राहायचं. धास्तावलेच होते मी. सगळं एकटीनं करायचं, पण निरुपाय झाला होता. म्हणून यावंच लागलं. पी.जी.ची अ‍ॅडमिशन सोडली असती, तर सर्वांनी वेड्यात काढलंच असतं आणि मुख्य म्हणजे आई-बाबांनी तसं होऊ दिलं नसतं.

कॉलेजचं होस्टेल चांगलं नव्हतं म्हणून या महागड्या होस्टेलमध्ये राहायला लागले. ‘‘नाहीद, मी अशी दर रविवारी येते. तुला त्रास तर नाही होत?’’ एकदा तिला मी सोफ्यावर आरामात पडून टीव्ही पाहताना विचारलं होतं. तिचं घर आता मला परकं वाटत नव्हतं. सोफ्यावर पाय वरती घेऊनसुद्धा बसत होते.
नाहीद मोठे डोळे करत म्हणाली होती, ‘‘अगं, असं काय म्हणतेस? मला खूप बरं वाटतं तू येतेस तेव्हा. यायलाच पाहिजे माझ्याकडे हक्कानं.’’
‘‘शफीला… अं… जीजूंना माहीत आहे ना?’’ तिच्या नवर्‍याला ‘शफी’ असं एकेरी बोलवायचं नाही, ‘जीजू’ म्हणायचं, असं तिनं आम्हा सगळ्या मैत्रिणींना बजावून सांगितलं होतं. आम्हाला गंमत वाटली होती, हसूही आलं होतं आणि असं काहीतरी वेगळं फिल्मी, भारी वाटलं होतं. तिच्या लग्नात तिला मोठे सोन्याचे हार, हातभर बांगड्या, मोठी नथनी वगैरे घालून भारी वजनदार लेहंगा घालून पाहिलं होतं, तेव्हा आपणही आपल्या लग्नात असंच तयार होऊ, असं सगळ्या मैत्रिणींच्या मनात आलं होतं. आम्ही सगळ्या भरपूर नटलो होतो, खूप मजा केली होती. सगळ्या करवल्या… मिरवल्या. मग तो नाहीद-शफीचा निकाह असला, तरी काय झालं?
‘‘हो, माहितंय ना. आजकाल वेळ कुठे असतो त्यांना. दोन-तीन दिवसांच्या टूर असतात काही वेळा.’’ ती म्हणाली.

मला या उत्तरानं बरं वाटलं, पण तिनं उत्तर द्यायचं टाळलं असतं, तरी मी येतच राहिले असते. वर्किंग वुमन होस्टेलमध्ये इतरांशी फारसं जुळणं अशक्य वाटत होतं. काहीजणी वयानं मोठ्या होत्या, नोकरी करणार्‍या होत्या, काही माझ्या वयाच्याही होत्या आणि खरंतर बोलचाल वाढवायचा प्रयत्न मीच केला नव्हता. कॉलेज झाल्यावर मी लायब्ररीमध्ये बसायची. वेळ घालवायला आणि होस्टेलवरच्या एकटेपणाची भीती वाटते म्हणून. होस्टेलवर शक्य तितक्या उशिरा पोचायचं, जेवायचं आणि झोपायचं. पुन्हा दुसर्‍या दिवशी कॉलेज. तिथे मात्र सम (दुःखी) विचारांचे मित्र-मैत्रिणी मिळायला सुरुवात झाली. प्रोफेसर्स, विद्यार्थी, ज्युनिअर्स, सीनिअर्स… बरेचजण. मला कॉलेजमध्ये जायला आवडायला लागलं. बराचसा वेळ तिथेच जायचा. पहिल्या वर्षी अभ्यास भरमसाट नसतो, त्यामुळे मोकळा वेळ गंमतजंमत करायला मिळायचा. तिथेही ग्रुप झाला आणि मला थोडं स्थिरस्थावर झाल्यासारखं वाटायला लागलं. असं असलं, तरी रूम उघडल्यावर अंगावर येणारा भकास एकटेपणा भीतीदायक वाटत होता.

मला नाहीदचा हेवा वाटायला लागला होता. शफी संध्याकाळी घरी येत असेल. तिला एकटेपणा कधीच वाटत नसेल, माझं पाहा. एखादा बॉयफ्रेंड तरी असायला हवा होता आपल्याला. त्यानं रोज संध्याकाळी फोन केला असता. मग मीही इतर मुलींसारखी तासन्तास त्याच्याशी बोलले असते. किती आधार वाटला असता, पण बॉयफ्रेंड वगैरे कधी जमलंच नाही. लग्न तर शक्यच नाही. सध्या फक्त अभ्यास करायला हवा. खूप राग आला, आई-बाबांचा, स्वतःचा,एंट्रन्स एक्झामचा. नाहीद नेहमी खूष दिसते. घरात काम करत असते. शेजारीपाजारी, मोलकरणी वगैरे लोकांशी बोलत असते. तिचं आयुष्य माझ्यापेक्षा किती छान आहे. शफी तिला सगळं पुरवतो. कशी टेचात राहते. नाही शिकली ती, पण काय बिघडलं? मला रडूच आलं. रडावं पण एकटंच लागणार. आई पण नाही समजूत घालायला.

माझे आई-बाबा दोघं पुरोगामी विचाराचे आहेत. थोडे कमी असते, तर बरं झालं असतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यांच्यापुढे मीच जुनाट मतांची, भित्री भागुबाई आहे. मुलीसाठी सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि मग लग्न. तिनं खूप शिकावं, कर्तृत्व गाजवावं, स्वतंत्र व्हावं आणि मग करावं लग्न. विचार करून करावं. नाही केलं तर… तर तेही ठीकच आहे, असे अत्याधुनिक विचार दोघांचे आहेत. इतरांना हेवा वाटावा असे. नाहीदचं लग्न झालं, तेव्हा आई-बाबा हळहळले होते. ‘पोरीला शिक्षण तरी पुरं करू द्यायचं होतं, मग करायचं लग्न,’ असं कळवळून म्हणाले होते.

नाहीद खरंतर माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवायची. अभ्यास खूप करायची, पण तिचं शिक्षण अर्धवट राहिलं. तसं तिच्या सासरच्या लोकांनी शिक्षण पूर्ण करून देऊ, असं आश्वासन दिलं होतं, पण करू मात्र दिलं नाही. नाहीदनं या विषयी कधी दुःख व्यक्त केलं नाही. आम्हीच तिला भेटायला गेलो होतो मुद्दामहून. तेव्हा तिला खूप सांगितलं होतं, ‘पूर्ण कर डिग्री, आम्ही नोट्स देऊ वगैरे.’ तशी ती साधी सरळ मुलगी. सगळ्यांना आवडायची. नेहमी हसरी, कधीही कसलीही तक्रार नाही. तिचे मोठे डोळे, बारीक बांधा आणि गालांवर खळ्या पडत हसण्याची सवय. ती सुंदर या कॅटॅगरीमध्ये येत नसली, तरी मोहक आहे. ती म्हणाली होती, ‘‘मी पैसा कमावण्याची गरज नाहीये. मग उगीच शिकून काय फायदा, असं अम्मी म्हणतात.’’ आई म्हणाली होती, की पण नाहीद काय म्हणतेय हे कुणी विचारात घेतलं का? आईचं ना, काहीतरी वेगळंच सुरू असतं.

प्रत्येक परीक्षेच्या आधी अभ्यासाशी अटीतटीचा सामना सुरू असताना हटकून मला या वाक्याची आठवण यायची आणि मी अधिकच तिचा हेवा करायची.
वाटायचं, हा पी.जी.चा नाद सोडून दिला (देऊ दिला) असता, तर काय बिघडलं असतं? शिक्षण संपलं असतं. मग स्वतःची प्रक्टिस, किंवा कुठे जॉब केला असता. बरा होता की हाही ऑप्शन. आणि नाहीतर नाहीदसारखं लग्न केलं असतं. सगळेच प्रश्न सुटले असते. एकटेपणा तरी आला नसता. इथे येण्यापूर्वी एकदा लाज कोळून पिऊन मी तिरीमिरीत म्हणालेच आईला ‘‘नाहीद माझ्यापेक्षा किती लकी आहे, लग्न करून संसार करतेय आणि मी आता एकटी राहणार तीन वर्षं.’’ एक शेवटचा प्रयत्न करून पाहिला होता, पण आईनं गालातल्या गालात हसून दुर्लक्ष केलं होतं.

अशीच मी त्या दिवशी तिच्याकडे गेले होते. २६ जानेवारीची सुट्टी होती. आधी वाटलं, शफी घरी असेल, आज नको जाऊया. पण नंतर एकटेपणा सहन होईना, म्हणून तिला फोन केला. तिला विचारलं, की ‘शफी आहे का घरी?’ तर म्हणाली, की ‘तो आठ दिवसांसाठी अम्मी-अब्बूला भेटायला गेलाय.’ मला एवढा आनंद झाला. आजचा दिवस छान जाणार. दुपारच्या वेळी तिच्याबरोबर गप्पा मारू, छानपैकी खाऊ, म्हणजे रात्री जेवणाची गरज पडणार नाही. शफी नाहीये म्हणजे ती एकटीच आहे, तिलाही बरं. मी लगेच टू व्हीलर काढली, किक मारली आणि भुर्र निघाले. नाहीदचा एक बेडरूमचा फ्लॅट आहे. त्यात आवश्यक ते सगळं आहे. तिच्या अम्मीनं दिलेलं बरंच काही आहे आणि आम्ही मैत्रिणींनी दिलेला मायक्रोवेव्ह पण. तिनं सगळं सुंदर स्वच्छ ठेवलंय. भरतकाम वगैरे करून सुंदर कव्हर घातलीयेत. ती असं सगळं काही म्हणजे भरतकाम, विणकाम, शिवण, स्वयंपाक वगैरे करण्यात हुशार आहे. मला यातलं काहीच येत नाही, असं मी आईला बोलून दाखवलं, तर ती म्हणाली होती, ‘‘तुला पण येईल, शिकशील तेव्हा येईल. तुला मुद्दामहून काही मी शिकवलं नाही.’’ आई माझी वेगळीच आहे, म्हणजे विचित्र. नाहीदच्या अम्मीसारखं हे पण शिकवायचं होतं मला.

ती आज थोडी स्थूल दिसत होती. चेहरा थोडा काळवंडलेला होता. लग्नानंतर होतात बायका जाड्या. मी तिला विचारलं, ‘‘तू फमिली प्लॅनिंगच्या गोळ्या अजून घेतेयस?’’ ती दचकून म्हणाली, ‘‘कुणी सांगितलं? एक दिवसही घेतली नाही. आम्हाला हवंच आहे बाळ.’’
आणि एकदम इतके दिवस मला न सुचलेला, न पडलेला प्रश्न मी तिला विचारला, ‘‘नाहीद, तुझी तर जॉईंट फॅमिली होती ना. मग तू इथे…’’ ती आधी नुसतीच हसली. ‘चाय पिओगी’ वगैरे विचारून विषयांतर करायचा प्रयत्न केला. मग मी अचानक लक्षात आलेला दुसरा प्रश्न विचारला, की ‘तू पण जायचंस जीजूबरोबर. का नाही गेलीस?’’ मी अडूनच बसलेय बघितल्यावर म्हणाली, ‘‘अगं, यांच्या अम्मी मुलासाठी खूप पाठी लागल्या होत्या. कुरबुरी व्हायला लागल्या. मग हेच म्हणाले, की आम्ही वेगळं राहतो.’’
किती चांगला नवरा आहे शफी. हिला किती जपतो. एवढ्या मनस्तापात मूल होणार नाही म्हणून इथे थाटात राणीसारखं ठेवलंय. दोघंच आहेत, मजा करतायेत. त्याची साथ आहे म्हणून ती आनंदात राहते आहे. हनीमून चाललाय.’’
‘‘ओह! गुड, बरं झालं.’’ मी म्हटलं, ‘‘मग आता?’’ ती गप्प बसली.
तिचा चेहरा काही वेगळं सांगत होता. मी तिला पुन्हा खोदून विचारलं, तेव्हा ती म्हणाली, ‘‘माझी ट्रीटमेंट सुरू आहे. गोळ्या आहेत काही. त्यामुळे वजन वाढतंय आणि चेहर्‍यावर मुरूम पण आलेत.’’ मी स्तब्ध राहिले. मग ती रडवेली होऊन म्हणाली, ‘‘अन्या, मला ओव्युलेशनसाठी गोळ्या देतात आणि ज्या दिवशी ओव्युलेशन होणार असेल, त्या दिवशी कितीदा शफी घरी येतच नाहीत, म्हणजे येऊ शकत नाहीत. मग कसं होणार? पुन्हा मलाच दोष देतात अम्मी…’’ ती एकदम गप्प झाली. डोळे पुसू लागली. मला धक्का बसला होता.

मी अतिशय दुखावली गेले. तिला मी माझं मनातलं सगळं काही सांगते, अगदी लहानसहान प्रॉब्लेम्स पण. व्हायवा चांगली गेली नाही म्हणून रडलेसुद्धा आहे तिच्यासमोर आणि तिनं मात्र एवढं मोठं दुःख लपवून ठेवलं. माझ्याबरोबर वाटून घ्यावं, असं तिला का वाटलं नाही? मी तिला सख्खी मैत्रीण समजते, अगदी मला बॉयफ्रेंड नाही याचंही रडगाणं अनेकदा गाऊन झालंय. ही मला कुणीच समजत नाही? ज्या हक्कानं मी इथे यायला हवं, त्याच हक्कानं तिच्या दुःखात तिनं मला सहभागी करून घ्यायला हवं होतं. मला रडूच फुटलं. तिला वाटलं, तिच्यासाठी रडते आहे. ती माझा हात थोपटायला लागली. मी तिला काहीच बोलले नाही. खरंतर खडसावून विचारायला हवं होतं, पण अचानक मला आमच्या दोघींत असलेली अदृश्य दरी दिसायला लागली. लगेच निघून जाता येईना म्हणून काही वेळ तिथेच बसले. मग अभ्यासाचं निमित्त करून जायला निघाले. आणि तिनं दिलेलं काही खाल्लं नाही. पोट खराब आहे, असं सांगितलं. तिनं मला तिच्या आयुष्यातली माझी जागा दाखवून दिली होती.

यानंतर परीक्षा असल्यामुळे मला न जायला निमित्त मिळालं होतं. ती मधूनच कधी फोन करून चौकशी करायची. मीही उत्तर देत होते. परीक्षेच्या अभ्यासाच्या ताणाखाली अपमानाचं ओझं हलकं झालं होतं. धार बोथट झाली होती. मनात तिच्याबद्दल कणव दाटून यायला सुरुवात झाली होती. अभ्यासाची इतकी भरभक्कम सोबत होती, की रूमचा भकासपणा लक्षात येत नव्हता. एकटेपणा आता मला आवडायला लागला होता. स्वतःशी संवाद करणं आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलणं, हेही आवडायला लागलं. मी तिच्याकडे पुन्हा फेरी मारणं सुरू केलं. महिन्यातून एखाददा जायला लागले. प्रत्येक वेळी ती अधिक स्थूल, अधिक काळवंडलेली दिसायची. बेढब दिसायला लागली होती. मंद हालचाली करत होती. तिची लेप्रोस्कॉपी वगैरे झाली, असं म्हणाली.

तिच्याकडे पाहून मला वाईट वाटायचं. मी तिला एकदा न राहवून म्हटलं, ‘‘मूल इतक जरुरी आहे का? जिवापेक्षा जास्त?’’ तिनं आश्चर्यानं माझ्याकडे पाहिलं, जणू काय वेडपटासारख बोलतेय. मग म्हणाली, ‘‘हवंच की. शफीना हवंच आहे आणि… मग काय उरतं गं?’’ तिला ही कल्पनाच सहन झाली नसावी. तिच्या आयुष्याचा उद्देश मूल जन्माला घालणं हाच आहे, हे तिच्या डोक्यात पक्कं बसलं होतं. मी तिला अधिक काही विचारलं नाही, पण शफी तिला का समजावत नाहीये, किंवा साथ देत नाहीये, हा प्रश्न मला भेडसावत राहिला. ती माझ्यापासून काही लपवतेय, असं मला वाटत राहिलं. केवळ एवढंच नाही, अजून काही आहे. आताशा ती नेहमीसारखी नीटनेटकी राहत नाही, असं मला वाटत होतं. तिच्या फ्रीजमध्ये भाज्या, फळं फारशी नसत. तिनं केलेले वेगवेगळे पदार्थ ती आवर्जून खाऊ घालायची. बर्‍याच दिवसांत तिनं असं नवं काही केलेलं दिसत नव्हतं. मी तिला म्हटलं, ‘‘शॉपिंगला जाऊया. येतेस? मला टॉप्स घ्यायचेत.’’ तर सरळ नको म्हणाली. ती विरजलेली दिसतेय, काहीतरी बिनसलंय, पण मला सांगत नाहीये. मला तिथे परकं, पाहुण्यासारखं वाटायला लागलं. पहिल्यांदाच.
यानंतर माझं तिसरं वर्ष सुरू झालं आणि कॉलेजच्या होस्टेलवर राहणं कम्पल्सरी झालं. तिसरं वर्ष अगदी धावपळीच वर्ष. नाहीदच्या घरापासून होस्टेल खूप दूर होतं आणि आता वेळ अजिबात नव्हता, त्यामुळे तिच्याकडे जाणं बंदच झालं. होस्टेलमध्ये फारश्या सोयी नसल्या, तरी आसपासच्या मुली मैत्री करण्यासारख्या होत्या, काही मैत्रिणीच होत्या. यामुळे या खोलीशी माझं बर्‍यापैकी जुळायला लागलं. सकाळी खिडकीतून सूर्य वर येताना दिसतो, पलंगावर पाठी उशी टेकून बसलं, तर जास्त आरामशीर वाटतं, वगैरे समजायला लागलं. मी एक-दोन सजावटीच्या वस्तू आणून खोलीत लावल्या. विंडो चाइम्स लावलं. स्टडी टेबलजवळच्या खुर्चीला आरामदायक कुशन आणलं. खोली आता भीतीदायक वाटत नव्हती आणि एकटेपणाशी माझी मैत्री झाली होती.

आता थीसिस पूर्ण करायचा होता, परीक्षा होती. मला विचार करायला फारसा वेळ मिळायचा नाही. थीसिस झाला, परीक्षा झाली आणि मोकळं वाटायला लागलं. अजून काही दिवस इथे राहून मग घरी परतायचं होतं. डोक्यात कापूस भरल्यासारखं वाटत होतं. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर इतका मोकळा श्वास घ्यायला मिळत होता. एकदाचं पी.जी. झालं होतं. पास झालेच आहे, प्रोफेसर्सनी सांगितलं होतं आणि आणखी मार्क्स वगैरेमध्ये मला अजिबात रस नव्हता.
मी एकटीच शांतपणे रूममध्ये बसले होते. आता एकटेपणाही जाणवत नव्हता. जणू तो माझ्यात सामावलेला होता. आता हा एकटेपणा भंग पावू नये, असं वाटू लागलं. स्वतःची सोबत आनंदात जगायला पुरेशी आहे, आता कुणी मी आणि एकटेपणात घुसायला लागला, तर नकोसा वाटेल. हातात वाफाळत्या कॉफीचा कप आहे, वाफा चेहर्‍याला सुखावत आहेत, मनात कसलाही ताण नाही, कसलीही चिंता नाही… वाह! किती छान वाटतंय. डोळे मिटून हे दृष्ट लागण्यासारखं सुख अनुभवत होते, तरंगत होते.

आणि अचानक नाहीदची आठवण झाली. गेल्या सात-आठ महिन्यांत तिची काही खबर नव्हती. तिनंही फोन केला नव्हता. तिला फोन करू करू म्हणेपर्यंत महिने उलटले. एकदम सरळ होऊन बसले. मला जाणवलं, किती स्वार्थी आहे मी. फक्त स्वतःचा विचार करते. इतका की नाहीदचं मन मला वाचता आलं नाही. ख, ाश ाूीशश्रष… खूप लाज वाटतेय स्वतःची. म्हणूनच कदाचित तिनं मला हक्कानं काही सांगितलं नसेल. चूक माझी आहे. तिला मी जवळची वाटण्यासारखी परिस्थिती मी निर्माण केली नाही, विश्वास निर्माण केला नाही. मला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. लगेच चूक सुधारायला हवी. तिला फोन न करताच जाते आणि सरप्राईज देते. कशी असेल ती? अजून बेढब झाली असेल, शरीराची हानी करून घेतली असेल? …नाही, चांगला विचार करते. ती बहुतेक प्रेग्नंट असेल, किंवा मूल झालं असेल. मला एकदम उल्हसित वाटायला लागलं. असंच झालं असेल. मूल, नवरा, संसार… गुंतून गेली असेल. देव करो, असंच झालेलं असलं पाहिजे. नाहीद किती चांगली मुलगी आहे…

आमचे दोघींचे वाईट दिवस संपले. माझी डिग्री झाली एकदाची आणि तिला बाळ झालं असेल. बाळ कसं दिसत असेल?
मी विचार करत करत तिच्या घरी पोचले, तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. आज सूर्य अजून आकाशातच होता. गर्मी अजून कमी झाली नव्हती. आज हा माझ्यासारखाच उत्साहात दिसतोय, ऐटीत चालतोय.
बेल वाजवल्यावर मीच सरप्राईज झाले, कारण नाहीदच्या अम्मीनं दार उघडलं. किती तरी वर्षांनी पाहिलं तिला. आनंदून तिला म्हटलं, ‘‘कैसी हो आप आंटी? कब आयी?’’ तीही हसली, ‘‘झाले पंधरा दिवस.’’ मी घरात नेहमीसारखी आरामात बसले. घराची पार रया गेली आहे, असं वाटलं. नाहीदचा स्वच्छतेचा हात फिरलेला दिसत नव्हता. हो बरोबर, अम्मी किती करणार? बाळ सांभाळायचं, स्वयंपाक आणि घर…एवढं जमत नसेल.
‘‘नाहीद झोपलीये का?’’ मी अम्मीनं दिलेलं पाणी पिताना म्हटलं.
अम्मीनं प्रतिप्रश्न केला, ‘‘खूप दिवसांनी आलीयेस का? तिच्याशी फोनवर बोलली होतीस का?’’
‘‘हो, परीक्षा होती आणि फोन पण खूप दिवसांत झाला नाही.’’ मी थोडं वरमून म्हटलं.
‘‘तुम्ही… तुम्ही नाहीदच्या डिलिव्हरीसाठी आलायत का?’’ मी धीर करून विचारलं.
अम्मीनं एकदा माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,‘‘चल, आत ये.’’

पलंगावर नाहीद पुतळ्यासारखी बसली होती. भकास, भावशून्य चेहरा. भिरभिरणारे डोळे. मला पाहूनही ओळख न दाखवणारे. माझ्या हृदयात चर्र झालं. अरे देवा, हे काय? अम्मी नाहीदला म्हणाली, ‘‘बघ, कोण आलंय. तुला भेटायला अनया आलीये.’’ भिरभिरणारे डोळे क्षणभर स्थिर झाले. पुन्हा तसेच. माझ्या पोटात ढवळून आलं. मी तिचा हात घट्ट धरला, ‘‘नाहीद, नाहीद… मी आलेय. रागावलीस?’’ तिनं पुन्हा शून्य डोळ्यांनी पाहिलं.
अम्मी म्हणाली, ‘‘शफीनं नाहीदला तलाक दिला. त्यानं पुन्हा निकाह केलाय.’’ मला धस्स झालं. अम्मीनं विचारलं, ‘‘नाहीद बोलली असेल की तुला?’’ मी मान डोलावली.
‘‘हिला इथे घेऊन आला, त्यानंतर त्यानं पुन्हा लग्न केलं आणि नव्या बायकोला त्या घरी ठेवलं. हिला खोटं सांगून, फसवून घराबाहेर काढलं. हिची ट्रीटमेंट सुरू ठेवली. शंका येऊ नये म्हणून महिन्यातून काही दिवस इथे राहायचा. नवी बायको प्रेग्नंट झाल्यावर इथे राहणं कमी झालं. तिला मूल झालं आणि हिला तलाक दिला.’’
मला सगळं उलगडायला लागलं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. नाहीद हे मनोमन ओळखून होती तर… मी स्तब्ध बसले. नाहीदकडे मला पाहवेना. अम्मी मूक रडत होती. माझेही डोळे आपसूक गळायला लागले.
आईचा फोन पुन्हा पुन्हा येत होता. मी घेऊ शकत नव्हते आणि याचं आज पहिल्यांदाच मला वाईट वाटत होतं. नाहीतर आजपर्यंत आईचा फोन म्हणजे कटकट असंच वाटायचं.
‘‘हा फ्लॅट उद्या रिकामा करायचा आहे. भाड्याचा आहे. उद्या आम्ही हिला घेऊन जाऊ.’’ अम्मी डोळे पुसत म्हणाली.

आम्ही दोघी खोलीतून बाहेर आलो. माझ्या शेजारी सोफ्यावर बसत ती म्हणाली, ‘‘हिचं शिक्षण पूर्ण करायला हवं होतं. चुकलं आमचं. अब कैसे जियेगी? क्या करेगी?’’ मी तिचा हात हलकेच थोपटला. माझ्या गळ्याशी आवंढा दाटून आला.
मी घराबाहेर आले, आईला फोन केला. खरंतर मला तिला सॉरी म्हणायचं होतं. माझ्या उद्धट वागण्याबद्दल क्षमा मागायची होती आणि हेही सांगायचं होतं, की ती किती बरोबर होती.
‘‘अनू, व्हॉट्सअ‍ॅप पाहा. देशपांड्यांच्या मुलाचा फोटो, बायोडाटा पाठवलाय. त्यांनीच तुझ्यासाठी विचारलंय. आम्हाला तो आवडलाय. तू कधी येते आहेस?तू पाहा आणि मग ठरवूया.’’
आई बोलत होती आणि मला एकदम तिचा रागच आला. हे काय आता नवीन? विचित्र आहे आई. लग्न? काहीही… मला नाही जमणार. मी आणि माझा एकांत यात कुणी आलेलं नाही जमणार आता. मला माझी कंपनी आवडते खूप.
नाहीदला नकोसा झालेला आणि मला हवासा वाटणारा एकांत…
आयुष्य विचित्रच आहे.

– डॉ. अस्मिता हवालदार

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.