Now Reading
उलाकची प्रेमकथा

उलाकची प्रेमकथा

Menaka Prakashan

”कुणी आहे का घरात?’’ पुरुषी… थोडीशी अडाणी उंच आवाजातली अनोळखी हाक ऐकू आली. अक्सार मुलांना शिकवत होता, त्यामुळे त्याची बायको- अर्मिन कोण आलंय, ते पाहायला पुढच्या अंगणात आली. तिचं अंगण मोठं देखणं होतं. सुंदर वासाचे मोठे गुलाब, फळांनी लगडलेली सफरचंद आणि बदामाची मोठी झाडं. त्यांच्याकडे येणारा अंगणातच अगदी खूष होऊन जाई.

त्या अंगणातल्या बदामाच्या झाडाखाली तो उभा होता. एकेकाळचा तिचा होणारा नवरा उलाक. त्यांची त्या अगोदरची भेटही बदामाच्या झाडाखालीच झाली होती. त्याही वेळी ती सगळी बदामाची झाडं अशीच खूप मोहरलेली होती. अर्मिननं एक मोठ्ठा श्‍वास घेतला. तिनं पाहिलं, घोंगडं खांद्यावर घेतलेल्या उलाकच्या हातात कोयता होता. त्या कोयत्याचं धारदार तेज दुरूनही तिच्या हृदयात शिरलं. उंच, देखणा उलाक कसा खंगल्यासारखा दिसत होता. त्याचे नेहमीचे आश्‍वासक डोळे थंड दिसत होते. काही क्षण अर्मिनला त्याची प्रचंड भीतीही वाटली. अजून उलाकला मात्र अर्मिन दिसली नव्हती. त्यानं पुन्हा आवाज चढवायच्या आत ती झाडांच्या राईतून त्याच्यासमोर आली. ‘‘उलाक…’’ तिनं हाक मारली.
त्याच्यासमोर अर्मिन उभी होती. पण तिचे उंची कपडे, तिच्या चेहर्‍यावर विलसत असलेलं बुद्धिमत्तेचं तेज, एक प्रकारची शहरी जरब होती. तिच्या डोळ्यांत मात्र ओळखीचं हास्य होतं आणि ठाम विश्‍वासही होता. त्यानं तिच्याकडे एकवार पाहिलं आणि त्याच्या हातातला तो कोयता गळून पडला. तो काहीही न बोलता मागे फिरला आणि शक्य तितक्या भरभर चालायला लागला.

त्याला काही सुचतच नव्हतं. अर्मिननं त्याच्याशी केलेली प्रतारणा त्याला सहन झालेली नव्हती. तिला आणि तिच्या नवर्‍याला- अक्सारला- संपवणं हेच ध्येय उराशी बाळगून तो तीन वर्षं त्याचं घरदार, गाव सोडून तिला शोधण्यासाठी भटकत होता. आता ती समोर दिसली, तर तो कोयता हातातून गळून पडला. जणू पुन्हा ती इच्छा परत होऊ नये म्हणून तो अजून भराभर पावलं उचलत होता. तेवढ्यात मागून कुणाची तरी थाप पडली.
तोच तो बुढ्ढा अक्सार… त्याच्या अर्मिनला त्याच्यापासून हिरावणारा राक्षस. त्याच्या निळ्या डोळ्यांत सगळ्या जगाबद्दल माया असे आणि लहान मुलांसारखं कुतूहल… उलाकनं त्याच्याकडे एकवार पाहिलं आणि खिशातले खूप घुंगरांचे अर्मिनचे जाडजूड पैंजण त्याच्या हातात कोंबले आणि तो अक्षरशः पळत सुटला.
त्याला आता क्षणभरही त्या शहरात थांबायचं नव्हतं. त्याला परतायचं होतं त्याच्या वस्तीत, त्याच्या घरी, जिथे त्याची मेंढरं होती. त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे आई-बाप होते. त्याचं सगळं जगच तिथे होतं. उलाक चालत होता काहीही न खातापिता… किती दिवस चालत होता कोण जाणे. त्याला जाग आली, तेव्हा तो एका झाडाखाली झोपलेला होता. कुणा तरी भल्या माणसानं त्याला कसलंसं पेय आणि गव्हाची कांजी प्यायला दिली. अन्न पोटात गेल्यावर त्याला थोडी हुशारी आली.
तो माणूस त्याला घोडा द्यायला कबूल झाला. त्यासाठी सोन्याची चार नाणी लागणार होती. उलाककडे दहा-पंधरा नाणी शिल्लक होती. तो माणूस त्याला म्हणाला, ‘‘थकलेला दिसतो आहेस मित्रा. माझ्या घरी रात्रभर विश्रांती घे. उद्या सूर्योदयाच्या अगोदर मार्गस्थ हो.’’

उलाक त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेला. त्याच्याकडे त्याची बायको आणि बारा-तेरा वर्षांची मुलगी होती. तिला पाहून उलाकला पुन्हा अर्मिनच्या आठवणीची कळ आली. त्या लोकांनी उलाकचं चांगलं स्वागत केलं. उलाकही गरम पाण्याच्या अंघोळीनं ताजातवाना झाला. जेवण झाल्यानंतर दोघं बापई अंगणात बाजल्यावर बसले. तो माणूस त्याला म्हणाला, ‘‘आता सांग मित्रा, तुझ्या डोळ्यांतल्या वेदनांची कहाणी. तू इथला दिसत नाहीस, पण आमची भाषा बोलतो आहेस, कुठून आला आहेस? कुठे चालला आहेस?’’ उलाकनं त्याच्या हातातल्या कडवट कॉफीचे दोन घोट घेतले.
गेली दोन-अडीच वर्षं तो त्या शहरात काम करत होता, त्यामुळे त्याला ती भाषा यायला लागली होती. खरंतर त्याच्या गावी उलाकची एकट्याची अशी दोनशे तरी मेंढरं होती. त्यांच्या जमातीतली लोकर सर्वोत्तम असायची, त्यामुळे ते मागतील ते दाम द्यायला व्यापारी तयार असत.
मात्र या शहरात त्याला ओळखणारा कुणीही नव्हता. पण त्याला तिथे लवकरच लोकर साफ करायची आणि रंगवायचीही कामं मिळाली आणि त्याचे बर्‍यापैकी पैसेही मिळायला लागले. त्याचबरोबर तिथे तो लोकरीचे कपडेही बनवायला शिकला, त्यामुळे खरंतर त्या शहरात त्याचं बस्तान चांगलं बसलंही असतं. पण मुळात त्याचा हेतू शहरात राहण्याचा नव्हताच. त्याला अर्मिनला शोधून काढायचं होतं आणि ती याच शहरात आहे, याचा त्याच्या मनानं कौल दिलेला होता.

अर्मिन त्याची जिवलग मैत्रीण आणि होणारी बायको. ती त्याचा विश्‍वासघात करेल, असं कुणी भविष्य वर्तवलं असतं, तरी त्यानं त्याचा खात्मा केला असता. उलाक बारा वर्षांचा असल्यापासूनच उत्तरेकडच्या गवताळ प्रदेशात त्याची मेंढरं घेऊन स्वतंत्रपणे जात असे.
तो आणि अर्मिन किरगिझ जमातीतले होते. ते लोक पामिर पठारावरच्या एका उंच डोंगरमाथ्यावर राहत. त्यांच्या गावाचं नाव सेरेझ. गाव म्हणजे वाडी. त्या वाडीच्या दोन्ही बाजूंना बर्फाच्छादित डोंगर. तिथून खाली पाहिलं, की रोरावणारी पामिर नदी दिसे. नदीकाठावर नजर फिरेल तिथे नदीच्या काठचं करडं वाळवंट.

त्या भागात दोन जमातींचं वास्तव्य होतं. डोंगरमाथ्यावर राहणारे किरगिझ आणि डोंगरपायथ्याशी राहणारे वाखी. डोंगरमाथ्यावर गवताशिवाय काहीच उगवत नसे, पण तिथून थोड्या कमी उंचावरच्या डोंगरावर गेलं, की तिथे विस्तीर्ण अशी गवताळ कुरणं होती. त्यामुळे एकेका किरगिझाच्या घरात निदान शंभर तरी मेंढरं आणि गुबगुबीत बोकड असत. किरगिझ पुरुष पशुपालन करत आणि स्त्रिया आणि मुलं डोंगरमाथ्यावर थोडीफार शेती करत. बर्फ वितळून पाणी साठलं असेल तिथे मासेमारी करत. हिवाळ्याचे चार महिने सगळीकडे बर्फच बर्फ असल्यानं काहीच करता येत नसे.
पण त्या जीवघेण्या थंडीच्या चार महिन्यांत अंगात ऊब राहावी म्हणून खूप अन्नसाठा करून ठेवावा लागे. हे सगळं काम घरातल्या बायका आणि मुलांचंच असायचं. त्यांना कधी उसंत म्हणून नसायचीच. किरगिझांकडे अनेक प्रकारची वाद्यं असत. हिवाळ्याच्या दिवसांत बाहेर काही काम करता येत नसे, तेव्हा घरातच मैफली होत, पण वसंत ऋतू मात्र सामुदायिकरीत्या साजरा होई. वसंत ऋतूत तो सगळा प्रदेश नाना तर्‍हेच्या रंगीबेरंगी आणि सुगंधी गवतफुलांनी भरून जाई.

त्या वाडीचा मुखिया म्हणजे अल्दीन. म्हणजे अर्मिनचा बाप. ही अर्मिन भयंकर बडबडी, चळवळी आणि चौकस मुलगी. तिला सगळ्या जगाची पंचाईत असे. अल्दीन मुखिया असला, तरी त्याच्या अंगी काही नेतृत्वगुण नव्हते. तो होता वादक आणि गायक. त्याच्यासारखा कोमुझ हे किरगिझांचं पारंपरिक वाद्य वाजवणारा कुणी नव्हता. तो आणि त्याची बायको किया स्वभावानं अगदी गरीब आणि शांत होते. परंपरेनं तो मुखिया झाला होता एवढंच.
त्यामुळे त्या वाडीची सगळी सत्ता अल्दिनच्या बहिणीच्या, म्हणजे फातमाच्या आणि तिच्या नवर्‍याच्या ताब्यात होती. त्यांचा शब्द मोडायची वस्तीतल्या कुणाचीही प्राज्ञा नव्हती. फातमा ही अल्दिनची सावत्र बहीण. तिची आई वाखी जमातीतली. फातमा सगळ्या वाखींप्रमाणेच अतिशय कष्टाळू आणि हरहुन्नरी होती. फातमाला सहा मुलं आणि सर्वात मोठा मुलगा म्हणजे उलाक. तो पंधरा वर्षांचा होता. त्याच्यामध्ये वाखी आणि किरगिझांचे रूप आणि गुण दोन्हीही आलेले होते. उलाक त्याच्या मामाप्रमाणेच कोमुझ आणि ओ कोमुझ, म्हणजे माऊथ ऑर्गन ही दोन्ही वाद्यं वाजवण्यातही तरबेज होता.

अर्मिनचा जन्म झाल्याबरोबर तिच्या आत्यानं ‘अर्मिन उलाकची बायको होणार,’ हे जाहीर करून टाकलेलं होतं. अर्मिन मोठी गोड आणि भयंकर खोडकर मुलगी. दाट कुरळे लांब केस आणि गालांवरच्या खळ्या… खूप मोहक दिसायची ती. शिवाय तिला कसली भीती म्हणून नव्हती. पामिरच्या खळखळत्या वेगवान प्रवाहातही डुबकी मारायची तिची तयारी असे. तिच्या पायांत भरपूर घुंगरांची पैंजणं होती. तिच्या आत्यानंच दिलेली. त्यामुळे त्या बर्फाळ निरव शांततेत अर्मिन वस्तीत फिरत असली, की लांबूनही कळे आणि त्या काहीशा उदास वातावरणात तिच्या घुंगरांचा आवाज ऐकून वस्तीतल्या लोकांच्या चेहर्‍यावर हसू फूटे. तिला मैत्रिणीही खूप. किरगिझ तर होत्याच, पण खाली राहणार्‍या वाखींच्या मुलींचेही तिच्याशिवाय पान हलत नसे.
दरवर्षी वसंत ऋतू संपता संपता डोंगरपायथ्याला राहणारा वाखी सेलीम हा ब्रिश्बेक शहरातल्या एका व्यापार्‍याला घेऊन येई. माथ्यावरच्या किरगिझांच्या वस्तीत येईपर्यंत खरंतर तो व्यापारी अर्धमेला झालेला असे. त्याच्या बरोबर त्याची पंधरा-वीस गाढवंही येत. त्याबरोबर फळफळावळ आणि बाकीचं जीवनावश्यक सामान येई. जाताना त्या गाढवांवर लोकरीच्या गोण्या जात. या वस्तीच्या सगळ्या मेंढ्यांची लोकर ब्रिश्बेकच्या बाजारात हातोहात विकली जाई, पण किरगिझांपैेकी कुणी कधीच शहरात गेलेलं नव्हतं.

तो व्यापारी नेहमीचाच असल्यानं सगळ्या वस्तीच्या ओळखीचा झालेला होता. व्यापारी आणि सेलीम आले, की त्यांच्यासाठी सर्वांतर्फे मेजवानी, वादन-गायनाचं आयोजन केलं जाई. किरगिझ तसेही त्यांच्या आतिथ्यासाठी प्रसिद्ध होते. तो व्यापारी गेला, की सगळे पुरुष किरगिझ मेंढ्या घेऊन उत्तरेकडे जात. वर्षानुवर्षं हा क्रम सुरू होता, त्यात काही बदल नसे.
त्या वर्षी मात्र लोकर नेण्यासाठी सेलीम आणि व्यापार्‍याबरोबर अजून एकजण आला होता. तो वयानं थोडा प्रौढ दिसत होता, पण तरीही तो अगदी सहजपणे अवघड चढण चढून आला होता. सेलीमनं त्या माणसाची ओळख करून दिली. याचं नाव होतं अक्सार. हा अक्सार म्हणे मोठा विद्वान अभ्यासक होता. ‘विद्वान’ आणि ‘अभ्यासक’ हे दोन्ही शब्द किरगिझांसाठी त्या वेळी तरी नवीनच होते. तो आला तेव्हा त्याच्यामागून त्याचं स्वतःचं असं गाढव आलं होतं. त्यावर पुस्तकांनी आणि कागदांनी भरलेल्या भल्यामोठ्या गोण्या होत्या. तो त्यांच्या सेरेझ गावात पुढचं वर्षभर, म्हणजे हिवाळ्यातसुद्धा कसल्याशा अभ्यासासाठी राहणार होता. पुढच्या वसंत ऋतूमध्ये तो परतणार होता.

तो ठिकठिकाणी फिरून डोंगर, दर्‍या, प्राणी, झाडं, पानं, फुलं, फळं आणि त्यांचे उपयोग, औषधं, माणसं, त्यांच्या निरनिराळ्या जमाती, त्यांच्या वस्त्या, त्यांचे सण, आकाश, चांदण्या यांचा अभ्यास करी म्हणे. अक्सारची ओळख ऐकल्यावर सगळ्यांना फारच आश्‍चर्य वाटलं. ‘त्या बिचार्‍याचं पोट कसं भरत असेल…’ काहीजण म्हणाले. ‘त्याची बायकापोरं बिचारी पोटासाठी रानोमाळ हिंडत असतील,’ असं बायकांना वाटलं. पण अक्सारनंच सांगितलं, तो निसर्गअभ्यासक आहे आणि ते काम त्याला राजानं दिलं असल्यानं त्याचं पोट भरेल एवढे त्याला पैसे मिळतात. त्यानं अजून लग्न केलेलं नाही, त्यामुळे त्याला मुलंही नाहीत. अक्सार बोलत असताना त्याच्या स्वरातून प्रामाणिकपणा झळकत होता.
वस्तीतल्या सर्वांनी त्याचं यथोचित स्वागत केलं. अक्सारनंही त्याचं व्हायोलिन वाजवलं, त्याच्या भाषेत गाणी म्हटली. अगदी अल्पावधीतच त्यानं सर्वांना अगदी आपलंसं केलं.
अर्मिनला तर त्याचं ते कागदांचं बाड, पुस्तकं, व्हायोलिन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं ते किंचित खाली झुकून बोलणं फारच आवडलं. दुसर्‍या दिवसापासून अक्सारची कामं सुरू होणार होती. त्याला त्याच्या बरोबर फिरण्यासाठी कुणाची तरी मदत हवी होती. पुरुष तर सगळे मेंढ्या घेऊन जाणार होते. मग त्यासाठी सर्वानुमते अर्मिनची निवड झाली, कारण अर्मिन एकटीच उड्या मारत सगळीकडे जात असे. तिला सगळे रस्ते पाठ होते.
अक्सारसाठी वेगळा तंबू उभारण्यात आला. तंबूत एक छोटी चूल, थोडी भांडी, झोपण्यासाठी आणि बसण्यासाठीही एक बाजलं, पुस्तकं आणि भरपूर कागद, लेखण्या एवढंच होतं. वस्तीवरच्या सर्वांनी आळीपाळीनं त्याच्या जेवणाची सोय करण्याचं ठरवलं.
अगदी थोड्याच अवधीत त्यानं उलाकसकट काही मुलांना व्हायोलिन आणि नवे खेळही शिकवले होते.

अर्मिन पहिल्यांदा जेव्हा अक्सारबरोबर त्यांच्या वस्तीच्या अजून थोड्या वरच्या भागात गेली होती, तेव्हा तिथे कोणते दगड असतील आणि दगडाच्या खाचेतलं निळं पाणी सूर्यप्रकाशात सप्तरंगी रंगानं चमकत असेल, हे तिला अक्सारनं तिथे जातानाच सांगितलं होतं. तिथे पोचल्यावर अक्सारच्या वर्णनाबरहुकूम ते दृश्य पाहून अर्मिन तर भारावूनच गेली होती. अक्सारनं त्या डबक्याचं रेखाटन केलं. दगडाचे नमुने गोळा करून घेतले. तो प्रदेश कसा तयार झाला असेल, याबद्दलही त्यानं अर्मिनला सांगितलं. अक्सार खूप सुरेख आणि हुबेहूब रेखाटनं करी.
अक्सारबरोबर फिरत असताना दररोज उलगडत जाणार्‍या त्या ज्ञानविश्‍वात अर्मिन अगदी हरवून जायची. त्याच्या बरोबर जाताना अखंड बडबड करणारी अर्मिन येताना उड्या न मारता अगदी शांतपणे चालत खाली यायची.
अक्सारकडून कळलेलं सगळं ज्ञान ती उलाकला सांगे. उलाकलाही ते ऐकायला मजा येई, पण त्याला हे सगळं कशासाठी समजून घ्यायचं, हे मात्र काही कळत नसे. पाहता पाहता वस्तीतल्या पुरुषमंडळींची त्या वर्षी मेंढ्या चरायला घेऊन जाण्याची वेळ अगदी जवळ आली. एरवी त्या प्रदेशात राहणार्‍या दुसर्‍या जमाती नेमकी ती वेळ साधून त्या वेळी वस्तीवर हल्ला करत. तिथल्या चीजवस्तू, मुलं आणि बायकांना पळवून नेत, त्यामुळे खूप सावधगिरी बाळगावी लागे. पण या वेळी वस्तीवर अक्सार असल्यानं सगळे अगदी निर्धास्तपणे जाऊ शकणार होते.
उत्तरेकडच्या प्रवासाला निघण्याच्या आदल्या दिवशी अर्मिन आणि उलाक पामिर नदीच्या वरच्या भागातल्या फुललेल्या बदामाच्या झाडांच्या राईत कितीतरी वेळ भटकत होते.

अर्मिनच्या खिदळण्यानं तो सगळा शुभ्रगुलाबी फुलांचा बदामाचा मोहर त्या दोघांच्या अंगावर बरसत होता. सोबतीला अर्मिनच्या पायांतल्या घुंगरांची छून… छून… आणि पामिरचा खळखळाट… बराच वेळ तिथे फिरल्यावर ती दोघं पामिर नदीच्या काठावर एका खडकावर बसली होती. पण या वेळी का कोण जाणे, उलाक थोडा अस्वस्थ होता.
अर्मिन त्याला म्हणाली होती, ‘‘उलाक, असा होऊ नकोस रे उदास. आपल्या घरात तुझ्यासाठी भरपूर, म्हणजे तुला अगदी परतीच्या प्रवासातही पुरेल एवढं फराळाचं बनवत आहेत.’’ उलाकलाही बरं वाटलं, कारण घरातलं फराळाचं संपलं, की बापई माणसं काहीतरी कामचलाऊ बनवत. उलाकला ते मुळीच आवडत नसे, त्यामुळे फराळाचं नाव काढल्यावर त्याला थोडा उत्साह आला खरा, पण तेवढ्यापुरताच. त्याचं काही तरी वेगळंच बिनसलेलं.
तो तिला म्हणाला होता, ‘‘मी उत्तरेकडून आल्याबरोबर आपला वाङ्निश्‍चय होईल. त्यानंतरच्या वसंत ऋतूत लग्न होईल.’’
‘‘मग आपल्याला खूप मुलं होतील.’’ अर्मिन उत्साहानं म्हणाली होती. ‘‘एकेकाकडे खूप मेंढरं… खूप लोकर… मग आपण मोठ्ठं घर बांधू…’’ उलाक हसला.
एकाएकी उलाक तिला म्हणाला, ‘‘अर्मिन, मला तुझं एक पैंजण देशील?’’
‘‘एकच…?’’ अर्मिन म्हणाली.
‘‘हो, एकच पुरे…’’ उलाक म्हणाला. तिनं पटकन पायातलं खूप घुंगरांचं पैंजण काढून त्याला दिलं.
‘‘तुझी आठवण आली, की मी पैंजणातले घुंगरू वाजवीन.’’ उलाक म्हणाला होता.
त्यावर अर्मिन कितीतरी वेळ हसत होती.
पण उलाकचा चेहरा पाहून ती म्हणाली, ‘‘अरे, लवकरच परतशील तू.’’
‘‘माझी वाट पाहशील?’’ उलाकनं विचारलं.
‘‘होऽ… चल, आता लवकर.’’ म्हणून अर्मिननं त्याचा हात पकडला होता. एरवी कितीदा तरी तिनं त्याचा हात धरला होता, पण त्या वेळी उलाकनं तो हात नेहमीपेक्षा अधिक घट्ट पकडला होता.
दुसर्‍या दिवशी भल्या पहाटेच मंडळी रवाना झाली. प्रत्येक वर्षी पुरुषमाणसं मेंढ्या घेऊन गेली, की तो दिवस फार उदासवाणा जाई. दुसर्‍या दिवसापासून सगळं सुरळीत सुरू होई, पण या वेळी अर्मिनला तर वेळच नव्हता. गेले दोन-तीन दिवस प्रवासाच्या तयारीत गेल्यामुळे ती त्या दिवशी ती पहाटेच अक्सारबरोबर गेलेली होती.

पामिर नदीच्या प्रवाहाबद्दल अक्सार तिला सांगत होता. अर्मिन भान हरपून ऐकत होती. ती अक्सारला अनेक शंका विचारी. अक्सारला त्यामुळे खरोखर नवी दिशा मिळत असे. ती अतिशय बुद्धिमान आहे, हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं हळूहळू तिला पुस्तकी भाषा शिकवायला सुरुवात केली.
अक्सारनं शिकवलेलं सगळं अर्मिन घरी येऊन गिरवायला लागली, की तिच्या आईला मात्र खूप काळजी वाटे. पण तिच्या आत्याची तिला काही हरकत नव्हती. शेवटी ती तिची होणारी सासू.
दिवसेंदिवस अर्मिनचं शिकण्याचं वेड वाढतच चाललेलं होतं. अक्सारला तिच्या त्या असाधारण आणि तीव्र आकलनक्षमतेचं खूप आश्‍चर्य वाटे. अक्सारकडून निसर्गरहस्यं, विज्ञान, गणित समजून घेताना अर्मिनचा निरागस अवखळपणा कधीच संपला होता. ती शांतपणे विचार करत बसे.
या वेळी मेंढपाळांचा मुक्कामही जवळ जवळ वर्षभर वाढलेला होता. वर्ष संपत आल्यामुळे अक्सारचे परत जाण्याचे दिवसही जवळ आले होते.
त्या दिवशी अक्सारची आवराआवर सुरू होती. अर्मिन आत आली. तिचे डोळे रडून सुजलेले, पण निश्‍चयी दिसत होते. तिनं त्याला सांगितलं, ‘‘मला अजून शिकायचं आहे. अभ्यास करायचा आहे. मी तुमच्याबरोबर येते.’’ अक्सार तिला म्हणाला, ‘‘तू खूप शिकू शकतेस. पण ठीक आहे, थोड्याच दिवसांत तुझं उलाकबरोबर लग्न होईल. तुझ्या मुलांना शिकायला माझ्याकडे पाठव.’’
त्यावर ती म्हणाली, ‘‘मला लग्न करायचं नाही. मला फक्त शिकायचं आहे. मला तुमच्याबरोबर न्या.’’

अक्सार तिला गमतीनं म्हणाला, ‘‘हे बघ, तू जर माझ्याशी लग्न केलंस, तरच तुला माझ्याबरोबर पाठवतील, नाहीतर शक्यच नाही. पण तू तर माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहेस. तुझ्या त्या तरण्याबांड, देखण्या उलाकला सोडून या म्हातार्‍याशी लग्न करशील का तू? वेडी कुठली! जा घरी लवकर. वादळाची लक्षणं आहेत.’’
अर्मिननं ते ऐकून त्याच्या कमरेचा खंजीर काढून घेतला आणि त्याचं पातं आपल्या हातात घट्ट धरलं. स्वतःचा रक्ताळलेला हात अक्सारच्या हातात दिला.
त्यांच्या जमातीत तसाच लग्नविधी असे. मग कुठल्याशा तंद्रीत अक्सारनंही त्याच्या जवळची तांबड्या गवताची टोपी अर्मिनला घातली आणि ते दोघं नवरा-बायको झाले.
अक्सारनं वर्तवल्याप्रमाणे त्या दिवशी ते हिमवादळ झालं आणि अर्मिनला दोन दिवस तिथेच अक्सारच्याच तंबूत राहावं लागलं. त्या जीवघेण्या थंडीत ऊब येण्यासाठी अक्सारनं काही चवदार पेय आणि नव्या नवरीसाठी गरमागरम स्वयंपाक बनवला होता. ते संपूर्ण दोन दिवस आणि दोन रात्रीत अर्मिन अक्सारकडून सगळी भूमितीची तत्त्वं शिकली.
तिसर्‍या दिवशी वादळ शमल्यावर तिनं घरी जाऊन घडलेलं सगळं तिच्या आईला आणि आत्याला सांगितलं. त्या वेळी त्या दोघींना काय झालं असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.
पण सगळ्या वस्तीनं ‘आपला’ म्हणून स्वीकारलेल्या पाहुण्या अक्सारला वस्तीतून घालवून देण्याचा निर्णय बायकांच्या हातात नव्हता. त्यानंतर लवकरच उलाक आणि वस्तीवरचे दोघं-तिघं सोडून पुरुषमंडळी परत आली. ती सर्व हकीकत ऐकून सगळ्यांना रागही आला आणि वाईटही वाटलं. अक्सारच्या मुसक्या बांधण्यात आल्या. त्याला तिथल्या पंचांसमोर आणण्यात आलं.
पण किरगिझ न्यायप्रिय होते, शिवाय अक्सार त्यांचा दोस्त होता. अक्सारनं त्याची आणि अर्मिनची बाजू मांडली. अर्मिनला गावसभेत बोलायची परवानगी नव्हती, तरी ती तिथे आली आणि तिनं तिचा बुरखा काढून टाकला. ती म्हणाली, ‘‘मला आता ज्ञानाची तहान लागली आहे. मला शिकायचं आहे. मला जाऊ द्या.’’ अर्मिनचं असं भर सभेतलं उर्मट बोलणं ऐकून एकच गदारोळ झाला. सगळे भयंकर संतापले होते. तिचा बाप अल्दिन तर कोयता घेऊन तिच्या अंगावर धावून गेला, पण त्या वेळी फातमा- तिची आत्या पुढे आली, तिनं स्वतःच अर्मिनचा हात अक्सारच्या हातात दिला आणि तिनं त्यांना त्या वस्तीतून शक्य तितक्या लवकर निघून जायला सांगितलं.

तिनं अर्मिनसाठी स्वतः अर्धवट विणलेला नववधूचा झगा, शाली, चार दागिने आणि चार फराळाचे पदार्थ असं एका गाठोड्यात बांधून अक्सारच्या हातात दिलं आणि त्याच्याकडे आणि अर्मिनकडे न पाहताच तिनं खुणेनंच त्यांना निघायला सांगितलं.
ती तिथून निघून गेल्यानंतर अक्सारनं अर्मिनकडे पाहिलं. तिचा निश्‍चय थोडाही ढळलेला नव्हता. ती त्याचा हात धरून भराभरा पहाडी उतरायला लागली.
दोन-तीन दिवसांनी उलाक वस्तीवर आला. तो अगदी उत्साहात होता. त्यानं अर्मिनसाठी किती काय काय आणलं होतं. तिला किती कथा सांगायच्या होत्या, पण जेव्हा त्याला सगळं कळलं, तेव्हा त्याचा स्वतःच्या कानांवर विश्‍वासही बसेना. उलाक रागानं नुसता फणफणत होता. खडकावर मुठीनं प्रहार करत होता.
त्याची वाग्दत्त वधू अर्मिन त्या वस्तीवर आलेल्या त्या विद्वान अभ्यागत पाहुण्याचा हात धरून गेलेली होती. आणि हात तरी कुणाचा धरावा तिनं… त्या अर्धवट पांढरी दाढी असलेल्या बुढ्ढ्याचा! त्यानं खिशातलं अर्मिनचं पैंजण काढून जोरात आपटलं. त्याबरोबर त्यातले सगळे घुंगरू निखळून विखरून इतस्ततः पसरून गेले. त्यानं ते सगळे परत गोळा करून खिशात ठेवले आणि रात्री एकेक करून ते पैंजण परत जोडून घेतलं.
दुसर्‍या दिवशी सकाळीच त्यानं तिला शोधून काढण्यासाठी वस्ती सोडून जाण्याचा इरादा जाहीर केला. त्याची आई फातमा खूप शहाणी बाई होती.
ती त्याला म्हणाली, ‘‘उलाक, वर्षानुवर्षं आपण या विपरीत निसर्गाच्या लहरीच्या सोबतीनं राहतोय. अशा ठिकाणी दुसर्‍या माणसांविषयीच्या आपल्या कोणत्याच भावना एवढ्या तीव्र असू नयेत, हे समजत नाही का तुला? तिच्यामध्ये ज्ञानाची आस निर्माण झालेली होती. ते मिळवण्यासाठीचा मार्ग म्हणून तिनं अक्सारशी लग्न करण्याचा पर्याय स्वीकारला. आम्ही तिला तसं करू दिलं नसतं, तर तिनं तुझा संसार केला असता. पण तिची शिकण्याची ओढ एवढी तीव्र होती, की ती आयुष्यभर दुःखी राहिली असती आणि तिच्यामुळे तूही.’’

‘‘आपल्या वस्तीवरची कुणीही मुलगी तुझ्याशी लग्न करायला आनंदानं तयार होईल.’’ तीे कळवळून त्याला सांगत होती. पण उलाकच्या डोक्यात काहीच शिरत नव्हतं.
तो कुणाचंही काहीही न ऐकता दुसर्‍या दिवशीच्या पहाटेच वस्ती सोडून पहाडी उतरून निघून गेला. अर्मिनला कुठे शोधायचं, हेही त्याला माहिती नव्हतं. ते कोणत्या शहरात राहतात, हेही त्याला माहिती नव्हतं. अर्मिन आणि अक्सार ही नावं माहिती होती, पण ती तर कित्येकांची असतील. बाकी काहीच माहिती नव्हतं. तो वस्त्यांमागून वस्त्या, गावांमागून गावं, नद्यांमागून नद्या ओलांडत राहिला. एका कझाकांच्या टोळीतही अक्सार येऊन गेल्याचं त्याला समजलं. त्यांच्याकडूनच त्याला अक्सार कधीकाळी राहत असलेल्या बर्बोक शहराचीही माहिती मिळाली, पण आता तो कुठे राहतो, हे कुणालाच माहिती नव्हतं. मजल दरमजल करत तो शिराझमध्ये पोचला खरा, पण तरी त्या दोघांचा पत्ता काही लागत नव्हता. अशी जवळ जवळ अडीच वर्षं लोटली.
एकदा तो एका सार्वजनिक खानपानगृहात बसलेला असताना तिथल्या राजदरबारातला नूर इफंदी त्याला भेटला. नूर इफंदी अगदी गमत्या माणूस होता. उलाकचं आणि त्याचं छान जमे. त्या दिवशी नूरच्या हातात एक चित्र होतं. हो, ते अक्सारचंच होतं. नूर इफंदीनं देखील त्याला दुजोरा दिला. त्याचा मुलगा अक्सारकडे शिकत होता. पुढच्या आठवड्यात अक्सार आणि त्याची पत्नी अर्मिन बेगम यांचा तिथल्या राजामार्फत सत्कार होणार होता. त्यासाठी त्याच्या मुलानं अक्सारचं तेे चित्र काढलं होतं. नूर ते चित्र राजाला दाखवण्यासाठी घेऊन गेला होता. सत्काराच्या दिवशीच दस्तुरखुद्द राजा ते चित्रही अक्सारला देणार होता.

नूर इफंदीनं अक्सार आणि अर्मिनच्या विद्वत्तेची खूपच तारीफ केली. उलाकनं खालचा ओठ घट्ट चावला. तो नूर इफंदीला म्हणाला, ‘‘घर माहिती आहे तुम्हाला त्याचं?’’
नूर इफंदी पडला शायर. तो म्हणाला़, ‘‘अरे वा! त्या घरात हुस्न, चाँद, गुलाब, शबाब सगळं एकत्र आहे. ते घर तर या शहरात एकदम मशहूर आहे.’’
‘‘मला पाहायचंय ते घर…’’ उलाक एकेक शब्द सावकाश उच्चारत म्हणाला.
नूरला पण काही जाणवलं असावं. तो उलाकला म्हणाला, ‘‘बाबा रे, काही जुनी दुश्मनी नाही ना?’’
‘‘छे छे!’’ उलाकनं स्वतःला सावरत काहीशा कडवटपणे, पण बेफिकिरीनं खांदे उडवत म्हटलं, ‘‘अक्सारसारख्या विद्वानाशी कोण कशाला दुश्मनी घेईल?’’
नूर इफंदी त्याला डोळा मारत म्हणाला,़ ‘‘त्याची विद्वान बायको त्याच्यापेक्षा वयानं बरीच लहान आणि अगदी चाँद का टुकडा आहे म्हणतात.’’
उलाकला त्याचं ते बोलणं काही आवडलं नाही, पण तो काही बोलला नाही. त्या रात्रभर तो त्याच्या कोयत्याची धार परजत बसला.
दुसर्‍या दिवशी पहाटे उठून त्याच्या घराच्या पायरीवर थोडा वेळ शांत बसला. त्याला लहानपणापासूनचं सगळं आठवत होतं. अर्मिनच्या घरी काय होईल, ती त्याच्याबरोबर यायला तयार झाली तर… हट्! ती शक्यता तर कधीच नसणार होती. त्या दोघांना मारून टाकणं, हा एकच मार्ग होता. त्यानंतर तो त्याच्या वस्तीत परत जाणार होता आणि तीन वर्षं थांबलेलं त्याचं आयुष्य स्वच्छ हृदयानं पुन्हा सुरू करणार होता. मग त्यानं पाठीवर त्याची काळी घोंगडी ओढून घेतली आणि तो अर्मिनच्या घरी पोचला.
त्यापुढचं सगळं त्या भल्या माणसाला सांगून झाल्यावर उलाक डोळे मिटून बसला होता. त्याच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहत होतं आणि ती हकीकत ऐकणार्‍या त्या माणसाच्या बायकोच्याही.

थोडा वेळ गेल्यावर तो भला माणूस म्हणाला, ‘‘धन्य आहे बाबा तुझी! तिला मारून टाकण्याच्या हेतूनं एवढा भटकलास, पण शेवटी तू माफ केलंस तिला. अगदी खरं प्रेम आहे तुझं त्या अर्मिनवर!’’
यावर उलाकनं नकारार्थी मान हलवली. तो म्हणाला, ‘‘तसं नाही. माझ्यासमोर आलेली ती स्त्री माझी अर्मिन नव्हतीच. कुणी परकी स्त्री होती. ती जर माझी कुणीच नसेल, तर मी तिला कशासाठी मारायचं, या विचारानं तो कोयता माझ्या हातातून गळून पडला.’’
यावर त्या माणसानं उठून उलाकला घट्ट मिठी मारली आणि उलाकनं डोळे उघडून पाहिलं, तर दरवाजात तो बुढ्ढा अक्सार दोन्ही हात पसरून उभा होता आणि त्याच्या मागे ते खूप घुंगरांचे दोन्ही पैंजण घातलेली खळखळती अर्मिन…
(किरगिझस्तानमधल्या लोककथेवर आधारित)

– मंजूषा देशपांडे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.