Now Reading
आनशी

आनशी

Menaka Prakashan

नगर जिल्ह्यात, खुद्द नगरपासून जेमतेम दहा-पंधरा किलोमीटरवर असलेलं आमचं गाव तसं एकदम चिमुकलं, सुंदर, आटोपशीर असं आहे. गाव कसलं हो, एकादी वाडीवस्ती म्हटलेलं जास्त योग्य होईल. साधारणत: शे-दीडशे उंबरा आहे झालं. पूर्वेला माळावर बराकीसारखी शाळा, ‘विविध कार्यकारी सेवा संघ’ असलं लांबलचक नाव असलेलं शेतीमालाबाबतचं गोडाऊन, तिथेच बाहेरच्या बाजूच्या मोठ्या ओट्यावर सहकारी दूध संकलन केंद्र, गावाबाहेर त्याच बाजूला बर्‍यापैकी वाहतं पाणी असलेला ओढा, काहीशी पडझड झालेली पण मोठी, उंच काळ्या दगडांनी बांधून काढलेली कमानदार वेस, तिच्यावर ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ अशी पाटी आणि महाराजांचा अर्धपुतळा, असं सगळं बाह्यस्वरूप. वेशीतून आत आल्यावर लगेच डाव्या हाताला लालसर दगडांनी बांधून काढलेलं उंचशा चौथर्‍यावरचं महादेवाचं देऊळ, उजवीकडे छोटीशी लाल मातीवाली तालीम, जवळच मशीद पण. दहा-पंधरा पायर्‍यांवरचं असं मारुतीचं देऊळ, त्याला लागूनच ग्रामपंचायतीचं कार्यालय, थोडंसं पुढे पुन्हा डाव्याच बाजूला काळ्याकरंद दगडांची बांधीव, जुनी, देखणी पाण्याची बारव. अशी एकंदरीत सुरुवातीची रचना. मग गावाची वस्ती सुरू. दक्षिणेकडे तर तसा नुसता गाडीरस्ताच. उत्तरेकडचा सगळा भाग म्हणजे तेलीवाडा, गवळीवाडा यांनीच व्यापून राहिलेला. गाव पूर्व-पश्चिम असं लंबुडकंच म्हणाना. मोठी दगडी, प्रशस्त अशी घरं मोजकीचं, बाकी सारी माळवदवाली, मातीची बैठी घरंच जास्त. इनामदाराचा वाडा, मारवाड्याचा वाडा, भटाचा वाडा आणि आम्ही, म्हणजे लोखंडे आणि जगताप यांचे समोरासमोरचे मोठे वाडे असा भागच काय तो जरा ‘गाव’ म्हणता येईल असा. मधून थेट जाणारा पूर्व-पश्चिम रस्ता म्हणजे गावाची शान. तर अशी एकंदरीत गावाची रचना. शाळा म्हणजे एकदम नमुना. फक्त चौथीपर्यंत, एक शिक्षकी, मुला-मुलींची एकत्र अशी शाळा. पुढे शिकायचं, तर चार किलोमीटरवरच्या पोखर्णी गावी जावं लागायचं. तेही फक्त सातवीपर्यंतच. हायस्कूल वगैरेची चैन हवी असेल, तर मग नंतर नगर, किंवा पुण्यासारख्या ठिकाणी कुणी काका, मामा, आत्या, मावशी असेल, तर त्यांच्या आसर्‍यानंच शक्य व्हायची.

मी, लोखंड्यांचा अर्जुना आणि जगतापकाकांची मुलगी अनसूया, म्हणजेच ‘आनशी’ गावातल्याच शाळेत ‘श्रीगणेशा’ केला. माझ्या वडलांना सारा गाव आबासाहेब आणि आनशीच्या वडलांना तात्यासाहेब म्हणत असे. घरंही समोरासमोर, शाळाही एकच असे आम्ही शाळासोबती होतो. आमच्या दोन्ही घराण्यांमध्ये वर्षोगणती एकदम जिव्हाळ्याचं, नातेसंबंधासारखंच वातावरण होतं. माझी आई- अक्का आणि आनशीची आई- काकू शेजारणी, बहिणीसारख्याच होत्या. आबा-तात्यांचं तसंच होतं. सार्‍या गावात आम्हा लोकांचा बराचसा दरारा होता.

गाडी रस्त्याकडेचं आमचं वावर ‘हत्ती आंबा’ आणि तात्यांचं वावर शेजारी-शेजारी लागूनच होतं. दुसर्‍या बाजूचं आबांचं वावर आणि तात्यांचं वावर जरा दूर दूर असे होतं. आमच्या ‘हत्ती आंबा’ वावराची कहाणी एकदम मस्त होती. सार्‍या गावात एवढा प्रचंड, विस्तीर्ण आम्रवृक्ष केवळ एकच एक होता. एकदा का तो फळांनी लगडला, की पानं कमी, अशी फळं लगडायची. सार्‍या गावाला त्याचं कौतुक असायचं. इतर तशी आंब्याची झाडं गावात बरीच होती, पण आमचा ‘हत्ती आंबा’ म्हणजे एकदम सम्राटच. कुणाकुणाकडे वानोळा दिला, की हमखास विचारणा व्हायची, ‘काय अर्जुना, हत्ती आंबा ना? एकदमच बेश्ट बुवा.’ वावर तसं ओढ्याकाठी आणि चांगलं लांबलचक, एकसंध पसरलेलं, मोठ देखणं. हत्ती आंब्याच्या माझ्या आठवणी नुसत्या सुखानंदाच्या फुलबाज्यांसारख्या आहेत.

गावच्या शाळेत, बालसुलभ प्रवृत्तीनुसार माझं अन् आनशीचं खेळणं, भांडणं, कट्टी, अबोला, पुन्हा बट्टी, चिमणीच्या दातांनी कैरी-चिंचा खाणं वगैरे सारंसारं चालायचं. आनशीच्या घरी, तिला वारंवार माझं उदाहरण दिलं जायचं. ‘बघ, अर्जुना कसा हुशार आहे, कसा झकास अभ्यासात पुढे असतो, मास्तर सांगत होते परवा आबांना.’ मग आनशी चिडायची, निष्कारण माझा दुःस्वास करायची. म्हणायची, ‘‘तू मुद्दाम मला अभ्यासात मदत करत नाहीस. मिरवायला हवं ना सार्‍या गावात आबांचा अर्जुना हुशार म्हणून!’’ तिची समजूत काढता काढता माझ्या नाकीनऊ यायचे.

गावची शाळा, पोखर्णीची शाळा सारं पार पडलं. अनशीची जेमतेम पोखर्णीच्या शाळेपर्यंत मजल झाली. मला तर तसं मुळीच चालणारं नव्हतं. म्हणजे घरून काही खास जोरजबरदस्ती मुळीच नव्हती. आमची शेतीवाडी, उत्पन्न तसं बक्कळ होतं. पण मी कसा तेवढ्यावर थांबणार? मग पुढील शिक्षणासाठी नगरला मनूमावशीकडे (मनोरमा) प्रस्थान केलं. दिल्ली गेटजवळ सातभाई गल्लीत तिचा चांगला मोठा दगडी बांधणीचा जुना वाडा होता. ती आणि काका. मूलबाळ काही नाही. मावशीचं माझ्यावर पोटच्या मुलावरताण असं प्रेम होतं. ती मला काहीही काम वगैरे करूच द्यायची नाही. म्हणायची, ‘‘मला काय धाड भरलीया, म्हून लेकराला कामाल लावू?’’ कॉलेज शिक्षण झाल्यावर योगायोगानं मला नगरमध्येच औरंगाबाद रोडवर शासकीय कार्यालयात नोकरी लागली. आता वैयक्तिकरीत्या मला दोन कामं होतीच. एक म्हणजे, जरा सावेडी रोडच्या बाजूला बर्‍यापैकी निदान टू बीएचके फ्लॅट घेणं आणि नित्याच्या वापरासाठी दुचाकी वाहन घेणं. काका पडले राजकारणी. त्यांची ‘पल्सर’ त्यांना लागायची. मी सायकल वापरायचो. आबा स्वत: म्हणायचे, ‘‘अरे, आता दुचाकी घे रे बाबा, काय अडचण असली, तर मी, तुझा बाप, आहे ना जिवंत?’’ पण शक्यतो मला माझ्यासाठी म्हणून मोठा खर्च, निदान आता तरी, आबांना करावा लागू नये, अशी तीव्र इच्छा होती. मी तसं कधी काही कुणाला बोलून दाखवलं नाही, पण मनात कायमचं असायचं. तसा मी फक्त काही कारणपरत्वेच घरी, गावाकडचा खर्च करायचो. कुणाचीच तशी काहीही अपेक्षा अशी नव्हतीच.

मावशीकडे, विशेषत: फ्लॅट घेण्याचा एकदा विषय सहज निघाला होता. ती म्हणाली, ‘‘काय जरूर पडलीये? तू अक्कीचा- माझ्या मोठ्या बहिणीचा- एकुलता एक मुलगा, म्हणजे माझा मुलगाच ना रे? काय तुला घरप्रपंच थाटायचाय तर इथे काय काटे टोचायला लागलेत का? होऊदे ना तुझं लग्न, तुझ्या बायकोची काकणं वाजूदेत ना या घरात, तुझं लेकरू खेळूबागडूदे ना रे या वास्तूत, आता या वयात का असा मला छळायला लागलाहेस रे दावेदारा?’’ मी काय अन् कसं बोलणार मावशीच्या असल्या बोलण्यावर? तो विषय मग तेव्हा तेवढ्यावरच राहिला.

हायस्कूलपासून मी नगरला एवढी वर्षं काढली मावशीकडे. आता तर लग्नाच्या गोष्टीपर्यंत मजल आली. तसा मी सणावाराला, काही काही कारणापरत्वे वारंवार गावी जातच असायचो. पण एकमेव सुप्त कारण म्हणजे, आनशी. काळाची अद्भुत जादू दृष्टोत्पतीस यायची. कळी हळूहळू फुलायला लागली. कशी अन् किती, कोणकोणत्या कोनांतून पाहावी, असा गोड प्रश्‍न छळत राहायचा. गाव पडलं नखाएवढं. सारं सांभाळूनच घ्यावं लागायचं, मनापासून खूप खूप इच्छा असूनही भेटणं, मनातलं बोलणं, सारं तसंतसंच राहून जायचं. ‘आता पुढच्या वेळी नक्की’ असा संकल्प कितीतरी वेळा केला अन् पुढे ढकलला, याची गणतीच नाही. शिवाय, आनशीला तरी नक्की काही ‘तसं’ वाटत असेल का नाही? तात्या, काकू आपल्या एकुलत्या लेकीसाठी कुठलं जबरं, तालेवार स्थळ पाहत असतील का? कशाचा काही ताळमेळ बसत नव्हता. आत्ता आत्ता कुठे जरा अंधुकसा आशेचा किरण अप्रत्यक्षरीत्या अक्काकडून समजला होता. काडी हाती लागली होती. तिच्या आधारे किनारा गाठायचा होता. तात्या, काकू आडूनपाडून आबा, अक्कांशी संधान बांधायच्या मार्गी लागले होते. स्वत: आनशीच्या मनीचं हितगूज तेवढं जाणून घ्यायला हवं होतं. ‘ठीकाय. ते आता या वेळी पाहू’ असं मी रजा घेऊन गावी आलो, तेव्हा मनाशी पक्क केलं.
आमच्या ‘हत्ती आंब्या’च्या वावरापासून ग्रामदेवतेचं देऊळ तसं जवळच, पंधरा-वीस मिनिटांवर होतं. देवळात जाऊन मी परत वावरात येऊन आंब्याच्या वृक्षातळी जरा विसावून बसलो होतो. जवळच्याच ओढ्यावर आनशी आलेली दिसली. तिच्याकडच्या छोट्या बारदानी पिशवीत ती रांगोळीसाठी लागणारे शिरगोळे दगड गोळा करत होती. मनानं उचल घेतली. म्हटलं, ‘वारे गब्रू, आता नाही तर मग कधी?’ मी हाक मारली, ‘‘आनशे, ए आनशे, जरा ये इकडे.’’

आनशी आली, साडीचा घोळ पायांत आवरून बसली. उजव्या हाताच्या मुठीचा मुटका गालाशी टेकवून तिरप्या नजरेनं माझ्याकडे पाहत म्हणाली, ‘‘पाव्हणे, या वक्ताला वाढूळ वाढला मुक्काम?’’
‘‘पाव्हणा? मी? माझी नाळ पुरलेलं हे माझं जन्मगाव अन् मी पाव्हणा? काय बोलतीयास आनशे? हां, आता हे खरं की शिक्षणापायी, नोकरीपायी मी मावशीकडे नगरला बर्‍याच वर्षांपासून आहे, पन म्हून मी इथे पाव्हणा मुळीच न्हाय, आन् तसाबी मधूनअधून मी येतोच की?’’
‘‘त्याला काय आरथ हाय? कधी सवडीनं, निवांतपनी चार सबूद तरी बोललास का रं?’’
‘‘न्हाय जमलं खरं, पन म्हून काय म्या इसरलूं न्हाय समदं, बालपनापासून मला वळकीत न्हाईस का? आँ? त्याचं काय हाय आनशे, एवढी वरसं गेली, आपून काय आता न्हानं न्हाय राह्यलो. उगं आपलं गप्पा निसत्या मारल्या, तरी गावातले लोक दहा तोंडानं हजार वावड्या उठीवतेत.’’
‘‘एवढा मर्दावानी मर्द आन् लोकान्ला काय घाबरतोस रं अर्जुन्या?’’
‘‘तेच म्हणतोय आनशे, मी मर्द म्हून मी न्हायंच घाबरत, पन कुनी वाईटवंगाळ तुझ्याबद्दल बोललं, तर माझ्याकून सहन न्हाईच हुयाचं, आन् मग सबदानं सबुद वाढून समद्या गावाला तमाशा हुयाचा, ते नुको. हां, तर या वक्ताला मुक्काम जरा वाढला म्हनतीयास ते खरं हाय. घरचे लोक आता लग्नासाठी मागं लागले हायेत ना, ते एक झेंगट लागी लावायचं हाय.’’
‘‘झेंगट कसलं? ते तं सारं समदं रीतीला धरूनच हाये की? आता आमच्या घरी तरी तेच चाल्लयं की, कुणीतरी पाव्हने यायचे हायेत म्हनं एवढ्या दो-चार दिसांत. पर तुझं काय?’’
‘‘मी नगरला मावशीकडे र्‍हातूं ना? तर तिच्या एका मैतरनीची पोरगी हाय म्हनं लग्नाची, म्हून मावशी मागं लागलीया आबा, अक्का अन् माझ्या. तुला तर ठावंच हाय, मावशी मला तर आयवानीच हाय म्हून. मंग तिची इच्छा हाय, तर एकदा आबा, अक्कानी नदरंखालून घालावी पोरीला, असं मावशी मलाबी म्हनतीया. जमलं समदं तर मंग साक्ष गंध उरकून घिऊ म्हनतीया. मी तर काय, संबरदा पाह्यलयं पोरीला.’’
‘‘व्हय? कसी कसी हाय रं? सुंदर हाय? माझ्या परीस?’’
‘‘हे बघ आनशे, असं मला पेचात नको पकडूस.’’
‘‘ते आनि कसं म्हनतूस?’’
‘‘मंजी बघ, तुझ्या परीस सुंदर हाय म्हनलं, तर तू म्हनशील, मोठा बाजीराव लागून गेलाय. मस्तानीशी लगीन करतुया?’’
‘बरं, तुझ्याइतकी सुंदर न्हाय म्हनलं, तर तू शेफारशील अन् म्हनशील, शेवटी माझ्यापरीस डावीच बायकू केली अर्जुन्यानं.’’
‘‘बरं, ते जाऊनदी, सांग ना, कसी हाय त्ये.’’

मी मुद्दाम डोळे मिटून घेतले. म्हनलो, ‘‘सुर्व्याला म्हनतंय उगूं नगस, अन् चंद्राला म्हनतयं मावळूं नंगस असलं देकनं रूप हाय. आनशे, सोनचाफा झक मारतुया, केवडा लाजतुया असी अंगकांती हाये बघ. हरनावानी टपुरं अन् हसरं, चमकदार डोळं हायती. आन् व्हट? दाळिंबाचं दानं सारं चुरडलंयत गं आनशे. मोगर्‍याच्या गजर्‍यावानी दांत हायती. हसली तर निसतं चांदनं सांडतंय. आन् मला लय आवडतेतं तसलं काळंभोर, दाट, लांबसडक क्येसं हायती.’’
माझ्या चेहर्‍यावर फटकन् केसाळ फटका बसला. डोळे उघडून पाहिलं, तर आनशीनं तिची वेणी फाडकन् माझ्या तोंडावर मारली होती. म्हनाली, ‘‘माझीबी क्येसं काळंभोर, दाट लांबसडक हायती म्हनलं.’’
‘‘आता? अगं, मी तू इचारलंस म्हून फकस्त सांगितलंय, तुला कुठं काय म्हनलो?’’
‘‘असून दी, लय पाल्हाळ नको लावूस.’’
‘‘बरं बाबा, र्‍हायलं समदं. मला तर आनशे काय कळतच न्हाय, कसं काय तुझ्यासंगट बोलावं त्ये. शिवाय आनशे, शेहरगावात र्‍हातीया, शिकशान झालंया, रीतभात, चालणंबोलणं समदं कसं बेश्ट हाय. आमच्या काकांनी सबुद टाकला तर कुठं एकांदी नोकरी बी मिळंल, तेवडाचं संसाराला हातभारबी हुईल.’’
‘‘तुला काय धाड भरलीया? बायकूच्या पैक्यावर डोळा ठिवतुयास मुडद्या!’’
‘‘अगं, हो हो, तुला ठावं न्हाय आनशे, म्हागाय काय चढलीया? सोपं न्हाय र्‍हायलं शेहरगावात र्‍हानं.’’
‘‘बरं, र्‍हाऊंदी. पोरगी बघायला मी बी तुमासंगट येईन, आमाला पाहू तर दी कशी वैनी हाय आमची.’’
‘‘तसं बरं न्हाय आनशे, कुनी इचारलं, का बाबा, ही भवानी कोन म्हून?’’
‘‘येवढं काय त्यात? सांगायचं, अशी अशी भन हाय म्हून.’’
‘‘असं का? मंग तुमच्या घरी पावने आले तुला बघायला, तर मी बी यीन की.’’
‘‘नगं, कुनी इचारलं, की बाबा हा म्हसुबा कोन म्हून?’’
‘‘त्यात काय? सांगायचं, असा असा सगंवाला हाय म्हून.’’
‘‘आमचंच सबूद आमावर उल्टू नगा.’’
‘‘चल आनशे, वाढूळ वकुत झालाया, ते दगडांचं वझं माज्या हाती दी बरं?’’
‘‘र्‍हाउंदी, शेहरगावची नाजूक नार न्हाय म्यां, शेतावावरांतली ‘ग्रामकन्या’ हाय म्हनलं.’’
‘‘अरे व्वा आनशे, ‘ग्रामकन्या’ काय?’’

गाडीरस्त्यानं चालताना हातातल्या दगडांच्या पिसवीच्या वज्यानं एका खड्यात आनशी पडायाच झाल्ती. तिच्या दंडाला धरून म्यां सावरली तर तिची क्येसं माज्या चेहर्‍याशी इवून त्यापायं निस्ती धुंद वासाची जादूजादू झाल्ती. डोसक्यापासून पायापावतो पार लाखो लाखो मुंग्यांची पालकीच निंगाली. साडीचा बोळा तोंडाशी धरून कुजबुजल्यागत आनशी म्हनाली, ‘‘या बया! हात धरलायसा बरं का अर्जुन्या, धेनात ठीव.’’ मी फकस्त हसलो.
पुढच्या दोन-तीन दिवसांत जगतापांच्या वाड्यात एकच धमाल उडाली. शेतावरचे हैबत्या, मारत्या गडी सारखे राबत होते. सारी चकाचक साफसफाई चालली होती, दारंखिडक्यांना तेलपाणी देणं, अंगणांत शेणसडा घालणं, दारांवर काचेच्या पुंगळ्यांचं तोरण लावणं, एकदम सारं जोसात पार पाडलं जात होतं. मंजी आता आनशीला बघायला पावने यायचे म्हनायचे.

‘तो’ दिवस उजाडला. ‘पावनेमंडळी’ येऊन तात्यांच्या ओटीवरच्या मऊशार, मोठ्या गालिच्यावर, गाद्यांवर विराजमान झाली. पानसुपारीची तबकं पुढे सरकली. ‘तुमी कशे? आमी कशे?’ इचारपूसबी झाली.
तात्यांनी आतल्या खोलीकडे आवाज टाकला, ‘‘आनशे, भाईर ये बरं.’’ खालमानेनं आनशी भाईर आली.
हलकेच नजर उचलली तिनं.
अन्… अन्…. समोर आबा, अक्का अन् मला पाहून अति अति गोऽऽड हसली. तिचे चमकदार, काळे, टपोरे डोळेसुद्धा हसत होते. खळकन अश्रूच ओघळायला लागले. एका झटक्यात वळून ती आतल्या खोलीत गेली.
तात्या ओरडले, ‘‘ए आनशे, येडे, भाईर ये बरं.’’
दाराआडूनच ती म्हणाली, ‘‘न्हाय तात्या, आमी न्हाय येनार, असली जीवघेणी थट्टा का केली म्हनायची? केवडा माझा जीव टांगणीला लागला हुता.’’
‘‘अगं, हो हो. सारं सांगायला तर भाईर ये सांगतुया म्हनं.’’

आनशी भाईर आली, बसली. माझ्याकडे बघून तिनं चक्क सर्वांदेखत जीभ बाहेर काढून वेडावून दाखवलं. सारा एकच हास्यकल्लोळ उडाला.
तात्यांनी खुलासा केला, ‘‘आनशे, आम्हा मोठ्या माणसांचा इचार अदुगरच झाल्ता समदा. अर्जुनराव पन सामील हुते त्यात. पन त्यांनी एक जबरदस्त अट घातली, की ‘त्यांना तुझा काय इचार हाये ते पन अदुगरच ठावं हुयाला हवं अन् ते सोता ते बघनार हुते. शिवाय, कुनाला कुनालाबी ह्यातलं एक आक्षीरबी कळायला नुको, अगदी तुला, आनशीलापन, कळू देयाचं न्हाई. जर का मुंगीच्या पायाइक्तं जरी कुठं कुनाला काय कळलं तर ते ह्या तात्या जगतापाला सुदीक मापी करनार न्हाईत. काय इचारनारबी न्हाईत, पन समजून जायाचं का बाबा ही सोईरीक हुनार न्हाई, काळ्या दगडावरची रेघ,’ मंग आमची काय बिशाद लागून गेली का न्हानपनापासून बघिटलेला, लाडका जावई असा हातून घालवायची. म्हून तुला फकस्त सांगिटलं का पावने येनार हायेत बघायला, कळलं का आता?’’

आनशीनं सरळ सरळ माझ्याकडे बघून विचारलं, ‘‘मंग नगरच्या मावशीच्या मैतरनीची पोरगी बघायची हाये, तिचं काय?’’ मी म्हन्लं, ‘‘ती अस्मानीच्या परी राज्यातली, अशीच आमची कल्पनेतली स्वप्नसुंदरी होती. खरीखुरी तर आता इथं समोरच बसली हायेना?’’
अगदी अगदी जीवघेणी लाजली आनशी.

– शरश्चंद्र दीक्षित

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.