Now Reading
आनंदभोवरा

आनंदभोवरा

Menaka Prakashan

डायनिंग टेबलावर पसरून ठेवून वर्तमानपत्र वाचणार्‍या विमलाबाई एकदम ओरडल्याच, ‘‘अगंबाई! ‘स्वरसाधने’च्या स्पर्धा!’’
गॅलरीत बसून पहिलाच चहा नुकताच संपवलेले वामनराव त्या ओरडण्यानं दचकले आणि दुप्पट आवाज काढून ओरडले, ‘‘एवढं ओरडायला काय झालं? काय विंचूबिंचू चावला का काय?’’ त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून विमलाबाई पुढे वाचायला लागल्या. आतून काहीच आवाज येत नाही, असं बघून आणि खरं म्हणजे पुन्हा चहा पाहिजे म्हणून वामनराव कपबशी घेऊन स्वतःच स्वयंपाकघरात आले. डायनिंग टेबलभर पसरलेलं वर्तमानपत्र बघून त्यांना तिडीक आली. ते जवळ जवळ खेकसले, ‘‘काय हे, कशी पसरलीत पानं! नीट घडी करून वाचायला काय होतं कोण जाणे… अशी पसरायची, मग कशीतरी गोळा करायची… वेळेवर पाहिजे ते पान इतरांना सापडलं तर शपथ! आता हे टेबल पसरलंय, मग ही कपबशी कुठे ठेवायची? डोक्यावर?’’

रागारागानं त्यांच्याकडे नजर टाकत विमलाबाईंनी वर्तमानपत्राची पानं त्यांच्याकडे ओढून टेबलावरची जागा मोकळी केली. त्यातून दोन पानं जमिनीवर घरंगळली. ते बघून वामनरावांची आणखी चिडचिड झाली. स्वतःशीच काहीतरी पुटपुटत त्यांनी मोकळ्या झालेल्या जागेत कपबशी ठेवली आणि खुर्ची ओढून घेत बसता बसता म्हणाले, ‘‘एवढं काय आलंय छापून कोण जाणे?’’ त्यांनी चहाचा थर्मास उचललेला बघून विमलाबाई म्हणाल्या, ‘‘एकट्यानं ढोसू नका. मला पण ओता…’’ चहा पिता पिता म्हणाल्या, ‘‘जरा चार ओळी सलग वाचू देऊ नका…’’
‘‘एवढं काय वाचायचं आहे? वाचायचं आणि ओरडायचं… दुसर्‍याला हार्ट अ‍ॅटॅक यायचा एखादवेळी…’’ वामनराव तणतणले, ‘‘हार्ट आहे का अ‍ॅटॅक यायला,’’ असं म्हणून वातावरण हलकं करत विमलाबाई म्हणाल्या, ‘‘अहो, ऐका ना… ‘स्वरसाधने’च्या स्पर्धा आहेत. गाण्याच्या.’’
‘‘म्हणजे अजून सुरू आहेत की काय?’’ वामनरावांनी आश्‍चर्यानं विचारलं, ‘‘कॉलेजात असताना ऐकायला जात होतो. पन्नास वर्षं होत आली त्यालासुद्धा.’’ त्यांच्या आवाजात त्या काळाच्या हळव्या ओल्या खुणा होत्या.
‘‘अजून आठवताहेत म्हणा की तेव्हाच्या स्पर्धा.’’ विमलाबाईंनी थोडं आश्‍चर्यानं विचारलं.

‘‘न आठवायला काय झालं? दिवसच्या दिवस घालवलेत तिथे. मला गाणं आवडायचं. शास्त्र कळायचं नाही फारसं. पण गाणारे, वाजवणारे मित्र होते. स्पर्धा सुरू झाल्या, की कॉलेज-क्लास सगळं सोडून आमचा ग्रुप तिथेच असायचा. सगळे वेगवेगळ्या कॉलेजात होतो, पण गाणं हा समान धागा. सुगम संगीत, नाट्य संगीत, शास्त्रीय संगीत, तबला, सतार काही म्हणून सोडायचं नाही. शेकड्यानं स्पर्धक! काही तयारीचे, काही हौशी. सगळं ऐकायचं. त्यावर कोण चांगलं, वाईट या चर्चा चहा पिताना करायच्या. आपला निकाल तयार असायचा. प्रत्यक्ष निकाल तसाच लागला, तर परीक्षक निःपक्षपाती, नाहीतर पार्शलिटी झाली असं तावातावानं सांगत घरी जायचं. पुढच्या वर्षी ऐकायला परत. तेव्हाचे चांगले स्पर्धक आता यशस्वी गायक झाले. त्या टीव्हीवर गाण्याच्या स्पर्धांना परीक्षक म्हणून आलेली बाई बघितली आणि आठवलं, हिला आपण त्या वेळी स्पर्धेत बघितलंय. फार छान गायली होती बक्षीस समारंभात. फार छान काळ होता तो. शिक्षणं संपत गेली, एकेकजण नोकरीधंद्याला लागला, ग्रुप मोडला… नवे विषय, नवे प्रश्‍न, नवे आनंद, नवी दुःखं… स्पर्धा केव्हा मागे पडल्या कळलंच नाही… आता तुम्ही म्हणालात म्हणून सगळं आठवलं.’’

हे सगळं ऐकताना विमलाबाईंचीसुद्धा तंद्री लागली. तो त्यांचासुद्धा काळ होता. ते दिवस त्यांचेसुद्धा होते. त्यांच्याकडे बघून वामनराव जरासं मिश्किल हसत म्हणाले, ‘‘असं हरवून जाऊ नका. या, वर्तमानात या… आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. इतक्या वर्षांत… म्हणजे या स्पर्धांचा विषयच कधी निघाला नाही.’’ वामनराव काहीतरी आत्तापर्यंत न सांगितलेलं सांगताहेत म्हटल्यावर विमलाबाईंची उत्सुकता वाढली.
‘‘या स्पर्धांच्या वेळीच मी तुम्हाला पाहिलं होतं. आमच्या ग्रुपसारखाच तुम्हा मुलींचाही ग्रुप होता. काही ओरडणार्‍या, काही रडणार्‍या… त्या बघत होतो. नंतर स्थळ म्हणून आलेला फोटो बघितला आणि म्हटलं, स्पर्धेच्या वेळी बघितलंय. आता बघायचंसुद्धा कारण नाही. मुलगी पसंत… आपल्यासारखीच गाण्याची आवड आहे. आयुष्य बरं जाईल.’’ असं म्हणून वामनराव उठले. त्यांचं बोलणं ऐकून एवढ्या वर्षांनंतर विमलाबाई एक्साईट झाल्या होत्या. ‘‘बरेच आहात की! स्पर्धा ऐकायला जात होतात का मुली बघायला? आणि आजवर कधी नाही बोललात हे सगळं… आणि आता सांगा, गेलं ना बरं आयुष्य?’’ मान हलवत वामनराव तिरकसपणे बोलले, ‘‘आता काय सांगायचंय? गेलं ते बरंच म्हणायचं अन् काय!’’

दुपारी जेवतानासुद्धा गप्पांचा विषय ‘स्वरसाधने’च्या स्पर्धांचाच होता. स्पर्धांपेक्षासुद्धा खरं सांगायचं म्हणजे आयुष्यातल्या त्या सोनेरी काळाचा होता. स्पर्धा हे निमित्त होतं. ते पंधरा-अठराचं वय. आपल्याला काहीतरी कळतंय, काहीतरी आवडतंय, हे नुकतंच कळायला लागलेले दिवस; आसपासच्या विसंगतीतले विनोद दाखवणारे ते दिवस, मोकळेपणानं हसवणारे, चटकन मावळणारे दिवस; मुठीत आवेगानं पकडलेल्या पाण्यासारखे चहूबाजूंनी वाहून गेलेले ते दिवस; पुन्हा न येणारे ते दिवस स्मरणातून पुन्हा आपल्याभोवती उभे करत वामनराव आणि विमलाबाई बोलत होते.
‘‘तुम्हाल आठवतंय? एकेका गाण्याची साथ यायची. एकदा ‘त्यांनीच छेडिले गं’ची साथ. मग पन्नासेक जणी छेडून घ्यायला दारात उभ्या! एकदा ‘सत्यात नाही आले, स्वप्नात येऊ का’ची लागण झाली होती. अति झाल्यावर मागून कुणीतरी ओरडलं, ‘अजिबात नको.’ ’’
ते ऐकून वामनरावांना हसू फुटलं. ‘‘कुणीतरी नको, मीच ओरडलो होतो. करणार काय? किती वेळा ते रडगाणं ऐकायचं? पुरुष गायकांचंही वेगळं नव्हतं कधी. ‘भातुकलीचा खेळ’ मांडायचा, कधी ‘तोच चंद्रमा’ धरून बसायचं.’’
विमलाबाई म्हणाल्या. ‘‘पण त्यातसुद्धा मजा होती.’’

तोच सूर धरून वामनराव म्हणाले, ‘‘होती तर… आणि अशी गाणी ऐकता ऐकता मधेच अनपेक्षितपणे चांगलं गाणं यायचं. आठवतं का? ती मुंबईची मुलगी आली होती. होती हडकुळीच. अशी तशी… पण प्राथमिक फेरीत तिनं ‘तरुण आहे रात्र अजुनी’ म्हटलं आणि बाजी मारली.’’
विमलाबाईंना ती मुलगी, ते गाणं सगळं लख्खं आठवलं. म्हणाल्या, ‘‘होय हो… काय गायली होती. प्राथमिक फेरीत पाहिली… आणि मग अंतिमला ‘मालवून टाक दीप’… दुसर्‍या कुणाचा घासच नव्हता ही गाणी म्हणायचा…’’ एरवी पंधरा मिनिटांत आटोपणारी जेवणं आज दीड तास होऊन गेली तरी संपेनात.
दुपारच्या चहाला वामनराव स्वयंपाकघरात आले, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्‍न खुटखुटत होता. नेहमीप्रमाणे चहा करून त्यांनी विमलाबाईंना हाक मारली आणि नेहमीच्याच शिरस्त्याप्रमाणे दोन हाका ऐकूनच विमलाबाई उठल्या. त्यांच्यासमोर चहाचा कप ठेवून चहाचा घोट घेता घेता वामनराव म्हणाले, ‘‘सकाळपासून आपण ‘स्वरसाधने’च्या स्पर्धांबद्दल एवढं भरभरून बोलतोय, पण आपण दोघंही श्रवणभक्तच. माझं एक ठीक आहे. मला ओ का ठो गाता येत नाही, वाजवता येत नाही. मी भाग घेणं शक्यच नव्हतं. पण तुमचं काय? तुम्ही का कधी स्पर्धेत भाग घेतला नाहीत?’’
त्यांच्याकडे नवलानं पाहत विमलाबाई म्हणाल्या, ‘‘जे तुमचं, तेच माझं… आपली श्रवणभक्ती बरी… मला थोडंच गाता येतंय? आम्ही आपले किचन सिंगर… स्वयंपाकघरात काम करताना गुणगुणत राहायचं. तेवढंच बरं वाटतं. पण ते स्वतःसाठी- इतरांसाठी नाही.’’
त्यांच्या बोलण्यावर जोरजोरात हसत वामनराव म्हणाले, ‘‘नाही नाही… माझं म्हणणं तेच आहे. इतकी वर्षं जी किरकिर माझ्या कानाशी करताय, ती काही इतकी वाईट नाही. म्हणजे याच्यापेक्षा वाईट गाणारे स्पर्धेत भाग घेत होते. अजूनसुद्धा घेत असतील. मग तुम्हाला काय हरकत होती?’’ त्यांचं बोलणं हातानं उडवून लावत विमलाबाई म्हणाल्या, ‘‘त्यांचं त्यांच्याकडे… आपली लायकी आपल्याला कळली म्हणजे झालं.’’

संध्याकाळी बाहेरून आल्यावर वामनरावांनी बॉम्ब टाकला. कॉटवर लोळत विमलाबाई टीव्ही बघत होत्या. वामनरावांनी त्यांच्यासमोर कागदाची एक सुरळी टाकली. ‘‘हां… तुमचं नाव नोंदवून आलोय. सुगम संगीत खुल्या गटासाठी. त्या फॉर्मची ही कॉपी.’’ आरामात लोळणार्‍या विमलाबाई एकदम दचकून उभ्या राहिल्या. थोड्या रागानं, थोड्या नाराजीनं म्हणाल्या, ‘‘हा नसता उपद्व्याप तुम्हाला कुणी सांगितला हो? परस्पर नाव नोंदवलंत. मी काही जाणार नाही गायला. आत्ताच सांगते.’’
वामनराव उसळले, ‘‘अशा कशा जाणार नाही? नाव काय फुकट नोंदवलंय? चांगले दोनशे रुपये दिलेत त्यासाठी. वाटलं, आनंद होईल. पण इथे उलटंच. म्हणे ‘जाणार नाही!’ ते काही चालायचं नाही. जावं लागेल. म्हणजे जावंच लागेल… तिथे जाऊन काहीही रडून या. नुसत्या गप्प बसून या, पण स्पर्धेच्या स्टेजवर जावंच लागेल.’’
वामनरावांच्या बोलण्यातली तिडीक बघून विमलाबाई कुरकुरत उठल्या. ‘‘आता या वयात स्पर्धेला जाऊन कुठली गाणी म्हणणार आहे मी? पण हम करे सो कायदा… म्हणे गेलंच पाहिजे.’’
विमलाबाईंची नाराजी आवाजात स्पष्ट जाणवत होती. दुखर्‍या स्वरात वामनराव म्हणाले, ‘‘वयाबियाचं बोलूच नका आणि कुठली गाणी विचारू नका. ती अर्जातच लिहून आलोय. नियमाप्रमाणे ती आधीच सांगावी लागतात.’’
ते ऐकून विमलाबाई आणखी हताश होत म्हणाल्या, ‘‘बघते आता. हं… ‘नववधू प्रिया मी’, ‘या कातरवेळी’… अहो, काय हो हे… अहो, सुगम संगीत स्पर्धेत सिनेमातली गाणी चालत नाहीत.’’
त्यांचं बोलणं संपायच्या आत वामनराव जवळ जवळ ओरडले, ‘‘सिनेमातली नाहीच आहे. हे गाणं ‘ऊन पाऊस’ सिनेमातलं माडगूळकर, फडके, आशाबाईंचं गाणं नव्हे हे… हे म्हणतोय ते मालती पांडे, धर्मवीर भारती… मधुकर पाठकांचं गाणं… फक्त पहिली ओळ सारखी, बाकी कडवी वेगळी. इथे कुणाला काही ऐकायला नको… तुम्हाला सुद्धा सांगून ठेवतोय. हे गाणं सिनेमातलं आहे असं कुणी म्हणालं, तर त्याच्याशी भांडा. कारण इतर कुणाला माहिती नसेल, तर तो त्यांचा दोष! आपला नव्हे.’’

विमलाबाई मान हलवत म्हणाल्या, ‘‘तुमचं ऐकायचं ठरवलं, तर सगळीकडे फक्त भांडणंच करावी लागतील मला… पण मला इथे भांडणं चालेल. म्हणजे भांडणं केली म्हणून माझं नाव स्पर्धकांच्या यादीतून बाद करून टाकतील. म्हणजे मग गाणं म्हणायची भानगडच संपली. थँक्यू फॉर सजेशन! आता स्पर्धेच्या दिवशी बघाच कशी भांडते…’’
वामनरावांनी कपाळावर हात मारून घेतला. ‘‘सांगायल गेलं की टांगायला नेऊ नका. गाणं टाळायचं नाही. तिसरं गाणं ‘जिवलगा नाही रे दूर घर माझे’ दिलंय. एकाच भावनेवरची तिन्ही गाणी आहेत. सुंदर आहेत. छान गा म्हणजे झालं. उद्यापासून तयारी सुरू करा. चहा द्यायला मी आहे.’’
तरी विमलाबाई कुरकुरत म्हणाल्या, ‘‘पेटी-तबल्याबरोबर प्रॅक्टिस नको?’’
समजूत काढावी, तसं वामनराव म्हणाले, ‘‘घरी प्रॅक्टिस करताना प्रत्येक गाणं शंभर वेळा ऐका… आणि आहे तसं बसवा. स्पर्धेच्या वेळी तबला-पेटी संस्थेकडून हवी असणार्‍यांच्या यादीत मी तुमचं नाव घातलंय. तिथे तबला-पेटीची साथ मिळेल. पण साथ नसली, तरी लक्षात येणार नाही अशी तयारी करा.’’
विमलाबाई आश्‍चर्यानं त्यांच्याकडे बघत राहिल्या. त्यांचा आपल्या गाण्यावर एवढा विश्‍वास आहे, याचं त्यांना नवल वाटलं आणि मन भरून ओसंडून वाहणारा आनंदही झाला. आणि त्यांच्यासाठी… त्यांच्यासाठीच आपण एवढं तेवढं चांगलं गायला हवं, असं त्यांनी ठरवून टाकलं.

दुसर्‍या दिवशी वामनरावांनी तिन्ही ओरिजनल गाणी मोबाईलवर टाकून दिली आणि विमलाबाईंची ‘स्वरसाधना’ सुरू झाली आणि वामनरावांची मदत. गाणं लावलं की वामनराव आजूबाजूला रेंगाळत राहायचे. एक-दोन दिवस गेल्यावर ते तिथेच बसून राहायला लागले. त्या गाण्यांचे शब्द, त्यांच्या चाली, स्वर आणि गाणार्‍या मालती पांडे, लताबाई, आशाबाई या सगळ्यांचं कौतुक, सगळी आपली माणसं असल्याचा अभिमान आणि गाण्यामुळे मिळणारा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत असायचा. सगळ्याबद्दल किती बोलू, असं त्यांना होत होतं, पण त्यामुळे विमलाबाईंच्या सरावात व्यत्यय येतो, हे कळल्यानंतर त्यांनी श्रवणभक्ती स्वीकारली. विमलाबाईंनी आधी तिन्ही गाणी ऐकली. शेकडो वेळा ऐकली. खरं म्हणजे नेहमी गुणगुणली जाणारी गाणी, पण आता ऐकताना प्रत्येक गाणं वेगळंच वाटत होतं. त्यातल्या बारीक बारीक जागा, ज्या इतक्या वर्षांत कधी लक्षातही आल्या नव्हत्या, त्या आता लख्ख दिसत होत्या.
गाणी डोक्यात पक्की बसल्यावर ती गळ्यातून काढायची धडपड सुरू झाली. स्वतःच्या आनंदासाठी काम करता करता गाणी म्हणायची सवय आता कामी झाली. सत्तर टक्के चाल पक्की होती. आता सुरू होतं ते कोरीव काम. ‘नववधू प्रिया मी बावरते’मध्ये प्रियातल्या ‘या’वरचा बारीक हेलकावा, ‘पुढे सरते फिरते’मधली फिरतेच्या शेवटावरची लकेर. सगळं डोळ्यांत उलगडायचं, पण गळ्यातून निघायची पंचाईत. पण मजा येत होती. गाणी अशी म्हणायचा कधी प्रयत्न केला नव्हता. आता करताना कोडं सोडवल्याचा आनंद येत होता. बरोबर वामनराव! बसल्या जागी चहाचा कप आणून देत होते. चहा पिता पिता गाण्यावर चर्चा करत होते. विमलाबाईंची चाललेली खटपट ऐकत होते. सूचना देत होते. जमतील तशा गाण्यांतल्या जागा आपल्या बेसूर गळ्यातून उलगडून दाखवत होते. त्यांनाही मजा येत होती. आता फक्त गाणं होतं. ओरडणं, खेकसणं, चिडवणं सगळं तूर्तास बंद होतं. शेवटी स्पर्धा दोन दिवसांवर आल्या. अचानक गवसलेलं आनंदपर्व संपत आलं. त्या रात्री झोपताना विमलाबाई म्हणाल्या, ‘‘आठ दिवस फार मजेत गेले हो. पण एक सांगू का? मी काही गाणं शिकलेली पट्टीची गायिका नाही. सगळं काही जसंच्या तसं मला नाही गाता येणार. जसं येतंय तसं स्पर्धेत म्हणून टाकीन झालं.’’

स्पर्धेच्या दिवशी सकाळपासूनच वामनरावांची गडबड सुरू झाली. ‘‘आवरा… आवरा… स्पर्धा आहे… वेळेवर पोचूया… नेहमी इतर ठिकाणी होतो तसा उशीर नको. तिथे जाऊन, ‘आलोय’ म्हणून सांगितलं म्हणजे सुटलो. वेळेवर ‘उपस्थित’ नाही म्हणून स्पर्धेतून नाव काढून टाकायला नको.’’
इकडे विमलाबाईंना स्पर्धेचं टेन्शन आलं होतं. त्यांच्या हृदयात धाकधूक होत होतं आणि पोटात गोळा आला होता. शेवटी एकदा सगळं आवरून दोघं बाहेर पडले. वामनरावांना स्पर्धेचे जुने दिवस आठवत होते. आजसाठी म्हणून त्यांनी दोन दिवसांपूर्वीच जुना मोठ्या चौकड्यांचा खांद्यावर कंडक्टर पट्ट्या असणारा, फ्लॅपचे दोन मोठे खिसेवाला निळा शर्ट आणि अंगासरशी बसणारी पांढरी जीन पँट हुडकून ठेवली होती. आणि दुसरे कपडेच कसे सापडत नाहीयेत असं नाटक करून नाईलाजानं तो खास ड्रेस अंगावर चढवला होता. नेहमीप्रमाणे विमलाबाईंना आवरायला उशीर झाला. शेवटी कसंबसं पातळ गुंडाळून त्या बाहेर पडल्या. पण कुलूप लावताना वामनरावांनी विचारलं, ‘‘हे हत्ती शीर्षासन करून का चाललेत?’’
विमलाबाईंनी बघितलं, तर खरंच दोन्ही काठांवर हत्तीचं खाली डोकं वर पाय झालं होतं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, आपण साडी उलटी नेसलोय. त्या स्वतःवरच चिडल्या. पण वामनरावांकडे चिडक्या नजरेनं पाहत म्हणाल्या, ‘‘नशीब! इथे दारातच दाखवलंत. खरं म्हणजे तुमच्या पद्धतीनं म्हणजे तिथे स्टेजवर जातानाच दाखवायचं!’’ तशीच चिडचिड करत कुलूप काढून आत जाऊन त्या साडी नीट नेसून आल्या आणि घुश्शातच, ‘चला…’ म्हणताना त्यांचं लक्ष वामनरावांच्या कपड्यांकडे गेलं आणि त्यांना हसू आलं.
‘‘अहो, काय हे? हे कुठले कपडे घातलेत? वय काय पन्नास वर्षांनी कमी होतंय का बघताय की काय… पण काही उपयोग नाही. तिथे तुम्हाला आजोबाच म्हणून घ्यायला लागणार. आणि मी आजी…!’’

स्पर्धेच्या हॉलवर पोचल्यावर वामनरावांचा जरासा हिरमोडच झाला. एकतर पूर्वी एक हजार कपॅसिटीच्या थिएटरमध्ये होणार्‍या स्पर्धा जेमतेम दोन-अडीचशे माणसं बसतील एवढ्या हॉलमध्ये आल्या होत्या. त्यांच्या कल्पनेसारखी शे-दीडशे माणसंही नव्हती. पंधरा-वीस माणसं इकडे तिकडे करत होती. तेही चेहरे गंभीर करून. वामनरावांच्या आठवणीतले प्रफुल्लित, उत्साही, उत्सुक, उत्तेजित चेहरे कुठे दिसत नव्हते. विमलाबाईंनासुद्धा चुकल्यासारखं झालं. त्यांच्याकडे बघून वामनरावांनी खांदे उडवले आणि त्यांना घेऊन ते स्पर्धक उपस्थितीची नोंद करायला गेले. विमलाबाईंची उपस्थिती नोंदवल्यावर त्यांनी यादीवर नजर टाकली, तर इनमीन पंचवीस नावं… वामनरावांचा मूडच गेला. पण ते न दाखवता हसत हसत म्हणाले, ‘‘अहो, नशीब चांगलं आहे तुमचं. स्पर्धाच दिसत नाही आहे तुम्हाला. चलो, इस खुशी में चाय हो जाय!’’
रस्त्यावरच्या गाड्यावर उभं राहून चहा पिता पिता धास्तावलेल्या विमलाबाई म्हणाल्या, ‘‘अहो, तुम्ही भरीला घातलंत म्हणून इथवर आलेय मी, पण होईल ना गाणं नीट? का जाऊया परत? फजिती होण्यापेक्षा ते बरं.’’
त्यांना अडवत वामनराव उत्साहानं म्हणाले, ‘‘अजिबात तसलं मनातसुद्धा आणू नका. जरासुद्धा टेन्शन घेऊ नका. तुमची गाणी मस्त होताहेत मी सांगतो ना, आज नंबर मारणार तुम्ही.’’
साडेनऊला सुरू होणार्‍या स्पर्धा एकदाच्या साडेदहाला सुरू झाल्या. पंचवीसातलीसुद्धा आणखी दोन नावं न आल्यामुळे गळली होती. सकाळी पहिली फेरी आणि त्यातल्या पहिल्या दहांची दुसरी फेरी दुपारी तीनला, संध्याकाळी पाच वाजता बक्षीस समारंभ, असं दिवसभराचं नियोजन सांगून संयोजक खाली उतरले आणि दोन दिवस चाललेल्या स्पर्धांतली शेवटची खुल्या गटाची स्पर्धा सुरू झाली. पंचविशीतल्या पहिल्या स्पर्धकानं ‘आज अचानक गाठ पडे’ सुरू केलं आणि इकडे वामनराव म्हणाले, ‘‘पेलणार आहे का गळ्याला?’’ पण गाणं छान झालं.

मग पुढचा स्पर्धक, मग त्याच्या पुढच्या अशी स्पर्धा पुढे सरकत राहिली. वामनरावही रंगून गेले. काही गाणी फारच चांगली झाली. काही अगदीच साधारण. बरीच माहितीची, तर दोन-चार एकदम अनोळखी. ‘अपुल्या हाती नसते काही हे समजावे…’ हे गाणं त्यांना अजिबातच माहीत नव्हतं, पण त्यांना आवडलं. विमलाबाईंचा क्रम शेवटी शेवटी आला. परीक्षकांनी त्यांना ‘नववधू’ गायला सांगितलं. विमलाबाईंचं टेन्शन एकदम हलकं झालं. गाणं आवडीचं, त्यातल्या त्यात सोपं… आणि तयारी पण खूप झाली होती. त्या उत्साहानं स्टेजवर गेल्या. संस्थेकडून वाजवणार्‍या तबला-पेटीवाल्या वादकांना आपला सूर सांगितला, गाणं सांगितलं आणि क्षणभर डोळे मिटून घेतले. आपण स्टेजवरून गाणार, हे त्यांना अजून खरं वाटत नव्हतं. त्यांचं मन आनंदानं भरून गेलं. त्या आनंदातच त्यांनी सुरुवात केली,
‘नववधू प्रिया मी बावरते…’ एकेक कडवं पुढे जात राहिलं. ‘इथला लळा लागला, इथल्या मळ्याची ओढ लागली’ शेवटी ‘आता तूज भय लाज’, ‘नाहीशी कर’, ‘धीर दे’ आणि ‘नवरी घेऊन जा’… ‘डोळे भरले तर भरू देत’ ही विनवणी झाली आणि ‘कळ पळभर मात्र खरे धर ते’ हे कबूल करून गाणं संपलं. विमलाबाईंच्या बंद डोळ्यांतून पाणी आलं. तेवढ्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनी डोळे उघडले. समोरचा प्रत्येक माणूस टाळ्या वाजवत होता. त्यांच्या नजरेनं वामनरावांना हुडकलं. त्यांचा चेहरा खूष दिसत होता. ते टाळ्या वाजवत होते. विमलाबाईंना आनंदाचं भरतं आलं. त्या लगबगीनं उठल्या. इतर कुणाकडेही लक्ष न देता त्यांनी वामनरावांना गाठलं आणि एखाद्या शाळकरी मुलीनं विचारावं त्या उत्सुकतेनं विचारलं, ‘‘कसं झालं गाणं?’’
खुषीत हसत वामनरावांनी सांगितलं, ‘‘एकदम बेस्ट! बाजी मारली तुम्ही विमलाबाई. दुसरी फेरी नक्की!’’

ते ऐकून विमलाबाईंना कृतकृत्य झालं. उरलेली एक-दोन गाणी झाली. दुसर्‍या फेरीची घोषणा झाली. त्यात आपलं नाव ऐकताना विमलाबाईंना मनापासून खुदुखुदु हसायला आलं. वामनराव म्हणाले, ‘‘आता यापुढे घरी जाऊन तू स्वयंपाक करणार. मग आपण जेवायचं… त्यापेक्षा बाहेरच काहीतरी खाऊया.’’
चारच्या सुमाराला दुसरी फेरी सुरू झाली. आता विमलाबाईंची धाकधूक वाढत होती. पहिल्या फेरीतून सुटलो… पण आता खरी स्पर्धा होती. ऐकणारांची संख्याही वाढली होती. परीक्षकांनी विमलाबाईंना ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे…’ तयार ठेवा म्हणून सांगितलं आणि त्यांचा धीरच खचला. आशाबाई आणि हृदयनाथ! एवढा आपला जीव नाही, हे त्यांना समजत होतं. सगळ्याबरोबर फजिती! गाणी देताना वामनरावांनी जरा तरी विचार करायला हवा होता. त्यांच्यामुळे हसं होणार आहे. शेजारी बसलेल्या वामनरावांना त्या म्हणाल्या, ‘‘चला घरी. मी काही स्टेजवरून ‘जिवलगा’ म्हणार नाही. घरी गुणगुणते… तुम्ही ऐकता, ते वेगळं. इथली फजिती, कुचेष्टा, हसं, खोटी सहानुभूती सगळं वेगळं. तो अपमान मला नकोय. सहनच होणार नाही… त्यापेक्षा निघून गेलेलं बरं.’’
त्यांच्याकडे बघून खेदानं मान हलवत वामनराव म्हणाले, ‘‘म्हणत असाल तर जाऊया, पण नंतर ते कायम डाचत राहील तुम्हाला. तुम्ही तयारी केली आहे. जीव तोडून एकेक गाणं शंभर-शंभर वेळा गायला आहात. पहिल्या फेरीतून दुसर्‍या फेरीत गाणं चांगलं झालं म्हणून आलात ना, आता त्या मंचावरून गाणं हा तुमचा हक्क आहे. बाकी स्पर्धा, बक्षीस या सगळ्या गोष्टी आता फिजूल आहेत. आता हे समोरचे पाचशे कान ऐकताना गाणं महत्त्वाचं, असं माझं मत. त्यातून तुम्ही म्हणत असाल, तर चला…’’ त्यांच्याकडे त्रासिक चेहर्‍यानं बघत विमलाबाई म्हणाल्या, ‘‘आयुष्यभर असंच निरुत्तर केलंत. काय बोलायचं!’’
वामनरावांनाही सणक आली, पण त्यांनी राग आवरला आणि ते एकदम उठून बाहेर निघून गेले. त्यांच्यामागे आपणही बाहेर पडावं, अशी तीव्र इच्छा त्यांना झाली. पण आपण आता न गाता गेलो, तर घरी ज्वालामुखीचे स्फोट होतील, हे त्यांना माहीत होतं. मग त्याही हळूहळू स्पर्धक बसले होते त्या जागेकडे निघाल्या.

गायला बसता बसता त्यांनी बघितलं, वामनराव आत येऊन बसले होते. त्यांना धीर आला आणि रागही. पुन्हा एकदा शरीरात रसरसलेपण जाणवायला लागलं. त्यात रोमांच होता, थरार होता, उत्सुकता होती, भीती होती. त्यांच्या तळहातांना घाम सुटला. पण आता त्यांची गायल्याशिवाय सुटका नव्हती. त्यांनी उसनं अवसान आणून आत्मविश्‍वासानं साथीदारांकडे पाहिलं. समोर ऐकण्यासाठी सिद्ध झालेल्या श्रोतृवर्गाकडे पाहून प्रसन्न हास्य केलं. खणखणीत आवाजात नाव सांगितलं. गाणं सांगितलं. ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ आणि मग डोळे मिटून जरासं पुढे झुकून सुरुवात केली. ‘जिवलऽ गाऽऽ राऽहिलेऽऽ रे दूऽऽर घर माझे…’ जसं गाणं सुरू झालं तसं त्यांना वाटलं, आता ही माझी शेवटची साडेतीन-चार मिनिटं आहे. पुन्हा कशाला मी इथे बसून गाते आहे. एका बाजूला हे सगळं मनात सुरू असताना दुसर्‍या बाजूला गाणं सुरूच होतं. सगळं सुरळीत सुरू असताना पुढच्या वळणावर ‘ती’ सरगम दिसायला लागली आणि विमलाबाई धसकल्या. ती सगरम आपल्याला येत नाही, हे त्यांना नक्की माहिती होतं, पण आता… आता ती पूर्ण सोडून देऊन गाणं पूर्ण करायचं, हा एकच मार्ग होता. ते बरं दिसलं नसतं, हे त्यांना कळत होतं, पण दुसरा मार्गच नव्हता.

‘गाव मागचा मागे पडला’ सुरू झालं. एकेक जागा, एकेक शब्द बारीकसारीक ताना करत ‘मिटले दरवाजे’वरची तान झाली आणि त्या क्षणभर थबकल्या. आता ती ‘सरगम’ आणि मग शेवटचं कडवं ‘निराधार मी, मी वनवासी’ त्या सेकंदभरात त्या ‘सरगम’मुळे त्यांनाच निराधार झाल्यागत वाटलं. पण सेकंदभरच. वार्‍याच्या वेगानं त्यांचा मेदू धावत होता. ‘गाण्यात स्वर महत्त्वाचे स्वर… बाकी सगळं नंतर’ वामनरावांचं वाक्य त्यांच्या मेंदूत दुमदुमलं. वाटलं ‘सरगम’ची अक्षरंच म्हटली पाहिजेत, असं थोडंच आहे? स्वर महत्त्वाचे. आणि सेकंदाच्या शंभराव्या भागात त्यांचा निर्णय झाला. त्यांनी पेटीवाल्याकडे एक नजर टाकली आणि ‘आ’कार लावला. त्याला क्षणभर बिचकल्यासारखं झालं. मग दुसरा स्वर… मग कोडं उलगडलं. त्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटलं आणि त्याची बोटं चालायला लागली. ऐकणारे श्रोतेसुद्धा एका अपेक्षेनं ऐकत असतात. त्यांना गाता येत नसेल, तरी ताना-आलापांसकट गाणी माहिती. आता सरगम असं मनात म्हणत त्याची वाट बघणार्‍यांना एकदम चुकल्यासारखं झालं.

सगळे चेहरे नवलानं मंचाकडे वळले. तेच स्वर फक्त अक्षरांच्या ऐवजी आलापी. हे पहिल्यांदाच घडत होतं. वेगळं पण छान वाटत होतं आणि टाळ्या पडल्या… हे सर्वस्वी अनपेक्षित होतं. त्या धुंदीतच त्या वामनरावांपाशी जाऊन बसल्या. वामनराव खूष दिसत होते. ‘‘विमलाबाई, हे वेगळंच होतं. मस्त मस्त! मजा आली. तुम्ही स्पर्धेत भाग घेतला नसेल कदाचित, पण तुम्हाला गाणं येतंय.’’
त्या पाच मिनिटं शांत बसल्या. सकाळपासूनची सगळी अस्वस्थता, सगळी चिडचिड निघून गेली होती. मनात एक वेगळीच शांतता भरून राहिली होती. वामनरावांकडे बघून प्रसन्न हसत त्या म्हणाल्या, ‘‘चला, आता मात्र जाऊया… दमल्यागत झालंय… घरी जाऊन हातपाय पसरून बसणार आहे.’’
वामनराव म्हणाले, ‘‘आता एवढा दिवस घालवलाय, तर बक्षीस समारंभ करूनच जाऊया. तुम्हाला ‘उत्तेजनार्थ’ का होईना मिळणार, असं मला नक्की वाटतंय.’’
त्यांचं बोलणं ऐकून विमलाबईंना मनापासून खुदुखुदु हसायला आलं.

अखेरीस बक्षीस समारंभ सुरू झाला. नाट्य संगीत, तबला, लहान गट, मोठा गट असं करता करता आता शेवटी स्पर्धा सुगम संगीत मोठा गट, असं पुकारून संयोजकांनी माईक बक्षिसांच्या यादीचं वाचन करणार्‍यांकडे दिला. ‘प्रथम उत्तेजनार्थ,’ असं म्हणत उत्तेजनार्थाची तिन्ही बक्षिसं झाली. विमलाबाईंना हुंदका आला. आपण पहिल्या तीनमध्ये नक्की नाही, पण… उत्तेजनार्थ मिळायला हवं होतं. निदान वामनरावांना वाटत होतं म्हणून तरी… त्यांनी वामनरावांकडे तिरप्या नजरेनं पाहिलं. ते निर्विकारपणे कशाचाच आपला संबंध नाही, असा आव आणून स्टेजकडे पाहत होते. ‘तृतीय क्रमांक’, ‘द्वितीय क्रमांक’ आणि शेवटी ‘प्रथम क्रमांक’, रोख रक्कम आणि चषक… निवेदक उंच स्वरात उत्साहानं सांगत होता. सगळं सभागृह उठून उभं राहिलं. टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. छायाचित्रकारांचे कॅमेरे लखलखले आणि पारितोषिक वितरण संपलं. माणसं जायला उठली, तेवढ्यात सूत्रसंचालकाचा उत्साही आवाज पुन्हा एकदा आला. ‘‘आता एक विशेष पारितोषिक…’’ हे ऐकल्यावर माणसं थबकली. ‘‘हे पारितोषिक एका ‘अनाम’ रसिक श्रोत्याकडून आलं आहे. नाव, ओळख न सांगण्याच्या अटीवर! आणि या विशेष पारितोषिकाच्या मानकरी आहेत विमलाबाई! विमलाबाई भावे! खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ज्या वयात केवळ व्यक्तिगत सुखदुःखाचे विचार येतात, त्या वयात त्यांनी स्पर्धेत भाग घेतला. दोन गाणी गायली. फक्त गायली नाहीत, तर चांगली गायली. आणि ‘जिवलगा’मध्ये जिथे सरगमला भले भले गोंधळतात, तिथे आपली फजिती उडू न देता, पूर्णपणे तो भागच वगळून टाकत त्या केवळ गळ्यातून आकारावर काढल्या आणि गळ्याचं वेगळंच अनपेक्षित दर्शन घडवलं… भले त्यांना स्पर्धेच्या नियमात राहून बक्षीस मिळालं नसेल, पण त्यांच्या या एकाच गोष्टीबद्दल हे पारितोषिक, विशेष पारितोषिक…’’

विमलाबाई तरंगत घरी आल्या. त्यांची सतत बडबड सुरू होती. तीन-तीनदा पारितोषिकाचं, विशेष पारितोषिकाचं पाकीट हातात घेऊन बघत होत्या. आपण ते पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारत आहोत, अशी पोझ घेऊन आरशात बघत होत्या. स्पर्धेतली गाणी तीन-तीनदा म्हणून झाली होती. ‘जिवलगा’तली सरगम जवळ आली, तेव्हा कसं धस्स झालं. मग उपाय कसा सुचला आणि तो अमलात आणत सरगम कशी टाळली हेसुद्धा दोनदा सांगून झालं.
वामनराव हे सगळं ऐकत बघत होते. त्यांना त्या सगळ्याची मजा येत होती, पण एका क्षणी त्यांची ही सहनशक्ती संपल्यासारखे ते खेकसले, ‘‘आता बास झालं. संपली संपर्धा… आता जेवणाचं बघा काय ते.’’

रात्रीचे दोन वाजले, तरी विमलाबाईंना झोप लागेना. वामनरावांशी झालेल्या तरुणपणातल्या स्पर्धांच्या गप्पा. अवचितपणे त्यांनी नोंदवलेलं नाव, नाराजीतून सुरू झालेली पण अतीव आनंद देऊन गेलेली गाण्यांची तयारी, ते दोघांचे सुखाचे क्षण… आणि आज स्पर्धा, अनपेक्षितपणे गाठलेली दुसरी म्हणजेच अंतिम फेरी. गाताना दाखवलेली जराशी हुशारी… त्यासाठी टाळ्या! आणि कळस म्हणजे ‘विशेष पारितोषिक’… सगळं कसं स्वप्नात घडावं तसं. अंथरुणावर अंग टाकल्यापासून या आनंदभोवर्‍यात गिरक्या घेत आनंदाचे ते ते क्षण त्या पुन्हा पुन्हा अनुभवत होत्या.

अडीच वाजता त्या पारितोषिकापर्यंत आल्या आणि भोवरा थांबला. आपल्याला कुणी दिलं असेल पारितोषिक? तेही नाव न सांगता? आपल्यापेक्षा दोन-तीन तरी स्पर्धक जास्त चांगले होते. मग आपल्यालाच का?… काही क्षण असे गेले आणि त्यांना उत्तर सापडलं. पुन्हा आनंदाची तार झणकारू लागली. त्या उठून बसल्या. समोरच्या कॉटवर भिंतीकडे तोंड करून वामनराव शांत झोपले होते. नाईटलँपच्या प्रकाशात त्यांच्याकडे क्षणभर बघत राहिल्या आणि मग जवळ जवळ ओरडल्याच, ‘‘अहो, थँक्यू बरं का सगळ्यासाठी… आणि विशेष पारितोषिकासाठी! नाहीतर मला कोण देणार? विशेष पारितोषिक? गेल्या आठवड्यातल्या सगळ्या आनंदासाठी पुन्हा एकदा थँक्यू!’’
आणि त्या क्षणार्धात गाढ झोपी गेल्या.

– जनार्दन लिमये

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.