Now Reading
आत्मशोध

आत्मशोध

Menaka Prakashan

सकाळी उठल्याबरोबर तिनं सर्वात आधी आपल्या आगामी फिल्मचे फोटो आणि पोस्ट फेसबुकवर टाकली आणि प्रसन्नचित्तानं हसत ती खिडकीबाहेर पाहू लागली. ढगांनी आकाश घेरून टाकलंय, थंड वारा सुटलाय, सूर्य दूर कुठे दडून बसलाय… शूटिंगसाठी योग्य वेळ. गरमी वाढण्यापूर्वी ते शूटिंग संपवू पाहत आहेत.

ही शॉर्ट फिल्म बनवण्याचं जाहीर झाल्यापासून ती एका वेगळ्याच खुषीत मिरवत असते. जणू तिची कित्येक जन्मांची आस पुरी होतेय. अपुर्‍या इच्छा अधूनमधून ज्वाळेसारख्या उफाळून येतात आणि आहुती तर स्वत:चीच पडते ना! युट्युबवर शॉर्ट फिल्म्स बघायला लागल्यापासून कित्येक विलक्षण प्लॉट्स तिच्या डोक्यात घोळायला लागले आहेत. जे आतापर्यंत सांगू शकले नाही, इतरांच्या भीतीनं, ते सांगावं. जे कित्येक वर्षांपासून आत कोंडून राहिलं आहे, आता चवताळून उठतंय, उफाळून येतंय, बाहेर येण्यासाठी व्याकूळ झालंय, ते सांगावं. जे कुणालाही सांगितलं नाही, अगदी स्वत:लाही नाही, ते सांगावं.
खरंतर स्वत:ला समजावता समजावता ती थकून गेली आहे. गरज आहे का हे सांगण्याची? जे आणलंयस स्वत:बरोबर जन्माला येताना, ते घेऊन जा ना वर. आता एवढ्या मोठ्या जगात तुला समजून घेणारा माणूस, किंवा बाई शोधायला कुठे जाणार तू? पण नाही. आतून कुणीतरी सतत सांगतंय, की आवश्यक आहे हे सांगणं. तुला समजून घेण्याची गरज कुणाला पडली नसेल, तर जोरात सांग आणि जोरात सांगायचं माध्यम आहे मीडिया. आपल्या नकळत हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्यापर्यंत पोचणं. तो तुमचं ऐकेल आणि म्हणेल, ‘येस, येस, मी पण हाच विचार करत होतो.’ शब्दांचा खजिना नाही त्यांच्याकडे. केवळ म्हणूनच ते सांगू शकले नाहीत, अशा हजारो लोकांच्या विचारांना साद घालायची.

ओह! तीही कुठे वाहवत चाललीये! तिनं पुन्हा आपल्या पोस्टवर नजर टाकली, तर कित्येक मेसेजेस येऊन पडले होते. किती अभिनंदनं, शुभेच्छा, संदेश. एकेकाळी हे बघितल्यावर वाटायचं, किती रिकामा वेळ असतो लोकांकडे! व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम सुरूच असतं दिवसभर. आज जाणवतंय, तेही स्वत:सारखं कुणीतरी शोधताहेत. त्यांचंही कुणी ऐकत नाही आणि तेही किंचाळताहेत – ‘अरे, कुणीतरी ऐका रे.’

तिनं पटकन मोबाईल खाली ठेवला आणि ती किचनकडे धावली. सर्वात आधी एक कप कॉफी हवी. आज लवकर तयार होऊन निघायला हवं. शूटिंगचं एकवीस दिवसांचं शेड्युल ठरलंय. जास्तीत जास्त एक महिना. तिचा रोल कोणकोणत्या दृश्यांत किती आहे, काय घालायचं, कसं दिसायचं सगळं आहे तिच्याकडे. त्या पात्रात कसं शिरायचं, हेही तिला माहीत आहे, कारण कथा तिचीच तर आहे.

मोबाईल गुणगुणायला लागला. स्क्रीनवर तिच्या मुलाचा चेहरा, ऑस्ट्रेलियाहून. हीच वेळ असते त्याच्याजवळ, बोलण्यासाठी. बघूनच तिची छाती धडधडू लागली.
‘‘हाय बाळा, कसा आहेस?’’ तिनं मोबाईल उचलला आणि खूष झाल्याची अ‍ॅक्टिंग केली.
‘‘हाय आई, खूष दिसतेयस?’’
‘‘हो, खूप…’’ अ‍ॅक्टिंग तर ती छानच करते.
‘‘काही खास?’’
‘‘सांगते ना. तू सांग, तू कसा आहेस?’’
‘‘ठीक. आई, तुझ्याकडे काम होतं.’’
‘‘हं, बोल बाळा.’’
‘‘आई, तुला माहीतच आहे, स्वातीची डिलिव्हरी जवळ आलीये. गेल्या महिन्यापासून तुला विचारतोय, तुझं कधीचं तिकीट काढू, तर तू सांगतच नाहीस…’’
‘‘मला माझी बरीच कामं करायची असतात. आणि मीही तिथे बोअर होते…’’
‘‘तुझी कसली कामं, आई? मला कळत नाही, तू करतेस तरी काय? आपली एखादी तरी जबाबदारी लक्षात घे.’’
‘जबाबदारी? जबाबदारी निभावण्याव्यतिरिक्त मी दुसरं केलंच आहे काय? स्वत:च्या बाबतीतली जबाबदारीच काय ती निभावली नाही. आणि बोअर होते, कारण तुमच्या घरात मला स्थान, दर्जा कुठे आहे! मला चांगलंच ठाऊक आहे, की मला का बोलावलं जातंय…’ ती विचार करत होती, पण बोलू मात्र शकली नाही.
‘‘तुला ठाऊक आहे, इथे इंडियातल्यासारखे सर्व्हंट्स मिळत नाहीत. सगळं स्वत:लाच करावं लागतं. नॅनी ठेवायची तर दहा हजार पर डे पडतात. शेवटी तू नाही येणार तर कोण येणार? माझ्या सगळ्या इंडियन फ्रेंड्सचे पेरेंट्स येतात. नाहीतर तू…’’
ती गुपचूप ऐकतेय.
त्याला वाटलं, आपलं बोलणं कठोर होतंय. मग थोडं नरमाईनं तो म्हणाला, ‘‘तू म्हणत असतेस ना, माझ्याबरोबर तू जास्त वेळ नाही घालवलास, तर आता ये ना. सहा महिने आरामात राहता येईल. आणि तिथे राहिलंय तरी काय आता? घराला कुलूप लावायचं आणि यायचं.’’
‘‘मला विचार करायला वेळ दे, बाळा… मी तर उरलेय ना की तीही नाही?’’
‘‘किती वेळ? उद्यापर्यंत विचार कर. आणि विचार करण्यासारखं आहे काय तुझ्याजवळ?’’ त्यानं फोन डिस्कनेक्ट केला.

खरोखरच तिच्याजवळ विचार करण्यासारखं काही नाही, कारण आतापर्यंत तिच्याकडे विचार करायला काहीच नव्हतं. जेव्हा तुम्ही दुसर्‍यांनी वाढून ठेवलेलं आयुष्य जगायला राजी होता, तेव्हा स्वत:चे विचार, स्वत:ची स्वप्नं यासाठी जागा उरतेच कुठे?
पण या वेळी तिला आपल्या मुलाचा विचार करायची इच्छा नाही. सध्या तिच्या डोक्यात तिनं लिहिलेल्या कथेची नशा आहे. अनेक वर्षं आपल्या आत जोपासल्यानंतर तिनं ती कागदावर उतरवली होती. तीही कधी, तर आपल्या एका चित्रकार मैत्रिणीबरोबर भटकंती करायला निघाली होती तेव्हा.
ऐकायला विचित्र वाटेल, पण सत्य हेच, की पती वर आणि मुलं बाहेर गेल्यानंतरच स्त्री स्वतंत्र होते. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर जेव्हा घर पूर्ण रिकामं झालं होतं, ‘बिचारी एकटी कशी राहणार?’ अशी नातेवाइकांची नवी-नवी सहानुभूती तिच्या पाठीशी होती, तेव्हा तिनं या सहानुभूतीचा फायदा उठवला. अगदी महिनाभरासाठी.
त्या दिवसांतल्या दृढ, निवांत क्षणांमध्ये आपल्या पेंटर मैत्रिणीच्या आतल्या स्वाभिमानी, निर्भय आणि बिनधास्त स्त्रीला बघून ती चकित झाली होती. एका बिनधास्त स्त्रीचं स्वप्न एक बिनधास्त स्त्रीच समजू शकते.
त्या मैत्रिणीसाठी जीवन आणि कला ही एकाच गोष्टीची दोन नावं आहेत. तिला माहीत आहे, आपल्या आतली सृष्टी आपण अतिशय सुंदरतेनं जगाला दाखवू शकतो, पण फक्त कलेच्या माध्यमातून. कला म्हणजे आपल्या ‘मी’चा एक छोटासा तुकडा असतो. ती म्हणते, ‘आपण ज्या आवेगात निर्मिती करतो, त्या आवेगाला प्रज्वलित ठेवणारा अग्नी सदैव आपल्या आत पेटत असला पाहिजे. आणि ऐक, आपल्या विचारात खूप नावीन्य असतं, पण आपण स्वेछेनंच आपलं जीवन नष्ट करून टाकतो, कारण त्यासाठी आवश्यक असणार्‍या साहसाचा आपल्यात अभाव असतो.’ तिनं लक्षपूर्वक ऐकून घेतलं. ती मैत्रीण रात्र-रात्रभर बसून आपल्या पेंटिंग्जच्या रंगांनी आपल्या कामना प्रदीप्त करायची. त्या कामना, ज्या इतरांना दिसत नसत; पण तिला मात्र आपल्या अस्तित्वाची जाणीव क्षणोक्षणी करून देत असत.

तेव्हाच तिनं पहिल्यांदा आपल्या मैत्रिणीला ती गोष्ट सांगितली, ‘‘ऐक ना. माझं प्रेम आहे एकावर.’’
‘‘अच्छा? म्हणजे तू आता जिवंत आहेस?’’ आणि ती हसली. ती मैत्रिणीकडे बघतच राहिली. ‘‘हो, मी आता जिवंत आहे.’’
‘‘त्याला सांगितलंस हे?’’ मग तिनं विचारलं.
‘‘नाही, पण मला वाटतं, त्याला माहीत आहे.’’
‘‘तो बोलला नाही काही?’’
‘‘त्याला माझ्या सीमांची जाणीव आहे…’’
‘‘तू कविता का करतेयस?’’
‘‘कारण प्रेमाला प्रवाही व्हायचंय…’’ तीही हसू लागली.
‘‘ही कविता त्यालाच गाऊन दाखव जा.’’ तिनं फणकारून म्हटलं.
‘‘त्याला सांगणं गरजेचं आहे?’’
‘‘हो. तुला सुखानं मरायचं असेल, तर भेटणंही आवश्यक आहे…’’
‘‘चल, त्याच्या शहरात जाऊया.’’ कधीकधी आत दडलेली बिनधास्त स्त्री बाहेर डोकावते .
‘‘ऑनलाईन बुकिंग करते मी. मी दिवसभर त्या शहरात भटकेन, चांगल्या चांगल्या रेस्तराँमध्ये खाईन, पेंटिंग करीन. तू तुझी इच्छा पुरी कर…’’

तीन दिवसांनंतर त्या आपल्या शहरातून निघाल्या. त्या दुसर्‍या शहरात त्या दोन दिवस राहिल्या. त्यांच्या येण्याच्या बातमीनं अख्ख्या शहराच्या नसानसांतून प्रतीक्षा आणि प्रेम भरून राहिलं होतं. पहिल्यांदाच तिनं प्रतीक्षा संपल्याच्या मद्याचा पहिला घोट प्राशन केला. खरंतर ती एक कॉकटेल होती. अनेक प्रकारची मद्यं मिसळून केलेली. प्रत्येकाचा स्वाद वेगवेगळा. ती मिसळून एक नवाच स्वाद बनला होता. त्या रात्रींमध्ये त्या कॉकटेलचे कित्येक ग्लास तिनं रिचवले आणि जीवनाच्या नशेनं ती धुंद झाली.

पहिल्यांदाच तिला जाणवलं, पन्नाशीनंतर जीवनाच्या नदीचा वेग थोडा कमी होतो. आजूबाजूची झाडं, जंगलं, गावं न्याहाळत, आसपास फुललेल्या फुलांना आपल्या नसांत आणि आत्म्यात सामावत सावकाश वाहते ती. बालपणीचा बालिशपणा आणि तारुण्याच्या जोशापासून मुक्त होऊन अनुभवांची ही नवी नारिंगी सकाळ लक्षपूर्वक पाहत जाते. कसलीही घाई नाही. हेच तर करू शकली नव्हती ती आजवर. लक्ष देऊन पाहणं, ऐकणं आणि जगणं. खरंतर ऐकण्या-पाहण्यातच जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. आपल्या गाभ्यातून येणारा तो आवाज ऐकणं, अदृश्य असला तरी दिसतो तो. आपल्या आत ‘दडण्या’तच ‘दिसणं’, हेच त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आपल्या निवांत कोपर्‍यात आपल्या सोबतीनं बसायचं, आपल्या धगीत आपल्या हातांना ऊब द्यायची, आपल्या अनुभवांचं गीत गायचं… याहून जास्त काय हवं असतं एखाद्याला?

दोन दिवस? या दोन दिवसांविषयी ती कुणाकडेच बोलत नाही. परतल्यावर मैत्रिणीनं जेव्हा तिच्याकडे कटाक्ष टाकला… तिनं हसतच सांगितलं, ‘‘जीवन शोधायचं नसतं, ते सापडतं. जगणं ही एक कला आहे. गुपचूप पीडा सहन केल्यावरच प्राप्त होते.’’ मैत्रीण फक्त हसत राहिली. काहीही विचारलं नाही तिनं. मैत्रीचं हे एक बरं असतं. जेव्हा आत बोलावू तेव्हाच येणार, नाही तर थांबणार बाहेरच, वाईट वाटून न घेता.
त्या मैत्रिणीनं सुचवलं म्हणून तिनं ते दोन दिवस काही दृश्यांमध्ये गुंफले, काही शब्दांत बांधले. सगळं काही व्यक्त करता येत नाही, हे माहीत असूनही. वास्तवातल्या गोष्टी शब्दांच्या पलीकडे घडतात आणि शब्दांच्या पलीकडेच उरतात. त्यांना शब्दांत सांगायचं, तर काटछाट होते. पण कधीकधी शब्द आपल्या इवल्याशा शरीरात सबंध मनाचा अवकाश सामावून घेतात. तर ‘सांगणं आवश्यक आहे,’ हे तिच्या मैत्रिणीचं ब्रीदवाक्य आहे. तिनं सांगितलं. आणि त्यावरच युट्युबसाठी एक शॉर्ट फिल्म बनवण्याची तयारी सुरू आहे.

एक फार्महाऊस घेतलंय भाड्यानं, एक महिन्याकरता. खर्चात कपात करण्यासाठी कॉस्च्युम आणि मेकअप स्वत:चा. तिचा रोल सुरू व्हायला अजून वेळ आहे, पण ती रोज येते. ती बघत राहते बरोबर काम करणार्‍या मुलींना हसता-बोलताना, दिवसभर बडबडताना. एक कॅमेरा सांभाळते, दुसरी तिच्या मुलीचा रोल करतेय. सगळा वेळ त्यांचा चिवचिवाट सुरू असतो, पण कॅमेर्‍यासमोर आल्यावर मात्र सारंच बदलून जातं. त्या जशा आहेत, तशा नाही राहत. जुने कपडे काढावेत, तसं आणखीही काही उतरवलं जातं त्यांच्या तन-मनावरून. त्यांचं बालिश वागणं तिला आवडतं… हेच तर आयुष्य तिला जगायचं होतं, पण कुणास ठाऊक कुणी तिची ही स्क्रिप्ट हिसकावून घेऊन तिला, सदासर्वकाळ आपल्या जबाबदारीचं भान असणार्‍या प्रौढ स्त्रीचा रोल दिलाय.

मुलाचा फोन येतच राहतो.
ती पुन्हा पुन्हा सांगत राहते, ‘‘मला थोडा वेळ दे, बाळा.’’
आणि वेळ घेऊन घेऊन तिनं शूटिंग पुरं केलं. आता फक्त डबिंग करायचं बाकी आहे. मुलगा रागानं बेभान झालाय.
‘‘आई, तुला कळत नाहीये का, मी काय म्हणतोय ते? मी तुला तिकीट मेल केलंय, ते बघ. प्रिंटआऊट काढायची गरज नाही. मोबाईलवरचं दाखवलं तरी चालेल. यायचं तर ये, नाहीतर मर्जी तुझी. या बाबतीत मी आणखी एक शब्दही बोलणार नाही. आणि यापुढे मी इंडियात येऊ शकणार नाही. पुढचं समज काय ते…’’ आणि त्यानं मोबाईल डिस्कनेक्ट करून टाकला.
‘मी गेलं पाहिजे? जावं तर लागेलच.’ ती स्वत:लाच सांगते. ‘तो समजून नाही घेणार. मलाच समजून घ्यावं लागेल. आई बनणं हे मुलगा बनण्यापेक्षा जास्त आवश्यक आहे. कुणी ना कुणीतरी बनणं हेच आवश्यक ठरलंय आजपर्यंत. स्वत: बनायची संधीच दिली नाही कुणी.’ मनात विचार येताच तिला वाटलं, ती चुकीचा विचार करतेय. दुसरं कोण संधी कशाला देईल? संधी तर कमवावी लागते. जगातल्या इतर वस्तूंसारखी. पण आता तर संधी कमवायची वेळही निघून गेलीये. आता मुलांना आमची नाही, आम्हाला त्यांची गरज आहे. न जाण्याचा परिणामही तिला ठाऊक आहे.

जड मनानं तिनं पॅकिंग करायला सुरुवात केली. ‘उद्याचं तिकीट आहे. डबिंग? काय होणार डबिंग करून तरी?’ मुलानं ऐकलं, तर तो जोरजोरात हसेल. सहन नाही करू शकणार ती, त्याचं ते हसणं. ते तिला क्षणोक्षणी आठवण देत राहतात, की ती कुचकामी, बिनकामाची आहे. मुलांच्या उपयोगी पडणं, एवढंच तिचं काम आहे. नाहीतर तिचं आयुष्य बेकार आहे.
तिच्या आत काहीतरी जळतंय. ‘मला तुमच्याकडे नाही यायचं. तुम्ही मला सतत आठवण देत राहता, की माझा रोल मी नीटपणे निभावतेय की नाही. आणि सत्य हेच आहे, की हा रोल निभावता निभावता मी थकून गेलेय. जगायचं राहून गेलेल्या बाल्याची हाक ऐकायचीये मला. जगायचं राहून गेलेल्या तारुण्याची मागणी पुरी करायचीये मला. माझ्या आतली कित्येक जंगलं कापून टाकलीयेत मी, तुमच्यासाठी एक घर बनवण्याच्या प्रयत्नात. तुम्ही कधी मागे वळून विचारलं नाही, की त्यावर माझ्या स्वप्नांची जी कच्ची फळं लागली होती, त्यांचं काय झालं? ती खारींनी खाल्ली, की कावळ्यांनी बोचकारून टाकली, की कच्चीच सडून गेली? स्वत:ची स्वप्नं पुरी करायच्या नादात तुम्ही लोकांनी काय काय तुडवलं, याचा तुम्हाला पत्ताच नाही. माझ्या आयुष्याची सारी वर्षं तुम्हाला दिली. आता ही शेवटची काही वर्षं मला कुणाला द्यायची नाहीयेत, कुणालाही नाही. मी स्वत:ला तुमच्याकडून हिसकावून घेतेय, स्वत:साठी.’ पण विचार करून काय होणार? हा घोटही तिनं गिळून टाकला.

ती प्लॅटफॉर्मवर बसली आहे. दिल्लीला जाणारी ट्रेन येईलच आता. चारी बाजूला कोलाहल. ट्रेन आली की धावपळ. नंतर पुन्हा पहिल्यासारखं. तिचं सामान हमालबाईनं प्लॅटफॉर्मवर आणून ठेवलंय. तिनं दोनशे रुपये काढून दिले. ती पन्नास परत द्यायला लागली, तर ती हसूनच ‘नको’ म्हणाली. हमालबाईच्या चेहर्‍यावर प्रसन्नतेची लाट उसळून आली. गरमी खूप आहे. ती घामानं चिंब भिजलीये. तिनं फेटा सोडला आणि तिथेच उभी राहून ती घाम पुसायला लागली. दोघींनी एकमेकींकडे बघितलं.
‘‘कधीपासून करतेयस?’’
‘‘दोन वर्षं झाली.’’
‘‘एवढं सामान उचलून नेतेस?’’
‘‘सामानाचंच ओझं नाही, बरंच काही उचलावं लागतं. घर, नवरा, मुलं… ओझं तर वाहावंच लागेल. नाही म्हणून जाणार कुठे? आता तर सवय झालीये. आपलं नशीब म्हणायचं आणि करत राहायचं.’’ क्षणभर थांबून तिनं विचारलं, ‘‘सामान चढवू? गाडी येईल आता.’’
तिनं ‘हो’ म्हणून मान हलवली. सिग्नल झालाय. ती एसी कूपेच्या समोर उभी आहे. हमालबाई समोर ठेवलेल्या कूलिंग मशीनचं थंडगार पाणी काढून पिते आणि हात-तोंड पुसत तिच्या समोर येऊन उभी राहते. थोड्याच वेळात ट्रेन धडधडत येऊन प्लॅटफॉर्मला लागते. एसी कूपेचा दरवाजा उघडा आहे. लोक उतरू लागले आहेत. हमालबाईनं मोठी अटॅची उचलली आणि त्या बाजूला फरफटत नेऊ लागली.
‘‘ थांब.’’ तिनं घाईघाईनं म्हटलं. हमालबाईनं मागे वळून तिच्याकडे पाहिलं.
‘‘राहूदे. आता मीही ओझं वाहून वाहून थकले आहे. सवय तर मलाही झालीये. स्वत:ला हरवून जाण्याची. पण एक प्रयत्न मी नक्कीच करीन, स्वत:ला वाचवण्याचा.’’
भरलेली ट्रेन तिच्या रिकाम्या प्लॅटफॉर्मपासून दूर जातेय.

– गौरी गाडेकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.