Now Reading
आऽऽकछीऽऽऽ

आऽऽकछीऽऽऽ

Menaka Prakashan

दडा बसल्यावर कसा आवाज येईल तशाच काहीशा आवाजातल्या राष्ट्रगीतानं माझी झोप भंगली. या वेळेला मी पलंगावर आहे, या कल्पनेनंच मन हर्षलं. मी परत डोळे घट्ट मिटले आणि झोपेच्या अधीन जायचा प्रयत्न करू लागलो. आज शाळेला बुट्टी झाली म्हणून आणखीनच आनंद झाला.
आमच्या घराभोवोती चार शाळा आहेत. त्यांची राष्ट्रगीताची वेळ सुमारे साडेदहाची. माझी शाळा सकाळी लवकर भरायची, त्यामुळे या शाळांचं राष्ट्रगीत ऐकायचा प्रश्नच नसे. शाळेला बुट्टी झाली, तरच ते ऐकायला मिळे.

‘‘तापलाय चांगलाच,’’ अप्पा माझ्या डोक्यावर हात ठेवून आईला सांगत. ‘‘ABCO घेऊ दे काही तरी खाल्ल्यावर.’’
आईची रुग्ण तपासायची खोली बाहेरच्या बाजूला होती. त्या खोलीच्या एका भिंतीच्या फळीवर लालचुटुक झाकणाच्या लहान पांढर्‍या डब्या ठेवलेल्या असत. त्या डब्यांवर इंग्रजी अक्षरं लिहिलेली असत. अ म्हणजे सर्दीची, इ म्हणजे तापाची, ज म्हणजे अँटिबायोटिक वगैरे वगैरे. मी महिन्यात दोनदा तरी ABCO च्या अधीन असायचोच. आजी मला चेष्टेनं ‘सर्दीची बरणी’ म्हणायची!
डंपर भरून गरम हळद-दूध आई घेऊन यायची आणि बळे बळे प्यायला लावायची. मला मात्र चहाचे डोहाळे लागलेले असायचे! सर्दी झाल्यावर हळद, दूध म्हणजे मला तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं वाटतं. रोज मस्त बोर्नव्हिटा, किंवा अंडं, दूध आणि व्हॅनिला इसेन्स. यासमोर हळद, दूध म्हणजे मला एरंडेल परवडले असं वाटे.
ABCO चा खुराक घेतला, की सरसरून घाम येई आणि माझी चुळबूळ सुरू होई.
या आई लोकांची सगळी इंद्रियं तेज असतात, हे अगदी खरं. ‘‘शाळा बुडलीये ना, आता शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे त्या त्या विषयाचा अभ्यास कर.’’ आईसाहेबांचा हा आदेश ऐकून माझ्या अंगात आलेली तरतरी नाहीशी होई.

माई आजी मधे मधे मला लिमलेटच्या गोळ्या, मनुका देत. ‘‘केदूचा घसा कोरडा झाला असेल गं, कॉफी दे त्याला कमी दुधाची म्हणजे पचायला सोपी.’’
काळी कॉफी मला प्राणप्रिय. ती प्यायला मी रोज घसा कोरडा करायला तयार असे. काळी कॉफी आणि मारीची दोन बिस्किटं खाल्ली, की छान झोप लागे. न्याहारीला गुरगुट्या भात, मेतकूट आणि तुपाची धार म्हणजे स्वर्गच.
आई वरून किती कडक असल्याचा आव आणत असली, तरी आतून ती फणसाच्या गर्‍यागत गोड आणि मऊ. दर तासाला माझ्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या घालायची आणि केसांतून बोटं फिरवायची. माझी एकशे एक टक्के खात्री आहे त्या केसातून फिरणार्‍या बोटांमुळेच मी बरा व्हायचो. अइउज निमित्तमात्र.
सर्दी आणि माझं लहानपणीच लग्न झालेलं. सगळ्या ऋतूंत आम्ही एकत्र. दुसर्‍या दिवशी उन्हाळा असला, तरी केदार लांब बाह्यांचा स्वेटर आणि कानटोपीशिवाय शाळेत जात नसे. जाच नुसता जाच!
आऽऽकऽऽछी आऽऽकऽऽछी …शिंकांच्या लडीनं जाग आली. नाकातून पाणी वाहत होतं. शेजारच्या खुर्चीवर ठेवलेल्या ओल्या रुमालाचा कोरडा भाग शोधला आणि नाक पुसलं. मोबाईल साडेआठ झालेत, असं खुणावत होता. विक्सच्या नळकांडीतून प्रत्येक नाकपुडीत दोन झुरके घेतले आणि ताडकन उभा राहिलो. गरम चहा प्यायला. गोळ्यांचा डबा ढुंढाळला आणि एक गोळी घशाखाली सारली. क्लिनिकला जायला तयार झालो.
आता गळक्या नाकाला नवीन कोरड्या रुमालाचा तो आधार.

हल्ली सर्दी पण वर्षा-दोन वर्षांत एकदा होते. माझ्यागत ती पण मिस करत असेल हळद, दूध, काळी कॉफी, लिमलेटच्या गोळ्या, मनुका, अइउज आणि उन्हाळ्यातला स्वेटर आणि कानटोपी.
मला उणीव भासते त्या एकाच जालीम इलाजाची… केसांत फिरणारी ती बोटं.
आक छीऽऽऽ… आईला भेटायला जावं लागेल, असं दिसतंय…

– डॉ. केदार आठवले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.